समाजात बंधुता रुजवण्यासाठी एकदिलाने काम करू या - प्रदीप रावत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या संघस्थानावर बंधुता परिषदेचे आयोजन

विवेक मराठी    03-Jan-2025
Total Views |

rss
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या संघस्थानावर बंधुता परिषदेचे आयोजन
कराड : इतिहासाच्या सागरातून कोळसा उगाळायचा की चंदन, हे आपण ठरवायचं... खर्‍या अर्थाने आपल्या प्रत्येक कृतीमधून बंधुता जोपासून आपण चंदनाचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी प्रयत्न करू या. आपली गावकी एक आहे; पण भावकीसुद्धा एक झाली पाहिजे, असे प्रतिपादन बंधुता परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीपदादा रावत यांनी केले.
 
 
दिनांक 2 जानेवारी 1940 या दिवशी कराडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून ज्या ठिकाणास डॉ. आंबेडकरांनी भेट दिली त्या श्री भवानी संघस्थानावर बंधुता परिषद या वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन कराड येथे लोककल्याण मंडळ ट्रस्टद्वारे करण्यात आले. हिंदू संघटनेशिवाय जातिभेद नष्ट होणार नाहीत, असे डॉ. आंबेडकरांचे विचार होते. त्याचप्रमाणे ‘सकल हिंदू, बंधू बंधू’ या विचाराने रा. स्व. संघ हिंदू संघटनेचे काम करत आहे, असे रावत म्हणाले.
 
 
या परिषदेतील परिसंवादामध्ये आंबेडकरी विचारवंत अ‍ॅड. क्षितिज टेक्सास गायकवाड, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय गव्हाळे या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या परिषदेच्या आयोजनाची भूमिका आपल्या प्रास्ताविकामध्ये विचारवंत भरत आमदापुरे यांनी मांडली.
 

rss 
 
लहानपणापासून गावात अस्पृश्यतेचे चटके सोसलेले असल्यामुळे मी बंधुतेच्या शोधात होतो. सुरुवातीच्या जीवनात तथाकथित पुरोगामी म्हणवणार्‍या लोकांनी आणि विद्रोही तसेच डाव्या विचारवंतांनी माझी दिशाभूल केल्याचे अनुभव मला आले. ढोंगी पुरोगाम्यांपासून दलित समाज आणि संपूर्ण देश आपण वाचवायला हवा. जातिभेद नष्ट करून बंधुता निर्माण करण्यासाठी आम्ही संघाच्या सोबत आहोत, असे प्रतिपादन मच्छिंद्र सकटे यांनी आपल्या भाषणात केले.
 
 
डॉ. आंबेडकरांवर सर्वाधिक अन्याय काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी केला आणि आज याच पक्षाचे नेते ‘संविधान बचाव’चा नारा देत आहेत, असे प्रतिपादन अ‍ॅड. क्षितिज गायकवाड यांनी केले.
 
 
देशाच्या फाळणीच्या वेळीसुद्धा बाबासाहेबांनी इस्लामचा धोका वारंवार सांगितला होता. फाळणीविषयी कठोर भूमिका त्यांनी मांडली होती. त्यावर तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने आज बांगलादेशसारख्या ठिकाणी हिंदू आणि बौद्ध बांधवांवर अत्याचार होत आहेत. कलम 370 सारख्या विषयातसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या राष्ट्रनिष्ठ भूमिकेमुळेच आज भारत सरकार ते कलम हटवू शकले. धर्मपरिवर्तन करत असताना डॉ. बाबासाहेबांनी भारतीय परंपरेतील बौद्ध धर्मच का स्वीकारला याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. बंधुतेसाठी हिंदू समाजाने डॉ. आंबेडकर समजून घेतले पाहिजेत, असे मत अ‍ॅड. विजय गव्हाळे यांनी व्यक्त केले.
 
 
परिषदेची सुरुवात बुद्धवंदनेने झाली. कार्यक्रमाचे संयोजन लोककल्याण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विजय जोशी यांनी केले. सूत्रसंचालन वैभव डुबल, प्रास्ताविक भरत आमदापुरे, तर परिसंवादाचे संचालन नीलेश अलाटे यांनी केले. श्रीकांत एकांडे यांनी आभार मानले. या वेळी आमदार अतुल भोसले, विविध चळवळींतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.