रामकृष्ण वस्तुसंग्रहालय आसामी संस्कृतीचे दर्शन

विवेक मराठी    03-Jan-2025
Total Views |
@प्रा. सुहास द. बारटक्के
9423295329
आपले गुरू रामकृष्ण परमहंस यांच्याप्रति आदराचं प्रतीक म्हणून स्वामी विवेकानंदांनी चेरापुंजी येथे 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. याच मिशनद्वारे चेरापुंजीसारख्या दुर्गम भागातील उपेक्षित जनतेसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने तेथील जनतेचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच चेरापुंजीच्या सोहरा भागातलं वस्तुसंग्रहालय आवर्जून भेट द्यावे असे आहे.
Belur Math
 
भारतातील मेघालयात चेरापुंजी येथे सर्वाधिक पाऊस पडतो, असं पाठ्यपुस्तकातून शिकलो होतो. मात्र प्रत्यक्षात चेरापुंजी इथं गेलो तेव्हा कळलं की, आता निसर्ग बदललाय. आता जास्त पावसाचं ठिकाण वर हिमालयाकडे सरकलंय. चेरापुंजीपासून पाऊस आता दूर पळाला आहे; तब्बल 10 किलोमीटर दूर... निसर्गातल्या या बदलाला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत यावर चर्चा करण्याचं इथं प्रयोजन नाही. इथं सांगायचं आहे ते अवतीभवती ख्रिश्चन धर्माचाच जास्तीत जास्त पगडा असलेल्या मेघालय राज्यात स्वामी विवेकानंद यांनी चेरापुंजीसारख्या अति दुर्गम आणि अति पावसाच्या भागात स्थापन केलेल्या एकमेव हिंदू आश्रमाबद्दल! स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या नावे रामकृष्ण मिशनद्वारे स्थापन केलेल्या या आश्रमाला आवर्जून भेट द्यावी, असंच हे ठिकाण आहे व इथंच आहे एक अनोखं वस्तुसंग्रहालय जे तुम्हाला प्राचीन आसामी संस्कृतीची माहिती देतं.
 
 
भारताची मान जगात उंचावणारे महान विचारवंत स्वामी विवेकानंद (12 जानेवारी 1863 ते 4 जुलै 1902) हे सार्वभौमिक सद्भाव जोपासणारे महान आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व म्हणून भारताला परिचित आहेत. आपले गुरू रामकृष्ण परमहंस यांच्याप्रति त्यांना अतीव आदर होता. त्यांचे ते मुख्य शिष्य असल्याने गुरूप्रति आदराचं प्रतीक म्हणून त्यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. याच मिशनद्वारे 1931 साली चेरापुंजीसारख्या दुर्गम भागातील उपेक्षित जनतेसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने तेथील जनतेचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी विद्यालये सुरू करून वंचितांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली. व्यावसायिक शिक्षण देणारी केंद्रे आणि छात्रावास अशा सुविधाही सुरू करण्यात आल्या, तर संपूर्णपणे कालौघाशी मिळत्याजुळत्या अनेक सोयी या मिशनतर्फे दिल्या जाऊ लागल्या व आजही दिल्या जात आहेत. त्यामध्ये संगणक प्रशिक्षण, फिल्म शोज, धर्मार्थ औषधालय, बेकरी, डेअरी, प्रिंटिंग प्रेस अशा सुविधांचा समावेश आहे. सोहरा इथं मुख्य केंद्र असून सोहबर, शेला अशा उपकेंद्रांद्वारे या सुविधा पुरवण्यात येतात. आसपासच्या गरजूंना दूध, कपडे, मधमाशांच्या पेट्या, अवजारे इत्यादी पुरवण्यापासून अनेक समाजोपयोगी कामे हाती घेतली जातात.
 
 
चेरापुंजीच्या सोहरा भागातलं हे वस्तुसंग्रहालय आवर्जून भेट देण्यासारखं आहे. गारो, खाशी, जैंतिया या पर्वतीय प्रदेशातील जमाती हे इथले मूळ रहिवासी (पूर्वांचलमधील). त्यातील खासी हिल्स म्हणजे खासी टेकड्यांमध्ये राहणार्‍या आदिवासींचा इतिहास इथं जपला आहे. इमारत ही अगदी वेगळ्या धाटणीची असून तिच्या पहिल्या मजल्यावर आणि खालच्या मजल्यावर हे अनोखं वस्तुसंग्रहालय आहे.
 
 
‘ट्रायबल कल्चर ऑफ ईस्ट खासी हिल्स’ या नावानं हे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध असून त्यामध्ये खासी जमाती वापरत असलेली हत्यारे, आभूषणे, कपडे, वाद्ये पाहायला मिळतात. इथं केली जाणारी शेती, त्यासाठी लागणारी अवजारे, ग्रामीण उद्योग, मनोरंजनासाठी वापरली जाणारी बांबूंची वाद्ये, ही तिथल्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवतात, तिथल्या परंपरांची माहिती करून देतात. या वस्तुसंग्रहालयाची स्थापना 20 ऑक्टो. 1952 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. ही दोन्ही म्युझियम्स पाहाण्यासारखी असून वरच्या मजल्यावरील संग्रहालय हे प्रामुख्याने ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवते, तर खालच्या मजल्यावरील संग्रहालय परंपरा व संस्कृती याचे दर्शन घडवते. खासी जमाती या किती विकसित होत्या याचं दर्शन तिथं लावण्यात आलेली चित्रं, कलाकुसर, शोभेच्या वस्तू यातून पाहायला मिळतं. या जमाती हातमागाचा वापर करून कापड विणत त्याचं प्रतीक म्हणून हातमागही इथं पाहायला मिळतो.
 
 
संग्रहालय पाहून झाल्यावर आपण समोरच असलेल्या वस्तू विक्री केंद्राकडे येतो. या केंद्राला मदत म्हणून इथं काही वस्तू विकत घ्या, असं एकानं सुचवलं; परंतु प्रत्यक्षात या विक्री केंद्रात गेल्यावर काय घेऊ आणि काय नको, अशीच अवस्था होऊन जाते. इथं अतिशय सुंदर आणि टिकाऊ अशा वस्तूंचा खजिनाच पाहायला मिळतो, तोही अगदी माफक किमतीत. बॅगा, पर्सेस, शोभेच्या वस्तू, लुंगी, टॉवेल, टोप्या याचे असंख्य पर्याय इथं पाहायला मिळतात. स्वामी विवेकानंदांचं साहित्य अत्यंत अल्प किमतीत विक्रीस ठेवलेलं आहे. सेवाभावी कर्मचारी अत्यंत नम्रपणे तुम्हाला हव्या त्या वस्तू काढून देतात.
 
एकूणच तबियत खूश करणारं हे ठिकाण आहे.
मदद करो, लडाई नही
समावेश करो, विनाश नही
सद्भाव और शांती
मतभेद नही...
असं 27 सप्टें. 1893 रोजी विश्व धर्म परिषद शिकागोत म्हणणारे स्वामी विवेकानंद आपल्याला इथं जागोजागी जाणवत राहतात.