
आपला भारत देश प्राचीन आहे, त्याची संस्कृती आणि तत्त्वज्ञान अतिशय उच्च आहे. एवढे सगळे भांडवल असताना इस्लाम आणि इंग्रजांनी आपल्यावर त्यांची सत्ता लादली. या गंभीर प्रश्नाचे उत्तर भारतातील अनेक थोर पुरूषांनी आपापल्या परिने शोधले. परंतु यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदू समाजाचे चिरकालिक संघटन उभे राहू शकत नाही. त्यासाठी वेगळा मार्ग शोधला पाहिजे. प्रत्येकाचे ऋण मान्य करून त्यातील सत्यांशांचा स्वीकार करून एक नवीन रचना उभी केली पाहिजे. याचे प्रदीर्घ चिंतन डॉ. हेडगेवारांनी केले. आपल्या सनातन भाषेत सांगायचे तर त्यांनी तपस्या केली. या तपस्येपूर्तीतून त्यांनी हिंदू समाज संघटनेसाठी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ सुरू केला. समाज संघटनेच्या संदर्भातील हा त्यांचा कालसापेक्ष, स्वतंत्र आणि अतिशय प्रतिभासंपन्न प्रयोग होता. आज या प्रयोगाला शंभर वर्षे झाली म्हणून त्याला प्रयोग न म्हणता समाज संघटनेचे सिद्धतंत्र या शब्दात त्याचा उल्लेख करावा लागेल. याच विषयाचा मागोवा घेण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे यांच्या सिद्धहस्त लेखणीने भारतीय विचार साधना प्रकाशित ‘भारतीय संघटनेचा वारसा आणि संघ’ हे आगामी पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. लेख स्वरूपात त्याच पुस्तकातील एक प्रकरण येथे देत आहोत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात 1925 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. भगवान गौतम बुद्ध, गोरखनाथ, गुरु नानक, महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या मागे एक वलय होते. डॉ. हेडगेवार हे वलयांकित नेता नाहीत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ सुरू करण्यापूर्वी अखिल भारतीय स्तरावर ते विख्यात होते, असेही नाही. त्यांच्या चरित्रात आपण वाचतो की ते जन्मजात देशभक्त होते. शालेय विद्यार्थी असताना त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या सुवर्णमहोत्सवी राज्यारोहणानिमित्त दिलेला खाऊचा पुडा फेकून दिला होता. वैद्यकीय शिक्षण घेत असताना क्रांतिकारकांच्या चळवळीत ते सहभागी झाले होते. राष्ट्रीय काँग्रेसचे मध्य भारत प्रांताचे ते पदाधिकारी होते. काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनाच्या स्वंयसेवक दलाची व्यवस्था त्यांनी केली. याचा एवढाच अर्थ होतो की त्या वेळी चालू असणार्या सार्वजनिक जीवनात ते सक्रिय होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना जमेल त्या मार्गाने ते प्रयत्न करीत होते.
मग प्रश्न असा निर्माण होतो की कुठल्याही एका मार्गाने ते पुढे का गेले नाहीत? क्रांतिकारकांच्या चळवळीतून ते बाहेर पडले. काँग्रेसचे ते सक्रीय कार्यकर्ते राहिले नाहीत. समाज सुधारणांच्या कोणत्याही चळवळीत ते पुढे गेले नाहीत. याची कारणे काय? याचे कारण असे की, एक मूलभूत प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत राहिला. तो प्रश्न असा की आपण पारतंत्र्यात का गेलो? आपला देश प्राचीन आहे, जनसंख्या अफाट आहे. आपला स्वतंत्र धर्म आहे. आपले तत्त्वज्ञान अतिशय उच्च आहे आणि संस्कृतीदेखील तेवढीच उच्च आहे. एवढे सगळे भांडवल असताना अगोदर इस्लामची राजवट, नंतर इंग्रजांची राजवट आपल्यावर का आली?
हा प्रश्न त्यांना एकट्याला पडला होता असे समजण्याचे कारण नाही. इंग्रजी राजवटीने आणि इंग्रजी शिक्षणाने जी नवजागृतीची लाट निर्माण झाली त्या सर्वांना पडलेला हा प्रश्न आहे आणि प्रत्येकाने आपापल्या परिने त्याचे उत्तर शोधून मार्गक्रमण केलेले आहे. राजा राममोहन राय यांना असे वाटले की आपण अनेकेश्वरवादी आहोत हे आपल्या पतनाचे कारण आहे. म्हणून त्यांनी एकेश्वरी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाज हे त्याचे दुसरे रूप होय. महर्षी दयानंद सरस्वती यांना असे वाटले की, आपले मूळ ग्रंथ वेद आहेत. त्या वेदाचा विसर पडल्यामुळे अधोगती झाली. स्वामी विवेकानंदाना वाटले की, आपण वेदांत जगायला शिकलो नाही हे आपल्या अध:पतनाचे कारण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाटले की, हिंदू समाजाने आपल्या पायात सात प्रकारच्या बेड्या घालून घेतल्या आहेत. आपले हे हिंदुराष्ट्र आहे. हिंदूूंनी संघटित झाले पाहिजे, बुद्धिनिष्ठ झाले पाहिजे, विज्ञाननिष्ठ झाले पाहिजे, तरच जागतिक संघर्षात आपण टिकू. हिंदूचे सैनिकीकरण देखील झाले पाहिजे. ते शस्त्रधारी झाले पाहिजेत असाही विचार त्यांनी मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध:पतनाची मीमांसा करताना चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था व त्यातून निर्माण झालेल्या क्रमिक विषमतेवर आधारित समाजरचना आणि अस्पृश्यता या गोष्टी आपल्या र्हासाचे कारण आहेत, असे मांडले. महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा याचा समाजाला विसर पडला असून सामान्य माणूस अत्यंत दुर्बळ झाला आहे, त्याला निर्भय केलं पाहिजे, अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध सविनय कायदेभंग करून त्याचा प्रतिकार केला पाहिजे, अशी मीमांसा केली.
महात्मा गांधी, सावरकर, डॉ.आबेडकर हे सर्व महापुरुष डॉ. हेडगेवारांचे समकालीन आहेत. या प्रत्येक चळवळीचा डॉक्टरांना परिचय होता. यापैकी कोणाचेही अनुसरण त्यांनी केलेले नाही. यातील प्रत्येकजण सत्य सांगत होता. त्यामुळे त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. परंतु डॉक्टरांना असे वाटले की यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदू समाजाचे चिरकालिक संघटन उभे राहू शकत नाही. त्यासाठी वेगळा मार्ग शोधला पाहिजे. प्रत्येकाचे ऋण मान्य करून त्यातील सत्यांशांचा स्वीकार करून एक नवीन रचना उभी केली पाहिजे. याचे प्रदीर्घ चिंतन त्यांनी केले. आपल्या सनातन भाषेत सांगायचे तर त्यांनी तपस्या केली आणि त्यातून त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले त्याची थोडक्यात मांडणी अशी करता येते.
हे ज्ञान अनुभूत ज्ञान आहे. म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही. या अनुभूत ज्ञानाचे बिंदू असे -
* हे हिंदुराष्ट्र आहे
* हिंदू समाज हा राष्ट्रीय समाज आहे.
* धर्म हा राष्ट्राचा आत्मा आहे
* या धर्माची कालसापेक्ष मांडणी झाली पाहिजे.
* हिंदू राष्ट्राचा राष्ट्रीय हिंदू समाज हा असंघटित आहे. हजारो जाती, पंथ यात विखुरला आहे.
* प्रत्येकाला आपल्या छोट्या अस्मिता अतिशय महत्त्वाच्या वाटतात.
* हिंदू समाजातील व्यक्ती कमालीची आत्मकेंद्री आणि स्वार्थी झालेली आहे. मी, माझा परिवार, माझी जात, माझा पंथ यापलीकडे तो कशाचा विचार करीत नाही.
* सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्याचे त्याला विस्मरण झाले आहे.
* आत्मविस्मृती हा समाजाला जडलेला मोठा रोग आहे.
* समाजाचे पुनरुत्थान करायचे असेल तर त्याचे आत्मभान जागृत केले पाहिजे, आपण कोण आहोत, आपला वारसा कोणता, आपला धर्म काय सांगतो, आपले राष्ट्रीय दायित्व कोणते हे त्याला शिकविले पाहिजे.
* समाज जागृत करण्याचे हे कार्य सभा घेऊन, भाषणे करून, लेख आणि पुस्तके लिहून, आंदोलने करून होणारे नाही.
* या मार्गाने तात्कालिक जागृती होते, तिचा प्रभाव अल्पकाळासाठी असतो. पुन्हा लोक आपल्या व्यक्तिगत, जातिगत स्वार्थात मग्न होतात.
हे साध्य करण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी संघ शाखापद्धती सुरू केली. समाज संघटनेच्या संदर्भातील हा त्यांचा कालसापेक्ष, स्वतंत्र
आणि अतिशय प्रतिभासंपन्न प्रयोग होता. आज या प्रयोगाला शंभर वर्षे झाली म्हणून त्याला प्रयोग न म्हणता समाज संघटनेचे सिद्धतंत्र या शब्दात त्याचा उल्लेख करावा लागेल.
डॉ. हेडगेवारांना कालसापेक्ष धर्माची मांडणी करायची होती. कालसापेक्ष धर्माची मांडणी करण्याचा आपला प्रवास हजारो वर्षांचा आहे. प्रथम उपनिषदकर्त्यांनी ती केली. एक भव्य तत्त्वज्ञान आपल्या समोर मांडले. नंतर भगवान गौतम बुद्धांनी केली. त्या वेळच्या भारताच्या फार मोठ्या भागात त्यांच्या धर्म विचारांचा प्रचार झाला, आणि जनजीवन धर्ममार्गी झाले. कालांतराने आणि निसर्गन्यायाने निर्माण केलेल्या व्यवस्था क्षीण होतात, त्यात दोष शिरतात. त्याचे पुनर्घटन करावे लागले. हे कार्य गोरखनाथ आणि नाथ संप्रदायाने दहाव्या शतकापासून केले. धर्माची कालसापेक्ष मांडणी करण्याचे कार्य गुरू नानकदेव यांनी शीखपंथ निर्माण करून केले. महर्षी दयानंदांनी आर्य समाजाची स्थापना करून केले. स्वामी विवेकानंद यांनी कालसापेक्ष धर्म रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून समाजात नेण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांनी एकादश व्रताच्या माध्यमातून साधी राहणी, उच्च विचारसरणी, अहिंसा, निर्भयता समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकारांनी विज्ञाननिष्ठ व बुद्धिप्रामाण्यवादी धर्मविचार मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रज्ञा, करुणा, शील, मैत्री या संकल्पनांद्वारे धर्मजागरण करण्याचा प्रयत्न केला. धर्माला डावलून कुणीही काम केलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत की, धर्मक्रांती झाल्याशिवाय समाजक्रांती होत नाही.
धर्म समजून घेणे ही भारत समजून घेण्याची पूर्वअट आहे. धर्म सोडून केलेल्या कोणत्याही चळवळी भारतात यशस्वी होत नाहीत आणि होणारही नाहीत. साम्यवादी चळवळ हे त्याचे मोठे उदाहरण आहे.
धर्म विचारांची कालसापेक्ष मांडणी करत असतात. डॉ. हेडगेवारांचे नेमके योगदान कोणते याचा विचार केला पाहिजे. रुढार्थाने ते धर्मगुरू नव्हते. धर्म या विषयावर त्यांनी प्रवचने दिलेली नाहीत. धर्माच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा त्यांनी प्रचार केला नाही. तसेच कोणतेही नवीन तत्त्वज्ञान शोधून काढले नाही. ते म्हणत असत की, ‘मी काही नवीन सांगत नाही.’ आपला सनातन हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती याचे रक्षण आपण केले पाहिजे आणि त्यासाठी संघाटित झाले पाहिजे. ‘मी’पणातून बाहेर पडून ‘आम्ही’पणात येता आले पाहिजे.
व्यक्तिधर्म, समाजधर्म, राष्ट्रधर्म अशी धर्माची रूपे आहेत. डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रधर्माला सर्वाधिक महत्त्व दिले. व्यक्तिगत धर्म हा व्यक्तिगत मोक्ष आणि सुखप्राप्तीसाठी असतो. या मार्गाने वाटचाल करताना मी कोण, मी मरणधर्मी आहे की अविनाशी आहे. मी अविनाशी असेन तर ते तत्त्व कोणते? त्या तत्त्वाची मी अनुभूती घेऊ शकतो का? ती कशी घेता येईल? त्याचा मार्ग कोणता? याची वाट दाखवणारे अनेक पंथ आहेत ते कालही होते. आजही आहेत. आणि उद्याही राहतील. जेव्हा आपल्या देशात प्रंचड समृद्धी होती, परकीय आक्रमणापासून आपण मुक्त होतो त्या काळात मानवी जीवनाचा उद्देश कोणता याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. श्रमण आणि ब्राह्मण परंपरा निर्माण झाली. या परंपरेने ‘स्व’चा शोध घेण्याचा शेकडो वर्षे प्रयत्न केला आहे.
या मार्गाचा एक दोष असा की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सुखाचा विचार करू लागतो. व्यक्ती हा समाजाचा घटक असतो. समाजाशिवाय व्यक्तीच्या अस्तित्वाला काही अर्थ राहत नाही. जीवसृष्टीतील मनुष्य हा सर्वाधिक पराधीन प्राणी आहे. समाज सुव्यवस्थित राहिला तर व्यक्ती सुरक्षित राहते. या समाजधर्माचे विस्मरण होणे घातक असते. समाजधर्माचे जागरण, अफाट कार्य करण्याचे काम सर्वप्रथम भगवान गौतम बुद्धांनी केले. समाजधर्मातून विषय पुढे आले की गरजेपेक्षा जास्त संग्रह करू नका. अतिरिक्त धनाचे दान करा. समाजातील दीनदुबळ्या लोकांची चिंता करा. मनुष्य सेवा हाच सर्वात्मक धर्म आहे. या सेवेतून तुम्हाला मुक्ती मिळेल. त्यासाठी व्यक्तिगत ध्यान, धारणा, समाधी लावण्याची गरज नाही. स्वतःला दुसर्यात पाहायला शिका. मनुष्य जीवनात सुखदु:खाच्या भावना समान असतात. दुःख निर्माण करणारे विषय टाकले पाहिजेत आणि सुखाची अभिवृद्धी होईल या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे.
समाजधर्मानंतरची पुढची पायरी राष्ट्रधर्माची असते. भगवान गौतम बुद्धांच्या काळात आणि मध्ययुगातदेखील राष्ट्रधर्माची संकल्पना क्षीण होती. वेदवाङ्मयात ‘राष्ट्र’ शब्द येतो. आमचे राष्ट्र तेजस्वी, ओजस्वी, बलवान होवो. आमच्या शत्रूचा विनाश होवो अशा प्रार्थनादेखील आहेत. 17 व्या/18 व्या शतकापासून उदयास आलेल्या राष्ट्र या संकल्पनांचे धागेदोरे वेदवाङ्मयात सापडतात. एवढाच त्याचा ऐतिहासिक अर्थ केला पाहिजे. आधुनिक काळातील राष्ट्र संकल्पना ही वेदकाळातील राष्ट्र संकल्पनेपेक्षा खूप पुढे गेलेली आहे.
एका विशिष्ट भूमीवर राहणारा जनसमुदाय. या जनसमुदायांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या एकत्र बांधून ठेवणारे बंध यातून राष्ट्र निर्माण होते. हे राष्ट्र, राष्ट्रीय भावना निर्माण करते या भावनेची वैशिष्ट्ये अशी.
* पराकोटीची भूमीनिष्ठा, जी मातृभूमी, पितृभूमी या शब्दातून व्यक्त होते.
* समान जीवनमूल्ये
* समान इतिहास
* समान शत्रुमित्र भावना
* समान जीवनादर्श
* इतर मानवी समूहापासून वेगळेपण व्यक्त करणारी तीव्र भावना.
* समान आकांक्षा
हे सर्व राष्ट्रीयत्वाचे घटक असतात. या घटकांचे अवमूल्यन आणि विस्मरण झाले असताना त्याचे पुन:जागरण करण्यासाठी केला जाणारा कर्मयोग याचे दुसरे नाव राष्ट्रधर्म असे आहे. डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रधर्म जागृतीचे कार्य हे संघाचे प्रमुख कार्य मानले. ‘धर्मो रक्षति रक्षितः’ असे आपले एक महावाक्य आहे. त्याचा आजच्या काळातील कालसापेक्ष अर्थ होतो,‘धर्माचे रक्षण करा, धर्म तुमचे रक्षण करील.’ हा धर्म कोणता तर राष्ट्रधर्म. या राष्ट्रधर्माचे रक्षण करा. म्हणजे तो धर्म आपले रक्षण करील.
राष्ट्रधर्माचे रक्षण करायचे म्हणजे काय करायचे? त्याचे सोपे उत्तर असे आहे. राष्ट्रधर्म जगायचा. राष्ट्रधर्म जगण्याची मुख्य अंगे अशी सांगता येतील.
* आपला धर्म हे सांगतो की आपण एका चैतन्याची विविध रूपे आहोत.
* एका चैतन्याची विविध रूपे असल्यामुळे रूपात विविधता राहणार, पण मूळ स्वरूपात भेद असू शकत नाही.
* म्हणून जाती आणि पंथभेद यांना तत्त्वतः कोणताही अर्थ नाही.
* आपला धर्म हे सांगतो की सत्य एकच आहे. हे सत्य विविध रूपात दिसते.
* सत्याकडे जाणारे सर्व मार्ग सत्यमार्ग आहेत. त्यात उजवे-डावे करणे योग्य नाही.
* आपला धर्म हे सांगतो की प्रत्येकाला त्यांच्या रुचीप्रमाणे सत्याचा मार्ग स्वीकारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
* या स्वातंत्र्यात विचार, अभिव्यक्ती, संचार, संघटन अशी सर्व स्वातंत्र्ये येतात. ही आपली प्राचीन परंपरा आहे.
* आपली म्हणून एक जीवनपद्धती आहे. तिला हिंदू जीवनपद्धती म्हणतात. ही पद्धती आपल्याला सर्व चराचर सृष्टीत एक तत्त्व पाहण्यास शिकविते.
* या एक तत्त्वामुळे जीव हिंसा निषिद्ध मानली गेली आहे. वनस्पतीतही जीव असल्यामुळे वनस्पतींचे संवर्धन पवित्र मानले गेले आहे.
राष्ट्रधर्म याचा अर्थ वर दिलेली सर्व सूत्रे जीवनात जगणे होय. त्यावर केवळ भाषण, लेखन करून काही उपयोग नाही. डॉ. हेडगेवार सांगत असत की जी तत्त्वे आचरणात आणता येत नाहीत ती वांझ समजली पाहिजेत. तत्त्वविचार जगण्यासाठी असतो. स्वामी विवेकानंद म्हणत की माणसाला उन्नत करण्याइतका श्रेष्ठ हिंदू धर्मासारखा दुसरा धर्म नाही आणि माणसाला चिरडून टाकण्याइतका वाईट हिंदू धर्मासारखा दुसरा धर्म नाही. हा विरोधाभास झाला. त्याचा अर्थ असा की आपली तत्त्वे आपण ग्रंथात ठेवतो आणि व्यवहारात जातिगत विषमता आणि अस्पृश्यतेचे पालन करतो. म्हणजे अधर्म करीत असतो. डॉ. बाबासाहेब देखील म्हणत की वेद उपनिषदांतील उदात्त तत्त्वाचे पालन हिंदू समाज करीत नाही. पालन करण्याचे धैर्य त्याच्यात नाही, सर्व माणसे ईश्वराची रूपे आहेत असे तो म्हणणार आणि व्यवहारात विषमता व अस्पृश्यतेचे पालन करणार.
हा राष्ट्रधर्म हिंदू माणसांच्या रोजच्या जीवनात दिसला पाहिजे. यासाठी काय करायला पाहिजे याचा कालसापेक्ष विचार डॉ. हेडगेवारांनी केला. दैनदिन संस्कार देणारी शाखा त्यांनी सुरू केली.ही शाखा हिंदुसाठी सुरू केली. पंडितांना हिंदू शब्दाच्या व्याख्या लागतात. डॉ. हेडगेवार पंडित नव्हते. द्रष्टे महापुरुष होते. त्यांनी हिंदू शब्दाची व्याख्या केली नाही. ज्यांना आपण हिंदू मानतो ते सर्व हिंदू हे सूत्र धरून शाखाकार्यांना प्रारंभ झाला. डॉ. हेडगेवारांनी एक सूत्र सांगितले की आपल्याला समग्र हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे. समग्र या एका शब्दात चारी वर्ण, हजारो जाती, तथाकथित अस्पृश्य समाज, वनवासी समाज असे सगळे बांधव येतात. संघटनेचा पहिला मंत्र सर्वसमावेशकता हा राहिला. कुणालाही वगळायचे नाही. सगळेच आपले आहेत. सगळे त्यांच्या गुणदोषांसहित आपले आहेत. अशा सर्वांचे संघटन करायचे.
हिंदू समाज हा देशव्यापी आहे. डॉ. हेडगेवारांच्या काळात त्याची व्याप्ती बलुचिस्थान ते बंगाल आणि काश्मीर ते कन्याकुमारी एवढी प्रचंड होती. अंतराचा विचार केला तर प्रचंड अंतर, विविधतेचा विचार केला तर अभारतीय माणसाचे डोके चक्रावू न जाईल अशी विविधता, भाषा, पोशाख, खानपान, घराची रचना, मंदिराच्या रचना, उत्सव साजरे करण्याची पद्धती भिन्न असा आपला हिंदू समाज भारतव्याप्त आहे. अशा विविधतेने नटलेल्या भारतव्याप्त समाजाला संघटित करायचे. आत्मविस्मृतीतून त्याला स्मृती जागरणात आणायचे. त्यांना हिंदुपणाची ओळख करून द्यायची नुसती कल्पना केली तरी अशक्यप्राय वाटावे असे हे काम आहे.
यापूर्वी कालसापेक्ष धर्म जागरणाचे काम ज्या थोर पुरुषांनी केले त्यांना समग्र हिंदू समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे शक्य झाले नाही. उदाहरणार्थ गुरुनानक देवांचे कार्य पंजाब-सिंध प्रांतापुरते मर्यादित राहिले. महर्षी दयानंदांचे कार्य पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, राजस्थान एवढ्या क्षेत्रापुरते मर्यादित राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य भारतातील दलित जातींनी स्वीकारले. उर्वरित हिंदू समाजातील एका छोट्या वर्गाने ते मानसिकदृष्ट्या स्वीकारले. बहुसंख्य हिंदू समाज आजही त्यांच्यापासून दूर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य ‘सावरकर भक्त मेळा’ या अल्प गटापुरते सीमित झाले आहे. स्वातंत्र्यवीरांचा त्याग किती महान, ते माफीवीर नाहीत. ते हिंदू राष्ट्राचे द्रष्टे महापुरुष आहेत. महान क्रांतिकारक होते या विषयावरील बौद्धिक चर्चेत ते रममाण असतात. स्वातंत्र्यवीरांचे कार्य गेलेले नाही. डॉ. हेडगेवारांना संघाची बौद्धिक चर्चा करणारा गट करायचा नव्हता. संघाचे कार्य महाराष्ट्रात सुरू झाले म्हणून ते महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवायचे नव्हते. हिंदू समाजाअंतर्गत एक संघटन उभे करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. प्रारंभापासून त्यांचा हेतू समग्र हिंदू समाजाचे संघटन हा आहे.
डॉ. हेडगेवारांचा मृत्यू 1940 साली झाला. तोपर्यंत ते एक वाक्य वारंवार सांगत असत. ते म्हणजे आपल्याला संघटनेसाठी संघटन करायचे आहे. त्यांना अनेक जण प्रश्न विचारत की, हिंदू संघटनेचा हेतू कोणता? या प्रश्नाला लांबलचक तात्त्विक उत्तर देण्याऐवजी आम्हाला संघटनेसाठी संघटन करायचे आहे, हे ते सांगत. त्यांना अनेक जण प्रश्न विचारत की, हिंदू संघटनेचा हेतू कोणता? या प्रश्नाला लांबलचक तात्त्विक उत्तर देण्याऐवजी आम्हाला संघटनेसाठी संघटन करायचे आहे, हे ते सांगत. नागपूर आणि विदर्भात संघकार्य वाढू लागले. बुद्धिमान तरुण संघात येऊ लागले. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या डोळ्यापुढे समग्र भारतातील हिंदू समाज असल्यामुळे हिंदू समाज संघटनेचे कार्य सर्व भारतात होणे ओघानेच आले. देशव्यापी संघकार्याची पायाभरणी डॉ. हेडगेवारांनी केली. अनेक जणांना त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दूरदूरच्या प्रांतात पाठविले. सध्याच्या काळातही करिअर घडविण्यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयांत परप्रांतीय विद्यार्थी जात असतात. या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत आणि डॉ. हेडगेवारांनी पाठविलेल्या स्वयंसेवकांच्या मानसिकतेत खूप अंतर आहे. अतिशय निवडक अशा विद्यार्थी अधिक संघ प्रचारकांचा परिचय येथे करून घ्यायचा आहे.
दिगंबर विश्वनाथ पातुरकर या अकरावी पास झालेल्या विद्यार्थ्याला डॉक्टरांनी लाहोरला जाऊन शिक्षण घेण्यास सांगितले. आज ही गोष्ट एका वाक्यात लिहिली जाते. पण हा विषय किती अवघड आहे, याचा थोडा विचार केला तर लक्षात येईल. साल आहे, 1937. लाहोर म्हणजे पूर्णत: अपरिचित शहर. तिथली भाषा अपरिचित. एसएससी झालेल्या दिगंबरचे नातेवाईकदेखील लाहोरला असतील की नाही, माहीत नाही. परक्या ठिकाणी राहायचे म्हणजे राहण्याखाण्याचा खर्च आला. निवासाची व्यवस्था आली. डॉक्टरांनी ज्यांना ज्यांना पाठवलं त्या सर्वांपुढे या समस्या आहेत. त्यावर त्यांनी कसा मार्ग काढला, हा देखील एक मोठा विषय आहे.
दिगंबर विश्वनाथ या नावाने पातुरकर विख्यात झाले नाहीत, ते राजाभाऊ पातुरकर म्हणून संघात विख्यात झाले. लाहोर येथील कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांची शरीरयष्टी बलवान असल्यामुळे हॉकी खेळात ते भाग घेऊ लागले. खेळता खेळता त्यांनी अनेक तरुणांशी मैत्री केली आणि त्यांना घेऊन लाहोरमध्ये शाखा सुरू केली.
एकदा कॉलेजच्या आवारात एका हिंदू मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला गेला. राजाभाऊंनी त्याचा प्रतिकार केला. छेड काढणार्या तरुणांना खूप चोप दिला. यामुळे राजाभाऊ तरुणांचे हिरो झाले. संघस्थानावरची उपस्थिती वाढू लागली. नवीन नवीन भागांत शाखा सुरू झाल्या. याचा परिणाम म्हणून 1939 साली प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गात पंजाब प्रांतातील 150 स्वयंसेवक उपस्थित होते. शाखा उभी करणे हे अतिशय कष्टाचे काम असते. राजाभाऊंनी त्यासाठी उदंड कष्ट घेतले.
माधवराव मुळेदेखील पंजाबात संघकार्यासाठी पाठविले गेले. ते चिपळूणचे. त्यांनी पंजाबी भाषा अवगत केली आणि अपार कष्ट करून अटकेपार संघशाखा नेली. फाळणीच्या काळात पाकिस्तानमधील हिंदू बंधूभगिनींना सुरक्षितपणे भारतात आणण्याचे अफाट कार्य त्यांनीच केले.
उत्तरेप्रमाणे दक्षिणेतही महाराष्ट्रातून अनेक प्रचारक गेले. दक्षिणेतील कामाचे दोन शिल्पकार आहेत. एक यादवराव जोशी आणि दुसरे दादाराव परमार्थ. दादाराव परमार्थ सोळाव्या वर्षी डॉक्टरांच्या सहवासात आले आणि अल्पावधीत डॉक्टरमय झाले. 1930 सालच्या जंगल सत्याग्रहात डॉक्टरांनी भाग घेतला होता. दादाराव परमार्थ यांच्याबरोबर ते तुरुंगात होते. दादाराव आजारी पडले. आजार गंभीर होता. डॉक्टरांनी त्यांची सेवा अत्यंत प्रेमाने आणि मनापासून केली. या प्रसंगाने दादारावांनी आपले जीवन डॉक्टरांति समर्पित करून टाकले.
दादारावांचे बाह्य व्यक्तिमत्त्व अगदीच सामान्य होते. दातही पुढे आलेले होते, परंतु ते बोलायला उभे राहिले की, विचारांचा धबधबा सुरू होत असे आणि ऐकणार्यांच्या मनावर त्याचा न पुसला जाणारा परिणाम होत असे. अब्राहम लिंकनचे व्यक्तिमत्त्वदेखील असेच ओबडधोबड होते. परंतु अब्राहम लिंकन यांचे भाषण सुरू झाले की, ऐकणारे देहभान विसरून ते ऐकत असत. विचारांचे तेज असे असते. ज्या तेजापुढे तुमच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाला काही अर्थ राहत नाही. ते मद्रासमध्ये संघकार्यासाठी गेले. त्या वेळी मद्रास प्रांतात केरळ आणि कर्नाटकचा देखील समावेश होता. या भागातील संघकार्य हे कठीण खडक फोडून काढण्याचे होते. त्यांची काही वाक्ये आजही कार्यकर्त्यांना खूप मोठी प्रेरणा देणारी आहेत. उदा. ‘हिंदू राष्ट्राच्या जीवन लक्ष्याचा क्रमबद्ध विकास म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.’ नवीन क्षेत्रात काम करणार्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचे वाक्य ‘तुम्हाला काय करायचे आहे, हे माहीत आहे, मग तुम्हाला हेही माहीत आहे की, कसे करायचे.’ संघस्थानाबद्दल ते म्हणत, ‘संघस्थान हे हिंदुस्थान आहे आणि अखंड हिंदुस्थान हे संघस्थान आहे.’ ते मॅट्रिकही झालेले नसले तरी संघविद्वान होते.
नारायणराव तरटे यांना डॉक्टरांनी ग्वाल्हेर येथे संघकार्य सुरू करण्यासाठी पाठविले. नारायणराव तरटे अकोल्याचे. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संघकार्यासाठी जीवन समर्पित करण्याचा त्यांचा निर्णय झाला. अकोल्याच्या संघचालकांकडे त्यांनी विनंती केली की, संघकार्यार्थ मला अन्य ठिकाणी पाठवा. संघचालकांनी ती विनंती मान्य केली नाही. मॅट्रिक झालेला हा तरुण मुलगा अकोल्याहून नागपूरला आला आणि डॉक्टरांना भेटला.
डॉक्टरांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना ग्वाल्हेरला संघशाखा सुरू करण्यास पाठवून दिले. साल होते 1937. नारायण नावाचा हा तरुण अनेक महिने वेगवेगळ्या धर्मशाळेत राहिला. डॉक्टरांनी त्याला पाच रुपये दिले होते. ते अत्यंत काटकसरीने त्याने वापरले. एका विद्यार्थ्याला घेऊन त्याने शाखा सुरू केली. दत्तात्रय कल्याणकर हे त्यांचे पहिले विद्यार्थी स्वयंसेवक. ग्वाल्हेरमधली शाखा वाढू लागली आणि या शाखेने अटलबिहारी वाजपेयी नावाचा पंतप्रधान देशाला दिला. अटलजींचे आणि नारायणरावांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे राहिले. अटलजी प्रेमाने त्यांना मामू म्हणजे मामा म्हणत. संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांची दृष्टी भविष्यात खूप खोलवर पाहण्याची आहे. इंग्रजीत त्यांना ‘लाँग रेंज व्हिजन’ असे म्हणतात. त्याचा हा परिणाम आहे.
मुंबईत संघकाम सुरू करण्यासाठी गोपाळराव येरकुंटवार आले आणि त्यांनी गिरगावातील मारवाडी शाळेत पहिली संघशाखा सुरू केली. संघकार्याचा देशभर विस्तार होण्यासाठी केशवराव दीक्षित कलकत्यात ठाण मांडून बसले. पूर्वांचलात मधुकर लिमये गेले, केरळमध्ये भास्करराव कळंबी गेले, गुजरातमध्ये लक्ष्मणराव इनामदार गेले, बंगालमध्ये गुरुजींनाही पाठविण्यात आले आणि बाळासाहेबांनाही पाठविण्यात आले.
पहिला तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग 1940 साली नागपूरला झाला. या तृतीय वर्षासाठी देशातील सर्व प्रांतातून स्वयंसेवक आले होते. डॉ. हेडगेवार त्या काळात खूप आजारी होते. डॉक्टरांनी त्यांना कुठेही जाण्यास परवानगी दिली नव्हती. शेवटी समारोपासाठी अंत्यत निग्रह करून ते आले. स्वयंसेवकांसमोरचे ते त्यांचे अखेरचे भाषण आहे. हे भाषण अतिशय उच्च अशा आत्मानुभूतीच्या पातळीवरचे आहे. भाषणातील शब्द केवळ अक्षरांचा समूह नाही, हे भाषण आत्मीयता, तळमळ, उत्कट मातृभूमी भक्ती, स्वयंसेवकाविषयीची शतप्रतिशत आत्मीयता इत्यादी अलौकिक गुणांनी भरलेले आहे. हे भाषण आजही प्रत्येक स्वसंसेवकाला राष्ट्रभक्तीची जबरदस्त ऊर्जा देत असते. ते भाषण असे आहे...
“माननीय सर्वाधिकारी, प्रांत संघचालक, अधिकारीवर्ग, स्वयंसेवक बंधुगण मला वाटत नाही, तुमच्यापुढे दोन शब्द तरी मी आज नीटपणे सांगू शकेन. तुम्हाला माहीतच आहे की, गेल्या चोवीस दिवसांपासून मी अंथरुणावर पडून आहे. संघाच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत सद्भाग्याचे आहे. आज माझ्यासमोर हिंदुराष्ट्राचे छोटे स्वरूप मी पाहत आहे, परंतु प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे इतके दिवस नागपुरात राहूनही आपला परिचय करून घेण्याची माझी इच्छा सफल होऊ शकली नाही. पुण्याच्या ओ. डी. सी.मध्ये मी पंधरा दिवस होतो व तेथील प्रत्येक स्वयंसेवकाचा मी स्वतः परिचय करून घेतला. मला वाटले होते की, नागपूरच्या ओ. डी. सी.मध्ये देखील मी असेच करू शकेन, पण आपली सेवा मुळीच करता आली नाही, म्हणून आज आपणा सर्वांच्या दर्शनाकरिता मी मुद्दाम आलो आहे.
माझा व आपला यत्किंचितही परिचय नसताना अशी कोणती गोष्ट आहे की, जिच्यामुळे तुमची अंतःकरणे माझ्याकडे व माझे अंतःकरण तुमच्याकडे धाव घेते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्वज्ञानच असे प्रभावी आहे की, ज्या स्वयंसेवकांचा परस्परांशी परिचय नाही त्यांना देखील पाहताक्षणीच एकमेकांविषयी प्रेम वाटते. बोलता बोलता क्षणभरात ते एकमेकांचे मित्र होऊन जातात. नुसते परस्परांना पाहून स्मितहास्य करताच त्यांची एकमेकांना ओळख पटते. मागे पुण्याला असताना मी व सांगलीचे श्री. काशिनाथराव लिमये एकदा लकडी पुलावरून जात होतो. इतक्यात समोरून येणारी नऊ-दहा वर्षांची दोन मुले आमच्याजवळून जाताना किंचित् स्मित करून पुढे जाऊ लागली. तेव्हा मी काशिनाथरावांना म्हटले,‘ही मुले संघाची आहेत!’ माझ्या बोलण्याचे काशिनाथरावांना आश्चर्य वाटले, अगदी अपरिचित अशा या मुलांना मी निर्धास्तपणे स्वयंसेवक ठरविले तरी कसे? हा प्रश्न त्यांना पडल्यासारखा दिसला. त्यांनी मला विचारले, ‘हे आपले स्वंयसेवक कशावरून म्हणता?’ कारण त्या दोघांचे वेषात स्वःयंसेवकत्वाचे निदर्शक असे दृश्य चिन्ह कोणतेही नव्हते. मी म्हटले, ‘मी म्हणतो म्हणून, तुम्हाला प्रचिती पहावयाची आहे?’ थोडे दूर गेलेल्या त्या दोघांनाही मी जवळ बोलाविले व तुम्ही आम्हाला ओळखता का? असे विचारलेे, त्यांनी ताबडतोब उत्तर दिले,‘दोन वर्षांपूर्वी शिवाजी मंदिरातील बाल शाखेत आपण आला होता. तुम्ही आमचे सरसंघचालक डॉ. हेडगेवार व हे सांगलीचे श्री. काशिनाथराव लिमये.’
ही संघाची पुण्याई आहे. कोणाही एकट्या व्यक्तीचे हे कार्य नाही. आताच येथे बोललेले आपले मद्रासचे संजीव कामथ अनोळखी म्हणून आले व चार दिवसांत बंधू होऊन गेले. हे कार्य माणसाचे नसून संघाचे आहे. भाषाभिन्नता व आचारभिन्नता असूनही पंजाब, बंगाल, मद्रास, मुंबई, सिंध येथील स्वयंसेवकांचे परस्परांवर इतके प्रेम का? तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घटक आहेत म्हणून. आपल्या संघांत प्रत्येक स्वयंसेवक दुसर्या स्वयंसेवकावर सख्ख्या भावापेक्षाही जास्त प्रेम करतो. सख्खे भाऊसुद्धा प्रसंगी इस्टेटी-करिता भांडतात. पण तशी गोष्ट स्वयंसेवकांची नाही. मी आज चोवीस दिवसपर्यंत घरी होतो; पण माझे अंतःकरण तुमच्याजवळ होते. माझे शरीर घरात व मन मात्र तुमच्याबरोबर कॅम्पमध्ये वावरत होते. काल सायंकाळी पाच मिनिटे प्रार्थनेपुरते तरी संघस्थानी यावे, अशी उत्कट इच्छा होती, पण डॉक्टर-लोकांच्या अत्याग्रहामुळे तो बेत रहित करावा लागला.
आज तुम्ही आपापल्या स्थानी परत जात आहात, मी तुम्हाला प्रेमाने निरोप देत आहे. हा वियोगाचा प्रसंग असला तरी दुःखाचा खास नव्हे. जे करण्याचा कृत-निश्चय करून तुम्ही सारे येथे आलात, त्या कार्याच्या पूर्तीस्तवच तुम्ही स्वस्थानी जात आहात. जोपर्यंत शरीरात प्राण आहेत, तोपर्यंत संघाला विसरणार नाही, अशी प्रतिज्ञा करा. कोणत्याही मोहाने आपण विचलित होऊ नका. ‘मी पाच वर्षार्ंपूर्वी संघाचा सदस्य होतो’, असले वाक्य उच्चारण्याचा प्रसंग आयुष्यात केव्हाही येऊ देऊ नका. आपण आमरण स्वयंसेवक आहोत. तनमनधनपूर्वक संघकार्य करण्याचा केलेला निर्धार अखंड जागृत राहूद्या. आज मजकडून किती काम झाले?’ याची रोज निजते वेळी आठवण करा. संघाचे कार्यक्रम बिनचूक करणे किंवा रोज नियमाने संघस्थानी उपस्थित राहणे एवढ्याने संघकार्य संपत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आसेतुहिमाचल पसरलेल्या हिंदू समाजाला आपल्याला संघटित करावयाचे आहे. महत्त्वाचे कार्यक्षेत्र संघाबाहेर आहे. संघ केवळ स्वयंसेवकांपुरता नाही. संघाच्याबाहेरील लोकांसाठीही संघ आहे. राष्ट्रोत्थानाचा खरा मार्ग या लोकांना दाखवून देणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदू जातीचे अंतिम कल्याण या संघटनेने होणार आहे. दुसरे कोणतेही काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करावयाचे नाही. संघ पुढे काय करणार आहे, हा प्रश्न निरर्थक आहे. संघ हेच संघटनेचे कार्य पुढेही कितीतरी वेगाने करणार आहे. हा मार्ग आक्रमण करता करता असा एक सोन्याचा दिवस निश्चित उगवेल की, ज्या दिवशी सर्व हिंदुस्थान संघमय झालेला दिसेल, मग हिंदू जातीकडे वाकड्या दृष्टीने पाहू शकणारी कोणतीही शक्ती उभ्या जगात राहणार नाही. आम्ही कोणावर आक्रमण करावयास निघालो नाही, पण आमच्यावर आक्रमण होणार नाही, अशी खबरदारी मात्र आम्हाला घेतलीच पाहिजे.
मी आज आपणाला काही नवीन सांगतो असे नाही. आपल्यापैकी प्रत्येक स्वयंसेवकाने संघाचे कार्य हे आयुष्यातले प्रधान कार्य समजले पाहिजे, संघकार्य हेच माझे जीवितकार्य हा मंत्र हृदयावर कोरून घेऊन मगच आपण आपापल्या स्थानी परत जाल, अशा दृढ विश्वासाने मी आपणास निरोप देत आहे.”
डॉक्टरांचे एक वाक्य असे आहे की, ‘मी हिंदुराष्ट्राचे लघुरूप पाहत आहे.’ या वाक्याचा अर्थ काय होतो? या वाक्याचा अर्थ असा होतो की, हिंदुराष्ट्र हे समग्र हिंदुंचे राष्ट्र आहे आणि अनेक भाषा बोलणार्यांचे राष्ट्र आहे. सर्व जातींचे राष्ट्र आहे. श्रीमंत, गरीब, शिक्षित, अशिक्षित अशा सर्वांचे हे राष्ट्र आहे. आपण स्वयंसेवक आहोत याचा विसर पडू देऊ नका, असेही डॉ. म्हणाले. 21 जून 1940 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूनंतर संघ सहानुभूतदार आणि विरोधक यांना असे वाटले की संघाचे पुढे काय होणार? डॉक्टरांनंतर संघाचे नेतृत्व कोण करणार? डॉक्टरांच्या मृत्यूनंतर संघ संपणार का? त्यांच्या मनातील हे प्रश्न स्वाभाविक होते. आपल्या देशातील संस्थाजीवनाचा इतिहास असाच आहे. महापुरुष गेला की त्याने उभे केलेले काम दिशाहीन होते. पहिली गोष्ट होते ती म्हणजे संघटनेत फाटाफूट होते. फाटाफूट करणारे आपले वेगळे संघटन बांधतात. आम्हीच महापुरुषांचे खरे अनुयायी आहोत, असे सांगू लागतात. बौद्ध धर्म संघटनेचे असेच तुकडे झाले. जैन धर्म संघटनेचेदेखील हेच झाले. आर्य समाजही याला अपवाद नाही. संघाचेही असेच होणार का? असे अनेकांना वाटले.
परंतु संघ अभंग राहिला. संघटनेमध्ये कोणत्या कारणाने फूट पडते याचे गहन चिंतन डॉक्टरांनी केले होते. मी अमर नाही हे ते जाणून होते. यासाठी संघटनेच्या सर्वोच्चपदी त्यांनी कोणत्याही व्यक्तीला बसविले नाही, म्हणजे स्वतःही बसले नाहीत. भगवा ध्वज आपला गुरू आहे. हा संस्कार त्यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या मनावर अतिशय खोलवर रुजवला. संघ स्वंयसेवक हेच संघाचे चालक मालक आहेत. संघात अधिकार पदे ही व्यवस्था आहे. आपलेे कार्य व्यक्तिकेंद्रित होणार नाही ते विचारकेंद्रित झाले पाहिजे, याचा आग्रह त्यांनी धरला. तसे ते स्वतः जगले. व्यक्तिमाहात्म्य वाढवण्याचे प्रकार असतात. स्वतःच्या गळ्यात हार घालून घेणे, अनुयायांकडून पाया पडून घेणे. स्वतःच्या नावाचा जयजयकार ऐकत राहणे. संघटनेचे सर्व निर्णय स्वतःच करणे. वेगळे मत मांडणार्याला बाहेरचा रस्ता दाखवणे. आपल्याला कुणी प्रतिस्पर्धी उभा राहणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घेणे असले सर्व प्रकार चालतात.
डॉ. हेडगेवारांनी अंत्यत वेगळी निर्णय प्रक्रिया सुरू केली. एखाद्या विषयाचा निर्णय करायचा असेल तर त्या विषयाच्या संदर्भातील सर्वांना एकत्र करायचे. त्या विषयावर चर्चा करायची आणि एकमताने निर्णय करायचा, बहुमताने नाही. मताचे विभाजन झाले की फूट पडते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही जगातील एकमेव अशी संघटना आहे की ज्या संघटनेचे नाव संघ सुरू झाल्यानंतर अनेक महिन्यांनी, स्वयंसेवकांनी एकत्र बसून एकमताने निश्चित केले आहे. डॉ. हेडगेवारांनी सुरू केलेली ही प्रथा संघटनेच्या मंडल स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत चालू आहे. संघाचे शब्दप्रयोग अत्यंत गहन अर्थाचे असतात. आज स्वयंसेवक सहजपणे म्हणतो की, हा संघाचा निर्णय आहे. हा संघाचा कार्यक्रम आहे. तो चुकूनही कोणत्या व्यक्तीचे नाव घेत नाही. लोकशाहीच्या परिभाषेत सांगायचे तर ही परिपूर्ण आदर्श लोकशाही व्यवस्था आहे.
संघाने लोकशाहीची विचारसरणी पाश्चात्य विचारवंताकडून स्वीकारलेली नाही. तिची मुळे आपल्या सनातन जीवन दर्शनात आहेत. भगवान गौतम बुद्धांनी याच सनातन लोकशाही मूल्यावर बौद्ध संघाची उभारणी केली. गोरखनाथांनीदेखील हेच केले. ही परंपरा संघाला वारसाहक्काने प्राप्त झालेली आहे. डॉक्टरांनी म्हणजे संघाने या परंपरेला कालसापेक्ष रूप दिलेले आहे.
हिंदुराष्ट्र दर्शन आपल्या हृदयात अंकित करून अनेक कार्यकर्ते अनेक देशांत गेले. त्यांनी संघ त्या देशांत नेला. संघाची अनुभूती घेतलेला स्वयंसेवक, कार्यकर्ता आपल्या जगण्यातून संघ प्रकट करीत राहतो. हिंदुराष्ट्राचे राष्ट्रीक असलेले हिंदू गुणसंपन्न असले पाहिजेत. चारित्र्यसंपन्न असले पाहिजेत. राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव असलेले पाहिजेत. हे काम संस्काराने होते. भाषणाने होत नाही. संघात भाषणे होतात, पण त्याला भाषण म्हणत नाहीत. त्याला बौद्धिक वर्ग म्हणतात. बौद्धिक वर्ग हा एक संस्कार असतो. भगवान बुद्धाने भिक्षू संघाचे असंख्य नियम सांगितले. हे नियम एकाच वेळी अस्तित्वात आले नाहीत. जसा प्रसंग आणि परिस्थिती निर्माण झाली तशी नियमांची निर्मिती झाली. या नियमांना ‘विनयपिटीका’ म्हणतात. हे आपण पाहिले आहे.
संघाचा असा ‘विनयपिटीका’ नावाचा ग्रंथ नाही. पण नियम आहेत. ते सर्व अलिखित आहेत. संस्काराने त्याचे पालन करायचे असते. रोजची शाखा, रोजची प्रार्थना हा स्वयंसेवकांसाठी सामान्य नियम आहे. संघाने निर्धारित केलेला गणवेश घालणे, प्रत्येकाने स्वत:चा गणवेश स्वतःच्या पैशातून खरेदी करणे. संघवर्गाचे, शिबिराचे शुल्क असते, ते प्रत्येकाला भरावे लागते. संघासाठी स्वतःचे धन द्यावे लागते. देणग्या गोळा करून संघ चालवायचा नाही किंवा शासकीय अनुदान घेऊन संघ चालवायचा नाही. संघ चालवण्याच्या बाबतीत आपण स्वतंत्र, स्वायत्त आणि सार्वभौम असलो पाहिजे हा देखील संघाचा नियम आहे. विचाराचे पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आपले मत आग्रहाने मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु जो निर्णय होईल तो सर्वांचा निर्णय आणि त्या निर्णयाप्रमाणे काम करायचे आहे हे संघाचे अनुशासन आहे. संघाची एक प्रतिज्ञा आहे ती पुढील प्रमाणे -
मी सर्वशक्तिमान श्रीपरमेश्वराला व आपल्या पूर्वजांना स्मरून प्रतिज्ञा करतो की, मी आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे संरक्षणाकरिता व हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे. संघाचे कार्य मी प्रामाणिकपणे, नि:स्वार्थ बुद्धीने व तनमनधन अर्पण करून करीन व हे व्रत मी आजन्म पाळीन.
जय बजरंग बली हनुमान की जय.
देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या प्रतिज्ञेचा मसुदा पुढीलप्रमाणे-
स्वातंत्र्यानंतर त्यात बदल करून ही प्रतिज्ञा तयार केली.
सर्वशक्तिमान श्रीपरमेश्वराला व आपल्या पूर्वजांना स्मरून मी प्रतिज्ञा करतो की आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे संरक्षण करून हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे. संघाचे कार्य मी प्रामाणिकपणे, नि:स्वार्थ बुद्धीने व तनमनपूर्वक करीन आणि हे व्रत मी आजन्म पाळीन.
भारत माता की जय.
प्रत्येक संघ स्वयंसेवक ही प्रतिज्ञा घेतो व तिचे आपल्या जीवनात पालन करतो.
संघकार्य देशव्यापी होत असताना हे सर्व विषय समाजात रुजवण्याचा प्रयत्न झाला. स्वयंसेवकाची जडणघडण त्यातून होत गेली. कोणाही एका व्यक्तीसाठी काम करायचे नसून आपल्याला हिंदुराष्ट्र जागृतीचे काम करायचे आहे आणि हे काम सामूहिक आहे हा संस्कार खूप खोलवर होत गेला. संघाचे कार्य समग्र हिंदू समाजाचे असल्याने ते वर्ण आणि जातीच्या पलीकडचे कार्य आहे. संघात चातुर्वर्ण्य अथवा जातिभेद यावर कुणी भाषणे देत नाहीत. संघ स्वयंसेवकाला अनेक वेळेला स्वतःचा परिचय करून देणारे पत्रक भरावे लागते. या पत्रकात नाव, वय, शिक्षण, व्यवसाय, निवारा इत्यादी रकाने असतात. जातीचा रकाना गायब झालेला असतो.
वर्षानुवर्षे स्वयंसेवक एकत्र राहतात, एकत्र जेवतात, एकमेकांच्या घरी जातात. परंतु कुणीही कुणाची जात विचारीत नाही. हिंदू समाजाच्या जातीय मानसिकतेचा विचार करताना संघ स्वयंसेवकांच्या मानसिकतेत संघाने घडवून आणलेली ही अद्भुत क्रांती आहे. तसे पाहू जाता क्रांती हा संघाचा शब्दप्रयोग नाही. संघ क्रांती, प्रतिक्रांती, परिवर्तन, जातिनिर्मूलन, वर्णमुक्तता असले शब्दप्रयोग करीत नाही. अत्यंत सोप्या साध्या भाषेत संघ सांगतो की, ही जननी जन्मभूमी भारतमाता आपली आई आहे आणि आपण सर्व तिचे संतान आहोत. संघात गायली जाणारी असंख्य गीतेही मातृभूमीच्या गौरवाची गीते आहेत. डॉक्टर हेडगेवारांनी व नंतर श्रीगुरुजींनी ही मातृभूमी भक्तीची भावना उत्कटपणे जागृत करण्याचा प्रयत्न केला. या भावनेचे तेज इतके जबरदस्त आहे की त्या तेजापुढे किंवा त्या तेजाच्या दाहकतेत सर्व प्रकारचे जातीय वर्णाभिमान जळून खाक होतात आणि उरते ती फक्त हिंदुपणाची भावना. मी प्रथम हिंदू आणि शेवटीही हिंदूच आहे. हीच माझी एकमेव ओळख.
पूजनीय डॉक्टरांचे मातृभूमी भक्तीचे एक बंगाली गीत खूप आवडते गीत होते, ते असे...
धोनो धन्नो पुष्पे भोरा अमादेर ई बोशुंधोरा
ताहर माझे आछे देश एक शोकोल देशेर शेरा
ओ शे शॉपनो दिए तोइरी शे जे सृति दिए घेरा
एमोन देश्टी कोथाओ खुजे पाबे नाको तुमी
शोकोल देशेर रानी शे जे अमर जोंमोभूमि
शे जे अमर जोनमोभूमि, शे जे अमर जोनमोभूमि
चोंड्रो शूरजो ग्रोहो तारा, कोथाय उजोल एमोन धरा?
कोथाय इमोन खेले तोरीत, इमोन कालो मेघे?
ओ तार पाखिर दाके घूमिये पोर, पाखिर दाके जेगे!
एमोन देश्टी कोथाओ खुजे पाबे नाको तुमी
शोकोल देशेर रानी शे जे अमर जोनमोभूमि
शे जे अमर जोनमोभूमि शे जे अमर जोनमोभूमि शे जे अमर जोनमोभूमि
एतो स्निगधो नोडी ताहर, कोथाय एमोन धूमरो पहाड़
कोथाय एमोन होरी खेत्रो आकाश तोले मेशे?
एमोन धनेर ओपोर धेउ खेले जय बताश कहार देशे?
एमोन देश्टी कोथाओ खुजे पाबे नाको तुमी
शोकोल देशेर रानी शे जे अमर जोनमोभूमि
शे जे अमर जोनमोभूमि शे जे अमर जोनमोभूमि
पुष्पे पुष्पे भोरा शखी, कुंजे कुंजे गाहे पाखी
गुंजोरिया ऐश ओली, पुंजे पुंजे धेये,
तारा फूलेर ओपोर घुमिये पोर फूलेर मोधु खेये
एमोन देश्टी कोथाओ खुजे पाबे नाको तुमी
शोकोल देशेर रानी शे जे अमर जोनमोभूमि
शे जे अमर जोनमोभूमि शे जे अमर जोनमोभूमि
भयेर मायर एतो स्नेहो, कोथाई गेल पाबे केहो
ओ मां तोमर चोरन दुती बोक्खे अमर धोरी
अमर ई देश ते जोनमो जेनो ई देश ते मोरी
एमोन देश्ति कोथाओं खुजे पाबे नाको तुमी
शोकोल देशेर रानी शे जे अमर जोनमोभूमि
शे जे अमर जोनमोभूमि शे जे अमर जोनमोभूमि शे जे अमर जोनमोभूमि
तसेच श्रीगुरुजींचेसुद्धा मातृभूमीविषयीचे अंत्यत आवडते गीत होते ते असे -
मृण्मयी हो तुम पुरातन
सुयश विमल पावन माँ ॥प॥
मृत्तिका तुम वीर प्रसवा, स्वर्णमयी तुम स्वर्ग प्रसवा
तुम अचेतन हो परन्तु, चैतन्य तुमसे प्राण लेता ॥1॥
विघ्नमाला आज आयी, दौडकर तुमको हराने
शक्ति ती तुम मूर्ति बनकर, पहन लो चिर विजयमाला ॥2॥
भयद है माँ आज मण्डल, भय कम्पित बन सृजन मन
कीर्ति का सौरभ तुम्हारे, प्रेरणा दे और सहारा ॥3॥
आपल्या देशातील थोर पुरुषांनी जातिमुक्ततेच्या संदर्भात जो संघर्ष केला त्यात त्यांनी खूप मौलिक विचारबिंदू सर्व समाजासमोर ठेवले आहेत. भगवान गौतम बुद्धांनी जन्मजात वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था नाकारताना अत्यंत तर्कशुद्ध विचार मांडला आहे. त्याचे उदाहरण यापूर्वी दिले आहे. गोरखनाथ यांच्यापासून सुरू झालेल्या मध्यकालीन संत परंपरेने मनुष्यात ईश्वर पाहा. नरदेह ईश्वराचे निवासस्थान आहे, तेथे विषमतेला कोणताही थारा नाही. आपण सर्व एकाच परमेश्वराची रूपे आहेत. हा आध्यात्मिक विषय मांडला. वर्ण आणि जातीच्या मागे उभे असलेले धार्मिक अधिष्ठान त्यांनी कधी मांडले नाही, परंतु हा विचार संप्रदायापुरता सीमित राहिला आणि आध्यात्मिक क्षेत्रापुरता मर्यादित राहिला. ज्याला सामाजिक समता म्हणतात त्यात त्याचे रूपांतर झाले नाही.
समाजिक समरसतेचा हा विचार आणण्याचा प्रयत्न आधुनिक काळात अनेक महापुरुषांनी केला. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या तिघांचा वाचकांनी या संदर्भात विचार केला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परीने समाजातील जातीयता, जातिगत विषमता आणि अस्पृश्यता घालवून लावण्याचा प्रयत्न केला. त्या कार्याचा एक सर्वव्यापी परिणाम असा झाला की, सामाजिक जीवनात उच्चनीचतेचे पालन करणे सोडून दिले पाहिजे, अस्पृश्यता अत्यंत वाईट आहे तिचा त्याग केला पाहिजे. सामाजिक समता निर्माण झाल्याशिवाय खर्या अर्थाने एक राष्ट्रीय विचार निर्माण होऊ शकत नाही, या थोर पुरुषांच्या कार्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांत आणि विशेषकरून राजकीय क्षेत्रांतदेखील सर्व राजकीय पक्षांत वेगवेगळ्या जाती सहभागी झालेल्या दिसतात.
आर्य समाजाने जातपाततोडक मंडळाच्या मार्फत, महात्मा गांधींनी हरिजन सेवक संघाच्या मार्गाने, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आंदोलन आणि प्रबोधनाच्या मार्गाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन, प्रबोधन आणि कायद्याच्या मार्गाने जातिनिर्मूलन करण्याचे प्रयत्न केले. संघ यातील कुणालाही नाकारत नाही. किंवा त्यांच्या मार्गाच्या मर्यादेची चर्चा संघात केली जात नाही. हे सर्व आपलेच आहेत. आपल्या हिंदू समाजाचे तळमळीने हितचिंतन इच्छिणारे महापुरुष आहेत, ही संघाची भावना आहे. त्याचे ॠण मान्य करून त्यांनी दिलेल्या मार्गाचे चिंतन करून संघकाळाच्या संदर्भात हा विषय घेऊन संघ पुढे जात आहे. हिंदू संघटन हा संघाचा मंत्र आहे. ते केवळ ध्येय नाही. या मंत्राचा सामाजिक अर्थ होतो की सर्व हिंदू समान आहेत. त्याची प्रतवारी करता येत नाही. मनुष्य म्हणून जी नैसर्गिक विषमता असते उदा. क्षमतांची विषमता, रंगरूपाची विविधता, शारिरीक ठेवणीची विविधता ही कुणाला बदलता येत नाही. मनुष्य जीवनातील अन्य सर्व विषमता या मनुष्यनिर्मित आहेत. त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. ही संघाची भूमिका आहे. विषमता निर्मूलनाचा स्वतंत्र संघमार्ग आहे या मार्गाचा तथाकथित समाजशास्त्री अभ्यास करीत नाहीत. हे समाजशास्त्राचे दुर्दैव आहे.
संघकार्य हे सनातन धर्मावर आधारित कार्य आहे. तरीही ते रूढार्थाने धार्मिक कार्य नाही. धार्मिक कार्याची काही लक्षणे आहेत.
* परमेश्वरासंबंधी निश्चित संकल्पना
* ही संकल्पना निर्गुण ईश्वर, साकार ईश्वर किंवा शून्यवत अशी असते.
* विचारसरणीप्रमाणे पाळायचे यम-नियम तयार होतात.
* साधनेची पद्धती निश्चित केली जाते.
* अनिवार्य कर्मकांडे निश्चित केली जातात.
* प्रत्येक धर्मपंथाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी चिन्हे निश्चित केली जातात. उदा. पोशाख, केशरचना, शरीरावरील धार्मिक अलंकार.
* यावरून त्या त्या पंथाची ओळख, ती व्यक्ती पाहिल्यानंतर समाजाला होते.
संघात यातील कोणतेही धार्मिक लक्षण नाही. संघ निर्गुण, साकार, शून्यवादी नाही, पण सर्वांचा आदर करणारा आहे. सत्य एकच असून ते विविध रूपांत प्रकट होतेे असे संघाचे म्हणणे आहे. ज्याची जशी रुची असेल त्याप्रमाणे त्याने धार्मिक विचार आणि आचाराचे पालन करावे. हा संघविचार आहे. हा संघविचार आहे याचा अर्थ तो संघाने शोधला आहे, असा नाही. तो आपला सनातन राष्ट्रीय विचार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा अर्थ या सनातन राष्ट्रीय विचाराचे पालन करणारा स्वयंसेवकांचा संघ असा करावा लागतो.
संघात कोणत्याही एका देवतेची पूजा केली जात नाही. देवता पूजनाचा संघात कोणताही कार्यक्रम नसतो. अमुक वार हा उपवासाचा वार म्हणून पालन करा, असे संघ सांगत नाही. याबाबतीत संघातील विनोद असा की आमचा एकच वार आहे, तो म्हणजे ‘हेडगेवार’. संघ ही कट्टर धार्मिक संघटना आहे, असा आरोप करणार्यांना धर्म समजलेला नसतो आणि संघाचे शून्य ज्ञान असते. म्हणून शहाणा कार्यकर्ता त्यांच्या तोंडी लागत नाही.
सर्व मतांचा समावेश करणारा एकात्मता मंत्र सर्व स्वयंसेवकांना पाठ असतो. तो मंत्र असा आहे -
यं वैदिका मन्त्रदृशः पुराणाः इन्द्रं यमं मातरिश्वानमाहुः।
वेदान्तिनो निर्वचनीयमेकम् यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति॥
शैवायमीशं शिवइत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति।
बुद्धस्तथार्हन्इति बौद्ध जैनाः सत्-श्री-अकालेति च सिक्खसन्तः॥
शास्तेति केचित् कतिचित् कुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या।
यं प्रार्थन्यन्ते जगदीशितारम् स एक एव प्रभुरद्वितीयः॥
मंत्राचा अर्थ असा -
ज्यांना वैदिक मंत्रांचे द्रष्टे (म्हणजे ज्यांना मंत्रांचे ज्ञान आहे आणि ज्यांनी ते अनुभवले आहेत), पुराणे (म्हणजे प्राचीन कथा आणि इतिहास) आणि इतर पवित्र ग्रंथ ‘इंद्र’, ‘यम’ आणि ‘मातरिश्वान’ म्हणून ओळखतात.
ज्यांना वैदिकदृष्ट्या इंद्र, यम आणि मातरिश्वान म्हणतात.
ज्याला वेदान्ती (वेदांताचे अभ्यासक) ‘ब्रह्म’ (अविभाज्य, अनिर्वचनीय सत्य) म्हणून संबोधतात.
ज्याला शैव (शिवभक्त) ‘ईश’ किंवा ‘शिव’ म्हणतात आणि ज्याला वैष्णव (विष्णूभक्त) ‘विष्णू’ म्हणून स्तुती करतात.
ज्याला बौद्ध आणि जैन ‘अर्हन्’ म्हणतात. ज्याला शीख ‘सत् श्री अकाल’ म्हणून ओळखतात.
ज्याला (सर्वजण) ‘जगदीश्वर’ (जगाचा स्वामी) म्हणून प्रार्थना करतात, तोच एकमेव आणि अद्वितीय प्रभू आहे.
मग संघाचे काम धार्मिक आहे याचा अर्थ कसा करावा लागतो? काळाच्या संदर्भात संघाने एकच धर्म सांगितला आहे. तो आहे राष्ट्रधर्म. व्यक्तिगत धर्म आणि उपासना यातून व्यक्तीला सुख मिळते. जीवनमुक्तीचा मार्ग समजतो. त्यातून त्याचे चारित्र्य बळ वाढते. तो सदाचरणी होतो. भूतमात्रांविषयी दयाभाव त्याच्या मनात जागृत होतो. दान करण्याची प्रवृत्ती वाढते. ‘माणसाला भाकरीइतकी धर्माची आवश्यकता आहे.’ असे डॉ. बाबासाहेब म्हणाले. त्या धर्माचे वर दिलेले फायदे आहेत.
संघव्यक्ती धर्माच्या पलीकडे जाते. आपले एक सनातन राष्ट्र आहे, आपले राष्ट्रीय जीवन आहे आणि त्या संदर्भात आपली कर्तव्ये आहेत. संघ राष्ट्रधर्म कर्तव्याचे पालन शिकवितो. व्यक्तिगत सुखाच्या प्राप्तीसाठी धडपड केली पाहिजे हे कुणाला शिकवावे लागत नाही. ती प्रत्येक व्यक्तीची स्वाभाविक प्रवृत्ती असते. सामाजिक कर्तव्यांचे पालन करा हे शिकवावे लागते. शालेय जीवनात नागरिकशास्त्रात त्याचे धडे असतात. यामुळे सामान्य कर्तव्याचा बोध लहान वयापासून होत जातोेे, परंतु शालेय जीवनात किंवा महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रधर्माची शिकवण दिली जात नाही. राष्ट्र प्रथम मी नंतर, राष्ट्राच्या गरजा प्रथम नंतर माझ्या, मला राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. हे सर्व शिकवावे लागते. डॉक्टरांची महानता यात आहे की राष्ट्रासाठी मरणे हे एकवेळ सोपे आहे, पण राष्ट्रासाठी जगणे हे अत्यंत कठीण काम आहे. अशा जगण्यात रोजच मरावे लागते. व्यक्तिगत आवडीनिवडी, धार्मिक आचार सर्व काही बाजूला ठेवून राष्ट्रसाधना करावी लागते.
संघाने राष्ट्रधर्माची साधना सांगितली. या साधनेचा पहिला मंत्र असा आहे की आमच्या सर्वांचे एकच उपासना दैवत ते म्हणजे भारतमाता. संघाचे गीत आहे.
मातृभूमि गान से गूँजता रहें गगन
स्नेह नीर से सदा फूलते रहें सुमन।
जन्मसिद्ध भावना स्वधर्म का विचार हो,
रोम-रोम में रमा स्वधर्म संस्कार हो
आरती उतारते प्राणदीप हो मगन,
स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन।
हार के सुसूत्र में मोतियों की पंक्तियाँ,
ग्रम नगर प्रान्त से संग्रहित शक्तियाँ
लक्ष्य-लक्ष्य रूप से राष्ट्र हो विराटतम
स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन।
ऐक्य शक्ति देश की प्रगति मे समर्थ हो,
धर्म आसरा लिये मोक्ष काम अर्थ हो
पुण्यभूमि आज फिर ज्ञान का बने सदन
स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन।
मातृभूमीची भक्ती म्हणजे मातृभूमीच्या संतानांची सेवा, मातृभूमीच्या निसर्गाचे रक्षण, मातृभूमीच्या प्राणिजीवनाचे रक्षण, मातृभूमीच्या जलस्रोताचे रक्षण, मातृभूमीच्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण, मातृभूमीच्या कला कौशल्य, संगीत साहित्याचे रक्षण. दुसर्या शब्दात सर्वांगीण राष्ट्रीय विचार. ‘भारतमाता की जय’, अशी केवळ घोषणा देऊन काही उपयोगाचे नाही. संघ स्वयंसेवंकांनी घोषणा देऊ नयेत, हा संघ संस्कार आहे. सर्वांगाने मातृभूमीची सेवा करावी हा सेवाधर्म संघाने शिकविला. रुग्णसेवा, शिक्षणसेवा, अन्नसेवा, वस्त्रसेवा असे सेवेचे विविध प्रकार समाजात चालतात. हे सर्व प्रकार समाजोपयोगी आहेत. परंतु संघ त्याच्या पलीकडे जातो आणि राष्ट्रसेवा म्हणजे समाजाला सर्वांगाने सक्षम करण्याची सेवा आहे. संघाच्या राष्ट्रसेवेचा हा अर्थ करावा लागतो.
सक्षम सेवा याचा अर्थ सर्व भेदांच्या पलीकडे असणारी समाजरचना असावी. ती सर्वोत्तम सेवा आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमचा श्रेष्ठ वारसा आहे तो स्वीकारून, आधुनिकता स्वीकारून या क्षेत्रात आपल्याला सक्षम झाले पाहिजे, ही विज्ञान सक्षम सेवा आहे. अर्थकारणाचा विचार करता आमच्या प्राचीन परंपरेने आम्हाला सर्वांचे कल्याण करणार्या अर्थ व्यवस्थेचे मंत्र दिले आहेत.
इशावास्य उपनिषदातील हा पहिला मंत्र
ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।
हा मनुष्यजीवन सुखी करणारा अर्थमंत्र आहे. त्यांची अंमलबजावणी ही अर्थसेवा आहे.
या सर्व सेवा कर्तव्य भावनेने करायला पाहिजेत. कर्तव्य भावना याचा अर्थ कसा केला पाहिजे? आपल्याकडील कर्तव्य हा शब्द प्रचंड अर्थ सांगणारा शब्द आहे. कर्तव्य या शब्दामध्ये कुठल्याही स्वार्थाची किंवा लाभहानीची काळजी न करता केलेले काम असा त्याचा एक अर्थ आहे. कर्तव्याचे पालन करीत असताना अनेक प्रकारचे त्याग करावे लागतात. त्यात व्यक्तिगत सुखाच्या त्यागापासून देहत्यागापर्यंतचे विषय येतात. कर्तव्याचे पालन करीत असताना निंदास्तुती समान मानून आपले काम करीत राहायचे आणि कर्तव्यपूर्तीचे समाधान होईपर्यंत त्यात खंड पडू द्यायचा नाही. सतत प्रयत्नशील राहायचे आणि माझे कर्तव्य हीच भावना मनात ठेवायची.
संघाने दिलेला हा राष्ट्रसेवेचा मंत्र हे या काळातील धर्माचरण आहे. म्हणून धर्म जगायचा असतो, याचा संघाचा अर्थ आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करायचे असा होतो. हे सांगत असताना संघ असे कधी सांगत नाही की तुमचा व्यक्तिगत धर्म सोडा, उपास, व्रतवैकल्याचा त्याग करा, यात्रा किंवा गंगास्नाान याला काही अर्थ नाही. अशी संघाची भाषा नाही. गुरू गोरखनाथांचे भजन यापूर्वी दिले आहे. त्यात गोरखनाथ म्हणतात, ‘मी एकाच निरंजनाचा ध्यास करणारा आहे. सर्व तीर्थे माझ्या शरीरात आहेत, त्यात स्नान करून मी मन:शुद्धी करीन.’
संघ हे भजन राष्ट्रदेव भव या भावनेने जगतो. संघाच्या दृष्टीने एकच निरंजन म्हणजे राष्ट्र. त्यासाठी जगायचे. सामूहिक साधना करून राष्ट्राला परम वैभवाला घेऊन जायचे आहे. संघविचार आणि मंत्र सांगणारी संघाची प्रार्थना आहे. या प्रार्थनेचे शेवटचे चरण असे आहे.
समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम्
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्राऽनिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम्
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ॥3॥
राष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्यासाठी प्रार्थनेतील या ओळीचे नित्यस्मरण व त्याला अनुसरून व्यक्तिगत व सामाजिक जीवनात आचरण करायला हवे. असे जगणे म्हणजे संघ जगणे. यापुढील काळात हे जगणे अधिक डोळसपणे घडावे यासाठी संघाने पंचसूत्रीची शिदोरी दिली आहे.