श्री क्षेत्र आळंदी येथे राष्ट्रसाधक शिबिर संपन्न

विवेक मराठी    03-Jan-2025
Total Views |
vivek
 
‘विवेक व्यासपीठ’ आणि ‘श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राष्ट्रसाधक शिबिर दि. 20 डिसेंबर 2024 ते दि. 22 डिसेंबर 2024 या कालावधीत श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज ग्रंथालय, श्री क्षेत्र आळंदी (देवाची) पुणे येथे तीन दिवसांचे निवासी शिबिर संपन्न झाले. ‘आत्मविकासापासून राष्ट्रभक्तीपर्यंतचा प्रवास’ हा या शिबिराचा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर होता. ‘आत्मोन्नतीबरोबर राष्ट्रसाधना करणारा तो राष्ट्रसाधक’ अशा भूमिकेतून सर्व सत्रांची मांडणी करण्यात आली. यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील 26 शिबिरार्थी उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन ‘श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ’चे शिरीष गाडगीळ, सुनील गुप्ते, धनंजय चितळे, रोहन उपळेकर, जयंत साठे आणि ‘विवेक व्यासपीठ’चे दीपक जेवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
 
शिरीष गाडगीळ यांनी राष्ट्रसाधकची संकल्पना व या शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. साधक व साधना हा श्रीपाद सेवा मंडळाचा गाभा आहे, तर ‘विवेक’ हे समाज कार्यकर्ते निर्माण करणारे व्यासपीठ आहे.
 
पहिल्या सत्रात ‘राष्ट्र’ आणि ‘साधक’ या शब्दांचा विस्तृत अर्थ धनंजय चितळे यांनी वेद, दासबोध व अन्य ग्रंथांतील उदाहरणांसह स्पष्ट करून सांगितला. राष्ट्र कसे निर्माण होते? तर ’जिथे देशाची उन्नती सर्व लोकांच्या शिरावर आहे याची जाणीव प्रत्येकाला होईल तिथे राष्ट्र निर्माण होते.’ तसेच ’बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध’ अशा मनुष्याच्या अवस्था असतात. यातल्या साधकाची भूमिका म्हणजे जो माणुसकीला धर्माचा गाभा मानतो तो साधक. चितळे सरांनी अशा विविध उदाहरणांनी राष्ट्राची आणि साधकाची भूमिका स्पष्ट केली.
 
 
रोहन उपळेकर यांनी अध्यात्माची आवश्यकता, बहिर्मुखता व अंतर्मुखता हा विषय उलगडून दाखवला. त्यातही अंतर्मुख होणे म्हणजे काय ते स्पष्ट केले. जर आपण आतून शांत असू तरच बाहेरचे काम आपण शांतपणे आणि अधिक परिणामकारकतेने करू शकतो. स्वार्थ सोडून परमार्थ बघणे म्हणजेच अंतर्मुख होणे.
 
 
मनुष्य देह व त्याची सार्थकता सांगताना धनंजय चितळे म्हणाले की, आत्मभान ठेवत कष्ट करावेत, परोपकार करावा व संतांचे विचार सर्वदूर आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचवावेत.
 
सद्गुण संपत्तीचा विकास हा प्रयत्नाधीन आहे. समोरच्यातील अवगुण न बघता सद्गुण शोधता आले पाहिजेत. चांगले गुण प्रयत्नपूर्वक आत्मसात केले पाहिजेत. त्यासाठी संतांची चरित्रे आवर्जून वाचावीत, असे रोहनजींनी सांगितले.
 
 
ह.भ.प. दीपक महाराज जेवणे यांनी ‘आता तरी पुढे हाचि उपदेश। नका करू नाश आयुष्याचा॥’ या संत तुकोबारायांच्या अभंगावर निरूपण करताना स्वामी विवेकानंदांची भविष्यवाणी कथन केली. स्वामीजींनी आपली ही प्राचीन भारतमाता पुनश्च जागृत झाली आहे, नवसंजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महिमाशाली होऊन आपल्या सिंहासनावर गौरवाने अधिष्ठित झाली आहे, असे दृश्य पाहिले होते. शांती आणि प्रेमाची पताका फडकवीत चैतन्याच्या शक्तीने भारताचे हे उत्थान होणार आहे; पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा उपदेश केला होता. यासाठी ‘कर्म करूनी अकर्ता व भोग भोगूनी अभोक्ता’ असा योगेश्वर भगवान श्रीकृष्णांचा आदर्श समोर ठेवून सर्व राष्ट्रसाधकांनी थोर चिंतक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे भारतमातेची उपासना केली पाहिजे. ते सांगतात- आम्ही कोणत्याही विशिष्ट समुदायाच्या किंवा वर्गाच्या नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राच्या सेवेसाठी वचनबद्ध आहोत. देशातील प्रत्येकाला आपण भारतमातेची लेकरे असल्याचा अभिमान वाटेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. या शब्दांच्या खर्‍या अर्थाने आपण भारतमातेला सुजला आणि सुफला करू. देवी दुर्गा म्हणून भारतमाता वाईटावर विजय मिळवेल; लक्ष्मीच्या रूपात ती सर्वांना समृद्धी देईल आणि सरस्वतीच्या रूपात ती अज्ञानाचा अंधकार दूर करेल आणि ज्ञानाचे तेज सर्वत्र पसरवेल. अंतिम विजयावर विश्वास ठेवून आपण राष्ट्रसाधनेसाठी स्वतःला समर्पित करू या. जेवणे यांनी समर्पक दृष्टांतांच्या आधारे राष्ट्रसाधनेचा विषय मांडला.
 
 
vivek
 
शिबिराच्या दुसर्‍या दिवशी धनंजय चितळे यांनी भारतीय संस्कृतीबद्दल बोलताना सांगितले की, आपली संस्कृती ही परिपूर्ण जीवनशैली आहे. सद्गुरुकृपेने अहंकाराला शून्यापर्यंत आणणारी आपली संस्कृती हे विश्वाचे वैभव आहे.
 
 
अत्यंत कठीण वाटणारा विषय ’कर्मसिद्धान्त व विहितकर्म’ उलगडून सांगताना रोहन उपळेकर म्हणाले की, कुठलेही कर्म वाया जात नाही, तसेच कोणत्याही कर्माचा चांगला-वाईट भोग भोगण्यावाचून पर्याय नसतो. वाईट आणि चांगले कर्म करायला कष्टच लागतात, तर वाईट कर्म करून दुष्परिणाम का भोगावेत? चांगलेच वागावे. कायम सकारात्मकच वागावे. शास्त्रांनी जे आवश्यक कर्म सांगितले आहे ते विहितकर्म. आपल्याच पूर्वकर्मांमुळे या जन्मात पुढे उभ्या ठाकलेल्या कर्माला शांतपणे सामोरे गेलात तर कर्म लवकर संपते. सद्गुरुकृपेने हे दोन्ही प्रयत्नपूर्वक साध्य होते. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण हे कर्मांचे तीन प्रकार त्यांनी विविध उदाहरणांनी समजावून सांगितले.
 
 
’अभ्यासे प्रकट व्हावे’ हे समजावताना धनंजय चितळे म्हणाले की, जगात ’पत’ मिळवायची असेल, तर ’तप’ करावे लागेल. नाही तर ’त त प प’ होते. जितके वेळा तुम्ही वाचाल आणि ऐकाल तितके वेळा तुम्हाला त्याचा अर्थ नव्याने कळत राहील आणि नंतरच तो कळलेला अर्थ इतरांना समजावून सांगता येईल.
 
साधकांसाठी उपासना करणे आवश्यक आहे, असे सांगताना रोहन उपळेकर म्हणाले की, उपासना ही शुद्ध पुण्य देणारी असते. नामस्मरण हे उपासनेचे सर्वश्रेष्ठ व सर्वात सोपे साधन आहे. उपासनेचा आधार नसेल तर साधक सेवाकार्यही धडपणे करू शकणार नाही.
 
दुसर्‍या दिवशीची सत्रे संपल्यानंतर सर्व शिबिरार्थींनी श्रीक्षेत्र आळंदीतील भगवान श्रीमाऊलींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विश्रांती वट, सिद्धबेट तसेच श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मठात दर्शन घेऊन स्थानमाहात्म्य जाणून घेतले.
राष्ट्रसाधकाचे व्यवस्थापन कसे असावे व त्याचबरोबर नेतृत्वकौशल्य कसे असावे, हे सांगताना शिरीष गाडगीळ यांनी चार मुद्दे मांडले, ते म्हणजे शुद्ध विचार (Purity of thoughts), प्रामाणिक प्रयत्न (Honesty), नि:स्वार्थीपणा (Unselfishness) आणि प्रेम (Love). उत्तम नेतृत्वासाठी आत्मभान, संघटनकौशल्य, वेळेचे नियोजन, आत्मपरीक्षण, वक्तृत्व व श्रवण आदी गुणांची आवश्यकता असते. त्याचबरोबर कामक्रोधादी षड्रिपूंचा नाश करता आला पाहिजे, किमान त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हे सांगितले. तसेच आपण नित्य एकांताची सवय लावून आपल्या आत डोकावून connection - correction and new direction  व proper good directionने स्वतःला सुधारावे. मग समाज - गाव - मित्रपरिवार - राज्य - राष्ट्र व समस्त जग नक्की सुधारेल, हे सांगितले.
 
आपण माणुसकीने सर्वांना मदत कशी करावी, आपणांस मदत केली तर कृतज्ञ असावे. तसेच कोणी आपल्याला दुखावले तर क्षमा - Let Go - करावी व आपण कोणास दुखावू नये व दुखावल्यास क्षमा मागावी. तसेच संघटन, नेतृत्व, वक्तशीरपणा, गुप्तता व राष्ट्रीय चारित्र्य यांचे महत्त्व सोदाहरण विशद केले.
 
सुनील साठे यांनी सामाजिक कार्य म्हणजे काय? त्याची समाजात काय आणि का आवश्यकता आहे हे समजावून सांगितले. माणसे कुठल्याही समाजातील असतील; जातीतली असतील, धर्मातली असतील तरी ती माझी आहेत, ही भावना जोपासून सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचे हेच संस्कार महत्त्वाचे आहेत, असे सांगितले.
 
 
सोहम बगे व नचिकेत कुलकर्णी यांनी ‘समाजपुरुषा होई जागृत’ या शिबिराच्या उद्देशास अनुसरून गीत सादर केले.
शिबिराचा समारोप ‘सा. विवेक’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांच्या मार्गदर्शनाने झाला. त्या वेळी ते म्हणाले की, आपल्या व्यक्तिगत जीवनाचा विकास करता करता समाजाचेही उदात्तीकरण करणे गरजेचे आहे. आपल्या प्राचीन व प्रगल्भ संस्कृतीची मूल्ये काही प्रमाणात तरी जतन करणे प्रत्येक राष्ट्रसाधकाचे कर्तव्य आहे. समाजाशी आपले काही नाते निर्माण झाले पाहिजे.
सर्व शिबिरार्थींना दिलीप करंबेळकर यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. शिबिराचा समारोप श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने झाला.