उस्ताद हॉटेल हा सिनेमा तीन पिढ्यांची गोष्ट आहे. त्यांच्या विचारातील संघर्षाची सुद्धा गोष्ट आहे. एका तरुण माणसाचा, कोऽहम्कडून सोऽहम्कडे जाण्याचा प्रवास म्हणजे उस्ताद हॉटेल हा सिनेमा. ज्याच्यात अन्नाची महत्त्वाची भूमिका आहे. आपण अन्नाला पूर्णब्रह्म म्हणतो. इथेही लोकांच्या पोटातच नाही तर मनात शिरायचा मार्ग अन्नामार्फत जातो, हे दिसते.
स्लीम समाजजीवन, संस्कृती, संगीत, वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती, उर्दू भाषा, त्यातली तेहजीब यांचे दर्शन अनेक सांगीतिक आणि पोशाखी सिनेमांमधून घडले. सत्तरच्या दशकानंतर, भारतीय समाजात जी काही सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे झाली, त्याचे प्रतिबिंब निकाह, बाजार या सारख्या सामाजिक सिनेमांत उमटले. मात्र या सर्वात, सर्वसामान्य मुस्लीम समाजजीवनाचे चित्रण करणारे चित्रपट मात्र खूप कमी बनले. भारतात सुद्धा सुशिक्षित, मध्यमवर्गीय मुस्लीम समाज आहे. त्यांच्या समस्या, इच्छा, अपेक्षा या इतर नागरिकांच्या अपेक्षांसारख्याच आहेत.
अन्वर रशीद दिग्दर्शित ’उस्ताद हॉटेल’ हा सिनेमा या वर्गाचे चित्रीकरण करतो. ही एका व्यावसायिक शेफ (आचारी)ची कथा आहे. त्याच्या स्वप्नांची, वडिलांबरोबरच्या गुंतागुंतीच्या नात्याची आणि आजोबांकडून मिळालेल्या प्रेरणेची सुद्धा गोष्ट आहे.
नायकाचा जन्म होण्याआधीच सिनेमा सुरू होतो. नायकाचे वडील अब्दुल रझाक अतिशय आनंदात आहेत कारण त्यांच्या लाडक्या पत्नीला दिवस गेले आहेत. आपल्याला मुलगा होणार, त्याचे नाव फैझल असणार, मी त्याला लाडाने फैझी म्हणणार, तो मोठा होऊन माझा व्यवसाय वाढवणार अशी स्वप्ने रंगवत असतानाच, पहिली मुलगी जन्माला येते. एकापाठोपाठ चारही मुली झाल्याने निराश होऊन अब्दुल कामानिमित्त दुबईला निघून जातो तेव्हा त्याची पत्नी फरिदा पाचव्यांदा गरोदर असते. अब्दुलला हवा असणारा मुलगा जन्माला येतो खरा, पण सततच्या बाळंतपणाने पिचून गेलेल्या फरिदाचा मृत्यू होतो. या दुःखाने खचलेला अब्दुल आपल्या पाचही मुलांना घेऊन दुबईला निघून जातो.
आपल्या चारही मोठ्या बहिणींबरोबर छोटा फैझी अगदी लाडाकोडात वाढतो. फैझीला त्यांना घरकामात सुद्धा मदत करायला आवडते. वडिलांच्या अपेक्षा मात्र वेगळ्या असतात.
बहिणींची लग्ने होतात. फैझीला उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठवायचे हे त्याच्या वडिलांचे स्वप्न असते पण फैझीला तर आचारी बनायचे असते. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातो असे सांगून फैझी स्वित्झर्लंडला जातो खरा, पण तो स्वयंपाक शिकण्याच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतो. उत्तम शेफ बनलेल्या फैझीला लंडन येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये नोकरी मिळते. इथल्याच एका परदेशी मुलीशी त्याचे सूत जुळते. त्याच्या महत्त्वाकांक्षेला विरोध न करणार्या त्यांच्या बहिणींना ही गोष्ट मात्र आवडत नाही. वडील आजारी आहेत असे सांगून त्या फैझीला दुबईला बोलावून घेतात आणि तो आल्यावर त्याचे वडील इथल्याच एका श्रीमंत घराण्यातील मुलीशी त्याचे लग्न ठरवतात.
या अनपेक्षित घटनांनी हबकलेला फैझी त्या मुलीला आपण शेफ म्हणून नोकरी करणार असल्याचे सांगतो आणि दोन्ही कुटुंबांना धक्का बसतो. मुलीचे कुटुंब अर्थातच लग्नाला नकार देतात. मुलाने हॉटेल मॅनेजमेंट केले आहे असे मुद्दाम खोटे सांगितल्याचा आरोप फैझीच्या वडिलांवर करून, त्यांचा अपमान केला जातो. संतापाने फैझीचे वडील त्याचा पासपोर्ट आपल्या ताब्यात घेतात, जेणेकरून त्याला दुबईत राहायला भाग पाडले जाईल. फैझी मात्र तिथून पळ काढतो आणि आपल्या आजोबांची मदत घेण्यासाठी समुद्रमार्गाने केरळमध्ये प्रवेश करतो.
फैझीचे आजोबा करीम कोझिकोडे येथे समुद्रकिनार्यावर एक छोटेसे हॉटेल चालवत असतात. त्यांनी बनवलेली बिर्याणी पंचक्रोशीत प्रसिद्ध असते. करीम आपल्या नातवाला केवळ बिर्याणी बनवायला शिकवत नाहीत तर ह्या व्यवसायावर प्रेम करायला शिकवतात. येथे काम करणारे केवळ कर्मचारी नाहीत, तर ते आचारी आहेत. ते लोकांची भूक भागवणारे, त्यांच्या पोटात जे अन्न जाणार आहे ते निगुतीने शिजवणारी माणसे आहेत. तेव्हा ते फैझीला त्यांचा आदर करायला, त्यांच्या अडीअडचणीला धावून जायला शिकवतात. पंचतारांकित हॉटेलमधील आचारी ते आजूबाजूच्या परिसरातील माणसे करीमचा आदर करत असतात, याचे कारण त्याचे पाककौशल्य एवढेच नसून माणसे सांभाळण्याचे त्याचे तंत्र हे ही असते. हे जाणल्यावर आपले आजोबा, छोट्याश्या हॉटेल व्यावसायिकापेक्षा सुद्धा खूप मोठे आहेत याची फैझीला जाणीव होते.
आजोबा आणि नातवांत जुळलेले बंध फार सुंदर चित्रित केले आहेत. आजोबांच्या हॉटेलमध्ये फैझी एका सर्वसामान्य कर्मचार्यासारखेच काम करतो आणि हळूहळू मुख्य आचारी बनण्याकडे, त्याचबरोबर आयुष्याकडे प्रगल्भ नजरेने बघण्याकडे त्याचा प्रवास सुरू होतो. त्याच्या इच्छेनुसार, त्याचे आजोबा त्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळवून देतात.
सुरुवातीला आपल्या दर्जाचे काम करायला मिळाल्याने फैझी खुश होतो पण त्याला लवकरच समजते की, लोकांची क्षुधा तृप्त करणे हा ह्यांचा उद्देश नाही तर केवळ आपले खिसे गरम करणे हा ह्यांचा धंदा आहे, त्यामुळे इथे येणारे ग्राहक आणि हॉटेल यांच्यात फक्त पैशाचे नाते आहे. माणुसकीचा बंध नाही.
फैझीच्या प्रेमाची छोटीशी गोष्ट सुद्धा कथानकात गुंफलेली आहे. ज्या परदेशी मुलीवर त्याचे प्रेम असते ती मुलगी या बदललेल्या फैझीवर काही प्रेम करू शकत नाही पण ज्या मुलीच्या कुटुंबाने तो आचारी म्हणून त्याला नाकारलेले असते ती मुलगी शहाना मात्र फैझीच्या प्रेमात पडते. हा मुलगा आधुनिक विचारांचा आहे आणि त्याला नात्याची बूज राखता येते, हे समजल्यावर तिच्या लक्षात येते की, तो स्वतःच्या पत्नीला इतर यशस्वी पुरुषांसारखे चार भिंतीच्या आत ठेवणार नाही. तो तिच्या करिअरला सुद्धा प्राधान्य देईल.
उस्ताद हॉटेल हा सिनेमा तीन पिढ्यांची गोष्ट आहे. त्यांच्या विचारातील संघर्षाची सुद्धा गोष्ट आहे. आचारी म्हणून फैझीच्या वडिलांना लहानपणी हिणवले गेले होते, त्याचा बदला म्हणून ते दुबईत जाऊन हॉटेल व्यावसायिक बनतात. ह्याच कारणामुळे फैझीचे स्वयंपाकाकडे वळणे त्यांना पसंत नसते. परदेशात मात्र शेफना मान आहे, प्रतिष्ठा आहे आणि ग्लॅमर सुद्धा आहे. फैझीने ही करिअर निवडणे हे या पिढीसाठी सहज आहे.
फैझीच्या आजोबांचे हॉटेल बँकेकडे गहाण असते.ते सोडवण्यासाठी फैझी मदत करतो, त्यात यशस्वी होतो. तो शहानाचे प्रेम मिळवतो तरीही कालिकत सोडून युरोपला जाण्याची महत्त्वाकांक्षा मात्र त्याच्या मनात अजूनही जागी असते.
आपल्याला वाटते, एवढे प्रेम सोडून हा मुलगा कसा काय परत जाणार! याचे कारण फैझीला त्याच्या आयुष्याचे ध्येय समजलेच नसते जे त्याला नारायणन कृष्णन या व्यक्तीला भेटल्यावर समजते. त्याचे आजोबा या व्यक्तीस गेली अनेक वर्षे पैसे पाठवत असतात. ते आजारी पडल्याने, फैझी त्यांना पैसे द्यायला जातो. त्यांना भेटल्यावर फैझीला समजते, कॉर्पोरेटमधली मोठ्या पगाराची नोकरी सोडून या व्यक्तीने आपले आयुष्य गरीब, अनाथ लोकांना अन्नदान करण्यात समर्पित केले आहे. त्यांच्या या कार्यात त्याचे आजोबा सुद्धा यथाशक्ती मदत करत आहेत.
पोटाचे समाधान तर कुणीही करू शकतो, चांगला आचारी लोकांच्या हृदयात सुद्धा जागा मिळवतो, त्याच्या आजोबांच्या या शब्दाचा अर्थ आता फैझीला समजतो.
नारायणन कृष्णनला भेटून फैझी जेव्हा परत येतो तेव्हा त्याचे आजोबा हजयात्रेला निघून गेलेले असतात. त्यांना माहीत असते की त्यांचा वारसा चालवायला त्यांचा नातू, फैझी आता समर्थ आहे.
उस्ताद हॉटेल हा सिनेमा एका तरुण माणसाचा, कोऽहम् कडून सोऽहम्कडे जाण्याचा प्रवास आहे. ज्याच्यात अन्नाची महत्त्वाची भूमिका आहे. आपण अन्नाला पूर्णब्रह्म म्हणतो. इथेही लोकांच्या पोटातच नाही तर मनात शिरायचा मार्ग अन्नामार्फत जातो. अंजली मेननची बांधीव पटकथा, अन्वर रशीद यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन, मुख्य पात्रांचा सहज सुंदर अभिनय आणि निसर्गरम्य केरळ सर्वांचाच या सिनेमाच्या यशात महत्त्वाचा वाटा आहे.