राजघराण्यातील कर्तबगार स्त्रिया

18 Oct 2025 16:36:04
vivek
भारताच्या इतिहासातील कर्तबगार, रणमर्दिनी स्त्रियांमध्ये राणी दुर्गावती, झाशीची राणी लक्ष्मीबाई आदींच्या शौर्यकथा सर्वश्रुत आहेत. महाराष्ट्राच्या वीरभूमीतील अशाच मुत्सद्दी-शूरवीर स्त्री कर्तृत्वाचा इतिहास मात्र तितकासा सर्वश्रुत झालेला नाही. छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ साहेब, धीरोदात्त येसूबाई, रणमर्दिनी ताराराणी यांनी धर्मांध मुस्लीम बादशहाविरुद्ध बाणेदारपणे लढा दिला, तसाच लढा करवीरच्या महाराणी जिजाबाई (द्वितीय) महाराणी दुर्गाबाई आणि महाराणी सईबाई तथा दिवाणसाहेब या स्त्रियांनी स्वकीय हितशत्रूंसह, कुटील साम्राज्यवादी इंग्रजांविरूद्ध बाणेदारपणे संघर्ष करीत करवीरचे स्वतंत्र राज्य राखले. इतिहासातील काहीशा उपेक्षित स्त्री कर्तृत्वाचे, मातृशक्तीचे शब्ददर्शन.
 
मराठ्यांच्या महाप्रतापी इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संंभाजी, वीरयोद्धे संताजी-धनाजी, थोरले बाजीराव पेशवे या आणि अशा प्रतापी योद्ध्यांच्या पराक्रमाच्या अनेक कथा सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या आहेत. त्याचा प्रत्येक मराठी माणसास अभिमान आहे. या पराक्रमाच्या गाथा हीच मराठ्यांच्या वीरत्वाची जगात ओळख आहे. पण त्या कालखंडात राजघराण्यातील स्त्रियांनी केलेल्या पराक्रमाकडे, योगदानाकडे आपले फारसे लक्ष गेलेले नाही. किंबहुना दुर्लक्षच झालेले आहे. या कालखंडातील धामधुमीच्या बिकट काळात राजघराण्यातील स्त्रियांनी दाखवलेला ‘बाणेदारपणा’, ‘शौर्य’ आणि ‘मुत्सद्दीपणा’ याचा पाहिजे एवढा ठळक गुणगौरव सर्वश्रुत नाही. या पुरुषार्थी कर्तृत्ववान स्त्रियांपैकी राजमाता जिजाबाई, छत्रपती संभाजीच्या धर्मपत्नी वीर येसूबाई आणि संभाजीमहाराजांच्या बलिदानानंतर, धर्मांध क्रूर औरंगजेेबाला सळो की पळो करून सोडणार्‍या रणरागिणी, करवीर गादीच्या संस्थापिका मर्दानी राणी ताराबाई यांच्याविषयी बरेच लोक बर्‍याच गोष्टी जाणतात. पण या तिघींप्रमाणेच छत्रपतींच्या राजघराण्यातील आणखीही अशा काही कर्तृत्ववान स्त्रिया आहेत की ज्यांच्या बाणेदारपणाच्या, वीरत्वाच्या आणि मुत्सद्दीपणाच्या कथा संस्मरणीय आहेत. विशेषतः करवीर रियासतीमधील राजस्त्रियांनी स्वकीय हितशत्रूंशी आणि धूर्त ब्रिटिश साम्राज्यवादी अधिकार्‍यांच्या करवीर रियासत गिळंकृत करण्याच्या कुटील कारवायांना दिलेले बाणेदार प्रत्युत्तर, रणांगणातील पराक्रमाएवढेच मोलाचे आहे.
 
 
आधी काही वर्षे धर्मांध मुस्लीम बादशहा, सुलतानाविरूद्ध आणि नंतर कुटील ब्रिटिशांविरूद्ध पुरुषांना हिंमतीने साथ देत स्त्रियांनी जी कर्तबगारी दाखवली ती अतुलनीय आहे. व्यापारासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीद्वारे एकेक रियासती, संस्थाने, साम-दाम-दंड-भेद अशा डावपेचांनी त्यांनी गिळंकृत करण्यास सुरुवात केली. कधी आपसातील दुही, कधी दत्तक घेण्यास मनाई करून, वारसदार नाही म्हणत ब्रिटिशांनी सर्व प्रदेशांवर वर्चस्व निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ब्रिटिशांचे हे सारे डावपेच, ताराराणी संस्थापित ‘करवीर रियासत’ गिळंकृत करण्यात पूर्णतः अपयशी ठरले. 1947 साली भारत स्वतंत्र होईपर्यंत ‘करवीर रियासती’ने आपले अस्तित्व कायम राखले. त्यामध्ये राजघराण्यातील स्त्रीकर्तृत्वाचा वाटा मोठा आहे. त्यांनी बिकट स्थितीत जो स्वाभिमानी बाणेदारपणा दाखवला, तो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांच्या प्रेरणेचाच हुंकार होता. त्या स्त्रीकर्तृत्वाचे स्मरण म्हणजे मराठी मातृशक्तीचे प्रेरक पुण्यस्मरण होय!
 
राजमाता जिजाऊ
हिंदवी स्वराज्य संकल्पक आणि निर्मात्या
 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी साकारलेले स्वतंत्र, सार्वभौम, ‘हिंदवी स्वराज्याचे’ स्वप्न, हे त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब यांचे ध्येय होते. ते त्यांनी आपल्या पुत्राकरवी, शिवाजीराजांच्याकरवी सत्यात आणले. राजमाता जिजाऊ या निजामशाही दरबारातील सिंदखेडचे पराक्रमी मातब्बर लखुजी जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी जन्मलेले कन्यारत्न होते. त्यांची आई म्हाळसाबाई या देवगिरीच्या धर्मपरायण, हिंदुत्वनिष्ठ पराक्रमी राजवंशातील होत्या. तेच सारे संस्कार, बाळकडू रूपात जिजाऊंना लाभलेले होते. घोडेस्वारी, तलवारबाजी या सर्व कलागुणांनी त्या संपन्न होत्या.
 
 
इ.स.1605मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी देवगिरी येथे त्यांचा मंगलविवाह झाला होता. पुढे एका प्रसंगी हत्ती उन्मत्त झाल्याच्या घटनेने जाधव-भोसले यांच्यात सशस्त्र संघर्ष झाला.
vivek
 
 
भोसलेंकडून जिजाबाईचा बंधू दत्ताजी जाधव मारला गेला तर बदला म्हणून लखुजींनी शहाजी भोसलेंचा चुलत भाऊ संभाजीस ठार केले. यावेळी संभाजीच्या संरक्षणार्थ शहाजी धावून आले. पण लखुजींच्या पराक्रमी तलवारीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अशा प्रकारे भोसले-जाधव संघर्षात जिजाऊंना आपला भाऊ आणि आपला चुलत दीर अशी आपलीच माणसे कामी आल्याचे दुःख सोसावे लागले. पण या प्रसंगाने जिजाऊने आपल्या माहेराशी असलेल्या संबंधांना तिलांजली दिली आणि शहाजीराजेंना साथ देऊन पतीपरायणतेचा आदर्श समाजापुढे ठेवला. एकीकडे जन्मदाता-पिता आणि अग्नी, देव, ब्राह्मण साक्षीने झालेला जीवनाचा सोबती पती; अशा मानसिक द्वंद्वात जिजाऊंनी आपल्या माहेराच्या संबंधांचा त्याग केला. माहेरच्या नात्यापेक्षा, पत्नीच्या कर्तव्यधर्माला त्यांनी विचारपूर्वक प्राधान्य दिले.
 
 
जिजाऊराणीसाहेबांना एकूण सहा अपत्ये झाली. त्याबाबत मतमतांतरे आहेत. पहिला मुलगा झाल्यावर त्याचे नाव, जिजाऊंनी आपल्या मृत पावलेल्या चुलत दिराच्या नावावरून ‘संभाजी’ ठेवले आणि दिराविषयीचा पारिवारीक जिव्हाळा दर्शविला. पूर्वी एकत्र हिंदू परिवारामध्ये चुलत, सावत्र असा भेदाभेद होत नव्हता. सर्व भावंडे सख्ख्यासारखीच गुण्यागोविंदाने एकत्र वाढत होती. पुढे जिजाऊंना चार अपत्ये झाली ती जन्मतःच दगावली. धामधुमीचा काळ, प्रवास, मानसिक ओढाताण, काळजी यामुळे ती दगावली असावीत अशी शक्यता आहे. इ.स.1630 मधील फाल्गुन वद्य तृृतीयेला त्यांनी शिवनेरी किल्ल्यावर ‘शिवाजी’ला जन्म दिला. मोठा पुत्र संभाजी वडील शहाजींसमवेत कर्नाटकात राहत होता. शहाजींना पुणेची जहागिरी मिळाली आणि माता जिजाऊसमवेत शिवबांचे पुण्यात आगमन झाले. सोन्याच्या नांगराने जमीन नांगरून माता जिजाऊने शिवबांच्या हस्ते पुण्याचा कायापालट केला. त्यांनी शिवबांवर सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, युद्धकौशल्य, आदी सर्व प्रकारचे संस्कार केले. त्यांना आपल्या मनातील हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सुयोग्य प्रकारे घडवले. त्यांनी शिवबाला थेट सदरेवर सोबत बसवून राजनीतीचे, न्यायनिवाड्याचे प्रत्यक्ष संस्कार-शिक्षण दिले.
 
 
विजापूरकर, निजामशाही, मोगल अशा सार्‍या धर्मांध कुटिल मुस्लीम राजवटींचा राजमाता जिजाऊंना चांगला अनुभव होता, त्याची दाहक वास्तवता त्यांनी जवळून पाहिली होती व त्यातून त्याच्या स्वाभिमानी मनामध्ये आपले सार्वभौम स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न उदित झाले होते, की जे केवळ स्वप्न नव्हते तर ध्येय होते. तेे त्यांनी पुत्र शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून प्रत्यक्षात आणले. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणार्‍या व ते अविरत प्रयत्नाने, ध्येयवादाने सत्यात साकार करणार्‍या राजमाता जिजाबाई या खर्‍या राष्ट्रनिर्मात्या होत्या. ‘हे राष्ट्र व्हावे ही श्रींची इच्छा आहे’ हे त्यांनी पदोपदी शिवाजीराजांच्या मनीमानसी ठसवले होते.
 
 
बिकट काळात राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची धुरा सांभाळली. शिवाजीराजे पुत्र संभाजीसह आग्य्रामध्ये मोगलांच्या कपट कैदेत होते. तेव्हा सार्‍या हिंदवी स्वराज्याच्या ‘कुलमुखत्यार’ माता जिजाबाई होत्या. त्यांच्या नावे शिक्काही होता. कर्तबगार मुलगा (शिवाजी) आणि नातू (संभाजी) दोघेही मोगलांच्या नजरकैदेत असताना या माऊलीने मोठ्या धीरोदात्तपणे समर्थपणे राज्यकारभार केला. पुढे शिवराज्याभिषेक पाहून वयाच्या 74व्या वर्षी त्यांचे इ.स.1674 साली निधन झाले. भारत सरकारने त्यांच्या अतुलनीय गौरवगाथेचा खास टपाल तिकीट प्रकाशित करून (1999साली) राष्ट्रीय सन्मान केलेला आहे.
 
धीरोदात्त येसूबाई
श्रीसखी राज्ञी जयति
 
शृंंगारपूरच्या जहागिरदार पिलाजीराव शिर्के यांची कन्या ‘राजसबाई’ यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र युवराज संभाजीराजे यांच्याशी झाला आणि ‘येसूबाई’ म्हणून शिवाजीराजांची ज्येष्ठ सून होण्याचे भाग्य त्यांना लाभले. संभाजीराजांची आई सईबाई राणीसाहेब यांचे संभाजी लहान असतानाच आजारपणात निधन झाले होते. त्यामुळे त्यांना सख्खी सासू नव्हती, सावत्र सासवा अनेक होत्या. पण येसूचे भाग्य एवढे महान की तिला आजे सासू राजमाता जिजाबाई यांचा 15 वर्षे निकटचा, जिव्हाळ्याचा सहवास लाभला. जिजाऊ मासाहेबांचे नातू संभाजीवर विशेष प्रेम होते, त्यामुळे अशा लाडक्या नातवाची, आपल्या घरातील पहिली सून म्हणून येसूबाईना त्यांचे अपार प्रेम लाभले. जिजाऊंच्याकडून त्यांना खूप शिकावयास मिळाले. ते सारे संस्कार पुढे बिकट काळात येसूबाईंना ‘वरदान’ ठरले. अचूक निर्णयक्षमता आणि कोणत्याही संकटात डगमगून न जाण्याचा धीरोदात्तपणा हे येसूबाईंचे गुण, आजेसासू राजमाता जिजाऊंची ‘देन’ होती.
 
 
 
संभाजीराजे यांच्याशी संसार म्हणजे एका वादळवार्‍याशीच संसार होता. पण त्यांनी आपल्या गुणांनी पतीचा विश्वास आणि विशेष प्रेम, मर्जी संपादन केली होती. त्यामुळे त्या बाणेदारपणे संभाजीराजांना स्पष्ट सल्लाही देत होत्या. संभाजीराजांनी त्यांना ‘श्रीसखी राज्ञी’ असे स्थान दिलेले होते. एवढेच नव्हे तर शिवाजीराजांनी येसूबाईंना ‘कुलमुखत्यार’पद, ‘शिक्काकट्यार’ दिलेली होती. अशी येसूबाईंची योग्यता होती. त्या शस्त्रविद्या पारंगत होत्या तसेच मुत्सद्दीही होत्या.
 
 
संभाजीराजे जेव्हा स्वराज्यावर रुष्ट होऊन रागाच्या भरात मोगल सरदार दिलेरखानला जाऊन मिळाले तेव्हा छत्रपती शिवाजीमहाराज व सर्वांनाच मोठा धक्का बसला. तेव्हा संभाजीराजेंबरोबर येसूबाई नव्हत्या, तर दुसरी पत्नी दुर्गाबाई व बहीण होती. अशा संकटात स्वतः येसूबाई यांनी संभाजी व दुर्गाबाईंची सुटका करण्याचे कारभार्‍यांकरवी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले, दिलेरखानाच्या हातावर तुरी देऊन संभाजी निसटले. पन्हाळ्यावर तीन वर्षांनी पिता-शिवाजीमहाराजांशी त्यांची भेट झाली होती.
 
 
vivek
 
येसूबाई यांचा स्वराज्याच्या पट्टराणीपदी पदाभिषेक झालेला होता. ‘श्रीसखी राज्ञी जयति’ असा त्यांचा शिक्का लक्षणीय होता. ‘चाफळ’ व ‘सज्जनगड’ येथील उत्सव विनासंकट उत्तम पार पडावेत म्हणून येसूबाईंनी या उत्सवास ‘अभयपत्र’ जारी करून आपल्या धर्मपरायण भक्तिभावाचे पूर्वीच दर्शन घडवलेले होते. छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदानानंतर (इ.स.1689) लगेच औरंगजेबाच्या सेनेने रायगडला वेढा घातला. रायगडवर तेव्हा संभाजी पत्नी येसूबाई - त्यांचा मुलगा शाहू, बंधूू राजाराम महाराज व कुटुंबीय होते. या सर्वांना ताब्यात घेऊन मराठ्यांचा, शिवाजीचा राजवंश संपूर्ण नष्ट करण्याचा औरंगजेेबाचा इरादा-मनसुबा होता. पण तो येसूबाईंच्या मुत्सद्दीपणामुळे धुळीस मिळाला. रायगडाला वेढा पडताच पुढील संकट लक्षात घेऊन येसूबाईंनी राजारामराजांना रायगड सोडून सुरक्षित स्थळी जाण्याची व स्वतः मुलासह रायगडवर राहून संकटास तोंड देण्याची योजना आखली. या मुत्सद्दीपणामुळे रायगड मोगलांच्या ताब्यात गेला तेव्हा मोगलांना राजारामराजे हाती लागले नाहीत. मोगल सरदारांनी येसूबाई व मुलगा शाहू यांना ताब्यात घेऊन, अहमदनगरच्या छावणीमध्ये नजरकैदेत पण मुक्त ठेवले. इ.स. 1689 ते 1719 अशी सुमारे 30 वर्षे त्या औरंगजेबाच्या नजरकैदेत आश्रित होत्या. पण हा वनवास त्यांनी धीरोदात्तपणे सहन केला. आपला बाणेदारपणा कायम ठेवला. या काळात त्यांना पैशाची गरज पडली तेव्हा त्यांनी औरंगजेबाकडे हात पसरला नाही. तर पत्र पाठवून चिंचवडच्या देवांकडून पैशाची तजवीज केली. हे पत्र उपलब्ध आहे. त्यावर ‘एसूबाई वालिद ए साहू राजवासने आहद’ असा येसूबाईंचा, मोगल कैदेतील (इ.स.1707) शिक्का आहे. येसूबाईंचा बाणेदारपणा-धीरोदात्त मुत्सद्दीपणा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक अजरामर सोनेरी पान आहे. मोगल कैदेतून 1719 साली मुक्तता होताच येसूबाई युवराज शाहूला घेऊन सर्वप्रथम वढू (कोरेगाव) येथे पती संभाजीराजांच्या स्मृतीस्थळी दर्शनास गेल्या. पुढे तेथे तुळशीवृंदावन बांधले आणि ‘श्रीसखी राज्ञी’ नाव सार्थ ठरवले. धन्य त्या राज्ञी येसूबाई!
 
 
 
रणमर्दिनी भद्रकाली ताराराणी
 
तुळजाभवानी प्रसन्न झाली । पातशाही हाती आली ।
 
दिल्ली झाली दीनवाणी । दिल्लीशाचे गेले पाणी ।
 
ताराराणी रामराणी । भद्रकाली कोपली ॥
 
 
अशा वीररसयुक्त शब्दात गोविंद कवी याने ‘रणमर्दिनी ताराबाई राणीसाहेब’ यांच्या पराक्रमाचे नेमके वर्णन केलेले आहे. छत्रपती संभाजीराजांना मारून आपण शिवाजीचे स्वराज्य संपुष्टात आणले असे वाटणार्‍या औरंगजेबाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दुसर्‍या सुनेने तब्बल 17-18 वर्षे गनिमी काव्याने जेरीस आणले. ताराराणीच्या या काळात संताजी, धनाजी यांच्या अचाट, अद्भुत, धाडसी पराक्रमाने औरंगजेेब व त्यांचे सरदार सैन्य एवढे धास्तावले की, त्यांना पाण्यात धनाजी, संताजी दिसू लागले, ‘गवताला भाले फुटले’ असे भय वाटू लागले.
 
 
छत्रपती राजाराम यांची द्वितीय पत्नी ताराबाई ही सेनापती हंबीरराव मोहिते यांची लाडकी कन्या होती. शौर्य आणि चातुर्य याचे तिला घरातच वडिलांकडून संस्कार लाभलेले होते. इ.स.1675 मध्ये जन्मलेल्या ताराबाई यांना 86 वर्षाचे आयुष्य लाभले. इ.स.1687 मध्ये त्यांचे राजारामराजे यांच्याशी लग्न झाले व त्या छत्रपती शिवरायांच्या सूनबाई झाल्या. त्यांचे जीवन विविध रोमहर्षक, अद्भुत घटना प्रसंगांचा, जयपराजयाचा, मानापमानाचा, सुखदुःखाचा, तसेच एकांत विजनवासाचा, गौरवाचा विविधरंगी पट आहे.
 
 
एका स्त्रीने बलाढ्य, शक्तिशाली, आलमगीर म्हणून मिरवणार्‍या औरंगजेेबाशी केलेला, पुरुषार्थाची शर्थ करणारा प्रदीर्घ रणसंघर्ष मराठे-मोगल इतिहासातील एक रोमहर्षक प्रकरण आहे. ताराबाईंच्या या पराक्रमाचा मराठी इतिहासकारांनी गौरव केलेलाच आहे पण मोगलांच्या दरबारी सेवेतील विदेशी इतिहासकारांनीही मुक्तकंठाने प्रशंसा केलेली आहे. इतिहासकार ‘निकोलाय मनुचि’, ‘काफीखान’, आणि ‘भीमसेन सक्सेना’ यांनी महाराणी ताराबाईंच्या शौर्याचा केलेला गौरव मराठी स्त्रीकर्तृत्वाचा ऐतिहासिक गौरव आहे. “काळाचा अचूक वेध घेणारी दृष्टी, अचूक निर्णय घेण्याची मुत्सद्दी बुद्धी आणि रणांगणात स्वतः उतरून हाती तलवार घेऊन नेतृत्व करण्याचे ताराबाईंचे शौर्य अतुलनीय आहे.” इतिहासकारांच्या या गौरवातून रणमर्दिनी, सौदामिनी ताराबाई महाराणीचे ऐतिहासिक कार्य नेमकेपणाने लक्षात येते.
 
 
छत्रपती संभाजींचा छळ करून बळी घेतल्यानंतर, लगेच क्रूर औरंग्याने संभाजीच्या कुटुंबाला ताब्यात घेण्यासाठी रायगडला वेढा घातला. ‘एकत्र राहिलो व मोगल हाती सापडलो तर संपलो, त्याहून अनेक ठिकाणी विभागून अनेक ठिकाणाहून गनिमावर हल्ला चढवू’ असे म्हणत छत्रपती राजाराम आणि ताराबाई आदींनी रायगड सोडून सज्जनगड, पन्हाळा करीत विशाळगडी आणि शेवटी ते जिंजीला शिताफीने पोचले. मागे मोगल सैन्याचा पाठलाग चालूच होता. पुढे ताराबाईंना काही वर्षे राजाराम महाराजांसमवेत जिंजी (तामिळनाडू तंजावर) येथील किल्ल्यात राहावे लागले. तेथेच त्यांना 1696 मध्ये पुत्ररत्न झाले. त्याचे नाव आजोबांच्या नावावर ‘शिवाजी’ ठेवण्यात आले. छत्रपती राजाराम महाराज अल्पायुषी ठरले. त्यांचे पुण्याजवळील सिंहगडावर 2 मार्च 1700 रोजी आजाराने निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला आता कोणी राजाच उरला नाही, असे समजून औरंगजेबाने उत्सव केला पण तो आनंद क्षणभंगुर ठरला.
 
 
ना राजा, ना पुरेसे सैन्य, ना पैसा, ना तोफा, ना शस्त्रे अशा बिकट स्थितीत महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याचा भगवा ध्वज खांद्यावर घेतला. पन्हाळा येथे छत्रपती पदावर आपल्या छोट्याशा चार वर्षाच्या पुत्राला (शिवाजी द्वितीय) बसवून राज्यकारभाराची सारी सूत्रे स्वतःकडे घेत स्वतंत्र करवीर राज्याची द्वाही फिरवली. औरंगजेेबाविरुद्धच्या संघर्षाची धुरा सांभाळली. औरंगजेबास सळो की पळो करून सोडले.
 
 
स्वतंत्र कोल्हापूर राज्याच्या संस्थापिका म्हणून इतिहासात ताराराणीसाहेबांचे स्थान अनन्य राहणार आहे. ताराबाईंचा मुलगा ‘शिवाजी’ हा या स्वतंत्र राज्याचा पहिला छत्रपती झाला. त्याला ‘छत्रपती शिवाजी द्वितीय’ तसेच ‘करवीर राज्याचे पहिले छत्रपती’ अशा दुहेरी नावाने ओळखले जाते. 1710 साली या बाल शिवाजींचे राज्यारोहण झाले आणि केवळ चार वर्षांनी घराण्यातील भाऊबंदकी, सवतीमत्सर याने राजवाड्यात ‘रक्तशून्य सत्तांतर’ झाले. सवतीचा (राजसबाई) मुलगा संभाजी (दुसरा) हा छत्रपती झाला आणि त्याने ‘ताराराणी’ व ‘शिवाजी’ दोघांना कैद केले गेले. या छत्रपती संभाजीराजांनी इ.स.1766 पर्यंत 52 वर्षे राज्य केले. ताराबाईंना विजनवासात दिवस काढावे लागले. 1726 मध्ये ताराबाईंचे पुत्र शिवाजीराजे यांचे निधन झाले. पुत्रवियोगानंतर ताराबाई करवीर सोडून सातार्‍याला छत्रपती शाहूमहाराज (येसूबाई संभाजी पुत्र) यांच्याकडे राहण्यास गेल्या. तेथेही त्यांना त्यांच्या स्वभावामुळे काही वर्षे कैदेतच रहावे लागले. पुढे शाहूमहाराजांनंतर ताराराणीचाच नातू रामराजे यास दत्तक घेऊन सातारा गादीवर बसवण्यात आले. छत्रपतींची आजी म्हणून ताराराणीचा हस्तक्षेप राज्यकारभारात वाढला. त्यामुळे छत्रपती रामराजे आणि आजी ताराराणीत वितुष्ट आले.
 
 
ताराराणीसाहेब यांच्या जीवनात इतके चढउतार, मान-अपमानाचे प्रसंग आले आहेत की एवढे कोण्या दुसर्‍या स्त्रीच्या वाट्याला आलेले नाहीत. त्यांचे सारे आयुष्य वाद-विवाद व संघर्षाच्या वादळी स्वरूपाचे होते. कर्तृत्वाचे सर्वोच्च शिखर गाठून ‘रणमर्दिनी’, ‘भद्रकाली’ म्हणून गौरवलेल्या या महाराणीस, एकदा सवतीच्या मुलाच्या (करवीर छत्रपती संभाजी) कैदेत तर दुसर्‍यांदा पुतण्याच्या (सातारचे शाहूमहाराज) कैदेत 19 वर्षे काढावी लागली. एका महापराक्रमी सेनापतीची कन्या, महान राज्यकर्ते छत्रपती शिवरायांची सून असलेल्या स्त्रीच्या विधिलिखिताचा हा उदय-अस्ताचा आलेख अचंबित करणारा आहे. ताराराणीचा जन्म शिवराज्याभिषेक वर्षात झाला आणि मृत्यु पानिपताच्या पराभवाच्या वर्षात झाला (1761). या दोन घटना ताराराणीच्या जीवनाच्या सूचक आहेत. तरीही ताराराणीचे इतिहासातील शौर्य व स्थान अनन्य आहे, संस्मरणीय आहे.
 
 
करवीर राज्यरक्षक राणी जिजाबाई
 
भोसल्यांच्या राजघराण्यात दोन जिजाबाईंच्या कर्तबगारीची यशोगाथा अजरामर आहे. पहिल्या जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवरायांच्या, ’स्वराज्य संकल्पक’ राजमाता जिजाऊ मांसाहेब’ आणि दुसर्‍या करवीरचे छत्रपती संभाजी (द्वितीय) राजे यांची चौथी धर्मपत्नी ’करवीर राज्यरक्षक’ राणी जिजाबाई! या दुसर्‍या जिजाबाई जणू राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा अवतारच होत्या, असे त्यांचे कार्यकर्तृत्व आहे.
 
 
भद्रकाली राणी ताराबाई यांनी करवीरचे स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि या दुसर्‍या जिजाबाई राणीसाहेबांनी ते स्थिरस्थावर करून त्याचे रक्षण केले. अशा प्रकारे कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य एका स्त्रीने स्थापन केले व दुसर्‍या स्त्रीने त्यास स्थैर्य प्राप्त करून दिले. एक दोन नव्हे तब्बल 70-75 वर्षे, करवीर राज्याच्या इतिहासाची पाने ताराबाई आणि जिजाबाईच्या मुत्सद्दीपणाने व शौर्याने व्यापलेली आहेत.
 
 
करवीरच्या या जिजाबाईंचा जन्म, पराक्रमी तोरगलकर शिंदे घराण्यात झाला. नरसोजी शिंदे यांची कन्या आणि जिवाजी शिंदे यांची मानसकन्या. घरातच धैर्य, शौर्य आणि राजकारणाचे संस्कार घेऊन वाढलेली. इ.स.1726मध्ये जिजाबाईंचे लग्न करवीरचे छत्रपती संभाजीराजे यांच्याशी झाले. त्यावेळी छत्रपती संभाजीराजे 28 वर्षाचे तर जिजाबाई 13-14 वर्षाच्या होत्या. जिजाबाई या राजे संभाजीच्या चौथ्या धर्मपत्नी होत्या. संभाजीराजेंनी सात विवाह केले पण त्यांना एकही मुलगा झाला नाही. अखेर गादीसाठी दत्तक घेण्याचेच त्यांचे विधिलिखित होते.
 
 
सासू राजसबाईंचे प्रोत्साहन
 
छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री राजसबाई यांना आपला मुलगा करवीर गादीवर बसावा अशी इच्छा-महत्त्वाकांक्षा होती. ती त्यांनी दरबारातील कारभार्‍यांना वश करून पूर्ण केली. कारभार्‍यांच्या मदतीने त्यांनी राणी ताराबाईंचा मुलगा सत्तारूढ छत्रपती शिवाजी (द्वितीय) यांना अटक केली आणि संभाजीराजेंचा सिंहासनाधिपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. अशा महत्त्वाकांक्षी राजसबाई यांची चौथी सून होण्याचे भाग्य जिजाबाईंना लाभले होते. जिजाबाईंची धडाडी, तत्परता, समंजस स्वभाव आणि एकूण हुशारी पाहून सासू राजसबाई यांच्या त्या विशेष लाडक्या सूनबाई होत्या. सासूसमवेत सारे राजकारण, कारभार जवळून पाहण्याची संधी त्यांना लाभली. 1726 ते 1751 एवढा प्रदीर्घ काळ त्यांना सासूबाईंचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
 
 
इ.स.1945 पूर्वीच्या अनेक दरबारी पत्रांमध्ये राणी जिजाबाईंचे नाव आढळते यावरून त्या राजकारभारात लक्ष घालत होत्या हे स्पष्ट होते. इ.स.1740 मध्ये जिजाबाई राणीसाहेबांनी ज्योतिबाच्या डोंगरावर यमाईदेवीच्या देवळासमोर तळे बांधून यात्रेकरू व गावकर्‍यांच्या पाण्याची सोय केली होती. तेथे राणी जिजाबाईंचा ठळक निर्देश असलेला शिलालेख असून आजही आपण तो पाहू शकतो. या शिलालेखावर ’श्रीराजा शंभू छत्रपती धर्मपत्नी वज्रचुडेमंडित उभयकुलवर्धिनी जिजाबाई’ असा गौरवपूर्ण उल्लेख आहे.
शौर्य व मुत्सद्दीपणाचा संगम
 
 
राणीसाहेब जिजाबाई या छत्रपती संभाजीराजेंसमवेत राज्यकारभारात सक्रिय भाग घेत होत्याच. वेळप्रसंगी सशस्त्र होऊन आघाडीवर जाऊन नेतृत्व करीत होत्या. करवीर राज्यातील ठाणेदार अर्जोजी यादव यांनी अन्य काही ठाणी बळकावण्याचा सशस्त्र प्रयत्न केला तेव्हा जिजाबाईंनी सशस्त्र प्रतिकार करून त्याचे पारिपत्य केले होते. करवीर राज्याला त्यावेळी सर्व बाजूंनी संकटांनी व हितशत्रूंनी घेरलेले होते. 1) सातारच्या छत्रपती शाहूंच्या द्वारे पेशवे, 2) पेशव्यांद्वारे सांगलीचे सरदार पटवर्धन, 3) इचलकरंजीचे सरदार घोरपडे आदी, तसेच 4) सावंतवाडीचे भोसले, आणि 5) कोकण समुद्रकिनार्‍याहून इंग्रज अशा सर्वांच्या नजरा करवीर राज्य ताब्यात घेण्यावर होत्या. वेळोवेळी संघर्ष होत होते. या सर्वांशी दरबारी व लष्करी दोन्ही आघाड्यांवर सक्षमपणे समर्थपणे तोंड देण्यात जिजाबाईंचा छत्रपती संभाजीच्या कामात मोठा पुढाकार होता. सर्व पत्रव्यवहार व मसलतीमध्ये जिजाबाई यांचे अनन्य स्थान होते. सातारचे छत्रपती शाहू यांच्या मौन संमतीने पंतप्रधान नानासाहेब पेशवे करवीरला वेगवेगळ्या सरदारांमार्फत त्रास देत होते. करवीर राज्य सातारमध्ये विलीन करून दोन्ही राज्ये एक करण्याचा पेशव्यांचा मनसुबा होता. जिजाबाई यांचा त्याला स्वाभिमानाधिष्ठित तीव्र विरोध होता. या सर्व स्व-बांधव हितशत्रूंशी लढण्यात, संघर्ष करण्यात जिजाबाई यांनी जो मुत्सद्दीपणा-चातुर्य आणि बाणेदारपणा दाखवला तो एका स्त्रीच्या पतीधर्मपरायण निष्ठा व स्वाभिमानाची गाथा आहे.
 
 
दत्तक घेऊन राज्य राखले
 
 
इ.स.1761 मध्ये करवीरचे छत्रपती संभाजी यांचे निधन झाले. त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे राज्याला-गादीला वारस पाहिजे म्हणून ते दत्तक घेण्याच्या विचारात होते. त्यावेळी सर्वत्र पेशव्यांचे वर्चस्व होते. त्यांची दत्तक घेण्यास मान्यता गरजेची होती. नानासाहेब पेशव्यांचे निधन होऊन माधवराव नवे पेशवे, पंतप्रधान झालेले होते. या संधीचा लाभ घेण्याची योजना मुत्सद्दी जिजाबाईंनी आखली. त्यांनी तीर्थयात्रेचा बहाणा केला व जेजुरीस मुक्काम ठोकला. जिजाबाईंना पेशवे वडिलकीच्या मानाने ’आईसाहेब’ मानत होते. कारभार्‍याकडून जिजाबाई जेजुरीत आल्याचे कळताच माधवराव पेशवे भेटीस गेले. या भेटीत जिजाबाईंनी चातुर्याने डाव टाकून माधवराव पेशवेंकडून दत्तक घेण्यास संमती मिळवली. त्या माधवरावांना म्हणाल्या - ’दत्तक घेण्यास त्वरित मान्यता द्या, अन्यथा मला तीर्थक्षेत्री देह अर्पण करण्यास सदिच्छा द्या आणि मग करवीरचे काय करायचे ते करा.’ हे निर्वाणीचे शब्द ऐकताच माधवरावांनी दत्तक घेण्यास होकार दिला. जिजाबाईंनी केवळ होकारावर विश्वास न ठेवता बेलभंडार घेऊन शपथपत्र तयार करून घेतले. एवढेच नव्हे तर माधवरावांसमवेतच त्या शनिवारवाड्यात (पुणे) आल्या. शनिवारवाड्यात त्यांचा मानसन्मान व सत्कार झाला. अशा प्रकारे अंगीभूत चातुर्याने जिजाबाई यांनी दत्तक घेण्याचा कार्यभाग सिद्धीस नेऊन करवीरचे ’स्वतंत्र राज्य राखले’ हे त्यांचे कार्य करवीरच्या इतिहासातील ऐतिहासिक पर्व आहे.
 
 
जिजाबाई राणीसाहेबांचा राजकीय पत्रव्यवहार प्रकाशित झालेला आहे. त्यातून त्यांच्या कर्तबगारीचे अनेक पैलू लक्ष वेधून येतात. इ.स.1765 साली त्यांनी इंग्रजांशी केलेला एक करार उपलब्ध आहे. इ.स.1773 मध्ये त्यांचे निधन झाले. मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार स्त्री काळाच्या पडद्याआड गेली. हिंमत, धोरणीपणा, मनाची दृढता, स्वाभिमान, समजूतदारपणा आणि बाणेदार चातुर्य या अनेक गुणांमुळे जिजाबाई राणीसाहेबांची कामगिरी इतिहासामध्ये संस्मरणीय व प्रेरणादायी आहे.
 
शंभु राजस्य भार्यायां जिजादेव्यां
धरातले बालेंदुरिव वर्धिष्णु
मुद्राभद्राय विराजते !
 
ही जिजाबाई राणीसाहेबांची मुद्रा-शिक्का इतिहासावरचा अक्षर ठसा आहे.
 
महाराणी दुर्गाबाई - महादजी शिंदेंना प्रत्युत्तर
 
(काळ 1773 ते 1779)
 
महाराणी दुर्गाबाई या छत्रपती संभाजीराजांच्या सहाव्या धर्मपत्नी होत्या, म्हणजेच महाराणी जिजाबाईंची धाकटी सवत होत्या. महाराणी जिजाबाईंचे इ.स.1773ला निधन झाल्यावर दत्तक शिवाजीराजेंना राज्यकारभारात मदत करण्यास दुर्गाबाई आईसाहेबांनी पुढाकार घेतला आणि 1779मध्ये निधन होईपर्यंत त्यांनी कणखरपणे राज्यकारभार केला. 1773 ते 79 अशी 6-7 वर्षेच त्यांना लाभली. पण या काळामध्ये त्यांनी पुण्यातून नाना फडणवीसांच्या आदेशाने करवीर राज्याचा कायमचा बंदोबस्त करण्यास फौजा घेऊन आलेल्या मुरब्बी सेनानी महादजी शिंदे यांना निकराने प्रत्युत्तर दिले. दुर्गाबाई यांनी येसाजी शिंदे यांना पूर्ण पाठिंबा व मदत देऊन महादजी शिंदेंच्या बलाढ्य फौजेला 3-4 महिने झुंजवत ठेवले. मुरब्बी महादजींसारख्या सेनानीशी लढणे सोपे नव्हते. पण मनाचा कणखरपणा व करवीर राज्याचा स्वाभिमान या दोन गोष्टींनी महाराणी दुर्गाबाईंनी तोडीस तोड प्रत्युत्तर दिले, हार मानली नाही. सैन्य मदतीसाठी त्यांनी राज्याचे जुने मित्र म्हणून कनार्टकातील हैदरशी संपर्क केला होता. समझोता करून करवीरचे स्वतंत्र राज्य अबाधित राखले. या महाराणी दुर्गाबाई मूळच्या मोहित्यांच्याच शूरवीर घराण्यातील कन्या होत्या .
 
महाराणी सईबाई तथा दिवाणसाहेब
(इ.स.1800-1861)
महाराणी सईबाई तथा दिवाणसाहेब या छत्रपती संभाजी (तिसरे) तथा आबासाहेब यांच्या तिसर्‍या धर्मपत्नी होत्या. त्या नारायण शिर्के यांच्या कन्या होत्या. आश्चर्य म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पहिल्या धर्मपत्नीचे नावही सईबाईच होते. त्या त्रिंबकराव खानवेलकर यांच्या घरातील होत्या. त्यांचे विवाहानंतर लवकरच निधन झाले, त्यामुळे या दुसर्‍या सईबाईंचे नाव न बदलता तसेच ठेवले. तरी पण सर्वजण त्यांना ’दिवाणसाहेब’ या नावाने ओळखत होते. या सईबाई उर्फ दिवाणसाहेब यांना एक मुलगा होता. त्याचे नाव शिवाजी उर्फ बाळासाहेब-बाळराजे (1816) होते. छत्रपती संभाजी यांना चार बायकांमध्ये फक्त दिवाणसाहेब राणीलाच मुलगा असल्याने त्यांना भावी छत्रपतीच्या भावी राजमाता म्हणून सन्मान दिला जात होता.
 
 
इ.स. 1821 छत्रपती संभाजी तथा आबासाहेब यांचा वयाच्या 30व्या वर्षी खून (1821) होऊन दुर्दैवी शेवट झाला. तोही खून चक्क राजवाड्यात भर दुपारी झाला. आबासाहेबांची छत्रपती पदावरील कारकिर्द केवळ नऊ वर्षांची ठरली. आणि पुन्हा छत्रपतीपदाचा वाद निर्माण झाला. आबासाहेबांचा मुलगा बाळराजे खूपच लहान होता आणि छत्रपती संभाजींचे धाकटे सावत्र बंधू शहाजी तथा बुवासाहेबांनी छत्रपती व्हावे असे सर्वांचे मत होते. त्यांचा राज्यकारभारात भाग पण होता त्यामुळे बुवासाहेब गादीवर बसणे रास्त होते. पण आजी सुंदराबाई आणि आई सईबाई-दिवाणसाहेब यांचा मुलगा बाळराजेंऐवजी सावत्र धाकट्या दिराने (बुवासाहेब) छत्रपती बसण्यास तीव्र आक्षेप-विरोध होता.
 
 
खरे तर बुवासाहेब यांची एक धर्मपत्नी बबई राणीसाहेब या सईबाई दिवाणसाहेब यांची सख्खी धाकटी बहिण होती. पण मुलगा छत्रपती होऊन आपण राजमाता म्हणून राज्यकारभार करावा अशी सईबाईंची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. थेट इंग्रजांशी संपर्क केला. करवीर राज्य तेव्हा इंग्रज कंपनी सरकारच्या वर्चस्वाखाली होते. या वाटाघाटी व मसलीच्या काळामध्ये दुर्दैवाने सईबाईंचा मुलगा बाळराजे बाळासाहेब गोवराच्या आजाराने (1822) मृत्युमुखी पडला आणि दीर बुवासाहेबांना इंग्रजांनी छत्रपतीपदी बसवले. बुवासाहेब छत्रपती होताच त्यांची ज्येष्ठ धर्मपत्नी आनंदी तथा ताराबाई या महाराणी झाल्या आणि करवीरच्या राजघराण्यात आनंदीबाई विरूद्ध सईबाई दिवाणसाहेब यांच्यात सुप्त वर्चस्वाचे डावपेच-राजकारण सुरू झाले.
 
 
इ.स.1838मध्ये छत्रपती बुवासाहेब यांचे तीर्थयात्रेला गेलेले असतानाच श्रीक्षेत्र पंढरपूरजवळ निधन झाले. पंढरपुरात नदीकाठी दहनविधी पार पडला. तेव्हा तेथेच सर्व प्रमुख मानकर्‍यांसमोर मुख्य कारभारी रामराव देसाई यांनी महाराजांची मुले अजून लहान आहेत हे लक्षात घेऊन घरातील ज्येष्ठ, अनुभवी म्हणून राणीसाहेब ’सईबाई उर्फ दिवाणसाहेब’ यांच्या नावे द्वाही जाहीर केली. या सईबाईंची एक बहीण बबईराणीसाहेब या बुवामहाराजांची एक धर्मपत्नी होत्या. त्या सती जाण्यास आग्रही होत्या. पण ब्रिटिशांचा सती बंदी कायदा लागू होता म्हणून तो प्रसंग टळला. 1838 डिसेंबरमध्ये बुवामहाराजांचे ज्येष्ठ पुत्र युवराज शिवाजी उर्फ बाबासाहेब गादीवर बसले व नवे छत्रपती झाले. पण राज्यकारभारावर सईबाई दिवाणसाहेब यांचे वर्चस्व कायम होते.
 
 
इ.स.1844 मध्ये इंग्रज राजवटीविरूद्ध अनेक ठिकाणी उठाव, उद्रेक, बंडाळी झाली. ती मोडून काढण्यात इंग्रजांना यश आले पण प्रचंड तारांबळ उडाली. करवीर राज्यातील उठावामागे राणीसाहेब सईबाई उर्फ दिवाणसाहेब यांचा हात व सहकार्य असल्याचे तपासात ब्रिटिशांना कळले आणि त्यांनी सईबाई दिवाणसाहेब यांना कैद करून पुण्याला नेले. तेथून अहमदनगरच्या किल्ल्यात नेऊन नजरकैदेत ठेवले. करवीरमधील उठावातील प्रमुखांना इंग्रजांनी फाशी दिली व करवीरवर आपला लष्करी अंमल अधिक कडक केला. इ.स.1861 मध्ये ब्रिटिश कैदेतच राणी सईबाई तथा दिवाणसाहेबांचा मृत्यू झाला. ब्रिटिशांविरूद्ध उठाव करण्याचे त्यांचे धाडस आणि बाणेदारपणे माफी न मागता ब्रिटिश कैदेत स्वाभिमानाने मरण पत्करणार्‍या या राणीसाहेबांचे नाव मराठ्यांच्या इतिहासातील राजमाता जिजाबाई, झुंझार धीरोदात्त येसूबाई आणि रणमर्दिनी ताराबाई या कर्तबगार स्त्रियांच्या बरोबरीने अजरामर आहे. स्वाभिमान व स्वत्वाची प्रेरणाज्योत प्रज्वलित करणारे आहे. या सार्‍या कर्तबगार स्त्रियांना मानाचा मुजरा! मातृशक्तीला विनम्र वंदन!
 
 
(संदर्भ ः करवीर रियासत कागदपत्रे ः संपा.-गर्गे ; * मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध ः पगडी सेतूमाधवराव; * ताराबाईकालिन कागदपत्रे (भाग 1,2)
टीप ः करवीर राज्याच्या इतिहासात 5 शिवाजी, अनेक संभाजी, अनेक शाहू, अनेक राजाराम, अनेक ताराबाई झाल्या आहेत. श्रद्धेने तीच तीच नावे पुढच्या पिढ्यात ठेवली गेली आहेत.)
Powered By Sangraha 9.0