पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी खूप दूरवरचा विचार करून संघटनशास्त्र शिकवणारी संघशाखा देशाला दिली व राष्ट्रकल्याणाचे ‘प्रार्थनेच्या’ रूपाने पूर्ण दर्शन देशाला दिले. राष्ट्रकल्याणाचे सामूहिक संकल्पाचे स्मरण करण्याचे स्थान म्हणजे संघशाखा. संघशाखा म्हणजे राष्ट्रीय तपस्थली. या तपस्थानांवर लाखो नागरिक राष्ट्रकल्याणाचा संकल्प ‘परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं’ या शब्दांनी करीत असतात.
एखादा छोटासा नियमदेखील केला व त्याचेे जन्मभर पालन केले, तर ते एक प्रकारचे तपच होईल. एखाद्याने रामनामाचा जप करण्याचे ठरवले, 108 मण्यांची माळ रोज फिरविण्याचा निश्चय केला, ठरावीक वेळही ठरवली व नियमांचे काटेकोरपणे पालन केले, तर त्याला तपच म्हणावे लागेल. नियम म्हटल्यावर परीक्षा असली काय, स्वतःचेच लग्न असले काय किंवा दुःखद प्रसंग असला काय, पालन करावेच लागेल. वर्षानुवर्षे पालन केले तर ते तपच होते. अशा माणसाचे मनोबल वाढते. जीवनामध्ये सुखदुःखाचे प्रसंग येतातच. मनोबल चांगले असलेला मनुष्य ते सहज सहन करताना दिसतो.
प्रतिदिन शाखेत जाणे हादेखील एक नियमच आहे. शाखा कार्यपद्धती विकसित करणारे पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार काही कामानिमित्त खेडेगावात गेले होते. काम आटोपून निघायला उशीर झाला. नागपूरला प्रभात शाखेत जावयाचे होते. नागपूरला जाणारी बस नव्हती. डॉक्टर पायी चालत निघाले. बराच वेळ चालल्यावर मागून एक ट्रक आला. डॉक्टरांजवळ आल्यावर ट्रक थांबला. ड्रायव्हर डॉक्टरांना ओळखणारा होता. पुढचे चालणे वाचले. डॉक्टर वेळेत शाखेवर जाऊ शकले.
चुलते आबाजी हेडगेवार यांची बहीण आजारी होती म्हणून डॉक्टरांना इंदोरला काही दिवस जावे लागले. इंदोर व देवास अशा दोन शाखा प्रारंभ केल्या.
बिहारमध्ये राजगीरला गरम पाण्याचे झरे आहेत. डॉक्टर उपचाराकरिता काही दिवसांकरिता गेले होते. डॉक्टरांनी राजगीरला एक विद्यार्थी शाखा प्रारंभ केली.
विश्व हिंदू परिषद महाराष्ट्राचे अधिवेशन पंढरपूरला होते. सभेचे अध्यक्ष होते प.पू. धुंडामहाराज देगलूरकर. अनेक वक्त्यांपैकी एक वक्ते होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी. त्यांनी अध्यक्ष महोदयांना विनंती केली की, मी 07.00 वाजता संघशाखेत जाईन. 07.30 पर्यंत परत येईन. हा वेळ सोडून माझे भाषण ठेवावे. प.पू. धुंडामहाराजांना श्रीगुरुजींचा शाखेत जाण्याचा नियम माहीत होता. ठरल्याप्रमाणे पंढरपूर नगर कार्यवाह मंचाजवळ मोटार घेऊन आले. श्रीगुरुजी शाखेत जाऊन आले. गुरुजींचे भाषण 07.30 वाजता झाले.
पाचवे सरसंघचालक प.पू. सुदर्शनजी पदमुक्त झाल्यावर भोपाळ येथील ‘समिधा’ कार्यालयात राहावयास आले. मा. सुदर्शनजी यांनी संपर्क करून विद्यार्थी बाल शाखा प्रारंभ केली. ते स्वतः नियमित बालांच्या शाखेत जात असत (वय वर्षे 80).
परीक्षा असो, घरामध्ये मंगल प्रसंग असो, आपली शाखा चुकणार नाही याची काळजी घेणारे कर्मठ कार्यकर्ते प्रत्येक राज्यात मिळतील.
एका जिल्हा प्रचारकाने सांगितलेली आठवण. एका स्वयंसेवकाची बहीण एकाएकी वारली. वय वर्षे 28. बसमध्ये बसल्या जागेवरच गेली. पार्थिव शरीर घरी आल्यावर आईवडिलांच्या आकांताला पारावार राहिला नाही. दुसर्या दिवशी अंत्यसंस्कार झाला. त्या दिवशी स्वयंसेवक संध्याकाळी शाखेत होता.
हजारो शाखांमध्ये लाखो स्वयंसेवक ‘पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते’ अशी भारतमातेची प्रार्थना रोज म्हणत असतात. प्रार्थना सामूहिक असते. व्यक्तिगत लाभांचा लवलेशही नाही. राष्ट्रकल्याणाच्या हेतूने चाललेले सामूहिक ‘तप’ म्हणजे संघाची शाखा. तपामुळे मनोबल वाढते. जसे व्यक्तीचे तसेच समाजाचे आणि राष्ट्राचेही. पराभूत मानसिकतेतून बाहेर येऊन विजयाच्या आकांक्षेने हिंदू समाज उभा राहिला पाहिजे.
द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी म्हणत असत, ‘स्वयंसेवक ‘शाखा’ चालू रखे तो विजय ही विजय है।’ ‘एकात्म मानव दर्शन’ प्रणेता पं. दीनदयाल उपाध्याय यांनी म्हटले आहे की, समाजाचा ‘विराट’ नेहमी जागा असला पाहिजे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत व कच्छपासून कामरूपपर्यंत पसरलेला हिंदू समाज एका महत्त्वाकांक्षेने एकाच वेळी उभा राहिला याचा अनुभव श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सर्व देशाला आला आहे. लाखो गावांहून गावकर्यांनी पूजन करून आपल्या गावची श्रीराम शिला अयोध्येला पाठवली होती. रामभक्ती आहेच, त्यामुळे हे झाले, असे म्हणता येईल. त्याच सुमारास रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ मालिका सुरू झाली होती. ‘श्रीराम’ या तीन अक्षरांचा जनमानसावर काय प्रभाव आहे याचा अनुभव सार्या देशाने घेतला. समाजाचा विराट जागा झाल्याचे खरे दर्शन दोन्ही कारसेवेत झाले. सर्व प्रांतांचे, सर्व जातीवर्णांचे, सर्व भाषाभाषक, सर्व पंथ-संप्रदाय, स्त्री-पुरुष, आपलेही पूर्वज श्रीरामच आहेत, असे म्हणणारे काही मुसलमान व ख्रिश्चन कारसेवक होते. कदाचित सर्व पक्षांचेही असतील.
पाचशे वर्षांपूर्वी लागलेला कलंक धुऊन टाकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती (विल पॉवर) कारसेवकांच्या मनात होती. अपमान धुऊन काढण्याची इच्छा होती. पाच तासांत गुलामीचे निशाण असलेला बाबरी ढांचा जमीनदोस्त झाला.
राजा सुहलदेवपासून आतापर्यंत (1992 पर्यंत) खूप युद्धे झाली. लाखो लोकांचे बलिदान झाले; पण उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिममध्ये सारा हिंदू एकच इच्छा घेऊन उभा राहिला. अशी देदीप्यमान घटना आपल्या देशाच्या इतिहासामध्ये पहिलीच असेल. राजेराजवाड्यांच्या काळात ‘यथा राजा तथा प्रजा’ असे शिकवले जात असे. आता ‘यथा प्रजा तथा राजा’ असे शिकवणे आवश्यक आहे.
समाजाचा ‘विराट’ जागा आहे याचा अनुभव दूरदूरहून आलेल्या कारसेवकांना आला. तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि कन्नड उत्तरेकडच्या लोकांना कळणे कठीण. दक्षिणेकडच्या कारसेवकांना हिंदी बोलता येत नव्हते. नुसते प्रांत व कारसेवक म्हटल्याबरोबर जी आत्मीयता प्रकट झाली त्याने दक्षिणेतील कारसेवक गदगद झाले. घरात बोलावणे, मालीशला तेल देणे, गरम पाणी, पोटभर भोजन व रात्री थांबणार असतील तर अंथरूण-पांघरुणाची सोय. ना ओळख ना पाळख. रामकार्याला चालले आहेत, हीच ओळख.
न्यायालयात तीस वर्षांचा वेळ गेला. पिढी बदलली; पण मंदिरासाठी निधी देण्यात तेवढाच उत्साह होता. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी तर जनतेचा उत्साह काही औरच होता.
श्रीराम सेतू रक्षा आंदोलनामध्ये हीच अनुभूती झाली. अरुणाचलपासून एर्नाकुलम्पर्यंत ठरलेल्या ठिकाणी एकाच वेळी संपूर्ण दोन तासांचे रास्ता रोको आंदोलन झाले.
अमरनाथ श्राईन बोर्ड जमीन विवादप्रसंगी जम्मूमधील सर्व स्त्री-पुरुष, मुले ‘शंकर, पार्वती आणि गणेश’ झाली होती.
महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, दशमेश श्री गुरू गोविंद सिंह महाराज, लच्छित बडफुकन, हरिहर बुक्क आदी अलीकडील कालखंडात झालेल्या वीर-पराक्रमी महापुरुषांमुळे हिंदू समाजाचा विराट जागा आहे याचा प्रत्यय आला; पण तो विशिष्ट भौगोलिक इकाईपुरता मर्यादित होता व काही काळ टिकला. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिममध्ये सर्वदूर हिंदू समाज जागा आहे असा अनुभव स्वतंत्र भारतात लोकशाही समाजरचनेनंतर पहिल्यांदाच आला आहे.
प्रसंगोपात जागृत होणारा समाज जगातील राष्ट्रराष्ट्रांच्या स्पर्धेमध्ये फार काही पुढे जाऊ शकणार नाही. समाजाचा विराट नेहमीच जागा हवा. म्हणून राष्ट्रकल्याणाचा संकल्प करून डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघास प्रारंभ केला. विराट जागा असणे हे स्वाभिमानाचे लक्षण आहे. देश रक्षणाची ग्वाही आहे. प्रगतिपथावरच्या वाटचालीचा विश्वास आहे.
संघाच्या कामाला व्यावहारिक रूप दिले ते म्हणजे प्रतिदिनाची शाखा. रोज राष्ट्रकल्याणाचे सामूहिक संकल्पाचे स्मरण करण्याचे स्थान.
रोज रामनामाचा जप हा व्यक्तीचा स्वतःचा संकल्प झाला. राष्ट्रकल्याणाचा संकल्प सामूहिकच असू शकतो. रोज संकल्पाचे स्मरण करणे यालाच ‘तप’ म्हणतात. राष्ट्रकल्याणाचा सामूहिक संकल्प म्हणून संघशाखा म्हणजे राष्ट्रीय तपस्थली. वर्तमानात सर्वदूर 80 हजार तपस्थानांवर लाखो नागरिक राष्ट्रकल्याणाचा संकल्प ‘परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं’ या शब्दांनी करत असतात.
‘परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं’ असा, रोज शाखेत म्हटल्या जाणार्या प्रार्थनेत उल्लेख आहे. परम सुख देणारे ते परम वैभव असे म्हणता येईल. परम सुखाची व्याख्या सूत्ररूपाने प्रार्थनेत दिली आहे. समुत्कर्ष व नि:श्रेयस या दोन्हींची प्राप्ती होईल ते परम सुख. समाजातील प्रत्येक घटकाला समुत्कर्ष व नि:श्रेयसची प्राप्ती झाली पाहिजे. समुत्कर्ष म्हणजे भौतिक संपदा व नि:श्रेयस म्हणजे ज्ञानसंपदा.
‘परम वैभव’ सर्व कल्याणकारी, सर्वसमावेशक आणि एकात्म दृष्टिकोन देणारा विचार आहे. वर्गसंघर्ष व राक्षसी स्पर्धा हा त्याचा आधार नाही. बंधुभावना हा त्याचा आधार आहे. बंधुभावना हे आध्यात्मिक तत्त्व आहे. ‘तत् त्वम् असि’ या वैश्विक सत्याचे व्यवहारात करावयाचे ते आचरण आहे. लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटीचा तो वैज्ञानिक आधार आहे म्हणूनच कदाचित पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले असतील की, ही तत्त्वे भगवान गौतम बुद्धांच्या ‘धम्म’मधून घेतली आहेत. (भौतिकवादी फ्रेंच क्रांतीच्या विचारातून घेतलेली नाहीत.)
‘तत्त्वमसि’ हे सत्य समजून घेतले, पचनी पडले, की बंधुभावनेचा विस्तार व विकास कितीही होऊ शकतो. आपले कुटुंब, आपले गाव, आपला देश आणि हे सारे विश्व व त्याही पुढे चराचराच्या सृष्टीपर्यंत त्याचा विस्तार होऊ शकतो. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ याच सत्याचे विशाल रूप आहे.
‘तत्त्वमसि’ या वैश्विक सत्यावर आधारलेल्या ज्ञानपरंपरेला ‘धर्म’ म्हणतात. तपाचा व संघटन शक्तीचा अहम् येऊन अथवा दुनियेच्या चकाचौंध वातावरणामध्ये भ्रमित होऊन आपण ध्येयापासून इकडेतिकडे भटकू नये म्हणून प्रार्थनेतील एक ओळ फार महत्त्वाची आहे. भावार्थ याप्रमाणे सांगता येईल. ‘आमची विजयशालिनी संघटित कार्यशक्ती’ या धर्माचे (भारतोत्पन्न ज्ञानपरंपरेचे) रक्षण करण्यास व आपल्या राष्ट्राला परम वैभव प्राप्त करून देण्यास समर्थ होवो.
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम्
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ॥
1940 ला डॉक्टरांचा देह पंचतत्त्वात विलीन झाला. तत्पूर्वी 1939 ला सिंदी या ठिकाणी प्रमुख पदाधिकार्यांची डॉक्टरांच्या उपस्थितीत बैठक झाली. दहा दिवस बैठक चालली. त्या बैठकीत ही प्रार्थना संघाची प्रार्थना म्हणून सर्वसंमत झाली. 1940 पासून आजपर्यंत सर्व शाखांवर म्हणजे राष्ट्रीय तपस्थानांवर ही प्रार्थना म्हटली जाते. इतक्यावर्षांच्या तपामुळे आता संघप्रार्थनेला मंत्रसामर्थ्य प्राप्त झाले आहे.
स्वातंत्र्य चळवळीच्या धकाधकीच्या काळातदेखील प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी खूप दूरवरचा विचार करून संघटनशास्त्र शिकवणारी संघशाखा देशाला दिली व राष्ट्रकल्याणाचे ‘प्रार्थनेच्या’ रूपाने पूर्ण दर्शन देशाला दिले यातच त्यांचे असामान्यत्व आहे.
चला, आपल्या घराजवळच्या संघशाखेत जायला सुरुवात करू या व राष्ट्रकल्याणाच्या हेतूने चाललेल्या तपामध्ये सहभागी होऊ या.