19 डिसेंबर 1961 च्या रात्री 8.30 वाजता गोव्याच्या गव्हर्नरने शरणागती करारावर सही केली. 451 वर्षानंतर गोमंतक भूमीवर स्वातंत्र्याची पहाट उगवली. खुद्द गोव्यात आणि देशभरातच प्रचंड जल्लोष झाला. पण विजयाच्या या हर्षोल्हासात काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले.
सन 1510 साली पोर्तुगीजांनी गोवे जिंकले होते, ते 1961 साली स्वतंत्र झाले. या 451 वर्षांमध्ये गोव्याने फार अत्याचार सहन केले. तुर्क, अफगाण, मुघल हे सगळे आक्रमक अत्यंत क्रूर होतेच. त्यांनी शतकानुशतके देशभरात अत्याचारांचे थैमान घातले. पण पोर्तुगीज मुसलमानांपेक्षाही जास्त क्रूर होते. यमदूतांनीही लाजवेल अशा यातना देऊन माणसांना ठार मारणे यांना फार आवडत असे.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात, इंग्रज पोलिसांनी अनेकदा, अनेक ठिकाणी बेछूट लाठीमार करून आंदोलकांची डोकी फोडलेली आहेत. पण गोवा स्वातंत्र्य आंदोलनांत पोर्तुगीज पोलिसांनी आंदोलकांवर वेळोवेळी जो लाठीमार आणि गोळीबार केला तो केवळ अमानुष होता.
1947-48चे भारत-पाक युद्ध, 1948च्याच हैद्राबाद आणि जुनागडवरच्या पोलीस कारवाया हे सर्व प्रसंग स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लगोलगच घडत गेले. 1954पर्यंत फ्रेंचांनीही पाँडिचरी आणि इतर छोटी ठिकाणे सोडून स्वदेशी प्रयाण केले. पण पोर्तुगीज काही हटेनात. म्हणजे आता संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाला, पण पोर्तुगीजांच्या अंमलाखालची गोवा, दमण, दीव, अंजदीव आणि दादरा-नगरहवेली इथली जनता अजूनही गुलाम आहे, हे जनतेला सहन होईना. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रेरित ’आझाद गोमंतक दलाने’ सशस्त्र छापा घालून 1954 साली दादरा-नगरहवेली मुक्त केली. आता उरला गोवा, दमण-दीव आणि अंजदीव, हा सगळा मुलुख मुक्त करण्यासाठी सैनिकी शक्तीच लागणार होती.
पोर्तुगीज सरकार फ्रांसप्रमाणे गोव्यातून माघार घ्यायला तयार नव्हते, उर्मटपणे उत्तरे देत होते, हेही जनता समजू शकत होती. पण जनतेला हे समजत नव्हते की, जर सत्याग्रहाला पोर्तुगीज दाद देत नाहीत, तर सरदार पटेलांप्रमाणे गोव्यावर पोलीस कारवाई करायला पंडित नेहरू का कचरतात?
आणि इकडे पंडित नेहरू अहिंसा, प्रेम, जागतिक शांतता, सद्भाव यांच्या कृत्रिम हस्तिदंती मनोर्यात बसलेले होते. शस्त्रबळ न वापरता राजकीय वाटाघाटींनी गोव्याची समस्या सोडवू म्हणत होते. 1947 ते 1960 अशी तब्बल 13 वर्षे निघून गेली. मग त्यांचाही संयम (एकदाचा) संपला. त्यांनी लष्करी कारवाईला परवानगी दिली.
आतापर्यंत स्वतंत्र भारताच्या सैन्याने काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या आणि हैद्राबादमध्ये निजामाच्या सैन्याशी समोरासमोर दोन हात केले होते. परंतु पाकिस्तानी सेना काय किंवा हैद्राबादी सेना काय, त्यांचे बलाबल भारतीय सेनापतींना चांगलेच ठाऊक होते. दुसर्या महायुद्ध काळात ते सगळे इंग्रजांच्या हाताखाली एकत्र लढले होते. आता पोर्तुगीज ही युरोपीय सेना होती, म्हणले भारतीय सेनापती पोर्तुगीजांना घाबरत होते, असे नव्हे. अत्यंत कजाखी अशा जर्मन सैन्याला सुद्धा ज्यांनी अनेकदा मात दिली, तेे भारतीय सेनापती पोर्तुगीजांना कशाला घाबरतील? पण तरी ते सावध किंवा जरा जादाच सावध होते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अवघ्या तीन दिवसांत - खरे म्हणजे दोनच दिवसांत, पोर्तुगीजांनी गुडघे टेकल्यामुळे जनतेत आणि सैन्यातही जरा जास्तच जल्लोष झाला. भारतीय सैन्याने मुसलमानी सैन्याचा नव्हे, तर आधुनिक, युरोपीय, गोर्या सैन्याचा बिमोड केला होता ना! त्याचा आनंद मोठा होता.
महत्त्वाचे घडे
जनतेचे एक वेळ ठीक आहे. विजयाच्या जल्लोषात काही महत्त्वाचे धड़े जनता विसरून जाते, हे एकवेळ क्षम्य म्हणता येईल. पण सेनापतींनी तसे करून चालत नाही. मेजर जनरल डी. के. पलित हे स्वत: अनेक युद्धे लढलेले सेनापती होते. निवृत्तीनंतर त्यांनी अनेक उत्तम पुस्तकेही लिहिलेली आहेत. गोव्याच्या मोहीमेबद्दल त्यांनी भारतीय सेनापतीवर म्हणजे मुख्यतः मोहीमप्रमुख जनरल चौधरी यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेचा मुख्य आशय असा की, एखादी रस्त्यावरची पेटलेली शेकोटी विझवायला आगीचा बंब बोलावण्याची गरज नसते. नीट पद्धतीने नुसता पाण्याच्या चुळा टाकून सुद्धा शेकोटी विझवता येते. भारतीय सेनापतींनी अति सावधतेने उगीचच मोठे सैन्य जमवले.
असे का घडले? तर सैनिकी गुप्तहेर खाते आणि नागरी गुप्तहेर खाते यांचे नीट समन्वयन झाले नाही. पोर्तुगाल म्हणजे काही ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी नव्हे. पहिल्या महायुद्धात पोर्तुगाल थोडासा सहभागी होता, पण दुसर्या महायुद्धात तर तो पूर्ण तटस्थ राष्ट्र होता. म्हणजेच या सैन्याला आधुनिक युद्धाचा अनुभव नव्हता. उलट भारतीय सैनिक चांगलेच अनुभवी होते. अशा स्थितीत, गोव्यातील पोर्तुगीज सैन्याची एकूण संख्या, शस्त्रसामग्री आणि मानसिक धैर्य कितपत दर्जेदार आहे, याची पक्की खबर भारतीय सेनापतींनी सैनिकी आणि नागरी हेर खात्यांमार्फत मिळवून त्यानुसार अचूक योजना आखायला हवी होती. पण भारतीय सेनापतींनी अफवांवर विश्वास ठेवला. काय होत्या या अफवा? तर म्हणे, गोव्याच्या दाबोली विमानतळावर पोर्तुगालची आधुनिक फायटर जेट विमाने उभी आहेत, पोर्तुगीज भूदलाकडे अत्याधुनिक तोफा, बंदुका, रणगाडे आहेत, पोर्तुगीजांना अन्य युरोपीय राष्ट्रे आणि पाकिस्तान युद्धा मोठी मदत पाठवणार आहेत, इत्यादि.
जनरल पलित म्हणतात, एका बाजूला या अफवांवर विश्वास ठेवून सेनापतींनी नको तितकी तयारी केली आणि दुसर्या बाजूला प्रत्यक्ष लढाईत जी काळजी घ्यायला हवी, ती घेतली नाही. उदा., अंजदीव बेटावर नौदलाची मरीन तुकडी भेट उतरवली. परिणामी पोर्तुगीजांच्या पहिल्याच प्रतिहल्यात दोन अधिकारी आणि पाच नौसैनिक ठार झाले तर सतरा लोक घायाळ झाले. हे अनावश्यक होते. अगदी हाच प्रकार दीव बेटावर झाला, राजपूत रेजिमेंट आणि मद्रास रेजिमेंटच्या हल्ल्यांना बेटावरच्या पोर्तुगीज तोफांनी कडवा प्रतिकार केला. मग नौदलाच्या तोफांनी आणि वायुदलाच्या विमानांनी बेट भाजून काढल्यावर तो प्रतिकार थंडावला, मग हे आधीच का केले नाही? म्हणजे आपली हानी अजिबातच टळली असती.
कर्नल ब्रायन मॅककुली हा ऑस्ट्रेलियन सेनानी काही काळ युनो लष्करी निरीक्षक होता. 1999 साली म्हणजे गोवामुक्तीनंतर चाळीसेक वर्षांनी लिहिलेल्या आपल्या पुस्तकात तो मत नोंदवतो की, गोवा मोहीम ही भारताच्या तीनही दलांनी उत्तमरीत्या आखली आणि उत्तमरीत्या पार पाडली. पण तिच्यात ज्या गंभीर त्रुटी राहिल्या, त्याकडे नंतरच्या विजयाच्या जल्लोषात दुर्लक्ष झाले. भारतीय सैनिकांना 1950 च्या कोरियन युद्धातील शांतिसेना म्हणून बजावलेल्या कामगिरीनंतर दशकभराने प्रत्यक्ष युद्धाचा मौल्यवान अनुभव मिळाला, ही गोष्ट खरीच. पण पोर्तुगीज कसलेल्या भारतीय सैन्यासमोर अक्षरश: चिल्लर होते. ती समसमान लढाई नव्हतीच, हे भारतीय सेनापतींनी लक्षात घ्यायला हवे होते. म्हणजे आणखी दहाच महिन्यांनंतर चिनी सैन्याने त्यांची जी हालत करून सोडली, तशी ती झाली नसती.
कर्नल मॅककुलीच्या म्हणण्याचा अर्धा भाग थोडा खरा आहे. त्वरित सुधारणे आवश्यक होते. ते झाले नाही. कर्नलच्या म्हणण्याचा थोडा दुसरा अर्धा भाग मात्र विपर्यस्त आहे. चिनी सैन्याच्या हालचाली, ते बांधत असलेले रस्ते, यांची शस्त्रास्त्रे, त्यांचे आक्रमक इरादे या सर्वांसंबंधी सेनापती वारंवार पंतप्रधानांना तळमळीने इशारे देत होते. पण ’हिंदी-चिनी भाई भाई’ या भ्रामक घोषणेत गुंग झालेल्या पंतप्रधानांनी सैन्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. हिमालयात 17 हजार फूट उंचीवर सरहद्दीचे संरक्षण करणार्या भारतीय सैनिकांना गरम कपडे आणि चांगले बूट पुरवण्याऐवजी साधे सुती कपडे पाठवण्यात आले. रायफलची नळी एका कॅलिबरची, तर तिच्यासाठी लागणार्या गोळ्या भलत्याच कॅलिबरच्या पुरवण्यात आल्या. म्हणजेच ही चूक सेनापतींची नव्हे, तर राजकीय नेतृत्वाची होती.
एवढेच कशाला? चीनने ऑक्टोबर 1962 ला जिथे आक्रमण केले होते, त्या युद्ध आघाडीचा म्हणजे ईस्टर्न कमांडचा प्रमुख सेनापती स्वतःच विमानातून दिल्लीला पळून गेला. का? तर म्हणाला, माझे पोट बिघडले आहे. इतर कोणता देश असता, तर अशा पळपुट्या सेनापतीवर कोर्टमार्शल होऊन कडक शिक्षा झाली असती. या सेनापतीवर कसलीही कारवाई झाली नाही. पुढे त्याने पुस्तक सुद्धा लिहिले. कारण तो पंतप्रधानांचा नातेवाईक होता.
असो. प्रस्तुत समरांगण कथासागर लेखमालेत आपण स्वतंत्र भारताच्या सैनिकी विषयांच्या कथा पाहाणार आहोत. तेव्हा गोव्यानंतर मधली 1962ची पराभव गाथा सोडून देऊन आता आपण 1965 कडे जाणार आहोत.