सवयीचं पत्र हरवलं

27 Oct 2025 17:50:22
@ मंगला गोडबोले 

letter
जग आधुनिक होत चाललं, तसं संवादाची माध्यमही बदलली. पूर्वी पोस्टकार्ड, आंतरदेशीय किंवा पाकिटातून येणारी, कागदावर शाईने आणि स्व-हस्ताक्षरात लिहिलेली पत्रांची जागा ईमेल, मेसेज, व्हॉटसअ‍ॅप सारख्या तात्काळ संदेश देणार्‍या आधुनिक माध्यमांनी घेतली आहे. पूर्वीच्या पत्रांना नात्यांच्या आस्थेचा वास असे, प्रेमाचा स्पर्श असे आणि मायेचा ओलावा असे. ईमेलला यातलं काही एक नाही. कोणीही, कोणालाही, कधीही, कशीही पाठवली तरी एकच छाप! यंत्राचा स्पर्श, मानवी स्पर्श गायब.
आमच्या लहानपणी पोरीबाळींचा एक खेळ फार लोकप्रिय होता. आठ, दहा, बारा वगैरे मुली जमिनीवर मांडी घालून गोल करून बसायच्या आणि एक मुलगी हातात रूमाल घेऊन त्या गोलामागे फिरत फिरत हळूच तो रुमाल कोणाच्यातरी पाठीमागे टाकायची. सोबत कोरसही चालायचा.
 
 
माझ्या आईचं पत्र हरवलं...
 
ते मला सापडलं...
 
असं म्हणण्याची आवाजाची पट्टी, वेग हळूहळू वाढत जायचा. आरडाओरडा... धावपळ... पकडापकडी जेवढी वाढेल तेवढा डाव रंगायचा. मात्र प्रत्येक डावात ते हरवलेलं पत्र (म्हणजे रुमाल) हमखास सापडायचंच. पत्र म्हटलं की नेहमी मला हे आठवतं. पण जेव्हा या खेळाची आठवण होते तेव्हा अभावितपणे मनात येतं.
 
माझ्या सवयीचं पत्र हरवलं...
 
हरवलं ते हरवलंच...
 
 
सवयीचं पत्र म्हणजे घरगुती पत्र, खुशालीचं पत्र, नातेवाईकांकडून येणारं, महत्त्वाची बातमी पुरवणारं पत्र. बहिणींची, मैत्रिणींची आपापसातली गप्पीष्ट पत्रं. पोस्टकार्ड, आंतरदेशीय किंवा पाकिटातून येणारी, कागदावर शाईने आणि स्व-हस्ताक्षरात लिहिलेली पत्रं.
 
 
तशी व्यावहारिक, व्यावसायिक पत्रं अजूनही येतात म्हणा. करारपत्र, कायदेशीर नोटिसा, वेगवेगळी बिलं, कंपन्यांची बॅलन्स शीट, नव्या उद्योगांची भडक माहितीपत्रकं असा जांगड माल टपालाने येतच असतो. पण त्यातलं बरंच टपाल कचरापेटीत जातं किंवा फायलींमध्ये विराजमान होतं. ’यंदा अवकाळी पावसाने आंब्यांचं फार नुकसान झालं. अमुक वकिलांचा मुलगा बेबीसाठी स्थळ म्हणून बघावा, परीक्षेत गाण्याचा एक विषय राहिला, यंदातरी अष्टविनायक करावेत म्हणतेय, शांतूकाकांची तब्येत फारच ढासळत चालली आहे, हॉस्टेलवर वेळच्या वेळी जेवत जावे.’ अशासारख्या मजकुराची कौटुंबिक किंवा व्यक्तिगत संवाद साधणारी पत्रं झपाट्याने ओसरत चाललेली दिसतात.
 
 
माझ्या घराच्या कोपर्‍यावर एका वृक्षाच्या दणकट बुंध्याला तारेने कशीबशी लटकवलेली एक जुनी बेवारशी टपालपेटी दीर्घकाळ आहे. तिचं तोंड वासलेलं आहे, पण त्यात फार काही पडतांना दिसत नाही. दररोज टपाल गोळा करण्याच्या वेळा वगैरे काही माहिती तिथे रंगवलेली असली तरी ती आता पुसटली आहे. त्याबद्दल कोणी तक्रार करायलाही जात नाही. आताचे पोस्टमन इमारतीच्या तळभागातल्या व्यक्तिगत टपालपेट्यांमध्ये टपाल टाकून कधी निघून जातात तेही समजत नाही. टपालकचेर्‍या मोठ्यामोठ्या होताहेत. गजबज असते पण ती अनेकदा पार्सलं, विमा, विकासपत्रं, बचतखातं अशासारख्या विषयांमधल्या कामांसाठी दिसते.
 
 
या सगळ्यातून हलकेहलके व्यक्तिगत किंवा कौटुंबिक संवाद साधणारी छोटीमोठी, धावती पत्रं गायब होत चाललेली दिसतात. माणसं आहेत तिथे संवाद आहेत. आता संवाद साधण्यासाठी पत्रांच्या माध्यमांची पत्रास लोकांना राहिलेली दिसत नाही. संवादाची मोफत किंवा स्वस्त, सोपी, तातडीची अशी नाना माध्यमं आता लोकांच्या हाताशी, सहजपणे आली आहेत. शब्दश: आबालवृद्ध त्यांचा मनसोक्त वापर करताहेत. अशावेळी मुळात योग्य त्या आकारप्रकारचा कागद पुढ्यामध्ये घ्या, त्यावर पेनाने खर्डेघाशीकरा, त्याची घडी घाला, चिकटवा, पत्ता लिहा, गरजेप्रमाणे कागद चिकटवा, तिकिटं लावा, योग्य त्या टपालपेटीपर्यंत हा ऐवज पोचवा आणि नंतर हे पत्र कधी, कसं पोचलं-नाही पोचलं? याचा छडा लावा, एवढा द्राविडी प्राणायाम या काळात कोण करायला बसलंय? पुढेमागे कधीतरी याच स्वरूपामध्ये या पत्राचं उत्तर आलं तर खूश व्हा, आलं नाही तर नाराज राहा, एवढं करत बसायला आता वेळ कोणाला आहे?
 
 
आम्हाला होता. आताच्या लोकांपेक्षा आम्ही बर्‍यापैकी रिकामटेकडे असणार त्या काळात. म्हणून मग सगळे सगळ्यांना अधूनमधून पत्रं पाठवायचे. मैत्रीत, नात्यांमध्ये, जुन्या परिचितांमध्ये, गुरुशिष्यांमध्ये, समव्यावसायिकांमध्ये अशा असंख्य नातेसंबंधांमध्ये पत्रव्यवहार व्हायचा. प्रेमपत्रं तर गुलाबी रंगांसह सनातनच. पण ‘यापुढे आपला संबंध संपला’ हेही पत्रानेच कळवलं जायचं. नातवंडाला थोडं थोडं लिहिता यायला लागलं की त्याच्याकडून आजीआजोबांना एखादं पत्र लिहवून घेतलं जायचं. ते पत्र वाचून आजीआजोबांना ‘धन्य धन्य’ व्हायचं. शाळेत पत्रलेखन हा स्वतंत्र विषय शिकवला जायचा. कोणाला शि.सा.न. लिहायचा, कोणाचा चरणारविंदी कृ.सा.न. करायचा, पत्ता कोणत्या कोपर्‍यात कसा लिहायचा वगैरे खूप शिकवून घोटून घेतलं जायचं. तरी कोणीतरी विद्वान परीक्षेतल्या पत्रलेखनामध्ये आपल्या आजोबांना किंवा थेट मुख्यमंत्र्यांना अनेकोत्तम आशीर्वाद देऊन आपली विद्वत्ता सिद्ध करायचा. त्याबद्दल शिक्षकवर्गाकडून अनेकोत्तम कानपिचक्या मिळवायचा. सासरी गेलेल्या मुलीने, शिक्षणासाठी/नोकरीसाठी परगावी राहणार्‍या मुलाने नियमित पत्र पाठवून खुशाली कळवावी अशी प्रत्येक ज्येष्ठाची अपेक्षा असायची. पाच पैशांचं कार्ड घेऊन खुशालीच्या चार ओळी लिहायला काय जातंय? वगैरे उपदेश चालायचा. पण त्या खुशालीच्या चार ओळींचीही खूप उत्कटपणे वाट पाहणारे असायचे. नेहमी नेहमी तीच खुशाली त्याच ओळींमध्ये कळवण्यात रस नसलेली माणसं मग, पत्रामध्ये
 
‘इकडे उन्हाळा फार सुरू झाला आहे.’
 
‘यंदा पावसाने थैमान घातले आहे’
 
अशी वाक्यं लिहून हवामानखात्याचा बोजा हलका करायची. हॉस्टेलमध्ये राहून शिकणार्‍या मुलांना वडिलांकडून पैसे मागायचे असले तर ती अतोनात उत्कट पत्रं लिहायची. ‘बाबा, कधी एकदा तुमचे कष्ट मी संपवतोय असं मला झालंय.’ किंवा ‘तुमची आठवण आली की अगदी चैन पडत नाही, बाबा.’ इ. गोडवा शिंपायची. पण संबंधित बाप हा खराच ‘बाप’ असेल तर उलट टपाली कळवायचा. ‘अरे एवढा त्रास होत असेल तर नको काढूस माझी आठवण. तिकडे तू बेचैन. इकडे मी उचक्यांनी हैराण! वर पत्रापत्रीचा त्रास. कशाला?’
 
 
letter
 
अशा पत्रांची सवय असलेल्या पिढीमधली मी एक व्यक्ती आहे. इतरही अनेक असतील ज्यांच्यासाठी पत्रं लिहिणं, पाठवणं, इतरांची पत्रं येणं, पत्रांची प्रतीक्षा, उत्तरातली आशा, निराशा, पत्रं गहाळ होणं किंवा जुनी पत्रं वाचून आपणही त्या काळात गहाळ होणं हा कधीतरी जगण्याचा भाग झाला असेल. असा आत्मीय पत्रव्यवहार खुंटत चालल्याचं बघून तेही हळहळत चालले असतील.
बहुसंख्य वेळा पत्र येणं, कोणाला तरी आपली आठवण आली आहे हे जाणवणं हा आनंदाचा भाग असे. पत्रं येत तेव्हा मुळात पोस्टमन घरी येई. जेव्हा इमारती फार उंच नव्हत्या. राहत्या घरांना लिफ्टस् नव्हत्या, इमारतींच्या तळभागात व्यक्तिगत टपालपेट्या टांगलेल्या नव्हत्या. तेव्हा पोस्टमन मंडळी प्रत्येक घराच्या दरवाज्याजवळ जाऊन पत्रं आत भिरकावत किंवा समोर हजर असणार्‍या माणसाच्या हातात देत. मोठ्या शहरांमध्ये दिवसातून दोनदा टपाल पोहचवलं जाई. अनेकांच्या दिवसभराच्या वेळापत्रकाला पोस्टमनच्या फेरीचा संदर्भबिंदू असे.
 
 
“काय बाई, सकाळची डाक केव्हाच येऊन गेली तरी नवरा घरी आला नाही रात्रपाळी संपवून.” किंवा
 
“दुपारचा पोस्टमन येऊन गेला की मी चहाची तयारी करते.”
 
अशा दैनिक गाठीभेटींमुळे खूप लोकांची आपापल्या भागातल्या पोस्टमन मंडळींशी ओळख असायची. टपालाबरोबर चारदोन शब्दांची देवघेव व्हायची. आग्रह... तक्रार इ.इ. ही चालायचं.
 
‘अहो, बघा ना माझं काही पत्रं आलंय का?’
 
“हल्ली तुम्ही मला पहिल्याइतकी पत्रं देत नाही राव.”
 
(जसा काही अडीनडीला पोस्टमन स्वत:चं एखादं खुशालीचं कार्ड लिहून यांना देणार होता.) घरात झालेल्या सत्यनारायणाचा प्रसाद किंवा ऐन उन्हाळी दुपारी घरातलं ‘घोटभर पन्हं’ पोस्टमनला देणारी घरंही मी पाहिली आहेत. आपुलकीची अशी देवघेव आता कुठली दिसायला?
 
रोजच्या पोस्टमनच्या मानाने तारवाले, मनिऑर्डरवाले यांचं दर्शन दुर्मीळ असायचं. मनीऑर्डर पोहोचवणार्‍यांबद्दल ‘सार्थ’ प्रेम वाटावं आणि तारवाल्यांनी घाबरवावं हे सहज समजू शकतं. तशा तर एस.एस.सी. बोर्डामध्ये गुणवत्ता यादीत येणार्‍यांना अभिनंदनाच्या तारा यायच्या म्हणे. पण आमची किंवा आमच्या परिघातल्या कोणाचीही, औपचारिक शिक्षणाची एवढी तार जुळली नसल्याने अशी अभिनंदनपर तार या डोळ्यांनी बघण्याचा मंगलयोग मी अनुभवलेला नाही. कुठेतरी कोणीतरी ‘सीरियस’ असल्याच्या किंवा दगावल्याच्या तारांबद्दल खूपदा ऐकलं. एकूणच तारवाल्यांचा असा ना तसा दबदबा कायमच अनुभवला. (पुढे 2013 साली, सुमारे 160 वर्ष सलगपणे देशाला सेवा देणारी ही ‘तारसेवा’ अधिकृतपणे बंद केली गेली. अशी माहिती आता गुगलमावशी देते आहे. तारा जोडायला शतकी कालखंड लागला होता. तुटायला एक दिवस पुरला म्हणायचा!)
 
 
बाकी साधं पोस्टकार्ड असो किंवा आंतर्देशीय एअर मेल, रजिस्टर, पार्सल, मनिऑर्डर, तारा यापैकी काहीही असो...आम जनतेला पोस्टाचा आधार वाटे हे नक्की. नगण्य व्याजदर असला तरी सुरक्षिततेसाठी ‘पोष्टात’ खातं उघडणारे लोक भेटत असत. अत्यंत माफक दरात देशाच्या, जगाच्या कानाकोपर्‍यामध्ये संदेशवहन करण्याचं पोस्टखात्याचं कसब होतंच तसं मौलिक. बचतखात्यासोबत विमा, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी, विकासपत्रं वगैरे क्षेत्रातही पोस्टखात्याने लोकांना आधार द्यायला सुरुवात केली. तसतसा लोकांचा त्यावर विसंबण्याकडे कल वाढला. नाती जपण्याइतकीच पैसा जपण्याची हमी होती ना त्यात!
 
 
आजमितीला देशात सुमारे 1 लक्ष 56 हजार एवढी टपाल कार्यालयं आहेत. त्यांच्याद्वारे करोडो भारतीयांकडे संदेशवहन होतंय तर लाखो लोकांना तिथल्या नोकरीच्या किंवा संलग्न सेवांच्या स्वरूरुपामध्ये रोजगार मिळतो आहे. पिवळेधमक पंख पसरलेल्या स्वरूपातलं त्याचं बोधचिन्ह सार्थ ठरत आहे. या एवढ्या जगड्व्याळ पसार्‍यामुळे व्यवहारात कधीकधी त्यांच्याकडून काही भूलचूक झाली असेल तर संभाव्यतेच्या नियमानुसार ती अंमळ समजायला हवी.
 
 
हे ज्यांना समजत नाही ते टपालसेवेला झाडत सुटतात. नावंबिवं ठेवतात. साक्षात पु.ल. देशपांडे, माझे पौष्टिक जीवन या लेखात भारतीय टपालसेवेची भरपूर खिल्ली उडवतात. ज्या टपालसेवेने पिढ्यांमागून पिढ्यांमधल्या प्रेमवीरांना प्रेमपत्रांच्या रूपात भक्कम आधार दिला, त्या निमित्ताने अनेकांची प्रतिभा बहरवली, प्रेम दाखवण्याचे नवनवे संकेत निर्माण केले, चोरून योग्य त्या व्यक्तीकडे पत्र पोचवण्याचे व्यूह रचायला चालना दिली. अगणित कवितांना, फिल्मीगीतांना जन्म दिला तिच्याशी असं कृतघ्नतेने वागणं का व्हावं? काय तर म्हणे,
 
 
“पत्राला ष्टाम्प चिकटावा तशी माणसं पोस्टाच्या नोकरीला चिकटतात.”
 
“काही पोष्टवाले सतत ‘तारेत’ काम करतात.”
 
“पोष्टवाले सतत डिलिव्हरीच्या लगबगीत असतात.”
 
“आता मेल्स आहेत, पूर्वी टपालखात्याच्या फक्त स्नेल्स होत्या.” (स्नेल - गोगलगाय)
 
 
कबूल आहे, टपालसेवेला ग्लॅमर नाहीये. आपल्या अनेक टपालकचेर्‍या (पोस्ट ऑफिस) आताआतापर्यंत कळकट होत्या. नव्या सुविधा सुधारणांपर्यंत सहजासहजी पोचत नव्हत्या. स्टॅम्प लावायला कोपर्‍यात ठेवलेली डिंकाची बाटली, तिच्यामधली डिंक लावण्याची काडी, बाटलीतला वाहता डिंक, जरूर पडल्यास डिंक पुसण्यासाठी ठेवलेलं फडकं हे सारं पुरेसं नमुनेदार होतं. एखाद्याला अत्यंत घाईच्या वेळी असल्या डिंकाने पाकीट चिकटवून दाखव, असं आव्हान दिलं जात होतं. आता ही परिस्थिती थोडीफार सुधारते आहे. नवतेचं वारं लागतंय. तरीही ‘लाल फीत’ आहेच. एखाद्या शिक्षणसंस्थेने प्रवेश दिल्याचं पत्र योग्य वेळी टपालात न टाकण्याने तिथे शिक्षणासाठी हजर राहण्याची संधी गमावलेली माणसं आहेत. ‘मुलगी पसंत आहे, पुढची बोलणी करायला या’ या छापाचं पत्र गहाळ झाल्यामुळे काही लग्नं होता होता थबकली आहेत. नोकरीचं अपॉईंटमेंट लेटर टपाल दिरंगाईत अडकल्याने योग्य वेळी नोकरीवर न गेलेल्या, पुढे बेकारीच्या भीतीने आयुष्य संपवणार्‍या युवकाची कथा कुठे, कोणी सांगितली, ऐकली आहे. या कशाचंही समर्थन होऊ शकत नाही, पण याची टक्केवारी अत्यंत नगण्य असल्याने टपालखात्याने दिलेले काही हृद्य क्षण, त्यातला मानवी स्पर्श आठवणच बरं असं मी मानते.
 
 
आता मेल तत्काळ जातात. मेसेजेस जगाच्या पाठीवर कुठेही ताबडतोब डिलिव्हर होतात. फार शब्दांची आवड नसेल तर इमोजींची देवघेव सहज करता येते. उंचावलेले अंगठे आणि गुलाबी हृदयं खिरापतींसारखी वाटता येतात. पण या खिरापत स्वरूपामुळेच त्यांना ‘एकास एक’ किंवा ‘एकमेव’ किंवा ‘अद्वितीय’ असं म्हणण्याजोगी खासियत उरत नाही. पूर्वीच्या प्रेमपत्रांना अत्तराचा वास लावत. (असं म्हणतात) तेवढा जरी नसला तरी सर्वसाधारण घरगुती पत्रांना नात्यांच्या आस्थेचा वास असे. थेट गुलाबी रंग नसला तरी भावनांच्या कोवळिकीची पुसट गुलाबी छटा असे. ईमेलला हे काही नाही. कोणीही, कोणालाही, कधीही, कशीही पाठवली तरी एकच छाप! यंत्राचा स्पर्श, मानवी स्पर्श गायब.
 
 
काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जगभरात आणि आपल्याकडेही पत्रांनी फार मौलिक कामगिरी केलेली आहे. चार्ल्स डार्विनचं संपूर्ण उत्क्रांतीवादाचं सूत्र पहिल्या प्रथम त्याने एका पत्राने कळवल्याचा इतिहास आज माध्यमांमध्ये सहज वाचायला मिळतो. आण्विक शस्त्रांबद्दल (अ‍ॅटॉमिक वेपन्स) विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांना पाठवलेलं पत्र विख्यात आहे. आठव्या हेन्रीने आपली प्रेयसी अ‍ॅन बुलियन हिला पाठवलेलं प्रेमपत्र हा प्रेमपत्रांचा मुकुटपणी मानला जातो. मार्टिन ल्यूथर किंग यांनी बर्मिंगहॅम तुरुंगातून पाठवलेलं पत्र हा ‘ए कॉल फॉर युनिटी’ आहे. समतेचं जाहीर आवाहन आहे, असं जगभर मानलं जातं.
 
 
ज्यांना एवढं एकदम जागतिक व्हायचं नसेल त्यांनी खुशाल आपल्याकडचं पत्रभांडार पाहावं, तेही विपुल व व्यामिश्रच आहे. मुळात ‘मी तुला मनोमन वरलं आहे’ असा कबुलीजबाब थेट कृष्णाला रुक्मिणीने पत्राने कळवला. तिथपासून आपल्याकडला हृद्य पत्रप्रवास सुरू झालेला आहे. गोपाळराव जोशी यांनी आनंदीबाई जोशींना शिकायला भाग पाडलं याला विरोध करताना लोक म्हणाले, ‘कशाला संकट ओढवून घेताय? बायकोला लिहायला शिकवलंत की ती प्रियकराला पत्र लिहिल.’ तसं काही घडलं नाही. उलट गोपाळराव आणि आनंदीबाई यांच्यातच बराच पत्रव्यवहार घडला, जो आज उपलब्ध आहे. पंडित नेहरूंची कन्येला पत्रं, सानेगुरुजींनी सुधा या आपल्या पुतणीला लिहिलेली पत्रं (पुस्तक : सुंदर पत्रे) हे आपल्याकडलं साहित्यधन ठरलेलं आहे. स्त्रीपुरुषांचा पत्रसंवाद तर मोठाच आहे. मग तो कवी अनिल व त्यांच्या पत्नी कुसुमावती बाई (पुस्तक : कुसुमानिष्ठ) यांच्यातला असो, सुनिताबाई देशपांडे व जी.ए. कुलकर्णी यांच्यातला असो, हरिभाऊ आपटे आणि काशीबाई कानिटकर किंवा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि आनंदीबाई शिर्के यांच्यातला असो. जी चर्चा सहसा खासगीत किंवा आमनेसामने करता आली नसती ती पत्रांंद्वारे करण्याचे प्रयत्न अनेकांकडून झाले आहेत. त्याची भरपूर विश्रब्ध शारदा आपल्या समाज, संस्कृतीच्या पोटात दडलेली आहे. म्हणून हरिभाऊ मोटे यांनी थोरामोठ्यांच्या सांस्कृतिक श्रीमंतीचं दर्शन घडवणार्‍या मराठी पत्रांचे तीन संग्रह ‘विश्रब्ध शारदा’ या नावाने प्रसिद्ध केले. त्याचे तितकीच श्रीमंती बाळगणारे आणखीही भाग निघू शकतील. विश्रब्ध म्हणजे शांत, निर्भय, विश्वसनीय. चांगली पत्र लिहिता येणं, मनातलं नेमकं हवं ते थोडक्यात परिणामकारकरित्या मांडता येणं ही कलाच आहे. शारदेचा वरदहस्त असल्याशिवाय चांगली पत्रं लिहिता येणार नाहीत. ती विद्वानांनी लिहिलीच पण सामान्यांनीही उत्कट भावनेपोटी लिहिली. आपल्या पुष्कळ आत्या, माम्या, मावश्या वगैरे पत्रं पाठवायच्या तरी त्यातल्या एखादीचं पत्र पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटायचं. कारण त्याला शारदेचा स्पर्श असायचा.
 
 
दिवसेंदिवस चिंता वाटते ती ही विश्रब्ध शारदा कायमची कुंठित होण्याची किंवा काळाच्या रेट्यापुढे दबून मूक होण्याची. लोकांपाशी वेळेची टंचाई असेल, संवाद साधण्याचे नाना पर्याय असतील, भाबड्या भावुकतेपेक्षा रोखठोक राहणं काहींना पत्करत असेल, हे सगळं मान्य केलं तरी पत्रलेखन लुप्त होणं पटत नाही.
 
पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा
 
पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा
 
या मंगेश पाडगावकरांच्या ओळी विसरता येत नाहीत. भले, तंत्रज्ञान कितीही वाढो, सुधारो, पुढारो तरी माहितीची, निरोपांची देवघेव करायला याचा फायदा होईल. पण भावनांची देवघेव जास्त परिणामकारकरित्या करायला कागदाच्या तुकड्याला काळजाच्या तुकड्याची जोड हवीत ना? ही जोड बघायला मिळते ती खासगी, घरगुती पत्रांमध्ये.
 
घरगुती, कौटुंबिक नातेसंबंधातली पत्रं ही खूपदा त्या त्या काळातल्या त्या त्या व्यक्तीच्या भावनावस्थेचे फोटोच असतात. म्हणून जुने फोटो जपून ठेवावेत तशी काही जुनी पत्रं आपण जपून ठेवतो. वाढत्या वयात, फुरसतीच्या वेळी, स्मरणरंजनासाठी जुने फोटो, अल्बम बघावेत तशी ही पत्रंही आपण मुद्दाम बघतो. पण बघताबघता कधी त्यात हरवतो किंवा कधी डोळ्यातल्या पाण्यामुळे ती धूसर दिसायला लागतात हे आपल्याला कळेनासं होतं.
 
 
पहिल्यांदाच आपलं घर, गाव, मोहल्ला, देश सोडून परदेशी गेलेल्या मुलाचं पत्र तब्बल पंधरावीस वर्षांपूर्वीचं असतं. आता त्याच्या इथे नसण्याची आपल्याला सवय झालेली असते. तो तर तिथे पुरताच रमलेला असतो. पण त्या पहिल्या पत्रातले घराबाबतचे बारीकसारीक उल्लेख, देश सोडण्यातली अपरिहार्यता, वियोगातली कातरता, पत्राच्या सुरुवातीचं (कदाचित उसनं धरलेलं) मनोबल शेवटीशेवटी ढासळत जाणं आणि ते अगदी अक्षरातही डोकावणं यातून आठवणीचं केवढं मोहोळ जागं होतं. म्हणून तर ते पत्र आपण मध्येच कधीतरी आठवणीने वाचतोही आणि खूपदा ठरवून ते वाचायचं टाळतोही!
 
 
सहस्रचंद्रदर्शनानिमित्त एखाद्या जराजर्जर शिक्षकाला त्याच्या एखाद्या उनाड शिष्याचं शुभेच्छापत्र आलेलं असतं. प्रत्यक्ष त्यांच्या शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या काळामध्ये त्या दोघांनाही एकमेकांबद्दल फारसं प्रेम वाटलेलं नसतं, पण पुढे आयुष्यात गुरूने एकेकाळी दिलेली शिदोरी खूपदा आपल्या कामी आल्याचं त्याला मनोमन जाणवतं आणि तो गुरूंना भरभरून मानवंदना देणारं पत्र लिहितो. हे पत्र कितीही वर्षांनी आणि कितीही वेळा वाचलं तरी गुरूचं मन भरणार नाही.
 
 
मानवी नातेसंबंधांमधल्या अशा अनेक भावनांचं, प्रेमाचं, स्वीकाराचं, पश्चात्तापाचं, उपरतीचं, भोगाचं, त्यागाचं कशाचंही न राहवून केलेलं उत्कट चित्रण करणारी पत्रं हा एक मोठा सांस्कृतिक ऐवज आहे, असं जाणवतं.
 
 
असं म्हणतात की, तुम्ही कितीही श्रीमंत असा तुमचा गेलेला काळ तुम्ही विकत घेऊ शकत नाही. हे खरंच आहे. पण तोच गेलेला काळ पत्रांमध्ये गोठवलेला असतो. काळाच्या तेवढ्यातेवढ्या अंशमात्र तुकड्याची गाठ घालून देण्याची ताकद पत्रांमध्ये असते. मग त्यांचा कागद पिवळा पडलेला असो, अक्षरं पुसटलेली असोत, त्याचे तुकडे पडत असोत. आपल्याकडलं इतिहास लेखन म्हणजे फक्त विजेत्यांचा इतिहास लिहिणं, तोही गौरवशाली इतिहास लिहिणं एवढंच असतं, असा एक आक्षेप घेतला जातो. तो इतिहासाचा एक तोंडवळा झाला. तो दाखवायला, बघायला आकर्षक असला तरी ते गतकाळाचं संपूर्ण चित्र असू शकत नाही. त्याला जनसामान्यांच्या जगण्याच्या इतिहासाची जोड हवी. ती मिळालीच तर फक्त आणि फक्त जुन्या पत्रलेखनातून मिळेल.
 
कागदावर, शब्दातून एकेका व्यक्तीने लिहिलेल्या पत्रलेखनातून! मेलमधूनही मिळू शकेल, पण मेलस् किती काळ जपल्या जातील? याची शंका वाटते. संपर्काच्या भाऊगर्दीत त्या हरवतील कदाचित आणि टिकल्या तरी कागदाच्या तुकड्यासारखं, त्यांना काळजाशी धरता येणार नाही. त्यांचा वास घेता येणार नाही. तुकडे पडल्यावरही जपून ठेवण्याचं भाग्य त्यांच्या वाट्याला येणार नाही. त्यांचं काहीच नुकसान होणार नाही, यामुळे पण जनसामान्यांचं नक्की नुकसान होईल. त्यांचं सांस्कृतिक संचित कमी होईल. हे जाणवलं की वाटतं... भले ते खेळातलं पत्र हरवो, सापडो... व्यवहारातली व्यक्तिगत पत्रं हरवता कामा नयेत.
Powered By Sangraha 9.0