मलई नाडूमधील दिव्य देसम्

07 Oct 2025 11:56:58

Divya Desam
गेले काही लेख आपण वदनाडूतील दिव्य देसम् मंदिरांबद्दल जाणून घेतले. या शेवटच्या लेखात आपण केरळमधील मंदिरांची माहिती घेणार आहोत.
केरळमधील मंदिरे मलईनाडूत किंवा चेरनाडूत येतात. प्राचीन काळी या भागात चेर साम्राज्याची सत्ता होती. तर मलई म्हणजे डोंगर किंवा टेकडी. केरळचा पश्चिमेकडील भाग सोडला तर उर्वरित केरळ पश्चिम घाटाच्या सान्निध्यात येते. भारताचा दक्षिणेकडील भूभाग केरळ आणि तामिळनाडूकडे निमुळता होत जातो. पश्चिम आणि पूर्व घाटांचा तिथेच संगम आहे. त्यामुळे बेलाग डोंगरकडे आणि त्याला बिलगून असलेलं घनदाट जंगल या भागात असल्याने केरळचे मलईनाडू नाव अगदी सार्थ ठरते.
 
 
या भागात एकूण तेरा मंदिरे आहेत. पैकी अकरा मंदिरे केरळमधे आहेत तर दोन तामिळनाडूत आहेत. केरळातील सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे थिरूअनंतपुरम येथील श्रीपद्मनाभस्वामी. तर त्रिचूर आणि कोचीच्या जवळ चार आणि चेंगन्नुर जवळ सहा मंदिरे आहेत. उरलेली दोन मंदिरे केरळ व तामिळनाडूच्या सांध्यावर आहेत. या भागात विष्णूला पेरूमाळ न म्हणता महाविष्णू असं संबोधित करतात. केरळातील मंदिरे अत्यंत साधी पण भव्य, सुंदर आणि शांत असतात. हे आपल्या पश्चिम किनारपट्टीचेच वैशिष्ट्य आहे. कर्नाटक-केरळमध्ये असंख्य दिव्यांनी मंदिर सजलेले असते. तेलाच्या दिव्यांसाठी मोठ्या लोखंडी ओळीच्या ओळी असतात. मंदिरांवर लामणदिवे लावले असतात. मंदिर परिसरही अतिशय देखणा आणि स्वच्छ आहेत. मंदिरेही फार उंचीची नाहीत तर बसकीच. तसेच मोठ्या मंदिर परिसरात छोटी छोटी देवळे असतात. तिथे जायला छान फरशीची वाट असते. फार आवडले मला तिथे.
 
 
मूलावरम विग्रहही अगदी लहान. आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो त्यावेळी प्रत्येक मंदिरातील विग्रहाला चंदन लावले होते. मंदिराच्या प्रदक्षिणा भागात दक्षिणामूर्ती (ज्ञानाची देवता) असतेच. तसेच पूर्ण केरळात जेवढ्या अयप्पाच्या मूर्ती मी पाहिल्या तेवढ्या कुठे पाहिल्या नाहीत. इथे अय्यप्पा ’सस्थाळू’ नावाने ओळखले जातात. शबरीमलाच्या सान्निध्यामुळे मुख्य दैवत अय्यप्पा आहे केरळात. या भागाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरे अगदी पहाटे दर्शनासाठी खुली होतात पण सकाळी साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत बंद होतात, ती संध्याकाळी सहा ते आठपर्यंत खुली असतात. या कारणाने तिथे मंदिरे बघायची असतील तर खूप घाई होते. इथे नमूद करण्याजोगी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केरळात स्वतंत्र थायरचे विग्रह नाहीत. ही हरीप्रिया, हरीच्या हृदयात वास करून असल्याचे प्रतिक म्हणून महाविष्णूच्या छातीवर लक्ष्मीमातेचे पदक असते.
 
Divya Desam  
 
संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभ. हे दर्शन तीन भागांत होते. पहिल्या भागात महाविष्णूचे मस्तक, मधील भागात महाविष्णूच्या नाभीतून उगवलेल्या पद्मावर विराजलेले ब्रह्मदेव व शेवटच्या भागात महाविष्णूचे चरणकमळ. इथे सुंदर माधवाची मूर्तीही विराजमान आहे. खरोखरचा खजिना लपवलेले हे मंदिर अतिशय गूढ आहे. कासरगोडला आद्यपद्मनाभमंदिर आहे. बाबिया नामक शाकाहारी मगरीसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. मात्र केरळाचे सर्वात विख्यात मंदिर आहे, ते म्हणजे कृष्णाचे ’गुरुवायूर’ मंदिर तसेच वायनाडच्या घनदाट अरण्यातील ’तिरूनल्ली’ मंदिर व आजुबाजूचा परिसर अतिशय मनोहारी. वर्कला येथील जनार्दन मंदिर आणि आदि शंकराचार्यांच्या जन्मगावचे, कालडी येथील कृष्ण मंदिर नावाजण्यासारखे आहे.
 
 
केरळमध्ये फिरताना एका गोष्टीची मला अतिशय गंमत वाटली. इथे महाभारतातील पाच भावंडांची व रामायणातील चार भावंडांची मंदिरे आहेत. रामायणाशी निगडित असलेल्या मंदिरांना ‘नलांबरम’ म्हणतात. याचा अर्थ होतो चार मंदिरांचा समूह. ही मंदिरे त्रिचूर-कोचीच्या आसपास आहेत व यांतील लक्ष्मणाचे मंदिर दिव्य देसम आहे. तर महाभारताशी निगडित मंदिरे कोट्टयममध्ये आहेत. विशेष म्हणजे महाभारताशी निगडित असलेली सर्व मंदिरे ही दिव्य देसम आहेत.
 
 
त्रिचूर- कोचीच्या जवळची मंदिरे आहेत- थिरूनावाय मुगंधा पेरूमाळ, श्री उथ्यवंथा पेरूमाळ, श्रीमुळ्ळिक्कळथान पेरूमाळ मंदिर (लक्ष्मण मंदिर) तर श्रीकाटकरै अप्पा पेरूमाळ कोविल हे वामन मंदिर आहे. या मंदिरात ओणम या केरळच्या महत्त्वाच्या सुगी सणाची सुरुवात झाली अशी मान्यता आहे. आता आम्हांला कोट्टयमला जायचे होते. इथे एकूण सहा दिव्य देसम आहेत. अशी एकमेकांपासून वीस-पंचवीस किमीच्या परिसरात सहा दिव्य देसम असणे हे फार सोयीस्कर होते. या सहापैकी पाच मंदिरे पांडवांनी बांधली आहेत अशी आख्यायिका आहे. मंदिरे बर्‍यापैकी जवळ असली तरीही एक मोठाच प्रॉब्लेम समोर आला.
 
 
माझ्याकडे असलेली नावे गुगलच्या नेव्हीगेटरवर नव्हती. याचे कारण ही नावे मागील गेली कित्येक शतके वापरात होती, परंतु काळाच्या ओघात आता ती नावे बदलली होती. असे काही झेंगट माझ्यासमोर येईल असा मी विचारही केला नव्हता. भाषा समजत नसलेल्या ठिकाणी मी काय करू असा मला प्रश्न पडला. याचे कारण हे झाले की, माझ्याकडे असलेली नावे ही हजारो वर्षांपूर्वीची जुनी होती. मात्र त्या मंदिरांना आता वेगळ्या नावाने ओळखतात. त्या चार मंदिरांसाठी इंटरनेट धुंडाळून काढले. कितीतरी जुने संदर्भ पाहिले आणि शेवटी या सहा मंदिरांची यादी माझ्या हाती आली. आता आपल्याला सगळ्या मंदिरांचे दर्शन होणार याचा मला खूप आनंद झाला.
 
Divya Desam  
 
अशीच कसरत मला तिरुनेलवेलीला ’नवतिरूपती’ची मंदिर शोधायला करावी लागली. जास्त कोणाची मदत न मिळता त्या परक्या राज्यात, परक्या भाषेत जेव्हा या गोष्टी मी शोधून काढल्या त्यावेळी मला खरंच जग जिंकल्याचा फील आला. असं वाटलं की मला रहस्यमय खजिन्याचाच शोध लागलाय.
 
 
या मंदिरांची पौराणिक कथा अशी सांगितली जाते की हस्तिनापूरचे राज्य परीक्षिताकडे सोपवून पांडव प्रांतोप्रांती विहार करू लागले. युद्धाच्या वेळी आपल्याकडून बरीच पापे घडली यांबद्दल त्यांच्या मनात रुखरुख लागली होती. फिरता फिरता ते केरळात पंबा नदीकिनारी आले. इथे प्रत्येक पांडवाने श्रीकृष्णाचा एकेक विग्रह स्थापन केला अशी आख्यायिका या मंदिरांबद्दल सांगितली जाते. ही मंदिरे पुढीलप्रमाणे आहेत.
 
 
* श्री इमायावरप्पन पेरूमाळ मंदिर - या मंदिराचा विग्रह धर्मराजाने स्थापन केला आहे.
 
* श्री मायापिरान पेरूमाळ मंदिर - हा विग्रह भीमाने स्थापन केला आहे.
 
* श्री पार्थसारथी मंदिर - या पंचमंदिरांतील हे महत्त्वाचे मंदिर. हा विग्रह अर्जुनाने स्थापला आहे. अलेप्पीला, ओणमच्या निमित्ताने होणारी ‘स्नेक बोट राईड’ हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सबरीमलाच्या यात्रेसाठी जे अय्यप्पाचे दागिने मिरवणुकीतून आणले जातात त्या सोहळ्याचा हे मंदिर एक थांबा आहे. गुरुवायूरसारखीच ह्या मंदिरात सतत लग्न चालू असतात. या मंदिरात पार्थ म्हणजे अर्जुनाच्या सारथीरूपात कृष्ण आहे. याच पार्थसारथी नामक कृष्णाचे मंदिर चेन्नईला, मरीना बीचजवळ आहे. हा पार्थसारथी सुद्धा दिव्य देसम मधील एक आहे.
 
* श्री पांबनयैपम्म पेरुमाळ मंदिर - हा विग्रह नकुलाने स्थापन केला आहे.
 
* श्री अथपुधा पेरुमाळ मंदिर - हा विग्रह सहदेवाने स्थापला आहे.
 
अधिक माहिती सांगायची म्हणजे, या चार मंदिरांशिवाय अजून एक श्री वल्लभ मंदिर आहे इथे, ते ‘दिव्य देसम’ आहे परंतु महाभारताशी निगडित मंदिर नाही. मात्र केरळातील अतिशय प्राचीन मंदिरांत या मंदिराचा समावेश होतो. बारा आळ्वारांपैकी ‘नम्मळवार’ या महत्त्वाच्या आळवरांनी ह्या मंदिराच्या महाविष्णूची स्तुती सातव्या शतकात केली आहे. ह्या सहाही मंदिरांचा फेरा जवळजवळ 95 किमीचा आहे.
 
 
चेंगनूरनंतर, श्रीपद्मनाभस्वामींचे दर्शन घेऊन आम्ही तामिळनाडूला प्रवेश केला. इथले अद्वितीय मंदिर माझे अतिशय आवडते आहे. थिरूवत्तारु येथील आदिकेशव. इथला रंगा पेरूमाळचा विग्रह पूर्ण दिव्य देसम्च्या विग्रहांमधील सर्वात मोठा आहे. त्याचे दर्शन घेताना मनात जे भाव उत्पन्न होतात ते सांगणे कठीण. इथले अप्रतिम आणि उच्च कोरीवकामाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. मलईनाडूचे शेवटचे मंदिर आहे, नागरकोईल येथील श्रीकुरलप्पा पेरूमाळ कोविल. या भागात पश्चिम घाटातील डोंगरांचे आकार वैविध्यपूर्ण आहेत.
 
 
तामिळनाडूच्या मंदिरांवर तर अध्याय लिहून होईल परंतु सगळ्यांच मंदिरांचा परामर्श घेणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. आजचा हा लेख माझ्या ‘दिव्य देसम्‘ लेखमालेतील शेवटचा लेख आहे. माझ्या लेखनाला आलेल्या प्रतिसादाबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. असाच लोभ ठेवावा!!
 
 
माझ्या लिखाणाची सेवा मी पेरूमाळ आणि थायरच्या चरणी अर्पण करतेय. ही ‘दिव्य देसम्’ नामक अत्यंत देखण्या, सुकुमार सुमनाच्या पाकळ्या माझ्यासमोर उलगडत गेल्या यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.
 
समाप्त.
Powered By Sangraha 9.0