@ दीपाली देवळे
राष्ट्र उभारणीचे सुस्पष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून, समाजातील उपेक्षित, वंचित, अभावग्रस्त आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहचणे, त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी त्याच समाजातील लोकसहभाग मिळवणे आणि हे सहवेदनेचे नाते दृढ करणे या विचारातून सेवा सहयोगचे काम सुरू झाले. 31 ऑगस्ट 2009 रोजी संस्थेचे रजिस्ट्रेशन झाले आणि त्यातूनच ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ ही संस्था उदयास आली.
2005 चे वर्ष.... पुण्यात एक विचार रुजत होता... व्यावसायिक क्षेत्रात काम करणार्या काही युवकांचा एक गट एक विचार करत होता.. विचार होता परिवर्तनाचा... विचार होता सेवेचा.. विचार होता सहयोगाचा... पण नेमके काय करावे कळत नव्हते... कुठून सुरुवात करावी काही पक्का धागा हाती सापडत नव्हता. मग सुरू झाला शोध... शोध योग्य दिशेचा... योग्य मार्गदर्शनाचा... अनेक लोकांच्या भेटी झाल्या, अनेक कामे पाहिली गेली. जगातील सर्वात मोठ्या सामाजिक संस्थेच्या मांडवाखालून गेल्याने शोध फार काळ घ्यावा लागला नाही. अनेक जण आपापल्या ठिकाणी, अनेक प्रश्नांवर जीव ओतून, प्रामाणिकपणे काम करीत असल्याचे दिसून आले. गरज होती ती फक्त... त्या कामांना अधिक आणि योग्य पाठबळ देण्याची... समाजात अनेक प्रश्न, समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी अनेक प्रयत्नही याच समाजात होत आहेत. या प्रयत्नांना आर्थिक, मानसिक, तांत्रिक आदी विविध पद्धतीने सहयोग देणारी, पाठबळ पुरवणारी रचनासुद्धा याच समाजात अस्तित्वात आहे. गरज आहे ती फक्त यातील दुवा बनण्याची, यांना एकमेकांशी जोडण्याची... हाच विचार घेऊन कामाला सुरुवात झाली. आणि स्थानिक संस्थांसाठीचा खारीचा वाटा उचलण्यास सेवा सहयोग सुरू झाले. पारिवारिक, व्यावसायिक, स्वयंसेवक (volunteers) ची एकत्रिकरणे सुरू झाली. संस्था संपर्क होऊ लागला. त्यासोबत शाळा संपर्क सुद्धा. त्यातूनच असे निदर्शनास आले की, अनेक शालेय विद्यार्थ्यांकडे स्वतःचे शैक्षणिक साहित्य नाही, शालेय दप्तर नाही. मग अशा मुलांनी शिकावे कसे? यातून शालेय संच योजना सुरू झाली. यात शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेनुसार शैक्षणिक साहित्य बॅगेसहित विनामूल्य देण्याचे ठरले. गरज तर दिसत होती, पण त्याच्या पूर्ततेसाठी काय...? मग दात्यांचा शोध सुरू झाला. आणि पहिल्या वर्षी त्यावेळची संस्थेची शक्ती पाहता, 3000 शालेय संच वितरित करण्याचे शिवधनुष्य पेलले गेले.
काळाची गरज ओळखून नुसते काम करणे पुरेसे नव्हते हे 2005 ते 2009 मधील केलेल्या कामातून लक्षात आले होते. या कार्याला आता एका चौकटीत आणणे गरजेचे होते. म्हणूनच 31 ऑगस्ट 2009 रोजी संस्थेचे रजिस्ट्रेशन झाले आणि त्यातूनच ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ ही संस्था उदयास आली.
राष्ट्र उभारणीचे सुस्पष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून, समाजातील उपेक्षित, वंचित, अभावग्रस्त आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणे, त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी त्याच समाजातील लोकसहभाग मिळवणे आणि हे सहवेदनेचे नाते दृढ करणे या विचारातून सेवा सहयोगचे काम सुरू झाले. संस्था म्हणून स्थापित झाल्यावर स्वतः संस्थेचे पण काही विषय असणे हे क्रमप्राप्त होते. म्हणूनच शिक्षण, पर्यावरण आणि महिला सबलीकरण विषय घ्यावेत असे ठरले.
विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे शाळा संपर्क वाढीस लागला. विद्यार्थ्यांची शिक्षणातील रुची वाढण्यासाठी त्यांना मुळात शाळेत यावेसे, बसावेसे वाटणे हेच महत्त्वाचे होते. अनेक शाळांमध्ये पायाभूत भौतिक सुविधांचा अभाव दिसून आला होता. विद्यार्थ्याला शिकण्यासाठी पोषक वातावरण आणि सुविधा नसल्याने विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता म्हणून शाळेच्या भौतिक सुविधेवर पहिले काम केले गेले पाहिजे हे लक्षात आले आणि त्यातून शिक्षा विकास हा आयाम सुरू झाला. यातून शाळांची पुनर्बांधणी करणे, वर्गखोल्यांचे नूतनीकरण, शौचालये बांधणे, पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करणे, पिण्याचे आणि वापराचे वॉटर स्टेशन बांधून देणे, छत बांधणे अशा भौतिक सुविधांशी संबंधित असलेल्या गरजांवर काम केले जाते. शाळेत विज्ञान प्रयोगाचे साहित्य देणे, ग्रंथालय उभारणे, खेळाचे साहित्य देणे, खेळाची मैदाने बांधणे अशी कामे केली जातात. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांना प्रकल्प भेटीसाठी नेले जाते. आतापर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, अहिल्यानगर, धाराशीव, कोकण विभागातील 250+ शाळांना याचा फायदा झाला आहे. संस्थेच्या सुरुवातीला 3000 शालेय संच वाटपाचा संकल्प धरला होता आणि आता दरवर्षी 75,000 हून अधिक शालेय संच वाटले जात आहेत. आतापर्यंत वाटले गेलेल्या शालेय संचांची संख्या 7,50,000 हून अधिक आहे. तीन राज्ये, 20 जिल्ह्यांतील गरजू आणि तळागाळातील 700+ शाळा आणि त्याचे विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.
सर्व शाळांपर्यंत आपण विज्ञान प्रयोगशाळा देऊ शकत नसल्याने आणि शाळांच्या काही मर्यादा असल्याने, संस्थेतर्फे फिरती प्रयोगशाळा सुरू करण्यात आली, यात शालेय पाठयपुस्तकांमधील वैज्ञानिक प्रयोगाने, साहित्याने, प्रदर्शनाने आणि संदर्भ पुस्तकाने सुसज्ज असलेले वाहन शाळाशाळांमध्ये जाते आणि तेथील विद्यार्थ्यांना प्रयोग शिकवले जातात, त्यांच्याकडून करवून घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढते, प्रयोग प्रत्यक्ष केल्याने ते समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास सोपे जाते. आजमितीला संस्थेच्या आठ KNOWLEDGE ON WHEELS (फिरती प्रयोगशाळा) असून वार्षिक 38,000 विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. प्रत्येक फिरत्या प्रयोगशाळेतर्फे दरवर्षी या शाळांची विज्ञान प्रदर्शने भरवली जातात. अनेक विद्यार्थी आपली सर्जनशीलता वापरून नवनव्या प्रयोगांची निर्मिती करतात.
संस्थेद्वारे विज्ञानावर विशेष भर दिला जातो. म्हणूनच शाळाशाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा बनविल्या जातात. विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक कुतूहल जागृत करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून दाखवले जातात. आजमितीला 550 शाळांना याचा लाभ मिळाला आहे. यात महाराष्ट्रासोबत राजस्थान, सिक्कीम, लद्दाख, पूर्वांचल अशा सीमा क्षेत्रातील शाळांचा देखील यात सहभाग आहे. तसेच पुणे, नाशिक, वाई परिसरातील सुमारे 40 शाळांमध्ये छोटे शास्त्रज्ञ व विज्ञान क्लबच्या माध्यमातून विज्ञानविषयक आवड निर्माण करण्याचे उपक्रम सुरू आहेत. ज्यात सुमारे 4000 मुलेे सहभागी होतात.
विद्यार्थ्यांचे कुतूहल वाढावे, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा, विद्यार्थ्यांच्या आकलन, निरीक्षण, तंत्रज्ञानातील समज याला एक व्यासपीठ म्हणून कम्युनिटी नॉलेज सेंटर-सामायिक विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. पनवेलमधील 3000 चौरस फुटांच्या या सुविधेमध्ये अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, रोबोटिक्स आणि संगणक), ग्रंथालय, इ लर्निंग उपलब्ध आहेत. रायगड जिल्हा आणि नवी मुंबई परिसरातील विद्यार्थ्यांना क्रमाक्रमाने या सुविधेचा लाभ दिला जात आहे आणि प्रशिक्षित शिक्षकांद्वारे अनुभवात्मक शैक्षणिक साधनांच्या सहाय्याने वर्ग सत्रांद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची तत्त्वे शिकवली जातात. दरवर्षी 5000 शालेय विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. यातीलच काही विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षिसेही मिळवली आहेत.
शाळेतील भौतिक सुविधा सुधारल्याने विद्यार्थी शाळेत येऊ लागले. शिकू लागले पण शाळेतून मुले त्यांच्या घरी आल्यावर त्यांच्या घरच्या अभ्यासाचे काय? अनेकदा वर्गात जे शिकवले जाते त्याची उजळणी आणि त्याचा पाठपुरावा घरामध्येसुद्धा होणे गरजेचे असते पण वस्त्यांमधील, गावांमधील अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करणार्या आणि परिस्थितीमुळे शिकू न शकलेल्या पालक वर्गाला हे शक्य नव्हते. तसेच मुंबईच्या गर्दीने फुललेल्या वस्त्या, ठाण्याच्या डोंगरकपारी, पालघरचे दुर्गम पाडे आणि रायगडच्या मळवाटांपर्यंत - एकच समस्या सतत दिसून येत होती. घरात अभ्यासाला जागा नाही, पालकांमध्ये शिक्षणाबाबत उदासीनता, पायाभूत सुविधांचा अभाव आणि कलागुणांना संधी न मिळणे. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी 2015 साली संस्थेचा समुत्कर्ष हा आयाम सुरू झाला. यात याच वस्ती/गावात अभ्यासिका सुरू करण्यात आली. त्याच वस्ती/गावातील थोडे अधिक शिकलेले किंवा शिकत असलेले ताई/दादा शिक्षक म्हणून निवडले. यातून दुहेरी फायदा झाला, तेथील भौगोलिक व सामाजिक परिस्थितीची जाणीव चांगली असल्याने मुलांची मानसिकता समजण्यास मदत झाली आणि पगारामुळे त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लागला. नुसता घरचा अभ्यास आणि त्यांचा पाया पक्का करणे या विचारातून अभ्यासिका सुरू झाली, पण मागील अनेक वषार्ंच्या अनुभवाने समृद्ध झालेल्या अभ्यासिकेत तज्ज्ञांच्या मदतीने दिनक्रम तयार झाला. प्रार्थना, खेळ, गाणी गोष्टींच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम शिकवला जातो. सोमवार ते शनिवार, दररोज दोन तास चालणार्या अभ्यासिका मुलांसाठी आता केवळ शिक्षणाचे केंद्र नसून त्यांचे जीवन उजळवणारे दीपस्तंभ ठरले आहेत. अभ्यासिका पहिली ते चौथी, 5वी ते 8वी इयत्तांसाठी चालवली जाते. 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सपोर्ट क्लास चालवले जातात. यात गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांवर भर दिला जातो. विषय शिक्षकांच्याद्वारे विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, प्रज्ञा शोध परीक्षा असतात. या परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थी कसे सहभागी होतील, यात उत्तीर्ण कसे होतील यावर लक्ष ठेवले जाते आणि विशेष प्रयत्न केले जातात. हुशार विद्यार्थ्यांना होमी भाभा, एन.एम.एम.एस., राज्य शिष्यवृत्तीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयार करून भविष्यातील वाट प्रकाशमान केली जात आहे. अभ्यासिकेत केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण दिले जात नाही, तर मुलांच्या कलागुणांना उजाळा देणारे मंचही येथे उपलब्ध आहेत. वार्षिकोत्सव, कला व क्रीडा महोत्सव मुलांच्या स्वप्नांना पंख देतात. जीवन कौशल्य शिबिरे त्यांचा आत्मविश्वास उंचावतात. विद्यार्जनासोबत त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शिष्यवृत्तीदेखील दिली जाते. अभ्यासिकेतील अत्यंत गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्याश्रय ही योजना राबविली जाते. यात विद्यार्थ्याला त्याचे किमान महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे मूल किमान महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करेल याची काळजी संस्थेकडून घेतली जाते आणि त्याला योग्य मार्गदर्शन मिळेल यासाठीचे शर्थीचे प्रयत्नही... 2022 पासून सुरू झालेली विद्याश्रय योजना ही वंचित मुलांच्या पुढील शिक्षणासाठी मोठी संजीवनी ठरली आहे. आजवर 150 विद्यार्थ्यांना या योजनेतून शैक्षणिक पाठबळ मिळाले आहे.
आजमितीला संस्थेची मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड, पुणे येथे 169 अभ्यासिका चालतात, ज्यात 7037 विद्यार्थी दरवर्षी सहभागी होतात. यात त्यांना आधार देणारे अभ्यासिका शिक्षक, अभ्यासिका सुरळीत चालावी म्हणून झटणारे विभाग समन्वयक आणि स्वयंसेवक या सर्वांनी मिळून शिक्षणाचा उजेड सर्वदूर पसरवला आहे.

अभ्यासिकेत काम करताना वयात येणार्या मुलामुलींना जवळून पाहण्याचा, या वयातील प्रश्न, या वयाची मानसिकता, समाज - परिवार यातील नातेसंबंध, त्यातील ताणतणाव हे सगळे जवळून अनुभवण्याचा योग संस्थेला आला. किशोरवयीन मुलींचे समुपदेशन आणि विकास. डिजिटायझेशन, ग्लोबलायझेशन आणि मीडियाच्या प्रभावामुळे आपण किशोरवयीन मुलींना भेडसावणार्या समस्या सोडवताना मानसिकता बदलत असल्याचे जाणवले. त्यांचे संगोपन करणे आणि संवादातून सतत व्यग्र राहणे ही काळाची गरज होती. म्हणून उर्जिता- किशोरी विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. मन-मनगट-मेंदू हे केंद्रित करून अभ्यासक्रम तयार करण्यात आला. या प्रकल्पाद्वारे, किशोरवयीन मुलींना आरोग्य आणि स्वच्छता, सुरक्षा, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवर उपक्रम, व्याख्याने आणि खेळांद्वारे शिक्षण दिले जाते. या प्रकल्पांतर्गत मुलींना लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले जाते. मासिक पाळीसारखा विषय जो अजूनही समाजात फारसा बोलला जात नाही. त्यावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेद्वारे वाचा फोडली जाते. किशोरी उत्सवाच्या माध्यमातून मुलींच्या कलागुणांना वाव आणि त्यांच्या विचारांना नवे पंख दिले जातात. किशोरी उत्सवामध्ये आई आणि मुलीचे नाते अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने स्पर्धा आयोजित केल्या जातात. S.N.D.T.. युनिव्हर्सिटीमध्ये संस्थेने तयार केलेल्या अभ्यासक्रमावर कोर्स चालवला जातो. या वर्षीपासून कर्णबधिर किशोरींसाठी ठाण्यात वर्ग सुरू करण्यात आला आहे. यातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजमितीला संस्थेचे मुंबई, रायगड, ठाणे, पुणे येथे 138 उर्जिता-किशोरी वर्ग चालतात आणि वर्षाला 3500 मुली याचा लाभ घेतात. किशोरी वर्गामधून संस्थेला काही बालविवाह, नैराश्यातून होणार्या आत्महत्या थांबविण्यात यश आले आहे. अजून बराच दूरचा पल्ला गाठायचा आहे.
विद्यार्थिदशेत असताना जर योग्य दिशा, योग्य संगत आणि संस्कार प्राप्त झाले तरच त्या विद्यार्थ्यांचे आणि पर्यायाने समाजाचे, देशाचे भविष्य उज्ज्वल घडते. हा संस्थेचा मानस असल्याने विद्यार्थिदशेतच अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. सामाजिक नेतृत्व विकास प्रकल्प हा त्यातील एक... आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. आपण आपल्या परिघात जगत असताना, आर्थिक सबलता, सक्षम परिवार, भौतिक सुविधांची उपलब्धता यामुळे अनेक गोष्टींची झळ आपल्यापर्यंत येत नसते. त्याची जाणीव करून देणे, समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, सामाजिक क्षेत्रातील मानव संसाधन आणि नेतृत्व विकसित करणे हा त्यामागचा विचार आहे. असा विचार घेऊन हे दहा दिवसांचे शिबीर राबविले जाते. यात पहिल्या दिवशी सेवा म्हणजे काय? सेवा कार्य कसे चालतात? त्याच्यातील तांत्रिक बाजू आणि शिबिरासाठी आवश्यक असणार्या विषयवार सत्र घेतली जातात. नंतर समाजातील विविध विषयांवर काम करीत असलेल्या सामाजिक संस्थांमध्ये राहून काम करण्याची संधी दिली जाते. त्यातून त्यांच्यामध्ये सामाजिक दृष्टी, संवेदनशीलता आणि नेतृत्व कौशल्य विकसित होते. त्यांना तळागाळातील एन.जी.ओ.च्या कार्यातील आव्हाने आणि व्याप्ती समजतात.
विद्यार्थ्यांना योग्य वेळेत योग्य मदत मिळाली तर त्यांचे शिक्षण पूर्ण होते आणि पर्यायाने त्यांचे भविष्य सुरक्षित... यात मदतीतील एक महत्त्वाचे अंग आहे, आर्थिक सहयोग... म्हणूनच संस्थेतर्फे विद्यार्थी विकास योजना राबवली जाते. यात अत्यंत हुशार, होतकरू पण आर्थिकदृष्ट्या अक्षम असलेल्या 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. जेवढे मोठे विद्यार्थ्यांचे शिकण्याचे आभाळ... तेवढ्या त्याच्या पंखांना बळ दिले जाते. आजमितीला 2400 विद्यार्थ्यांचे भविष्य समृद्ध करण्यात संस्थेने खारीचा वाटा उचलला आहे. यात भारतातील खखच, खखढ आणि भारतातील नामांकित महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे आणि घेत आहेत. आतापर्यंत 2396 विद्यार्थ्यांना एकूण 27 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यातील अनेक विद्यार्थी आज टाटा, महिंद्रा, इन्फोसिस, खउखउख, ङ।ढ यांसारख्या नामवंत कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. कौतुकाची बाब म्हणजे आपल्या व्यवसायिक आयुष्यात स्थिर होण्याच्या दिशेने प्रवास सुरू केल्यावर, समाजाचे ऋण फेडण्यासाठी आणि त्यांच्यासारख्या अन्य विद्यार्थ्यांसाठी आर्थिक योगदान करीत आहेत. योजनेचे लाभार्थी असलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला आतापर्यंत फूल ना फुलाची पाकळी म्हणून 63.57 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
जसे फीसाठीचे पैसे मिळणे महत्त्वाचे, तसेच अभ्यासासाठी पुस्तके... 1 ली ते 8वी सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तके शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध होतात. पण नववी नंतर पुढे विद्यार्थ्याला त्याचा बंदोबस्त त्यालाच करावा लागतो.विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेता संस्थेतर्फे 9 आणि 10 वीच्या विद्यार्थ्यंसाठी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यात आतापर्यंत ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा पोहचला आहे. तसेच संस्थेतर्फे बुक बँक चालवली जाते. यात एका ठिकाणी आर्टस्, कॉमर्स, सायन्स, टेक्निकल, इंजिनिअरिंग, सीए अशा विविध शाखेची विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमाची पुस्तके मागवली जातात आणि त्याचे वितरण केले जाते. ही वर्षाच्या शेवटी पुस्तके परत घेतली जातात. संस्थेच्या मुलुंड आणि कोंडीविटा येथे मुख्य बुक बँक आणि पनवेल, कर्जत, मुरबाड, वाडा, मोखाडा अशा 5 शटल बुक बँक चालतात. संस्थेच्या या उपक्रमांतर्गत 7500+ विद्यार्थ्यांनी लाभ मिळवला आहे.
विद्यार्थ्यांनी नुसता अभ्यास एके अभ्यास करावा असे संस्थेचे मुळीच मत नाही. खेळ हा तर विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तथापि, काही भौगोलिक प्रदेशांमध्ये योग्य पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात त्यांचे कौशल्य वाढवता येत नाही. गंमत म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट शारीरिक क्षमता आणि खेळासाठी कौशल्य असते. त्यांना फक्त योग्य सुविधा आणि प्रशिक्षणाची गरज असते. त्यांच्यातील खेळाला ओळखून, त्याचे तज्ज्ञांकडून सातत्यपूर्ण मार्गदर्शन देऊन सर्व करत त्या विद्यार्थ्याला त्या खेळात प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि सहयोग देणे, त्याला विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी हा क्रीडा विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. संस्थेतर्फे नवी मुंबई आणि कर्जत येथे संजय हेगडे स्पोर्टस् अॅकॅडमी चालते. यात कुस्ती, मल्लखांब, रोप मल्लखांब, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग, ऍथलेट, बुद्धिबळ अशा अनेक खेळांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. या अॅकॅडमीत मुले येतात, खेळतात, तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यांना लाभते. अभिमानाने संस्था इथे सांगू इच्छिते की, आतापर्यंत अॅकॅडमीची बरीच मुले ही जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवर खेळली आहेत.

सेवा वस्त्यांमध्ये, खेड्यापाड्यांत राहणारे विद्यार्थी त्यांच्याच वस्ती किंवा गावाजवळ असलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. अशा शाळांमध्ये अद्ययावत कॉम्प्युटर लॅब आणि प्रशिक्षणाचा अभाव दिसून येतो, विद्यार्थ्यांनी दहावीनंतर कॉम्प्युटर कोर्स करायचा म्हटला तर त्याची फी परवडत नाही आणि एखाद्याकडे कॉम्प्युटर असणे तर दूरचीच गोष्ट.
वेगाने पुढे जाणार्या तंत्रज्ञान युगात पैशांअभावी कोणताही विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये यासाठी 2020 साली संस्थेने प्रथम पुणे येथे आणि नंतर नवी मुंबईत नेरुळ येथे मोफत डिजिटल लर्निंग सेंटरला सुरुवात केली. आणि पुढे त्याच धर्तीवर 2022साली लोखंडी पाडा, बोईसर येथील स्वामी विवेकानंद केंद्रात ग्रामीण भागातील पहिले डिजिटल लर्निंग सेंटर सुरू झालं. लाभार्थी विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कॉम्प्युटर स्किल्स अवगत व्हावेत हा डिजिटल लर्निंग सेंटर सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश होता. सध्या या तीनही सेंटरची सेवा सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत सुरू आहे.
केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्येक विद्यार्थ्याला कॉम्प्युटरवर हाताळता यावा, शिकवल्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक कॉम्प्युटवर करता यावे यासाठी मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड MS-office कोर्स आपण उपलब्ध करून दिला. ज्यांच्यासाठी कॉम्प्युटर अगदीच नवा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बेसिक कोर्सची तरतूद करण्यात आली. सेंटर मध्ये प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी गरजवंत आहे याची पडताळणी केली जाते तसेच प्रवेश घेतल्यानंतर त्याच्या प्रगतीचा आढावा देखील घेतला जातो. कोर्स पूर्ण झाल्यांनतर विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येते आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सेवा सहयोग मार्फत MS-office आणि मायक्रोसॉफ्टचे एक्सेल स्पेशलिस्ट सर्टिफिकेट देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात येतो.
मागील चार वर्षांत वर्षांत फक्त बेसिक कॉम्प्युटरपुरते मर्यादित न राहता डिजिटल लर्निंग सेंटरमध्ये आपण चड एक्सेल, वर्ड, पॉवर पॉईंट तसेच ऍडव्हान्स एक्सेल आणि टॅली इसेन्शिअल इत्यादी सर्टिफाईड कोर्सेस सुरू केले. विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स विकसित व्हावेत यासाठी वेळोवेळी विविध कार्यशाळा आणि सत्रांचे आयोजन करून त्यांना मार्गदर्शन केले जाते. येणार्या काळात प्रोग्रामिंग लँगवेज आणि अख तंत्रज्ञानावर आधारित काही कोर्सेस सुरू करून विद्यार्थ्यांना आणखी प्रगत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
2020 पासून आत्तापर्यंत नेरुळ आणि बोईसर सेंटर सुमारे 7000हून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटली प्रगत करण्यात यशस्वी ठरले आहे. सेवा वस्त्यांमधील 40हून अधिक गृहिणींनीदेखील हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला आहे. कोर्स पूर्ण केलेल्या 150हून अधिक विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी ऑफिस असिस्टंट, अकाउंट्स, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि रिसेप्शनिस्ट इत्यादी पदांवर नोकर्या मिळाल्या आहेत. कॉम्प्युटरची फक्त कागदावरच ओळख असणारे कित्येक विद्यार्थी जेव्हा सेंटरमधले कॉम्प्युटर आणि त्याचे विविध ऍप्लिकेशन्स स्मार्टली वापरतात तेव्हा आपण सुरू केलेल्या सेवाकार्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
संस्थेच्या कामाचा प्रवास आणि आवाका जसजसा वाढत होता, तसतसा शहरी आणि ग्रामीण मानसिकतेचा, तेथील प्रश्नांचा परिस्थितीचा अंदाज येत होता. हा अंदाज फक्त विद्यार्थी आणि शाळेपुरता मर्यादित नव्हता. तेथील सामाजिक, आर्थिक, भावनिक, वैचारिक विषयांचा होता. त्यातून एक विचार सतत संस्थेच्या मनात घोळत होता, तो म्हणजे रिव्हर्स मायग्रेशन... ग्रामीण युवा शक्ती जी मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी शहराकडे कूच करत होती, त्यामुळे शहर आणि गाव या दोन्ही बाजूला असंतुलन निर्माण होत होते, आणि त्यातूनच सामाजिक अस्थिरता, तणाव, असमान उपलब्धता असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे लक्षात आले आणि याचे भविष्यातील भयंकर रूप विचारात घेता आतापासूनच त्यावर काहीतरी शाश्वत काम सुरू करणे गरजेचे वाटले आणि सुरू झाला ग्रामविकास ... गावाच्या स्थितीचा सर्वांगीण अंदाज घेणे, त्याच गावातील लोकांना संघटित करणे, विषयाची आणि गरजेची प्रतवारी ठरवणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसहभागातून प्रत्यक्ष काम सुरू करणे अशी कामाची पायवाट तयार केली गेली. गावभेटी सुरू झाल्या, शेती शाळा भरू लागल्या, अनेक प्रकारचे प्रशिक्षण घेतली जाऊ लागली. तयार मालाच्या विक्रीचे प्रशिक्षण आणि रचना लावायला सुरुवात झाली. अनेक शेतकरी, महिला, युवक जोडले जाऊ लागले. 2017ला पेणंद गावातून सुरू झालेला हा प्रकल्प आज 500 हून अधिक शेतकर्यांपर्यंत पोहोचला आहे. पालघर व वाडा या दोन तालुक्यातील 7 ग्रामपंचायत व 21 पाड्यांमध्ये सेंद्रीय शेती, शेती शाळा, जैविक खत व कीटकनाशक निर्मिती, विक्री साखळी, जलसंधारण, महिलांसाठी टेलरिंग व अन्नपूर्णा उपक्रम, युवकांसाठी शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण अशा उपक्रमांमुळे अनेक गावांच्या आर्थिक आणि सामाजिक क्षमतेला चालना मिळाली आहे. गावागावांतून निर्माण केलेल्या गाव समित्यांमुळे देखील गावकर्यांचा या कार्यात प्रत्यक्ष सहभाग वाढताना दिसतोय, ग्रामीण महिलांचा वाढता सहभाग हे सुखद दृश्य ग्रामविकास टीमला पाहायला मिळत आहे.
संस्थेचे काम अनेक विषयांवर चालू होते त्यात वाट काढत पर्यावरण हा विषयही जोम धरू लागला होता. शाळेतील वीजेची उपलब्धता येणारे वीजेचे बिल, अनियमित भत्ता अशा कारणांमुळे शाळेमध्ये साधे पंखे, लाईटसुद्धा सुरू होत नव्हते मग ीारीीं र्ीींं, संगणकाचा तर विचारच दूर... म्हणून आपण शाळांमध्ये तसेच काही वाड्या-पाड्यांवर सेवा किरण प्रकल्पांतर्गत सोलर बसवण्यात आले. आजमितीला 160पेक्षा जास्त शाळांमध्ये सौरऊर्जेचा वापर होत आहे. त्यामुळे दरवर्षी 839 मेगावॅट वीजेची बचत होत आहे. या सर्व उपक्रमांतून शाश्वत आणि निसर्गस्नेही विकासाचा संदेश पोहोचवण्यात आला आहे. अनेक शाळांमध्ये पाण्याची स्थिती भयावह होती. वर्षाजल संधारणाच्या माध्यमातून ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. आतापर्यंत 13 शाळांमध्ये वर्षाजल संधारण करण्यात आले असून या मार्फत दरवर्षी 2 कोटी लीटर पाण्याचे पुनर्भरण केले जाते. ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. शेतकर्यांच्या दारा-शेतात रोपे लावण्यात आली. मियावाकी या जापनीज तंत्रज्ञानानुसार मुंबई तसेच नवी मुंबई परिसरात 26 ठिकाणी 1,00,000 रोपांची लागवड करून शहरी वनीकरण करण्यात आले.
स्वतःच्या व्यग्र आयुष्यातून, व्यक्तिगत व्यवधानातून सामाजिक कामासाठी-संस्थेसाठी वेळ काढणारे स्वयंसेवक volunteer हा संस्थेच्या कामाचा आत्मा आहे. प्रत्येक प्रकल्पात, आयामात, कार्यक्रमात असे वैयक्तिकरित्या अनेक स्थानिक स्वयंसेवक volunteer जोडले गेले. आपला वेळ, अनुभव, ज्ञान, संपर्क, कौशल्य अशा नानाविध पद्धतीने या परिवर्तनाच्या प्रक्रियेत संस्थेसोबत अनेक वर्ष जोडली गेली. पण यातील कॉर्पोरेट जगतातील लोकांना प्रत्यक्ष लाभार्थ्याला जोडण्यासाठीचा दुवा अजूनही हवा तसा तयार होत नव्हता. कॉर्पोरेट मानसिकता, कामाची शैली आणि वेळ, तिथल्या सवयी याचा अभ्यास करून काहीतरी वेगळे, करायला सोपे, त्यांच्या हद्दीत जाऊन करावयाचे काम शोधणे गरजेचे होते. त्यातून corporate volunteer engagement हा विषय मूळ धरू लागला. यात तिथल्या लोकांसोबत, लाभार्थी शाळा, विद्यार्थी, शेतकरी याच्या आवश्यकतेनुसार विविध वस्तू बनवून घ्यायला सुरुवात झाली.
लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यांच्या कौशल्य प्रतिभा आणि आवडीनुसार उदात्त कार्यात योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे हे स्वयंसेवेचे उद्दिष्ट आहे.
सुमारे 29,000 स्वयंसेवक वर्षभरात विविध कार्यक्रम आणि कार्यक्रमांमध्ये गुंतलेले असतात. आमचे नियमित स्वयंसेवा उपक्रम खालीलप्रमाणे आहेत.
सीड बॉल मेकिंग, सॅम्पलिंग बनवणे, पेपर पेन-पेपर बॅग बनवणे, दिवाळी किट तयार करणे, शैक्षणिक साहित्य तयार करणे, कापडी पिशव्या, ब्लॉक प्रिंटिंग, स्टोरीबुक बनवणे, आमच्या अभ्यासिकांमध्ये शिकवणे, क्रेयॉन बनवणे असे विविध उपक्रम त्यांच्यासाठी घेतले जातात. वाटपासाठी त्यांना बोलावले जाते आणि लाभार्थ्यासोबतचा त्यांचा संवाद सुरू करून दिला जातो. यावर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून 20734 कॉर्पोरेट व्हॉलेंटीअर्स जोडले गेले आहेत.
गेल्या काही वर्षात सेवा सहयोगने काही वैचारिक परिषदांचेदेखील आयोजन केले. उदा. Tech for Seva, C-20, CSR Conclave for Viksit Bharat. समाजातील विविध क्षेत्रांचा म्हणजेच सेवा संस्था, कंपन्या, शैक्षणिक संस्था, शोध-संस्था यांचा देशाच्या विकासाच्या दृष्टीने आणि सामान्यांचे जीवन सुसह्य कसे होईल या दृष्टीने या परिषदांमध्ये चर्चा होऊन महत्त्वाचे निष्कर्ष काढले गेले.
16 वर्षात संस्थेने खूप चढउतार पाहिले. अनेक चांगले-वाईट अनुभव गाठीशी घेत काम चालू राहिले. असाच एक अनुभव म्हणजे पूर्ण जगावर आलेले संकट... ज्याची जराशीही कल्पना कुणी केली नव्हती. सर्वजण आपापले काम नेटाने करीत असताना अचानक सर्व चित्र बदलले. सगळं थांबलं...भयाण शांतता... माणसामाणसांमध्ये अंतर निर्माण करणारा कोविड काळ सुरू झाला. जग थांबलं. सर्वांची मानसिक स्थिती ढासळली. कंपन्या, दळणवळण, सर्व व्यवहार बंद पडले. काय करावे, कुठे जावे, कुणालाच काही कळत नव्हतं. यापूर्वी कुणीही न पाहिलेल्या संकटावर मात करण्यासाठी, उत्तर माहीत नसलेल्या प्रश्नातून भारताला सोडवण्यासाठी सरकार नेटाने उभे राहिले आणि सोबत पाय रोवून उभ्या राहिल्या स्थानिक संस्था, अनेक संघटना, त्यातील एक होती सेवा सहयोग... या काळात फूड किट, अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर, पीपीई किट, याचे वाटप झाले. इस्पितळ आणि दिवसरात्र जिवाची पर्वा न करता झटणारे डॉक्टर्स याच्यासाठी मदत उभारली केली. इतकेच काय तर स्मशानभूमीतही आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी संस्था उभी राहिली. संस्थेचे संस्थाचालक स्वतः कार्यभूमीत राबत होते. 400 हून अधिक कार्यकर्ते या काळात या चळवळीत सहभागी झाले होते. सर्व सुरळीत व्हायला दोन वर्षे लागली आणि या कठीण, भयावह परिस्थितीतून आपण सहीसलामत बाहेर पडलो. कुसुमाग्रज लिखित ‘कणा’ कवितेनुसार पुनश्च एकदा जोमाने कामाला लागलो.
पाहता पाहता कामाला 16 वर्षे झाली. आपल्या कामाचा आढावा घेतला तर, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर काही निकष उद्दिष्टे निश्चित केली जातात. भारताच्या नीति आयोग आणि UNDP यांनी 17 उद्दिष्टे निश्चित केली आहेत, त्यापैकी 16 उद्दिष्टांमध्ये संस्था काम करते ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. एकट्या 2024-25 वर्षात 4,67,000 इतक्या लोकांना सेवा दिली आहे. आगामी काळात प्रत्येक प्रकल्पाची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढविणे, महाराष्ट्राच्या दुर्लक्षित भागांमध्ये काम पोहोचवणे. कौशल्य विकासाबरोबरच स्वयंरोजगारासाठी तरुण-तरुणींना मार्गदर्शन करणे, राज्य व केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच सरकारी योजनांच्या अंमलबजावणीच्या सर्वेक्षणात, मूल्यांकनात सहभागी होणे. यावर आधारित संस्थेच्या योजना असतील.
सोळा वर्षांच्या या प्रवासात सेवा सहयोग परिवाराने लाखो जीवनांना स्पर्श केला. हजारो स्वयंप्रेरणेने काम करणार्या स्वयंसेवकांचे हात आणि मन कार्याशी जोडले. आज या वाटचालीकडे पाहताना हृदयात समाधान, डोळ्यांत कृतज्ञतेची ओल आणि भविष्यातील प्रवासासाठी उत्साहाची नवी ऊर्जा निर्माण होते. समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागामुळेच ही क्रांती शक्य झाली. आपण सारे मिळून केलेल्या या प्रयत्नांतूनच पुढील पिढीसाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग तयार होईल यात शंका नाही.
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्॥
या प्रार्थनेप्रमाणेच, सेवा सहयोगचा प्रत्येक उपक्रम समाजातील प्रत्येकासाठी सुख, आरोग्य आणि समृद्धीचा संदेश घेऊन पुढे जात राहील, हीच आमची खात्री आणि श्रद्धा.