अनौपचारिक शिक्षण देणारे शिक्षक

05 Oct 2025 16:56:29
@वामन देशपांडे 9423246950
 
rss 
मधुभाईंनी बी. एड. म्हणजे शिक्षणशास्त्राचे औपचारिक शिक्षण जरी घेतले असले तरी त्यांचा भर अनौपचारिक शिक्षणावर असायचा. छोट्या छोट्या वाक्यातून हे काम ते सहजपणे करीत असत.
एक दिवस विभाग प्रचारक श्रीरामजी पांडे घरी आले. संघकामासंबंधीच्या काही गप्पा झाल्या. थोड्या वेळाने ते म्हणाले, आपण काही प्रचारकांसाठी पालक रचना करीत आहोत. काही जणांची नांवे काढली आहेत, त्यात तुमचेही नाव आहे. ज्या प्रचारकांसाठी पालक रचना करावयाची होती ते सर्व प्रचारक जवळपास तरुण होते. त्यामुळे त्यांच्यासाठी एखादा ज्येष्ठ कार्यकर्ता पालक असणे समजले. शेवटी ते म्हणाले की, मधुभाईंसाठीही पालक आवश्यक आहे व ते दायित्व तुम्ही घ्यावे. मी थोडा बुचकळ्यात पडलो. तरुण प्रचारकांचे ठीक आहे परंतु मधुभाईच अनेकांचे पालक राहीलेले आहेत त्यांच्यासाठी कोणी पालक असण्याची काय गरज आहे, असे मी सरळ सांगितले... ते म्हणाले, ते तुम्हाला हळूहळू समजेल. एवढे म्हणून ते बाहेर पडले. नंतर मी जसजसा मधुभाईंच्या सहवासात राहात गेलो, तसतसे मला उमगू लागले की, ही व्यवस्था मधुभाईंसाठी नसून माझ्या प्रशिक्षणासाठीच होती.
 
 
मधुभाईंनी बी. एड. म्हणजे शिक्षणशास्त्राचे औपचारिक शिक्षण जरी घेतले असले तरी त्यांचा भर अनौपचारिक शिक्षणावर असायचा. छोट्या छोट्या वाक्यातून हे काम ते सहजपणे करीत असत.
 
 
मागील एक-दीड वर्षापासून मधुभाईंना वारंवार रुग्णालयात भरती व्हावे लागत असे. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांच्या प्रवासावर बंधने आली, मात्र डॉक्टरांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन ते प्रवास करीत असतच. यावर्षी नाशिकला कार्यकर्ता विकास वर्गात त्यांना जावयाचे होते. सोबत मी आणि संतोष कुलये जाणार होतो. आदल्या दिवशी रात्रीच मधुभाईंचा फोन आला, ’बॅग भरली का?’ मी होकार दिल्यावर मधुभाई म्हणाले, ’गणवेश न्यावा लागेल का?’ मी एकदम भानावर आलो, कारण मी ते विसरून होतो, मी लगेच होकार दिला व माझा गणवेश सोबत घेतला. संतोष कुलयेंनाही गणवेशाची मी लगेच आठवण करून देणे आवश्यक होते. मात्र त्याआधीच मधुभाईंनी त्यांनाही आठवण करून दिली होती. वास्तविक मधुभाई सांगू शकले असते की गणवेश सोबत घ्या. परंतु अनौपचारिक संवादातून सहज शिकवणे हे मधुभाईंचे वैशिष्ट्य होते. यांच्यासोबत राहीलेल्या सर्वच प्रबंधकांचे असेच अनौपचारिक प्रशिक्षण झाले आहे.
 

rss 
 
कार्यमग्नता जीवन व्हावे
 
मधुभाई संभाजीनगरात आल्यानंतर त्यांच्याकडेफारसे दायित्व नसले तरी प्रत्येक क्षणाचा ते विचारपूर्वक उपयोग करीत असत. त्यांचे वाचन तर चालूच होते परंतु लिखाणही चालू होते. मोबाईलवर देशभरातल्या कार्यकर्त्यांशी संपर्कही चालू असायचा. शिवाय जवळपास दररोज संभाजीनगरमधील कोणत्यातरी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटण्याचा उपक्रम चालूच होता.
 
 
एकदा एका कार्यकर्त्याकडे जाण्याचे आम्ही निश्चित केले होते. त्या कार्यकर्त्याने ऐनवेळी त्याची अडचण सांगून एक-दोन दिवसांनी येण्याची विनंती केली व मधुभाईंना तसे कळवण्यास सांगितले. हा निरोप मी विसरून गेलो. मधुभाई माझी वाट पाहात होते. शेवटी त्यांचा फोन आला. काय झाले? म्हणून विचारले तेव्हा मी निरोप सांगितला. मधुभाई थोडेसे रागावूनच मला म्हणाले, ’मग लगेच सांगायला हवे होते. मी काय रिकामा वाटलो काय?’ खरेच मधुभाई कधीच रिकामे वाटले नाहीत. ठरवलेली प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे असा त्यांचा या वयातही आग्रह असे
मधुभाईंनी लिहिलेले ’अथातो संघजिज्ञासा’ हे पुस्तक संघ समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे, शिवाय संघशाखाकेंद्रित काही विषयांवर सा. विवेकमध्ये लिहिलेली ‘संघदृष्टी’ लेखमाला तसेच काही बोधकथाही लिहील्या आहेत. हे सर्व लिखाण पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम ते मला दाखवत असत व काही दुरुस्त्या, बदल करावयाचे आहेत काय? असे विचारत.
 

 
 
मधुभाईंच्या लिखाणात काही दुरुस्त्या सुचविण्याची माझी पात्रता नाही हे त्यांना व मला दोघांनाही पक्के ठाऊक होते. मात्र वर म्हटल्याप्रमाणे कार्यकर्त्याचे अनौपचारिक प्रशिक्षण कसे करावे याचा तो वस्तुपाठ असावयाचा.
 
 
संघकार्यालयात 15 ऑगस्टच्या ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी मला बोलायचे होते. थोडी तयारी केली. भाषण झाले. कार्यक्रम संपल्यानंतर मधुभाईंनी त्यांच्या कक्षात बोलावले. गेल्यानंतर त्यांनी सहजपणे अशा कार्यक्रमात कोणते विषय, मुद्दे असावेत, आतापर्यंत देशाने काय साध्य केले याबद्दल सकारात्मक मांडणी कशी करावी यासंबंधी अनेक वक्त्यांची उदाहरणे देऊन थोडक्यात विषयच स्पष्ट केला. खरोखरच मधुभाईंचे अनौपचारिक समजावून सांगणे म्हणजे शिक्षकाचा आदर्श वस्तुपाठ!
 
 
भेटीलागे जीवा
 
कार्यकर्त्यांची भेट, त्यांच्याशी मनमोकळे बोलणे हे सर्वच ज्येष्ठ संघ प्रचारकांचे आवडते व्यसन! मधुमाई तरी त्याला कसे अपवाद राहतील, कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते जीवाचा आटापिटा करीत. एकदा का कार्यकर्त्यांची भेट झाली की त्यांच्या चेहर्‍यावरील आनंदाचे भाव समोरच्यालाही संतुष्ट करीत.
 
 
प्रसंग होता छत्रपती संभाजी राजे साखर कारखान्यात हरिभाऊ बागडे यांच्या पुढाकाराने झालेल्या अनौपचारिक एकत्रीकरणाचा. ज्या काळात 1963 ते 1970 मधुभाई त्यावेळच्या खडकी जिल्ह्याचे (आताचे संभाजीनगर व जालना प्रचारक होते, त्यावेळच्या कार्यकर्त्यांचे अनौपचारिक स्नेहमीलन! जवळपास 125 जण उपस्थित होते. मधुभाईंना भेटून सर्वांनाच आनंद झाला. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. कार्यक्रमानंतर अनेक दिवस मधुभाई त्याच वातावरणात वावरत होते.
 
 
दत्ताजी भाले हे सर्वच कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत! मधुभाई शहर प्रचारक, मधुकरराव जोशी जिल्हा प्रचारक व दत्ताजी भाले विभाग प्रचारक असे एकाच वेळी शहरात कार्यरत होते. दत्ताजींनी सोसलेल्या अपरिमित कष्टांचे मधुभाई साक्षीदार होते. दत्ताजीबद्दल मधुभाईच्या हृदयात विशेष स्थान होते. एके दिवशी मधुभाईंनी माझ्याजवळ विषय काढला की, दत्ताजींच्या सर्व नातेवाईकांचे एकत्रीकरण संघ कार्यालयात करायचे का? सर्वांचे दिवस जुळवून एकदा समर्पण कार्यालयात हा सोहळा पार पडला. मधुभाईंना झालेला आनंद तर अवर्णनीयच! त्याहीपेक्षा दत्ताजींच्या सर्व नातेवाईकांना झालेला आनंद पाहून मधुभाईंनी सर्वांसोबत छायाचित घेतले.
 
 
दत्ताजी भाले रक्तपेढी सर्वत्र रक्तदान शिबीरे घेत असते. अशा शिबीर संयोजक व काही प्रमुख कार्यकर्त्यांचे वर्षातून एकदा सहभोजन असते. एका वर्षी हा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाचा दिवस व वेळही निश्चित झाली. मधुभाईंना व आम्हा कार्यकर्त्यांना त्याची कल्पनाही नव्हती, मधुभाईंना कुठून कसे कळले ते माहीत नाही. मधुमाईंनी मला फोन केला व कार्यक्रमाचा तपशील विचाराला. मी म्हणालो की, मलाही माहीत नाही. आपल्याला निरोप नाही तर कशाला जायचे? शिवाय वाहनही उपलब्ध नाही. मात्र कार्यकर्त्यांच्या भेटीची आस मधुभाईंना लागली होती. त्यांनी अर्ध्या तासात सर्व जुळवाजुळव केली व ते कार्यक्रमाला गेलेच. कार्यकर्त्यांची भेट, त्याच्याशी हितगुज, त्याच्या सुखदुःखाची विचारणा करणे यातच त्यांचे सुख, आनंद सामावला होता.
 
 
प्रल्हाद भवन, समर्पण या दोन्ही वास्तूंमधे त्यांचा निवास राहीला. या सर्व काळात अनेक तरुण प्रबंधकांना त्यांच्यासोबत राहता आले. या सर्व प्रबंधकांच्या घरी मधुभाई गेले होते. त्यांच्यासोबत फोटोही काढू देत असत. कृष्णा खिवरे हा कार्यालयाच्या स्वच्छता विभागात काम करतो
 
 
एक दिवस मधुभाईच्या लक्षात आले की, बाकीच्या सर्व प्रबंधकांसोबत आपण फोटो काढले आहेत. मग त्यांनी कृष्णाला आपल्या खोलीत बोलवून त्याच्यासोबत आपला फोटो काढला. मधुभाई प्रवासात असो की त्यांच्या कक्षात असो. नवीन कार्यकर्त्याशी प्रबंधकांचा स्वतःच परिचय करून देत असत. स्वाभाविकच प्रबंधक संकोचून जात. पण त्यातूनही प्रबंधकांना ऊर्जा मिळत असे.
 
 
एकदा मी नेहमीप्रमाणे मधुभाईंसोबत चहा घेत होतो. मधुभाईंनी अचानक देहदानाचा विषय काढला. काळजात चर्र झाले. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, माझ्या बहिणीने व अन्य नातेवाईकांनी देहदान केले आहे. त्यामुळे आपणही करावे असे वाटते. नंतर डॉ. दिवाकर कुलकर्णी, अ‍ॅड. जयंत वासडीकर, डॉ. सतीश कुलकर्णी या सर्वांची बैठक घेऊन देहदानाच्या कागदपत्रांची पूर्वता लवकर करण्याचा आग्रह धरला. मात्र डॉ. हेडगेवार रुग्णालयाशी संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाला देह स्वीकारण्याची परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रीया पूर्ण झाली. महाविद्यालयास मिळालेला हा पहिला मृतदेह पुण्यात्म्याचाच आहे अशी भावना महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी व्यक्त केली. ती सार्थच आहे.
 
 
शेवटच्या काही दिवसांत दररोज मधुभाईंजवळ राहात असे. एके दिवशी त्यांनी बोलावणे पाठवले. लवकर या म्हणून निरोप आल्याबरोबर आय.सी.यू.मधे गेले. त्यांच्यासोबत चहा घेतला. त्यांनी खोलीतील सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले. नंतर म्हणाले, बहुतेक आता कार्यालयात जाण्याची वेळ येईल असे वाटत नाही. क्षणभर थांबून त्यांच्या कपाट, पेटीतील कागदपत्रे व हिशोबाच्या रकमेबाबत सूचना देऊ लगले. मी स्तब्धच होतो. शेवटी धीर धरून त्यांना म्हटले, मधुभाई सर्व व्यवस्थित होईल. काहीच काळजी करू नका. मात्र तोपर्यंत त्यांना कळून चुकले होते.
 
 
सरसंघचालक डॉ. मोहनजी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याशी बराच वेळ बोलत होते. अशीच निरवानिरवीची भावना तेव्हाही त्यांनी व्यक्त केली होती.
 
 
मधुभाईजवळ संघ अनुभवाचा प्रचंड साठा होता. नवीन कार्यकर्त्यांसाठी तो ठेवा उपलब्ध व्हावा व त्यातून कार्यकर्त्यांना प्रकाशवाटा मिळाव्यात यासाठी त्यांची एखादी प्रदीर्घ मुलाखत घ्यावी, काही ध्वनिमुद्रित करून ठेवावेत, ही भरतजी देशपांडे यांनी सूचना अंमलात आणू शकलो नाही व त्यामुळे या पाथेयापासून वंचित राहिलो ही एक खंत कायम मनात राहील.
 
लेखक आर्यचाणक्य विद्याधाम, जटवाडा,
छ. संभाजीनगरचे कार्यवाह आहेत.
Powered By Sangraha 9.0