असे होते मधुभाई...

05 Oct 2025 15:51:39
 @हसमुख छोटाभाई पटेल
संघकामात अनेक संकेतांचे पालन करावे लागते. काही संकेत हे तर अलिखितच असतात. त्यांचे कार्यकर्त्याला भान असावे लागते. याची प्रचिती मधुभाईंच्या सहवासात आली. तसेच आपल्यावर जी जबाबदारी आहे ती पार पाडण्याविषयी किती जागरूक असले पाहिजे हे संस्कार नकळतपणे माझ्यावर त्यांच्यामुळे घडले.
rss
 
मधुभाई कुलकर्णी यांच्यासोबत माझा परिचय जेव्हा ते 1984 साली गुजरातमध्ये संघकामासाठी आले तेव्हा झाला. त्यावेळी मी खेडा जिल्हा कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळत होतो. आमचे प्रांत प्रचारक केशवराव देशमुख होते आणि मधुभाई आमचे सह प्रांत प्रचारक होते. केशवराव देशमुख यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर बाबूभाई ओझा यांच्याकडे गुजरात प्रांत प्रचारक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. ते गृहस्थी कार्यकर्ता होते. त्यांच्या मुलीचे नाव आहे लताबेन. या लताबेनचे लग्न नडियादचे भूपेंद्रभाई दलवाडी यांच्यासोबत झाले आहे. नडियाद हे आमचे जिल्हा केंद्र होय. तेथे मधुभाईंचा प्रवास होता. माझा दलवाडी कुटुंबाशी परिचय नव्हता. तेव्हा मधुभाई मला आपल्यासोबत लताबेनच्या घरी घेउन गेले. तेथे या कुटुंबासोबत गप्पा झाल्या आणि आमचे चहापाणी झाले. मधुभाईंनी माझा परिचय तेथे करून दिला.
 
दलवाडी कुटुंबाच्या घरून जेव्हा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा मधुभाईंनी मला बजावून सांगितले की, लताबेन आणि भूपेंद्रभाई यांच्याकडे चांगला संपर्क ठेवा. भूपेंद्रभाई आपले स्वयंसेवक झाले पाहिजेत. मी मान डोलावली. आज भूपेंद्रभाई केवळ संघस्वयंसेवकच झालेले नाहीत तर संघाच्या कार्यालयाचे ते विश्वस्त आहेत. मधुभाईंची अशी दूरदृष्टी होती. आपले संघकार्य का आणि कसे वाढते ते अशा निष्ठावंत प्रचारकांकडे पाहूनच कळते.
 

rss 
 
संघकामात अनेक संकेतांचे पालन करावे लागते. काही संकेत हे तर अलिखितच असतात. त्यांचे कार्यकर्त्याला भान असावे लागते. या संदर्भात मला एक घटना आठवते. गुजरातमधील सांबरकाठा जिल्ह्यातील इडर नावाच्या ठिकाणी प्रांताचा संघ शिक्षा वर्ग पार पडला होता. या वर्गात माझ्याकडे कार्यवाह या नात्याने जबाबदारी होती. वर्ग संपल्यानंतर या वर्गाच्या मूल्यांकनाच्या संदर्भात बैठक होत असते. दीक्षांत बौद्धिक झाल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते. त्या बैठकीत एका प्रमुख कार्यकर्त्याने असा प्रश्न विचारला की, या वर्गाला असे काही जण आले होते की, ज्यांच्या वयाची पंधरा वर्षे होण्यासाठी महिना-पंधरा दिवस बाकी होते. त्यामुळे या स्वयंसेवकांचा वर्ग झालेला आहे पण त्यांची संख्या धरावी की वय कमी असल्यामुळे त्यांना मोजणीत धरू नये? यावर बैठकीत खूपच उलटसुलट चर्चा झाली. तेव्हा त्यावेळचे मा. प्रांत संघचालक अमृतभाई कडीवाला म्हणाले की, अशा प्रकारचा वर्ग तर मागील वर्षीसुद्धा झालेला होता. तेव्हासुद्धा असा प्रश्न उपस्थित झाला असेलच. त्यामुळे त्यावेळी आपण या संदर्भात जो निर्णय घेतला असेल तसाच निर्णय यावेळीही घेतला जावा. नंतर बैठकीत दुसर्‍या विषयांवर चर्चा सुरू झाली. याच दरम्यान एका कार्यकर्त्यांने पुन्हा कमी वयामुळे स्वयंसेवकाची संख्या मोजणीत धरण्याचा विषय पुन्हा उकरून काढला. तेव्हा मधुभाईंनी त्या कार्यकर्त्याकडे रोखून पाहिले आणि त्याला विचारले, आता मा. प्रांत संघचालकजी यांनी काय सांगितले ते आपण ऐकलेले नाही का? आपण तेच केले पाहिजे. जेव्हा मा. संघचालकांनी सांगितले की ते आपण ब्रह्मवाक्य समजले पाहिजे. यावर कोणतीही चर्चा करण्याची गरज नाही. त्यामुळे संघकार्याची रिती आणि नीती या संदर्भात मधुभाईंना किती अचूक भान होते हे आम्हाला दिसून आले. संघकामाचे हे संकेत नीट पाळले गेले पाहिजेत हा त्यांचा आग्रह आमच्या लक्षात आला. यातून आमच्यासारख्या अनेक छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांना बोध झाला.
 
 
मधुभाईंच्या बोलण्यातून अनेक गोष्टींचा बोध आम्हाला होत असे. या संदर्भात मला अगदी अलीकडचे उदाहरण आठवते. मे महिन्यात मुंबई येथे एक बैठक होती. त्या बैठकीला गेलो असताना त्यांची भेट झाली. त्यांनी मला विचारले, आपले संभाजीनगरचे कार्यालय नवे बनले आहे, ते पाहिले आहे का? मी त्यांना नकारार्थी उत्तर दिले. तेव्हा ते म्हणाले, अहो, हा तर तुमचाच विषय आहे. आपण क्षेत्राचे व्यवस्था प्रमुख आहात तेव्हा या नवीन कार्यालयाच्या व्यवस्थेकडे कोण लक्ष देणार? नंतर 5 जूनला संभाजीनगर कार्यालयात पश्चिम क्षेत्र व्यवस्था विभागाची बैठक होती. तेव्हा या कार्यालयाच्या व्यवस्थेच्या संदर्भात माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली. आपल्यावर जी जबाबदारी आहे ती पार पाडण्याविषयी किती जागरूक असले पाहिजे याचा संस्कार नकळतपणे माझ्यावर घडून आला.
- लेखक रा.स्व. संघाचे प.क्षेत्र व्यवस्था प्रमुख आहेत.
Powered By Sangraha 9.0