शेतीशी नाळ जोडणारा सण : येळवस

विवेक मराठी    08-Jan-2025   
Total Views |
महाराष्ट्रात नानाविध सणांची मोठी परंपरा आहे. त्यातील एक सण म्हणजे ‘येळवस’ अर्थात ‘दर्श वेळ अमावस्या’. ग्रामीण व कृषी संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा सण लातूर, बीड, धाराशिव, नांदेड व सोलापूर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या काळ्या आईची मनोभावे पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतो. आहार, विहार, आरोग्य आणि सांस्कृतिक मूल्य जपणार्‍या या सणाविषयी माहिती सांगणारा हा लेख.
 
krushivivek
 
भारतीय लोकसंस्कृतीचे आदिम प्रतिबिंब ’कृषिसंस्कृतीत’ आढळते. निसर्ग हा कृषिसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. म्हणूनच शेतकरी नेहमीच मातीशी आणि निसर्गाशी जुळवून घेत जगत आला आहे. पाणी, पशुपक्षी, झाडे, वेली आणि नद्या यांच्यामुळे आपले जीवन अधिक सुखमय होते, याची जाणीव कृषकास असते. वड, पिंपळ, भूमी, रुई, शमी, कडुलिंब, सौंदड, आंबा, बैल, गाय, नाचणी, ज्वारी, बाजरी, गहू, भात, नद्या, डोंगर, अग्नी, सूर्य, चंद्र, पाऊस यांना ’देवता’ म्हणून तो पुजत आला आहे. निसर्गाच्या आदरयुक्त प्रतिक्रियेतून शेतकर्‍याला शेतीची कला अवगत झाली. यातूनच कृषिसंस्कृतीचा विकास होत गेला आणि सण-उत्सव उदयाला आले. असेच एक दर्शन महाराष्ट्रात घडते. मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये एकसमान कृषिसंस्कृतीच्या पाऊलखुणा आढळतात. परंपरेने चालत आलेला ’येळवस’ किंवा ’वेळ अमावस्या’ हा सण या भागातील शेतकर्‍यांनी आजही जतन करून ठेवला आहे. या सणाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. काळ बदलला, दळणवळण वाढले, अक्षरे शिकलेली मंडळी शहरात आली, हळूहळू गाव व शिवाराचे स्वरूप पालटत गेले; पण येळवस व पूजेची पद्धत मात्र तशीच आहे. हा देवभोळेपणा किंवा अंधश्रद्धा नाही. त्यामागे विज्ञान दडलेले आहे. ते समजून घेणे आवश्यक आहे. निसर्ग, आहारविहार, आरोग्य आणि सांस्कृतिक अधिष्ठान लाभलेल्या याचे मूळ आदिम आहे. या सणाचे अंश आमच्या पिढीमध्ये पाझरत आहेत. म्हणूनच शहरात राहूनही, विज्ञानाने सारे कवेत घेतले असतानाही या सणाविषयीचे महत्त्व यत्किंचितही कमी झालेले नाही. ही नाळ अधिकाधिक घट्ट राहील, असा प्रयत्न असतो.
’येळवस’ म्हणजे काय?
 
महाराष्ट्र व कर्नाटक ही दोन शेजारील राज्ये. त्यामुळे या दोन्ही राज्यांत ज्याप्रमाणे भाषिक संबंध आढळतात त्याप्रमाणे सण आणि उत्सवांतूनही एक अनुबंध दिसून येतो. सीमावर्ती भागातील लातूर, धाराशिव, नांदेड व सोलापूर जिल्ह्याच्या कृषिसंस्कृतीचा धागा हा कर्नाटकाच्या लोकजीवनात मिसळलेला आहे. या परिसरातील ’येळवस’ या सणावर कर्नाटकाचा प्रभाव दिसून येतो.
 
 
कन्नड भाषेत येळ म्हणजे सात. (मूळ कानडी शब्द ’येळ्ळ अमावस्या’.) रब्बी हंगामानंतर (हस्त नक्षत्र- सप्टेंबर-ऑक्टोबर) येणार्‍या सातव्या अमावस्येला ’येळ्ळी अमावस्या’ (पौष महिन्यातील दर्श वेळा अमावस्या) साजरी केली जाते. ’येळ्ळ’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो कर्नाटकच्या सीमेवरील लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात ’येळ अमावस्या’ हा शब्द रूढ झाला आहे.
कर्नाटक राज्यातील बिदर, कलबुर्गी (गुलबर्गा), विजयपूर (विजापूर), तेलंगण सीमाभागातील जहराबाद व निजामाबाद आणि महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यासह बीड, नांदेड व परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ’येळ अमावस्या’ साजरी केली जाते.
 

krushivivek 
 
आगळ्यावेगळ्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन
 
रब्बी हंगामात शिवार हिरवं गर्द झालं की, येळवसची चाहूल लागते. भोवताली जोंधळ्यात (ज्वारी) हुरडा भरतो. गव्हाला हिरवीगार ओंबी येते. करडईला लाल फुलांचा गुच्छ तयार होतो. हरभर्‍याची भाजी खुडायला येते. बोराची झाडं बोरांनी लगडलेली असतात. मधमाश्यांनी झाडावर आपले पोळे तयार केलेले असते. अंगात हुडहुडी भरणारी थंडी ही ऐन भरात आलेली असते. अशा वेळी वेळ अमावस्या येते. या सणात कुंभाराच्या मडक्यापासून ते रानभाज्या आणि फळापर्यंतचा समावेश असतो. हा सण तसा दोन दिवसांचा. या सणाचा स्वयंपाक मात्र आदल्या (रात्री) दिवशी केला जातो. वेळ अमावस्या उत्सवाचा पहिला दिवस भोगीचा (भाजीपाला) म्हणून ओळखला जातो. घरोघरी भोगीनिमित्त मिश्र भाज्या तयारीसाठी महिलांना कसरत करावी लागते. तुरीच्या शेंगा, हरभर्‍याची भाजी, करडईची भाजी, वाटाणे, मेथी, शेंगदाणे, कोथिंबीर, कांद्याची पात, लसणाची पात, हिरवी मिरची, हिरवी चिंच, तेल, मीठ अशा विविध भाज्या व पदार्थांपासून चविष्ट भज्जी (मिश्र भाजी) तयार केली जाते. विशेषतः ज्वारी किंवा बाजरीचे पीठ, ताक, दही, लसूण, मिरची, कोथिंबीर, लिंबू यापासून खास आंबील तयार केले जाते. हे आंबील आदल्या रात्री बनवून एका खापराच्या माठात ठेवले जाते. दुसर्‍या दिवशी आंबिलाचे मडके शेतकरी डोक्यावर घोंगडी पांघरून शेतात घेऊन जातो आणि हेच पांडवपूजेतील नैवेद्याचे व वेळ अमावस्येचे मुख्य वैशिष्ट्य. याशिवाय तीळ लावलेले बाजरीचे उंडे, शेंगदाण्याची पोळी, पुरणपोळी आणि वरण, आंबट (दही)भातालाही विशेष स्थान आहे. ज्वारी, बाजरी, तूर, शेंगदाणे, हरभरा इत्यादी पिकांचे उत्पादन लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात व शेजारील कर्नाटक व तेलंगणा प्रदेशात होत असल्याने त्यावर आधारित असे अनेक पदार्थ इथल्या जनमानसात प्रचलित आहेत. त्यामुळे आहारपद्धती हा एक वेळ अमावस्येचे प्रमुख अंग आहे. ऐन थंडीत शरीराला ऊब देणारे बाजरीचे उंडे, शेंगदाण्याची पोळी, भज्जी, आंबील इत्यादी पदार्थ ’वेळ अमावस्या’ जेवणाची लज्जत वाढवत असतात.
 
 
महत्त्वाचे म्हणजे, वेळ अमावस्या आणि हेमंत ऋतू (हिवाळा) यांची अत्यंत सुरेख सांगड यामध्ये आढळते. हेमंत ऋतूत उपलब्ध असणारे धान्य, भाजीपाला, त्याची शरीराच्या निरोगी आरोग्यासाठीची उपयुक्तता याचा सुंदर मिलाफ या सणामध्ये दिसून येतो.
 
पांडवपूजेला अनन्यसाधारण महत्त्व
 
वेळ अमावस्येचा दिवस म्हणजे पांडवपूजा. हा दिवस मुख्य मानला जातो. ज्वारी किंवा बाजरीच्या पाच ताटव्यांमध्ये (कडब्याची खोपी करून सावली तयार केली जाते.) प्रतीकात्मक पाच पांडव व द्रौपदी असे सहा दगड ठेवले जातात. या दगडांना पांढरा चुना व कात लावला जातो. बाजरीचे उंडे, आंबील, शेंगदाण्याची पोळी, भज्जी, पेरू, गाजर आणि केळीचा उपयोग करून नैसर्गिक नैवेद्य दाखविला जातो. या विधीनंतर पीक चांगले यावे आणि सुखसमृद्धी वाढावी म्हणून शेतकरी दांपत्य खोपीभोवती ’चावर चावर चांगभलं... पाऊस आला घराला चला...’, ’ओलगे ओलगे सालम पोलगे’ (कानडी शब्द) म्हणत फेर्‍या मारतात. एका हातात आंबील घेऊन पिकांवर शिंपडले जाते. पिकांवर रोगराई पडू नये, चांगला पाऊस पडावा, खळ्यात धान्यांची रास ओसंडून वाहत राहावी, अशी यामागील धारणा आहे.
 
पांडवपूजेचा संबंध कसा आला? याबाबत संदर्भ मिळत नसले तरी यामागे काही धारणा प्रचलित आहेत. महाभारतात कौरवांनी ‘माझी जमीन तर माझी आहेच, पण दुसर्‍याची जमीनसुद्धा माझीच आहे’, असा हट्ट धरला. या नादात त्यांना संस्कृती आणि संस्काराचा विसर पडला. पाच पांडव वनात राहूनही भूमीशी एकनिष्ठ राहिले, मातीचे रक्षण केले. ’कृतज्ञता’ म्हणून शेतकरी पाच पांडवांची पूजा करत असतो. दुसरी धारणा अशी- अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांमुळे जीवसृष्टी टिकून आहे. याचे प्रतीक म्हणून पांडवांची पूजा केली जाते. या प्रतीक पूजेतून निसर्गरक्षणासारखा नवा आशय अभिव्यक्त होतो. याशिवाय शिवारातल्या साती आसराला, विहिरीला आणि म्हसोबाला नैवेद्य दाखवला जातो. या ठिकाणी गवरीवर एका भांड्यात दूध तापवले जाते. दूध उतू गेले की बरकत येते, अशी एक समजूत आहे. घरातला कर्ता पुरुष किंवा लहान मुलाच्या पाठीवर बाजरीचे उंडे ठेवण्याची प्रथा आहे. यामागे सदृढ प्रकृती राहावी अशी धारणा आहे. त्यानंतर पांडवांच्या समोर वनभोजनाचा आस्वाद घेतला जातो.
 
कृषी पर्यटनाची अनुभूती
 
’वेळ अमावस्या’ हा कृषी पर्यटनाची अनुभूती देणारा जगातला पहिला सण आहे. या दिवशी गावात माणसाला माणसं मिळणं दुरापास्त. घरातली सगळी माणसं झाडून शेत-शिवारात आलेली असतात. शाळेला कलेक्टर सुट्टी घोषित केलेली असते. शहरात गेलेल्या मंडळींचे पाय शेताला लागतात. माणसाच्या गर्दीने शेत-शिवार फुललेलं असतं. सणानिमित्त मित्रपरिवार आणि शेजारपाजार्‍यांना निमंत्रण दिले जाते. शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेले लोक दोन दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन राहण्यास पसंती देतात. खास येळवसनिमित्त केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतात. ’भज्जी खा, आंबील प्या, निरोगी राहा’ असा खास आग्रह धरला जातो. वनभोजनाचा आनंद घेतल्यानंतर काही जण निसर्ग, शुद्ध हवा, निसर्गरम्य, संस्कृती, खाद्यसंकृती तसेच शेत-शिवारात आढळणार्‍या दुर्मीळ वनस्पती, मध, हुरडा पार्टी, विटीदांडू, पोहणे, झाडे, प्राणी, पक्षी, झरे, डोंगर, दर्‍या, निसर्ग निरीक्षण, शिवार- शेतीचा व बैलगाडी सफरीचा अनुभव घेतात.
 
हेंडगा पेटविण्याची प्रथा
 
या सणातील ’हेंडगा’ हे एक आणखीन शास्त्र समजून घेतले पाहिजे. सायंकाळी वेळ अमावस्येची सांगता होते. गावचा पाटील आपल्या शेतातील टोपलीला ज्वारीचा ताटवा लावतो. त्यात लक्ष्मी (प्रतीक) ठेवतो. या टोपलीत दिवा असतो. ही टोपली पाटील डोक्यावर घेऊन घराकडे येतो. ही टोपली ग्रामदैवतासमोर उतरवून मंदिरात दिवा लावतो. शेत-शिवारात शेतकरी-आयाबाया गावात प्रवेश करतात. यानंतर या दिव्याने रात्री गावात ’हेंडगा’ (काड, चिपाडाचा अग्नी) पेटविला जातो. यामागचे शास्त्र असे आहे. थंडीमुळे पीक कडाडून येते, दव पडतात. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतातील थंडी गावात यावी म्हणून ’ हेंडगा’ पेटविण्याची प्रथा प्रचलित आहे. या प्रथेत वैज्ञानिक सत्य दडले असले तरी काळाच्या ओघात ही प्रथा लोप पावत आहे.
 
 
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शेकडो वर्षांपासून हा सण उत्साहाने, आनंदाने आणि चैतन्याने साजरा केला जातो; पण आजचे या भागातील शेतीचे व खेड्याचे वर्तमान भीषण स्वरूपाचे आहे. यामध्ये बदल घडवून आणायचा असेल, तर जुन्याची जागा नव्याने घेतली पाहिजे. म्हणजे वेळ अमावस्या संकल्पनेवर आधारित ’कृषी पर्यटन’ केंद्राची उभारणी होऊ शकते. प्रत्यक्षात शेती कशी केली जाते, लागवड कशी जाते, ग्रामीण आहारविहार आणि संस्कृती म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ‘वेळ अमावस्या’ ही संकल्पना पुरेशी असली तरी यास व्यापक रूप देण्यासाठी कृषी पर्यटनाची साखळी निर्माण करण्यास मोठा वाव आहे. गरज आहे फक्त इच्छाशक्तीची.

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.