बिनबुडाचा दावा आणि वक्फचा कावा

विवेक मराठी    09-Jan-2025
Total Views |
 
Waqf Boards  
वास्तविक कुंभमेळा ही हिंदूंची प्राचीन परंपरा आहे. ज्या वेळी भारतातच काय, पण जगाच्या पाठीवर कुठेही इस्लाम अस्तित्वातही नव्हता तेव्हापासून भारतात फक्त चारच तीर्थक्षेत्री कुंभमेळा होतो आहे. तेव्हा ही जमीन वक्फची आहे, असा दावा करणे हे किती बिनबुडाचे आहे हे यावरून लक्षात यावे. 
भारतीय संस्कृतीच्या विराटतेचे, विविधतेचे आणि सर्वसमावेशकतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुंभमेळा. प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक या चार तीर्थक्षेत्री त्याचे आयोजन केले जाते. प्रयागराज इथे दर बारा वर्षांनी पूर्ण कुंभ होतो. असे बारा पूर्ण कुंभ झाल्यावर येणार्‍या कुंभाला महाकुंभ म्हटले जाते. 13 जानेवारीपासून प्रयागराज इथे होत असलेला कुंभमेळा हा 144 वर्षांनी होत असलेला महाकुंभ आहे. देशविदेशातून या कुंभासाठी सुमारे 40 कोटी भाविक येतील असा अंदाज असून त्यासाठी उत्तर प्रदेश सरकार कंबर कसून जय्यत तयारी करत आहे. अशा प्रकारचे ठरावीक कालखंडानंतर होणारे भाविक आणि साधुसंतांचे एकत्रीकरण हे जगातले सर्वात मोठे एकत्रीकरण आहे. यंदाचा महाकुंभ हा अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरावा यासाठी प्रयत्न होतो आहे. त्याविषयी विस्तृत माहिती याच अंकातील लेखातून वाचकांना मिळेल.
 
 
कुंभ जरी प्रयागराज इथे होत असला तरी संपूर्ण देशातील हिंदूंमध्ये आज आनंद आणि चैतन्याचे वातावरण आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या अखिल भारतीय मुस्लीम जमातीचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दिन रझवी बरेलवी याने एका कार्यक्रमादरम्यान, ‘कुंभमेळा आयोजित करण्यात आलेली जमीन वक्फ बोर्डाची आहे. प्रयागराज येथील मुस्लीम समुदायातील लोकांनी ‘वक्फ’ भूमीवर कुंभमेळ्याला मोठ्या मनाने परवानगी दिली असून हिंदूंनी या कार्यक्रमामध्ये आम्हाला प्रवेश देऊन प्रतिसाद दिला पाहिजे,’ असा सनसनाटी दावा व त्याला साजेशी अपेक्षा व्यक्त करत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा दावा ताबडतोब फेटाळून लावत, कुंभमेळ्याचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी अशी निरर्थक वक्तव्ये करून धार्मिक तेढ निर्माण करणार्‍यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
 
वास्तविक कुंभमेळा ही हिंदूंची प्राचीन परंपरा आहे. ज्या वेळी भारतातच काय, पण जगाच्या पाठीवर कुठेही इस्लाम अस्तित्वातही नव्हता तेव्हापासून भारतात फक्त चारच तीर्थक्षेत्री कुंभमेळा होतो आहे. तेव्हा ही जमीन वक्फची आहे, असा दावा करणे हे किती बिनबुडाचे आहे हे यावरून लक्षात यावे.
 
 
वक्फचा कायदा म्हणजे काँग्रेसने बहाल केलेले अस्त्र आहे. ज्याचा गैरवापर करत भारतातल्या किती तरी महत्त्वाच्या जमिनी वक्फ बोर्डाने गिळंकृत केल्या आहेत. कायद्याच्या आधारे दिवसाढवळ्या केलेल्या त्या चोर्‍याच आहेत. मूळ वक्फ कायदा आणि वक्फ कायदा, 1995 तसेच 5 मार्च 2014 ला (लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी काही तासांचाच अवधी असताना) मनमोहन सिंह सरकारने वक्फ बोर्डाला मालमत्ता हस्तांतरित करण्यासंबंधी दिलेले पत्र... ही सगळी काँग्रेसच्या मुस्लीम अनुनयाची उदाहरणे आहेत. याच्या आधारे, कोणत्याही जमिनीवर वक्फने दावा करावा आणि कोणत्याही पुराव्याशिवाय ती जमीन त्यांच्या ताब्यात मिळावी असे प्रकार आपल्या देशात चालू होते. त्यातून देशाच्या एकात्मतेला असलेला धोका लक्षात घेत या कायद्यात सुधारणा करण्यासाठी मोदी सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक ऑगस्ट 2024 मध्ये लोकसभेत सादर केले. त्यासाठी संयुक्त संसदीय समितीही गठित करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे नाराज असलेले मुस्लीम नेते कुरापती काढण्याची आणि सामाजिक वातावरण गढूळ करण्याची संधी शोधत असतात. महाकुंभ हे त्यांना मिळालेले नवे निमित्त. अर्थात केवळ तेवढेच कारण आत्ता केलेल्या सनसनाटी विधानाला नाही. त्याच्या तळाशी उत्तर भारतातील सरकारने घेतलेल्या काही निर्णयांबद्दलची नाराजीही आहे.
 
 
उत्तर भारतात हिंदूंच्या सण-उत्सवांपासून योगी सरकारने मुस्लीम विक्रेत्यांना दूर ठेवले आहे. त्यातून होत असलेल्या आर्थिक नुकसानीमुळे मुस्लीम समुदायात अस्वस्थता आहे. वास्तविक, गेली काही वर्षे ईद वा अन्य सणांसाठीची खरेदी फक्त मुस्लीम दुकानदारांकडून केली जावी, असा फतवा मुल्ला-मौलवींनी काढला आहे. हे लक्षात घेता, योगी सरकारने उचललेले पाऊल योग्य म्हणावे लागेल.
 
 
तसेच उत्तर भारतातील अनेक मशिदी या हिंदूंची मंदिरे पाडून उभारल्याचे दावे हिंदूंकडून केले जात आहेत. त्यांच्या या दाव्यांना पुष्टी देणारे भरभक्कम पुरावेही सापडत असल्याने मुस्लिमांमध्ये अस्वस्थता आहे. संभल हे त्याचे अगदी ताजे उदाहरण.
 
या पार्श्वभूमीवर महाकुंभाची जागा वक्फची असल्याच्या मुस्लीम नेत्याच्या दाव्याकडे पाहावे लागेल. तसे पाहिले तर लक्षात येईल की, हा दावा असंतोष व्यक्त करण्याचे एक निमित्त आहे. यावरून वक्फचा उपयोग किती सर्रासपणे शस्त्रासारखा केला जातो आहे हे लक्षात येईल आणि त्या कायद्यात आमूलाग्र सुधारणा करण्याची तातडीही लक्षात येईल. अर्थात, अनेक मुल्ला-मौलवी असे निराधार दावे करत असले तरी काही त्यांच्यातलेच काही सुबुद्ध हा दावा मूर्खपणाचे असल्याचे सांगत फेटाळून लावत आहेत. काशी ज्ञानव्यापी प्रकरणातील मुस्लीम पक्ष असलेल्या अंजुमन अरेंजमेंट मस्जिदचे संयुक्त सचिव मोहम्मद यासीन यांनी बरेलवी यांना चपराक लगावली आहे. ‘हजारो वर्षांपासून महाकुंभ चालू असताना त्याला वक्फ जमीन म्हणणे म्हणजे मूर्खपणाशिवाय दुसरे काहीही नाही. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत. हे पूर्णत: अन्यायकारक आहे,‘ असे सांगून, ‘यामागची सत्यता वक्फ बोर्डाच्या कार्यालयातून तपासली आहे. अशी अनावश्यक वक्तव्ये समाजासाठी घातक आहेत’ हा इशाराही मोहम्मद यासीन यांनी दिला आहे. त्यांचे या स्पष्टोक्तीसाठी अभिनंदन केले तरी बेजबाबदार विधाने करणार्‍या मुल्ला-मौलवींच्या अधीन असलेल्या बहुसंख्य मुस्लीम समाजाला जागे कसे करायचे, हा प्रश्नच आहे.
 
 
अर्थात, वक्फचा हा बिनबुडाचा आरोप आणि त्यातून कलहाचे केलेले सूचन याचे दडपण घेणारे सरकार ना त्या राज्यात आहे, ना केंद्रात. त्यामुळे ठरल्याप्रमाणे हा महाकुंभ अविस्मरणीय होईल याची खात्रीच आहे. या विधानाची दखल घ्यायची ती यासाठी की, वक्फच्या नावाखाली चालू असलेली हडपशाही आणि दडपशाही सर्वसामान्यांच्या लक्षात यावी.