‘रघुपति मति माझीआपुलीशी करावी’

विवेक मराठी    03-Jan-2025   
Total Views |
देहबुद्धीच्या ओढीने जीवाला प्रपंचात अनेक ऐहिक आकर्षणे आपणाकडे खेचत असतात. माणसे मरणाधीन आहेत, पैसा स्थिर राहात नाही, हे तो स्वार्थांध विसरतो. त्यामुळे अंतिमतः स्वार्थमूलक घटनांचे पर्यवसान दुःखात होते याची जीवाला प्रचीती येते. प्रांजळपणा व भक्ती हे साधकाचे प्रमुख लक्षण आहे. अशा वेळी तो प्रांजळपणे आपले आराध्य दैवत रामाला सांगतो की, हे रामा, माझी बुद्धी फक्त तुझाच विचार करू दे. माझी मती तू आपलीशी करून टाक म्हणजे इतस्ततः भटकणारे माझे मन तुझ्या ठिकाणी स्थिर होईल.


vivek
‘अनुदिनी अनुतापें...’ या ‘करुणाष्टका’तील पहिल्या श्लोकावर आपण विवेचन केले.
आता यापुढील श्लोक असा आहे.
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ।
रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।
सकळ त्यजुनि भावे कास तूझी धरावी ॥2॥
 
 
(रामा, तुझा भक्तिभाव न समजल्याने आतापर्यंतचे आयुष्य मी तुझ्या भक्तीशिवाय व्यतीत केले. माझी माणसे, माझे नातेवाईक, माझा पैसा, असे म्हणत मी निष्कारण स्वार्थ केला; पण सारे फुकट गेले. त्यातून ना आनंद मिळाला, ना माझ्या व्यथा दूर झाल्या. तेव्हा हे रघुकुलश्रेष्ठ रामा, माझी प्रापंचिक स्वार्थबुद्धी दूर करून, मी तुझा आश्रय करावा, अशी बुद्धी मला दे. आता असे वाटते की, सर्व अशाश्वत गोष्टींचा त्याग करून मी तुझी भक्ती करीत तुझ्या जवळ राहावे.)
 
 
समर्थांनी सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे सूक्ष्मावलोकन केले आहे. त्यामुळे साधकाच्या आणि भक्ताच्या मनातील तळमळ ते योग्य प्रकारे मांडतात. विकारवश माणसाचे आयुष्य ’भजनरहित’ म्हणजे परमेश्वराच्या भक्तीशिवाय घडत जाऊन माणूस माया, मोह, अहंकारादी विकारात कसा गुंतत जातो याचे मार्मिक चित्रण स्वामींनी ‘दासबोधा’त केले आहे. ‘दासबोधा’त ’स्वगुण परीक्षा’ नावाचा एक दशक स्वामींनी लिहिला आहे (दशक 3). त्यात स्वामींनी मानवी जीवनातील समस्या स्पष्ट करून सांगितल्या आहेत. आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव मावळल्याने जीवाला वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे तो जीव भगवंतापासून वेगळा होऊन अशाश्वताच्या पूर्णपणे आहारी जातो. देहबुद्धी, अहंकार, वृथा गर्व, ताठा, द्वेष, मत्सर आदी विकारांमुळे अशाश्वत ध्येयांसाठी अखंड धडपड केल्याने मानवी जीवनात दुःख निर्माण होते. भगवंतापासून दुरावल्याने त्याच्या अस्वस्थ चित्ताच्या वाट्याला सुख येत नाही. ‘दासबोधा’तील ’स्वगुण परीक्षा’ या दशकात स्वामींनी चार मोठे समास लिहून तत्कालीन सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख आणि कष्टांचे वर्णन केले आहे. आज साडेतीनशे वर्षांनंतर बाह्य परिस्थिती बदलली असली तरीही मानवी जीवनातील समस्या थोड्याफार फरकाने कायम आहेत, कारण मानवी स्वभाव आजही, पूर्वी होता तसाच आहे आणि यापुढेही त्यात बदल संभवत नाही. मानवी जीवनात स्वार्थमूलक आणि अहंकारयुक्त अशाश्वतांचा भरणा असल्याने आणि परिणामतः ते देहबुद्धी, मीपणा आणि स्वार्थ वाढवणारे असल्याने तेथे भगवंताच्या भक्तिभावाचा लेश उरत नाही. हे पूर्वी होते. आजही तसेच आहे. ’स्वगुण परीक्षा’ समासांत स्वामींनी सामान्य माणसाच्या जीवनक्रमाचा आलेख पुढीलप्रमाणे मांडला आहे. त्यावरून त्याच्या ’भजनरहित’ जीवनाची कल्पना येते.
आपले मूळ आनंदी आणि अविनाशी स्वरूप सोडून जीव वासनेमुळे जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर काही काळ मूल सर्वस्वी आईवर अवलंबून असते. भरणपोषण, सुरक्षा, वात्सल्य आणि प्रेम त्याला आईकडून मिळत असते. पुढे मूल जरा मोठे झाल्यावर त्याला मित्रांचा, तसेच सवंगड्यांबरोबर खेळण्याचा नाद लागतो. मित्रांबरोबर गप्पा आणि खेळ चालू असताना तो त्यात इतका रममाण होतो, की त्याला आईची आणि घराची आठवणही राहात नाही. पुढे मारून मुटकून शिकवून शहाणा केल्यावर आईवडील मुलाचे लग्न लावून देतात. लग्नानंतर त्याला बायको व सासुरवाडी अत्यंत प्रिय असते. बायकोशिवाय त्याला काही सुचत नाही. तिच्या सहवासासाठी तो वेडापिसा होतो. काही कारणाने बायको मेली तर लगेच तो दुसरे लग्न करतो. येथेही दुसरी बायको त्याचे प्रीतिपात्र असते. तिच्याशिवाय त्याला चैन पडत नाही. कालांतराने मूल न झाल्याने लोक आपल्याला वांझ म्हणतील, अशी त्याला भीती वाटते. मग दोघेही मुलासाठी उपासतापास, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा याद्वारा शरीराला कष्ट देतात. पुढे कुलदेवता पावते; पण त्यामुळे भलतेच घडून येते. परिस्थिती अशी बदलते की-
लेंकुरें उदंड जालीं। तों ते लक्ष्मी निघोन गेली।
बापडीं भिकेसी लागलीं। कांहीं खाया मिळेना॥
अशा रीतीने त्याच्या समस्या वाढत जातात आणि दुःखात भर पडते. सुख सुख म्हणून शोधायला जावे, तर त्या कृतीने दु:खाचे डोंगर समोर उभे राहतात. माणसाला प्रपंचात सर्व ठिकाणी अशाश्वतता आणि अनिश्चितता जाणवल्याने जीव प्रपंचाला कंटाळतो व परमेश्वराला शरण जाऊन त्याच्यासंबंधी विचार करू लागतो. पूर्वायुष्यातील घटना आठवून त्याला पश्चात्ताप होतो. परमेश्वराला तो विनवण्या करू लागतो. येथे जीवाला बद्धावस्थेची जाणीव होऊन त्याच्या मुमुक्षू अवस्थेची चुणूक जाणवू लागते. बद्ध व मुमुक्षू या अवस्थांच्या संधिकालात आपल्या विचारांबाबत माणसाची निश्चितता नसते. भगवंतावर विश्वास निर्माण होऊ लागल्यावर परमेश्वरकृपेने बद्धावस्था ओलांडल्यावर जीवाला परमेश्वरी सत्तेची आणि त्याच्या शाश्वततेची जाणीव होऊ लागते. पूर्वायुष्यात आपण विषयाच्या संगतीने भगवंताला विसरलो आणि देहबुद्धीत अडकून राहिलो, असे त्याला वाटू लागते; पण गेलेले आयुष्य काही परत येत नाही. झाले ते झाले, असा विवेक करून जीव पूर्वायुष्यातील विकारांना विसरण्याचा प्रयत्न करतो. जीवाला वाटू लागते की, इथून पुढे तरी आपण शहाणपणाने वागावे, संयमाने राहावे, सारासार बुद्धीने निर्णय घ्यावे. आतापर्यंत अशाश्वताची कास धरल्याने सुख सुख म्हणता दुःखाचा अनुभव घेत राहिलो; तथापि आता शाश्वत अशा रामाची जाणीव झाल्याने रामापाशी आपल्या पूर्वायुष्यातील सार्‍या अपराधांची कबुली द्यावी, त्यामुळे अपराधीपणाचा भार कमी होईल, असे जीवाला वाटू लागते. आतापर्यंतचे माझे आयुष्य भजन आणि भक्तीशिवाय गेले, हे तो रामापुढे प्रांजळपणे मान्य करतो. प्रांजळपणा व भक्ती हे साधकाचे प्रमुख लक्षण आहे. माझ्या भक्तीविरहित जीवनाचा काय परिणाम आला, हेही रामापुढे सांगावे, असे त्याला वाटू लागते. आपण स्वार्थीपणे कसे वागलो, हे तो सांगतो. देहबुद्धीच्या ओढीने जीवाला प्रपंचात अनेक ऐहिक आकर्षणे आपणाकडे खेचत असतात. अहंकारी मन त्यात आनंद शोधत असते. मन स्वार्थी बनते. सर्व काही माझ्यासाठी आणि माझ्या सुखासाठी, असा समज झाल्याने, माझी माणसे आणि माझा पैसा सदैव माझ्याजवळ राहावा, असा तो आग्रह धरतो; पण वास्तवात माणसे मरणाधीन आहेत, पैसा स्थिर राहात नाही, हे तो स्वार्थांध विसरतो. त्यामुळे अंतिमतः स्वार्थमूलक घटनांचे पर्यवसान दुःखात होते याची जीवाला प्रचीती येते. अशा वेळी आपले आराध्य दैवत रामाला सांगावे लागते की, हे रामा, माझी बुद्धी फक्त तुझाच विचार करू दे. माझी मती तू आपलीशी करून टाक म्हणजे इतस्ततः भटकणारे माझे मन तुझ्या ठिकाणी स्थिर होईल. तुझ्या कृपेने माझी देहबुद्धी कमी झाल्याने आणि विषयवासना क्षीण झाल्याने मला असे वाटू लागले आहे की, या अशाश्वताचा त्याग करून मी भक्तिभावाने सदैव तुझी संगत करून राहावे.शाश्वत रामा, तुझ्या संगतीत राहावे, हीच खरी मुक्ती आहे.

सुरेश जाखडी

'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..