संघाची शताब्दी आणि पंचपरिवर्तन

विवेक मराठी    03-Oct-2025   
Total Views |
rss
पाच परिवर्तन सूत्रांच्या आधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाला आहे. आता देशातील सर्व नागरिकांनी त्यात सहभागी होऊन आपला देश विकसित, संघटित, सुरक्षित आणि आत्मगौरवाने परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
या विजयादशमीला म्हणजे 2 ऑक्टोबर 2025ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाली. आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची सुरुवात केली. हिंदू समाजाचे संघटन हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल सुरू झाली. डॉ. हेडगेवार हे भविष्यवेधी होते. त्याचप्रमाणे हिंदू समाजाची अवनती का झाली, याचाही त्यांनी अभ्यास केला होता. सशस्त्र क्रांतिकार्य, राष्ट्रीय काँग्रेसचे कार्य अशा सामाजिक अनुभवांना गाठीशी बांधून डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात केली. शंभर वर्षानंतर, डॉ. हेडगेवारांनी केलेल्या बीजारोपणातून एक डेरेदार वटवृक्ष निर्माण झाला आहे, हे आपण अनुभवत आहोत. केवळ हिंदू समाजाचे संघटन हेच ध्येय घेऊन सुरू झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करताना दिसतो आहे. हे सर्व काम हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी आहे. त्यामुळे मूळ उद्देश साध्य करण्यासाठी मनुष्यनिर्माण करण्यावर संघाचा सुरुवातीपासून भर राहिला आहे. संघाच्या शाखेत प्रशिक्षण झालेल्या स्वयंसेवकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत जाऊन काम केले. मग ते काम सामाजिक क्षेत्रात असो की आरोग्य क्षेत्रात असो. ज्या क्षेत्रात संघस्वयंसेवकांनी संघविचाराला अधिष्ठान मानून काम सुरू केले ते काम त्या क्षेत्रात अग्रगण्य म्हणून गौरवले गेले. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजचे दृश्यस्वरूप आहे. या पार्श्वभूमीवर संघ सुरू झाला तेव्हा काय परिस्थिती होती हे समजून घेतले पाहिजे.
 
आपल्या हिंदू समाजाला हजारो वर्षांपासूनचा एक गौरवशाली वारसा आहे. चिरंतन तत्त्वज्ञान आहे. मात्र आपदा, परचक्र आणि ‘स्व’चे विस्मरण या गोष्टींमुळे आपण आपले अस्तित्व विसरलो. आणि गुलाम झालो. आपले समाजजीवन विसविशीत झाले. जातीय अस्मिता, धार्मिक अहंकार, भेदभाव अशा विविध व्याधींनी ग्रासलेल्या हिंदू समाजाची त्यावेळची मनोभूमिका काय होती? मला गाढव म्हण पण हिंदू म्हणू नको, असे अभिमानाने सांगणारे विद्वान त्याकाळी आपल्या समाजात होते. एकसंघ, एकात्म, संघटित, बलशाली हिंदू समाजाचे स्वप्नही कुणाला पडत नव्हते. अशा काळात संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात केली. त्यासाठी सोळा स्वयंसेवकांसोबत जी बैठक झाली त्यात डॉ. हेडगेवार म्हणाले होते, ‘स्वयंप्रेरणेने आणि स्वयंस्फूर्तीने राष्ट्रसेवेचा विडा उचलणार्‍या व्यक्तीने केवळ राष्ट्रकार्यासाठी निर्मिलेली संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. या राष्ट्रीयत्वासाठी कोणत्याही धर्माचा, संप्रदायाचा त्याग अभिप्रेत नसून सनातन सांस्कृतिक चेतनेच्या आधारावर सकारात्मक रूपाने राष्ट्रीयत्वाची परिभाषा करणे अपेक्षित आहे.‘
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणते काम करेल? या प्रश्नाचे उत्तरही डॉ. हेडगेवारांनी दिलेले आहे. ते म्हणतात, ‘संघाला एकच भावना उत्पन्न करायची आहे, ती म्हणजे हिंदुत्वाची. हिंदू समाज कितीही जातीत विभागला गेला असला, तरी संघ हिंदू एकच जात ओळखतो. ब्राह्मण-अब्राह्मण, स्पृश्यास्पृश्य, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित हे भेद संघ जाणत नाही. संघाला हिंदुत्वाशिवाय काहीच महत्त्वाचे वाटत नाही. इतकेच नव्हे, तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी संघाची निर्मिती आहे हे प्रत्येकाने अवश्य ध्यानात असू द्यावे. या पवित्र भगव्या ध्वजाखाली अखिल हिंदूंची संघटना करणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय आहे. यापेक्षा अधिक उदात्त अधिक उच्च व तेजस्वी ध्येय असू शकेल असे मला वाटत नाही.’
 
 
संघाचा शंभर वर्षांचा प्रवास हा अनेक राजकीय व सामाजिक आव्हाने अंगावर घेत झालेला आहे. तीन वेळा संघबंदी, साम्यवाद, फुटिरतावाद, भाषिक संघर्ष, खाजगीकरण, जागतिकीकरण याचबरोबर सीमेवरील घुसखोरी इत्यादी आव्हाने समजून घेत संघाचे काम चालू आहे. ते आहे हिंदुत्वाचे. चिरंतन हिंदू तत्त्वज्ञान आणि जीवन पद्धतीने पुन्हा आपला समाज परमवैभवी करण्याचे. या पार्श्वभूमीवर हिंदू धर्म आणि जीवनपद्धती यावर भाष्य करताना द्वितीय सरसंघचालक श्रीगुरूजी म्हणतात, ‘हिंदू संस्कृतीने नेहमीच प्रथम धर्माचा विचार केला. परंतु हे न समजणारे लोक भ्रामकपणे हिंदू जीवनपद्धतीच्या वैशिष्ट्यांवर सदानकदा चिखल उडवीत राहातात. मी भारतमातेच्या पुत्ररूप हिंदू समाजाचे अंग आहे. भाषा, राहणी भिन्न भिन्न असूनही संपूर्ण समाजाशी एकरस, एकात्म आहे. अशी समाजाला एका सूत्रात गुंफणारी भावना शक्ती प्रत्येकाच्या अंत:करणात जागवून ही दुरावस्था समाप्त होऊन स्वाभिमानी जीवन निर्माण होईल.’
 
 
हिंदुत्व आणि राष्ट्रीयता हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे हिंदुत्व हे राष्ट्रवादाच्या अंगाने समजून घेणे आवश्यक आहे. सामाजिक जीवनात असलेल्या कुप्रथा दूर करून एकरस हिंदू समाज संघटित करण्यासाठी तृतीय सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांनी दिशादर्शन केले होते. राष्ट्रवादाची व्याख्या करताना ते म्हणतात,‘राष्ट्रवाद ही एक आपुलकीची भावना आहे. जी काही विशिष्ट श्रद्धेच्या आणि पद्धतीच्या समानतेतून उद्भवते. यातील पहिली म्हणजे मातृभूमीप्रती असलेली परम निष्ठा आणि त्यासाठी सर्वस्व अर्पण करणे, दुसरे म्हणजे या देशाच्या पूर्वजांबद्दल आदर, तिसरा या देशाच्या संस्कृतीशी जोडले जाणे. विविधतेची कसली भीती? यातून ’एकम् सत विप्रा बहुधा वदन्ति’चा व्यावहारिक सिद्धांत आला. या तीन गोष्टी ज्यांने स्वतःमध्ये उतरवल्या त्यांच्याबद्दल या देशातील व्यक्तींना कधी परकेपणा वाटणार नाही.’
 
 
हिंदू धर्म, धर्म परंपरा आणि त्यासंबंधीच्या चुकीच्या धारणा प्रस्थापित करून सामाजिक जीवनात अस्वस्थता निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो. या पार्श्वभूमीवर धर्म म्हणजे काय? हे सांगणे आवश्यक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक मा. रज्जूभय्या यांनी स्पष्ट केले आहे की, आपला देश ’सर्व पंथाचा आदर’ म्हणतो, पण धर्मनिरपेक्षता येथे नाही. रिलिजन या इंग्लिश शब्दासाठी आपण धर्म हा शब्द वापरल्याने हा सारा गोंधळ निर्माण झाला. रिलिजनचा योग्य प्रतिशब्द पंथ किंवा संप्रदाय आहे. धर्म हा व्यापक शब्द आहे. ज्यामध्ये सशक्त समाजनिर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या सर्व रचनांचा, व्यवस्थांचा आणि गुणांचा समावेश आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा मी धर्मसंस्थापनेसाठी जन्म घेतो. धारणात् धर्ममित्याहु:-ज्याने समाजाची धारणा होते, रक्षण होते तो धर्म, तो समाज घडवतो. धर्म अशा गुणांचा समुच्चय आहे, जे गुण समाजाला सत्याकडे नेतात.’
 

rss 
 
हिंदू समाजाच्या संघटित शक्तीच्या बळावर आपला देश विश्वगुरू होऊ शकतो. आपण आपली जीवनमूल्ये, परंपरा आणि चिरंतन तत्त्वज्ञान यांच्या आधारे परमवैभवी होऊ शकतो. हा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक मा. के. सुदर्शनजी यांनी व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की,‘देशाच्या, संस्कृतीच्या ’एकम् सत विप्रा बहुधा वदंति’ म्हणजे सत्य एकच आहे. केवळ लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. आणि अंतिम सत्यापर्यंत पोहचण्याचे अनेक मार्ग आहेत आणि ते सर्व सत्यच आहेत. या मूळ तत्त्वावर विश्वास ठेवतात. जे फक्त आम्हीच खरे आणि बाकीचे सगळे चुकीचे म्हणतात, त्यांना हिंदू म्हणता येणार नाही. बळजबरीच्या धर्मांतराबद्दल बोलणार्‍यांना या राष्ट्रजीवनात स्थान नाही. जर आपण सर्वांनी एकत्र वाटचाल केली आणि एकमेकांना सहकार्य केले तर तो दिवस फार दूर नाही, जेव्हा आपल्या राष्ट्राचा ध्वज जगात सर्वात उंच फडकवू. परमवैभवाचा टप्पा दृष्टिपथात आला असून तो सर करण्यासाठी हिंदुत्वासाठी हिंदू समाजाने आपल्या व्यवहारातून जीवनमूल्ये प्रकट केली पाहिजेत.’
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहावे सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत म्हणतात,‘हिंदुत्व एक असा शब्द आहे, ज्याच्या अर्थाला पूजापद्धतीशी जोडून संकुचित केले गेले. हा शब्द आपल्या ओळखीला सनातन सत्य व समस्त मूल्यसंपदेबरोबर अभिव्यक्ती देणारा शब्द आहे. म्हणूनच संघाला वाटते की हा शब्द भारताला आपले मानणारा, त्याच्या संस्कृतीच्या वैश्विक आणि सार्वकालिक मूल्यांना आचरणात उतरवण्याची इच्छा बाळगणारा आणि तो यशस्वीरित्या करून दाखवणारा, त्याच्या पूर्वपरंपरेचा अभिमान मानणार्‍या समस्त 150 कोटी समाजबांधवांना लागू होतो.’
 
 
हा झाला संघाचा, हिंदुत्वाचा प्रवास. या प्रवासात संघ कालानुरूप बदलत गेला, अगदी गणवेशापासून ते बैठकीच्या स्वरूपापर्यंत. अनेक बदल संघात झाले आहेत. असे असले तरी संघाचे मूळ काम हे हिंदू समाजाला संघटित करण्याचे आहे. त्यामुळे समकालीन परिस्थितीमध्ये संघ आपले काम कसे करणार? या प्रश्नाचे उत्तर दोन वर्षांपूर्वी विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत यांनी दिले. हिंदू समाजासमोरची आव्हाने, वैश्विक समस्या आणि दैनंदिन व्यवहारात बदल घडवून आणण्यासाठी मूल्ये. या तीन गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले होते. ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले होते. ‘2025-2026 हे वर्ष संघाचे 100 वर्षे पूर्णत्वाचे वर्ष आहे. संघाचे सगळे स्वयंसेवक वर सांगितलेल्या गोष्टींमध्ये पुढे जातील आणि काम सिद्धीस नेतील. संपूर्ण समाजात आपलेपणाची भावना असावी. मंदिर, पाणी, स्मशानातील भेद मिटावा. परिवारात नित्य मंगल संवाद, संस्कारित व्यवहार आणि संवेदनशीलता राहावी. समाजाची सेवा सगळ्यांनी करत राहावी. आपल्या घरात पाणी वाचवून, प्लास्टिक टाळून, हिरवळ वाढवून सृष्टीला वाचवण्यात हातभार लावू, स्वदेशीमुळे स्वयंरोजगार आणि स्वावलंबन वाढेल. रोजगार वाढावा. देशातील पैसा देशात राहावा म्हणून स्वदेशी आवश्यक आहे. कायदे व नियमांचे पालन होवो. परस्पर सहयोग व सद्भाव राहो. सर्वाना या पाच गोष्टी हव्या आहेत. लहानलहान गोष्टींपासून सुरुवात करून त्याच्या अभ्यासाने या सवयी आचरणात आणल्या पाहिजेत समाजहितासाठी शासन-प्रशासन जे करीत आहे, त्यात संघाचे स्वयंसेवक योगदान देतील. समाजाची एकता राखण्यासाठी सजग निःस्वार्थी, जनहितकारी शासन व प्रशासन स्वबळावर उभे राहून सतत प्रयास करतात. तेव्हाच राष्ट्र बलशाली बनते, जेव्हा बल आणि वैभवसंपन्न राष्ट्राजवळ आमच्यासारखी सनातन संस्कृती, सर्वांना आपले कुटुंब मानणारी, अंधारापासून प्रकाशकाडे घेऊन जाणारी, असत्यापासून सत्याकडे जाणारी आणि मर्त्य जीवनापासून सार्थक जीवनाकडे घेऊन जाणारी संस्कृती असत तेव्हा ते राष्ट्र विश्वाचे संतुलन परत आणते आणि जगाला सुख-शांतिमय जीवन प्रदान करते. सध्याच्या काळात आपल्या अमर राष्ट्राच्या नवोत्थानाचे हेच प्रयोजन आहे.’
 
 
सरसंघचालकांचे विजयादशमीचे बौद्धिक हे स्वयंसेवकांसाठी कार्यदिशादर्शन असते. स्वयंसेवक आपापल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक व्यवहारातून सरसंघचालकांचे विचार म्हणजे संघाचे विचार कृतीतून साकार करतो. संघशाखा, स्वयंसेवकाचे घर, कार्यालय इतपतच हा परिवर्तनाचा विषय मर्यादित राहू नये. कारण संपूर्ण हिंदूसमाजाचे संघटन हे जसे संघाचे ध्येय आहे तसेच संपूर्ण हिंदू समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सध्याचे लक्ष्य आहे. संघाच्या वतीने पंच परिवर्तन सूत्रांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्यक्ष कृती व प्रबोधन चालू आहे. त्याप्रमाणे सामाजिक जाणीवा जागृत असणार्‍या व्यक्तीच्या मदतीने पाच बिंदूंवर काम करत आहे. ते बिंदू पुढीलप्रमाणे आहेत.
 

rss 
 
* समरसता गतिविधी - आपला समाज हा गतिशील समाज आहे आणि समूहशक्तीच्या आधारावर आपली वाटचाल झाली आणि समृद्धी आणि वैभवाचा काळही याच समूहशक्तीमुळे आपण अनुभवू शकलो. विविध कलाकौशल्य व ज्ञानपरंपरा जतन करणारे ज्ञातीसमूह आपल्या समाजाचे बलस्थान आहे. याची प्रचिती अंजिठा-वेरूळच्या लेण्यांतून येते. एकात्मता आणि भ्रातृभाव ही मूल्ये प्रकट करणार्‍या आपल्या समाजात अस्पृश्यता, जातीभेद, उच्चनीचता अशा विविध व्याधींची लागण झाली. या सर्व कुरिती आक्रमकांनी आमच्यावर लादल्या अशी एक मांडणी केली जाते. पण या कुरितींना धर्माचा आधार कुणी दिला? धर्माशी या नीच पातळीवरच्या व्यवहाराला कुणी जोडले? या प्रश्नाचे उत्तर शोधताना असे लक्षात येते की, मूठभर लोकांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हे धार्मिक आधार शोधले. आणि चिरंतन मानव्याचा मंत्र सांगणारा धर्म बदनाम झाला. त्यातून हिंदू समाज विखंडित झाला.
 
 
या पार्श्वभूमीवर सामाजिक समरसता हा महत्त्वाचा विषय संघाने आपला कार्यसूचीवर घेतला आहे. सामाजिक समरसता हा विषय संघाला नवा नाही. अगदी संघाच्या प्रारंभापासून समरसता हा कृतीचा व चिंतनाचा विषय संघात आहे. आपली संतपरंपरा, महापुरुषांच्या प्रबोधनाचा आधार घेऊन समाजात बदल घडवून आणण्यासाठी संघ प्रयत्न करत असला तरी भावजागरणातून मानवी व्यवहारात बदल घडवून आणण्यावर भर दिला जातो आहे. या प्रयत्नांना यश लाभत आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अस्पृश्यता पाळल्या जातात. त्या सामाजिक जीवनावर वाईट प्रभाव निर्माण करून समाजाचे विभाजन करतात. या पार्श्वभूमीवर बंधुभाव हाच धर्म ही संकल्पना समोर ठेवून सामाजिक समरसता या विषयातून समाजमन घडवण्यात येते आहे. सामाजिक दरी कमी करण्यासाठी या गतिविधीचा उपयोग होत असून त्यातून समरस समाज उभा राहतो आहे.
 
 
* कुटुंब प्रबोधन गतिविधी- भारतीय समाजव्यवस्थेचा कणा म्हणजे कुटुंबव्यवस्था. भारतीय कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास जागतिक पातळीवर होत असतो. अकृत्रिम प्रेम, ममत्व या गोष्टीच्या आधारावर आपली कुटुंबव्यवस्था उभी राहिली आहे. अनेक व्यक्ती एका छत्राखाली एकत्र राहतात, त्यातून त्यांचा विकास होतो. क्षमता विकसन होते. ज्ञान, परंपरा, संस्कार, संस्कृती यांचे अनौपचारिक शिक्षण कुटुंबव्यवस्थेतून प्राप्त होते. परिणामी व्यक्तिमत्व विकासासाठी वेगळे शिक्षण किंवा प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नसते. व्यक्ती ते समष्टी असा एकात्म भाव जपणारी संस्था म्हणजे कुटुंबव्यवस्था होय. मात्र या कुटुंबव्यवस्थेसमोर आज मोठ्या प्रमाणात आव्हाने उभी राहिली आहेत. एकत्र कुटुंबापेक्षा विभक्त/विस्तारित कुटुंब यावर भर दिला जातो आहे. त्यामुळे ज्ञान, संस्कार, संस्कृती यांचा अभाव दिसून येतो आहे. पाश्चात्य संस्कृतीचा आंधळा स्वीकार आणि अनुकरण, आर्थिक सुबत्ता, सुखाची खर्चिक संकल्पना, नातेसंबंधांतील दुरावा इत्यादी गोष्टी समोर येत असून ही हिंदू समाजासाठी धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कुटुंब प्रबोधनाचा विषय हाती घेऊन समाजात काम करत आहेत. भाषा, भवन, भूषा, भजन, भोजन, भ्रमण या सहा बिंदूच्या सहाय्याने हे प्रबोधन चालू आहे. सक्षम, संस्कारयुक्त आणि परस्परांशी स्नेहधाग्यांनी बांधलेले कुटुंब हे अनेक समस्यांचे उत्तर आहे. हे लक्षात घेऊन विशेषतः नव्या पिढीला कुटुंब व्यवस्था व तिचे महत्त्व समजावून सांगणे व ज्येष्ठांना नव्या पिढीच्या मानसिकतेशी जोडून घेण्यासाठी जो सुवर्णमध्य काढावा लागेल तो कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या माध्यमातून साध्य होईल.
 
 
* पर्यावरण गतिविधी - जागतिक पातळीवर सध्या पर्यावरण संवर्धन आणि त्याविषयीची जागृती हा विषय घेऊन जोरदार काम चालू आहे. युनोसारख्या संस्था विविध पर्यावरणीय प्रश्न आणि त्याच्या सोडवणुकीसाठी मानवी सहभाग या विषयावर सातत्याने प्रयत्न करत असतात. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक पातळीवर कायदे तयार केले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या संस्कृतीमध्ये असलेली दोहन ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. आपण निसर्गाकडून आवश्यक त्या गोष्टी घेत असलो तरी मुळावर घाव घालून निसर्ग नष्ट करण्याची पद्धती आपली नाही. अन्य देशांत मात्र ओरबाडून घेण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यातून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पाणी, हवा, जमीन या निसर्गदत्त गोष्टीचे इतके शोषण झाले की, त्यातून पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संघाच्या माध्यमातून पर्यावरण गतिविधीचे काम सुरू झाले आहे. प्रबोधन, संवर्धन आणि प्रशिक्षण या तीनही पातळ्यांवर हे काम चालते. जल, जंगल, जमीन, जनावर, जीवन या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून पर्यावरण गतिविधीचे काम सुरू आहे. हे काम सामुदायिक असले तरी व्यक्तिगत पातळीवर केलेले प्रयोग हे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी खूप उपयुक्त आहेत. जागतिक विचार आणि स्थानिक कृती अशा स्वरूपात हे काम असल्याने व्यक्तिगत पातळीवर छोट्या-छोट्या प्रयोगातून पर्यावरण गतिविधीचे काम चालते.
 
 
* नागरी कर्तव्य - आपण स्वतंत्र देशात राहतो. आपल्या देशाचे संचालन संविधानाच्या माध्यमातून होत असते. भारतीय संविधान हा भारतीय नागरिकांनी स्वतःप्रती अर्पण केलेला जिवंत दस्तऐवज आहे. भारतीय जीवनपरंपरेत व्यक्तिगत पातळीवर काही जबाबदारी किंवा कर्तव्य सांगितली आहेत. या कर्तव्यालाच धर्म असेही म्हटले जाते. उदाहरणार्थ-पुत्रधर्म, मातृधर्म, बंधूधर्म, ज्ञातीधर्म, समाजधर्म अशा विविध पातळीवर कर्तव्ये पार पाडली जातात. आणि त्यासंबंधीचे प्रबोधन/मानसिकता सहजपणे होत जाते. या उलट आपल्या संविधानाने आपल्यासाठी काही कर्तव्ये आणि काही हक्क दिले आहेत. त्या विषयी खूप मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे हक्कांच्याबाबतीत लवकर जागरूकता निर्माण होते आणि हक्कासाठी सर्वजण आग्रही देखील असतात. मात्र संविधानाने आपल्याला काही जबाबदार्‍या दिल्या आहेत, त्याला आपण नागरी कर्तव्य असेही म्हणू शकतो. या नागरी शिष्टाचाराविषयी प्रबोधन आणि व्यक्तिगत कृतिरूप आदर्श समाजासमोर ठेवण्याची आवश्यकता आहे. यासाठी बालवयापासूनच विविध नागरी कर्तव्ये समजावून सांगत त्याचे आचरण व्हावे यासाठी संघाचे कार्यकर्ते प्रबोधन करत आहेत. हा विषय समाजाच्या आचरणाचा असून तो समाजानेच कृतीतून साकार करायचा आहे. यासाठी लागणारे प्रबोधन व दिशादर्शन संघकार्यकर्ते करत आहेत.
 
 
* ‘स्व‘ जागरण - ‘स्व’ जागरण किंवा ‘स्व’ बोध या नावाने ओळखले जाणारे परिवर्तन सूत्र हे व्यक्ती ते समष्टी अशा व्यापक परिघाला गवसणी घालणारे आहे. ‘स्व’ म्हणजे मी. या मी चा शोध म्हणजे ‘स्व’ बोध. मी कोण? माझा वारसा काय? माझ्या जगण्याचे औचित्य काय? इथपासून सुरू होणारा हा प्रवास कुटुंब, ज्ञाती, समाज, प्रांत, राष्ट्र आणि विश्व अशा चढत्या भाजणीमध्ये होत जातो. जास्तीत जास्त स्थानिक गोष्टीचा वापर करून ग्रामकेंद्रित जीवनपद्धतीचा अंगीकार म्हणजे ‘स्व’ जागरण. नव्याचा स्वीकार करताना जास्तीत जास्त स्वदेशी तंत्रज्ञान, उत्पादन याचा वापर, स्वभाषेचा वापर म्हणजे ‘स्व’ जागरण. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून आपल्या मुळाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ‘स्व’ जागरण. हे सर्व कशासाठी? आपण व आपल्या भविष्यासाठी. आपल्या सण-उत्सवातून जे एकत्व प्रकट होते, त्याच्या रक्षणासाठी. आपल्या परंपरा, आपले ज्ञान कौशल्य याचे संवर्धन करण्यासाठी.
 
 
संस्कार, संस्कृती आणि राष्ट्रीयता यांना जपण्यासाठी ‘स्व’ जागरण आवश्यक आहे. पाश्चात्य जगताचा प्रभाव आणि त्यातून सुरू झालेले अंधानुकरण संपवण्यासाठी स्वतःची खरी ओळख करून घेणे ‘स्व’ जागरणाचे काम आहे. अर्थात हे काम ज्याचे त्याने करायचे आहे. त्यात संघ स्वयंसेवक पुढाकार घेऊन आपल्या व्यवहारातून आदर्श निर्माण करत आहेत.
 
 
तर अशा या पाच परिवर्तन सूत्रांच्या आधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाला आहे. आता देशातील सर्व नागरिकांनी त्यात सहभागी होऊन आपला देश विकसित, संघटित, सुरक्षित आणि आत्मगौरवाने परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001