आपल्या खंडप्राय देशाला अत्यंत प्राचीन वारसा लाभलाय. आपली संस्कृती जगातील एक आद्य संस्कृती आहे. याचा प्रत्यय दक्षिणेत फिरताना ठाईठाई येतो. आपली मंदिरे ही नुसती प्रार्थनास्थळे नव्हती तर ऊर्जास्थाने होती. अतिशय सकारात्मक शक्ती आपल्या मंदिरांत वास करून असते. तामिळनाडूत श्रीविष्णूच्या मंदिरांची संख्या लक्षणीय आहे. या मंदिरांचा एक समूह आहे. महाविष्णूची 108 स्थाने ‘दिव्य देसम्’ म्हणून ओळखली जातात. दिव्य म्हणजे पवित्र तर देसम् म्हणजे स्थान. आपल्या सात्विक सौंदर्याने आणि अजोड शिल्पकलेने मनाला भुरळ घालणार्या, भक्तिभाव जागवणार्या दिव्य देसम्विषयी.
2022 चा सरता डिसेंबर महिना होता तो. मी, माझी आई आणि माझी मुलगी श्रीरंगमच्या श्रीरंगनाथस्वामी मंदिरात पोहोचलो तेव्हा तिन्हीसांजेची वेळ झाली होती. हे मंदिर जगातील सर्वात मोठे असे हिंदू मंदिर आहे. मंदिराच्या आसपास बरीच गडबड उडाली होती. पोलीस बंदोबस्त होता. नक्की काय झालंय असा विचार करतच गोपुरातून आत प्रवेश केला आणि एकदम अंगावर आली ती म्हणजे लोकांची गर्दी. यत्र-तत्र-सर्वत्र नुसती माणसेच माणसे! लोक जणू काही इथे मुक्कामाला आलेत की काय असे त्यांच्याकडे बघून वाटत होते. त्यांच्यातून वाट काढत समोर असलेल्या एका मंदिरात आम्ही पोहोचलो तर तिथे उत्सवमूर्तीला पालखीत ठेवले होते. संगीतसेवा सुरू होती. आजुबाजूचे लोक त्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी अक्षरशः झटत होते. पण तिथले वातावरण काही वेगळेच होते. अतिशय भक्तिमय वातावरण होते ते. तिथली संगीतसेवा मनाचा अगदी ठाव घेत होती. जगातल्या सगळ्यांत मोठ्या मंदिरात आपण चेपून निघत आहोत याचे काही भानच आम्हांला नव्हते. तिथून कसेबसे बाहेर पडून पहिला मोकळा श्वास घेतला आणि नंतर कळले की दुसर्या दिवशी वैकुंठ एकादशी होती, त्याचा सोहळा तिथे चालला होता. इतक्या गर्दीच्या ठिकाणी मी परत कधीच गेले नसते पण त्या मंदिरात असे काहीतरी होते की, ते मला परत परत खेचत होते. वैकुंठ एकादशीबरोबर आणि श्रीरंगम् मंदिराशी झालेली ही माझी पहिली ओळख.
या वैकुंठ एकादशीच्या साधारण पाच-सहा दिवस आधीची गोष्ट. तेव्हा आम्ही कांचीपुरमला होतो. तिथले एकाम्रेश्वरम आणि कांची कामाक्षी मंदिर बघून विष्णुकांचीत म्हणजेच वरदराज पेरुमाळ मंदिरात आलो तोपर्यंत मध्यान्ह होत आली होती. तामिळनाडूच्या शिरस्त्याप्रमाणे मंदिर बंद होण्याची वेळ झाली होती. पण इथे दर्शनासाठी थोडा जास्त वेळ लागेल हे आधीच माहीत असल्यामुळे थांबण्याची तयारी होती. रांगेतून पुढे जात असताना, आम्ही गर्भगृहाजवळ आलो. समोरच्या पेरूमाळकडे नजर गेली आणि मी भान हरपून पाहतच राहिले. जणू ट्रान्समध्ये गेले. महाविष्णूची इतकी उंच, मोठी मूर्ती मी तोवर कधी पाहिली नव्हती. इतका देखणा, हसरा पेरूमाळ बघून मला काय झालं ते कळलंच नाही... नकळतपणे मी सुद्धा हसले. ती मूर्ती, एक क्षण मला मूर्ती वाटलीच नाही तर समोर कोणीतरी अतिशय हसरा व प्रेमळ मनुष्य माझ्यासमोर उभा आहे असा मला भास झाला. तो क्षण मला वरदराजाबरोबर एकदम कनेक्ट करून गेला. हा एक क्षण जसा होता तसाच श्रीरंगनाथाच्या वैकुंठ एकादशीचा दिवस. त्यानंतर मी अधिकाधिक श्रीविष्णुस्थानांकडे ओढली गेले. त्यानंतर मग मात्र मी वाचत गेले. या संदर्भातील जे साहित्य वाचायला मिळेल त्यावर अगदी तुटून पडले. तमिळ भाषा अगदीच अपरिचित असल्याने इंग्लिशमधून वाचत गेले. सुरुवातीला प्रचंड गोंधळ झाला. काही ठिकाणी परस्परविरोधी नोंदी होत्या तर उच्चारांचा घोळ व्हायचा. अतिशय कठीण नावे असल्याने ते लक्षात ठेवणे म्हणजे मोठाच टास्क होता. तसेही वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करायला आणि त्याबद्दल जाणून घ्यायला मला फार आवडते. मग ही तर आपलीच संस्कृती होती. यातूनच दिव्य देसम् मंदिरांचे वैभव माझ्यासमोर खुले झाले आणि मी त्यांत अगदी न्हाऊन निघाले.
त्या ट्रिपमध्ये तमिळनाडूची भव्य-दिव्य मंदिरे पाहून मी अतिशय स्तिमित झाले होते. या ट्रिपच्या आधी मी, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स असलेली ढहश ॠीशरीं उहेश्रर ढशाश्रिशी आणि महाबलीपुरम व पंचमहाभूते मंदिरे पाहायची, तिरुमलाच्या व्यंकटेशाचे दर्शन घ्यायचे आणि परत एकदा मदुराई आणि रामेश्वरमला जायचे अशी काहीशी कल्पना केली होती. पण झाले भलतेच. मी मनापासून तिथे रमले. प्राचीन भारतात नांदून गेलेल्या कलासक्त सम्राटांनी बांधलेली अत्यंत आगळीवेगळी मंदिरे, दिव्यत्वाची प्रचिती देणारे मंदिरांतील विग्रह आणि मंदिरांत केलेले अद्वितीय कोरीवकाम यांची मनाला फार भुरळ पडली. माझ्या त्या ट्रिपमध्ये मी मुख्यत्वेकरून शिवाच्या मंदिरांचे दर्शन घेतले होते. त्या ट्रिपचा प्रत्येक दिवस आश्चर्याचे धक्के देत होता. रोज असे नवीन काहीतरी पाहिले जाई जे आधी पाहिले त्यापेक्षा विलक्षण असे. तिरुमलाचा व्यंकटेश म्हणजे श्रीविष्णूचे देवस्थान आहे किंवा कांचीपुरममध्ये ’वरदराज पेरूमाळ’ म्हणजे सुद्धा श्रीविष्णूच आहे हे माहीत होते. परंतु तामिळनाडूत, श्रीविष्णूची अजून बरीच मंदिरे आहेत याचा ’शोध’ लागला. पेरूमाळ म्हणजे श्रीविष्णू किंवा कोविल म्हणजे मंदिर हे ठाऊक झालं. महाराष्ट्रात किंवा अगदी उत्तरेकडे श्रीविष्णूची मंदिरे नसतात. अपवाद फक्त कोकणाचा की जिथे दिवेआगरचा ’सुंदरविष्णू’, आसूदचा ’केशवराज’, कोळीसर्याचा ’लक्ष्मीकेशव’ इ. आपल्याकडे मूळ श्रीविष्णूपेक्षा त्याचे अवतारच जास्त पूजले जातात. मग ती राम मंदिरे असोत, कृष्ण मंदिरे असोत किंवा नृसिंह मंदिरे. दक्षिणेत श्रीविष्णूचे अवतार पूजले जातातच परंतु मूळ स्वरूपातील श्रीविष्णू सगळ्यांत जास्त पूजला जातो. उत्तर आणि दक्षिण भारतातील वैष्णव मंदिरांतला हा मूलभूत फरक आहे. दक्षिणेत वराह आणि नृसिंह अवतारांची मंदिरे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. आपल्याला नारायण, माधव, केशव, जनार्दन अशी श्रीविष्णूची नावे माहीत असतात. खरे पाहता ही फक्त नावेच नाहीत. तर या नावांच्या मूर्तीही वेगवेगळ्या आहेत. श्रीविष्णूने हातात शंख व पद्म धारण केले असते. ही लांच्छने आहेत तर चक्र व गदा ही आयुधे आहेत. या आयुधांचा जो क्रम आहे त्यानुसार नामांच्या मूर्ती असतात. होयसळांची मंदिरे अशा मूर्तींसाठी प्रसिद्ध आहेत.
आपल्या खंडप्राय देशाला अत्यंत प्राचीन वारसा लाभलाय. आपली संस्कृती जगातील एक आद्य संस्कृती आहे. याचा प्रत्यय दक्षिणेत फिरताना ठाईठाई येतो. उत्तरेकडील बहुतांश प्राचीन मंदिरे ही लुटारूंच्या टोळ्यात उध्वस्त झाली असल्याने हा प्राचीनतम वारसा फक्त दक्षिणेत टिकून राहिलाय. इथेही नासधूस झाली नाही असे नाही. प्रत्यक्ष श्रीरंगम्, मदुराई या धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मंदिरांवर घाला पडलाय. पण उत्तरेकडे दुर्दैवाचे दशावतार जेवढे झाले तेवढे दक्षिणेत झाले नाहीत. उत्तरेला मंदिरांची नागर शैली विकसित झाली तर दक्षिणेत गोपुरांची द्रविड संस्कृती विकसित झाली. बरेचदा मंदिरे दाक्षिणात्य शैलीसारखी दिसली तरी त्यांत थोडीशी भिन्नता आहे. कर्नाटकातील गोपुरे ही गाईच्या शिंगांसारखी असतात. बर्याचदा मंदिरांवर गाय बसवलेली दिसून येते तर तामिळनाडूतील मंदिरे मात्र अतिशय विस्तीर्ण असतात, भव्यदिव्य असतात आणि त्यांचे क्षेत्रफळ काही एकरांत असते. उंचच उंच गोपुरे असतात. केरळातील मंदिरे अतिशय साधी, उतरत्या छपरांची असतात. मंदिराला नंदादीप लावलेले असतात. पणत्या ठेवायला लोखंडी ओळी केलेल्या असतात.
आपली मंदिरे ही नुसती प्रार्थनास्थळे नव्हती तर ऊर्जास्थाने होती. अतिशय सकारात्मक शक्ती आपल्या मंदिरांत वास करून असते. प्राचीन काळापासून आपल्या भारत देशात पाच पंथ नांदत होते. ते होते शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य आणि सौर. आपल्या संस्कृतीचे आदिगुरू शंकराचार्यांनीसुद्धा पंचायतन परंपरा सुरू केली. त्यांची परपरा शैवपेक्षाही ’स्मार्त’ होती. वाळवंटातून आपल्या संस्कृतीवर वरवंटा फिरवणारी विध्वंसक वावटळ येणार असल्याने हिंदू धर्माचे रक्षण करण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल हे भविष्य फक्त याच महापुरुषाने जाणले होते. त्यासाठी त्यांनी भारताच्या चारही टोकांवर चार मठ स्थापन केले. तसेच ’अद्वैत’ सिद्धांत मांडला. जर आदिशंकराचार्य नसते तर आज हिंदू धर्माचे अस्तित्व ही खूप कठीण गोष्ट झाली असती.
हिंदू धर्माला जशी आस्तिकता मान्य होती तशी नास्तिकताही मान्य होती. हिंदू धर्माइतकी लवचीकता इतर कुठल्याच धर्मात नाही. बर्याचदा एखाद्या घरातील एक जण शैव असतो, एक वैष्णव तर कोणी शाक्त परंपरेनुसार देवीची भक्ती करत असतो. कोणावर कसलीच सक्ती नाही. डोळस श्रद्धा, भक्ती आणि सतत बदलत राहण्याची मानसिकता हेच आपल्या धर्माचे सौंदर्य आहे, नाही का?
तामिळनाडूत शिवाची आणि श्रीविष्णूच्या मंदिरांची लक्षणीय संख्या आहे. या मंदिरांचा एक समूह आहे. भारतील काही मंदिरांमध्ये हा समूह पॅटर्न दिसून येतो. तामिळनाडूतील सर्वात महत्त्वाचा पॅटर्न म्हणजे, शिवाची 276 मंदिरे जी ’पाडल पेट्र’ स्थाने म्हणून ओळखली जातात तर महाविष्णूची 108 स्थाने ‘दिव्य देसम्’ म्हणून ओळखली जातात. यांपैकी आपण दिव्य देसम् स्थानांबद्दल जाणून घेऊ.
ही पेरूमाळ कोविल वैष्णव परंपरेशी निगडीत स्थाने आहेत. दिव्य म्हणजे पवित्र तर देसम् म्हणजे स्थान. तामिळ वैष्णव संतांना ’आळ्वार’ म्हणतात. हे तामिळ आळ्वार 12 होते. आळ्वार म्हणजे ’पूर्णपणे समर्पित’. हे आळ्वार विष्णुभक्तीत पूर्णपणे रममाण झाले होते. इसवी सनाच्या पाचव्या ते आठव्या शतकात हे बारा आळ्वार होऊन गेले. ह्या आळ्वारांनी निश्चित केलेली 108 स्थाने म्हणजेच दिव्य देसम्.
आता अस्तित्वात असलेली तामिळनाडूमधील सगळीच मंदिरे ही दीड ते दोन हजार वर्षांपूर्वी बांधली आहेत. मात्र विग्रहांचे अस्तित्व तिथे होतेच. एकाच जागी परत परत मंदिर बांधली गेली. या आळ्वारांनी पूर्ण भारतभरात 106 मंदिरे शोधली. तिथल्या पेरूमाळवर पासुरामी म्हणजे श्लोक रचले. मंदिरातील थायरचे किंवा नच्चियारचे म्हणजेच लक्ष्मीदेवीचे वर्णन केले. मंदिराच्या विमानाचे आणि तिथे असलेल्या पुष्करणीचे वर्णन केले. तिथल्या स्थलपुराणाचे वर्णन केले. आळ्वारांनी वर्णन केलेली मंदिरे आधीपासूनच अस्तित्वात होती. मात्र आळ्वारांनी नेमकी महत्त्वाची अशी मंदिरे शोधली आणि त्यांना दिव्य देसम् नामक या एका सूत्रात जोडले. या पासुरामींची संख्या 4000 इतकी असून त्या ’नालयिरा दिव्य प्रबंधम’ या ग्रंथात एकत्रित केल्या आहेत. दिव्य देसम् मंदिरांतील विग्रह हे चोवीस नामांपैकी किंवा श्रीविष्णूच्या अवतारांशी बर्यापैकी निगडित आहेत. तामिळ वैष्णवांमध्ये अशी मान्यता आहे की हे आळ्वार पेरूमाळशी निगडित आहेत. पोईगाई, भूतळ्वार, पेयळ्वार, थिरुमलीसई, नम्मळवार, मधुराकवी, कुलशेखर, पेरियाळ्वार, थिरूमंगाई, थिरुप्पन, थोंडारादीपोड्डी हे ते आळ्वार होत. तर आंडाळ ही एकमेव स्त्री आळ्वार होती. प्राचीन काळात स्त्रियांना किती मान होता ते यावरून कळते. आंडाळ हे प्रत्यक्ष भूलक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तसेच आळ्वारांमध्ये समाजातील सर्व स्तरांतील वर्ण होते. जातीपातींची बंधने तेव्हा फारशी प्रचलित नव्हती. या आळ्वारांनी 108 पैकी 106 भौतिक मंदिरे निवडली. तर उरलेली दोन स्थाने म्हणजे क्षीरसागर व प्रत्यक्ष वैकुंठात श्रीविष्णूचे चरणकमल. आपल्या मर्त्य आयुष्यात आपण 106 मंदिरांत जाऊ शकतो, परंतु जर आपण सदाचारी राहून आयुष्यभर आपले कर्तव्य मनापासून निभावले, महाविष्णूच्या प्रति भक्तिभाव जागृत ठेवला तर मृत्यूनंतर निश्चितच आपल्याला या दोन्ही स्थानांचा लाभ होऊ शकतो अशी वैष्णवांची श्रद्धा आहे.
आळ्वारांनी निश्चित केलेली जवळपास 84 मंदिरे ही तामिळनाडूत, 11 मंदिरे केरळमध्ये, 2 मंदिरे आंध्र प्रदेश येथे, गुजरातमध्ये असलेले 1 मंदिर, उत्तर प्रदेश व उत्तराखंड येथे अनुक्रमे 4 व 3 मंदिरे तर नेपाळमध्ये एक मंदिर आहे. आळ्वारांनी या भागांना नावे देऊन मंदिरांचे वर्गीकरण केले आहे. तामिळनाडूच्या ज्या भागावर ज्या साम्राज्याची सत्ता होती ते नाव त्या प्रभागाला किंवा नाडूला मिळाले आहे. तंजावर- तिरूचिरापल्ली येथील चोळ नाडू, तिरुनेलवेली- मदुराईचे पांड्य नाडू, कांचीपुरमचे पल्लव नाडू, केरळचे मलई किंवा चेर नाडू, चेन्नई जवळचे थोंडई नाडू, चिदंबरम जवळील नाडू नाडू अशी वेगवेगळी नाडू होती. नाडू म्हणजे राष्ट्र. क्षीरसागर व वैकुंठाचा समावेश विन्नुलगा नाडूत आहे. तर तामिळनाडू आणि केरळ सोडून उर्वरित भारताचा भाग वद नाडूत येतो. वद म्हणजे उत्तर दिशा. या भागात नेपाळचे मुक्तिनाथ, अहोबिळम, तिरुमला, द्वारका, नैमिषारण्य, अयोध्या, मथुरा, गोकुळ, देवप्रयाग, बद्रिनाथ आणि ज्योर्तिमठ येथील नृसिंह मंदिरांचा समावेश आहे. ज्यावेळेस संपर्काची, वाहतुकीची कोणतीही साधने नव्हती त्या काळात आळ्वारांनी ही स्थाने शोधली होती. त्या मंदिरांपर्यंत प्रवास केला होता व त्यावर पासुरामी रचल्या होत्या.

थिरूमंगाई आळ्वार यांनी त्यांच्या जीवनकाळात एकूण 88 मंदिरांना भेट दिल्याचे उल्लेख आहेत. हे मला फार महत्त्वाचे वाटते.कारण आजच्या द्रविड अस्मितेच्या राजकारणात तामिळनाडू, पूर्ण देशापासून काहीसा तुटत चालल्यासारखा वाटतो. खरे पाहता दक्षिण- उत्तरेचे चिवट बंध फार प्राचीन काळापासून अस्तित्वात होते आणि ते एकाच धर्माचा भाग होते. आळ्वारांनी निश्चित केलेल्या स्थानांमध्ये मूळावरम म्हणजे मंदिरातील पेरूमाळची मूर्ती उभ्या अवस्थेत (निंद्रा थिरूकोलम), बसलेल्या अवस्थेत (वित्रिरूंध थिरूकोलम) आणि शयन अवस्थेत (किदंथा थिरूकोलम) आहेत. शयन अवस्थेतील पेरूमाळला ’रंगनाथन’ म्हटले जाते. प्रेमाने या पेरूमाळला ’रंगा’ असे संबोधले जाते. चेन्नईच्या निर्माणपेरूमाळ मंदिरात निंद्रा, किदंथा बरोबरच इरुंथा (नृसिंह स्थिती) आणि उलगनंदा (चालण्याची स्थिती) अशा चार स्थितींमधील पेरूमाळचे विग्रह आहेत.
चेन्नई जवळचे थोंडई नाडू, चिदंबरम जवळील नाडू नाडू अशी वेगवेगळी नाडू होती. नाडू म्हणजे राष्ट्र. क्षीरसागर व वैकुंठाचा समावेश विन्नुलगा नाडूत आहे. तर तामिळनाडू आणि केरळ सोडून उर्वरित भारताचा भाग वद नाडूत येतो. वद म्हणजे उत्तर दिशा. या भागात नेपाळचे मुक्तिनाथ, अहोबिळम, तिरुमला, द्वारका, नैमिषारण्य, अयोध्या, मथुरा, गोकुळ, देवप्रयाग, बद्रिनाथ आणि ज्योर्तिमठ येथील नृसिंह मंदिरांचा समावेश आहे. ज्यावेळेस संपर्काची, वाहतुकीची कोणतीही साधने नव्हती त्या काळात आळ्वारांनी ही स्थाने शोधली होती. त्या मंदिरांपर्यंत प्रवास केला होता व त्यावर पासुरामी रचल्या होत्या.
थिरूमंगाई आळ्वार यांनी त्यांच्या जीवनकाळात एकूण 88 मंदिरांना भेट दिल्याचे उल्लेख आहेत. हे मला फार महत्त्वाचे वाटते.कारण आजच्या द्रविड अस्मितेच्या राजकारणात तामिळनाडू, पूर्ण देशापासून काहीसा तुटत चालल्यासारखा वाटतो. खरे पाहता दक्षिण- उत्तरेचे चिवट बंध फार प्राचीन काळापासून अस्तित्वात होते आणि ते एकाच धर्माचा भाग होते. आळ्वारांनी निश्चित केलेल्या स्थानांमध्ये मूळावरम म्हणजे मंदिरातील पेरूमाळची मूर्ती उभ्या अवस्थेत (निंद्रा थिरूकोलम), बसलेल्या अवस्थेत (वित्रिरूंध थिरूकोलम) आणि शयन अवस्थेत (किदंथा थिरूकोलम) आहेत. शयन अवस्थेतील पेरूमाळला ’रंगनाथन’ म्हटले जाते. प्रेमाने या पेरूमाळला ’रंगा’ असे संबोधले जाते. चेन्नईच्या निर्माणपेरूमाळ मंदिरात निंद्रा, किदंथा बरोबरच इरुंथा (नृसिंह स्थिती) आणि उलगनंदा (चालण्याची स्थिती) अशा चार स्थितींमधील पेरूमाळचे विग्रह आहेत. असे हे एकमेव मंदिर आहे. तसेच श्रीविष्णुची आठ स्वयंभू स्थाने आहेत. मुक्तिनाथ, नैमिषारण्य, पुष्कर, श्रीमुश्नम, श्रीरंगम, तिरुमला, वनमामलई आणि बद्रिनाथ. यांपैकी श्रीमुश्नम व पुष्कर सोडल्यास सर्व स्थाने दिव्य देसम् मध्ये येतात.
आळ्वारांचा इतिहास पाचव्या शतकापर्यंत पोहोचतो. थिरूकोविल्लुर या गावी पोईगाई, भूतळ्वार आणि पेयळ्वार दैवगतीने एकत्र आले आणि तिथे त्यांना नारायणाचा दृष्टांत झाला असे म्हटले जाते. त्याबरोबर त्या तिघांनी नारायणाची स्तुती करायला सुरुवात केली. थिरूकोविल्लुरला ज्या ठिकाणी ही घटना घडली तेच त्रिविक्रम स्थितीतील नारायणाचे गर्भगृह आहे. हे मंदिर अर्थातच दिव्य देसम् आहे. ह्याच श्लोक किंवा पासुरामींनी दिव्य देसम् या महान परंपरेचा आरंभ झाला. पुढच्या साडेतीन-चार शतकांत बारा आळ्वारांच्या मिळून 4000 पासुरामी तयार झाल्या. परंतु आठव्या शतकापर्यंत या पासुरामी विखुरल्या गेल्या होत्या. तोपर्यंत सगळ्या आळ्वारांचे जीवितकार्यही संपले होते. ही परंपरा आता खंडित होण्याच्या मार्गावर आली होती. परंतु दैवगती काही निराळीच होती. चिदंबरमजवळील विरनारायण मंदिरातील आचार्य, नाथमुनींनी या कथा लहानपणापासून ऐकल्या होत्या. एक दिवस त्यांच्या मंदिरात मेळूकोटेचे भाविक आले होते, त्यांच्याकडून माहितीचा तुकडा घेऊन नाथमुनी कुंभकोणमच्या सारंगपाणी मंदिरात पोहोचले. तिथे त्यांना नम्मळवार या आळ्वारांनी लिहिलेल्या दहा पासुरामींचा शोध लागला. शेवटी अखेरचा उपाय म्हणून ते नम्मळवारांच्या जन्मगावी ’आळ्वरथिरुनागरी’ येथे पोहोचून ध्यानाला बसले. असे म्हणतात की त्यांच्या तीव्र ध्यानात नम्मळवारांनी फक्त त्यांच्याच नाहीत तर दुसर्या आळ्वारांच्याही एकूण 3990 पासुरामी नाथमुनींना दिल्या. याच पासुरामी नाथमुनींनी ’नालयिरा दिव्य प्रबंधम’ या ग्रंथात एकत्रित केल्या. हा ग्रंथ वैष्णवांची जणू काही गीता आहे. दिव्य देसम् परंपरेत म्हणूनच नाथमुनींना आणि मेळूकोटे मंदिराला खूप महत्त्व प्राप्त झालेय. नाथमुनींनी नंतरचे आयुष्य याच भक्तिमार्गाला वाहून घेतले. हीच भक्ती संप्रदायाची मुहूर्तमेढ होय.
आळ्वारांची आणि नाथमुनींची परंपरा यमुनाचार्य विशेषतः श्रीरामानुजाचार्यांनी खूपच पुढे नेली. वैष्णव जगताचे ते अत्यंत महान आचार्य म्हणून नावाजले जातात. त्यांनी मंदिरांच्या दैनंदिन कामकाजाचे नियमन केले. सण-उत्सव, परंपरा, आचार्यांचा पेहराव, त्यांचे गंध कसे असावे याबाबतीत मार्गदर्शन केले. विशिष्टाद्वैताचा जोरदार प्रचार केला. उत्तराधिकारी नेमून शिष्यपरंपरेचे नियमन केले. जियर परंपरा सुरू केली. तसेच त्यांनी अस्पृश्यतेला प्रखर विरोध केला. आजही शेकडो वर्षे उलटून गेली तरीही त्यांच्या नियमनाप्रमाणेच देवालयांचे कामकाज चालते. त्यांचे पार्थिव गेली नऊशे वर्षे श्रीरंगमच्या मंदिरात जपून ठेवले आहे. त्या पार्थिवाचे दर्शन घेताना आपल्या मनात काही वेगळेच भाव येतात. श्रीरामानुजाचार्यांच्या आयुष्यातील बहुतांश काळ श्रीरंगम मंदिराभोवतीच केंद्रित झाला होता.
श्रीरंगमचे श्रीरंगनाथस्वामी
दाक्षिणात्य वैष्णवांसाठी हे नाव किती महत्त्वपूर्ण आहे याचा आपण विचार करू शकत नाही. कारण हे 108 दिव्य देसम् पैकी सर्वात अग्रस्थानाचे दिव्य देसम् आहे. प्रत्येक आळ्वार तसेच नाथमुनींपासून सगळ्यांच आचार्यांनी इथे सेवा दिली आहे. श्रीरंगम हे पवित्र कावेरी आणि कोल्लिडम या नद्यांमधील एक बेट आहे. त्रेतायुगापासून ह्या मंदिराचे महत्त्व आहे. प्रत्यक्ष श्रीरामाने हा श्रीविष्णुचा रंगा विग्रह बिभीषणाला दिला होता. अयोध्येहून लंकेला जाताना हा विग्रह श्रीरंगला स्थित झाला. अतिशय ऐतिहासिक असे हे मंदिर आहे. इथली थायर ’रंगनायकी’ असून ह्या मंदिरात ऐतिहासिक ’नम्मपेरूमाळ’ची उत्सवमूर्ती आहे. मंदिराचा सगळ्यांत मोठा उत्सव म्हणजे ’वैकुंठ एकादशीचा’ सोहळा. आपल्या पुराणात वैकुंठ हे ब्रह्मांडात उत्तरेला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दाक्षिणात्य पेरूमाळ मंदिरात उत्तरद्वार वर्षभर बंद असते. ते फक्त वैकुंठ एकादशीला उघडले जाते. द्वारातून जाऊन पेरूमाळचे दर्शन घेतले तर वैकुंठाची प्राप्ती होते अशी वैष्णवांची श्रद्धा आहे. त्याचा अतिशय नेत्रदीपक सोहळा श्रीरंगमला आणि तिरूमलाला साजरा होतो. अगदी लहानातल्या लहान पेरूमाळ मंदिरालासुद्धा असे वैकुंठद्वार असते.
श्रीरंगनाथाचे दर्शन घेताना मनात जे भाव उत्पन्न होतात त्याचे वर्णन करण्यासाठी शब्दच अपुरे आहेत. दिव्य देसम् मंदिरांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, एकावर एक अशी तीन मजली गर्भगृहे असलेली तीन मंदिरे ही तामिळनाडूत आहेत. कांचीजवळील वैकुंठ पेरूमाळ, कुंभकोणम जवळील थिरूकोट्टीयूर आणि मदुराई येथील अळगर कोविल ही ती तीन मंदिरे होत. आता आपण मुख्यत्वेकडून तामिळनाडूच्या दिव्य देसम् देवालयांची माहिती जाणून घेऊया. अर्थातच संपूर्ण 84 मंदिरांवर लिहिणे जागेअभावी सर्वस्वी अशक्य आहे. तरीही त्यांतील निवडक मंदिरे पाहूयात. पैकी श्रीरंगनाथस्वामी आणि दिव्य देसम् परंपरेची जिथे सुरुवात झाली त्या थिरूकोव्विलूर मंदिराबद्दल आपण आधी जाणून घेतले आहे.
आता चेन्नई आणि कांचीच्या थोंडाई नाडू आणि पल्लव नाडू विषयी जाणून घेऊ. इथे अर्थातच पल्लवांची सत्ता होती. कांचीचे सर्वात प्रसिद्ध विष्णूमंदिर म्हणजे श्रीवरदराज पेरूमाळ. ह्या पेरूमाळची मूर्ती गंडकी पाषाणातली आहे. मंदिरातल्या थायरला ’पेरूनदेवी थायर’ म्हणतात. इथे श्रीरामानुजाचार्यांनी बारा वर्षे वास्तव्य केले होते म्हणून या महाविष्णूचे अतोनात महत्त्व आहे. इथले एक वैशिष्ट्य म्हणजे इथे वरदराजाबरोबर ’आत्तीवरदराज’ या पेरूमाळची सुद्धा पूजा केली जाते. ही मूर्ती उंबराच्या झाड्याच्या खोडापासून बनवली आहे. हा पेरूमाळ मंदिराच्या एका पुष्करणीत ठेवला आहे व दर चाळीस वर्षांनी, मूर्तीला पुष्करणीतून बाहेर काढले जाते. काही दिवस रंगा अवस्थेत तर काही दिवस उभ्या स्थितीत मूर्ती ठेवली जाते.
सन 2019ला आत्तीवरदराजचा सोहळा झाला. त्यावेळी देशविदेशांतील लाखो भाविकांनी आत्तीवरदराजाचे दर्शन घेतले. आता पुढचा सोहळा 2059 ला होणार आहे. मंदिराच्या मागच्या चार सोहळ्यांची नोंद झाली आहे. ब्रिटिश राजवटीच्या वेळी ’लॉर्ड क्लाईव्ह’ दर्शनाला आला होता. त्यावेळी त्याने सोन्याचा हार मंदिराला अर्पण केला होता. नामोल्लेख करण्याजोगे दुसरे मंदिर म्हणजे वैकुंठ पेरुमाळ, ज्या मंदिराला तीन गाभार्यांचे मजले आहेत. या तीन मजल्यांवर पेरूमाळच्या तीन अवस्थांचे वेगवेगळे गाभारे आहेत. पैकी वैकुंठ पेरूमाळ अत्यंत पुरातन मंदिर आहे. ज्यावेळेस मी या मंदिराला भेट दिली त्यावेळी इतके पुरातन असे काही पाहायला मिळेल याची बिलकूल कल्पना नव्हती. मंदिरामध्ये गर्भगृहाच्या चौबाजूला एक ओवरी होती. त्यावरचे कोरीवकाम बघून आश्चर्याचा धक्का बसला होता. इथल्या पेरूमाळचे नाव ’वैकुंठ पेरूमाळ’ आणि थायरचे नाव ’वैकुंठवल्ली’ आहे. इथे सगळ्यांत खाली बसलेल्या स्थितीतील मूर्ती आहे तर मधल्या मजल्यावर रंगा स्वरूपातील विग्रह आहे ज्याचे दर्शन फक्त एकादशीला होते आणि सर्वात वरच्या भागातील उभ्या स्थितीतील मूर्ती आता कुठे आहे याचा कोणालाच पत्ता नाही. परंतु ह्या उभ्या पेरूमाळवर आळ्वारांनी आठशे वर्षांपूर्वी रचलेल्या पासुरामी उपलब्ध आहेत. याचा अर्थ उभी मूर्ती तिथे नक्की होती. कांची या सप्तपुरींपैकी एका पुरीत असलेले हे सर्वात प्राचीन पेरूमाळ मंदिर आहे. महाबलीपुरम येथील कोरीवकाम व ह्या मंदिरातील कोरीवकाम पल्लव साम्राज्याने केलेय त्यामुळे या दोन्ही ठिकाणी विलक्षण सारखेपण आहे. महाबलीपुरम या पल्लव सम्राटांचे स्थान जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून गणले जाते इथे ’स्थळसयन पेरूमाळ’ व ’भूस्थळमंगादेवी’ किंवा ’निलमंगाई थायर’ विराजमान आहेत.
कांचीला एकूण 15 दिव्य देसम् आहेत. यांपैकी ’उलगळनाथ पेरुमाळची’ त्रिविक्रम स्वरूपात पूजा केली जाते. मूर्तीशास्त्रात ज्या विष्णुमूर्तीचा उंचावलेला पाय बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात ढकलण्याच्या स्थितीत असतो त्याला त्रिविक्रम स्थिती म्हणतात. थिरूकोविल्लूर या मंदिरातही वामनस्वरूप आहे पण दोन मंदिरांतील विग्रह वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. या मंदिरात एकूण चार दिव्य देसम्चे विग्रह आहेत. जगदीशर पेरूमाळ, करुणाकर पेरूमाळ आणि थिरुक्कर वनार पेरूमाळ हे ते विग्रह होत. थिरूकोविल्लूरला जवळपास सात फूट उंच अशी निंद्रा स्थितीतील मूर्ती आहे. ह्या विग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे हा विग्रह हिरव्या रंगात आहे. अतिशय विलक्षण वाटते ही मूर्ती बघताना. मंदिरसुद्धा अत्यंत गूढ आहे. या मंदिराच्या थायरला ’पुष्पवल्ली’ म्हणतात. चेन्नईतील एक सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे मरीना बीचवरील ’पार्थसारथी मंदिर’. अर्जुनाच्या सारथी स्वरूपातला श्रीकृष्ण इथे पूजला जातो. इथल्या थायरला ’कमला’ म्हणतात. नाडू नाडू या भागात चिदंबरम आणि थिरकोविल्लूरची मंदिरे येतात. तामिळनाडूच्या शिव मंदिरांपैकी सर्वात अग्र क्रमांकावर हे मंदिर आहे. इथे नटराजन स्वरूपात शिव वास करतात. ह्या मंदिरातच ‘गोविंदराज पेरूमाळाचा’ रंगास्वरूप विग्रह आहे तर थायर ’पुंडरीगावल्ली’ आहे. आकाशतत्त्वाचे अत्यंत गूढ मंदिर आहे चिदंबरम.
तामिळनाडूचा तिरूचिरापल्ली, तंजावूर आणि कुंभकोणम भाग म्हणजे अक्षरशः मंदिरांचे हब आहे. कावेरी म्हणजे तमिळांची लाडकी पोन्नी नदी. नदीच्या काठावर संस्कृती फळते, फुलते. कावेरीच्या दोन्ही तीरांवर तर हजारोंनी मंदिरे असतील. तामिळनाडूच्या या भागात चोळ साम्राज्य होते. इथे जवळपास चाळीस मंदिरे आहेत. येथील माझे अत्यंत आवडते मंदिर म्हणजे ’सारंगपाणी’ पेरुमाळ. जे कुंभकोणमला आहे. नाथमुनींना दहा पासुरामी याच मंदिरात मिळाल्या होत्या. या मंदिराचे, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराशी आणि तिरुपतीच्या पद्मावती मंदिराशी नाते आहे. सारंगपाणी मंदिरात रंगनाथन स्वरूपातील मूर्ती असून, पेरूमाळवर थायर रागावली आहे. त्यामुळे तिच्यापासून वाचण्यासाठी मंदिराच्या तळघरात श्रीविष्णूची अजून एक मूर्ती आहे. इथल्या लक्ष्मीदेवीला ’कोमलावल्ली’ म्हणतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे दक्षिणायन व उत्तरायणाच्या वेळी सारंगपाणीचे दर्शन वेगवेगळ्या द्वारांतून होते. हे मंदिर महाविष्णुच्या ’राम’ या अवताराशी निगडित आहे; ज्याने सारंग म्हणजे धनुष्यबाण धारण केला आहे. सारंगपाणी, चक्रपाणी, वराहपेरूमाळ, रामास्वामी व राजगोपाळचारी ह्या पाच मंदिरांचा मिळून ’महामहाव’ नामक उत्सव दर बारा वर्षांनी होतो. हा कुंभकोणमचा कुंभमेळा आहे. इथे अजून एक मंदिर आहे ते म्हणजे ’ऊप्पिलिअप्पन पेरूमाळ’. म्हणजे लवणवर्जित पेरूमाळ. हे मंदिर भूदेवी व मार्कंडेय ऋषींशी निगडित आहे. इथला प्रसाद हा मिठाशिवाय असतो. तिरूचिरापल्ली येथील श्रीअळगिया मानवळा पेरूमाळ मंदिरात थायरचे नाव ’कमलावल्ली’ आहे. या कमलावल्ली थायरला भेटायला प्रत्यक्ष श्रीरंगनाथस्वामी, श्रीरंगनायकी थायरपासून लपतछपत येतात. तो एक मोठाच सोहळा श्रीरंगमला आणि या मंदिरात असतो. खरे तर दोन्ही देव आणि देवी एकच आहेत. पण भक्तांनी आपले गुणदुर्गुण प्रत्यक्ष भगवंतालाही लावून ठेवलेत. भाविक आपल्या लाडक्या देवाला मानवाच्या पातळीवर आणून ठेवतात. पण यांतूनच त्यांची देवावर किती श्रद्धा आहे, भक्ती आहे याचा प्रत्यय येतो. थिरूअंबिल, नच्चियार कोविल, श्रीहरसभा विमोचन पेरुमाळ, श्रीगजेंद्रपेरूमाळ, श्रीपरीमला रंगनाथ पेरूमाळ अशी कित्येक विख्यात मंदिरे या भागात आहेत.
चोळनाडूबरोबर पांड्य नाडूची मंदिरे अतिशय अनोखी आहेत. मदुराईच्या आसपास पांड्य नाडूची मंदिरे आहेत. मिनाक्षी मंदिराजवळील कुडळ अळगर मंदिर प्रसिद्ध आहे. याच मंदिराला तीन मजली गाभारे आहेत. इथे पेरूमाळचे तिन्ही स्वरूपातील विग्रह पाहायला मिळतात. या मंदिरात नवग्रहाचे स्वतंत्र मंदिर आहे. इथल्या थायरला ’मधुरावल्ली’ म्हणतात. मदुराईपासून साधारण बावीस किमीवर ’कल्लाळगर पेरूमाळाचे’ मंदिर आहे. हा पेरूमाळ, मिनाक्षीचा भाऊ समजला जातो. या मंदिराच्या थायरचे नाव ’सुंदरावल्ली’ आहे. ह्या मंदिरातील देवीच्या हळदीला विशेष महत्त्व आहे. प्रदक्षिणा मार्गात इथे एक जणू काही सिक्रेट चेंबर आहे. इथले चक्र बघून मला अतिशय आश्चर्य वाटले होते. श्रीकाळमेघा पेरूमाळचे मंदिर मोहिनी अवताराशी निगडीत आहे.
रामेश्वरमला जाताना भारताच्या मेनलँडजवळ जिथे पंबन ब्रिज चालू होतो तिथे रामनाथपुरम नावाचे मंदिर आहे. अर्थातच हे मंदिर रामसीतेशी निगडित आहे. श्रीविलुपुथ्थर हे एक विख्यात मंदिर या भागात आहे. हे मंदिर आंडाळ या आळ्वारशी निगडित आहे. ह्या मंदिरात आंडाळ ’भूदेवीच्या’ रूपात पूजली जाते. तिचा आणि श्रीरंगनाथस्वामींचा विवाह सोहळा इथला सगळ्यांत प्रसिद्ध सण. असे म्हणतात की विवाहानंतर आंडाळ श्रीरंगनाथस्वामींच्या विग्रहात लुप्त झाली. अगदी कृष्ण आणि मीरेची कथा आहे आंडाळची. जवळच असलेल्या सिवाकासी इथल्या निंद्रा नारायणाचा विग्रह फार सुंदर आहे. सिवाकासी हे शहर फटाक्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. या थायरचे नाव ’सेंगमला थायर’ आहे. थिरूकोट्टीयूर येथील मंदिरात श्रीरामानुजाचार्यांना ’ॐ नमो नारायणा’ ह्या मंत्राचे पठण लोककल्याणासाठी झाले होते. या मंदिरात तीन मजली गाभारा आहे. इथले अजून एक मंदिर म्हणजे ’सत्यगिरीनाथन पेरूमाळ’. चेट्टीनाड भागात असलेले हे एक महत्त्वाचे दिव्य देसम् आहे. इथल्या रंगा पेरूमाळची मूर्ती श्रीरंगमपेक्षा मोठी आणि जुनी मानली जाते. जवळच असलेल्या डोंगरकपारीतील शिवमंदिरात जाण्यासाठी खालून शिडी लावली आहे.
तिरुनेलवेलीजवळ जी पांड्य नाडू मंदिरे आहेत, त्यांपैकी नवग्रहांची ’नवतिरूपती’ मंदिरे अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध आहेत. या नऊ मंदिरांची मिळून एक यात्रा आहे. कावेरीसारखीच पवित्र ’ताम्रवर्णी’ नदी या भागातून वाहते. नम्मळवारांचे ’आळ्वारथिरूनागरी’ हे गाव इथलेच. ते मंदिर गुरू ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. ज्या चिंचेच्या झाडाजवळ नम्मळवार बसत असत किंवा जिथे नाथमुनींना साक्षात्कार झाला ते झाड बघून मला अगदी धन्य झाले होते.
याच भागात ’सरवणा भवन’ या सुप्रसिद्ध रेस्टॉरंट चेनच्या मालकाचे मूळ गाव आहे. याशिवाय या भागातील दोन मंदिरे मला अतिशय आवडली. थिरूगुरूंगुडी येथील ’निंद्रा नंबी पेरूमाळ’ आणि वनमामलई पेरूमाळ. थिरूगुरूंगुडी येथे पाच नंबी आहेत. त्यांना मिळून एक दिव्य देसम् आहे. रामायणात वर्णन केलेला महेंद्रगिरी पर्वत इथेच आहे. पाच पैकी एक पेरूमाळ ’मलईमेळ पेरूमाळचे’ मंदिर या पर्वतावर आहे. ह्या मंदिरातील कोरीवकाम अत्यंत उच्च दर्जाचे आहे. या गावात थिरुमंगाई आळ्वार यांची समाधी आहे. थिरूमंगाई आणि नम्मळवार हे माझे दोन अतिशय आवडते आळ्वार. त्यांच्या आयुष्याशी निगडित स्थाने बघायला मिळणे हे माझे भाग्यच आहे, असे मी समजते. या गावात एका नारळाच्या झाडामधून पाच झाडे निघाली आहेत. ही झाडे या गावातील पाच नंबींचे प्रतिनिधित्व करतात असा गावकर्यांचा समज आहे. ढतड कंपनीच्या मालकांचे हे मूळ गाव आहे. वनमामलई पेरूमाळ मंदिर हे स्वयंभू विष्णु मंदिरापैकी एक आहे. इथे एक पुरातन तैलविहीर आहे. त्या तेलाने शारीरिक दुखणी बरी होतात अशी भाविकांमधे श्रद्धा आहे.
मलईनाडू मधील दोन दिव्य देसम् मंदिरे फार विशेष आहेत. एक म्हणजे थिरूअंनतपुरम येथील सुप्रसिद्ध पद्मनाभ स्वामींचे मंदिर. जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिरात या मंदिराची गणना होते. तर इथले आदिकेशवाचे मंदिर अत्यंत सुंदर आहे. भौगोलिकदृष्ट्या हे मंदिर मलईनाडूचे असूनही तामिळनाडूत येते. ह्या मंदिरातील रंगा, पूर्ण दिव्य देसम् मंदिरांतील सर्वात मोठा आहे. अतिशय भव्य दिव्य मूर्ती पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फिटते. अभिजात शिल्पकला आणि कोरीवकाम हे या मंदिराचे ठळक वैशिष्ट्य आहे.
संपूर्ण दिव्य देसम् मंदिरांचा आढावा एका लेखात घेणे ही अशक्य कोटीची गोष्ट आहे. हा लेख म्हणजे माझी पेरूमाळ आणि थायरची पूजा आहे असे मी समजते. तेव्हा ही श्रीविष्णूला अतिप्रिय असणारी तुळशीची माळ, इदं न मम् म्हणत माझ्या आवडत्या कावेरीच्या पाण्यात अर्पण करतेय.