मीडियाने मोठा केलेला HMPV विषाणू

विवेक मराठी    07-Jan-2025
Total Views |
 @डॉ. प्रिया देशपांडे
 
HMPV व्हायरसची बातमी चीनच्या कोणा एका व्यक्तीने ट्वीट केली, ही एवढी एकच बाब सर्व मीडियाच्या ओव्हर रिअॅक्शनला कारणीभूत ठरली. HMPV च्या बातम्या सर्वच मीडियाने उलटसुलट रंगवल्या. या बातम्यांमुळे भीतीचे सावट निर्माण झाले. खरं तर HMPV या विषाणूमुळे कोणताही धोका नाही. गरज आहे ती काळजी घेण्याची.
 
HMPV
 
असे म्हणतात ’हर कुत्ते के दिन आते है’. सध्याची सर्व परिस्थिती बघता हेच शब्द आठवतात. सध्या कचझत विषाणूचे दिवस सुरू आहेत! प्रत्येक न्यूज चॅनल व वर्तमानपत्रामध्ये चढाओढीने याविषयी बातम्या दिल्या जात आहेत. कोणी म्हणतंय की, हा कोविडपेक्षाही गंभीर आजार आहे. कोणी म्हणतंय, त्याच्यामुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे आणि अगदी रांगा लागल्या आहेत. बातमी कोणतीही असो, कोणीही दिलेली असो किंवा कितीही गंभीर असो, त्याचे मूळ हे आपण एका ट्वीटमध्ये शोधू शकतो. ते ट्वीट लिहिणार्‍या व्यक्तीलाही माहीत नसेल की, आपल्या ट्वीटमुळे हजारो किलोमीटर दूर भारत देशामध्ये एवढी उलथापालथ होईल. तसे पाहायला गेले तर निसर्गामध्ये लाखो प्रकारचे विषाणू आहेत. हे सर्वच विषाणू मानवासाठी बाधक नसतात. 2022 पर्यंत या लाखो विषाणूंपैकी केवळ 11273 विषाणू शास्त्रज्ञ ओळखू शकले आहेत. मात्र जे विषाणू सापडले आहेत त्यांच्याविषयी अतिशय सखोल असा अभ्यास केला जातो. अगदी त्यांचे जीन्स कोणते आहेत, ते पेशींना कसे बाधित करतात वगैरे सर्व माहिती प्रयोगाद्वारे मिळवली जाते. या सर्व ज्ञात विषाणूंमधील साधारणपणे 270 प्रकारचे विषाणू मानवाला बाधित करू शकतात. यांच्याविषयी थोडा जास्तच अभ्यास केला जातो. अर्थात जसजसे नवीन शोध लागत जातील तशी ही संख्या वाढत जाईल. अर्थातच सामान्य जनतेला ही 270 नावे माहीत असणे शक्यच नाही. अगदी सर्व डॉक्टरांनादेखील हे प्रत्येक नाव माहीत असेल असे नाही. त्यामुळे HMPV म्हणजे Human Meta Pneumo Virusअसे भले मोठे नाव असणारा विषाणू हा एक नवा विषाणू आहे, असा गैरसमज होऊ शकतो. कोविडनंतर आपण सर्व जण नव्या विषाणूंना घाबरतो, कारण चीनमध्ये सुरू होऊन या नव्या विषाणूने सर्व जगभरामधील सत्तर लाख लोकांचे मृत्यू घडवून आणले आणि या एचएमपीव्ही व्हायरसची बातमी चीनच्या कोणा व्यक्तीने एका ट्वीटमध्ये दिली होती, ही एवढी एकच बाब सर्व मीडियाच्या ओव्हर रिअ‍ॅक्शनला कारणीभूत आहे. एचएमपीव्ही नक्की आहे तरी कोण? हा विषाणू 2001 मध्ये नेदरलँडमध्ये सापडला म्हणजे खरे तर ओळखला गेला. तत्पूर्वी लहान मुलांमध्ये जे न्यूमोनियासारखे गंभीर आजार होत होते, त्यातील जवळजवळ 30-40% मुलांमध्ये नक्की कोणत्या सूक्ष्म जंतूने आजार होत आहेत हे ओळखता येत नव्हते. म्हणजेच मानवाला माहीत नसलेला एखादा किंवा अनेक विषाणू असू शकतील, असा अंदाज होता.
 
डच शास्त्रज्ञ व्हॅन डेन हुगेन व सहकारी यांनी या विषाणूचा शोध लावला आणि असे लक्षात आले की, रुग्णालयामध्ये गंभीर आजाराने दाखल असणार्‍या 10% मुलांमध्ये या विषाणूची बाधा दिसून येते. मुलांमध्ये सर्दी, खोकला व न्यूमोनिया असा आजार निर्माण करणार्‍याआरएसव्ही विषाणूचा हा जवळचा नातेवाईक आहे, मात्र त्याच्याएवढा गंभीर आजार निर्माण करत नाही.
 याबाबत प्रयोग करताना डच शास्त्रज्ञ व्हॅन डेन हुगेन व सहकारी यांनी या विषाणूचा शोध लावला आणि असे लक्षात आले की, रुग्णालयामध्ये गंभीर आजाराने दाखल असणार्‍या 10% मुलांमध्ये या विषाणूची बाधा दिसून येते. मुलांमध्ये सर्दी, खोकला व न्यूमोनिया असा आजार निर्माण करणार्‍याआरएसव्ही विषाणूचा हा जवळचा नातेवाईक आहे, मात्र त्याच्याएवढा गंभीर आजार निर्माण करत नाही. कोणताही विषाणू सापडला की पहिला प्रश्न निर्माण होतो की, हा नवा विषाणू आहे की जुना? त्यामुळे एचएमपीव्ही सापडला की, त्यानंतर सर्वात पहिल्यांदा जे प्रयोग केले गेले ते कोणत्या ना कोणत्या कारणाने साठवून ठेवलेल्या लहान मुलांच्या ब्लड सॅम्पल्सवर. त्याने असे लक्षात आले की, अरे हा व्हायरस तर जवळपास गेली 50 वर्षे आपल्यामध्ये आजार निर्माण करत होता. म्हणजे कमीत कमी 1950 पासून हा विषाणू नक्कीच आपल्याला बाधित करत होता. सध्या 2025 मध्ये हा 75 वर्षे जुना विषाणू आहे आणि आपली भारतीय मीडिया मात्र या विषाणूचा पहिला रुग्ण सापडला, अशा बातम्या जोरजोरात सांगत आहेत. गेल्या 75 वर्षांत या विषाणूने कोणालाच बाधित केले नसेल हे शक्य तरी आहे का? मग जगभरात किती लोकांना या विषाणूची बाधा होऊन गेलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अतिशय सोपे असते आणि शास्त्रज्ञांनी पुढचा प्रयोग हाच केला. त्यांनी वेगवेगळ्या देशांतील लोकांमध्ये जन्मलेल्या बाळापासून अगदी वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांच्या रक्ताची तपासणी केली आणि त्यांच्या शरीरात या विषाणूविरुद्ध अँटिबॉडीज आहेत का हे तपासले. त्यांना जे सापडले ते आश्चर्यकारक होते. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जवळजवळ 90% मुलांमध्ये अँटिबॉडीज सापडल्या आणि 100% प्रौढ व्यक्ती एचएमपीव्हीने आधीच बाधित झालेल्या होत्या. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या शरीरातदेखील या अँटिबॉडीज होत्या, कारण आईपासून त्या बाळाला ही सुरक्षा मिळत होती. काही महिन्यांनंतर जेव्हा या अँटिबॉडीज कमी व्हायच्या तेव्हा त्या बाळांमध्ये संसर्ग सुरू होताना दिसला. अर्थात कोणत्याही कारणाने जेव्हा इम्युनिटी कमी होते त्या वेळेला अँटिबॉडीज असल्या तरीदेखील बाधा होण्याची शक्यता यामध्ये आहे. चीनमधले
 
आजार लहान मुलांमध्ये, अति वृद्ध व्यक्तींमध्ये आणि ज्यांची इम्युनिटी कोणत्याही कारणाने कमी आहे अशा व्यक्तींमध्ये दिसून येत आहेत. यात उगाच घाबरण्यासारखे काय आहे? थंडीच्या मोसमामध्ये जेव्हा विविध श्वसनसंस्थेचे आजार वाढतात तेव्हा त्याचे कारण जे विविध प्रकारचे सूक्ष्म जंतू असू शकतात त्यातील एक विषाणू हा एचएमपीव्ही आहे.

HMPV
 
चित्रदेखील असेच आहे.  श्वसनसंस्थेच्या आजारांमध्ये हा विषाणू किती वेळा कारण असतो? जर साधी सर्दी-खोकला असेल तर सहसा 5-15% रुग्ण एचएमपीव्हीने बाधित असू शकतात. न्यूमोनिया किंवा ब्रोकायटिससारखे गंभीर आजार झाले असतील, तर साधारण 10% वेळा एचएमपीव्ही बाधा सापडते. ज्यांच्या अस्थमाचा त्रास अचानक वाढतो त्यांच्यामध्ये 1-5% वेळा एचएमपीव्हीची बाधा हे कारण असू शकते. मात्र एकाच वेळी एचएमपीव्हीसोबत इतर विषाणूची बाधाही झालेली असेल, तर अशा वेळी मात्र आजार जास्त गंभीर होऊ शकतो. आयसीयूमधील रुग्णांमध्ये 70% वेळा दुहेरी बाधा आढळून आली आहे. या एचएमपीव्हीला घाबरण्याची कितपत गरज आहे? आपण फ्लूला घाबरतो का? आपण सर्दीला घाबरतो का? जर याचे उत्तर नाही असेल, तर या विषाणूलाही घाबरायची गरज नाही. खरे तर कोणत्याही सूक्ष्म जंतूला घाबरायची गरज नसते, कारण त्यांचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडे अनेक उपाय उपलब्ध असतात. हे उपाय जर सामान्य जनतेने नेहमीसाठीच लक्षात ठेवले, तर भविष्यातही आपण कोणत्याही नव्या किंवा जुन्या सूक्ष्म जंतूला घाबरणार नाही. आपण एखाद्या आजाराला घाबरतो तेव्हा योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, कारण निर्णय प्रज्ञा नाही तर भीती घेते. या विषाणूबाबत बोलायचे झाले तर, हा एक अतिशय जुना विषाणू आहे, जो सर्वांना वयाच्या पाचव्या वर्षापर्यंतच बाधित करून टाकतो. मात्र याची तपासणी केली जात नसल्याने आपल्याला याची पूर्वकल्पना नव्हती. एचएमपीव्हीपासून सुरक्षित राहण्याचे उपाय हा आजार लहान मुलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात दिसून येतो, हे आपण लक्षात ठेवायला हवे.
 

HMPV
 
 चौकटीत दाखविलेले हे अतिशय साधे-सोपे उपाय तुम्हाला श्वसनसंस्थेच्या सर्वच आजारांपासून बर्‍याच प्रमाणात सुरक्षा देऊ शकतात. मात्र हे उपाय नियमितपणे करायला हवेत. कोणत्या विषाणूची बातमी आली म्हणून हे उपाय तात्पुरत्या स्वरूपात करण्यात अर्थ नाही.
 
 
समाजशिल्पी
महापुरुषांच्या कार्याचा गौरव आणि परिचय उद्याच्या सक्षम नागरिकांना करून देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत….
समाजशिल्पी संच प्रत्येक घरात असलाच पाहिजे असा संच…
आपल्या मुलांना यांचीही ओळख होऊद्या…
https://www.vivekprakashan.in/books/samajshilpi/
 
 
 
2001 मध्ये सापडल्यानंतर गेली 25 वर्षे ’एचएमपीव्ही विशेष गंभीर आजार निर्माण करत नाही/यासाठी वेगळा कोणताही उपचार नाही’ या कारणास्तव याची नियमितपणे तपासणीदेखील केली जात नव्हती. मात्र भारतीय मीडियाने याला आता हिरो बनवले आहे. पुढील काही दिवस एखादी नवी बातमी सापडेपर्यंत या आजाराबाबत तुम्हाला निरनिराळ्या प्रकारे माहिती सांगितली जाईल. मात्र ही माहिती वाचताना किंवा ऐकताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची. एचएमपीव्ही हा एक जुना विषाणू आहे आणि ज्याविरुद्ध आपल्या सर्वांमध्ये अँटिबॉडीज उपलब्ध आहेत. यामध्ये नवे म्युटेशन झाल्याची कोणतीही बातमी नाहीये. भारत आणि चीनमधील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. यामुळे एचएमपीव्ही विषाणूमुळे कोविडसारखे पँडेमिक होण्याची कोणतीही शक्यता नाही. मग आता मीडियामधील बातमीमुळे घाबरण्याची गरज नाही. केवळ त्यांच्या अज्ञानावर हसणे पुरेसे आहे. मात्र अशा घटना भविष्यात वारंवार घडणार असल्याने विविध शास्त्रीय माहिती असणे, प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती असणे आवश्यक आणि प्रत्येक बातमी सुरुवातीलाच तपासून घेणे, हे कौशल्य सर्वांनी मिळवायला हवे. अन्यथा मीडियामार्फत कोणताही व्हायरस येईल आणि टिचकी मारून जाईल.
 
लेखिका एम.डी. रोगप्रतिबंधकशास्त्र तज्ज्ञ असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे कार्यरत आहेत.
drprdeshpande2@gmail.com