डॉ. आंबेडकर आणि रा. स्व. संघ

30 Oct 2025 17:07:06
The relationship between the RSS and B.R. Ambedkar
 
@सागर शिंदे
 

rss 
छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकताच वंचित बहुजन आघाडीने संघाच्या विरोधात एक मोर्चा काढून संघावर बंदी घालण्याची मागणी करत जुनेच आरोप पुन्हा नव्याने गिरविण्याचा प्रयत्न केला. कथ्य सर्वदूर पोहचाताना तथ्य जाणणेही महत्त्वाचे. डॉ. आंबेडकरांना अपेक्षित सामाजिक समतेचे, बंधुतेचे विचार व्यवहारात आणण्यासाठी रा.स्व.संघाने अनेक कार्यक्रम-उपक्रम हाती घेतले, व्यापक प्रबोधन करण्याचे कार्य केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध नेमके कसे होते? याबाबत जे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत ते या लेखात बघूयात.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत आणि शताब्दी वर्षानिमित्त देशभरात संघाचे अनेक कार्यक्रम, उपक्रम सुरु आहेत. माध्यमांमध्ये संघाची मोठी चर्चा होत आहे. संघाची शंभर वर्षांची वाटचाल, हिंदुत्व विचार, विविध आंदोलने, भिन्न विषयांवरील संघाची भूमिका यावर मंथन सुरू आहे. संघाचे विरोधक सुद्धा या निमित्ताने संघाला विरोध करण्यासाठी सरसावलेले दिसताहेत. जुनेच आरोप पुन्हा नव्याने केले जात आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने 24 ऑक्टोेबर 2025 रोजी संघाच्या विरोधात एक मोर्चा काढून संघावर बंदी घालण्याची मागणी करत संघाची नोंदणी नाही, संघ मनुवादी वगैरे नेहमीचेच आरोप केले. या निमित्ताने संघ आणि डॉ. आंबेडकर अशी चर्चा समाजमाध्यमात सुरू झाली.
 
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध नेमके कसे होते? याबाबत जे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत ते बघूयात. सातारा जिल्ह्यातील कराड येथे डॉ.आंबेडकरांनी रा.स्व.संघाच्या शाखेला भेट दिली होती. याचे अनेक संदर्भ उपलब्ध झालेले आहेत. या वर्षीच्या नागपूर येथील विजयादशमी दसर्‍याच्या मुख्य कार्यक्रमात माजी राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांनीसुद्धा बाबासाहेबांच्या संघ शाखा भेटीचा विशेष उल्लेख केला. कराड येथील संघ स्वयंसेवकांना डॉ. आंबेडकर हे ‘भवानी’ संघ शाखेत आल्याचे ऐकीव माहीत होते. कराड येथील केदार गाडगीळ यांनी याबाबत संशोधन केले व डॉ. आंबेडकर जेव्हा शाखेत आले होते तेव्हा उपस्थित असलेल्या मंडळींशी संवाद साधला. त्यात दत्तात्रय टंकसाळे यांना पत्र लिहून या घटनेबाबत माहिती विचारली. दिनांक 30-10-1999 रोजी त्यांनी केदार गाडगीळ यांना पत्र लिहून डॉ. आंबेडकर यांनी संघ शाखेस दिलेल्या भेटीबाबत आठवण सांगितली ते पत्र उपलब्ध आहे.
 
 
दरम्यान, केसरी वृत्तपत्रातील 09 जानेवारी 1940 साली प्रसिद्ध झालेली बातमी पुण्यातील अभ्यासक डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्या पाहण्यात आली. बातमी पुढीलप्रमाणे, - ता. 2 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब अंबेडकर हे कर्‍हाड येथे गेले असतांना तेथील म्युनिसिपालिटीत मानपत्र देण्याचा समारंभ झाला. यानंतर त्यांनी तेथील रा. स्व. संघाच्या शाखेस भेट दिली. याप्रसंगी भाषण करतांना डॉ. आंबेडकर म्हणाले, ’कांही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पहातों. 
 
   केसरी वृत्तपत्रातील बातमी


kesari
 
डॉ. आंबेडकरांच्या संघ शाखा भेटीच्या निमित्ताने याच वर्षी 02 जानेवारी 2025 रोजी कराड येथे ‘बंधुता परिषद’ घेतली गेली होती. त्यावेळी बरीच चर्चा झाली, टीका झाली. लोकसत्ता वर्तमानपत्रात काही लेख तसेच पत्र आले ज्यामध्ये हे खोटे असल्याचे बोलले गेले. मी त्यावेळी लोकसत्तामध्ये एक लेख लिहिला होता व उपलब्ध पुरावे व संघाची बंधुभावाची भूमिका मांडली होती. या संदर्भात मी आणखी पुराव्यांचा शोध घेतला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ‘जनता’ साप्ताहिकाच्या खंड 9 मधील 20 जानेवारी 1940 च्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 2 जानेवारी रोजी संघाला भेट दिल्याचा संदर्भ सापडला. डॉ. आंबेडकरांच्या कराड भेटीचे सविस्तर वृत्त यात आलेले आहे व त्यातील संघ भेटीचा उल्लेख पुढीलप्रमाणे...या समारंभानंतर कर्‍हाड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळास डॉ. साहेबांनी भेट दिली व त्यांना जरूर लागेल त्या प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन दिले. आश्चर्यकारक बाब म्हणजे शासनाने प्रकाशित केलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे, खंड 18 भाग 02’ मध्ये ‘जनता’च्या 20 जानेवारी 1940 च्या अंकातील वृत्त जशास तसे घेतलेले आहे मात्र यात संघ भेटीचा उल्लेख गाळलेला आहे. ही लबाडी कोणी आणि का केली हा चौकशीचा विषय आहे.
 

rss
 
संघ ‘सकल हिंदू बंधू-बंधू’ या विचाराने अत्यंत प्रामाणिकपणे जातीच्या भिंती तोडून समाज जोडण्याचे काम स्थापनेपासून करीत आला आहे. संघ परिवारात विविध सामाजिक घटकातील कार्यकर्ते सक्रियपणे काम करत आहेत. म्हणून डॉ. आंबेडकरांनी संघाबद्दल जो आपलेपणा व्यक्त केल्याचा पुरावा उपलब्ध झाला, तो प्रेरणादायी आणि स्वयंसेवकांचा उत्साह वाढविणारा आहे.
 
 
राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीद्वारे संकलित व प्रकाशित केलेल्या ‘जनता’ साप्ताहिकाचे नऊ खंड तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे’चे खंड यामध्ये आणखी संशोधन केले असता आणखी अतिशय महत्त्वाचे संदर्भ हाती लागले.
 
 
विदर्भातील भंडारा येथे संसदेच्या एका जागेवर 1954साली पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे राहिलेले होते. 1952प्रमाणे या निवडणुकीतसुद्धा काँग्रेसने बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला होता.
  
 
Dr. Ambedkar
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मात्र 1954च्या भंडारा पोटनिवडणुकीमध्ये बाबासाहेबांना निवडून आणण्यासाठी प्रचार केला होता. संघाचे ज्येष्ठ प्रचारक दत्तोपंत ठेंगडी हे तेव्हा मध्यप्रदेश जनसंघाचे सरचिटणीस होते. (तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झालेला नव्हता व तेव्हाचा जनसंघ म्हणजेच आताचा भाजपा) या निवडणुकीत जनसंघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाहीर व सक्रीय पाठींबा दिलेला होता. पाठिंब्याचे पत्रक काढले होते, 
 

rss
 
त्यांच्या मतदारसंघात दत्तोपंत ठेंगडी यांनी जाहीर सभा घेतल्या व जनतेला पू. बाबासाहेबांना मतदान करण्याचे आव्हान केले होते. याचे संदर्भ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ‘जनता’ साप्ताहिकात आलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 20 एप्रिल 1954 रोजी नागपूर येथे आले असता त्यांचे भव्य स्वागत झाले. यावेळी डॉ.आंबेडकरांच्या उमेदवारीला पाठींबा देणार्‍या पक्षांच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यास म. प्र. जनसंघाचे दत्तोपंत ठेंगडी उपस्थित असल्याबाबत उल्लेख ‘जनता’च्या दिनांक 24 एप्रिल 1954 च्या अंकात तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग तीन, पृष्ठ 373, 374 वर देखील हा संदर्भ आलेला आहे. ‘जनता’च्या दिनांक 1 मे, 1954 च्या अंकात पृष्ठ क्र.03 वर ‘भंडारा पोट-निवडणुकीवर ओझरती नजर’ या मथळ्याखाली निवडणुकीचे वृत्त व काही विश्लेषण केलेले आहे. यात पुढील वृत्त आलेले आहे.
 

मध्यप्रदेश जनसंघाचे सरचिटणीस श्री. दत्तोपंत ठेंगडी यांनी एक जाहीर पत्रक काढून जनसंघाचा पाठिंबा पू. बाबासाहेब आंबेडकर यांना असल्याचे जाहीर केले. त्याप्रमाणें स्वतः श्री. दत्तोपंत ठेंगडी व जनसंघीय कार्यकर्ते भंडारा मतदान विभागांत ठिकठिकाणी सभा घेऊन आपल्या पक्षातील त्याचप्रमाणे हिन्दु मतदारांनी डॉ. बाबासाहेबांना, आपली अमुल्य मतें द्यावी व त्यांना निवडून आणावे असा प्रचार करीत आहेत.
 
संघाचे जेष्ठ प्रचारक दत्तोपंत ठेंगडी व डॉ. आंबेडकरांचे उत्तम संबंध होते व दत्तोपंतांनी अनेकदा डॉ. आंबेडकरांसोबत विविध विषयांवर संवाद साधलेला होता. विदर्भातील आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांसोबत दत्तोपंतांचे स्नेहाचे संबंध होते. दत्तोपंत ठेंगडी यांनी ‘सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. आंबेडकर’ हा ग्रंथ लिहिलेला आहे व याविषयीच्या अनेक आठवणी त्यात सांगितलेल्या आहे. या ग्रंथात ‘डॉ. आंबेडकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या प्रकरणात दत्तोपंत म्हणतात,‘डॉ. आंबेडकरांना रा.स्व.संघाची पूर्ण माहिती होती व संघाच्या स्वयंसेवकांचा त्यांच्याशी नित्य संपर्क व चर्चा होत. रा.स्व.संघ ही हिंदू संघटनेचे कार्य करणारी एक अखिल भारतीय संघटना आहे. परंतु अन्य हिंदुत्वनिष्ठ पक्ष वा हिंदू संघटन करणार्‍या संस्था यांमध्ये व संघामध्ये फरक आहे याचे भानही बाबासाहेबांना होते.’
 
सामाजिक समरसतेच्या भूमिकेविषयी दत्तोपंत लिहितात, बाबासाहेब म्हणाले होते. ’माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत. माझे गुरू बुद्ध यांच्या शिकवणीपासून ते मी काढले आहे. माझ्या तत्त्वज्ञानात बंधुतेस फार उच्च स्थान आहे. स्वातंत्र्य नि समता यासंबंधी होणार्‍या उल्लंघनाविरुद्ध संरक्षण फक्त बंधुभावनेचेच आहे. याचेच दुसरे नाव बंधुता किंवा मानवता आणि मानवता हेच धर्माचे दुसरे नाव आहे.’
 
 
या समरसतेच्या, समतेच्या, शोषणरहिततेच्या प्रस्थापनेच्या मार्गातील समस्येचे खरोखर निराकरण करावयाचे असेल, तर दोन्ही बाजूंनी अप्रियता स्वीकारावी लागेल. ज्यांच्या हातचे अधिकार, नवीन बदलामुळे जाणार आहेत अशा प्रकारच्या निहित स्वार्थ (vested interests) वाल्या शोषक लोकांची नाराजी पत्करून, तसेच जे शोषित असल्यामुळे आवेशापोटी अतिरेकी (extremist) बनू शकतात त्यांचीही नाराजी पत्करून, संवैधानिक मार्गाने, संतुलित पद्धतीने शोषितांचे नेतृत्व केले जाण्याची आवश्यकता आहे आणि आपण सर्व एकाच समाजाचे, एकाच कुटुंबाचे अंग आहोत, हा भाव निर्माण केला पाहिजे. संपूर्ण कुटुंब मिळून एक युनिट असते. कुटुंबामध्ये दूध पिणारे लहान मूल आहे, ऐंशी वर्षांचा खाटेला खिळलेला म्हातारा आहे, लंगडा आहे, पांगळा आहे, अशा प्रकारच्या घटकांची जास्त काळजी घेतली जाते. त्याप्रमाणेच संपूर्ण समाज एक कुटुंब असल्यामुळे या कुटुंबामध्ये जे सामाजिक, आर्थिक दृष्टीने दुर्बल आहेत त्यांची अधिक काळजी घेण्याची स्वाभाविक प्रवृत्ती निर्माण व्हावी या दृष्टीने सामाजिक समरसता म्हणजेच बंधुता म्हणजे बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे धर्म हाच खरा मार्ग असू शकतो. सामाजिक समरसता जर निर्माण होणार नाही तर केवळ प्रतिक्रियांमधून शेवटी निरंतर क्रांतीच्या सिद्धांताकडे मार्ग जातो आणि चीनमध्ये सिद्ध झाल्याप्रमाणे हा सामाजिक क्रांतीचा खरा स्थायी मार्ग होऊ शकत नाही.
 
 
पुढे डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर यांच्या समान दिशेबाबत ते लिहितात, डॉ. आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार दोघांच्याही पद्धती अलग अलग वाटत असल्या तरी दोघांची दिशा एकच आहे. समतेचे व समरसतेचे दोघेही समर्थक आहेत. निर्भेळ समतेची भाषा बोलणार्‍यांच्या अंतर्मनांतही सामाजिक समरसतेचा विचार, त्यांना स्वतःला न कळत का होईना, असतोच, तसेच सामाजिक समरसतेचा पूर्ण आग्रह ठेवणार्‍यांच्या मनांत सामाजिक समता अध्याहृत असतेच. फरक आहे तो केवळ emphasisचा. सामाजिक समतावादी ज्याला सामाजिक अभिसरण म्हणतात, त्यासाठीही सामाजिक समरसतेचीच आवश्यकता असते. परंतु डॉ. आंबेडकर व डॉ. हेडगेवार या दोघांचेही प्रारंभ बिंदू भिन्न असल्यामुळे दोघांनी विभिन्न मार्गाचा अवलंब केला. ही सामाजिक समरसतेची मानसिकता संपूर्ण समाजाच्या मनात कशी निर्माण करता येईल याविषयी डॉ. हेडगेवार यांनी भावात्मक विचार केला.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे निधन 21 जून 1940 मध्ये झाले तेव्हा जनता साप्ताहिकात 29 जूनच्या अंकात बातमी छापून आली ती पुढीलप्रमाणे...डॉ. हेडगेवार यांचे निधन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. के. बी. हेडगेवार हे ता. 21-6-40 रोजी सकाळी 9-30 वाजतां रक्तदाबाच्या विकाराने मृत्यू पावलें. निधनसमयीं त्यांचे वय सुमारें 51 वर्षांचें असून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुमारे सहाशेवर शाखा स्थापन केलेल्या आहेत, आणि त्यांत जवळ जवळ पाऊण लाखांवर स्वयंसेकांची नोंद पटावर झालेली आहे. त्यांच्या निधनाने नागपूरचा एक थोर आणि उत्साही हिंदु कार्यकर्ता नाहींसा झाला आहे.
 
 
 
संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा ‘नागपूरचा एक थोर आणि उत्साही हिंदू कार्यकर्ता’ असा सन्मानपूर्वक उल्लेख ’जनता’मध्ये होणे हा त्यांच्याबद्दल असणारा आदरभाव दर्शविणारा महत्त्वाचा संदर्भ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल स्वतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही टीका केल्याचे आढळत नाही तरी लोक अन्य पुस्तकांचे अर्धवट संदर्भ देत टीका करण्यात धन्यता मानतात. दिवंगत अभ्यासक हरी नरके यांनी याबबत फार लबाडी केलेली दिसते. अर्धवट आणि सोयीचे तेवढे सांगयचे काम त्यांनी केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे’च्या संपादक मंडळात हे महाशय असताना चक्क काही संदर्भ वगळण्याची लबाडी यांनी केलेली आहे.
 
 
संघाचे दुसरे सरसंघचालक श्री. मा. स. गोळवलकर गुरुजी यांनी सप्टेंबर 1949मध्ये दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत प्रा. हरी नरके यांनी त्यांच्या एका लेखात सोहनलाल शास्त्री यांच्या ग्रंथाचा संदर्भ देऊन, या भेटीत डॉ. आंबेडकरांनी संघाला विषवृक्ष म्हटल्याचे लिहिलेले आहे. आजही काही लोक तो संदर्भ समाजमाध्यमात फिरवतात. तर या सोहनलाल शास्त्री आणि त्याच्या ग्रंथाची विश्वासार्हता किती आहे ते पाहूया. सोहनलाल शास्त्री यांनी ‘बाबासाहेब डॉ.आंबेडकर के संपर्क में पच्चीस वर्ष’ नावाचे हिंदीतून पुस्तक लिहिलेले आहे. त्यात ते पृ.क्र.54,55 वर लिहितात,
 
 
1. उन्हीं दिनों गुरु गोल्वालकर भी बाबा साहेब के पास आए थे। उनकी दसों उँगलियों में नाना प्रकार की पाषाणजड़ित सुनहरी अंगूठियाँ पहनी हुई मैंने अपनी आँखों से देखी थीं। ...हे तर पूर्णतः खोटे आहे. श्रीगुरुजी यांचे अनेक फोटो व व्हिडीओ उपलब्ध आहेत. दहाही बोटांमध्ये पाषाणजडित सोन्याच्या अंगठ्या ते कधीही घालत नव्हते. तसेच संघ प्रचाराकांचे राहणीमान हे अत्यंत साधे असते हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सोहनलाल शास्त्री यांचे म्हणणे खोटे ठरते.
 
 
2. याबाबत पुढे ते लिहितात...सदाशिव गुरुजी गोल्वालकर बाबा साहेब से मराठी में बातें करते रहे जिन्हें मैं बहुत कम ही समझ पाया था क्योंकि मैं मराठी से अनभिज्ञ था...सोहनलाल शास्त्री हे मूळ पंजाब राज्यातील होते व जर त्यांना मराठीच कळत नव्हते तर त्यांना ही चर्चा कशी समजली हा मोठा प्रश्न आहे.
 
3. ‘बाबासाहेब डॉ. आंबेडकर के संपर्क में पच्चीस वर्ष’ हा ग्रंथ 1975 सालचा आहे. म्हणजे 1949 नंतर 26 वर्षांनी आठवणींच्या आधारे लिखाण केले आहे.
 
4. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सोहनलाल शास्त्री म्हणतात, इन पच्चीस बरसो में पहले सोलह वर्ष ऐसे है जिनमें मेरा बाबासाहेब से साक्षात्कार तो केवल एक हि बार हुआ ...या प्रस्तावनेत शेवटी ते म्हणतात की, हाईब्लडप्रेशर का रोगी होने के कारण प्रुफशुद्धि भली-भांती नही करा पाया. आशा है पाठक वृंद मुझे इसके लिए क्षमा करेंगे.
 
 
श्रीगुरुजी व डॉ. आंबेडकर यांच्या भेटीच्या संदर्भात जनता साप्ताहिकात दिनांक 09 सप्टेंबर 1949 च्या अंकात वृत्त आलेले आहे. त्यातील काही भाग पुढीलप्रमाणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्होरके, श्री. माधवराव गोळवलकर हे परवां दिल्लीस आले तेव्हां, त्यांनी हिंद सरकारचे कायदेमंत्री, ना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली. श्री. गोळवलकरांच्या समवेत त्यांचे 2, 3 लेफ्टनंट्सही (सहकारी) होते. अगदी निकटवर्ती गोटांतून असे कळते की, पुढे दोन प्रश्न डॉ. आंबेडकरांनी विचारले व पुढे लिहिले आहे की, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न श्री गोळवलकर यांनी केला; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खात्री करण्याइतके सामर्थ्य त्यांच्या (श्री. गोळवलकरांच्या) उत्तरांत नव्हते, असे चौकशीअंती कळले.
 
 
या वृत्तात पुढे म्हटले आहे की, वरील प्रश्नोत्तरांत बरीच घासाघीस झाली; आणि नंतर चर्चा समाप्त झाली. चर्चेचा एकूण शब्द न शब्द देणे, अगर त्याचा एकंदर गाभा सांगणें थोडे कठीण आहे. तथापि, तदनंतर जी माहिती मिळाली त्यावरून हिंदुच्या जुन्या संस्कृतीच्या अन्वयार्थाचा कयास करणे कठीण नाहीं. हिंदुची जुनी संस्कृती कोणती असणार? ब्राह्मणी संस्कृतीच आणि दुसरे काय!’ याच जुन्या ब्राम्हणी संस्कृतींचे पुनर्जीवन रा. स्व. संघाला करावयाचे आहे असे दिसते.
 
 
वरील वृत्त पाहता, 1. ‘अगदी निकटवर्ती गोटांतून असे कळते’, 2. ‘असे चौकशीअंती कळले’, 3. ‘चर्चेचा एकूण शब्दन शब्द देणे, अगर त्याचा एकंदर गाभा सांगणें थोडे कठीण आहे. तथापि, तदनंतर जी माहिती मिळाली त्यावरून हिंदुच्या जुन्या संस्कृतीच्या अन्वयार्थाचा कयास करणे कठीण नाहीं.’ या वाक्यांचा विचार केला तर लक्षात येत की हे वृत्त ऐकीव माहितीवर आधारित आहे व पुढे कयास करून लेखकाने स्वतःचे मत व्यक्त केले आहे. श्रीगुरुजी व डॉ. आंबेडकर भेटीचा उल्लेख धनंजय कीर यांच्या ग्रंथात आलेला आहे. परंतु त्यांनी कोणताही तपशील दिलेला नाही. मुळात या भेटीतील चर्चेबाबत स्वतः डॉ. आंबेडकरांनी कुठेही लिहिले किंवा बोललेले दिसत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
 
या भेटीपूर्वी गोळवलकर गुरुजी यांनी 18 जुलै 1949 रोजी डॉ.आंबेडकरांना एक पत्र लिहिलेले आहे, जे समग्र श्रीगुरुजी, खंड 10 मध्ये उपलब्ध आहे. ते पुढीलप्रमाणे,
 
मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
सप्रेम नमस्कार.
आपली भेट झाल्याला बरेच दिवस उलटले आहेत. या दरम्यान अनेक घटना घडल्या आणि अखेर परमेश्वरी कृपेने, संघाला लागलेल्या ग्रहणाचा काळ संपला. यासाठी अनेक सज्जनांनी विविध प्रकारे मदत केली. अनेकांनी अथक परिश्रम केले. त्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच आजची ही सुखद स्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत पाहता हे सुख निर्भेळ नसून संमिश्र आहे. यासंबंधी सांगण्यासारखे बरेच काही असले पाहिजे तरी सध्या मी त्याबाबत शांत राहण्याचे ठरविले आहे.
 
या सर्व अवधीत आपण मला भेटण्याची आणि संघाची बाजू आपणापुढे मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपण माझे सगळे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन शक्य ते सर्व प्रकारचे साहाय्य करण्याचे आश्वासन मला दिले. त्याप्रमाणे शक्य त्या मर्यादेपर्यंत आपण प्रत्यक्षात तसे प्रयत्न निश्चित केले असणार असा मला विश्वास आहे. आपल्या या सौजन्याबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन. सौजन्य हा आपला सहजस्वभाव असल्यामुळे आणखी वेगळ्या प्रकारच्या व्यवहाराची अपेक्षाही आपणाकडून कोणाला करता येणार नाही.
 
सध्या मी संघकार्याची घडी पूर्वीप्रमाणे बसवण्यात व्यस्त आहे त्यामुळे आपल्यासारख्या हितचिंतकांना भेटण्याचे आवश्यक कर्तव्य लांबणीवर पडत आहे. तरीही शक्य तितक्या लवकर येथे येऊन सर्वांना भेटून आभार मानण्याचा प्रयत्न करत आहे.
कृपालोभ असावा ही विनंती.
 
आपला,
मा. स. गोळवलकर’
 
 
वरील पत्रानुसार श्रीगुरुजींची सप्टेंबर 1949मधील भेटीच्या अगोदरही भेट डॉ. आंबेडकरांशी झालेली आहे. गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली होती, ती बंदी उठल्यानंतर हे पत्र लिहिलेले आहे व ही बंदी उठविण्यात अनेकांनी मदत केली व बाबासाहेबांनीसुद्धा केली असणार आणि म्हणून श्रीगुरुजी कृतज्ञता व्यक्त करताहेत.
 
 
शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या 1951च्या जाहीरनाम्याचा उल्लेख करून सांगितले जाते की, जनसंघ, RSS, हिंदुमहासभाशी युती करणार नाही परंतु त्यात कम्युनिस्ट, काँग्रेस या इतर पक्षांचे सुद्धा उल्लेख आहेत व 1954 च्या भंडारा निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने जनसंघाचा पाठींबा स्वीकारलेला दिसतो. याच जाहीरनाम्यात कम्युनिस्ट पक्षाबाबत असे म्हटले आहे की, ‘कम्युनिस्ट पार्टीसारख्या पक्षांशीही सहकार करणार नाही; कारण त्यांचे ध्येय वैयक्तिक स्वातंत्र्य व लोकशाहीची राज्यपद्धती यांवर गदा आणून हुकूमशाही स्थापण्याचे आहे.’ डॉ. आंबेडकरांनी काँग्रेस, कम्युनिस्ट, गांधीवाद, इस्लामिक विचार यावर अत्यंत कठोर टीका केलेल्या आहेत पण संघ विरोधक त्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात.
 
नागपूरच का? 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म दीक्षा घेण्यासाठी नागपूरच का निवडले? याबाबत तेव्हा अशी कुजबुज सुरू होती की संघाचे मुख्यालय या ठिकाणी आहे म्हणूनच बाबासाहेबांनी नागपूर निवडले.
 
 
Dr. Ambedkar
 
याविषयी दिनांक 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणात स्वतः डॉ.आंबेडकर म्हणतात,‘पुष्कळसे लोक मला असा प्रश्न करतात की या कार्याकरिता तुम्ही नागपूर हेच शहर का ठरविले? अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही? काही लोक असे म्हणतात की आर. एस. एस. ची-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची-मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली आहे. हे मुळीच खरे नाही. त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडतो. आपले नाक खाजवून दुसर्‍याला अपशकून करण्यासाठी मजजवळ वेळ नाही.’
 
 
याच भाषणात बाबासाहेब नागपूरच का निवडले हे सांगतात व पुढे म्हणतात की,‘भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास’ नाग-पूर’ म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे 27 मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे. नजिकच वाहणारी जी नदी आहे ती नाग नदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहाणार्‍या लोकांवरून पडले आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी आहे. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे.
 
 
नागपूर यामुळे निवडले आहे. यामध्ये कोणालाही खिजविण्याचा कोठेच प्रश्न नाही. तशी भावनाही नाही. आर. एस. एस. चे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही. तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये. (संदर्भ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 3, पृ.523, 524.)
 
 
मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी मोठा विरोध झाला, मराठवाड्यात हिंसाचार झाला नामांतरासाठी अनेक वर्ष चळवळ झाली. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्षाने नामांतराच्या समर्थनात मोठी मोहीम राबविली, जनजागृती केली, अनेक कार्यकर्त्यांनी तुरुंगवास देखील भोगला हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदुमहासभेचे नेते, आर्यसमाजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी अशा अनेकांशी बाबासाहेबांचे स्नेहाचे संबंध होते. संवाद होता. मतभेदही होते. समाजात काम करताना माणसांमध्ये मतभेद होणे स्वाभाविक आहे. परंतु, मतभेद असले तरी डॉ आंबेडकर चांगले कार्य करणार्‍यांसोबत संवाद साधायचे तसेच आपलेपणाची, बंधुत्वाची भावना बाळगायचे हे स्पष्ट दिसून येते.
 
 
डॉ. आंबेडकरांना अपेक्षित सामाजिक समतेचे, बंधुतेचे विचार व्यवहारात आणण्यासाठी रा.स्व.संघाने अनेक कार्यक्रम-उपक्रम हाती घेतले, व्यापक प्रबोधन करण्याचे कार्य केले. 1983 साली महाराष्ट्रात याच विचाराने समाजिक समरसता मंचाची स्थापना झाली व त्याद्वारे समरसता परिषदा, समरसता साहित्य संमेलने, समरसता यात्रा आयोजित केल्या जातात. ‘बंधुत्वाचे घडवू दर्शन, समता आणू समरसतेतून’ हे गीत संघात गेली अनेक वर्ष म्हटले जाते. संघाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाच्या विचाराने व आपलेपणाच्या भावनेतून देशभरात लाखो सेवा प्रकल्प वंचित घटकांसाठी राबविले जातात.
 
 
2015पासून संघात अखिल भारतीय स्तरावरून समरसता गतीविधी हा स्वतंत्र आयाम पूर्ण भारतात सुरू केला गेला. विशेष म्हणजे साधू, संत, हभप अशा धार्मिक नेतृत्वाने सुद्धा समरसतेचा विचार समजून घ्यावा व समाजप्रबोधन करावे यासाठी स्वयंसेवक कार्यरत आहेत.
 
 
हिंदू ऐक्य, हिंदू संघटन, हिंदुत्व या विचारातच जातिभेदाला स्थान नाही. जातीय विचार केला तर संघटन कसे होणार? संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी पुण्यात 1974 मध्ये वसंत व्याख्यानमालेमध्ये सामाजिक समता व हिंदू संघटन या विषयावर व्याख्यान दिले. या मध्ये अतिशय प्रागतिक सामाजिक भूमिका मांडली आहे. .... आता बेटी व्यवहार सर्रास व्हावा. अस्पृश्यता ही चूक आहे. It must go lock, stock and barrel! ती सर्वतोपरी गेली पाहिजे..If untouchability is not wrong. nothing in the world is wrong! अस्पृश्यता वाईट नसेल तर मग जगात काहीच वाईट नाही! आज जी जातिव्यवस्था आहे, ती अव्यवस्था आहे. ती विकृती आहे.... जी जाऊ घातली आहे. ती आता नीट कशी जाईल याचाच सर्वांनी विचार केला पाहिजे. जे अस्पृश्यता-जातिभेद पाळतात, त्यांच्याकडे गेले पाहिजे. त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे ही आपली जबाबदारी आहे. जे असले भेद मानतात त्यांच्यावर तुटून पडण्यापेक्षा, संघर्ष निर्माण करण्यापेक्षा, त्यांना भेटायचे, त्यांच्याकडे जाऊन समजावून सांगायचे हे केले पाहिजे. असे करणे हाही कामाचा एक प्रकार होऊ शकतो. कारण हे सर्व बंधू आपलेच आहेत आणि त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झाले पाहिजे असा आपला प्रयत्न आहे.... , असे देवरसांनी स्पष्टपणे मांडले. संघ शताब्दी वर्षानिमित्त शोषणमुक्त, समतायुक्त हिंदू समाज निर्मितीसाठी जे कार्य सुरू आहे, ते आपण सर्व मिळून अधिक ताकदीने पुढे घेऊन जाऊया, बंधुभाव वाढवूया.
 
जय भीम जय हिंद !
 
लेखक विवेक विचार मंचाचे राज्य संयोजक आहेत.
Powered By Sangraha 9.0