संघसमर्पित जीवन - बाबाजी देसाई

31 Oct 2025 16:59:06
@मोहन सालेकर  9869406811
 
rss 
संघकार्याच्या इतिहासात काही व्यक्तिमत्वे अशी असतात, ज्यांनी आपल्या कृतीतून आपला प्रभाव निर्माण केला. त्यांचे आयुष्य म्हणजे निष्ठा, शिस्त, साधेपणा आणि समर्पण यांचे जिवंत उदाहरण असत. अशीच एक व्यक्ती होती, बाबाजी देसाई. त्यांचे 30 सप्टेंबर 2025 रोजी त्यांच्या राहत्या घरी खारघरला निधन झाले.
त्यांचे वडील काँग्रेसीच्या विचारांचे, पण बाबाजी मात्र रमले ते संघाच्या शाखेत. दादरच्या महाराष्ट्र हायस्कूलमधून 8 वी ते 11 वी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यावेळी ते संघाची हाफ पॅन्ट घालूनच शाळेत जात असत. बालपणापासूनच संघाशी संबंध आला, सुरूवातीला नगर कार्यवाह, भाग शारीरिक शिक्षण प्रमुख आणि तदनंतर त्यांनी मुंबईचे शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणून काम केले. संघाच्या शारीरिक विभागात नियुद्ध विषय शिकवायला सुरुवात झाली, तेव्हा बाबाजी प्रशिक्षक म्हणून उभे राहिले. थोड्याच अवधीत त्यांनी उत्कृष्ट नियुद्ध प्रशिक्षक म्हणून लौकिक मिळवला. नियुद्धासोबतच इतर शारीरिक कार्यक्रमांवरही त्यांची तेवढीच हुकूमत होती. शारीरिक शिक्षण आणि संघशाखेतील इतर कार्यक्रम हे त्यांच्या जीवनाचं ध्येय बनले. त्यांना खात्री होती की भारताला पुन्हा वैभवशाली बनवायचे असेल, तर प्रथम तरुणांच्या मनात राष्ट्रभक्ती, शौर्य आणि संघटनशक्ती जागवली पाहिजे.
 
1970 च्या दशकात संघाच्या कामाकडे तुच्छतेने पाहिले जात होते. स्वयंसेवक रस्त्याने जात असले तर कुत्सित टिकाटिपण्णी होत असे. असेच एकदा बाबाजी जांबोरी मैदान, वरळी येथील शाखा संपवून स्वयंसेवकांसोबत चालले होते. मागून चालणारा एक तरुण टिंगलीच्या सुरात म्हणाला, “संघ दक्ष, मुलींकडे लक्ष,” बाबाजी तडक मागे वळले, त्या तरुणाच्या कानाखाली सणसणीत आवाज काढला आणि म्हणाले, “होय, आमचं लक्ष प्रत्येक मुलीकडे आहे, कारण त्या आमच्या बहिणी आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे.”
 
संघकार्य आणि शिक्षण याचा तोल सांभाळत ते पुढे पदवीधर झाले. सेंट जॉर्ज इस्पितळात नोकरी धरली. तिथेही आपल्या नेतृत्व गुणांची चमक दाखवत तिथल्या कर्मचारी युनियनचे नेते बनले. सुरूवातीला दादरच्या सयानी रोडवर राहणारे बाबाजी लग्नानंतर सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या शासकीय निवासस्थानी रहायला गेले. त्यांचे निवासस्थान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच असल्याने अनेक संघ अधिकार्‍यांचा त्यांच्या घरी राबता होता. 1989 साल संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्यावेळी वर्ष प्रतिपदा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती एकाच दिवशी आली. तेव्हा जन्मशताब्दी निमित्ताने मुंबईच्या तीन ठिकाणाहून पथसंचलन निघाले, त्या तीनही पथ संचलनाचे एकत्रीकरण जांबोरी मैदानात झाले. त्यावेळी झालेल्या पथसंचलनाने डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यालाही मानवंदना दिली. या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन बाबाजींनी केले होते. त्यानंतर दादरच्या छ. शिवाजी पार्कला जन्मशताब्दी समारोहाची सांगता सभा झाली. त्या आयोजनात रामभाऊ नाईक, मोहन सालेकर यांच्या सोबत बाबाजींचा महत्वपूर्ण सहभाग होता. पू.पांडुरंगशास्त्री आठवले आणि तत्कालीन सरसंघचालक पू.रज्जुभय्या यांच्या उपस्थितीत झालेल्या त्या सभेने पूर्वीचे सर्व विक्रम मोडले.
 
नंतरच्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनातही बाबाजींची सक्रिय भूमिका होती. त्यावेळच्या आंदोलनाचा रेटा लक्षात घेऊन संघ योजनेतून बाबाजींना विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची जबाबदारी दिली गेली. ते कोकण प्रांताचे सहमंत्री झाले. बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीचे ते पालक झाले. त्यांनी परिश्रमपूर्वक या दोन्ही आयामांचे काम वाढवले. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात बाबाजी दादा देसाई झाले. ज्यावेळी बाबरी ढांचा पडला, त्यावेळी कारसेवक म्हणून बाबाजी अयोध्येत होते. बाबरीच्या पतनानंतर त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेचे नेते स्व. प्रमोद नवलकर, रमेश मोरे आदी अयोध्येत पोहचले.बाबाजी दादरचेच असल्यामुळे नवलकरांची बाबाजींशी ओळख होती. नवलकर म्हणाले,“अहो, खरंच ढांचा पडला का?” बाबाजी म्हणाले,“एवढ्या लांबून आलाच आहात तर जाऊन प्रत्यक्षच बघा.”
 
 
बाबरीच्या रुपाने उभा असलेला अन्यायाचा कलंक पुसला गेला होता. पण त्याच श्रेय बाबाजींनी हिंदू शक्तीच्या पराक्रमाला दिले होते. इदं न मम हाच संघ संस्कार घेऊन बाबाजी आयुष्यभर झटले. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात सोबत काम केल्यामुळे त्यांच्या कामाचा उरक, चालण्यातला करारीपणा, बेधडक भिडण्याची वृत्ती अनेक तरुण कार्यकर्त्यांना बजरंग दलाच्या कार्यात जोडत होती. बकरी ईदच्या काळात वाशी चेक नाक्यावर परिषदेच्या कार्यकर्त्यांना चौकी लावण्यास पोलिसांनी विरोध केला, चौक्या उद्ध्वस्त केल्या. दुसर्‍याच दिवशी सर्व बजरंगी मंत्रालयात घुसले आणि गृहमंत्र्यांच्या दालनाबाहेर गोरक्षरणाचा शंखनाद केला, या धडक आंदोलनाला यशस्वी करण्यामागे बाबाजी देसाईंचे सूक्ष्म नियोजन होते.
 
 
मधल्या काळात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. तरुण, कमावता मुलगा त्याच्या डोळ्यादेखत गेला, या दोन आघातांनी बाबाजी थोडे खचले. एकाकी पडले. स्मृती दगा द्यायला लागली, अशातच 30 सप्टेंबर 2025 रोजी संघमालिकेतील एक तेजस्वी तारा निखळला. बाबाजी शरीराने आपल्यात नाहीत, पण शाखेतल्या प्रार्थनेत जिवंत आहेत. ‘त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम’चा संदेश अनेकांच्या मनात जागवत बाबाजी इहलोकाच्या यात्रेत मार्गस्थ झाले आहेत.
 
लेखक विश्व हिंदू परिषदचे कोकण प्रांत मंत्री आहेत.
Powered By Sangraha 9.0