पद्मश्री वनयोगी

विवेक मराठी    30-Jan-2025   
Total Views |
 
padma shri award
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चैत्राम पवार या नावाची घोषणा पद्मश्री पुरस्कारासाठी झाली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाड्यातील चैत्रामदादांचे एम.कॉम.पर्यंत शिक्षण झाले; परंतु नोकरीतील आकडेमोडीची गणिते न सोडवता वनवासी समाजाच्या विकासाची गणिते सोडविणण्याची वेगळी वाट त्यांनी धरली. चैत्रामदादांची बारीपाड्यातील शाश्वत विकासयात्रा देशात रोल मॉडेल ठरली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय अशा अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले. यानिमित्त रवींद्र गोळे लिखित ‘सहृदयी’ या पुस्तकातील चैत्राम पवार यांना लिहिलेले पत्र पुनःप्रकाशित करीत आहोत.
प्रिय चैत्रामभाऊ
सप्रेम नमस्कार,
 
परवा श्रीकांतने रानभाजी स्पर्धेचा लेख वाचायला पाठविला. ‘लोकमत’मध्ये तो प्रसिद्ध झाला होता. तो लेख वाचताना मीही भूतकाळात गेलो आणि बारीपाडा, चैत्राम पवार आणि डॉ. आनंद फाटक यांच्या आठवणींना उजाळा देऊ लागलो. खरं सांगू चैत्रामभाऊ, आपली पहिल्यांदा भेट कशी झाली, बारीपाड्याविषयी पहिल्यांदा कधी ऐकलं, वाचलं, हे नीट स्मरणात येईना; पण मनाच्या तळाशी चैत्राम आणि बारीपाडा ही दोन नावे अगदी घट्ट रुतून बसली आहेत याची पुन्हा नव्याने खात्री झाली.
 
 
’साप्ताहिक विवेक’मध्ये कामाला लागलो तेव्हा संघविषयक पुस्तिका व बातम्या पाहणे आणि त्यातील कुठला मजकूर ’विवेक’मध्ये छापता येईल याचा विचार करणे, हा माझ्या कामाचा भाग होता. अशातच कधी तरी सुदर्शनजींच्या भाषणात बारीपाडा येथील विकासयात्रेचा उल्लेख ऐकला आणि आपणही कधी तरी बारीपाडा पाहिला पाहिजे असे वाटून गेले. ’विवेक’मध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या बातम्या छापण्यासाठी येत असत. वनवासी कल्याण आश्रमाची दिनदर्शिका ही ’आस्वाद’मध्ये तयार होई. त्यामुळे तुमचं काम आणि तुम्ही याबाबत माहिती मिळत असे; पण तेवढ्यावर समाधान होत नसे. उलट बारीपाड्याला जाण्याची इच्छा अधिक तीव्र होत असे. अशातच ’विवेक’च्या दिवाळी अंकासाठी मी लिहू लागलो. विदर्भातील वनवासी कल्याण आश्रमाने मेळघाट आणि धारणी परिसरांत जे काम केले ते पाहून आलो. त्यावर दिवाळी अंकात लेखही लिहिला होता. त्यानंतर बारीपाड्यावर लिहावे, अशी संघाकडून सूचना आली आणि माझे अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होणार याचा मला आनंद झाला आणि मग संभाजीनगर-धुळे-बारीपाडा असा प्रवासही निश्चित झाला. संभाजीनगरला डॉ. फाटकांशी बोललो. फाटक सर स्वत:बद्दल खूप कमी बोलतात. कोणतेही श्रेय घेण्यास तयार नसतात. मात्र बारीपाडा म्हटले की भरभरून बोलतात याचा अनुभव आला.
 
 
बारीपाडा म्हणजे काय? त्याचा विकास कसा झाला? अशा प्रश्नांचे बोट धरून मी चाललो होतो आणि प्रत्येक थांब्यावर चैत्रामभाऊंची मोहोर उमटलेली होती. प्रत्येक नव्या प्रयोगाची सुरुवात चैत्रामभाऊंनी कशी केली हे सांगताना डॉ. फाटक तल्लीन झाले होते आणि त्यामुळे तुम्हाला भेटण्याची आणि बारीपाडा पाहण्याची ओढ अधिकच अनावर होत होती. धुळ्यात नाना नवलेंना भेटलो. त्यांनीही तुमचे कौतुक केले आणि धुळे ते बारीपाडा अशा प्रवासासाठी वाहनव्यवस्था करून दिली आणि शेवटी मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो.
 
 
चैत्रामभाऊ, त्या दिवशी पाऊस होता आणि तुमच्या शेतात भातलावणी चालू होती. आधीच दिवस ठरल्यामुळे तुम्ही शेतात न जाता घरीच थांबला होता. गाडीतून उतरलो आणि तुम्ही मला तुमच्या चंद्रमौळी घरात घेऊन गेलात. चहापाणी झाले आणि मग आपल्या गप्पा सुरू झाल्या. मी बारीपाडा आणि तुम्हाला समजून घ्यायला आलो होतो. त्यामुळे तुम्ही बारीपाड्याची विकासगाथा सांगायला सुरुवात केलीत. आज 450 हेक्टर क्षेत्रात बारीपाडा गावचे संरक्षित जंगल आहे. विविध प्रकारचे वृक्ष आणि झुडपे या जंगलात आहेत. 450 हेक्टर जंगल, तेही इतके घनदाट की, माहीतगार माणसाशिवाय या जंगलात गेल्यास चकव्याचा अनुभव येतो. आज बारीपाड्याच्या या प्रयत्नातून पुढील पंचवीस वर्षे पुरेल इतके इंधन निर्माण झाले आहे. गावकर्‍यांनी श्रमदानातून 482 दगडी बांध आणि 70 मातीचे बांध बांधले आहेत. विपुल प्रमाणात पाण्याचे संधारण होत आहे. परिणामी जलस्रोतांची पातळी वाढली आहे. ज्या गावात पूर्वी केवळ दोन खासगी विहिरी होत्या आणि पिण्याच्या पाण्याचे कायम दुर्भिक्ष होते तेथे आता तुडुंब भरलेल्या 42 विहिरी आहेत. एवढेच नव्हे तर आजूबाजूच्या तीन पाड्यांना पिण्याचे पाणी पुरविण्याची योजना शासनाने बारीपाड्याच्या जिवावर हाती घेतली आहे.
 
 
या 42 विहिरी जरी खासगी मालकीच्या असल्या तरी संपूर्ण बारीपाडा या विहिरींचा वापर करतो. मालकी खासगी असली तरी सर्वांना पाण्याचा हक्क आहे, ही समूह भावना बारीपाड्याच्या मनामनांत जागलेली आहे. चैत्रामभाऊ, तुम्ही आजचा बारीपाडा माझ्यासमोर मांडत होता. आज जे शाश्वत विकासाचे मॉडेल म्हणून बारीपाडा प्रसिद्ध झाला आहे, ते रूप तर मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होतो. स्वच्छ घरे आणि स्वच्छ परिसर यातून बारीपाड्याची छाप मनावर पडत होती आणि दुसर्‍या बाजूला 1992 साली बारीपाडा कसा होता याचे डॉ. फाटकांनी केलेले वर्णन पुनःपुन्हा आठवत होते. बारीपाड्याच्या बाईच्या डोक्यावर एक तर पाण्याचा हंडा असतो किंवा लाकडाची मोळी असते. ही परिस्थिती बदलण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यापैकी तुम्ही एक होता. 1992-93 साली वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वार्सा गावात आरोग्य केंद्र सुरू झाले आणि डॉ. फाटक या केंद्राचे काम पाहू लागले. कराड-पाटण परिसरात प्रचारक म्हणून काम करत असताना भविष्यात आपण वनवासी क्षेत्रात काम करायचे, हे डॉ. फाटकांनी ठरवले होते आणि त्यानुसार ते वार्सा येथे आले होते. डोक्यावर एक भळभळती जखम घेऊन तुम्ही दवाखान्यात गेलात आणि तेथे तुमची डॉ. फाटकांशी भेट झाली. तेव्हापासून हा कारवा सुरू झाला आहे विकासाचा, शाश्वत मूल्यांचा आणि विचारांचाही.
 
 
चैत्रामभाऊ, खरं तर डॉ. फाटक भेटण्याआधी तुमच्या डोक्यात काही तरी खळबळ चालू होतीच. आपल्या गावाचे भले व्हावे, आयाबायांच्या डोक्यावरचा हंडा उतरावा आणि पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी म्हणून तुम्ही प्रयत्न करीत होतात. एम.कॉम.पर्यंत शिक्षण झाल्यावर कुठे तरी नोकरी शोधत फिरण्यापेक्षा गावाच्या भल्याचा तुम्ही विचार केलात आणि कामाला लागलात. तुम्ही सांगितले होते, ’मी माझ्या खर्चाने निलगिरीची रोपे आणली, लावली; पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पदरी निराशा आली. डॉक्टर भेटले आणि पुन्हा उमेद मिळाली.’ डॉक्टरांशी तुमचा परिचय झाला आणि तुम्हाला तुमचे जीवनउद्दिष्ट कळाले. डॉक्टर फाटकांविषयी बोलताना तुम्ही म्हणाला होतात, ‘फाटकांसारखी मंडळी आपले घर आणि कुटुंबापासून दूर राहून वनवासींसाठी काम करताहेत. मग आपण पुढाकार घेऊन आपल्या गावाचं चित्र का बदलू नये?’ तुमच्या मनात हा विचार इतका पक्का झाला की, तुम्ही नोकरी न करण्याचा निर्णय घेऊन यापुढे जगायचे ते गावासाठी आणि गावविकासासाठी. असे धाडसी निर्णय घेताना तुम्ही तुमच्या भविष्याचा आणि कुटुंबाचा विचार केला होता का? भगीरथाने धरतीवर गंगा आणण्यासाठी जे परिश्रम घेतले तोच वारसा तुम्ही पुढे चालविण्यासाठी सिद्ध झाला होता.
 
 
तुमचा निर्धार झाला आणि तुम्ही बारीपाडा ग्राम विकास समिती स्थापन केली. बाबूराव पवार, मोतीराम पवार, देवचंद पवार आणि लहानू पवार यांना सोबत घेऊन तुम्ही पाच पांडवांची वज्रमूठ तयार केलीत आणि कामाला भिडलात. तुम्हाला केवळ कष्टाचे डोंगर फोडायचे नव्हते, तर बारीपाडा गावच्या नागरिकांच्या व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणायचा होता. अज्ञान, दारिद्य्र आणि अनारोग्य या समस्यांना तोंड देतानाच पर्यावरणाचा होणारा र्‍हास थांबवायचा होता.
 
 
चैत्रामभाऊ, हे आव्हान तुम्ही स्वीकारलेत. बेसुमार वृक्षतोड थांबविण्यासाठी आवश्यक असणारे प्रबोधन करताना भविष्याची चिंता आणि वर्तमानातील गरज यांची सांगड घालावी लागत होती. हळूहळू तुमची मते ग्रामस्थांना पटू लागली; पण ती अंगवळणी पडण्यासाठी काही अवधी देणे आवश्यक होते. मुळात शाश्वत विकासासाठी तुम्ही झटत होता. त्यामुळे केवळ जंगल वाढविणे किंवा वृक्षतोड थांबविणे एवढ्यापुरता तुमचा विषय नव्हताच. जंगल, जल, जमीन, जनावर आणि जन या पाच बिंदूंवर तुम्हाला काम करायचे होते आणि त्यासाठी डॉ. फाटकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कामाला भिडला होतात.
 
 
चैत्रामभाऊ, तुम्ही प्रबोधनाचा मार्ग स्वीकारलात; पण त्याला फारसे यश येईना. जंगलतोड होतच होती आणि बारीपाडा शहाणा झाला तरी आसपासच्या गावांचं काय? त्यांच्या कुर्‍हाडी कोण थांबविणार? शेवटी तुम्ही दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतलात. गावातील दोन तरुणांना जंगलात राखणीचे काम दिले. जो झाड तोडताना सापडेल त्याला दंड, असा ग्रामस्थांचा निर्णय करून घेतला आणि वृक्षतोडीला आळा बसला. तुम्हाला केवळ झाडांची कत्तल थांबवायची नव्हती, तर निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करून बारीपाड्याच्या अनंत समस्यांचे उत्तर मिळवायचे होते. त्यातूनच तुम्ही लोकसहभागातून डोंगरात बांध घालण्यास सुरुवात केली. डोंगरात मुबलक मिळणारे दगडगोटे जमा करून तुम्ही ओढे अडवले. पावसाचे पाणी खळखळून न वाहता स्थिर होऊ लागले आणि जमिनीत मुरू लागले. जैवसाखळी शाश्वत स्वरूपात उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जुन्या वृक्षांचे संवर्धन आणि नव्या झाडांची लागवड करताना तुम्ही जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा कधीही विसर पडू दिला नाहीत.
 
 
जंगल आणि पाण्याचा विषय गावकर्‍यांना पटला, त्यांनी स्वीकारला आणि तुम्ही शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. केवळ पावसावर अवलंबून असणार्‍या आणि ठरावीकच पारंपरिक पिके घेणार्‍या बारीपाड्यात तुम्ही वेगवेगळे प्रयोग सुरू केले.
 
इंद्रायणीसारखी सुवासिक तांदळाची शेती केलीत तशी उसाची लागवडही केलीत. धुळे जिल्हा- सार्की तालुका हे काही उसाच्या लागवडीचे क्षेत्र नाही; पण तुम्ही धाडस केलेत आणि बारीपाड्यात ऊस पिकू लागला. मोठ्या हौसेने उसाची लागवड केली; पण उसाचे करायचे काय? हा प्रश्न पुढ्यात उभा ठाकला. बारीपाड्याच्या जवळ कोणताही साखर कारखाना नव्हता. मग तुम्ही गुर्‍हाळ सुरू केलेत. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाऊन गुर्‍हाळाचा अभ्यास केलात.
 
 
गावकर्‍यांना सोबत घेऊन तुम्ही उत्तम प्रतीचा गूळ तयार केलात. चैत्रामभाऊ, मला हे लिहिताना खूप सोपे जाते आहे; पण तुम्ही निर्माण केलेली ही शाश्वत विकासाची पदचिन्हे इतक्या सहजासहजी उभारली नाहीत. त्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतलेत. पारदर्शक व्यवहार आणि सारासार विवेक यांच्या आधाराने तुम्ही वाटचाल करत राहिलात. तुमच्या जीवनातील एक घटना डॉ. फाटकांनी सांगितली होती. सामाजिक जीवनात कार्यकर्ता म्हणून काम करताना कसा व्यवहार केला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या जीवनातील ती घटना होय असे मला वाटते.
 
 
त्याचे असे झाले की, तुमच्या बचतगटातून तुमच्या वडिलांनी रक्कम घेतली आणि ठरलेली मुदत संपली तरी ती परत केली नाही. बचतगटाची बैठक बसली. वसुली कशी करायची, हा सर्वांसमोर पेच होता. त्याहीपेक्षा तुमचे वडील थकबाकीदार होते, त्यामुळे तुमच्यापुढे वसुलीचा तगादा कसा लावायचा, हा सार्‍यांसमोर प्रश्न होता. तुम्ही सार्‍या सभासदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि एका क्षणात निर्णय घेतला. जेवढी रक्कम थकीत आहे तेवढ्या किमतीची वस्तू घरातून उचलून आणा आणि बचत गटात ठेवा.
 
चैत्रामभाऊ, तुम्ही सारासार विवेकाने वागलात. तुम्ही तुमच्या वडिलांची बाजू घेतली नाही, तर नीरक्षीरविवेक केलात. कदाचित त्या वेळी तुम्ही वडिलांची पाठराखण केली असती, तर तुम्हाला कोणी दोषी ठरविले नसते किंवा कोणी आक्षेपही घेतला नसता; पण तुम्ही निरपेक्ष भावनेने निर्णय दिलात. मला वाटतेय चैत्रामभाऊ, ही तुमच्या नेतृत्वाची परीक्षा होती. नात्यागोत्याच्या गुंत्यात न गुंतता तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःला सिद्ध केलेत आणि या प्रसंगामुळे बारीपाड्याच्या गावकर्‍यांचा तुमच्यावरचा विश्वास अधिकच दृढ झाला.
 
 
चैत्रामभाऊ, तुम्हाला बारीपाड्याचा विकास करायचा होता त्यासाठी सामुदायिकता किंवा समूहमताची गरज आहे, हे तुम्ही ओळखले होते आणि म्हणूनच प्रत्येक उपक्रम समूहाचा कसा होईल, सर्वांची सहभागिता कशी राहील यावर तुम्ही लक्ष दिलेत. सार्वजनिक काम म्हटले की, वेगवेगळे विचार आणि वेगवेगळे स्वभाव असणारी माणसे सोबत घेऊन पुढे जावे लागते. प्रत्येकाच्या मनाचा आणि मताचा आदर राखता आला नाही तरी सर्वांना पटेल आणि रुचेल असा सुवर्णमध्य काढत काम उभे करावे लागते. 1992 सालापासून तुम्ही हे काम करत आहात. या कामाचे अनेक टप्पे आहेत.
 
 
चैत्रामभाऊ, बारीपाड्यात वनभाजी स्पर्धा कशी सुरू झाली, हे आठवतं का तुम्हाला? कॅनडाहून शैलेश शुक्ल 2013 साली बारीपाड्यात आले. वनऔषधींवर त्यांना प्रबंध लिहायचा होता. तुम्ही आणि तुमचे सहकारी त्यांना घेऊन जंगलात भटकलात. या भटकंतीत त्यांना 300-350 वनस्पतींच्या प्रजाती सापडल्या. त्यातील दोनतृतीयांश वनस्पती या वनऔषधी होत्या. ही गोष्ट लक्षात आल्यावर तज्ज्ञ मंडळींची मदत आणि मार्गदर्शन घेऊन तुम्ही वनभाजी स्पर्धा घ्यायचे ठरवलेत. दरवर्षी होणार्‍या यास्पर्धेत भाग घेणार्‍या महिला जंगलात भटकून वेगवेगळ्या वनभाज्या जमा करतात आणि त्यावर प्रक्रिया करून स्पर्धेत मांडतात. त्या भाजीचे पारंपरिक नाव, आकार आणि रंग यांची माहिती महिला देते, तर परीक्षक त्या भाजीचे औषधी गुणधर्म समजावून सांगतात.
 
 
चैत्रामभाऊ, तुमची ही आगळीवेगळी वनभाजी स्पर्धा आता बारीपाड्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर तालुका, जिल्हा असे टप्पे पार करत ती महाराष्ट्रभर पोहोचली आहे. तुमच्या या वनभाजी स्पर्धेची प्रतीक्षा अनेक पत्रकार करतात. अनेक मंत्री आणि आमदार या स्पर्धेला उपस्थित राहिले आहेत.
 
 
चैत्रामभाऊ, 1992 सालचा बारीपाडा आणि आजचा बारीपाडा यात जमीन-आसमानाचे अंतर आहे. कधीकाळी बेसुमार वृक्षतोड आणि पाण्याचे दुर्भिक्ष असणारा बारीपाडा आता सदाहरित डोंगरासाठी आणि वाहणार्‍या ओढ्यांसाठी ओळखला जातो. निसर्ग आणि माणूस यांच्या समन्वयातून ही संपदा निर्माण झाली आहे. तिचे रक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे यासाठी तुम्ही दक्ष असता आणि म्हणून भावी पिढीवर वनसंरक्षणाचे संस्कार करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता.
 
 
बारीपाड्याच्या भावी पिढीच्या मनात रानातील झाडे, वनस्पती आणि पशुपक्षी यांच्याविषयी प्रेम आणि आपुलकी रुजणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन तुम्ही बारीपाडा ग्रामविकास संगतीच्या माध्यमातून वनसहलीचे आयोजन करू लागलात. ठरलेल्या दिवशी घरातील तांदूळ घेऊन मुले जंगलात जातात. मुलांनी आणलेल्या तांदळातून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. भोजन तयार होईपर्यंत मुले मुक्तपणे जंगलात फिरतात. झाडाझुडपांची नावे आणि उपयोग आपल्या नोंदवहीत टिपून घेतात. फिरताना दिसणार्‍या प्राणी-पक्ष्यांचा अभ्यास करतात. जे प्राणी आणि पक्ष्यांचे नाव अचूकपणे ओळखतात त्यांना बक्षीसही दिले जाते.
 
 
वनभटकंतीच्या दरम्यान मुलांना बांधबंदिस्ती करण्याचे कसबही शिकवले जाते. त्याचबरोबर समितीचे कार्यकर्ते ग्रामविकास म्हणजे काय? तो कोणकोणत्या अंगाने करता येतो? याची माहिती सोप्या पद्धतीने देत असतात. त्यामुळे बारीपाडा गावातील मुले वनसजग होतात.
 
 
चैत्रामभाऊ, तुम्हाला माहीत आहे की, सर्व समस्यांचे मूळ हे अज्ञानात आहे. त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण वाढले पाहिजे. तुम्ही स्वतः एम.कॉम. झालात; पण तुमच्या एकट्याच्या शिक्षणाने प्रश्न सुटणार नव्हता. सारे गाव शिकले तरच काही बदल घडून येणार यावर तुमचा विश्वास होता. बारीपाड्यात प्राथमिक शाळा आहेत; पण गळतीचे प्रमाण खूप होते. इथेही कधी प्रबोधन, तर कधी दंडात्मक कारवाईचा मार्ग स्वीकारत तुम्ही गावात शिक्षणाची आवड निर्माण केलीत. बारीपाड्यात अनेक तरुण-तरुणी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकर्‍या करीत आहेत. माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक, कंडक्टर, ग्रामसेवक आणि परिचारिका अशा विविध भूमिका आत्मविश्वासाने पार पाडीत आहेत. बारीपाड्यातील एक मुलगी इंजिनीअर झाली, तर एकीने शिक्षण पूर्ण झाल्यावर राष्ट्रोद्धाराच्या कार्यासाठी वनवासी कल्याण आश्रमाची विस्तारिका म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. बारीपाड्याचा एक तरुण संघ प्रचारक म्हणून काम करू लागला. काही तरुण पदवीधर झाल्यावर ठरवून गावात शेती करत आहेत. ही सारी किमया केवळ तुमच्या परिश्रमामुळेच झाली आहे. चैत्रामभाऊ, तुम्हाला तुमचे कौतुक केलेले आवडत नाही आणि स्वतः तुम्ही काय सांगत नाही. खूप कमी शब्दांत तुम्ही माहिती देता, तीही स्वत:ला अलिप्त ठेवून. ’मी केले’, ’माझ्यामुळे झाले’ असे शब्द बहुधा तुमच्या शब्दकोशात नाहीतच. तुम्ही ’स्वत:’ विसरून गेलात आणि ’आपण’च्या भावस्थितीत आलात. ’आपण’मध्ये काय शक्ती असते याची प्रचीती बारीपाड्याच्या नागरिकांना दिली आणि ती उभ्याआडव्या महाराष्ट्राला दिली. म्हणूनच बारीपाडा पाहण्यासाठी आणि तुम्हाला भेटण्यासाठी सारा महाराष्ट्र आतुरलेला असतो.
 
 
चैत्रामभाऊ, तुम्ही शिक्षणाइतकेच आरोग्याला महत्त्व दिलेत. वैद्यकीय शिक्षण, आरोग्यजागृती आणि आरोग्यविषयक सेवासुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या वापराची सवय लावणे यावर तुम्हाला सुरुवातीला खूप काम करावे लागले होते. आरोग्यरक्षक, दाई प्रशिक्षण अशा कामांतून गावातील काही नागरिकांना तुम्ही आरोग्यरक्षण आणि स्वच्छतेचे धडे दिलेत आणि त्यांना हाताशी घेऊन सार्‍या गावात आरोग्याविषयी जागृती निर्माण केली. स्वच्छतेच्या बाबतीत अजूनही काम चालूच आहे. खरं तर ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गावातील प्रत्येक घरात एक असे 66 शोषखड्डे खणले गेले. शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रबोधन केले. सुरुवातीला उघड्या रानात शौचालयास जाणारे गावकरी आता शौचालयाचा वापर करू लागले आहेत. हा बदल सहजासहजी होत नाही. त्यासाठी नेटाने काम करावे लागते. हे तुम्ही तुमच्या कामातून दाखवून दिले आहे. कुटुंब नियोजनासंबंधीही लोकजागृतीच्या माध्यमातून ग्रामविकास समिती चांगली कामगिरी करते आहे. बारीपाड्यात महिला नसबंदीपेक्षा पुरुष नसबंदीचे प्रमाण जास्त आहे. गावातील स्त्री-पुरुषांनी कुटुंब नियोजनाची गरज ओळखली आहे आणि कमीत कमी अपत्ये असावीत यासाठी प्रयत्न केले आहेत.
 
 
चैत्रामभाऊ, 1992 साली तुमचा आणि डॉक्टर फाटकांचा संपर्क झाला नसता तर काय झाले असते, असा मला प्रश्न होता. त्यावर डॉक्टरांनी उत्तर दिले. ’काहीही झालं असतं. चैत्रामभाऊंनी त्यांच्या क्षमतेनुसार काम केलंच असतं, कारण काम करण्याची प्रचंड ऊर्जा चैत्रामभाऊंकडे आहे.’ तुम्हाला हाच प्रश्न विचारला होता तेव्हा तुम्ही म्हणाला होता, ‘डॉक्टरांमुळेच हा सर्व बदल घडून आला आणि ग्रामविकास झाला.’ एकूणच काय, तर तुम्ही दोघेही कोणत्याही प्रकारचे श्रेय घेण्यास तयार नाही. सतत काम करत राहणे, विकासाचे नवनवे टप्पे सर करणे, हाच तुमचा जीवनोद्देश झाला आहे. सातत्याने प्रयोग करताना कधी यश आले, अपयशही आले; पण त्यामुळे तुम्ही विचलित झाला नाहीत. बारीपाड्यातील दारूबंदी हा तुमचा फसलेला प्रयोग. एका चांगल्या उद्देशाने सुरू केलेला दारूबंदीचा प्रयोग वाईट परिणाम देऊ लागला तेव्हा तुम्ही त्या परिणामाचा आग्रह सोडला. मात्र व्यसनमुक्तीचे प्रबोधन कायम ठेवले. आज ना उद्या या प्रयोगाला नक्की यश येईल अशी खात्री ठेवून तुम्ही काम करत राहिलात.
 
 
चैत्रामभाऊ, तुम्ही केवळ ग्रामविकासाचा ध्यास घेऊन काम करत राहिलात आणि जगाने त्याची दखल घेतली. बारीपाड्याच्या निसर्गाधारित ग्रामविकासाकडे जग केवळ कुतूहलानेच पाहत नव्हते, तर शाबासकीची थापही पाठीवर देत होते. 2001 साली बारीपाडा ग्रामविकासाला पहिला पुरस्कार मिळाला. ’आदिवासी हिंदू अस्मिता’ नावाचा 2003 साली IFAD (International Fund for Agricultural Development) पुरस्कारामुळे बारीपाडा आंतरराष्ट्रीय नामांकनात गेला. आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेने जागतिक पातळीवर 2030 साली वीस बिंदू निश्चित केले आहेत. त्यातील जवळजवळ 15 बिंदूंवर आपण काम केलं आहे. हे कौतुक समाजाला करायला हवे.
 
 
तुम्ही जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात जे काम केले त्याची ती पोचपावती होती. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तुम्ही डॉ. फाटकांसह बँकॉकला गेलात. मग शासनाने तुम्हाला शेतीनिष्ठ पुरस्कार दिला आणि मग तुम्हाला आणि बारीपाडा ग्रामविकास सोसायटीला अनेक पुरस्कार मिळू लागले. डॉ. हेडगेवार सेवा निधी पुरस्कार, संस्कार कवच नागपूर, गो. नी. दांडेकर फौंडेशन पुणे, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, नातू फौंडेशन सेवावृत्ती पुरस्कार अशा अनेकानेक पुरस्कारांनी बारीपाडा गौरांकित झाला. चैत्रामभाऊ, तुम्हाला जेव्हा जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा तुम्ही एकट्यानं स्वीकारला नाही. बारीपाड्यातील आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन गेलात. सर्वांनी मिळून काम केले, सर्वांनी मिळून यश मिळविले आणि म्हणून पुरस्कारही आपला सर्वांचा आहे, ही भावना तुम्ही गावात रुजविलीत. चैत्रामभाऊ, जागतिक पातळीवर शाश्वत विकासाचे सतरा बिंदू निश्चित झाले आहेत. या बिंदूंना घेऊन जगभरात काम चालते. पुढच्या काही वर्षांत हे बिंदू हा सर्वांच्या जगण्याचा विषय व्हावा असा प्रयत्न सर्वच स्तरांवर व्हावा, असा आग्रह असणार आहे. चैत्रामभाऊ, या सतरा बिंदूंपैकी जवळजवळ पंधरा बिंदूंवर आपण बारीपाड्यात आजपर्यंत काम केले आहे आणि उरलेले दोन बिंदूही लवकरच तुम्ही साध्य कराल याची खात्री आहे.
 
 
चैत्रामभाऊ, तुम्हाला हे पत्र लिहिताना अनेक गोष्टी आणि प्रसंग सहजपणे निसटून जात आहेत. सर्व आठवते, पण शब्दांत मांडता येईना. खरं तर तुमचे जीवन आणि बारीपाड्याची विकासगाथा ही एका मोठ्या पुस्तकाची गोष्ट आहे. आपण ते पुस्तक करतोय. डॉ. फाटकांचीही तीच इच्छा आहे. ’साप्ताहिक विवेक’ तुमच्या प्रकल्पावर पुस्तक करतेय आणि त्या घडामोडीत मी सहभागी आहे याचा मला आनंद आहे.
 
 
चैत्रामभाऊ, आपले पुस्तक येईल. लवकरच जगाला तुमच्या प्रकल्पाची गोष्ट कळेल; पण भाऊ, तुमचा साधेपणा आणि तुमचे मितभाषीपण आम्हाला शब्दांत पकडता येईल का? तुम्ही खूप कमी बोलता, स्वत:बद्दल बोलायला तर अजिबात तयार नसता. अशा वेळी लेखन करणार्‍या प्रकाश कामतांची कसोटी लागणार आहे; पण तुमच्या सहकार्यामुळे पुस्तक नक्कीच चांगले होईल याची मला खात्री आहे.
 
 
चैत्रामभाऊ, श्रीकांतचा लेख वाचून तुम्हाला पत्र लिहायला घेतले आणि खूप भरकटत राहिलो; पण मी तरी काय करणार? तुमचे कामच एवढे आहे की, मी लिहीत राहिलो. माझे हे लिहिणे परिपूर्ण नाही. तुमच्या कामाचा एक अंश जो मला कळला तोच मी या पत्रातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लिहिता लिहिता जे सहजपणे आठवले ते मांडले आहे. या मांडण्यापलीकडे अजून खूप काही शिल्लक आहे याचीही मला जाणीव आहे.
 
 
चैत्रामभाऊ, तुम्ही दीर्घकाळ ग्रामविकासाच्या कामात गुंतला आहात. एवढ्या मोठ्या कालखंडात खूप भलेबुरे अनुभव तुम्ही गाठीशी बांधले आणि त्या शिदोरीवर वाटचाल करत राहिलात. या शिदोरीतील मूठपसा जगाला मिळावा आणि तुमच्यासारखे अनेक चैत्राम निर्माण व्हावेत, हीच एक इच्छा मनात ठेवून लिहीत आहे. बाकी काय लिहू? स्नेह आहेच, तो वृद्धिंगत होईल.
 
आपलाच
रवींद्र गोळे

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001