भैरप्पांचा सत्यशोध स्वस्त कधीच नव्हता. त्यांच्या पुस्तकांवर, त्यांच्यावर अनेकदा टीका झाली, पण भैरप्पांना त्याची कधीच फिकीर नव्हती. ‘लेखकाची निष्ठा फक्त सत्याशी असावी-विचारसरणीशी नाही, लोकप्रियतेशीही नाही.’ हाच भैरप्पांचा जीवनमंत्र होता. भैरप्पा दाखवून गेले की, लेखकाची पहिली निष्ठा ही सत्याशीच असली पाहिजे, जरी ते सत्य अस्वस्थ करणारं, अप्रिय असलं, तरी... अशा माणसाला योग्य निरोप हाच असेल की सत्याप्रती असलेल्या त्यांच्या अविचल निष्ठेची आणि भारताच्या सनातन मूल्यांशी असलेल्या बांधिलकीची आठवण पुढच्या पिढीच्या वाचकांनी ठेवावी.

इतिहासात असे काही दुर्मीळ क्षण येतात, जेव्हा एखाद्या लेखकाचा नश्वर देह नष्ट होतो, पण त्याचे शब्द पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतात. असे कालातीत साहित्य प्रसवणारा साहित्यिक शतकातून एकदोनदाच जन्म घेतो. कन्नड साहित्याचे मानदंड असलेले संतेशिवरा लिंगण्णैया भैरप्पा हे असे लेखक होते, ज्यांचं साहित्य भाषा, काल, संदर्भ ह्या सर्व भिंती लीलया ओलांडून भारतभरातल्या करोडो वाचकांपर्यंत पोचलं. 24 सप्टेंबर 2024 रोजी वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी बंगळुरूमध्ये देह ठेवला खरा पण भैरप्पांचं साहित्य मात्र अविनाशी आहे. एस. एल. भैरप्पा यांनी केवळ वाचनीय कादंबर्या मागे ठेवल्या नाहीत तर अनेक विचारांचा, प्रश्नांचा आणि प्रखर, प्रांजळ सत्याचा ठेवा ते त्यांच्या वाचकांसाठी सोडून गेलेत.
भैरप्पा गेले ही बातमी कळली तेव्हा माझ्यासकट त्यांच्या करोडो वाचकांना आपल्या घरातलीच एक वडीलधारी व्यक्ती गेल्यासारखं दुःख झालं. माझी त्यांच्या साहित्याशी तोंडओळख झाली ती उमा आणि विरुपाक्ष कुलकर्णी यांच्या प्रयत्नांमधून झालेल्या त्यांच्या कादंबर्यांच्या उत्कृष्ट मराठी अनुवादांमधून. उमाताईंनी हे मराठी वाचकांवर करून ठेवलेले उपकार आहेत खरे तर! त्यांच्या अनुवादातून उलगडत गेलेले भैरप्पा मराठी वाचकांना इतके भावले की त्यांच्या कादंबर्या आवडलेल्या कित्येक वाचकांना ते मराठी लेखकच वाटतात.
मी भैरप्पांची सर्वप्रथम वाचलेली कादंबरी म्हणजे आवरण. फार थोड्या साहित्यकृतींमध्ये वाचकांची झोप घालवण्याची ताकद असते. आवरण ह्या पुस्तकाने मला अंतर्बाह्य हलवून सोडलं. त्यानंतर झपाटल्यासारखी मी भैरप्पांची मिळतील ती पुस्तके वाचायला सुरुवात केली. वंशवृक्ष, सार्थ, मंद्र, तंतू आणि महाभारतावरचा त्यांचा महाग्रंथ-पर्व, सर्वच्या सर्व पुस्तके मी उमा कुलकर्णींच्या अनुवादातून सलग वाचून काढली. भैरप्पांच्या अफाट अभिव्यक्तीने, प्रत्येक कादंबरीसाठी त्यांनी केलेल्या सखोल संशोधनाने, त्यांच्या कादंबर्यांच्या विषयवस्तूंच्या अफाट व्याप्तीने आणि उमाताईंच्या समर्थ अनुवादातून अभिव्यक्त झालेल्या त्यांच्या भाषेच्या सौंदर्याने मी खरोखरी स्तिमित झाले.
उमाताईंनी ‘मी भैरप्पा‘ ह्या शीर्षकाने अनुवादित केलेले त्यांचे आत्मचरित्र भित्ती आणि त्यांच्या बालपणीच्या विदारक अनुभवांवर आधारलेले अर्ध-आत्मचरित्रात्मक गृहभंग ही दोन पुस्तकं वाचली की समजतं ते कुठल्या दिव्यातून गेलेत. भैरप्पांचं आत्मचरित्र त्यांनी अतिशय अलिप्तपणे लिहिलं आहे. त्यांच्या आयुष्यात जे घडलं, जसं घडलं ते त्यांनी जसंच्या तसं कागदावर उतरवलेलं आहे. पण त्यांच्या आयुष्याचा प्रवासच इतका विलक्षण आहे की त्यापुढे त्यांची कुठलीही कादंबरी फिकी वाटावी.
कर्नाटकच्या संतेशिवरा ह्या हासन जिल्ह्यातल्या छोट्या गावाची पिढीजात शानभोगकी म्हणजे कुलकर्णीपद असलेल्या घरात भैरप्पांचा जन्म झाला, एका होयसळ ब्राह्मण घरात. त्यांचे वडील अत्यंत विक्षिप्त, बेजबाबदार आणि संसाराविषयी सर्वस्वी उदासीन होते. ते आपले कामही नीट करायचे नाहीत. जेमतेम चार पुस्तकं शिकलेली त्यांची आईच सगळे गावचे हिशेब ठेवायची. शिक्षणासाठी म्हणून भैरप्पांना त्यांच्या मामाच्या घरी ठेवण्यात आलं, पण मामाने त्यांचा खूप मानसिक आणि शारीरिक छळ केला, त्यातच त्यांच्या आईचा आणि मोठ्या भावाचा प्लेगमुळे अकाली मृत्यू त्यांना सोसावा लागला. आईचं तर अंत्यदर्शनही त्यांच्या नशिबात नव्हतं. अकाली गेलेल्या आईची उणीव ही भळभळती, चिरंतन वेदना अश्वत्थाम्यासारखी निरंतर कपाळावर बाळगतच भैरप्पा आयुष्यभर जगले.
आई गेल्यानंतर भैरप्पा जवळजवळ देशोधडीलाच लागले. वडिलांनी त्यांच्या शिक्षणाची किंवा इतर कसलीही जबाबदारी घ्यायला नकार दिल्यामुळे वारावर जेवून, अनाथाश्रमात राहून त्यांनी शिक्षण घेतलं. अगदी उदबत्ती विकण्यापासून ते हॉटेलमध्ये स्वयंपाक करण्यापर्यंतची सगळी पडेल ती कामं केली. काही काळ साधूंबरोबर भटकंती केली, मुंबईला स्टेशनवर हमालीही केली. तरीही त्यांनी जीवनापुढे हार मानली नाही. अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर भैरप्पांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. इतके सगळे भोग भोगून देखील त्यांनी तत्त्वज्ञान ह्या विषयात मैसुरु विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळवलं. पुढे सौंदर्यशास्त्र ह्या विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘सत्य आणि सौंदर्य-सत्य मत्तु सौंदर्य’. याच प्रबंधाने त्यांच्यामधला साहित्यिक घडवला. खरं तर त्यांच्या संपूर्ण साहित्याचाच काय, त्यांच्या संपूर्ण आयुष्याचाच धागा ह्याच दोन तत्त्वांभोवती गुंफलेला दिसतो, सत्य आणि सौंदर्य.
घराघरांत नाव झालेले प्रख्यात कन्नड कादंबरीकार होण्यापूर्वी भैरप्पांनी अध्यापनाचं काम केलं. आधी कर्नाटकात, मग दिल्लीतील एनसीईआरटीमध्ये, आणि पुढे गुजरातमधील विश्वविद्यालयांत आणि शेवटी मैसुरु विद्यापीठात त्यांनी शिकवलं. अध्यापक हा त्यांच्या दृष्टीने नुसता पेशा नव्हता, अध्यापन हे त्यांच्या तत्त्वचिंतनाच्या यात्रेचा अविभाज्य भाग होतं. अध्यापकाची नोकरी करताना आपल्या मानी स्वभावामुळे त्यांनी अनेक लोकांकडून अपमान सोसले. विद्यापीठात नोकरी करत असतानाच नोकरी सांभाळून त्यांनी एकापेक्षा एक अशा सुंदर कादंबर्या लिहिल्या. वंशवृक्ष ही प्रसिद्ध कादंबरी लिहिली तेव्हा भैरप्पा फक्त 26 वर्षांचे होते.
तत्त्वज्ञान हा विषय शिकवत असल्यामुळे असेल कदाचित, पण भैरप्पांच्या प्रत्येक साहित्यकृतीला स्वतःचा असा एक नैतिक केंद्रबिंदू असतो. त्यांच्या प्रत्येक कादंबरीत एक तरी अशी व्यक्तिरेखा असते जी आजूबाजूला काहीही घडलं तरी, सभोवतालचा सतत बदलता काळाचा पट कितीही सामाजिक, मानसिक स्थित्यंतरं घडवून आणत असला तरी ती व्यक्तिरेखा आपल्या मूल्यांपासून ढळत नाही. एस. एल. भैरप्पा यांची ही ‘आधारस्तंभ’ पात्रं आपली नैतिक मूल्ये कधीही सोडत नाहीत. त्यांच्या कादंबर्यांतली इतर पात्रं संघर्ष करतात, भूमिका बदलतात, चुकतात, स्खलीत होतात, पण ह्या व्यक्तिरेखा कधीही डळमळीत होत नाहीत. धर्म, परंपरा, चिरंतन सत्य, नैतिकता ह्या शाश्वत मूल्यांचे निष्ठुर प्रतीक म्हणूनच जणू भैरप्पा ह्या व्यक्तिरेखा रंगवतात .
आणीबाणीच्या वेळच्या राजकीय स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवरच्या ‘तंतू’ह्या कादंबरीत अशी व्यक्तिरेखा गावातील वृद्ध पुजार्याची आहे, जो अटक झाली तरी आपल्या शुचिर्भूततेच्या नियमांवर ठाम राहतो. ‘आवरण’मध्ये नायिका लक्ष्मीच्या वडिलांचं म्हणजे नरसे गौडा ह्यांचं पात्र असं आधारस्तंभ आहे, जे पोटची मुलगी स्वत:पासून दुरावतानाही खरं ऐतिहासिक सत्य उघड करण्याबाबत आग्रही असतात. ‘पर्व’मध्ये हा नैतिक आधारस्तंभ पितामह भीष्म आहेत, ज्यांची भयंकर भीष्मप्रतिज्ञा पुढच्या सगळ्या अपरिहार्य घटनाचक्राला जन्म देते. ‘तंतू’मध्ये अशी दुसरी व्यक्तिरेखा अण्णय्या आहेत, जी भ्रष्ट समाजातही आपल्या व्यक्तिगत नीतिमूल्यांवर ठाम राहते. ‘सार्थ’मध्ये ती व्यक्ती नागभट आहे, जो आजूबाजूला उठलेल्या सांस्कृतिक वावटळीतही एक जिज्ञासू विद्वान म्हणून आपला सत्याचा शोध अखंड सुरू ठेवतो. ‘वंशवृक्ष’मध्ये ही व्यक्तिरेखा नंजुंडय्या आहेत जे आपल्या धर्ममूल्यांना जपण्यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार होतात.
भैरप्पांची ही सगळी आधारस्तंभ पात्रं रूढार्थाने त्या त्या कादंबरीच्या नायक-नायिका असतातच असं नाही. कधी त्या व्यक्तिरेखा शोकात्म असतात, तर कधी कठोर आणि निष्ठुर, तर कधी शांत आणि तेजस्वी. पण सर्वांची कादंबरीतली साहित्यिक भूमिका एकच असते-सातत्याचा, शाश्वत मूल्यांचा आधारस्तंभ म्हणून उभे राहणे. आपल्या प्रत्येक पुस्तकात भैरप्पा वाचकाला परत परत स्मरण करून देतात की राजकारण, इतिहास आणि मानवी दौर्बल्य यांचे वारे कसेही वाहत असले, तरीही जीवनाचं एक नैतिक केंद्र असतं जे कधीही ढळत नाही.
भैरप्पांनी केवळ वाचकांची घटकाभर करमणूक करावी ह्या मर्यादित उद्देशाने कधीच काही लिहिलं नाही. त्यांच्या कुठल्याही कादंबरीची कथावस्तू ही पारंपरिक प्रश्न मांडणी - संघर्ष - समाधान अशी सरळसोट आणि सुखांत नसतेच. त्यांची प्रत्येक साहित्यकृती म्हणजे एक वैचारिक उत्खनन, आध्यात्मिक उकल, आणि मानवी मनाच्या तळाचा प्रवास असतो. आपल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं,‘वर्षोनुवर्षे संशोधन केल्याशिवाय मी काही लिहीतच नाही, एखादा विषय सर्वांगाने समजून घेतल्याशिवाय मी साहित्य निर्माण करूच शकत नाही’. ही वैचारिक स्पष्टता त्यांच्या चोवीसही कादंबर्यांमध्ये स्पष्ट उमटलेली दिसते. वंशवृक्षसाठी 1966साली भैरप्पांना कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. या कादंबरीत पिढीजात परंपरा आणि वैयक्तिक स्वातंत्र्य ह्यांच्यामधल्या संघर्षाची गोष्ट भैरप्पांनी फार सुंदर रंगवली आहे.
‘पर्व’ हा महाभारतावरचा भैरप्पांचा महाग्रंथ वाचकाला मुळापासून हादरवून टाकतो. महाभारतावरचे देवत्वाचे पारंपरिक कवच उतरवून भैरप्पांनी या महाकाव्याला मानवी कोंदणात बसवलं आहे. कौरव असोत की पांडव, ह्यातल्या कुठल्याच व्यक्तिरेखा दैवी भासत नाहीत; शंका, वासना, दुर्बलता असलेली तुमच्या आमच्यासारखीच माणसं भैरप्पांनी रंगवलेली आहेत. ‘पर्व’ वाचताना महाभारत नव्या नजरेनं दिसू लागतं-धर्म, सत्ता, निष्ठा आणि नीतिमत्ता हे प्रश्न किती सनातन आहेत याची जाणीव चटका लावून जाते.
‘मंद्र’ने शास्त्रीय संगीताचं आतलं जग वाचकांपुढे उलगडलं, संगीताच्याच नव्हे तर जीवनाच्याही सुरावटींची थेट चौकशी केली. ‘तंतू’ने आणीबाणीच्या काळातील मूल्यांच्या क्षयावर भाष्य केलं, माणसांचं नैतिक पतन, स्खलन दाखवलं. ‘सार्थ’ ही तर भारताच्या भूतकाळातून निघालेली दीर्घ तत्त्वयात्रा, इतिहास, तत्त्वज्ञान आणि कल्पनाशक्ती यांचं वेधक विणकाम.
पण मला, आणि कदाचित त्यांच्या बहुसंख्य वाचकांना सर्वात खोलवर भिडलेलं त्यांचं पुस्तक म्हणजे ‘आवरण’. आपल्या कथावस्तूमुळे अतिशय वादग्रस्त ठरलेली ही कादंबरी म्हणजे फक्त कन्नडच नव्हे तर सर्व भारतीय साहित्यातला एक मैलाचा दगड आहे. ‘आवरण’ कादंबरीची नायिका लक्ष्मी ही एक हिंदू मुलगी. आमिर नावाच्या एका मुसलमान युवकाच्या प्रेमात पडून ती तिच्या वडिलांच्या, म्हणजे नरसे गौडा ह्यांच्या इच्छेविरुद्ध धर्मांतर करून त्याच्याशी निकाह करते. वडिलांशी संबंध तोडून रजिया बनून ती आमिरबरोबर राहते. हळूहळू तिला प्रागतिक विचारांचा म्हणवणार्या आमिरचा खरा धर्मांध चेहरा दिसायला लागतो आणि तिचा पुरता भ्रमनिरास होतो. पण पुढे जेव्हा ती हंपीला एक निधर्मी डॉक्युमेंटरी करण्याच्या निमित्ताने जाते तेव्हा मुसलमानी सैन्याने केलेला हंपीच्या देवळांचा, मूर्तींचा भयानक विध्वंस बघून तिच्या डोळ्यांवरचं निधर्मी मायापटल हळूहळू फाटायला लागतं. हे मायापटल म्हणजेच ते आवरण, कादंबरीचे शीर्षक.
याच सुमारास तिच्या वडिलांचा मृत्यू होतो व त्यांच्या वस्तूंची उस्तवार लावण्यासाठी म्हणून लक्ष्मी अनेक वर्षांनी तिच्या माहेरी जाते. तिथे तिला तिच्या वडिलांनी इस्लाम धर्म, त्यांच्या चालीरिती, भारतात व भारताबाहेर धर्माच्या नावाखाली घडवलेला विध्वंस या विषयांवर असंख्य ग्रंथ जमवून त्यांचा अभ्यास केलेला आहे हे जाणवतं. त्यांनी लिहून ठेवलेल्या मुद्द्यांचा विचार करता करता लक्ष्मीच्या मनात एक कादंबरी आकार घेते. मुसलमानी आक्रमणाच्या वेळी प्राण पणाला लावून न लढता प्राणभयामुळे लपून बसलेल्या एका हिंदू राजपूत राजकुमाराची झालेली वाताहत हा त्या कादंबरीचा विषय. राजकुमार पकडला जातो आणि त्याचे शारीरिक खच्चीकरण करून त्याला हिजडा बनवलं जातं. मुसलमान सरदारांच्या विकृत वासनेचा गुलाम इतकीच त्याची ओळख उरते. त्या गुलामांच्या नजरेतून भैरप्पा मुसलमान शासकांनी भारतातल्या हिंदू प्रजेवर केलेले अत्याचार, हिंदू, बौद्ध, व जैन मंदिरांचा केलेला विध्वंस इत्यादी ऐतिहासिक सत्याचे फार विदारक चित्रण करतात. ’कादंबरीतली कादंबरी’ ह्या अभिनव तंत्राने लिहीलेली आवरण ही भैरप्पांची कादंबरी अगदी पहिल्या पानापासून वाचकांची पकड घेते. वाचकांना अतिशय अस्वस्थ करणार्या ह्या कादंबरीवर अगदी प्रकाशनापूर्वीच वादळं उठली. प्रकाशन व्हायच्या आधीच आवरण कादंबरीवर बंदीची मागणी जोर धरू लागली.
2007 साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी आजही भैरप्पांची सर्वात लोकप्रिय कादंबरी आहे. आवरण मध्ये भैरप्पांनी इतिहास कसा लिहिला जातो, खरा इतिहास कसा लपवला जातो आणि योजनाबद्ध रितीने इतिहासाचे विकृतीकरण कसे केले जाते यावर स्पष्ट प्रकाश टाकला आहे. आवरण औपचारिकरित्या प्रकाशित व्हायच्या आधीच पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या सर्व प्रती विकल्या गेल्या होत्या. फक्त पाच महिन्यांत आवरणच्या दहा आवृत्या प्रसिद्ध झाल्या. वाचकांकडून कादंबरीला ‘न भूतो, न भविष्यती’ असा प्रतिसाद मिळाला, पण तितकीच भैरप्पांवर जहरी टीकेची वादळंही उसळली. टीकाकारांचं म्हणणं होतं की, आवरण मधलं इस्लामी अत्याचाराचे वर्णन एकांगी आहे. कर्नाटकमधलेच काही डाव्या विचारांचे लेखक आणि साहित्यिक ह्या टीकेच्या अग्रभागी होते. कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांनी आवरणचं वर्णन धोकादायक असं केलं होतं. नाटककार गिरीश कर्नाड यांनीही आवरणच्या विरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती. काही इस्लामी संघटनांनी पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणीही केली, पण इतका दबाव येऊनही भैरप्पा आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आवरण ही त्यांच्या वर्षानुवर्षांच्या ऐतिहासिक संशोधनाची फलश्रुती आहे असं त्यांनी कादंबरीतच संदर्भ ग्रंथांची यादी देऊन सप्रमाण दाखवून दिलं होतं, वर त्यांनी जाहीर आव्हान दिलं होतं की कोणीही आपल्या पुस्तकातली चूक सप्रमाण दाखवून दिली, तर ते तत्काळ पुस्तक मागे घेतील. पण त्यांच्या पुस्तकाची तर्कशुद्ध, संदर्भाधारित प्रतिवादक समीक्षा कुठलाच टीकाकार करू शकला नाही. परिणामी, जसजसा विरोध झाला तसतशी ‘आवरण’ अधिक लोकप्रिय होत गेली. 2014 मध्ये संदीप बालकृष्णन यांनी आवरणचा इंग्रजी अनुवाद (Aavarana: The Veil) प्रसिद्ध केला आणि कादंबरीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळालं. आतापर्यंत आवरण अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आहे आणि कन्नडमध्ये तर आवरणच्या तब्बल चौपन्न आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
आवरण कादंबरीच्या शेवटी असं दाखवलंय की, लक्ष्मीच्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रक्षुब्ध झालेला धर्मांध इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा जमाव तिच्यावर हल्ला करायला येतो आणि तेव्हा तिच्या नवर्याचं, आमिरचं अचानक हृदयपरिवर्तन होतं आणि तो लक्ष्मीला जमावापासून वाचवतो. मला कादंबरीचा हा शेवट अजिबात पटला नव्हता, कारण जो नवरा बायकोच्या मनाविरुद्ध तिला गोमांस खाऊ घालतो, ती स्वतःचं ऐकत नाही म्हणून तिला तलाक देऊन दुसरी बायको करतो, त्या नवर्याचं मत असं अचानक कसं बदलेल? मला हा शेवट फार खटकला होता, आणि भैरप्पांना हे कधीतरी प्रत्यक्ष भेटून मला सांगायचं होतं. 2019 साली मंगळूर साहित्य महोत्सवात माझ्या सुदैवाने ती संधी मला मिळाली. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटले तेव्हा मी खूप भीतभीत आणि चाचरत चाचरतच त्यांना सांगितलं की,‘आमिरचं हृदयपरिवर्तन अजिबात पटणारं नाही.’
मला वाटलं होतं की, असं सांगितल्यावर माझ्यावर भैरप्पा एकतर भडकतील तरी किंवा माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मला उडवून तरी लावतील. पण त्यांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, काही काळ गप्प राहिले, थोडा विचार केला आणि नंतर म्हणाले की ’हो, तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे खरं. कदाचित कादंबरीचा शेवट हिंदू-मुस्लिम सामंजस्यात व्हावा असा आशावादी विचार तेव्हा माझ्या मनात प्रबळ झाला असावा म्हणून मी तो अंत तसा लिहिला असेल.’ मी दुसर्या दिवशी त्यांची मुलाखत घेणार होते. ते मला स्वतःहून आवर्जून म्हणाले की, ’तू जेव्हा माझी मुलाखत घेशील तेव्हा हा प्रश्न मला जरूर विचार. मी प्रांजळपणे उत्तर देईन’. एवढा मोठा लेखक माझ्यासारख्या एका सामान्य वाचकाचं म्हणणं इतक्या मोठ्या मनाने ऐकून घेईल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.
दुसर्या दिवशी प्रख्यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या सौजन्याने मी भैरप्पांची यूट्यूबसाठी दीर्घ मुलाखत घेतली. ते मनापासून आणि प्रांजळपणे बोलले. मी आवरणच्या शेवटाचा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा त्यांनी परत प्रांजळपणे कबूल केलं की ते पुस्तक लिहिताना थोडासा भाबडा आशावाद त्यांच्या मनात होता म्हणून तो शेवट त्यांनी तसा लिहिला. मी विचारलेले प्रश्न त्यांना आवडले असावेत कारण नंतर त्यांनी माझा फोन नंबर घेतला. काही आठवड्यांनी मला त्यांच्या मुलाकडून फोन आला की त्यांच्या वाढदिवसानिमित्त मैसुरुमध्ये मोठा भैरप्पा साहित्य महोत्सव होणार आहे आणि तिथे मी भैरप्पांच्या मला आवडलेल्या पुस्तकावर बोलावं आणि त्यांची प्रकट मुलाखत घ्यावी ही खुद्द भैरप्पांची इच्छा आहे. मला अर्थात आभाळ ठेंगणं झालं. त्या महोत्सवाच्या निमित्ताने मैसुरुला गेले तेव्हा चार दिवस भैरप्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा निकट सहवास मला लाभला. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर भरपूर गप्पा करता आल्या. अत्यंत आनंददायी आणि खूप काही शिकवून जाणारे मौल्यवान क्षण होते ते माझ्यासाठी.
मैसुरुला मला खर्या अर्थाने कळलं साहित्यिक म्हणून कर्नाटकात भैरप्पा किती मोठे आणि किती वाचकप्रिय आहेत ते. कर्नाटकच्या कुठल्या कुठल्या भागातून सामान्य वाचक स्वतःचा पैसा आणि वेळ खर्च करून मैसुरुला आले होते. उत्तर कर्नाटकमधल्या एका छोट्या खेड्यात केशकर्तनालय चालवणारा एक माणूस तीन बसेस बदलत बारा तासांचा प्रवास करून मैसुरुला फक्त भैरप्पांची स्वाक्षरी घ्यायला आणि त्यांना भेटायला म्हणून आला होता. वाचकांचं असं प्रेम लाभायला भाग्य लागतं. भैरप्पा त्याच्याशी ज्या आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने बोलले होते ते अनुभवून त्याच्या डोळ्यात पाणीच उभं राहिलं होतं. वाचकांचं हे अकृत्रिम प्रेम हीच भैरप्पांची खरी ताकद होती.
तसे भैरप्पा नेहमीच साहित्यिक वर्तुळाबाहेर राहिले. अनंतमूर्ती वगैरे त्यांच्या समकालीन लेखकांप्रमाणे भैरप्पांनी कधीच साहित्यिक कंपूबाजी केली नाही. भैरप्पा लिहित होते तेव्हा कन्नड साहित्यामध्ये ‘नव्य’ चळवळ आपलं अधिराज्य प्रस्थापित करत होती. कुठे बंडाया गटातले साहित्यिक आपले झेंडे पुढे दमटवत होते, तर कुठे कन्नड दलित साहित्यिक आपले विद्रोही साहित्य निर्माण करत होते. पण भैरप्पा या कुठल्याच गटात कधीच नव्हते. ते शांतपणे, चिवटपणे विद्यार्थ्यांना शिकवत होते. वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करत होते आणि एकाहून एक सरस कादंबर्या लिहित होते. भैरप्पा सदैव शिस्तबद्ध, एकांतप्रिय, आणि सत्याशी एकनिष्ठ राहिले. कुठल्याच ‘इझम’मध्ये त्यांना अडकायचं नव्हतं. त्यांचं वैचारिक स्वातंत्र्य त्यांनी कसोशीने जपलं. त्या बदल्यात त्यांना जहरी टीका, बदनामी, अगदी काही साहित्यिक कंपूंचा बहिष्कारही सहन करावा लागला. तरीही ते अविचल राहिले, फक्त अंतःस्वराच्या आज्ञेने लिहित राहिले.
ह्या त्यांच्या अलिप्त, तत्त्वनिष्ठ आणि निर्भीड लेखनामुळेच वाचकांनी भैरप्पांवर अभूतपूर्व असं मन:पूर्वक प्रेम केलं. भैरप्पा लिहित गेले. पुरस्कार मिळत गेले-2010चा सरस्वती सन्मान, 2015ची साहित्य अकादमी फेलोशिप, 2016चा पद्मश्री, 2023चा पद्मभूषण-पण सरकार दरबारी कुठलाही अधिकृत सन्मान मिळण्यापूर्वीच भैरप्पांनी वाचकांची हृदये जिंकली होती. त्यांच्या लेखी तोच सर्वोच्च सन्मान होता. त्यांच्या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्त्या बाजारात येण्याआधीच खपून जात. भैरप्पांच्या वाचकांमध्ये सर्वच सामाजिक-आर्थिक स्तरांतील लोक होते. 2019मध्ये मैसुरुमध्ये झालेल्या ‘भैरप्पा साहित्य महोत्सवा’चा शेवट मी कधीच विसरणार नाही. खचाखच भरलेल्या हॉलमध्ये वंदे मातरम सुरू होतं, स्टेजवर एकटे भैरप्पा होते आणि गीत संपलं तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वच्या सर्व दीड हजारावर प्रेक्षकांनी भैरप्पांना स्टँडिंग ओव्हेशन दिलं. पूर्ण पाच मिनिटे झाली तरी टाळ्या संपत नव्हत्या! तो टाळ्यांचा गजर आजही, हा लेख लिहितानाही माझ्या कानात गुंजतोय.
विशेष म्हणजे भैरप्पांच्या वाचकांमध्ये स्त्रियांचे प्रमाण लक्षणीय आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. त्यांच्या कादंबर्यांमधल्या सर्वच स्त्री व्यक्तिरेखा विलक्षण लक्षवेधी आणि प्रभावी आहेत. भैरप्पांची कुठलीच नायिका मूकपणे अन्याय सहन करणारी सहनशील, अबला नारी नाही. त्यांच्या सर्व नायिका ह्या हाडामासाच्या जिवंत, कणखर स्त्रिया आहेत, ज्यांची व्यक्तिमत्त्वं एकरेषीय नसून अतिशय गुंतागुंतीची आहेत. भैरप्पांनी रंगवलेल्या माझ्या विशेष आवडत्या व्यक्तिरेखा म्हणजे आवरण मधली लक्ष्मी, सार्थ मधली चंद्रिका, पर्वमधली द्रौपदी आणि गृहभंगमधील नंजम्मा, जी भैरप्पांच्या त्यांच्या स्वतःच्या आईच्या व्यक्तिरेखेवरून बेतलेली आहे.
गृहभंग ही भैरप्पांच्या आईचीच गोष्ट आहे, आणि तिचा धाकटा मुलगा विश्व, म्हणजे स्वतः भैरप्पा. भैरप्पांनी स्वतःच एके ठिकाणी म्हटलंय की, ’बालपणीच्या आठवणी सांगायच्या म्हटलं की, पावलोपावली ’गृहभंग’ आडवी येते. ’गृहभंग’ ही माझी एक कादंबरी. आमचं गाव, आई-वडील, महादेवय्या, अक्कय्या, रामण्णा, मी, आजी, धाकटा काका, बागूरचा मामा, रामपूरचे कल्लेगौडा ही सारी माणसं तिथं कादंबरीतली पात्रं होऊन आली आहेत.’
गृहभंगमधल्या नंजम्माचा नाकर्ता नवरा कसलीच जबाबदारी घेत नाही, फक्त स्वतःपुरतं पाहतो. सासू शिवराळ आणि कजाग असते. पदरी तीन पोरं असतात. दारिद्रयाच्या पाशात अडकलेली, वैवाहिक जीवनाचा छळ सोसणारी, निर्दयी सासूच्या अत्याचारांना तोंड देणारी, तरीही आपल्यातला मूलभूत चांगुलपणा नष्ट न होऊ देणारी नंजम्मा अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या अंगभूत धैर्याच्या, बुद्धीच्या जोरावर परिस्थितीवर मात करू पाहते. शानभोगकीचे हिशेब शिकून घेते, पळसाच्या पत्रावळी लावते, मुलांना शाळेत घालते. दर दीड वर्षांनी घरी पाळणा हलत असतो. तेही सर्व भोग सोसून स्वतःचा घरसंसार उभा करू पाहते. आपल्या मुलांना चांगलं आयुष्य आणि चांगले संस्कार देण्यासाठी जीवाचं रान करते. तिच्या आयुष्यात स्वतःसाठी निर्भेळ आनंदाचे क्षण कसे ते नाहीतच. जैमिनीचं महाभारत, सीता स्वयंवरसारखे ग्रंथ मुखोद्गत असलेल्या नंजम्माला कितितरी वेळा प्रश्न पडतो की मानवी जीवन असंच असतं का आणि जर असंच असेल तर मग त्याचा अर्थ काय.
भैरप्पांची लेखणी तटस्थपणे घडल्या घटना मांडत असते. त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा बघायला गेलं तर एका बाजूला आपल्याला नंजम्माचा अविरत संघर्ष दिसतो, तिचा कणखर सोशिकपणा दिसतो, दुसर्या बाजूला तिची जाऊ सातम्मा हिची परिस्थितीशरणता दिसते. तिची सासू गंगम्मा हिचा कातडीबचाऊ स्वार्थ दिसतो, नंजम्माची वहिनी, कमलू हिचा स्वकेंद्रित विकृतपणाही दिसतो. मानवी स्वभावाचे कंगोरे जसे दिसले तसे भैरप्पा मांडतात, कुणाचीही बाजू घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. कदाचित त्यामुळेच नंजम्माची व्यक्तिरेखा आपल्या मनात इतकं घट्ट घर करून राहते. एका मागोमाग असे नियतीचे घाव नंजम्मावर का पडावेत ह्या विचाराने वाचक सुन्न होतो. गृहभंग वाचताना आपल्याही आसपास दिसणार्या अनेक नंजम्मा आपल्या नजरेसमोरून तरळून जातात आणि हेच भैरप्पांच्या लेखणीचं खरं यश आहे. भैरप्पांच्या कादंबरीतल्या स्त्रिया अनेक यातना सहन करतात; पण रडत-विव्हळत नाहीत. आपलं आंतरिक धैर्य गमावत नाहीत. त्या जखमी होतात, पण मोडत नाहीत. त्या व्यक्तिरेखा समजून घेणं म्हणजे भारतीय स्त्रीत्वाच्या शांत, पण धीरोदात्त स्वरूपाला समजून घेणं.
भैरप्पांचा सत्यशोध स्वस्त कधीच नव्हता. त्यांच्या पुस्तकांवर, त्यांच्यावर अनेकदा टीका झाली, आवरणवर सांप्रदायिकतेचे आरोप झाले, तंतू राजकीय असल्याची टीका झाली. इतिहास, धर्म, संस्कृती, भारतीय तत्त्वज्ञान यांवरची त्यांची स्पष्ट, निर्भीड मतं कन्नड साहित्यात आपली संस्थानं प्रस्थापित करून बसलेल्या डाव्या विचारांच्या साहित्यिकांना कधीच पटली नाहीत, त्यामुळे भैरप्पांना कन्नड साहित्य वर्तुळाने जवळजवळ वाळीतच टाकलं गेलं. पण भैरप्पांना त्याची कधीच फिकीर नव्हती. मी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं, ‘लेखकाची निष्ठा फक्त सत्याशी असावी-विचारसरणीशी नाही, लोकप्रियतेशीही नाही.’ हाच भैरप्पांचा जीवनमंत्र होता. काँग्रेसच्या काळात राजकीय शिष्टाचारांच्या वा पुरस्कारांच्या वार्यावर अनेक लेखक पोफळीसारखे डोलू लागले त्या वेळी भैरप्पा एखाद्या पुरातन वटवृक्षासारखे खंबीर उभे राहिले होते, न उन्मळता.
आपल्या वैयक्तिक आयुष्यात भैरप्पा अत्यंत साधे आणि मितभाषी होते. मी त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटले तेव्हा माझ्यावर त्यांच्या लौकिकाचं खूप दडपण होतं. पण प्रत्यक्षात ते अतिशय शांत आणि प्रेमळ वाटले. पण त्यांच्या नजरेत एक भेदक तेज होतं. ते बोलताना आपला प्रत्येक शब्द सोन्याच्या नाण्यांसारखा जपून खर्च करत असत आणि कोणाचे ऐकताना समोरच्याला पूर्ण सन्मान देत.
मी जेव्हा आवरणच्या शेवटाबद्दल त्यांच्याशी असहमती व्यक्त केली होती तेव्हा त्यांनी ना माझ्याकडे दुर्लक्ष केलं ना मला उडवून लावलं. माझी टीका त्यांनी शांतपणे ऐकून घेतली, त्यावर विचार केला, आणि मान्यताही दिली. त्या दिवशी मला उमगलं, खरा मोठेपणा स्वतःच स्वतःचं कौतुक करण्यात नसतो तर समोरच्याचं विचारपूर्वक ऐकण्यात असतो.
एस. एल. भैरप्पांनी मागे ठेवलेला त्यांचा वारसा काय? केवळ त्यांच्या स्वतःच्या चोवीस कादंबर्या? केवळ त्यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार? अजिबात नाही. भैरप्पांचा खरा वारसा म्हणजे त्यांनी जागवलेली विचारशील तरुण वाचक मने, सहना विजयकुमारसारखी शिष्या आणि वैचारिक वारसदार. त्यांनी त्यांच्या पुस्तकातून मागे ठेवलेले विचार. भैरप्पांनी त्यांच्या वाचकांना शिकवलं की साहित्य म्हणजे केवळ मनोरंजन करणार्या छान छान गोष्टी नाहीत तर साहित्य एक आरसा आहे ज्यात इतिहास, तत्त्वज्ञान, संस्कृती, राजकारण, आणि मानवी मनाची गुंतागुंत ह्या सर्वांचं प्रतिबिंब त्यात पडणं अपेक्षित आहे.
लिहिणं म्हणजे जोखीम पत्करणं, दुखावणं, प्रश्न विचारणं, स्वतःलाच गाभ्यापर्यंत सोलून रक्तबंबाळ करणं. भैरप्पा दाखवून गेले की, लेखकाची पहिली निष्ठा ही सत्याशीच असली पाहिजे, जरी ते सत्य अस्वस्थ करणारं, अप्रिय असलं, तरी.
कर्नाटकमधल्या सामान्य वाचकांसाठी भैरप्पा दूरस्थ देव नव्हते; ते घराघरांत वाचले जाणारे, चौकात चर्चिले जाणारे, शाळांमध्ये वादविवाद पेटवणारे, लोकप्रिय लेखक होते. उमा कुलकर्णीं, संदीप बालाकृष्णन आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक समर्थ अनुवादकांमुळे भैरप्पांना संपूर्ण भारतभरचे वाचक लाभले. एस. एल. भैरप्पा त्यांनी जसं लिहिलं तसेच ते जगले-साधेपणाने, प्रामाणिकपणाने, धैर्याने. अशा माणसाला योग्य निरोप हाच असेल की सत्याप्रती असलेल्या त्यांच्या अविचल निष्ठेची आणि भारताच्या सनातन मूल्यांशी असलेल्या बांधिलकीची आठवण पुढच्या पिढीच्या वाचकांनी ठेवावी. भैरप्पांनी आपल्याला भूतकाळाकडे डोळसपणे पाहण्याचं सामर्थ्य दिलं. त्यांनी आपल्याला पटवून दिलं की सौंदर्य आणि सत्य हे एकमेकांचे विरोधक नाहीत, तर सोबती आहेत; आणि साहित्य हे एकाच वेळी काव्यमय आणि कठोर, कोमल आणि प्रखर असं दोन्ही असू शकतं, नव्हे असावं, आणि हाच त्यांचा खरा वारसा आहे.