जिजाऊसाहेबांची नीतिमूल्ये आणि शिवबांचे स्वराज्य

06 Jan 2025 14:46:57

Rajmata Jijau
शिवबांच्या स्वराज्याची नीती धर्माधिष्ठित आणि लोककल्याणकारी होती, कारण त्याला जिजाऊसाहेबांच्या व्यक्तिगत नीतिमूल्यांचे अधिष्ठान होते. शिवरायांचे निष्कलंक चारित्र्य हे त्यांच्या संस्काराचे पूर्णफल होते. जिजाऊसाहेब असामान्य गुणांनी युक्त माता होत्या हे जसं खरं तसेच शिवरायांसारखा पुत्र लाभला आणि शिवबांच्या अंगचे स्वयंभू अद्भुत व्यक्तित्व त्या मातृत्वाला सर्वोच्च स्थानी घेऊन गेले, हे अधिक महत्त्वाचे ठरते. आयुष्यभर दुःखाचे डोंगर पेलवून, संकटांशी झुंजत या मातापुत्राने भारतभूमीवर हिंदवी स्वराज्याला सिंहासनाधिष्ठित केले आणि हिंदुस्थानच्या इतिहासालाच कलाटणी दिली. 12 जानेवारी हा जिजाऊंचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण करणारा लेख...
शिवबा जन्माला येणं हा भाग्ययोग होता; पण शिवबा जन्माला घालणं हे महाकठीण कर्म होतं. ते अद्भुत कार्य अनंत यातना आणि असंख्य भोग भोगून साधलं, ही जिजाऊसाहेबांची खरी किमया होती. माहेरचं जाधव घराणं आणि सासरचं भोसले घराणं- दोन्ही प्रतिष्ठित, श्रीमंत घराणी. अशा सुखवस्तू घराण्यांत साजशृंगार करत आनंदात आयुष्य घालवणं नशिबी असतानाही जिजाऊसाहेबांनी जो मार्ग पत्करला तो तत्कालीन स्त्रियांहून भिन्न, आव्हानात्मक आणि अधिक खडतर होता. आजूबाजूच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितींची त्यांना नीट जाणीव होती. इस्लामी सत्तांची धर्मांधता, परस्परांतील युद्धे, मराठ्यांचे पराक्रम आणि लाचारी, वतनांच्या लोभासाठी चाललेली मारामारी, मिंधेपणा, स्त्रियांची विटंबना, गोरगरिबांची अन्नान्न दशा अशी बिकट परिस्थिती त्या जवळून पाहत होत्या. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात तर दुःखांची मालिकाच समोर मांडलेली होती. जाधव-भोसल्यांचं वितुष्ट, निजामशाहीच्या दरबारातील वडील आणि भावांच्या झालेल्या हत्या, सग्यासोयर्‍यांची भाऊबंदकी, शहाजीराजांची परवड, स्वातंत्र्याची आस, मुघल-आदिलशहांशी सामना आणि नंतरचा जीवघेणा पाठलाग, जहागिरीपासून दूर कर्नाटकात झालेली रवानगी, असे किती तरी काळीज हेलावून टाकणारे प्रसंग पाहणे जिजाऊंच्या भाळी आले. शिवरायांचा जन्म खरं तर अशा अंधारयुगात झाला होता. ह्या भीषण वेळी स्वराज्याचे स्वप्नही पडणे दुरापास्त होते. शहाजीराजांचे स्वतंत्रतेचे सर्व यत्न निष्फळ ठरले होते. त्यांच्याबरोबर बंगळुरात वैभव आणि विलास भोगत शिवरायांना घेऊन आयुष्य मजेत घालवणं सहज शक्य होते; पण ते ठोकरून शहाजीराजांच्या मनातला स्वराज्याचा पट मांडण्यासाठी शिवबाला घेऊन त्या पुण्यात आल्या. पतीचा विश्वास आणि काळजातला आत्मविश्वास या दोहोंच्या जोरावर त्यांनी हा कठीण डाव मांडला होता. जबाबदारी निभावणं हा त्यांचा पिंड होता; पण पुढे जे घडणार होतं त्यासाठी त्याच जबाबदार ठरणार होत्या.
 
 
शिवरायांच्या स्वराज्याचा आणि जिजाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे जिजाऊसाहेबांच्या जीवनाची नीतिमूल्ये हीच हिंदवी स्वराज्यासाठी आधारभूत ठरली होती. शिवरायांची नीतिमत्ता ही जिजाऊंच्या वारशातून आली होती. जिजाऊंचे प्रत्यक्ष कार्य हेच खर्‍या अर्थाने शिवबाचे संस्कार ठरले.
 
 
लहान शिवबाला घेऊन ज्या वेळी त्यांनी पुणे जहागिरीत पाऊल टाकलं तेव्हा पुणं बेचिराख झालं होतं. आदिलशाहीच्या मुरार जगदेवानं पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता. भूमी शापित केली होती. वस्त्या उजाड झाल्या होत्या. देवळं पडली होती. माणसं परागंदा झाली होती. शहाजीराजांचा विश्वासू दादोजी कोंडदेवांसारखा जुनाजाणता कारभारी हाताशी घेऊन जिजाऊसाहेबांनी पुणं पुन्हा वसवलं. ठकारांच्या पडक्या वाड्याखाली दडलेला गणपती सापडला तेव्हा जिजाऊंनी त्याचं मंदिर बांधून स्वराज्यकार्याचा श्रीगणेशा केला. लोकांना आपापल्या जमिनी कसावयास सांगितल्या. शेतजमिनी लागवडीखाली आणल्या. घरे बांधायला सांगितली. त्यासाठी सढळ हाताने मदत केली. जमिनी-वतनाचे भांडणतंटे सोडवायला सुरुवात केली. चोर-दरोडेखोर आणि जंगली जनावरांपासून सुरक्षा देण्याची व्यवस्था केली. जिजापूर, शिवापूर अशा पेठा वसवल्या. व्यापार-उद्योगधंदे वाढीस लागावे म्हणून यत्न मांडले. निव्वळ स्वतःच्या जहागिरीची व्यवस्था लावण्याचा हा उद्योग नव्हता, तर ह्या सार्‍या कृत्यांमागे जिजाऊंची धर्मनीती, राजनीती आणि अर्थनीती यांच्या प्रगल्भ जाणिवा होत्या. कुमारवयातील शिवबाची शिकवण आणि संस्कार जिजाऊसाहेबांच्या प्रत्येक कृतीतून घडत होते. कसबा गणपती मंदिर बांधणं हे इस्लामी राजसत्तेच्या काळातलं धाडस होतं. शापित भूमीला नांगरणं, तिला वसवणं हे आदिलशाही तख्ताविरुद्ध बंडाचं लक्षण होतं. शेतकर्‍यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, घरंदारं बांधण्यासाठी मदत करून लोकांचे संसार उभं करणं, हे त्यांच्या सहृदयतेचं द्योतक होतं. शिवरायांच्या ठायी वसलेलं साहस, धाडस आणि रयतेबद्दलची कणव यातूनच प्रकटली होती. गावकुसाचं संरक्षण हा लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा संकल्प होता. त्यांच्यातील पराक्रम जागृत करून स्वसंरक्षणाचा मंत्र देणं, ही स्वराज्याची पायाभरणी होती. कृषी आणि व्यापार-उद्योगधंदे वाढीस लागणं हे स्वराज्याच्या भविष्यातील आर्थिक नीतीची मुहूर्तमेढ होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांवरील अत्याचारांना प्रतिबंध. सुलतानी कालखंडात दिवसाढवळ्या स्त्रियांची इज्जत वेशीला टांगली जात होती, बाजार मांडले जात होते. भोसले कुलवधूला, प्रत्यक्ष जिजाऊंच्या जावेला महाबतखानाने गोदावरीच्या घाटावर बेइज्जत केले होते. स्त्रियांच्या या सार्‍या यातनांना जिजाऊंनी संपवायचे ठरवले होते. त्यांचा हाच दृष्टिकोन शिवरायांच्या चरित्रात ठळक दिसून येतो. शिवरायांचे 28 जानेवारी 1646 चे पत्र याच जाणिवांचे द्योतक आहे. रांझ्याच्या बाबाजी पाटलाला स्त्रीशी बदअंमल केला म्हणून हातपाय तोडण्याची दिलेली कठोर सजा स्वराज्याच्या नीतीचे उगमस्थान आहे. हिंदवी स्वराज्यात स्त्रीसन्मान सर्वतोपरी राहिला त्याचे कारण जिजाऊंची कळकळ. चौदा-पंधरा वर्षांचे शिवराय मावळात घोडे दौडवत होते, आदिलशाहीच्या बेवारसकिल्ल्यांचा ताबा घेत होते. हे सारं कशासाठी आहे, कुठवर जाणार आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे याची पूर्ण कल्पना जिजाऊसाहेबांना होती; पण व्यक्तिगत विचारापेक्षा समाजाचा आणि राष्ट्राचा विचार त्यांना महत्त्वाचा वाटला. शिवरायांच्या ठायी आलेलं निःस्वार्थीपण हे जिजाऊसाहेबांचे संस्कार होते. त्याला स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेच्या प्रेमाची जोड होती आणि म्हणूनच शिवरायांचं स्वराज्य याच त्रिसूत्रीचा परिपोष ठरला.
 
 
प्रतिकूल परिस्थितीतही मनाचा तोल ढळू न देता ध्येयासाठी झुंजत राहण्याचे जिजाऊंचे आत्मबळ शिवरायांमध्ये उतरले होते. अफजलखानाची स्वारी, पन्हाळ्याचा वेढा आणि आग्र्याची नजरकैद या घटना जिजाऊंच्या मातृत्वाची कसोटी पाहणार्‍या ठरल्या. अफजलखानाने शहाजीराजांच्या पायांत बेड्या घालून विजापुरातून धिंड काढली होती. ज्येष्ठपुत्र शंभूराजांना कपटाने मारले होते. मावळातल्या वतनदारांना धमकावून शिवरायांना मारण्यासाठी तसेच स्वराज्याचा घास घेण्यासाठी अफजलखान चालून आला होता. राजगडावरून शिवाजी महाराज जेव्हा जावळीत प्रतापगडावर जाण्यास निघाले तेव्हा कोणते विचार मनात आले असतील? पोटचा मुलगा आपण गमावणार तर नाही ना? शंभूराजे बाळ आहेत, सईबाई मरणासन्न आहेत, त्यांना सांभाळायचे कसे? शहाजीराजांचा विश्वास गमावणार तर नाही ना? मावळमुलखातील मांडलेला रयतेच्या स्वराज्याचा पट उधळला तर जाणार नाही? आजवर आदिलशाही-मुघलांविरुद्ध शिवबाच्या उलाढाल्यांना मज्जाव केला नाही. संकटं अंगावर घेण्यास प्रवृत्त केले, झुंजण्यासाठी प्रोत्साहित केले, ही चूक तर ठरणार नाही? असे नानाविध विचार मनात आले तरीही काळीज हेलावून टाकणार्‍या या प्रसंगी जिजाऊसाहेबांनी आपले आईचे प्रेम शिवरायांच्या पायात शृंखलेसारखे अडकवले नाही, तर समोर येणार्‍या प्रतिकूल परिस्थितीवर निर्धाराने मात करण्यासाठी तेच प्रेम मातृत्वाच्या दिव्य शक्तीत परिवर्तित केले.
 
 
पन्हाळ्यावरील वेढ्यात शिवबा अडकले असता, नेताजी पालकरांना खडसावून स्वतः रणवेशात निघण्याची तयारी करणे, हे त्यांच्यातील वीरांगनेचे दर्शन होते. आग्र्याला महाराज नजरकैदेत होते तेव्हा स्वराज्याचा कारभार सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी जिजाऊसाहेबांनी उतारवयातही पेलली. त्याही काळात रांगणा किल्ला स्वराज्यात येतो, हे त्यांच्या संजीवनाचंच द्योतक ठरतं आणि म्हणूनच अपयशाने खचून न जाता सावरून पुनःपुन्हा झुंजण्याचं त्यांचं बळ शिवरायांतच नाही, तर स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्यात उतरलं. किंबहुना हीच नीतिमत्ता शिवशंभूनंतरही घडलेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंगरात टिकून राहिल्याचं दिसून येतं.
 
 
तत्कालीन राज्यकर्त्यांमध्ये अभावाने दिसणारी गोष्ट म्हणजे प्रजेबद्दलचे आत्यंतिक प्रेम. रयतेबद्दलचे अमर्याद प्रेम हा गुण शिवरायांच्या ठायी उमटला तो जिजाऊंकडून. 4 एप्रिल 1668 च्या गुंजवण मावळातील विठोजी हैबतराव देशमुख याला लिहिलेल्या कौलनाम्यात जिजाऊसाहेब जिवाच्या भयाने परागंदा झालेल्या त्याला पुन्हा देशमुखीचा कारभार हाती घेण्यास सांगून त्याचे ऊर्जित करतात, हे लोकांची काळजी त्यांना किती होती हेच दाखवते. इतकेच नाही तर 15 मार्च 1669 च्या त्यांच्या पत्रात ते विठोजी हैबतरावाकडे पैसे नाहीत हे कळल्यावर त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईकांच्या मुलाशी करताना लग्नाचा सर्व खर्च उचलतात. मुलीला लुगड्यासाठी 25 होन आणि पाचशे माणसांचे जेवणसामान पुरवून हैबतरावाला मदत करतात, ही त्यांच्या ठायी असलेल्या प्रजेच्या प्रेमाची प्रचीती दर्शवते. ’रयतेच्या भाजीच्या देठालाही स्पर्श करू नये’ ही शिवरायांची राजनीती जिजाऊसाहेबांच्या पोटी लोकांसाठी असलेल्या आत्यंतिक प्रेमाची परिणती होती. त्यांच्या महजरांतून त्यांचा निष्पक्ष न्याय आणि सामंजस्य दिसते तसेच प्रसंगी कठोरपणाही दिसतो. आपल्या मुलाबद्दल असलेला अभिमान आणि विश्वासही दिसतो. 28 डिसेंबर 1668 च्या बाबाजीराम देशकुलकर्णी याची कानउघाडणी करताना ’नशते कथळे केल्या चिरंजीव काही कोन्हाचा मुल्हाजा करणार नाहीत ऐसे समजोन मा। मुकुंद कान्होसी घसदस न करणें’ असा सज्जड दम देतात, तर अखेरीच्या काळातल्या दि. 10 नोव्हेंबर 1673 च्या पत्रात कथल्याचे निराकरण करून विनायक भट ठकाराचे मिरासीपण जपताना दिसतात. या पत्रात कुणावरही अन्याय होता कामा नये यासाठी जिजाऊसाहेब किती जागरूक होत्या हे जसे दिसते तसेच वार्धक्यातही आयुष्याच्या अंतापर्यंत त्या शिवरायांना स्वराज्य कारभारात मदत करत होत्या हेही जाणवते. शिवबाच्या स्वराज्याची नीती धर्माधिष्ठित आणि लोककल्याणकारी होती, कारण त्याला जिजाऊसाहेबांच्या व्यक्तिगत नीतिमूल्यांचे अधिष्ठान होते. शिवरायांचे निष्कलंक चारित्र्य हे त्यांच्या संस्काराचे पूर्णफल होते. जिजाऊसाहेब असामान्य गुणांनी युक्त माता होत्या हे जसं खरं तसेच शिवरायांसारखा पुत्र लाभला आणि शिवबाच्या अंगचे स्वयंभू अद्भुत व्यक्तित्व त्या मातृत्वाला सर्वोच्च स्थानी घेऊन गेले, हे अधिक महत्त्वाचे ठरते. आयुष्यभर दुःखाचे डोंगर पेलवून, संकटांशी झुंजत या मातापुत्राने भारतभूमीवर हिंदवी स्वराज्याला सिंहासनाधिष्ठित केले आणि हिंदुस्थानच्या इतिहासालाच कलाटणी दिली. आयुष्यभर ज्या वैयक्तिक नीतिमूल्यांची जपणूक जिजाऊसाहेबांनी केली त्याच पायावर त्यांचे पुत्र शिवबा ’युगपुरुष शिवछत्रपती’ झाले. शिवबाचे स्वराज्य युगायुगांना प्रेरणा देणार्‍या नीतिमूल्यांचे मापदंड ठरले आणि केवळ इतिहासात सुवर्णांकित झाले नाही, तर आजच्या भारताच्या अभ्युदयाचेही दिग्दर्शन करते आहे, करीत राहील.
Powered By Sangraha 9.0