प्रयागराज महाकुंभ -भारतीय संस्कृतीचे विराट दर्शन

विवेक मराठी    08-Jan-2025
Total Views |
prayagraj kumbh mela 2025
 
@ डॉ. दिलीप अग्निहोत्री
‘वसुधैव कुटुंबकम’ हाच भारतीय संस्कृतीचा संदेश आहे. कुंभ आपल्या देशाची विविधता आणि समृद्ध संस्कृती समजावून घेण्याचे उत्तम साधन आहे. 2025 च्या महाकुंभाच्या निमित्ताने इथे भाविक आणि पर्यटकांना अनेक प्रदेशांच्या विविध कला पाहावयास मिळतील. या कुंभाचा शुभारंभ मकरसंक्रांतीपासून होत आहे. यानिमित्त भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन इथे घडणार आहे.
prayagraj kumbh mela
 
सनातन धर्मात अयोध्या आणि प्रयागराज यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात एक दुर्लभ संयोग होतोय. एकीकडे अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती होत आहे आणि दुसरीकडे प्रयागराजमध्ये पौष पौर्णिमेपासून महाकुंभाचा शुभारंभ होत आहे. दुसरा संयोग असा की, मागील कुंभमेळा आणि अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे यशस्वी नियोजन हे दोन्हीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात केले गेले.
 
 
तब्बल एकशे पंचेचाळीस वर्षांनी महाकुंभाचा असा शुभयोग या वर्षी आला आहे. प्रमुख स्नानावेळी पूज्य संतांसाठी व भक्तांच्या स्वागतासाठी पुष्पवर्षाव केला जाणार आहे. 13 जानेवारीला पौष पौर्णिमेचे प्रथम स्नान होईल. 14 जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीला दुसरे स्नान असेल. 29 जानेवारीला मौनी अमावस्येनिमित्त स्नान असेल. असा अंदाज आहे की, या दिवशी सहा ते आठ कोटी भाविक येथे येऊ शकतात. 3 फेब्रुवारीस वसंत पंचमी आहे. त्यानंतर 12 आणि 26 फेब्रुवारी अशी एकूण सहा स्नाने असतील.
 
पाचशे वर्षांनंतर योगी आदित्यनाथ सरकारने इलाहाबादला आपले पौराणिक नाव परत मिळवून दिले- प्रयागराज. याच पाश्वर्भूमीवर 2019 चा कुंभ प्रयागराजमध्ये आयोजित केला गेला. पंतप्रधान मोदी यांनी तेथे कुंभ कलशाचे पूजन केले. 2019 च्या कुंभपर्वाच्या शुभारंभाआधीच पाच शतकांमधील एक विक्रम स्थापित झाला होता. तत्पूर्वी या कालावधीतील कुंभ इलाहाबाद येथे आयोजित होत होते. 2019 मध्ये मात्र प्रथमच महाकुंभाचे आयोजन प्रयागराज येथे झाले. त्या वर्षीचे योगी आदित्यनाथ यांचे भव्य नियोजन अनेक बाबतीत अभूतपूर्व ठरले. हे कार्य निव्वळ शासनसत्तेच्या माध्यमातूनच होते असे नाही, तर त्यासाठी आस्थेची पार्श्वभूमी अत्यावश्यक आहे. याच मनोभूमिकेतून त्यांनी कुंभ तयारींचे निर्देशन केले होते. तेथील सर्व व्यवस्थांचे सर्व स्तरांतून कौतुक होत होते. 2019 च्या या कुंभमेळ्यात अनेक विश्वस्तरीय कीर्तिमान स्थापित झाले. अशीच उत्तम व्यवस्था योगी आदित्यनाथ यांनी केली होती.
 
prayagraj kumbh mela
 
 
सरकारी यंत्रणांनीसुद्धा याच भावनेतून कार्य केले. पन्नास वर्षांत प्रथमच तीर्थयात्रींना स्नानासाठी इतके शुद्ध जल लाभले. प्रथमच तीर्थयात्रींनी पौराणिक अक्षयवट आणि सरस्वती कुपाचे दर्शन घेतले. अशा आस्थेच्या स्पर्शाने सर्वच वातावरण बदलते. याप्रसंगी प्रयागराज येथे सांस्कृतिक केंद्रांसाठी ‘कलाग्रामची’ व्यवस्था केली गेली. युनेस्कोने या कुंभमेळ्यास ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा’ अशी संज्ञा दिली. त्या वेळी प्रवासी संमेलन प्रतिनिधीव्यतिरिक्त 71 देशांचे राजदूत मेळ्यात आले होते. जलशुद्धीसाठी गंगोत्री ते प्रयागराजपर्यंत नालींमधील अशुद्ध पाणी गंगेत प्रवाहित होणे थांबवले गेले. मागील प्रयागराज कुंभाचे भव्य आयोजन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपलब्धींमधील एक आहे. इथे सर्वाधिक संख्येने स्नानार्थी आले. 2019 मध्ये ‘स्वच्छ कुंभ, सुरक्षित कुंभ’ ही संकल्पना यशस्वी ठरली. हजारो विद्यार्थ्यांनी आठ तासांपर्यंत चित्रे काढली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला. 10 हजार सफाई कर्मचार्‍यांनी एकत्र साफसफाईचा विश्वविक्रम केला. 2019 च्या कुंभामध्ये चोवीस कोटींहून जास्त भाविकांनी स्नान केले. एवढ्या मोठ्या संख्येच्या देखरेखीसाठी ‘इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ स्थापित केले होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोगसुद्धा झाला.
 
 
याच प्रयागराज कुंभादरम्यान मा. पंतप्रधानांनी सफाई कर्मचार्‍यांचे पाद्यपूजन केले होते. 2019चा कुंभ यंत्रणा व सुविधा यांच्या विकसित रूपासाठी आणि सुव्यवस्थेसाठी ओळखला गेला. कुंभाचे ऐतिहासिक महत्त्व जगप्रसिद्ध आहे. अशा प्रकारचे आयोजन अन्यत्र कोठेही होत नाही. प्रत्येक सरकार आपल्या स्तरावर यशस्वी आयोजनाचे प्रयत्न करत असतेच; परंतु योगी आदित्यनाथ एवढेच करून थांबले नाहीत, तर भावनात्मक पद्धतीने त्यांनी स्वत:ला या कुंभाशी जोडून घेतले आहे. तेच 2019 च्या आयोजनातून दिसून आले.
 
 
2025 च्या पूर्ण कुंभाच्या शुभारंभाआधीच अनेक विक्रम स्थापित झाले आहेत. योगी सरकारने या विशाल आयोजनांतर्गत कुंभ नगराची स्थापना केली आहे. या जिल्ह्यात प्रयागराज तहसील तसेच करछना, फुलपूर आणि सौरांव या जवळपास सत्तर गावांचा आणि प्रभागांचा समावेश आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ हाच भारतीय संस्कृतीचा संदेश आहे. कुंभ आपल्या देशाची विविधता आणि समृद्ध संस्कृती समजावून घेण्याचे उत्तम साधन आहे. कुंभाच्या निमित्ताने इथे भाविक आणि पर्यटकांना अनेक प्रदेशांच्या विविध कला पाहावयास मिळतात. या कुंभाचा शुभारंभ मकरसंक्रांतीपासून होत आहे. भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन इथे घडणार आहे.
 
 
इथे बॉलीवूडचे समस्त तारे-तारका आपल्या समधुर आवाजाने भाविकांना अध्यात्म आणि भक्तिरसात चिंब भिजवतील, तर दुसरीकडे सांस्कृतिक संध्येत महाकुंभाशी संबंधित कथा आणि रामलीला व महाभारतलीला यांचे प्रयोग होणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा ‘हमारे राम’ हा कार्यक्रम सादर करतील, तर ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी गंगाअवतरण यावर कलात्मक सादरीकरण करतील. ‘महाभारत’ मालिकेतील प्रसिद्ध कलाकार पुनीत इस्सार आपल्या प्रस्तुतीने भाविकांना प्राचीन भारतयुगात घेऊन जातील. हे सर्व कार्यक्रम गंगा पंडाल येथे आयोजित होतील. भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन होईल. भोजपुरी आणि बॉलीवूड अभिनेते व गोरखपूर खासदार रविकिशन शिवतांडव प्रस्तुत करतील. देशातील प्रसिद्ध कवींचे कवी संमेलनही आयोजित केले आहे. अशा प्रकारे हा प्रयागराज महाकुंभ सामाजिक सद्भावनेचे प्रतीक बनला आहे. कुंभाच्या या महान परंपरेला ‘सर्व सिद्धीप्रद: कुंभ’ याच संदेशाने प्रसारित केले जाणार आहे.
 
prayagraj kumbh mela 
 
इतक्या भव्य आयोजनाची तयारीसुद्धा तितकीच चोख केली जाणार आहे. फ्लायओव्हर व ब्रिज बनवले जात आहेत. शेकडो रस्त्यांचे विस्तृतीकरण झाले आहे. चौका-चौकांचे सुशोभीकरण होत आहे. या वेळी कुंभमेळ्याचे क्षेत्र विस्तारित करण्यात आले आहे. जगभरातून चाळीस कोटींपेक्षा जास्त भाविक महाकुंभात सहभागी होण्याचा अंदाज आहे. योगी आदित्यनाथ या महाकुंभास भव्यदिव्य बनविण्यासाठी कटिबद्ध आहेत. मेळा क्षेत्रात अनेक केंद्रीय दवाखाने आणि हरवलेल्या व्यक्तींचे शोधकेंद्र बनवले गेले आहेत. प्रयागराज शहरातसुद्धा अनेक तात्पुरते आणि कायमस्वरूपी कार्य निर्माण होत आहेत. मेळा प्राधिकरण, नगर निगम लोक आणि अन्य अनेक विभागांची निर्माणकार्ये येथे चालू आहेत. यापैकी बहुतेक कार्ये पूर्ण झाली आहेत आणि काही कार्ये निर्माणाधीन आहेत.
 
 
प्रयागराजच्या जोडणीसाठी गंगा एक्स्प्रेस वे प्रस्तावित केला होता. चार मार्गिका असलेला हा एक्स्प्रेस वे जगातील सर्वात लांब एक्स्प्रेस वे असेल. तो पश्चिम उत्तर प्रदेशाला प्रयागराजशी जोडेल. सहाशे किलोमीटर लांब असा हा एक्स्प्रेस वे मेरठपासून प्रयागराजपर्यंत असेल. तो मेरठ, अमरोहा, बुलंदशहर, बदायू, शाहजहापूर, फरुर्खाबाद, हरदोई, कन्नौज, उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ या मार्गांनी प्रयागराजपर्यंत पोहोचेल. प्रयागराजपासून चित्रकुटामधील पहाडी क्षेत्रात महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा आणि रामायण शोध संस्थान बनविण्याचा मार्गही आता प्रशस्त झाला आहे.
 
 
prayagraj kumbh mela
 
योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभाच्या तयारींचा आढावा घेण्यासाठी अनेक वेळा प्रयागराजचा प्रवास केला आहे. ते म्हणाले की, “प्रयागराज शहराचा कायाकल्प आता जवळपास पूर्ण झाला आहे. प्राधिकरणाने जवळपास पाच हजार एकर क्षेत्रफळात प्रयागराजशी जोडल्या जाणार्‍या मार्गांवर आणि संगमापासून दोन ते पाच किलोमीटर अंतरावर पार्किंग स्पेस चिन्हित करून सक्रिय केलेले आहेत. प्रत्येक पार्किंग स्थळावर एक पोलीस चौकी असेल. कडेकोट सुरक्षाव्यवस्था असेल, पब्लिक एन्ट्रस सिस्टीम असतील. तीस पाँटून ब्रिज तयार होत आहेत. बारा किलोमीटर लांबीचा अस्थाई घाटनिर्माण चालू आहे. चेकर्ड प्लेट्स पाचशे किलोमीटरच्या परिघात लावून ठेवलेल्या आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची पाइपलाइन केलेली आहे. आतापर्यंत सात हजारांहून जास्त संस्था या कुंभमेळ्याशी जोडल्या गेल्या आहेत. दीड लाखाहून जास्त टेंट व्यवस्था मेळा प्राधिकरणातर्फे करण्यात आली आहे.
 
 
मुख्यमंत्र्यांनी फाफामऊ येथे गंगा नदीवरील सहा मार्गिकांची योजना असलेल्या पूलनिर्माणाचे निरीक्षण केले. या कुंभात हा पोलादी पूलच तीर्थयात्री आणि पर्यटकांच्या संगमस्थानापर्यंत जाण्याचे साधन असेल. या पोलादी ब्रिजमुळे पश्चिम उत्तर प्रदेश, अयोध्या, गोरखपूर, लखनऊ, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान इथून महाकुंभात येणार्‍या भाविकांना वाहनांची सुविधा मिळेल. गंगा किनार्‍यावर रिव्हर फ्रंट रोड येथून वाहनांनी थेट महाकुंभ स्थळावर प्रवेश करता येईल. भारत सरकारच्या सौजन्याने बनणार्‍या या पोलादी ब्रिजच्या लोड टेस्टिंगचे कामही पूर्ण झाले आहे. तीर्थयात्रेतील प्रत्येक स्थान सुरक्षित व्हावे यासाठी कोणत्याही व्यवस्थेत कुचराई होणार नाही, याची दक्षता घेतली गेली आहे. पाच हजार कुंभ सेवामित्रांची नियुक्ती केली गेली. त्यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही झाले आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथे कुंभ कलशाचे पूजन केले. अक्षयवटाचे दर्शन व पूजन केल्यानंतर त्यांनी श्री बडे हनुमान मंदिराच्या प्रस्तावित कॉरिडॉर मॉडेलचे अवलोकन केले. याव्यतिरिक्त पंचावन्नशे कोटी रुपयांच्या परियोजनांच्या लोकार्पणाचा शिलान्यासही केला. अशा प्रकारे 2025 च्या या भव्य महाकुंभ मेळ्यासाठी योगी सरकार प्रतिबद्ध झाले आहे.
 
अनुवाद - कौमुदी परांजपे