तीन भाषणे - एक विचार

04 Oct 2025 12:18:17
संघाने शतकभराच्या वाटचालीत घडविलेले जे काही परिवर्तन असेल तर हेच आहे की, अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची जेव्हा संघमुशीतून जडणघडण होते तेव्हा ते जरी आपले विचार स्वतंत्रपणे मांडत असले, त्यांचे शब्द जरी वेगळे असले तरी त्यामधील भावात्मक आशय एकच आहे. एका दृष्टीने पाहणार्‍याला आणि ऐकणार्‍याला हा चमत्कार वाटत असला तरी हेच संघकार्यपद्धतीचे यश किंवा उपलब्धी आहे. 
rss
 
या विजयादशमीला रा. स्व. संघ शंभर वर्षांचा झाला आहे. ही वाटचाल काही लोकांच्या दृष्टीने अभिमानाची, काही लोकांच्या दृष्टीने असूयेची तर बर्‍याच लोकांच्या दृष्टीने कुतूहलाची बाब ठरली आहे. या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर झालेली तीन भाषणे आपण पाहिली तर या यशस्वी वाटचालीमागचे इंगित उमगू शकते. मात्र ज्यांनी संघाला जवळून पाहिलेले नाही, संघात जाऊन संघ प्रत्यक्ष अनुभवलेला नाही त्यांना ही गोष्ट उमगेलच अशी नाही. अतिशय प्रतिकूलता आणि वेगवेगळी संकटे व आव्हाने छातीवर झेलत संघाची ही वाटचाल झालेली आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळातील प्रतिकूलता ही समजण्यासारखी होती कारण देश गुलामीत होता व परक्यांचे शासन होते. पण स्वातंत्र्यानंतरही स्वकियांचे शासन असतानाही वेगवेगळ्या प्रतिबंधांना आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत संघाने हा शतकपूर्तीचा टप्पा गाठला आहे.
 
 
नागपूर येथील विजयादशमीच्या उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचे दरवर्षी भाषण होते, ही परंपरा चालत आलेली आहे. यंदाच्या विजयादशमीच्या नागपूर येथील कार्यक्रमात विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याबरोबर प्रमुख उपस्थिती असलेले पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचेही भाषण झाले. त्याचबरोबर, 1 ऑक्टोबर रोजी संघाच्या शतकपूर्तीच्या वाटचालीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून जेव्हा शंभर रुपयांच्या एका विशेष नाण्याचे तसेच एका विशेष डाक तिकिटाचे अनावरण झाले त्यावेळी झालेले त्यांचे भाषणही महत्त्वपूर्ण होय.
 
 
तसे पाहायला गेलो तर मोहनजी भागवत, रामनाथ कोविंद आणि नरेंद्र मोदी ही वेगवेगळ्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतून आलेली व्यक्तिमत्त्वे आहे. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक हाच यामध्ये समान धागा होय. वेगवेगळ्या संस्थात्मक पातळीवर तसेच संविधानिक जबाबदारीच्या पदावर कार्य करणारी ही मंडळी आहेत. त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्या अनुभूती यासुद्धा वेगवेगळ्या आहेत. पण अशा नेतृत्वाचे मन हे मोठ्या समूहमनाशी एकरूप झालेले असते. जो आपल्या तत्त्वांशी एकरूप झालेला आहे त्याच्या बाबतीत ही प्रक्रिया सहज आणि स्वाभाविकपणे घडून येते. संघाचे वेगळेपण हे आहे की, या संघटनेने अशी शेकडो-हजारो जीवने आपल्या या शंभर वर्षांच्या वाटचालीत घडविली आहेत.
 
 
याच वाटचालीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून जेव्हा शंभर रुपयांचे एक विशेष नाणे आणि एका विशेष डाक तिकिटाचे अनावरण झाले तेव्हा त्यांनी व्यक्त केलेली भावना यावरच भाष्य करते. मोदी म्हणाले की, संघाची शाखा हे असे प्रेरणास्थान आहे की जिथे ’मी’पासून ’आम्ही’पर्यंतचा प्रवास आरंभ होतो. हे विधान अनेक दृष्टीने बोलके आहे. व्यष्टीपासून समष्टीपर्यंतचा प्रवास स्वयंसेवक अगदी सहजपणे आणि नकळतपणे चालत असतो. त्यामुळेच मग मोदी या स्वयंसेवकत्वाची ओळख करून देताना असेही सांगतात,‘इतरांचे दु:ख दूर करण्यासाठी आपणहून कष्ट उपसणे ही प्रत्येक स्वयंसेवकाची ओळख आहे. ज्या संघटनेचा हा व्यापक पाया असेल ती संघटना मोहनजींच्या विधानानुसार लोकांच्या विश्वासास पात्र ठरली नाही तरच नवल! मोहनजी आपल्या भाषणात म्हणाले,‘सर्व लोकांचा आमच्या विचारांवर विश्वास आहे असे नसले तरी आमच्या विश्वासार्हतेवर मात्र सर्वांचा विश्वास आहे. त्यामुळेच जेव्हा संघ काही सांगतो तेव्हा ते समाज ऐकत असतो. यामुळेच संघाची ही शंभर वर्षांची वाटचाल झालेली आहे.’
 
 
rss
 ग्रंथ नोंदणीसाठी येथे click करा...
 
त्यांनी आपल्या शेजारी राष्ट्रांना आपल्या कुटुंबाचा भाग असे संबोधून सांगितले की, आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणाच्या पलीकडे जाऊन या शेजारी देशांना शांतता, स्थैर्य, कल्याण आणि सुखसमृद्धी बहाल करणे ही आपल्या नैसर्गिक आत्मीयतेतून निर्माण झालेली गरज आहे. संघाच्या या भूमिकेमुळेच त्याला असे ठासून म्हणण्याचा हक्क मिळत असतो की, अनेक गंभीर आव्हानांनी चिंताग्रस्त झालेले जग त्यांवर उपाय शोधण्यासाठी भारताकडे पाहात आहे. भारताने आपले उदाहरण घालून देऊन नेतृत्व करावे आणि जगाला मार्ग दाखवावा अशी विश्वाची इच्छा आहे. हे त्यांचे उद्गार ’परंवैभवं नेतुमे तत स्वराष्ट्रं’ या संघाने मनीमानसी बाळगलेल्या ध्येयाच्या पूर्ततेमागची वैश्विक कल्याणाची भावनाच अधोरेखित करणारे आहे. सरसंघचालकांनी आपल्या भाषणातून दाखवलेले ’भारताच्या पुनरुत्थानाचे स्वप्न’ हे विश्वकल्याणाच्या हेतूने कसे प्रभारित आहे हे यातूनच दिसून येते. याचवेळी देशांतर्गत नक्षली दहशतवाद आणि शेजारील राष्ट्रांमध्ये उसळलेला हिंसाचार याबाबतही ते सावधगिरीचा इशारा देतात. असे हिंसेच्या माध्यमातून सत्तांतर भारतात घडणे शक्य नाही याबद्दलही आश्वस्त करतात. संघाचे कार्य हे संविधानाच्या चौकटीत चालणारे असून संघाचे कार्य हे संघाचे स्वयंसेवक राष्ट्रसेवा आणि समाजाला सक्षम करण्यासाठी अथकपणे समर्पित असून ते संविधानिक मूल्यांवर विश्वास ठेऊन समाजाप्रती कटिबद्ध आहेत. हे विजयादशमी उत्सवात मोहनजी, रामनाथ कोविंद यांनी आणि मोदींनी डाक तिकिट अनावरण प्रसंगी वेगळ्या शब्दांतून सांगितले आहे.
 
 
कोविंद यांनी हा देश भीमस्मृतीवर चालणारा आहे असे अटलजींनी नमूद केले असल्याचे सांगितले तर मोदी यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, राष्ट्रउभारणीचे ध्येय, व्यक्तिमत्त्व विकासाचा सुस्पष्ट मार्ग आणि संघशाखेची जीवमान कार्यपद्धती हाच शतकभराच्या वाटचालीचा पाया आहे. त्याचवेळी मोहनजी यांनी आपल्या भाषणातून स्वदेशी आणि स्वावलंबनाला पर्याय नाही, हे ठासून सांगितले. जगासमोरच्या पर्यावरणीय संकटावर भाष्य करताना, केवळ इहवादी आणि उपभोगवादी विकासात्मक संरचनेच्या माध्यमातून देशाचे आणि विश्वाचे कल्याण होणार नाही असे सांगून त्यांनी पंचपरिवर्तनावर भर दिला तर मोदी यांनी संघाने सांगितलेले पंचपरिवर्तन हे प्रत्येक स्वयंसेवकाला देशापुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी व त्यावर मात करण्यासाठी प्रेरित करते हा विचार मोदी यांच्या भाषणातून समोर आला.
 
 
संघाने शतकभराच्या वाटचालीत घडविलेले जे काही परिवर्तन असेल तर हेच आहे की, अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची जेव्हा संघमुशीतून जडणघडण होते तेव्हा ते जरी आपले विचार स्वतंत्रपणे मांडत असले, त्यांचे शब्द जरी वेगळे असले तरी त्यामधील भावात्मक आशय एकच आहे. एका दृष्टीने पाहणार्‍याला आणि ऐकणार्‍याला हा चमत्कार वाटत असला तरी हेच संघकार्यपद्धतीचे यश किंवा उपलब्धी आहे, हे खचित.
Powered By Sangraha 9.0