चौसष्ट घरांचा अनभिषिक्त सम्राट

25 Oct 2025 15:05:44
@डॉ. मिलिंद ढमढेरे
 
भारतीय संस्कृतीने जगाला बुद्धिबळासारखा आकर्षक क्रीडाप्रकार दिला असला तरी भारतीय खेळाडूंमध्ये या खेळात वर्चस्व गाजवण्याची क्षमता नाही, अशी टीका अनेक बुद्धिबळ पंडित काही वर्षांपूर्वीपर्यंत करीत होते. विश्वनाथन आनंद याने पाच वेळा जगज्जेतेपद मिळवत या टीकेला सडेतोड उत्तर देत बुद्धिबळात भारताचे वर्चस्व प्रस्थापित करण्याची पायाभरणी केली. त्याचा हा समृद्ध वारसा पुढे नेत डोम्माराजू गुकेश व दिव्या देशमुख यांनी आपला देश बुद्धिबळात महासत्ता होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.
 
chess
 
 भारतीय खेळाडूंनी बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटात अजिंक्यपद मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेबरोबरच जागतिक सांघिक अजिंक्यपद, आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई इनडोअर स्पर्धा, आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धा अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आजपर्यंत 54 सुवर्णपदके, 56 रौप्यपदके व 46 कांस्यपदके मिळवित आपल्या कामगिरीचा ठसा जागतिक स्तरावर उमटविला आहे. एके काळी भारतीय बुद्धिबळपटूंना कोणीही घाबरत नव्हते, परंतु आनंद यांनी बुद्धिबळाचे युग निर्माण केल्यानंतर कोणत्याही विश्वविजेत्या खेळाडूला पराभूत करण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आहे हे सिद्ध झाले आहे. खुद्द गॅरी कास्पारोव्ह यांच्यासह बुद्धिबळातील अनेक ज्येष्ठ विश्वविजेते खेळाडू भारतीय खेळाडूंचे विशेषतः युवा खेळाडूंचे भरभरून कौतुक करीत आहेत.
 
 
स्वातंत्र्यापूर्वीपासूनच भारतास अव्वल दर्जाच्या खेळाडूंची वैभवशाली परंपरा लाभली आहे. सर्वप्रथम मीर सुलतान खान या भारतीय बुद्धिबळपटूने सार्‍या बुद्धिबळ जगाचे लक्ष वेधून घेतले. पंजाबचे नवाब उमर हयात खान यांच्याकडे काम करणारा हा एक साधा नोकर एक दिवस बुद्धिबळातील महान खेळाडू होईल अशी कोणी कल्पनाही केली नसेल. आपल्या मालकाबरोबर तो सन 1929मध्ये इंग्लंडला गेला. त्याने सन 1930मध्ये ब्रिटिश अजिंक्यपद स्पर्धा जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. हे यश मिळवताना त्याने तेव्हाचा श्रेष्ठ खेळाडू कॅपाब्लांका याच्यासह अनेक रथी महारथींना पराभूत केले. त्याने तार्ताकोवर यालाही पराभूत करीत सनसनाटी विजय नोंदविला. त्याने बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्वही केले. तीन वर्षे त्याने इंग्लंडमधील आपल्या वास्तव्यात अनेक स्पर्धांमध्ये अजिंक्यपदावर नाव कोरले. सन 1933मध्ये तो आपल्या मालकांसमवेत भारतात परतल्यावर म्हणावी तशी खेळाची कारकिर्द पुढे करू शकला नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो पाकिस्तानात राहायला गेला आणि तेथेच त्याचे सन 1966 मध्ये निधन झाले.
 
मीर सुलतान खान
 
chess

स्वातंत्र्यापूर्वी बुद्धिबळ खेळामुळे जगाचे लक्ष वेधून घेणारे बुद्धिबळपटू 
 
chess
 मॅन्युअल एरॉन
 
मॅन्युअल एरॉन यांनी सन 1960 ते 1970 या दशकात नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवित या खेळातील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्यानंतर काही वर्षे भारतीय खेळाडूंना अपेक्षित यश मिळाले नाही. 1980 ते 1990 या दशकात विश्वनाथन आनंद नावाचा सूर्य भारताच्या बुद्धिबळ पटलावर उगवला आणि खर्‍या अर्थाने भारतामध्ये बुद्धिबळ युग निर्माण झाले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविला आणि तेथूनच सुरू झाली आनंदची दिमाखदार कारकिर्द. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. हा किताब मिळवणारा तो भारताचा सर्वात लहान खेळाडू होता. कनिष्ठ गटात असूनही त्याने सन 1986 मध्ये पहिल्यांदाच वरिष्ठ गटाची राष्ट्रीय स्पर्धा जिंकून अनेक बुद्धिबळ पंडितांचे अनुमान चुकीचे ठरविले. पाठोपाठ त्यांनी सन 1987 व 1988 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवित आपले पहिले विजेतेपद हा काही चमत्कार नव्हता हे त्याने सिद्ध केले. सन 1987 मध्ये त्याने ग्रँडमास्टर किताब निश्चित केला. हा किताब मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू होता. त्यानंतर दिबेंदू बरूआ (सन 1991) व प्रवीण ठिपसे (सन 1997) यांनीही हा किताब मिळविला या खेळाडूंनंतर आजपर्यंत 83 भारतीय पुरूष व दोन महिला खेळाडूंनी ग्रँडमास्टर किताब मिळवला आहे तर आंतरराष्ट्रीय मास्टर किताबही आत्तापर्यंत सहा महिला खेळाडूंसह 125 भारतीय खेळाडूंनी मिळवला आहे.
 
 80-90च्या दशकात विश्वनाथन आनंद नावाचा सूर्य भारताच्या बुद्धिबळ पटलावर उगवला

chess 
 
आनंद याने जागतिक स्तरावर मिळवलेल्या यशामुळे देशात या खेळाबाबत प्रचंड क्रांती झाली. देशात प्रत्येक दिवशी कोठे ना कुठेतरी एखादी बुद्धिबळ स्पर्धा सुरू असते असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. दोन दिवसांमध्ये जलद पद्धतीने नऊ फेर्‍यांची स्पर्धा आयोजित करण्याची संकल्पनाही लोकप्रिय होऊ लागली आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंतचे हौशी खेळाडू आपले कौशल्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या देशात ग्रँड मास्टर व आंतरराष्ट्रीय मास्टर दर्जाच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाही आयोजित केल्या जात आहेत. त्यामध्ये परदेशातील अनेक अव्वल दर्जाचे खेळाडूही भाग घेऊ लागले आहेत. बुद्धिबळात करिअर करता येते हे आनंदने दाखवून दिले आहे. सुदैवाने राष्ट्रीयीकृत बँका, पेट्रोलियम कंपन्या, एअर इंडिया आदी कॉर्पोरेट संस्थांनीही खेळाडूंना नोकरी देत बुद्धिबळाच्या विकासास हातभार लावला आहे. तसेच शासकीय स्तरावरही या खेळाच्या स्पर्धांना सहकार्य मिळत आहे तसेच खेळाडूंनाही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळत आहेत ही या खेळाच्या लोकप्रियतेचीच पावती आहे.
 
 
बुद्धिबळाचे भीष्माचार्य
 

chess
 भाऊसाहेब पडसलगीकर
 
बुद्धिबळाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे नरहर व्यंकटेश तथा भाऊसाहेब पडसलगीकर यांचे वडील व्यंकटेशराव यांनी सन 1925 मध्ये सांगली येथे नूतन बुद्धिबळ मंडळाची स्थापना केली व या संस्थेद्वारे बुद्धिबळाच्या खुल्या स्पर्धांना सुरुवात झाली. प्रारंभी फक्त एकच स्पर्धा आयोजित केली जात असे व सर्व वयोगटातील स्पर्धकांना त्यामध्ये भाग घेता येत असे. विविध वयोगटासाठी वेगवेगळी स्पर्धा आयोजित केली तर त्या गटातील खेळाडूंना स्वतंत्रपणे आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल व खेळाडूंचा विकास होईल हे भाऊसाहेब यांच्या लक्षात आले. त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत जवळजवळ दोन महिने वेगवेगळ्या गटासाठी स्पर्धा आयोजित करून नवोदित व युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे व्रत सुरू केले. अनेक वेळेला प्रायोजक कमी पडले तरी भाऊसाहेबांनी पदरमोड करीत ही स्पर्धा अखंडपणे सुरू ठेवली. ज्यावेळी बुद्धिबळाला फारसे प्रायोजक नव्हते अशा काळात प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीतच त्यांनी स्पर्धेस व खेळाडूंना काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली. भाऊसाहेब हे नियमांबाबत अतिशय कडक व शिस्तप्रिय होते परंतु ते तितकेच प्रेमळही होते. त्यामुळे त्यांना जनमानसात अतिशय सन्मानाचे स्थान होते. अनेकांसाठी भाऊसाहेब हे पितृतुल्य होते. एकाच वेळी पुरुष महिला आठ, दहा, बारा, चौदा, सोळा वर्षाखालील मुले व मुली अशा सर्व गटांच्या स्पर्धा आयोजित केले जाणारे सांगली हे जगातील एकमेव ठिकाण असेल. ज्येष्ठ ग्रँडमास्टर निगेल शॉर्ट यांनीही भाऊसाहेबांच्या स्पर्धेचा मुक्तकंठाने गौरव केला होता. या स्पर्धेत देशाच्या कानाकोपर्‍यातील शेकडो खेळाडू भाग घेत असतात. गेली अनेक वर्षे हे व्रत अव्याहतपणे सुरू आहे. या स्पर्धांमुळे भारताला अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू मिळाले आहेत.
 
 
खुल्या मैदानात बुद्धिबळ स्पर्धा
 
खुल्या मैदानात मांडव घालून या खेळाचे सामने आयोजित केले तर या खेळाचा अधिकाधिक प्रसार होऊ शकतो हे पुण्यातील बुद्धिबळ प्रसारक मंडळ या संस्थेने दाखवून दिले. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी बुद्धिबळ स्पर्धेबरोबरच अनेक ख्यातनाम व्यक्तींची व्याख्याने, विविध वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स आदी सुविधाही ठेवल्या. या उपक्रमास खेळाडूंबरोबरच प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आठ वर्षे हा उपक्रम सुरू ठेवला होता. केवळ पुण्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून 800 ते एक हजार खेळाडू या स्पर्धेत भाग घेत होते. पुण्यात ग्लोबल माईंड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे प्रत्येक रविवारी जलद स्पर्धा आयोजित करण्याची संकल्पना अंमलात आली. त्यांनी हा उपक्रम 52 रविवारी सुरू ठेवला होता. या उपक्रमातही परगावचे खेळाडू सहभागी झाले होते. या दोन्ही उपक्रमांमुळे महाराष्ट्राला अनेक उत्तमोत्तम खेळाडू लाभले. त्यानंतर गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळे आपोआपच महाराष्ट्रातील खेळाडूंचा दर्जा उंचावत चालला आहे.
 
 
बुद्धिबळ-करिअरसाठी उत्तम पर्याय
 
आर. प्रज्ञानानंद, अर्जुन एरिगेसी, विदीत गुजराथी, डी. गुकेश, निखिल सरीन, सूर्यशेखर गांगुली, संदीपन चंदा, पेंदायला हरिकृष्ण, कृष्णन शशीकिरण, निलोत्पल दास, अभिजीत कुंटे, अभिजीत गुप्ता, सहज ग्रोवर, परिमार्जन नेगी, अक्षयराज कोरे इत्यादी खेळाडूंनी पुरुष गटात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. महिला गटातही भारतीय खेळाडूंनी वेगवेगळ्या वयोगटांमध्ये आपला अव्वल दर्जा सिद्ध केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या रोहिणी, वासंती व जयश्री या खाडीलकर भगिनी, मृणालिनी कुंटे औरंगाबादकर, सौम्या स्वामीनाथन, स्वाती घाटे, ईशा करवडे, दिव्या देशमुख, तानिया सचदेव, द्रोणावली हरीका, आरती रामस्वामी, सुब्रमण्यम विजयालक्ष्मी, कोनेरू हंपी इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे. जागतिक स्तरावर मानांकन असणे ही देखील खेळाडूंसाठी अतिशय अभिमानास्पद कामगिरी असते. आतापर्यंत भारताच्या 33 हजार पेक्षा जास्त खेळाडूंना हे मानांकन लाभले आहे. सुदैवाने या सर्वच खेळाडूंना त्यांच्या घरच्यांकडून भरपूर सहकार्य मिळाले आहे. आपल्या मुलांना आंतरराष्ट्रीय मास्टर्स किंवा आंतरराष्ट्रीय महिला मास्टर्स यासारखे किताब मिळावेत या दृष्टीने वेळप्रसंगी दहावी किंवा बारावीच्या परीक्षेलाही दांडी मारण्याची परवानगी पालकांनी दिली आहे. यावरूनच या खेळात करिअर करणार्‍या आपल्या पाल्यावर त्यांचा किती ठाम विश्वास आहे हे दिसून येते. केवळ खेळाडू नव्हे तर प्रशिक्षक, पंच, समालोचक, स्वतंत्र वेबसाईट, छायाचित्रकार, सूत्रधार असे विविध पर्याय देखील बुद्धिबळ क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी उपलब्ध झाले आहेत.
 
 
पालकांचा त्याग व साथ महत्त्वाची
 
भारताच्या डोम्माराजू गुकेश व दिव्या देशमुख यांनी जागतिक स्तरावर जे अजिंक्यपद मिळवले आहे त्यामध्ये त्यांच्या पालकांनी केलेल्या त्यागाचा आणि दिलेल्या साथीचा मोठा वाटा आहे. गुकेश याने 12 व्या वर्षी एका वेबसाईटला मुलाखत देताना आपले लक्ष्य विश्वविजेतेपदाचेच आहे असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. त्याचा हा आत्मविश्वास पाहून त्याच्या वडिलांनी आपला वैद्यकीय व्यवसाय बाजूला ठेवीत पूर्णपणे त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच भारताला आनंदचा वारसदार लाभला. दिव्या हिच्याबाबत देखील असाच अनुभव आला आहे. कनिष्ठ गटात जागतिक विजेतेपद मिळवल्यानंतर प्रसारमाध्यमांना तिने मुलाखत देताना माझे पुढचे ध्येय वरिष्ठ गटाचे विजेतेपद आहे असे सांगितले होते. तेव्हा तिच्या आईनेदेखील आपला वैद्यकीय व्यवसाय बाजूला ठेवत पूर्णपणे तिच्या खेळाच्या करिअरसाठीच अधिकाधिक वेळ दिला. त्यामुळेच अवघ्या एक वर्षातच दिव्याने वरिष्ठ गटातही कीर्तीचे शिखर गाठले आहे.
 
 
आपल्या देशामध्ये अनेक कुटुंबे वेगवेगळ्या खेळांच्या विकासामध्ये उत्साहाने भाग घेत असतात. त्यामध्ये अभिजीत कुंटे याच्या कुटुंबीयांना महत्त्वाचे स्थान आहे. त्याच्या आई-वडिलांनी अभिजीत व त्याची मोठी बहीण मृणालिनी यांची बुद्धिबळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कारकीर्द सुरू असताना, त्यांच्या विकासाबरोबरच महाराष्ट्रातील अन्य खेळाडूंना देखील कशी प्रगती करता येईल या दृष्टीने अनेक सकारात्मक प्रयत्न केले होते. ज्या काळी बुद्धिबळ खेळाडूंच्या दृष्टीने लॅपटॉप ही अतिशय दुर्मीळ गोष्ट होती, त्या काळामध्ये अभिजीत याचे वडील प्रकाश यांनी वेगवेगळ्या देणगीदारांच्या मदतीने उदयोन्मुख खेळाडूंना लॅपटॉप देण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबविला होता. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडले असे म्हणता येईल.
 
 
chess
 
गुकेशची खिलाडूवृत्ती
 
भारतीय खेळाडू पराभव किंवा विजय दोन्ही गोष्टी खिलाडू वृत्तीने स्वीकारतात याचा प्रत्यय गुकेश याने जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीच्या वेळी दाखवून दिला. दिंग लीरेन या चीनच्या खेळाडू विरुद्ध त्याने विजेतेपदाची लढत जिंकली. त्यानंतर त्याने बुद्धिबळाच्या पटाला नमस्कार केला, तसेच पुन्हा सर्व मोहरे जागच्या जागी ठेवले. गुकेशने विजेतेपद निश्चित झाल्यानंतर आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट दिली. ही लढत पाहणार्‍या लाखो चाहत्यांना त्याच्यावर आई-वडिलांनी केलेल्या चांगल्या संस्काराचा प्रत्यय आला. गेल्या दोन वर्षांमध्ये डाव गमावल्यानंतर विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याचा उद्धटपणा, बेशिस्त, तसेच स्पर्धेच्या ठिकाणी उशीरा येत प्रतिस्पर्धी खेळाडूंना मानसिक दडपण आणण्याची वृत्ती हे अवगुण लक्षात घेतले तर भारताचे गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी, विदित गुजराथी यासारखे युवा खेळाडू खेळाबरोबरच आपल्या देशाचीही प्रतिष्ठा उंचावत आहेत. त्यामुळेच की काय, भारताच्या अनेक खेळाडूंना परदेशातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तेथील संस्थांकडून निमंत्रण दिले जाते आणि आपले खेळाडूही तेथे भाग घेत खेळाचा दर्जा कसा उंचावेल या दृष्टीने प्रयत्न करीत असतात.
 

chess 
 
निष्ठा असावी हरीकासारखीच
 
खेळाडूंची आपल्या खेळावर आणि आपल्या देशावर किती निष्ठा असते हे द्रोणावली हरीका हिने दाखवून दिले. चेन्नई येथे सन 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याबाबत ती साशंंक होती.
 

chess 
 
स्पर्धेच्यावेळी ती नऊ महिन्यांची गरोदर होती. तिच्या जागी दुसरी एखादी खेळाडू असती तर तिने घरी बसून विश्रांती घेतली असती. पण स्वतःच्या शहरातच ही प्रतिष्ठेची स्पर्धा असल्यामुळे आपण काही झाले तरी सहभागी होणार हे तिने भारतीय संघ व्यवस्थापनाला सांगितले होते. तिचा आग्रह लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने तिच्यासाठी अतिशय अव्वल दर्जाची सुविधा केली होती. तिचा डाव सुरू असताना तिच्याजवळच वैद्यकीय तज्ज्ञांची तुकडी हजर होती. तसेच सभागृहाच्या बाहेर सुसज्ज रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. भारताच्या इतर खेळाडूंबरोबरच ती देखील खेळाडूंच्याच हॉटेलमध्ये निवासास थांबली होती. तेथे देखील 24 तास वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. एवढी सुसज्ज व्यवस्था असल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या हरीका हिने भारतीय संघास पदक जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. हरीका व कोनेरु हम्पी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, कारण या दोघींनी संसार आणि बुद्धिबळातील जागतिक स्तरावरील करिअर या दोन्ही आघाड्या अतिशय यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. सुदैवाने त्यांना त्यांच्या सासरच्या मंडळींकडूनही अतिशय मोलाचे सहकार्य लाभले आहे.
 

chess 
 
 
ज्ञानदानाचे पुण्य
 
ज्ञान दिल्याने वाढते असे आपण नेहमी म्हणतो. महाराष्ट्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते खेळाडू रघुनंदन गोखले, प्रवीण ठिपसे, अभिजीत कुंटे इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी स्पर्धात्मक करिअरमधून थोडेसे बाजूला जाऊन आपल्याकडे असलेले बुद्धिबळाचे ज्ञान नवोदित खेळाडूंना देण्याचे कार्य केले आहे. तसेच या खेळाडूंनी नवोदित खेळाडूंना वेगवेगळ्या शासकीय आस्थापनांमध्ये नोकरी मिळावी या दृष्टीनेही भरपूर प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांनाही सातत्याने यश मिळत आहे. ज्याप्रमाणे क्रिकेट या खेळासाठी स्वतंत्र स्तंभलेखन करणारे अनेक ज्येष्ठ खेळाडू असतात त्याचप्रमाणे अशा अनुभवी बुद्धिबळपटूंनाही आज-काल बुद्धिबळासाठी विशेष स्तंभ लिहिण्याकरता आवर्जून विचारले जात असते ही या खेळाचीच पावती आहे.
 
 
व्यावसायिक लीगचे आयोजन
 
आयपीएल क्रिकेट स्पर्धेमुळे खेळामध्ये पैसा मोठ्या प्रमाणात खेळू लागला. अल्पकाळातच खेळाडूंना भरपूर पैसा मिळतो हे लक्षात आल्यानंतर अन्य काही क्रीडा प्रकारांप्रमाणेच आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर अन्य खेळांच्याही व्यावसायिक लीग स्पर्धा आयोजित करण्याची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आली. बुद्धिबळ हा खेळही त्यास अपवाद नाही. पुण्यात ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी बुद्धिबळ लीग स्पर्धा सुरू केली. त्यामध्ये अनेक मान्यवर खेळाडूंनी आपल्या अप्रतिम कौशल्यामुळे या स्पर्धेची लोकप्रियता कानाकोपर्‍यात पोचली आहे. या स्पर्धेमुळे अनुभवी खेळाडूंबरोबरच उदयोन्मुख खेळाडूंनाही भरपूर आर्थिक कमाई झाली. हा खेळ लोकाभिमुख झाला तर आपोआपच अधिकाधिक प्रेक्षक व प्रायोजक लाभणार आहेत हे लक्षात घेऊनच ही व्यावसायिक स्पर्धा तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला.
 
अभिजीत कुंटे
chess 
 
 बुद्धिबळ खेळाचा वारसा पुढे चालविण्यासाठी कटीबद्ध

vivek 
 
चेस इन स्कूल व चेस इन प्रिझन यासारख्या नवीन नवीन कल्पनाही भारतीय बुद्धिबळ संघटकांनी प्रत्यक्षात अंमलात आणून या खेळाच्या विकासास अधिक चालना दिली आहे. प्रत्येक शाळांमध्ये या खेळाची मुहूर्तमेढ रुजवावी या दृष्टीने गेल्या दहा वर्षांमध्ये अतिशय सकारात्मक प्रयत्न केले गेले. त्यामुळेच आज आपल्या देशात लाखाच्या वर खेळाडू या खेळात करिअर करू इच्छित आहेत. तुरुंगातील कैद्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल व्हावा या दृष्टीने गेल्या सहा सात वर्षांमध्ये तुरुंगातील कैद्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक कैद्यांच्या मानसिकतेमध्ये खूप चांगला बदल घडत आला आहे. महाराष्ट्राबरोबरच देशात अनेक ठिकाणी अशा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. बालगुन्हेगारांच्या पुनर्वसन केंद्रातही अशा स्वरूपाच्या स्पर्धांचे आयोजन सुरू करण्यात आले आहे. अलीकडे बाल गुन्हेगारांचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळेच बुद्धिबळासारख्या चांगल्या उपक्रमाद्वारे त्यांची मानसिकता सकारात्मक होईल या दृष्टीनेच प्राधान्य देण्यात आले आहे. पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे कैद्यांच्या स्पर्धांविषयी व अन्य उपक्रमांविषयी कार्यशाळा ही देखील आयोजित करण्यात आली होती त्या निमित्ताने महासंघाचे सर्वच पदाधिकारी पुण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही खेळाडू व येरवडा तुरुंगातील कैदी यांच्यात सामनेही आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये बुद्धिबळाविषयी नवीन वेगवेगळ्या उपक्रमाबाबत सखोल चर्चाही करण्यात आली होती.
 
अर्थार्जनाची हमी
 
कोणताही खेळाडू एखाद्या खेळात करिअर करायचा निर्णय घेतो तेव्हा त्याच्या पालकांचा पहिला प्रश्न असतो तो, ‘या खेळातून तुला नोकरी मिळणार आहे का किंवा चांगलं उत्पन्न मिळणार आहे का?’ बुद्धिबळ हा खेळ देखील त्याला अपवाद नाही. बुद्धिबळ खेळाडूंना आता अन्य खेळांप्रमाणेच शासकीय आस्थापनांमध्ये नोकरीसाठी राखीव जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक कॉर्पोरेट संस्था खेळाडूंना आपल्या आस्थापनांमध्ये सामावून घेत आहेत. कंपन्यांचे सामाजिक दायित्व या योजनेअंतर्गत अनेक उद्योग संस्था बुद्धिबळपटूंना मदत करण्यासाठी आणि या खेळाच्या स्पर्धांसाठी पुढे आल्या आहेत. तसेच राज्य व अखिल भारतीय स्तरावरील संघटनांनाही चांगले पुरस्कर्ते मिळत आहेत. अलीकडे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने एप्रिल ते जून या तीनही कालावधीसाठी देशातील 42 अग्रमानांकित खेळाडूंना 42 लाख 30 हजार रुपयांची छात्रवृत्ती दिली आहे. खुल्या गटाप्रमाणेच 7,9,11,13,15,17,18 वर्षाखालील मुले-मुली या गटातील खेळाडूंचाही त्यामध्ये समावेश आहे.
 
 
बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संयोजनातही भारताने मोठा वाटा उचलला आहे. चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे संयोजनपद केवळ तीन महिने अगोदरच भारताकडे देण्यात आले होते. बुद्धिबळ हा आपला राज्याचा महत्त्वाचा क्रीडा प्रकार आहे असे मानून तेथील स्थानिक राज्य शासनाने या स्पर्धेच्या यशस्वितेमध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावली. न भूतो न भविष्यती असेच या स्पर्धेचे आयोजन झाले. जगातील सर्वच श्रेष्ठ खेळाडूंचा सहभाग होता पण त्याचबरोबर या स्पर्धेनिमित्त आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अनेक पदाधिकारी, बुद्धिबळ क्षेत्रातील अनेक श्रेष्ठ प्रशिक्षक व समालोचक यांच्या सहभागामुळे ही स्पर्धा म्हणजे बुद्धिबळपटूंची मांदियाळीच झाली होती. या स्पर्धेच्या वेळी चेन्नई शहर अक्षरशः बुद्धिबळमय झाले होते. या स्पर्धेला केंद्र शासनानेही सहकार्य केले होते. ज्याप्रमाणे अन्य खेळांच्या ऑलिंपिक स्पर्धांच्या वेळी क्रीडाज्योत दौडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो, त्याप्रमाणेच बुद्धिबळाच्या ऑलिंपिक स्पर्धांचे वेळी देखील भारतामध्ये अशी दौड आयोजित करून त्याद्वारे या खेळाच्या विषयी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चाहत्यांनीही या उपक्रमास अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता.
 
 
बुद्धिबळ म्हणजे फक्त रशियन खेळाडूंनी वर्चस्व गाजवायचा खेळ असे पूर्वी म्हटले जात असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंनी विविध घटक जागतिक स्तरावर अजिंक्यपद मिळवले आहे त्यामुळे जागतिक स्तरावर आता देश म्हणून भारतीय खेळाडूंचा धसका अन्य देशातील खेळाडू घेऊ लागले आहेत.
Powered By Sangraha 9.0