केवळ तंजावूरच नाही, तर संपूर्ण तमिळनाडूमध्ये मराठा राजवटीच्या खुणा जागोजागी दिसतात. मराठा इतिहासाची अनेक पाने तमिळनाडूशी जोडलेली आहेत. मराठा राजांनी आपल्या कारकीर्दीत घडलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद केली आहे. उदा. मंदिराचे जीर्णोद्धार, वाहनांची व्यवस्था करणे आणि पूजापाठ लावणे इ. तमिळनाडूमध्ये मराठा राजांशी संबंधित 34 हून अधिक शिलालेखांचा उलगडा झाला आहे. त्यात आणखी नव्याने भर पडत आहे. यासंदर्भातील माहिती देणारा लेख..
दोन महिन्यांपूर्वी, ऑक्टोबरमध्ये, तंजावूर (तंजावर) येथील बृहदेश्वर मंदिरात सापडलेल्या एका शिलालेखाने तमिळ माध्यमांचे लक्ष आकर्षित केले. तंजावूर येथे मराठी राजे राज्य करत असताना अपराध्याला कशा प्रकारे शिक्षा देत असत आणि कशा प्रकारे न्यायनिवाडा होत असे, यावर या शिलालेखाने प्रकाश टाकला. हा शिलालेख देवनागरी आणि मोडी लिपी वापरून मराठी भाषेत लिहिला आहे, हे विशेष. यानिमित्ताने तमिळनाडूतील मराठी पावलांचा मागोवा घेण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, अशी अपेक्षा आहे. मराठा शिलालेखांचा अभ्यास याआधी झाला असला, तरी संपूर्ण तपशील आताच समोर येऊ लागला आहे, असे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या शिलालेख विभागाचे संचालक मुनीरत्नम रेड्डी यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले.
चोल, पांड्य आणि नायक (नायगर) राजांनंतर तंजावूरवर मराठा राजांचे राज्य होते. तंजावूर 1674 मध्ये त्यावर राज्य करणार्या विजय रघुनाथ नायककर यांच्याकडून मराठा एकोजी वेंकोजीराव भोसले यांच्या ताब्यात आले. चोलांची राजवट सुमारे 140 वर्षे चालली. नायक राजांनीही याच काळात राज्य केले; पण तंजावूरवर मराठा राजांनी त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे 170 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. या राजांच्या वंशाचा, राजवटीचा आणि भेटवस्तूंचा सर्व तपशील शिलालेखांमध्ये कोरला आहे.
हा नवीन सापडलेला शिलालेख बृहदेश्वर मंदिर, ज्याला पेरिय कोविल किंवा मोठे मंदिर म्हटले जाते, त्या मंदिराच्या परिसरात असलेल्या गणेश मंदिराच्या वायव्य दिशेला आहे. (या गणेशाची स्थापनाही मराठ्यांनीच केली आहे.) एका स्मशानभूमीच्या वादाशी संबंधित हा विशिष्ट शिलालेख 1724 चा आहे. तो तुळजाराजे यांचे चिरंजीव शरफोजी पहिले यांच्या काळात तो कोरला गेला होता. त्यातील माहितीनुसार, अंत्यसंस्कारासाठी जमिनीच्या हक्कावरून कोडियान, सिनान, तंजनान आणि कलवाट्टी या समुदायांमध्ये संघर्ष सुरू होते. हे प्रकरण सुनावणीसाठी राजाकडे आले. त्या वेळी राजाने या समुदायातील एकेका व्यक्तीला उकळत्या तुपाच्या भांड्यात हात घालण्याचा आदेश दिला. त्यात तांजियान नावाच्या व्यक्तीच्या हाताला उकळत्या तुपाचा स्पर्श झाला नाही. त्यामुळे खटल्याचा निकाल त्याच्या बाजूने देण्यात आला. एखाद्याने चूक केली नाही तर त्याला काहीही होणार नाही, ही मराठा राजांची श्रद्धा होती.
मुनीरत्नम रेड्डी यांच्या मते, तंजावूरमध्ये भारतीय पुरातत्त्वसर्वेक्षणाने सुमारे 40 मराठा शिलालेखांचे लिप्यंतर केले आहे. त्यांच्या मते, मराठा राजांचे शिलालेख वाचले गेले आहेत; पण ते गांभीर्याने घेतले गेले नाहीत. तंजावूर बृहदेश्वर मंदिराच्या भिंती व खांबांवर असंख्य शिलालेख असून पुरातत्त्व खात्याने त्यांचे लिप्यंतर केले आहे. तमिळ शिलालेख अनेकांनी वाचले आहेत आणि पुस्तके म्हणून प्रकाशित केले आहेत; पण मराठा शिलालेखांकडे पुरेसे लक्ष देण्यात आलेले नाही. मराठा शिलालेखांचे वाचन करून ते ग्रंथरूपाने आणण्याचे काम पुरातत्त्व खाते करत आहे.
केवळ तंजावूरच नाही, तर संपूर्ण तमिळनाडूमध्ये मराठा राजवटीच्या खुणा जागोजागी दिसतात. मराठा इतिहासाची अनेक पाने तमिळनाडूशी जोडलेली आहेत. मराठा राजांनी आपल्या कारकीर्दीत घडलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद केली आहे. उदा. मंदिराचे जीर्णोद्धार, वाहनांची व्यवस्था करणे आणि पूजापाठ लावणे इ. तमिळनाडूमध्ये मराठा राजांशी संबंधित 34 हून अधिक शिलालेखांचा उलगडा झाला आहे. आता 15 नवीन शिलालेख आले आहेत. यापैकी प्रत्येक शिलालेख 612 फूट आकाराचा आहे.
तमिळ प्रदेश परका असूनही मराठ्यांनी येथील मंदिरातील पूजा आणि प्रशासनात कोणताही बदल केला नाही. हे राजे काही मंदिरांच्या कारभारावर थेट लक्ष ठेवत आणि त्यांचे व्यवस्थापन पाहत. हे राजे स्वतः प्रखर शिवभक्त असले, तरी शैव आणि वैष्णव असा पंथभेद त्यांनी कधी केला नाही. दोन्ही प्रकारची मंदिरे त्यांनी सुस्थितीत ठेवली. शिवाय पुण्णै नल्लुर मरियम्मन मंदिरासारख्या अनेक नवीन मंदिरांचीही बांधणी केली. हे मंदिर इ.स. 1677 मध्ये बांधण्यात आले. तंजावरपासून पूर्वेला सहा किलोमीटरवर ते आहे. तंजावूर शहरातील सर्व मंदिरे त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळली आहेतच. शिवाय तिरुवैयारू येथील आयराप्पर मंदिर, तिरुविडैमारुदुरु, कुंभकोणम, तिरुभुवनम, तिरुवारुर, तिरुपाऴनम, बंडानल्लुर, तिरुवापाडी, पट्टिचारम, तिरुवनैयालुम, तिरुवनायरुम अशा मंदिरांना त्यांनी दिलेल्या सेवांचे तपशील आहेत.
तिरुवारुर येथील श्री त्यागराज स्वामी मंदिराच्या देवसिरिया मंडपात मराठाकालीन चित्रे अजूनही पाहायला मिळतात. ही चित्रे 300 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. या मंदिराच्या उत्सवात त्या काळी कशा प्रकारे रोषणाई केली जात होती, याचे चित्रण त्यामध्ये केले आहे.
मदुरै येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराला अर्काडच्या मुस्लीम नवाबाने धक्का लावायचा प्रयत्न केला तेव्हा मराठ्यांनी त्याचा प्रतिकार केला होता. तशी माहिती त्या मंदिरातील फलकावर आहे. मराठ्यांनी 1740 च्या दशकात मदुरै शहर काबीज केले आणि चंदा साहिबला कैद केले. पुढील दोन वर्षे हे शहर मराठ्यांच्या ताब्यात होते. याशिवाय तिरुवरंगम, रामेश्वरम, तिरुप्पनंदल आणि श्रीलंकेतील जाफना येथील मंदिरांनाही मराठ्यांची सेवा लाभल्याचे ऐतिहासिक उल्लेख आहेत. महाराष्ट्रातील मराठ्यांनीही या मंदिरामध्ये सेवा व उपासना केली आहे. बृहदेश्वर मंदिरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी एक लक्ष कमळ वाहण्याचे व्रत केले होते.
शाहजी (शहाजी) राजे (इ. स. 1684 ते 1712 ) यांच्या काळात पोर्तुगीज मिशनरी भारतीय पोशाख परिधान करून स्वतःला ’रोमन ब्राह्मण’ म्हणवून घेत. ते हिंदू मंदिरांजवळ थांबून धर्मप्रचार करत. कडलूर येथे ख्रिश्चनांनी राजांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान करणारे नाटक सादर केले. त्यामुळे शाहजी संतापले आणि त्यांनी ख्रिश्चनांना अटक करण्याचे आदेश दिले. त्यांच्यावर कर लादला. तंजावूर व पाँडिचेरी येथे राहणार्या ख्रिश्चनांना अद्दल घडविण्यात आली. त्यांचे चर्च उद्ध्वस्त करण्यात आले. अखेर नवाब दाऊद खानच्या हस्तक्षेपानंतर राजे शाहजी शांत झाले.
तिरुवन्नामलई, जिंजी आणि पुदुचेरी
तमिळनाडूत मराठ्यांची सर्वात मोठी मुद्रा तिरुवण्णामलै येथे उभी आहे. या मुद्रेला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा वरदहस्त लाभला आहे. दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना छत्रपती शिवाजी महाराज तिरुवण्णामलै येथे आले होते. त्या वेळी तेथील दोन मंदिरे मुस्लीम आक्रमकांनी उद्ध्वस्त करून त्यांचे मशिदीत रूपांतर केल्याचे त्यांना कळले. त्यांनी तात्काळ आपल्या सैनिकांना त्या मशिदी पाडून पुन्हा त्यांचे मंदिरात रूपांतर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शोणाचलापती हे महादेवाचे मंदिर आणि समुत्तिर पेरुमाळ हे विष्णूचे मंदिर पुन्हा बांधण्यात आले. महाराजांनी 1000 गाई मंदिराच्या मंडपात आणल्या आणि तिथे प्राणप्रतिष्ठा करून घेतली. अण्णामलाई येथील कार्तिकै दीपम हा उत्सव आता जगप्रसिद्ध झाला आहे. मात्र तो उत्सव आक्रमकांच्या भीतीने बंद पडला होता. तो शिवाजी महाराजांनी पुन्हा सुरू केला.
तिरुअण्णामलाईच्या जवळच असलेल्या जिंजीलाही मराठी इतिहासात मानाचे स्थान आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी तब्बल नऊ वर्षे येथे राहून मोगलांचा सामना केला. खुद्द शिवाजी महाराजांनीच अजिंक्य किल्ला म्हणून या किल्ल्याला दाद दिली होती. ब्रिटिशांनी ट्रॉय ऑफ द ईस्ट असे त्याचे नामकरण केले होते. या जिंजीच्या परिसरात मराठ्यांशी संबंधित अनेक स्थाने आहेत.
जिंजीपासून जवळच (64 किलोमीटर) पुदुच्चेरी आहे. तमिळनाडूला लागून असल्यामुळे येथे तमिळ संस्कृती आहे. तसेच फ्रेंचांची राजवट असल्यामुळे येथे फ्रेंच संस्कृती प्रकर्षाने जाणवते. मात्र येथेसुद्धा मराठ्यांचा अतूट संबंध आहे, कारण मुळात पुदुच्चेरी हा भाग मराठ्यांचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुभेदाराने कर्नाटकच्या मोहिमेवर असताना पुदुच्चेरी जिंकली, मात्र फ्रेंच आणि मराठ्यांचे संबंध जवळिकीचे होते म्हणून फ्रेंचांना तेथे व्यापार करण्याचा परवाना देण्यात आला. छत्रपती राजाराम महाराजांना जेव्हा पैसे आणि शस्त्रांची निकड जाणवली तेव्हा त्यांनी पुदुच्चेरी फ्रेंचांना विकण्याचे ठरवले. पण हा सौदा होऊ शकला नाही आणि राजाराम महाराजांनी पुदुच्चेरी डचांना विकली. पुढे डच सत्ताधार्यांनी करार करून ती फ्रेंचांना दिली. ज्या भागात फ्रेंच लोकांची वस्ती होती त्याला व्हाइट टाऊन असे म्हणतात, तर मूळ निवासी तमिळ लोकांची वस्ती असलेल्या भागाला ब्लॅक टाऊन म्हणतात. या व्हाइट टाऊनमध्ये गणपतीचे मनक्कुळ विनायगर हे प्रसिद्ध मंदिर आहे. काही फ्रेंच अधिकार्यांनी ते तोडायचा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिक हिंदूंनी त्याला विरोध केला. त्याची दखल घेऊन मराठ्यांनीही त्याचे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. त्यामुळे डुप्लेला माघार घ्यावी लागली.
विशेषतः दक्षिण भारतात, त्यातही तमिळनाडूत फिरताना मराठ्यांची पदचिन्हे पावला-पावलांवर भेटत राहतात.