चेहरा सुशिक्षित, मानसिकता जिहादीच

13 Nov 2025 15:35:31
दहशतवादी उच्चशिक्षित आणि व्यावसायिक कौशल्य व हुशारीने युक्त असेल तर तो मोठमोठी दहशतवादी कृत्ये लीलया घडवून आणू शकतो हे या दहशतवाद्यांच्या आकांनीही ओळखले आहे व त्यामुळे सध्या दहशतवादाचा 'मारीच' पांढरपेशा रूपाने बोकाळला आहे. देशाला लागलेली ही ’सफेद’ वाळवी असून तिचा सफाया करणे अवश्यमेव झाले आहे.

musalim
 
राजधानी दिल्ली येथे 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या भीषण बाँबस्फोटाने संपूर्ण भारतीय जनमानस हादरले आहे. हा काही साधासुधा घातपाताचा प्रकार नसून थेट दहशतवादी हल्ला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे आधुनिक दहशतवादाचा अत्यंत भयावह पैलू जगासमोर आला आहे. असे दहशतवादी हल्ले विविध सरकारांच्या काळात जेव्हा भारतामध्ये झाले आहेत तेव्हा असे प्रकार का घडतात यावर बर्‍याचप्रकारे चर्वितचर्वण झालेले आहे. या चर्वितचर्वणातून अशा प्रकारच्या दहशतवादी घटनांना आळा घालण्याचा उपाय हाती लागण्यापेक्षा या समस्येचीच नुसती चिकित्सा झालेली आहे. या चिकित्सेचा मोठा दोष म्हणजे काहीतरी अंतस्थ हेतू मनात धरून व त्याला वैचारिक बैठक देऊन ही चिकित्सा विचारवंत आणि बुद्धिमंत मंडळींनी केली आहे. त्यामुळे आपोआपच ती उपाय शोधण्याच्या हेतूपासून दूर गेलेली आहे. मात्र दिल्ली येथील दहशतवादी हल्ल्यात सामील दहशतवाद्यांनी आपल्या घृणित कृत्यामुळे यापूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या बर्‍याचशा गृहितकांना केराची टोपली दाखवलेली आहे. अशा घटना घडल्यावर काही लोक उच्चरवाने सांगत होते की, दहशतवादाला धर्म नसतो. शिक्षणाचा आणि रोजगाराचा अभाव व हलाखीच्या गरीब परिस्थितीमुळे अनेक युवक दहशतवादाकडे ओढले जातात व दहशतवाद्यांच्या जाळ्यात सापडतात. एक प्रकारे दहशतवाद्यांना भरकटलेले व दिशाहीन व्यक्तिमत्त्वे ठरवून त्यांच्याबाबत सहानुभूती निर्माण करण्याचाच व त्याबरोबर हळवा कोपरा तयार करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न होत आला आहे आणि अजूनही या प्रकाराला चाप बसलेला नाही. ही मंडळी एक प्रकारे वैचारिक दहशतवाद तयार करून निरपराध नागरिकांच्या जिविताशी खेळ करीत आहेत व राजसत्ता राबविणार्‍या शासनकर्त्यांच्या मार्गात विविध अडथळे निर्माण करीत आहेत. विशिष्ट धर्माचीच मंडळी जगभरातील दहशतवादी कारवायांत गुंतलेली आहेत हे सूर्यप्रकाशाइतके ढळढळीत सत्य दिसूनही हे लोक आपली आवडती गृहितके कुरवाळत राहतात व ब्रेनवॉशमुळे दहशतवादी तयार होतात आणि बुद्धिमंतांचे ब्रेनवॉश धोकादायक असते असे सांगून मग धर्म कोणताही असो हेच लोकांच्या मनावर बिंबविण्याचा अजूनही प्रयत्न करीतच राहतात. खरे पाहायला गेले तर असा काही ब्रेनवॉश केला जात नसून अगदी बालपणापासून या जिहादी कारवायांना पोषक मानसिकता तयार केली जाते व जोपासली जाते हे लक्षात घेण्याची गरज आहे. अशा प्रकारांतून जे दहशतवादी तयार होतात आणि मग घातपाती कृत्यानंतर पकडले जातात तेव्हा ज्या समाजात ते वावरले, ज्या संस्था आणि संघटनांशी त्यांचा संबंध होता ते सर्व आपला पदर झटकून संशयिताच्या यादीपासून अलिप्त राहताना दिसतात. अगदी या दहशतवाद्यांचे परिवारही आपल्या कानावर हात ठेवून या जबाबदारीतून मोकळे होतात. वास्तविक पकडीत आणि प्रकाशात आलेल्या दहशतवाद्यांपेक्षा हे पडद्याआड राहून त्यांना सर्व प्रकारचे पाठबळ पुरविणारे अघोषित दहशतवादी खरे जास्त घातक मानले पाहिजेत. पण हे छुपे दहशतवादी कधी समोर येतच नाहीत. यामुळेच हा धोका मुळापासून संपत नाही.
 
 
आता अटकेत आलेले सर्व दहशतवादी उच्चशिक्षित आणि सन्माननीय रोजगाराची संधी लाभलेले व प्रतिष्ठित व्यवसायातील आहेत. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशिक्षित व अकुशल दहशतवादी एखादे घातक मोठे दहशतवादी कृत्य घडवून आणू शकत नाही. त्या कामाचे नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापन आणि थेट अंमलबजावणी या गोष्टींवर आपोआपच मर्यादा येत असतात. पण हाच दहशतवादी उच्चशिक्षित आणि व्यावसायिक कौशल्य व हुशारीने युक्त असेल तर तो मोठमोठी दहशतवादी कृत्ये लीलया घडवून आणू शकतो हे या दहशतवाद्यांच्या आकांनीही ओळखले आहे व त्यामुळे सध्या दहशतवादाचा ’मारीच’ पांढरपेशा रूपाने बोकाळला आहे. देशाला लागलेली ही ’सफेद’ वाळवी असून तिचा सफाया करणे अवश्यमेव झाले आहे.
 
 
दुसर्‍या प्रकारचे विचारवंत बहुसंख्याक व अल्पसंख्याक अशा विभागणीतून या दहशतवादाची चिकित्सा करताना दिसतात. ही प्रामाणिक चिकित्सा नसून दहशतवादी कृत्यावर पांघरूण घालण्याचाच प्रकार आहे. अशा प्रकारे अन्याय-अत्याचाराची प्रतिक्रिया दहशतवादाच्या रूपाने प्रत्यक्षात येत असेल तर मग सिरिया व पाकिस्तान येथे जी दहशतवादी कृत्ये घडत आहेत ती कोणत्या भूमिकेतून याचे उत्तर सापडत नाही. मुळात अशी सर्व चिकित्सा मुख्य प्रश्नापासून पळ काढण्यासाठी केली जाते. एका विशिष्ट जिहादी मानसिकतेतून असे अतिरेकी तयार करण्याची कार्यपद्धती जगभरात राबविली जात असून समाजाच्या वेगवेगळ्या थरांतील मंडळींचा भरणा वेगवेगळ्या प्रकारचा प्रोपोगंडा राबवून सतत दहशतवादी संघटनांमध्ये केला जात आहे. त्यांचे व्यवस्थित प्रशिक्षण घेतले जात असून घातपाती घटना घडविण्यासाठी आधुनिक तंत्र आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांना प्रेरित केले जात आहे. उच्च शिक्षणाने दहशतवादाचा प्रश्न सुटण्यापेक्षा अधिक गंभीर झाला आहे. संपूर्ण मानवतेच्या विरोधात असलेले व त्या दृष्टीने विशिष्ट समाजघटकांचा विद्वेष आणि विनाश घडवून आणण्यास मजहबी मूल्यांचा व मजहबी शिकवणुकीचा साधन म्हणून उपयोग केला जात आहे. या सैतानी कृत्यांना उदात्ततेचा मुलामा देऊन असे आत्मघाती जिहादी पैदा केले जात आहेत. त्यांचे या भौतिक जगतात व इहलोकांत उत्तम आयुष्य घालविण्यात काहीच स्वारस्य उरलेले नसून मरणोत्तर परलोकातील सुखसमृद्धीपूर्ण जीवनाचे टोकाचे आकर्षण वाढवून ती दिवास्वप्ने त्यांच्या भावविश्वावर पगडा मिळविल अशा पद्धतीने मदरसा आणि मशिदी यांतून उपदेशाच्या रूपाने ठसविली जात आहेत. प्रसंगी या पारलौकिक प्राप्तीसाठी आपला आत्मघात करण्यासही हे दहशतवादी सज्ज होत आहेत. हा कार्यकारणभाव लक्षात घेऊन अशी मानसिकता घडविणारे कारखाने बंद झाल्याशिवाय ही दहशतवाद्यांची पैदास थांबणार नाही. जसा हा रोग जालिम तसाच त्याचा उपायही जालिम योजल्यावाचून ही सफेद वाळवी संपणार नाही.
Powered By Sangraha 9.0