एकीकडे संघाची शताब्दी आणि दुसरीकडे मोदींची पंचाहत्तरी आणि त्यातही पंतप्रधान म्हणून तिसरा कार्यकाळ यांचा धांडोळा घेणे म्हणूनच औचित्याचे ठरते. हिंदुत्वाच्या विचारांना, संघविचारांना या अगोदर राजकारणात स्थान मिळाले असले तरी त्या विचारांचा निःसंकोच उच्चार आणि मुख्य म्हणजे त्या विचारांशी सुसंगत धोरण-निर्णय निश्चिती व अंमलबजावणी गेल्या दहा-अकरा वर्षांत होताना प्रकर्षाने दिसते आहे. त्यामुळे संघाची शताब्दी, मोदींची पंचाहत्तरी आणि मोदी यांच्या नेतृत्वातील गेल्या दशकभराचा कार्यकाळ यांचा धांडोळा घेणे रोचक ठरेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाला नुकतीच पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. हा योगायोग विलक्षण आहे. त्याचे कारण संघविचारांचा केवळ विस्तारच नव्हे तर प्रभाव आता समाजाच्या जवळपास सर्व क्षेत्रांत दिसतो आहे; त्यात राजकीय क्षेत्रही आले. तेथे मोदी हे संघविचारांच्या प्रभावाचे लखलखते प्रतीक आहेत. संघाने शंभर वर्षांच्या वाटचालीत समाजजीवनातील विविध क्षेत्रांना कसलेले कार्यकर्ते पुरविले. संघाच्या शताब्दीनिमित्त दिल्लीत नुकतीच सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी एक व्याख्यानमाला गुंफली. तेथे बोलताना भागवत यांनी संघाच्या तीन स्थायी मुद्द्यांचा उल्लेख केला होता. त्यांत व्यक्तिनिर्माणातूनच सामाजिक परिवर्तन होऊ शकते हा एक; समाजसंघटन करूनच अपेक्षित बदल घडवून आणता येतो हा दुसरा; तर हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र आहे हा तिसरा. यांतील व्यक्तिनिर्माणाचे कार्य हे शांतपणे; कोणताही गाजावाजा न करता केले जाणारे काम. मात्र निरलसपणाने केलेल्या याच कार्याचा परिणाम म्हणजे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत संघाने पुरविलेले कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांनी त्या क्षेत्रात रुजविलेला, वाढविलेला आणि प्रस्थापित केलेला संघविचार.
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा राजकीय क्षेत्रात काँग्रेस, समाजवादी व डाव्यांचे प्राबल्य होते. हिंदुत्वाचा विचार हा मागास आहे असे समजण्याची रीत होती. मात्र आता स्वातंत्र्यानंतर पाऊण शतक उलटत असताना त्याच हिंदुत्वाच्या विचाराचा प्रभाव सर्वदूर दिसतो आहे. त्यात राजकारण देखील आले. हिंदुत्व म्हणजे केवळ उपासना पद्धती नव्हे तर ती एक जीवनशैली (वे ऑफ लाईफ) आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यास देखील आता अनेक वर्षे उलटून गेली. हा विचार केवळ राजकारणातच नव्हे तर मजदूर क्षेत्रापासून विद्यार्थी क्षेत्रापर्यंत आता प्रस्थापित झाला आहे. केवळ सांख्यिकी निकषावर नव्हे तर गुणात्मक निकषांवर देखील हा विचार सर्वांत परिणामकारक आहे याची दखल जगभरात घेतली जात आहे आणि त्या विचारास स्वीकारार्हता लाभत आहे. पण हे सगळे आपसूक झालेले नाही. गेल्या शंभर वर्षांत उपेक्षेपासून द्वेषापर्यंत अनेक अडथळे पार करीत संघाने हा विचार समाजात रुजविण्याचे महत्कार्य केले आहे.
वैचारिक कटिबद्धतेची कसोटी
संघ हा थेट राजकारणात सामील नाही. राजकारण हे अन्य क्षेत्रांच्या तुलनेत अतिशय निराळे क्षेत्र आहे. त्या क्षेत्राचा पायाच तडजोडी हा आहे. त्या तडजोडी अनेकदा वैचारिकही असतात आणि अनेकदा त्या करणे अपरिहार्य असते. मुद्दा इतकाच असतो की, त्या सवंग असता कामा नयेत आणि वेळ आली तर विचारांसाठी सत्तेला सोडचिठ्ठी देण्याचा बाणेदारपणा जिवंत असला पाहिजे. संघाने गेल्या शतकभरात अनेक संकटांचा सामना केला; पण आपल्या मूळ वैचारिक गाभ्याशी कधी तडजोड केली नाही. राजकारणात संघाचे असंख्य कार्यकर्ते सक्रिय आहेत व होते. त्यांनी देखील कधी सवंगपणे वैचारिक तडजोड केल्याचे उदाहरण नाही. आणि तरीही मोदींचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ हा उठावदार दिसतो असा दावा करता येतो. एकीकडे संघ आपल्या इतिहासातील सर्वांत अनुकूल काळाचा अनुभव घेत असताना राजकीय क्षेत्रात संघप्रेरित भाजपने देखील आपला सुवर्णकाळ अनुभवावा हा केवळ योगायोग नव्हे. विचार जेव्हा विस्तारतो, प्रस्थापित होतो आणि प्रबळ ठरतो तेव्हा तो समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांना व्यापतो. मात्र तरीही राजकारण हे या अर्थाने निराळे असते की, तेथे स्थायीपेक्षा तात्कालिक विषय अनेक असतात. त्यामुळे वैचारिक कटिबद्धतेची तेथे रोजच्या रोज कसोटी लागत असते. संघासारख्या संघटनेपेक्षा राजकारण हे भिन्न पद्धतीने चालत असते. संघ व्यक्तीनिरपेक्षता, प्रसिद्धिपरान्मुखता मानतो; राजकारणात हे शक्य नसते कारण ते क्षेत्रच मुळी प्रतिमांचे असते. मात्र तरीही व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठे हा विचार घेऊन जेव्हा तेथील नेतृत्व काम करते तेव्हा आपली प्रतिमा हे केवळ निमित्तमात्र आहे ही त्यामागील जाणीव जिवंत असल्याचा पुरावा मिळतोच; पण संघविचाराचे पाईक म्हणजे काय याचाही प्रत्यय येतो.
एकीकडे संघाची शताब्दी आणि दुसरीकडे मोदींची पंचाहत्तरी आणि त्यातही पंतप्रधान म्हणून तिसरा कार्यकाळ यांचा धांडोळा घेणे म्हणूनच औचित्याचे ठरते. हिंदुत्वाच्या विचारांना, संघविचारांना याअगोदर राजकारणात स्थान मिळाले असले तरी त्या विचारांचा निःसंकोच उच्चार आणि मुख्य म्हणजे त्या विचारांशी सुसंगत धोरण-निर्णय निश्चिती व अंमलबजावणी गेल्या दहा-अकरा वर्षांत होताना प्रकर्षाने दिसते आहे. त्यामुळे संघाची शताब्दी, मोदींची वयाची पंचाहत्तरी आणि मोदी यांच्या नेतृत्वातील गेल्या दशकभराचा कार्यकाळ यांचा धांडोळा घेणे रोचक ठरेल.
संघविचारांचा राजकारणावर प्रभाव
याचे विवेचन करण्यापूर्वी संघ व राजकारण यांच्या संबंधांवर रंगा हरी यांनी मांडलेल्या विचारांचा उल्लेख करणे प्रस्तुत ठरेल; कारण त्यातून संघ कार्यकर्ते, प्रचारक म्हणून मोदींनी राजकारणात दिलेल्या योगदानाचे आकलन होऊ शकेल. रंगा हरी लिहितात: ‘संघ सत्तेचे राजकारण करीत नसला तरी संघविचार आणि आचारांचा प्रभाव राजकारणावर होणे अगदी स्वाभाविक आहे. राजकारणाचा विचार करताना तीन घटकांचा विचार करावा लागतो: एक म्हणजे सत्ताधारी व्यक्ती, सत्ता राबविणारी व्यवस्था व तिसरी म्हणजे सत्तेतील व्यक्ती व सत्ताव्यवस्था यांमुळे प्रभावित होणारी समाजातील व्यक्ती. संघ साकल्याने या तिन्हींचा विचार करतो... नुसत्या व्यवस्था उत्पन्न करून चालत नसते तर त्या व्यवस्था राबविणारी माणसे देखील चांगली असावी लागतात... सत्तेतील व्यक्ती संस्कारित नसल्यामुळे व त्यांच्यावर संस्कार घडविण्याची कुवत नसल्याने साम्यवादाचे पतन झाले... संघाने व्यवस्थेबरोबरच व्यक्तिनिर्माणाकडे विशेष लक्ष दिले आहे. व्यवस्थेतून व्यक्तीसुद्धा या ऐवजी व्यक्तीकडून व्यवस्थासुद्धा असे संघाचे तत्त्व आहे... देशाच्या राजकीय वातावरणात संघविचारांचा प्रभाव वेगळ्या प्रकारे कसा पडतो हेही आपण पाहू शकतो. संघाच्या पद्धतीनुसार अमुक एखादा विषय सर्वांनी स्वीकारला पाहिजे असा काही आदेश संघ काढत नाही. परंतु संघाच्या व्यवहाराने असा प्रभाव दिवसेंदिवस जरूर वाढत जाईल.’ रंगा हरी यांनी हे लिहिले होते तेव्हा संघ अमृतमहोत्सव साजरा करीत होता. मात्र संघविचारांचा प्रभाव वाढत जाईल हे त्यांचे भाकीत आता पंचवीस वर्षांनी तंतोतंत खरे ठरले आहे यात शंका नाही. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या कार्यकाळाचा मागोवा घेणे इष्ट ठरेल.
संघाच्या मुशीतून आलेले मोदी
मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते; तत्पूर्वी भाजप संघटनेत सक्रिय होते. पण या सर्वांच्या अगोदर ते संघाचे कार्यकर्ते व प्रचारक होते. तेव्हा त्यांच्या पुढच्या सर्व वाटचालीचा पाया हा त्यांच्यावर झालेल्या संघसंस्कारांचा आहे हे नाकारता येणार नाही. मोदींनी जी पुस्तके लिहिली आहेत त्यांत देखील या संघसंस्कारांचे प्रतिबिंब उमटलेले दिसेल. त्यांची दखल घेणे याकरिता आवश्यक की मोदींचे व्यक्तिमत्व संघविचार व संघसंस्कारांमध्ये किती रुजलेले आहे याची कल्पना येऊ शकेल. मोदींचा संघाशी संबंध आला तो गुजरातच्या वडनगर येथे. वयाच्या आठव्या वर्षी ते संघशाखेत जायला लागले. अर्थात ते वय राष्ट्र, हिंदुत्व हे समजण्याचे नव्हते. पॉडकास्टर लेक्स फ्रीडमनला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत मोदींनी याचा उल्लेख केला होता. आपल्या गावात संघाची शाखा होती. तेथे खेळ खेळले जात आणि राष्ट्रभक्तीची गाणी म्हटली जात. विशेषतः त्या गीतांनी आपल्याला प्रभावित केले आणि मग आपण संघाचा सवयंसेवक झालो असे त्यांनी सांगितले होते. भारतीय सैन्यात दाखल होण्याचेही त्यांचे स्वप्न होते. वयाच्या सतराव्या वर्षी मोदींनी भारताचा दौरा केला. पश्चिम बंगाल, ईशान्य भारत येथपर्यंत त्यांनी प्रवास केला आणि भारत जवळून पाहिला आणि अनुभवला. त्याच प्रवासात त्यांना स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा परिचय झाला आणि मोदींनी त्यांना आदर्श मानले. एका अर्थाने ती भारत परिक्रमा संपवून मोदी गावी परतले; मात्र त्यांच्या आयुष्याला तेथूनच कलाटणी मिळणार होती. याचे कारण त्यांनी निश्चय केला होता तो संघाचे कार्य करण्याचा. वयाच्या विसाव्या वर्षी मोदी संघकार्यात सक्रिय झाले. त्यांच्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व म्हणजे ‘वकील साहेब’ या नावानेच परिचित असणारे लक्ष्मणराव इनामदार.
मोदींनी ‘ज्योतिपुंज’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यांत त्यांनी इनामदार यांच्या आदर्शवत व्यक्तिमत्वाचा गौरव केला आहे. त्यांत डॉ. हेडगेवार यांच्यापासून अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. मात्र त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्या पैलूचा प्रभाव मोदींवर पडला याचे दर्शन त्यातून घडते. स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन व डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेला संघ या दोन्हींमधील साम्यस्थळे मोदींवर प्रभाव टाकणारी होती. डॉ. हेडगेवार यांनी संघात प्रचारक व्यवस्था सुरू केली. चिन्मय मिशनचे स्वामी चिन्मयानंद यांनी प्रचारक म्हणजे शुभ्र वस्त्रांतील संन्यासी असे वर्णन केले होते. मोदी हे सगळे टिपत होते आणि संघाचे सक्रिय कार्यकर्तेही झाले होते. 1972 मध्ये ते स्वतः संघाचे प्रचारक झाले. लक्ष्मणराव इनामदार हे त्यांचे मार्गदर्शक. त्यांचा उल्लेख मोदी संघयोगी असा करतात. इनामदार यांच्यावर लिहिताना मोदींनी संघकार्याचे मर्म सांगितले आहे, ते म्हणजे अविरत कार्य. राजकारणात आल्यावर मोदींच्या कामाचा जो झपाटा दिसतो आणि ज्याने त्यांचे चाहते थक्क होतात त्या अविरत कार्यशीलतेची शिकवण मोदींना संघातूनच मिळाली असणार. इनामदार यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना बाळासाहेब देवरस यांनी म्हटले होते की, ‘इनामदार यांच्यामधील काही गुण हे वारसा म्हणून त्यांच्यात आलेही असतील; परंतु त्यांच्यापाशी असणारे बहुतांशी गुण हे सततच्या प्रयत्नांतून त्यांनी विकसित केले होते’. इनामदार यांचा मोदींवर असणारा प्रभाव पाहता मोदींनीदेखील स्वतःमध्ये असेच गुण विकसित केले असणार यात शंका नाही.
संघसंस्कारांचे पाईक
आणीबाणीच्या कालखंडात मोदींचा प्रत्यक्ष राजकारणाशी संबंध नसला तरी जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनात ते सहभागी होते; आणीबाणीला विरोध करणार्या लोकसंघर्ष समितीचे ते सरचिटणीस होते. 2013 मध्ये आपल्या ब्लॉगमध्ये मोदींनी लिहिले होते की, ‘एकाच ध्येयासाठी संघर्ष करीत असलेल्या भिन्न विचारसरणीच्या नेत्यांबरोबर काम करण्याची संधी आणीबाणीच्या काळाने आपल्यासारख्या तरुणांना दिली’. मोदींमधील संघटक या सर्व अनुभवाने संपन्न होत होता. प्रचारक म्हणून त्यांनी केलेले संघटनात्मक कार्य म्हणूनच वाखाणले जाते. पंतप्रधान म्हणून मोदी नावीन्यपूर्ण कल्पना मांडत असतात याचा अनुभव देशाने घेतला आहेच; पण ते काही त्या पदावर विराजमान झाल्यावर आणलेले उसने अवसान नव्हे. प्रचारक असतानाच्या काळापासून त्यांचा हाच पिंड होता.
फ्रीडमनला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी म्हटले होते की, ‘संघाचे मूलभूत मूल्य म्हणजे कोणतेही काम हे अर्थपूर्ण असायला हवे. एका ध्येयाने (विथ पर्पज) प्रेरित होऊन ते काम करायला हवे’. पण त्या कामाला देखील काही लक्ष्य असायला हवे ही देखील त्यांची धारणा होती. त्यांच्या त्या आग्रहाचे प्रतिबिंब आता पंतप्रधान म्हणून ते करीत असलेल्या कामांमध्ये पडलेले दिसेल. सरकारे कोणत्याही पक्षाची असली तरी ती नवनवीन योजना, पायाभूत सुविधा, प्रकल्प यांची सुरुवात करीत असतातच. तेव्हा त्यांत काही थक्क व्हावे असे नाही. मात्र निराळेपण यात आहे की, ज्या प्रकल्पांची सुरुवात केली ते प्रकल्प शक्य तितक्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा मोदींचा आग्रह असतो. नवीन संसद भवनाचे निर्माण हे त्याचे उत्तम व ज्वलंत उदाहरण. लक्ष्यपूर्तीचा हा ध्यास मोदी प्रचारक असल्यापासून आढळून येईल. जगाला त्याची ओळख मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर आणि मुख्य म्हणजे ते पंतप्रधान झाल्यावर झाली असली तरी संघवर्तुळाने तो अगोदरच अनुभवला होता.
किंबहुना गुजरातेत आव्हानात्मक परिस्थिती असताना मोदींना संघाने भाजपामध्ये पाठवावे यामागेही मोदींच्या संघटनात्मक कौशल्याचा, नेतृत्वगुणांचा वाटा मोठा असणार यात शंका नाही. पण त्यापेक्षाही त्यांच्यावर झालेल्या संघसंस्कारांचा पीळ घट्ट आहे ही संघ नेतृत्वाची खात्री प्रबळ असणार हे खरे कारण. राजकारण म्हणजे निसरडे क्षेत्र आहे असे संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणत असत. त्यातील मर्म जाणले तर संघातून भाजपामध्ये पाठवल्या जाणार्या कार्यकर्त्यांच्या वैचारिक कटिबद्धतेचा निकष जास्त प्रबळ ठरतो याची जाणीव होईल. 1987 पर्यंत प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केलेले मोदी यांना संघाने भाजपामध्ये पाठवले आणि तेथून त्यांच्या पंतप्रधानपदापर्यंतच्या वाटचालीचा प्रारंभ झाला.
वेगवगेळ्या प्रसंगी मोदींनी संघाविषयी व्यक्त केलेली मते त्यांच्यावरील संघसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित करतात. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मोदींनी संघाचा उल्लेख केला. मुद्दा त्यांनी तो उल्लेख केल्याचा नव्हे. पंतप्रधान म्हणून त्यांनी संघाचे नाव लाल किल्ल्यावरील भाषणात घेण्यास संकोच केला नाही हे जास्त महत्त्वाचे. अकारणच काही कुंपणे घालून ठेवायची आणि मग त्या निरर्थक कुंपणांना पावित्र्य देत राहायचे ही कंपूशाही देशाने साठ-सत्तर वर्षे अनुभवली. मात्र मोदींचे वैशिष्ट्य हे की, डाव्यांनी रचलेली कुंपणे त्यांनी निःसंकोचपणे तोडून टाकली. याचे कारण मुळातच त्या कुंपणांमध्ये वैचारिक अहंतेचा दर्प होता; अकारणच जागतिक आकलनाचा अहंकार त्यात होता. आपल्या मातीत रुजलेल्या विचारांबद्दलचा आकस दडलेला होता. आपल्या तीनही कार्यकाळात संघाशी असणारी घनिष्ठता मोदींनी कधीही लपवली नाहीच; शिवाय जेथे आवश्यक तेथे संघाच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला. अशाने तळागाळापर्यंतच्या कार्यकर्त्यांत एक संदेश जात असतो. मोदींचा संघाशी असणारा संबंध जगजाहीर असला तरी पंतप्रधान म्हणून त्यांनी संघाचा गौरव करणे आगळे ठरते. विशेषतः कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास वाढविणारे ठरते. पण मोदी तेथवरच थांबले नाहीत. संघ म्हणजे काही बंदी घातलेली संघटना नव्हे. तरीही 1966 मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारने एक परिपत्रक काढून सरकारी कर्मचार्यांवर संघाच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यावर निर्बंध घातले होते. त्यास 58 वर्षे उलटून गेली तरी ते परिपत्रक कायम होते. मोदी सरकारने ते परिपत्रक गेल्या वर्षी (2024) मागे घेतले; म्हणजे निर्बंधांच्या यादीतून संघाचे नाव वगळले. काँग्रेसच्या राजकारणाच्या भिंती अशा धाडसाने पाडून टाकण्याचे काम मोदींनी केले. शिवाय जे केले ते केवळ संघस्वयंसेवक म्हणून नव्हे; घटना व कायद्याच्या चौकटीत राहून मोदींनी हे केले. किंबहुना इंदिरा गांधी यांच्या सरकारने जारी केलेल्या परिपत्रकाला मध्य प्रदेश उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ती याचिका निकाली काढताना न्यायालयाने केलेली टिप्पणी महत्त्वाची होती: ‘केंद्रातील सरकारला आपली चूक उमगायला पन्नास वर्षे लागली.’ ती चूक दुरुस्त करण्याचे श्रेय मोदींचे. संघसंस्कारांचा पीळ घट्ट असल्याचे हे द्योतक.
स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात मोदींनी संघाची वैशिष्ट्ये नमूद केली होती: ती म्हणजे व्यक्तिनिर्माण, राष्ट्रनिर्माण, मातृभूमीचे कल्याण. पंतप्रधान म्हणून मोदींनी त्याच तीन घटकांना आपल्या कारभारात प्राधान्य दिल्याचे दिसेल. याच वर्षीच्या 30 मार्च रोजी मोदींनी नागपूर येथील संघकार्यालयास भेट दिली होती आणि सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्यासह त्यांनी डॉ. हेडगेवार यांना आदरांजली वाहिली. संघटन, समर्पण व तपस्या या संघाच्या तीन मूल्यांवर त्यावेळी त्यांनी भाष्य केले होते. कोरोना काळात सरसंघचालकांनी दिलेल्या ऑनलाईन बौद्धिक वर्गात स्वदेशीचे आवाहन केले होते. मोदींच्या ’मेक इन इंडिया’ अभियानाची प्रेरणा संघविचार हीच होय हे सहज समजू शकेल.
संघाचे हे संस्कार घेऊनच मोदींचे भाजपामध्ये पदार्पण झाले. एकदा ते संस्कार घट्ट असले की, संघ कार्यकर्ता मजदूर संघात जातो की भाजपामध्ये हा प्रश्न उरत नाही. कार्यक्षेत्र बदलले की कार्यपद्धत बदलते; परंतु संस्कार, मूल्ये व वैचारिक अधिष्ठान नव्हे. या संस्कारांचा किती पगडा त्यांच्यावर आहे याची प्रचिती भाजपा संघटनेत त्यांनी काम सुरू केल्यापासून पुढे गुजरातचे मुख्यमंत्री व मुख्य म्हणजे गेल्या दशकभर पंतप्रधान म्हणून केलेल्या कारभारातून येऊ शकेल.
राजकीय जीवनातील घोडदौड
राजकीय क्षेत्रातील मोदींची वाटचाल पाहिली तरी पक्षाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास किती अतूट होता याचा प्रत्यय येईल. ते गुजरात भाजपाचे पदाधिकारी असताना भाजपाने 1980च्या दशकात अहमदाबाद महापालिका निवडणुकीत विजय मिळविला. हा विजय म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ होतेच; पण ते घडवून आणण्यात मोदींच्या कल्पकतेचा वाटा होता. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले; त्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी समाजात जाऊन नागरी बैठका घ्याव्यात अशी अपेक्षा होती. जे करायचे ते घिसाडघाईने नव्हे; तर नियोजनपूर्वक हा मोदींचा आग्रह तेव्हापासूनचा. मुळात निवडणूक व्यूहरचना म्हणून तो अगदी आगळा प्रयोग त्यावेळी होता. अहमदाबाद महापालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयानंतर भाजपाने मोदींवर अधिक जबाबदार्या देण्यास सुरुवात केली. 1990च्या विधानसभा निवडणुकीत मोदी पक्ष प्रचार समितीचे सदस्य होते. त्या निवडणुकीने गुजरातेत काँग्रेसची राजवट संपुष्टात आणली. 1995च्या विधानसभा निवडणुकीत मोदी स्वतः प्रचारात सक्रिय झाले. त्या निवडणुकीचे वैशिष्ट्य हे की भाजपाने प्रथमच सर्व 182 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. निकालाने भाजपाची व्यूहरचना अचूक असल्याचे सिद्ध केले; कारण भाजपाला तब्बल 121 जागांवर विजय मिळाला होता. त्या विजयात मोदींच्या असणार्या योगदानाची योग्य दखल घेत पक्षाने मोदींना 1996मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त केले आणि पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीर या उत्तर भारतीय राज्यांचे प्रभारी केले. सरचिटणीस (संघटन) हे भाजपा संघटनेतील अतिशय महत्त्वाचे पद मानले जाते. त्या पदावर सुंदरसिंह भंडारी, कुशाभाऊ ठाकरे अशांनी काम केले होते. पक्षाने मोदींवर ते दायित्व सोपविले. साहजिकच 1998 व 1999 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात मोदींचा भूमिका महत्त्वाची होती; शिवाय देशभरच्या प्रचाराचे दायित्व त्यांच्यावर होते. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला. वाजपेयी, अडवाणी यांचे नेतृत्व पक्षाला होते आणि पक्षाच्या घोडदौडीत त्यांच्या विश्वासार्ह प्रतिमांचा महत्त्वाचा व मोठा वाटा होता हे नाकारता येणार नाहीच; परंतु संघटन स्तरावर पक्षाला सक्रिय करणे यात मोदींचाही वाटा होता हेही तितकेच खरे. याचे कारण संघटनेत मोदींनी तरुण कार्यकर्ते हेरून त्यांना तयार केले; शिवाय प्रचारात तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर दिला. या सर्व काळात हिंदुत्वाला राजकीय क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळू लागले होते.
गुजरातेत भाजपा 1998मध्ये पुन्हा सत्तेत आला खरा; मात्र पक्षात गटबाजी होती आणि पक्षासमोर आव्हान उभे होते. अशा वेळी 2001 मध्ये पक्षाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री करण्याचा. संघप्रचारक म्हणून केलेले काम; पक्ष संघटनेत बजावलेली भूमिका हे सगळे आश्वासक असले तरी मुख्यमंत्री म्हणून असणार्या जबाबदार्या अगदी भिन्न असतात हे एक; आणि दुसरे म्हणजे त्या जबाबदार्यांची व्यापकता देखील विस्तृत असते. सरकार हे केवळ मंत्र्यांमुळे चालत नसते; ते प्रशासनावर चालते. प्रशासन कार्यक्षम असले तर सरकार कार्यक्षम असल्याची ती खूण समजली जाते. मात्र प्रशासनावर राजकीय व्यवस्थेची मांड असणे निकडीचे असते. अन्यथा मंत्र्यांचा इरादा कितीही नेक असला पण प्रशासन ढिसाळ असले तर सरकारची प्रतिमा मलीन होते. याचाच अर्थ प्रशासनाची कार्यसंस्कृती बदलणे आणि ती जनतानुकूल करणे हा कोणत्याही सरकारची कार्यक्षमता जोखण्याचा निकष असतो. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून दायित्व स्वीकारले तेव्हा त्यांना प्रशासकीय अनुभव नव्हता. त्यामुळे अनेक जण त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीला ते न्याय देऊ शकतील किंवा नाही याबाबत साशंक होते.

संघाच्या मूल्यांचे कोंदण
मात्र येथे पुन्हा संघसंस्कारच कामी आले. प्रशासन हे स्वयंप्रेरित क्वचितच असते. पण व्यक्तीकडून व्यवस्थासुद्धा हे जे रंगा हरी यांनी म्हटले होते त्याचा प्रत्यय मोदींनी मुख्यमंत्री म्हणून त्या राज्यालाच नव्हे तर देशाला दिला. येथे स्वतः मोदींनी ’ज्योतिपुंज’ पुस्तकात गोळवलकर गुरुजींच्याबद्दल लिहिलेल्या एका आठवणीचा उल्लेख अस्थानी ठरणार नाही. मोदी लिहितात: ’एका डॉक्टरने गुरुजींना विचारले की या दक्ष-आरम-खङग-कब्बडीमधून भव्य काम कसे उभे राहणार?’ गुरुजींनी हसून त्या डॉक्टरांना प्रश्न केला की,‘ तुमच्या अलोपॅथीत सर्वांत परिणामकारक औषध कोणते?’ त्यावर डॉक्टरांनी ‘पेनिसिलीन’ हे उत्तर दिले. तेव्हा गुरुजींनी विचारले की, ‘हे कसे बनते?’ तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितले की, ‘एका दुर्गंध असणार्या पदार्थापासून हे बनते; हा दुर्गंध इतका असतो की कोणालाही तो घेणे पसंत पडणार नाही.’ तेव्हा तोच धागा पकडत गुरुजी म्हणाले की, ‘अगदी निरुपयोगी वस्तूदेखील सक्षम व समर्थ हातांत गेली तर ती उपयुक्त ठरू शकते. याचा अर्थ अगदी निकृष्ट गोष्ट देखील तज्ज्ञांच्या हातात पडली तर ती अगदी परिणामकारक ठरते असा नाही काय?’ त्यावर डॉक्टरांनी होकार भरला तेव्हा गुरुजी म्हणाले की, ‘आम्ही संघटन कार्यातील तज्ज्ञ आहोत’.
अशा प्रसंगांच्या वेळी आपण स्वतः तेथे हजर असायलाच हवे असे नाही. मात्र असे प्रसंग वाचून-ऐकून देखील प्रेरित होता येते याचे उदाहरण म्हणजे मोदींनी प्रशासकीय अनुभव नसताना मुख्यमंत्री म्हणून बजावलेली भूमिका. त्यांनी गुजरातचा कायापालट करून दाखविला आणि गुजरात प्रारूपाने देशाला भुरळ पाडली. गोध्रा हत्याकांडानंतर मोदींची प्रतिमा मलीन करण्यासाठी काँग्रेस, डावे आणि सेक्युलरवादी यांनी एकही संधी सोडली नाही. मात्र गुजरातच्या जनतेने मोदींवरील विश्वास ढळू दिला नाही. सरकारचे प्रमुख म्हणून मोदींनी जे काम उभे केले त्यामागे संघसंस्कारांतील संघटनशास्त्र कळीचे होते. अर्थात संघटन म्हणजे तरी शेवटी काय असते? समाजाच्या सर्व घटकांबद्दल समान आपुलकी, आस्था हा त्याचा गाभा असतो. संघाने हिंदू समाजाचे संघटन करण्याचे व्रत घेतले आहे. त्याचाच कित्ता मोदींनी मुख्यमंत्री म्हणून गिरविला. त्यांच्यामधील संघटन कौशल्याचा परिचय पक्षाला लालकृष्ण अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेच्या आणि नंतर डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्या एकता यात्रेच्या वेळी आला होताच. मुख्यमंत्री म्हणून त्याचा परिचय देशाला अधिक झाला.
या सगळ्यात संघसंस्कारांतून आलेली आणखी एक बाब म्हणजे निर्धार आणि कितीही विरोध झाला तरी निराश न होता पुढे जात राहण्याची जिद्द. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर विरोधकांनी टोकाची गरळ ओकली. स्वातंत्र्यानंतर संघावर देखील तीनदा बंदी आली होती. पण बंदी उठल्यावर संघाने ‘माफ करा आणि विसरून जा’ (फर्गिव्ह अँड फर्गेट) अशी भूमिका घेतली. मोदींनीदेखील आपल्यावरील टोकाच्या आरोपांना उत्तर देण्यात वेळ दवडला नाही. कारण अशा स्पष्टीकरणांचा त्यावेळी काहीही उपयोग नसतो; उलट अकारणच बचावात्मक पवित्रा घेतला गेल्याचे चित्र निर्माण होते. त्याऐवजी आपण निर्धारित केलेल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे जात राहणे आणि व्यापक समाजाच्या विश्वासाचे धनी होणे हे जास्त दूरगामी परिणाम साधणारे असते. मोदींनी तोच मार्ग स्वीकारला. अर्थात हेही संघसंस्कारांतूनच आले आहे हे नाकारता येणार नाही.
संघविचारांशी सुसंगत कारभार
पंतप्रधान झाल्यावर मोदींनी भारतीय राजकारणाचे व्याकरणच बदलून टाकले हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. संघाने नेहमीच स्वदेशीबरोबरच विश्वबंधुत्व या संकल्पनांचा पुरस्कार केला आहे. या दोन परस्परविसंगत कल्पना वाटत असल्या तरी त्या परस्परपूरक संकल्पना आहेत अशी संघाची धारणा आहे. याचे कारण राष्ट्र म्हणून असणारे अस्तित्व जेव्हा मान्य केले जाते तेव्हा त्या राष्ट्राच्या हिताच्या बाबींना प्राधान्य मिळणे सयुक्तिक. तथापि सर्वच राष्ट्रांनी परस्परसहकार्य केले तर विश्वबंधुत्व देखील मूळ धरेल हा संघविचार आहे. मोदींनी पंतप्रधान म्हणून आपल्या कार्यकाळात जे परराष्ट्र धोरण विचारपूर्वक राबवले त्यात याचे प्रतिबिंब दिसते. आज अनेक राष्ट्रांशी भारताचे जे सौहार्दाचे नाते तयार झाले आहे त्यातून विश्वबंधुत्वाची संकल्पना रूजत असल्याचे प्रत्ययाला येते. सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी दिल्लीतील व्याख्यानमालेत त्याचा उल्लेखही केला. मोदींनी पंतप्रधान झाल्यावर तोच मंत्र जपला असल्याचे आढळेल. राष्ट्र प्रथम हे केवळ शब्द न राहता आपले आचरण आणि आपले कार्य हे त्याच्याशी सुसंगत असावे अशी संघ धारणा; पंतप्रधानपद म्हणजे देशाच्या कारभाराचे सर्वोच्च पद. त्याचा उपयोग मोदींनी संघविचार धोरण कृतीत उतरविण्यासाठी चोख केल्याचे दिसेल. दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानवतावादाची संकल्पना मांडली. त्यात त्यांनी अंत्योदय ही कल्पना मांडली. त्याचा अर्थ अगदी तळागाळातील सर्वसामान्य माणसांचेही कल्याण. आर्थिक नियोजन व आर्थिक विकास यांचे यश सामाजिक शिडीच्या वरच्या बाजूला असणार्यांच्या नव्हे तर तळाशी असलेल्यांच्या स्थितीवरून मोजले जाईल असे प्रतिपादन उपाध्याय यांनी केले होते. मोदींनी 2014मध्ये प्रथम केंद्रात सत्तेत आल्यानंतर ज्या योजना सुरू केल्या त्या उपाध्याय यांच्या विचारांशी सुसंगत आहेत. मुळात ‘सब का साथ, सब का विकास’ या नार्याचे बीजच मुळी उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेत आहे. एकीकडे देशभर भाजपाचा विस्तार होत असताना, केंद्रातच नव्हे तर राज्या-राज्यांत भाजपाला अभूतपूर्व विजय मिळत असताना, राष्ट्रपतिपदापासून अगदी एखाद्या शहराच्या महापौरपदापर्यंत सर्व स्तरांवर भाजपाचे उमेदवार विजयी होत असताना देखील सत्तेचे प्रयोजन काय याचा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विसर पडलेला नाही. विरोधक यातही संघविचार आणला म्हणून मोदींवर टीका करतात. तथापि जनतेचे कल्याण हा संघ विचार असेल तर तो कारभारात आणला तर बिघडले कुठे?
सरकारी तिजोरीतून एक रुपया खर्च होतो तेव्हा प्रत्यक्षात सामान्य माणसापर्यंत केवळ पंधरा पैसेच पोचतात, असे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी म्हटले होते. तो एकीकडे प्रांजळपणा मात्र दुसरीकडे त्यावर कोणताही उपाय योजता आला नाही ही अगतिकता देखील त्यातून डोकावते. मोदींनी पंतप्रधान झाल्यावर ज्या योजना सुरू केल्या त्यांचा केंद्रबिंदू सर्वसामान्य नागरिक हाच होता. त्यामुळे त्या घोषणांत वरकरणी भव्यदिव्य काही नव्हते मात्र त्या योजनांचे परिणाम मात्र सर्व स्तरापर्यंत पोचणारे होते. इंदिरा गांधी यांनी 1970 च्या दशकात बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. हेतू हा की, गरिबांना या सुविधा मिळाव्यात आणि त्याने त्यांच्या आयुष्यात बदल व्हावेत. पण मोदींनी जनधन योजना सुरू केल्यानंतर लाखोंच्या संख्येने खाती उघडली गेली. इंदिरा गांधींनी घेतलेला निर्णय कदाचित योग्य असेल; पण अंमलबजावणीच्या बाबतीत त्या सरकारला यश आले नाही. राजीव गांधी तक्रार करून थांबले; पण शासकीय मदत थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याच्या दृष्टीने याच जनधन खात्यांचा उपयोग झाला. तक्रार करणे हा एक भाग झाला; पण त्यावर प्रभावी उपाय योजणे हे खरे सत्ताधीशाचे कर्तव्य व लक्षण. स्वच्छ भारत योजना असो किंवा गरिबांसाठी गॅस कनेक्शन देण्याची उज्ज्वला योजना असो; अथवा दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना असो; या सर्वांचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस हाच होय. उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेचे याहून दुसरे मनोहारी रूप कोणते? किफायतशीर घरे, स्वस्त औषधे, मोफत वैद्यकीय उपचार, शेतकर्यांना पुरविण्यात येणारे कडुनिंबाचे आवरण असणारे युरिया खत अशा अनेकानेक योजना मोदींनी राबविल्या. या योजनांचे कोट्यवधी लाभार्थी देशभर आहेत. मात्र केवळ मदत म्हणजेच अंत्योदय संकल्पना नव्हे. मोदींनी त्या संकल्पनेचा अर्थ अधिक व्यापक केलेला दिसेल. तो म्हणजे पद्म पुरस्करांमध्ये मोदी सरकारने आमूलाग्र बदल केले. ज्यांचे कार्य मूलभूत आहे पण ज्यांना प्रसिद्धी नाही अशा कर्तृत्ववानांना हुडकून त्यांचा समावेश पद्म पुरस्कारार्थींमध्ये करण्यात येऊ लागला. हा बदल सामान्यांना हरखून टाकणारा आणि प्रेरणा देणारा होता यात शंका नाही. नेतृत्वाने केवळ निर्णय घ्यायचे नसतात; केवळ धोरणे राबवायची नसतात; लोकांना प्रेरितही करायचे असते.
हिंदुत्वाच्या विषयांना हात
लोककल्याण हा आपल्या कारभाराचा गाभा बनवतानाच खास संघाचे किंवा व्यापक अर्थाने हिंदुत्वाचे जे विषय होते व आहेत त्यांनाही मोदींनी हात घातला. संघाने हिंदूंचे संघटन हेच आपले ध्येय मानले. मात्र मुळात हे संघटन का आवश्यक याविषयी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांची काही भूमिका होती. ती म्हणजे हिंदू समाज आत्मविस्मृत झाला आहे. त्याच्या गौरवशाली भूतकाळाचा त्याला विसर पडला आहे आणि त्यामुळे ओज, तेज यांचे हिंदू समाजाला विस्मरण झाले आहे. परिणामतः हिंदू अस्मितेवर कोणीही हल्ला चढवतो आणि हिंदू समाजाचा तेजोभंग करतो. आणि हिंदू समाज हतबल होऊन पाहत राहतो. त्यामुळेच संघाने नेहमीच हिंदू समाजाच्या मानबिंदूंचे मुद्दे उपस्थित केले; तद्वत भारतीयीकरणाला देखील प्रोत्साहन दिले. अयोध्येत पाचशे वर्षांपासून राममंदिराच्या जागी बाबरी ढांचा उभा होता. 1992 मध्ये बाबरी ढांचा जरी कारसेवकांनी पाडला तरी तेथे भव्य राममंदिर उभे राहिलेले नव्हते. अखेरीस 2024च्या जानेवारी महिन्यात त्या मंदिराचे लोकार्पण झाले. मोदी 2014 मध्ये प्रथम पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून अयोध्या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू होता. संघ परिवाराने आणि व्यापक अर्थाने हिंदू समाजाने अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न 2024मध्ये मोदी पंतप्रधान असताना पूर्ण झाले. तीच बाब जम्मू-काश्मीरला लागू असणार्या 370 व्या कलमाची. संघाने नेहमीच या कलमाचा विरोध केला; डॉ. मुखर्जी यांनी तर त्याचा विरोध करताना बलिदान दिले. मोदी दुसर्यांदा 2019मध्ये सत्तेत आल्यानंतर काहीच महिन्यांत संसदेत हे कलम रद्दबातल ठरविणारे विधेयक संमत झाले. राजीव गांधी यांनी शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरविण्यासाठी संसदेत आपल्या पक्षाच्या बहुमताचा वापर केला होता. तो मुख्यतः मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानाची बेगमी करण्यासाठी. पण त्यात मुस्लीम महिलांच्या हिताकडे पूर्णपणे कानाडोळा करण्यात आला होता; किंबहुना मुस्लीम महिलांवर तो अन्यायच होता. मोदी यांनी अगदी वेगळा विचार केला. तिहेरी तलाक रद्द करणारा कायदा आणून त्यांनी मुस्लीम महिलांना दिलासा दिला. कट्टरवादी या निर्णयाने संतापले; परंतु मुस्लीम महिलांनी मात्र समाधान व आनंद व्यक्त केला.
तीच बाब वक्फ सुधारणा कायद्याची; तीच बाब नागरिकत्व विधेयकाची आणि तीच बाब भारतीय न्याय संहितेची. त्यात भारतीयीकरण हे ध्येय आणि सर्वसामान्य नागरिकाचे कल्याण हा ध्यास. संसदेत सेंगोलची स्थापना मोदींनी केली; काशी-तामिळ संगममची सुरुवात केली; अभ्यासक्रमांत भारतीय ज्ञानपरंपरेचा (इंडियन नॉलेज सिस्टीम) अंतर्भाव केला, आंतरराष्ट्रीय योगदिनाची सुरुवात केली. भारतीय म्हणून काही न्यूनगंड असावा अशा वातावणाचे रूपांतर मोदींनी आपल्या परीने आणि पद्धतीने भारतीय परंपरांच्या गौरवाच्या भावनेत केले. या सगळ्यामागे संघविचारांची मूस होती हे विसरता येणार नाही. संघाने राष्ट्राला परमवैभवाला नेण्याची प्रतिज्ञा केली आहे. हे परमवैभव म्हणजे केवळ आर्थिक नव्हे. सामरिकदृष्टया देखील भारत अजिंक्य असावा; तो स्वावलंबी असावा; ही त्यामागील कल्पना. मोदी यांच्या कार्यकाळात त्याचेही प्रतिबिंब उमटलेले दिसेल. संरक्षण सामग्री उत्पादनात भारताने घोडदौड केली आहेच; पण भारत आता निर्यातदार देश झाला आहे. भारतात विकसित संरक्षण प्रणालींना अनेक देशांतून मागणी होत आहे हे त्याचे एक उदाहरण.
अनुपम योगायोग
देशात चैतन्याचे वातावरण आहे. संघाचे शताब्दी वर्ष सुरू होत असताना संघविचार आता देशभर रुजला आहे ही कल्पनाही संघ कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांना मोहरून टाकणारी आहे. गेल्या शंभर वर्षांत संघाने उपेक्षा झेलली; विरोध पचवला, उपहास सहन केला, विरोधकांची राजकीय वक्रदृष्टी सोसली. मोदी पंचाहत्तरीचे होत असताना मुख्यतः राजकीय जीवनात त्यांनीही हाच अनुभव गेल्या तीनेक दशकांत घेतला. आता मात्र मोदी हाच एक राजकीय ब्रँड झाला आहे हे त्यांचे प्रामाणिक विरोधकही मान्य करतील. संघटनेची शताब्दी आणि त्या संघटनेचा विचार घेऊन तो राजकीय जीवनात प्रस्थापित करण्यासाठी झटणार्या राजकीय नेतृत्वाची पंच्याहत्तरी हा अनुपम योगायोग आहे. संघ विचारांनी केवळ प्रेरित नव्हे तर त्या विचारांत पूर्णपणे रुजलेले राष्ट्रनेता म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी असे त्यांचे लक्षावधी चाहते मानतात ते उगाच नव्हे!