विद्यमान भारत सरकार हे राष्ट्रवाद मानणारे सरकार आहे, म्हणून आज भारतात विकासाच्या दृष्टीने होत असलेले परिवर्तन शक्य झाले आहे. आणि या विकसित भारतात पूर्वांचलाचा विकासही अग्रस्थानी आहे हे विशेष! भारताची एकता आणि अखंडता अबाधित राहण्यासाठी देशभरात अनेक संस्था/संघटना कार्यरत आहेत. पूर्वांचलात काम करणारी संस्था म्हणजे ‘माय होम इंडिया’ही अशांमधलीच एक अग्रणी संस्था.
“ईशान्य भारतातून मुंबई, पुणे आणि बेंगळुरू येथे शिक्षण आणि नोकरीसाठी येणार्या युवक-विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करून राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य साधावे”, असे आवाहन केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. निमित्त होते, ‘माय होम इंडिया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वन इंडिया अॅवार्ड’ या पुरस्कार सोहळ्याचे. पुरस्काराचे यंदाचे पंधरावे वर्ष. यंदाचा वन इंडिया पुरस्कार त्रिपुरा राज्यातील जनजाती भागात कार्य करणारे मदन हरी मलसम यांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महाराष्ट्राचे माहिती-तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, ‘माय होम इंडिया’चे संस्थापक श्री. सुनील देवधर, सॅटर्डे क्लबचे संस्थापक अजित मराठे आणि नरेंद्र पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रल्हाद जोशी पुढे म्हणाले,“सरकारने सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा विकास केल्यामुळे देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या आहेत. तसेच भारतातील राज्ये एकमेकांशी जोडली जाण्यात, ‘एक भारत’ ही भावना दृढ होण्यास उपयुक्त ठरले आहे.“ असे मतदेखील त्यांनी यावेळी मांडले.
तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले,“ईशान्य भारत हा विविधतेने नटलेला प्रदेश आहे. कला, लोककला, खाद्यसंस्कृती, वाद्य या सर्व क्षेत्रांत येथील वैशिष्ट्ये लक्षणीय आहेत. आता या प्रदेशात विकासाची गंगा वेगाने वाहू लागली आहे. विमान सेवा, रेल्वे आणि रस्ते ही सर्व प्रकारची संपर्कसाधने मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरू झाली असून, इतकी वर्षे विकासापासून दूर राहिलेला हा प्रदेश आता विकासाच्या ‘महामार्गावर गतिमान’ झाला आहे.”
सत्कारमूर्ती मदन हरी मलसम म्हणाले,“आम्ही स्वभाषा, स्वभूषा आणि स्वसंस्कृती जपण्याचे कार्य करीत आहोत. मलसम समाज अल्पसंख्याक आहे. अशा दुर्बळ समाजात धर्मांतरणाचे प्रमाण अधिक असते. धर्मांतरणामुळे केवळ एक हिंदू कमी होत नसतो तर हिंदू संस्कृतीचे पतन होण्याची सुरूवात होत असते. यासाठी धर्मांतरण रोखणे ही काळाची गरज आहे. हाच विचार ‘माय होम इंडिया’ उर्वरित भारतात रुजवत आहे.” दिलेल्या पुरस्काराबद्दल मदन हरी मलसम यांनी संस्थेचे आभार मानले.
माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले,“ हा पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा एक सेतू आहे. ‘माय होम इंडिया’ अनेक उपक्रमांद्वारे एकात्मतेची आणि अखंडतेची भावना संपूर्ण राष्ट्रात रूजवण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहे.”
‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि इतर अनेक संघटनांनी गेल्या 40-50 वर्षांत ईशान्य भारतात कार्य करून तेथील संस्कृती, स्वभाषा आणि स्वत्व टिकवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले आहे. संघ संस्कारामुळेच ईशान्य भारतातील समाज घटकांसाठी काम करावे ही प्रेरणा मिळाली. वन इंडिया अॅवार्डसारख्या पुरस्काराने सामाजिक कार्यात समर्पित कार्यकर्त्यांचा गौरव मुंबई आणि दिल्ली अशा विकसित शहरांत करण्याचा मुख्य हेतू ईशान्य भारतातील लोक उर्वरीत भारताशी जोडले जावेत हा आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार खराडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे संयोजन देवेंद्र अतकरी यांनी केले.