संगणकाला ‘हीलिंग टच’ देणारे कैलाश-संजय

विवेक मराठी    06-Jan-2025   
Total Views |
Quick Heal

Quick Heal
 
भारतातील क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड म्हणजे एक आघाडीची जागतिक सायबर सुरक्षा उपाय प्रदाता कंपनी म्हणून नावारूपाला आलेली आहे. नुकतेच या कंपनीने भारतातील सर्वप्रथम फ्रॉड प्रिव्हेन्शन सोल्यूशन - अँटिफ्रॉड एआय बाजारात आणले आहे. संगणकाला एखादा व्हायरस ग्रासून टाकतो व नाकाम करतो. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांच्या मेहनतीच्या कमाईवर डल्ला मारण्याचे सायबर गुन्हे सर्रास घडताना दिसत आहेत. त्यावरही या कंपनीने ग्राहकांना सुरक्षा उपाययोजना पुरविली आहे. त्यांच्या या क्षेत्रातील गरुडझेपेवर भाष्य करणारी ही मुलाखत.
एखादा सफल उद्योजक कसा घडतो? याचा विचार केला असता उद्योजकता ही एखाद्याच्या रक्तातच असावी लागते असे वाटते; पण रक्तात उद्योजकता असणे म्हणजे घराण्यात त्याचा वारसा असावा लागतो असे मात्र नाही. ज्याप्रमाणे एखाद्याचा रक्तगट ‘अ’ असतो, तर दुसर्‍याचा ‘ब’ असतो त्याप्रमाणे उद्योजकाचा रक्तगट हा ‘उ’ म्हणजे उद्योजक असावा लागतो, अशी भावना क्विक हीलच्या कैलाश आणि संजय काटकर या बंधुद्वयांना पाहून मनात निर्माण झाली. आपल्या संगीतविश्वात राम-लक्ष्मण, लक्ष्मीकांत- प्यारेलाल आणि आता अजय-अतुल अशा गाजलेल्या जोड्या दिसतात, त्याप्रमाणेच उद्योगविश्वातील ही कैलाश-संजय जोडी म्हणावी लागेल.
 
 
‘साहसे श्री प्रतिवसति’ असे म्हणतात. त्यामुळे उद्योजक बनण्यासाठी साहस हा फार मोठा गुण होय. सातार्‍यातील रहिमतपूरसारख्या छोट्या गावात जन्मलेले आणि बालपणी अर्धवट शिक्षण सोडलेले आणि नंतर बाहेरून दहावी उत्तीर्ण झालेले, पुढे आपल्या अनन्यसाधारण योगदानासाठी डॉक्टरेट मिळालेले क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन कैलाश काटकर हे अजब रसायन होय. त्याचबरोबर आपल्याला रस वाटत नाही अशा विषयांचे शिक्षण घेणे एखाद्यावर का बंधनकारक असावे? हीसुद्धा गोष्ट महत्त्वाची वाटते. एखाद्या विषयाची आवड स्वभावतः उमलत्या वयातच एखाद्याला असू शकते; पण तो आवडीचा विषय आपले जीवनलक्ष्य व्हावे असे वातावरण समाजात नसते. आता बुद्धिबळ विषयात जगज्जेता ठरलेल्या डी. गुकेश यानेही आपले शालेय शिक्षण अर्धवट सोडून दिले होते. खरे पाहता, आर्थिक परिस्थिती नसतानाही आपल्या मुलांना महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणार्‍या काटकर दांपत्याने आपल्या आशाआकांक्षा या बंधुद्वयावर लादल्या नाहीत म्हणूनच या मुलांनी उद्योगविश्वात एवढे नाव कमावले आहे, याबद्दल त्यांच्या पालकांनाही धन्यवाद दिले पाहिजेत.


Quick Heal 
 
खिशात पैसा नसताना आणि बँकेत साधे बचत खाते नसताना कैलाश काटकर यांनी कोणत्या धैर्याने पुण्याहून मुंबईला मालकाच्या कार्यालयात त्याच्यासमोर उभे राहून आत्मविश्वासाने आपला पुण्यातील व्यवसाय मला सोपवून टाका, असे म्हटले असावे? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांचे उत्तर खरोखरच अंतर्मुख करणारे होते. ते म्हणाले, मला त्यात गमावण्यासारखे काहीच नव्हते आणि झालाच तर फायदाच होणार होता. मालक यापुढे पुणे येथील शाखा बंद करणार हे मला स्पष्टच दिसत होते.
 
उद्योजकालाही अशीच दृष्टी असावी लागते हे निश्चित. कैलाश काटकर यांच्याकडे ही जणू उपजत दृष्टी असावी, कारण केवळ इलेक्ट्रिकल उपकरणे दुरुस्त करून पोटापुरते मिळवून अल्पसंतुष्ट राहण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता. कैलाश यांच्यासोबत काम करणार्‍या अन्य उच्चशिक्षित कर्मचार्‍यांचा विचार येथे नाही तर दुसरीकडे नोकरी करू, असा होता; पण त्या वेळी एका बँकेत संगणकीकरणाच्या विरोधात झालेले आंदोलन पाहून आता यापुढे संगणक हाच नव्या युगाच्या परवलीचा शब्द बनणार आहे, हे ओळखण्याची क्षमता आणि दृष्टी असणार्‍या कैलाश काटकर यांना दादच दिली पाहिजे. त्यांनी नुसती ही गोष्ट ओळखून सोडून दिली नाही, तर संगणकदुरुस्तीचे काम स्वत: शिकून घेण्यावर भर दिला आणि आपला धाकटा भाऊ संजय यालाही अभियांत्रिकी शिक्षणासाठी संगणक हाच विषय घेण्यासही सुचविले.
 
Quick Heal
 
आपण संगणक अभियंता होण्याचा विचार कसा केला, असे विचारल्यावर क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर संजय काटकर म्हणाले, ‘खरे म्हणजे आधी मला संगणकात रस नव्हता. केवळ गंमत म्हणून ते शिक्षण मी घेत होतो; पण माझ्या लक्षात एक गोष्ट आली की, अनेकदा आमच्या संगणक प्रयोगशाळेतील संगणक बंद असत किंवा संपूर्ण विभागच बंद असे. याचे कारण विचारल्यावर मला असे समजले की, संगणक हा विषाणूबाधित झाला आहे म्हणजे सोप्या भाषेत त्यात व्हायरस घुसला आहे. बरे, ही समस्या दादाच्या वर्कशॉपमध्येही निर्माण होत असे. माझे कुतूहल चाळविले गेले आणि मी व्हायरस कसा काढावा यावर प्रयोगच सुरू केले. त्याबाबत पुस्तके वाचून माझे मीच संशोधन केले. काय आश्चर्य, मला त्यात यश मिळाले. मग मी आमच्या महाविद्यालयातील विभागातील एकूण एक संगणकातील व्हायरस काढून दाखविला. आमचे प्रशिक्षक प्रभावित झाल्यानंतर त्यांनाही ते तपशिलात विवरण करून सांगितले. मग त्यांनी हाच विषय सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडण्यास सांगितले. तसे पाहता मी एवढा सभाधीट नव्हतो; पण अभ्यास करून हा विषय सर्वांसमोर मांडला. तसे पाहता हा विषयच तेव्हा सर्वस्वी नवीन होता.’
 

Quick Heal 
‘आपली व्यावसायिक गुपिते कोणासोबत वाटून घेण्यावर आपला विश्वास आहे का?’ असा प्रश्न विचारल्यावर खळखळून हसत संजय काटकर म्हणाले, ‘अशा प्रकारे ज्ञान हे एकमेकांसोबत वाटून घेतल्यावर वाढते हे मला कळले होते व आंतरराष्ट्रीय परिषदांत जेव्हा मी सहभाग घेतला तेव्हा ते प्रकर्षाने लक्षात आले. जेव्हा एका परिषदेत मांडणी करणार्‍या वक्त्यापेक्षा माझ्याकडे या संदर्भातील ज्ञान अधिक आहे, असे माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला मुद्दाम विचारलेल्या प्रश्नांना तो उत्तर देऊ शकला नाही. मग मी माझ्याकडचे ज्ञान उघड केल्यावर अशा परिषदांतून आपण मांडणी करण्याची निकड जाणवली. मी जेव्हा अशी मांडणी करू लागलो तेव्हा या क्षेत्रातील माझ्या ओळखीची क्षितिजे विस्तारू लागली आणि अन्य देशांतील व्हायरसतज्ज्ञांशी माझे जवळचे संबंध निर्माण झाले आणि त्यातून वैचारिक देवाणघेवाण वाढल्यावर जे व्हायरस अद्याप भारतात आलेसुद्धा नाहीत त्यांचेही नमुने व माहिती मला प्राप्त होऊ लागली व माझ्या या संदर्भातील ज्ञानाच्या कक्षा सतत रुंदावत जाऊ लागल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्यापेक्षा वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसमोर जेव्हा विषयाची मांडणी फळ्यांवर आकृत्या वगैरे काढून केली तेव्हा मला लक्षात आले की, त्यांची या विषयातील समज अजून विकसित झालेली नाही. त्यामुळेही स्पर्धा वगैरेची भीती बाळगण्याची मला गरज वाटली नाही.’
 
 
‘आपली संगणक प्रयोगशाळा पाहायला मिळेल का,’ असे विचारल्यावर कैलाश काटकर पुन्हा हसले आणि म्हणाले की, ‘ही प्रयोगशाळा अन्य प्रयोगशाळांप्रमाणे नसते. तेथे केवळ संगणक आणि त्याच्यापुढे बसलेला माणूस एवढेच तुम्हाला पाहायला मिळेल. मी तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो. जेव्हा संजय व्हायरस काढण्यात तज्ज्ञ झाला आहे, असे माझ्या लक्षात आले तेव्हा हे विषाणू काढण्याची संगणक आज्ञावली त्याने बनवावी म्हणून मी त्याला संगणक आणून दिला व त्यावर त्याचे कामही सुरू झाले; पण हे काम दिसून येणारे काम नव्हते. माझे काम संगणक हार्डवेअरमध्ये असल्यामुळे व दुरुस्तीचे असल्यामुळे ते लोकांना दिसत असे. त्यामुळे जेव्हा संजयने वर्ष-दीड वर्ष संगणकासमोर बसून अँटिव्हायरस बनविण्याचे संशोधन आणि काम केले, तेव्हा प्रत्यक्ष आमच्या आईनेही मला सल्ला दिला होता, की कैलाश, तू चांगला काम करतो आहेस; पण हा संजय दिवसभर नुसता बसून असतो. त्याच्या नादी तू लागू नकोस. आता बोला.’
 
 
त्यावर संजय यांनी सांगितले की, ‘हो खरोखरच तसे बसून राहणे भाग होते; पण सगळ्यांना ही गोष्ट समजू शकत नाही; पण मला लाइफ पार्टनरसुद्धा समजून घेणारी मिळाली. तिचे नाव छाया. ती तशी डोळ्यांची डॉक्टर असल्यामुळे कदाचित माझे काम तिला दिसले असावे असेही आपण समजू शकतो; पण तिने नेत्र रुग्णालयात स्वत: काम करून मला माझ्या संशोधनासाठी खूप पाठिंबा दिला. तिला स्वत:चे नेत्र रुग्णालय काढता आले असते; पण माझ्या यशातच तिने आपले यश शोधले. आमच्या दादाला वहिनीसुद्धा अशाच समजूतदारपणे वागणार्‍या मिळाल्या. अनुपमा वहिनींनी संघर्षाच्या काळात अगदी बेकरी चालवून आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळली. आमच्या कुटुंबाच्या या भक्कम पाठिंब्यावरच आमचा हा व्यवसाय विस्तारला, असे आम्ही नक्की सांगू शकतो.’
 
 
उद्योजक यशस्वी कसा होतो, नव्या उद्योजकांना काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल, यावर तात्त्विक चर्चा झाल्यानंतर मी जेव्हा त्यांना उद्योगाव्यतिरिक्त कोणत्या आवडीनिवडी अथवा हौशी आहेत, असे विचारल्यावर एकदम संजय यांचा चेहरा चकाकला आणि त्यांनी आपल्याला पॅराग्लायडिंग या साहसी क्रीडा प्रकाराची आवड असल्याचे सांगितले आणि या खेळाचा उद्योजकाच्या मानसिकतेशीच थेट संबंध जोडला. संजय म्हणाले, ‘या क्रीडा प्रकारात ते पक्ष्याच्या पंखासारखे साधन आपल्या शरीरासोबत बांधले जाते व ते पंख पसरून आपल्याला कड्यावरून खोल दरीकडे झेप घ्यावी लागते. क्रिकेटचा चेंडू टाकण्यासाठी जसा गोलंदाज धावत पुढे येतो तसे कड्याच्या दिशेने आपण धावत जातो व नंतर पुढे आकाशात झेपावतो. अनेक जण यालाच खूप घाबरतात. अपघात होत नाहीत असे नाही. पडणे आणि जखमा होणे, हाडांची तोडमोड होणे हेसुद्धा होण्याचा धोका असतो; पण माझ्या मनात मात्र विश्वास असायचा की, मी उडणारच आणि कड्याचा किनारा येण्याआधीच मी आकाशाकडे झेपावलो आहे असे घडून येत असे. खरेच, उद्योजकालाही मी झेप घेणारच याचा आत्मविश्वास असायलाच हवा.‘
 
 
कैलाश आणि संजय काटकर या अतिशय सर्वसामान्य कुटुंंबात जन्मलेल्या उद्योजकांनी उद्योगात कशी झेप घेतली आहे, हे आपल्याला त्यांच्या या उदाहरणावरून नक्कीच जाणवते. कैलाश यांनी आपण अल्पशिक्षित आहोत म्हणून आपल्या पहिल्या नोकरीच्या कमी पगारात पडेल ते काम करताना अगदी आपल्या उच्चशिक्षित सहकार्‍यांची वाहने पुसून देणे व त्यांना नाश्ता-जेवण आणणे, ही कामे करण्यात कमीपणा मानला नाही; पण याच्या मोबदल्यात त्या सर्वांकडून तांत्रिक यंत्रांच्या दुरुस्तीचे ज्ञान हस्तगत करून घेण्याकडे लक्ष पुरविले आणि अल्पावधीत सर्वच उपकरणांच्या दुरुस्तीत प्रावीण्य मिळविले. ते जेथे नोकरीला लागले त्याच व्यवसायाचे ते मालक बनले आणि मेहनतीने पैसा मिळवून ठरलेल्या कालावधीच्या अगोदरच चांगला नफा कमावून त्यांनी त्या व्यवसायाची ठरलेली किंमत मूळ मालकाला चुकती केली. यातून व्यावसायिक ज्ञान मिळवीत बंधूच्या सहकार्याने क्विक हील ही अँटिव्हायरस प्रोग्राम बनविणारी कंपनी उभारली आणि ती यशस्वी करून दाखविली.
 
 
या वाटचालीवर भाष्य करताना कैलाश काटकर म्हणाले, ‘आपल्याकडे बरेचसे संगणक प्रोग्राम हे पायरेटेड व्हर्जनचे वापरले जात असल्यामुळे अँटिव्हायरस हा विकत घ्यावा लागतो. अशी ग्राहकाला सवय नव्हती. त्यामुळे काही तरी युक्तीप्रयुक्ती करून आपल्या संगणकात व्हायरस घुसणार नाही असाच प्रयत्न सर्व जण करत; पण जेव्हा व्हायरसचा हल्ला होत असे, तेव्हा मात्र आमच्या कार्यालयासमोर ग्राहकांच्या रांगा लागत असत. त्यामुळे ग्राहकांची गरज आणि स्वभाव ओळखून मी स्वत: आमच्या उत्पादनाचे मार्केटिंग केले व नंतरच्या काळात सेल्सची टीम बनवून तिलाही तसे प्रशिक्षण दिले. यामुळेच आजचे यश आम्ही अनुभवत आहोत.’
 
 
महत्त्वाची बाब म्हणजे चांद्रयान 3 मोहिमेत पुण्यातील क्विक हील टेक्नॉलॉजी आणि सेक्युराइट या कंपनीचा सायबर सुरक्षा भागीदार म्हणून मोलाचा वाटा होता. आता पुढची कोणती क्षितिजे आपल्याला खुणावत आहेत, असे विचारल्यानंतर अतिशय समर्पक उत्तर या बंधूंनी दिले.
 
ते म्हणाले, इस्रो आणि देशाने जे काही साध्य केले त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. इस्रो आणि त्याचबरोबर अशा महत्त्वाच्या अनेक मोठमोठ्या संस्थांमध्ये आमची सुरक्षा प्रणाली वापरली जात आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या जलद वाढीमुळे आपल्या जीवनातील विविध पैलूंवर, सामाजिक आणि आर्थिक दोन्हीवर सकारात्मक परिणाम झाला आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रसारामुळे आर्थिक फसवणूक आणि सायबर घोटाळ्यांमध्ये वाढ झाली आहे. अशी फसवणूक करणारे लोकांच्या खासगी माहितीचा गैरफायदा घेण्यासाठी नेहमीच नवीन मार्ग शोधतात. सायबर गुन्हे आणि फसवणूक प्रतिबंध हे फसवणूक करणार्‍यांद्वारे वापरल्या जाणार्‍या विविध युक्तींवर आधारित सतत बदलणारे आणि विकसित होत असलेले क्षेत्र आहे. फसवणूक करणारे नेहमी नवीन युक्त्या वापरण्याचा प्रयत्न करत असताना ग्राहक हे धोके कमी करण्यासाठी फसवणूक आणि घोटाळ्यांविरुद्ध असलेली उपाययोजना वापरून अधिक चांगल्या प्रकारे सक्षम होऊ शकतात. यासाठी क्विक हील कंपनीने भारतातील सर्वप्रथम फ्रॉड प्रिव्हेन्शन सोल्यूशन - अँटिफ्रॉड एआय बाजारात आणले आहे. मानवाला आयुर्विमा अथवा आरोग्यविमा हे आपल्यासाठी आवश्यक वाटते त्याप्रमाणेच सायबर सुरक्षासुद्धा महत्त्वाची आहे आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्धा आहोत.
 
 
खरोखरच कैलाश आणि संजय काटकर हे बंधू समाजासाठी व देशासाठीसुद्धा आपली सेवा प्रदान करून ग्राहकांच्या संगणकाला सुरक्षेसाठी सतत हिलिंग टच देत आहेत. त्यांच्या या वाटचालीला मन:पूर्वक शुभेच्छा.