नुक्कड साहित्य संमेलन - प्रेरक आणि दिशादर्शक

विवेक मराठी    09-Jan-2025
Total Views |
@संजीवनी शिंत्रे
 
यंदाचे सातवे नुक्कड साहित्य संमेलन आणि तिसरे बाल साहित्य संमेलन 4 आणि 5 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. ‘अभिजात मराठी भाषा’ हा विषय या संमेलनाच्या केंद्रस्थानी ठेवून साहित्य क्षेत्रात कार्यरत असणार्‍या अनेक मान्यवरांचा संमेलनात सहभाग होता. तसेच साहित्य संमेलनात सर्व वयोगटांतील मराठी भाषकांनी सहभाग नोंदविल्यामुळे कार्यक्रम सर्वसमावेशक झाला.

vivek
 
मराठी साहित्याची अवस्था वाईट आहे, मराठी भाषेला भवितव्य नाही, असे गळे काढण्यापेक्षा ‘मराठी भाषक’ या नात्याने आपण काय करू शकतो, या विचाराने ‘विवेक व्यासपीठ’ या उपक्रमाने 2019 साली ‘विवेक साहित्य मंच’ या व्यासपीठाची निर्मिती केली. सर्व वयोगटांतील मराठी साहित्यिक आणि मराठी वाचक यांना एकत्रित आणून विविध साहित्यिक उपक्रम राबवणे, हा या व्यासपीठाच्या निर्मितीमागचा प्रमुख हेतू होता. हा हेतू समोर ठेवून साहित्याशी संबंधित व्याख्याने, परिसंवाद, कवी संमेलने, लेखन स्पर्धा असे विविध उपक्रम ‘विवेक साहित्य मंच’तर्फे घेतले जातात. याच उपक्रमांपैकी बहुचर्चित आणि सर्वसमावेशक उपक्रम म्हणजे ‘नुक्कड साहित्य संमेलन’. 2019 सालापासून दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘विवेक साहित्य मंच’च्या वतीने ‘नुक्कड साहित्य संमेलन’ भरवले जाते. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्यातले विविध साहित्य प्रकार, जुन्या तसेच नव्या मराठी लेखकांचे लेखन, समीक्षा क्षेत्रातील घडामोडी यांसारख्या विषयांवर चर्चा होते आणि साहित्यावर आधारित काही कार्यक्रमही सादर केले जातात.
  
‘अनुष्टुभ’सारख्या वाङ्मयीन मासिकाचे संपादक, का.स. वाणी प्रगत अध्ययन संस्थेचे संचालक आणि मराठी साहित्याचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. रमेश वरखेडे हे यंदाच्या नुक्कड साहित्य संमेलनाचे बीजभाषक होते, तर मराठी कवितेच्या क्षेत्रातील नावाजलेल्या ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे या संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर होऊन केवळ काहीच महिने झाले असल्यामुळे ‘अभिजात मराठी भाषा’ हा विषय या संमेलनाच्या केंद्रस्थानी होता. त्यामुळे मराठी भाषा जतन करणे, समृद्ध करणे आणि प्रवाही ठेवणे, ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत व्यक्त करून आसावरी काकडे यांनी संपूर्ण संमेलनाचे विचारसूत्रच निश्चित केले. त्यानंतर डॉ. वरखेडे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण बीजभाषणात मराठी साहित्यातील पूर्वसुरींचा तसेच समकालीन साहित्याचा आढावा घेऊन भविष्यात मराठी साहित्यात कोणकोणत्या गोष्टींची भर घालणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मराठी साहित्यामध्येे तसेच मराठी वाचकाच्या दृष्टिकोनात नक्की कोणते बदल घडणे आवश्यक आहे याबाबतही परखड भूमिका मांडली.
 

nukkad 
 
या संमेलनात ‘मराठी भाषा: अभिजातता आणि साहित्यिक उपक्रम’ या विषयावरील परिसंवाद, नारायण धारप यांच्या कथेचे अभिवाचन असणारा ‘भय इथले संपत नाही’ हा कथा अभिवाचनाचा कार्यक्रम, नुक्कड कथाविश्वमधील लेखन स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण, अति लघुकथा म्हणजेच अ.ल.क.चे अभिवाचन, ‘कथा, कविता, कादंबरी आणि तरुण’ या विषयावरील परिसंवाद असे साहित्याच्या विविध घटकांचा ऊहापोह करणारे कार्यक्रम झाले. ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनाचा समारोप झाला तेव्हा त्यांनी परत एकदा सार्वजनिक ठिकाणी बिघडलेल्या भाषेच्या दर्जाबद्दल खंत व्यक्त केली आणि मराठी भाषकांनीच आपल्या नेत्यांच्या बिघडलेल्या भाषेबद्दल कानउघाडणी करणे कसे गरजेचे आहे याची जाणीव करून दिली. यानंतर ‘फोकलोक’ या बहारदार लोकगीतांच्या कार्यक्रमाने संमेलनाची सांगता झाली.
 
 
सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या साहित्य संमेलनात सर्व वयोगटांतील मराठी भाषकांनी सहभाग घेतला असल्यामुळे कार्यक्रम सर्वसमावेशक झाला. कार्यक्रमात सहभागी झालेले वक्ते आणि कलाकार यांच्यातही तरुण आणि मध्यमवयीन यांचा समतोल होता. डॉ. आनंद काटीकर, मिलिंद शिंत्रे, डॉ. रुपाली शिंदे यांसारखी अनुभवी मंडळी, अभिजित थिटे यांच्यासारखे पत्रकार अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करत असले तरी स्वानंद बेदरकर, गीतेश शिंदे, सुचिता घोरपडे, कीर्ती जोशी, अनिरुद्ध प्रभू यांसारखी तरुण मंडळी सहभागी होती. पुस्तक संपादन, विविध साहित्यिक उपक्रम, पुस्तक प्रकाशन, पुस्तक विक्री यांसारख्या साहित्य व्यवहाराच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत तरुण पिढी धडपड करतेय हे चित्र खूप आश्वासक आहे. प्रांजली देशपांडे यांच्यासारख्या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या संशोधक मराठी भाषेच्या संगणकीय प्रणालीवर चिकाटीने काम करतायत आणि इंटरनेटच्या जगात मराठी वापरकर्त्यांचा क्रमांक दुसर्‍या स्थानावर असून आपण गांभीर्याने काम करत राहिलो तर मराठी भाषेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगातही चांगले भवितव्य आहे, हे ठामपणे सांगतात, ही गोष्ट अतिशय दिलासादायक आहे याची या संमेलनाच्या निमित्ताने सुखद जाणीव झाली.
 
 
nukkad
 
साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी बाल साहित्य संमेलन होते. साहित्य संमेलनाच्या अनुभवातून दर्जेदार साहित्याच्या निर्मितीसाठी बालवयापासूनच काम केले पाहिजे, हे जाणवल्यामुळे साहित्य संमेलनाबरोबरच ‘विवेक साहित्य मंच’ने गेली तीन वर्षे बाल साहित्य संमेलनाचेही आयोजन करण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या लाटेत पालकांपासून प्रकाशकांपर्यंत सगळेच जण मुलांच्या मराठी वाचनाकडे दुर्लक्ष करत असताना ‘विवेक साहित्य मंच‘ने उचललेले पाऊल अतिशय अभिनंदनीय आहे.
 
 
गेली तीन वर्षे भरत असलेले हे बाल साहित्य संमेलन म्हणजे मुलांचा जास्तीत जास्त सहभाग आणि पूर्णपणे मुलांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणारा आनंदोत्सव असतो. या वर्षी या संमेलनाच्या बीजभाषक म्हणून बाल साहित्याचे अभ्यासपूर्ण संपादन करणार्‍या ज्येष्ठ साहित्यिक मंगला वरखेडे होत्या, तर कुमारांसाठी विज्ञानकथा लिहिणारे संजय ढोले या संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते. बदलत्या काळात आजूबाजूच्या समाजावर आणि पर्यायाने बालमनावर समाजमाध्यमांचे वर्चस्व असताना कोणत्या प्रकारचे बाल साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे याची दिशा देणारे भाषण करून मंगला वरखेडे यांनी या बाल साहित्य संमेलनातील एकूण कार्यक्रमाची दिशा निश्चित केली. या दिशेला अनुसरून संजय ढोले यांनी मुलांसाठी विज्ञानविषयक ललित लेखनाची कशी गरज आहे याचे विवेचन केले.
 

nukkad 
 
यानंतर मुलांनी स्वतःचे भावविश्व व्यक्त करणार्‍या कविता सादर करून पुढील ‘बालकेंद्री’ संमेलनाची नांदी केली. या छोट्या कवींना लोकप्रिय बाल साहित्यकार राजीव तांबे यांनी विंदा करंदीकरांच्या बालकवितांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांचा शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर ‘गोष्ट इथे संपत नाही’ हा अतिशय रंजक कथाकथनाचा कार्यक्रम, संगीताची ओळख करून देणारा मधुवंती पेठे यांचा ‘ऐकू या... गाऊ या’ हा कार्यक्रम, नाट्यछटा, बालगीते अशा विविध कार्यक्रमांनी मुलांचे मनोरंजन तर केलेच; पण त्यांना विचारप्रवृत्तही केले. नाट्यछटांच्या सादरीकरणानंतर रवींद्र सातपुते यांनी एकपात्री प्रयोग आणि नाट्यछटा यांच्या संहितेत आणि सादरीकरणात नक्की काय फरक असतो याचे सोदाहरण मार्गदर्शन केल्यामुळे मुलांना नाट्य प्रकारातील आनंदाबरोबरच नाट्य प्रकारांचे नकळतपणे प्रशिक्षणही मिळाले. ’बालगीत इंडिया’ आणि ‘स्वरतेज विद्यालय’ या गटांनी सादर केलेली बालगीते आशय आणि संगीत या दोन्ही दृष्टीनेदर्जेदार होती. मुले या गाण्यात इतकी रमली होती की, अनेक मुलांना गाण्याच्या तालावर नाचण्याचा मोह आवरता आला नाही.
 
मुलांसाठी अशा दर्जेदार कार्यक्रमांचा फारच अभाव असल्यामुळे या सर्व कार्यक्रमांना मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीही तुडुंब गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही पालक तर शाळेत जाणार्‍या मुलांच्या तान्ह्या भावंडांनाही कार्यक्रमाला घेऊन आले होते. या बाल साहित्य संमेलनाचा समारोप करताना डॉ. मंदा खांडगे यांनी अशा कार्यक्रमाच्या उपयुक्ततेची अनेक उदाहरणे देऊन संमेलनातील सहभागी कलाकारांचे कौतुक केले. संमेलनाच्या शेवटी मुलांनी ‘माय सुपरहिरो‘ या नाटकाचे उत्तम सादरीकरण करून आबालवृद्ध प्रेक्षकांची मने जिंकली.
 
 
दोन दिवसांच्या या संमेलनासाठी विवेक साहित्य मंच, विवेक व्यासपीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विदिशा विचार मंच, युवा विवेक, चरित्रकोश, पुणे मराठी ग्रंथालय, शिक्षण विवेक, मुकुंद भवन ट्रस्ट अशा विविध संस्थांचे सहकार्य लाभले होते.
दोन दिवसांच्या या यशस्वी संमेलनामुळे अभिजात मराठी भाषेचे पाईक म्हणून मराठी भाषकांवर कोणती जबाबदारी आहे याची दिशा स्पष्ट झाली. त्यामुळे संयोजकांवरची जबाबदारी अधिकच वाढली आहे.