डेमोक्रॅटिक विजय आणि रिपब्लिकनांसाठी इशारा

विवेक मराठी    13-Nov-2025   
Total Views |
america
निवडणुकीत दिलेले मत हे बंदुकीसारखे असते. त्याची उपयुक्तता ही मतदाराच्या गुणावगुणांवरच ठरते. जर अमेरिकेतील वोक संप्रदायाला कंटाळून जनतेने ट्रम्प यांना काही अपेक्षा ठेवून निवडून आणले असले आणि आता अपेक्षाभंग होत आहे असे वाटू लागले असेल तर त्यांनी ह्या त्या मानाने लहान प्रमाणावरील निवडणुकीत ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाला एक इशारा दिला आहे. जर ह्या इशार्‍यातून ते शिकले तर पुढील वर्षअखेरीच्या निवडणुकीत तेथे रिपब्लिकन पक्षाला काही स्थान राहील. अन्यथा अमेरिकी जनता निवडणुकीत कुणाच्या बाजूने उभे राहायचे हे ठरवण्यास सूज्ञ आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुका ह्या लीप वर्षाच्या नोव्हेंबरला होतात. अमेरिकन काँग्रेस अथवा त्याला US House of Representatives म्हणतात त्यांच्या निवडणुका ह्या दर दोन वर्षांनी होतात आणि अमेरिकन सिनेटच्या निवडणुका ह्या त्यातील एकतृतियांश जागांसाठी दर दोन वर्षांनी होतात. थोडक्यात, सिनेटर्स हे सहा वर्षे असतात तर कॉँग्रेसमन णड US Representatives हे दोन वर्षे असतात. लहान गावे सोडल्यास बर्‍याचशा स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारे यांच्या निवडणुका ह्या दर चार वर्षांनी नोव्हेंबेरच्या पहिल्या मंगळवारी होतात. आता प्रत्येक निवडणुकांची मुदत ही एकाच वेळेस चालू होत अथवा संपत नसल्याने दरवर्षी कुठे ना कुठे तरी निवडणुका होत असतात.
 
 
ह्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी ज्या काही महत्त्वाच्या निवडणुका झाल्या त्यातील अतिशय ठळक अशा निवडणुका ह्या न्यूयॉर्क शहराच्या महापौराची. या तसेच न्यू जर्सी आणि व्हर्जिनिया राज्यांच्या गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर पदाच्या निवडणुकांकडे सार्‍या देशाचे लक्ष केंद्रित झाले होते.
 
 
यामधील न्यूयॉर्कच्या महापौराची निवडणूक अधिक गाजली आणि त्यामध्ये अमेरिकास्थित आणि भारतातल्या देखील लोकांचे आणि माध्यमांचे अधिक लक्ष गेले होते. त्याचे कारण म्हणजे निवडणुकीच्या रणधुमाळीत पहिल्यापासून पुढे असलेला आणि महापौर म्हणून निवडून आलेला झोहरान ममदानी. एक तरुण आणि हसरे व्यक्तिमत्व असलेला झोहरानची आई ही डाव्या विचारसरणीची चित्रपट निर्माती मीरा नायर आणि त्यांचे वडील हे मुंबईत जन्माला आलेले, युगांडात वाढलेले आणि आता न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक असलेले मोहम्मद ममदानी आहेत. त्या अर्थाने न्यूयॉर्कचा महापौर हा प्रथमच भारतीय वंशाचा आणि प्रथमच मुस्लीमधर्मीय व्यक्ती झालेला आहे.
 
america 
 
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जरी पक्षीय पातळीवर लढवल्या जात नसल्या तरी, उमेदवार हे रिपब्लिकन अथवा डेमोक्रॅटिक पक्षाशी संलग्न असतातच. डेमोक्रॅटिक पक्षात एक असा उपगट आहे जो स्वत:ला समाजवादी डेमोक्रॅट समजतो. यांचे विचार हे अमेरिकेतील मुक्त अर्थव्यवस्थेशी मिळतेजुळते नसतात. ज्या नागरी सेवा ह्या करदात्याच्या पैशातून चालत असतात त्या जबाबदारीने राबवण्याऐवजी फुकट वाटण्याकडे यांचा कल असतो. ममदानी ह्याला अपवाद नाहीत. त्यामुळे अशा मोफत सुविधा मिळतील अशी हमी दिल्याने अनेक जण त्यांच्याकडे आकृष्ट झाले. अर्थात नुसते मोफत मिळणे इतकेच कधी उमेदवाराचा विजय होण्यामागचे पुरेसे कारण नसते. त्याहूनही महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे योग्य पर्याय नसणे. डेमोक्रॅटिक पक्षातीलच दुसरे उमेदवार अँड्रयू कुमो हे आधी न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर होते. त्या वेळेस केलेला भ्रष्टाचार आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या तक्रारी यामुळे ते पद त्यांना सोडावे लागले. रिपब्लिकन पक्षाचे कर्टिस स्लीवा ह्यांना तर कुठलाच जनाधार नव्हता आणि त्यांच्याकडे लोकांसमोर मांडण्याजोगा ठोस कार्यक्रम नव्हता.
 
 
 
अमेरिकेतील अनेक तरुण भारतीय वंशीय (अमेरिकेत जन्माला आलेले अथवा वाढलेले) यांच्यावर असलेला बॉलीवुडचा प्रभाव झोहरानवर देखील दिसतो. त्यामुळेच त्याच्या निवडणूक कॅम्पेनमध्ये आणि विजयी मेळाव्यात हिंदी गाणी वाजत होती. अर्थात झोहरान यांच्या ह्या बॉलीवूड मार्केटिंगचे अजून एक कारण होते, ते म्हणजे मतदार. न्यूयॉर्क शहरात साधारण 3-4 टक्के मतदार हे भारतीय आणि पाकिस्तानी आहेत. त्यांना आपण त्यांच्यातले वाटावे ह्यासाठी ही खेळी. त्याचा परिणाम असा झाला होता की, एकूण डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूचे असलेल्या (जे ममदानीला मत देण्याची अधिक शक्यता होती) अशा मतदारांची अंदाजे 32% संख्या होती. अर्थातच त्यातील बहुतांशी लोकांनी ममदानीस मत दिली असे समजले तर त्याचा विजय निर्णायक होण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे ठरले. त्याव्यतिरिक्त ममदानी यांनी आपला स्वत:चा धर्म लपवला नाही तर त्याचा सातत्याने फायदा घेतला.
 
 
9/11 हल्ल्यानंतर मुस्लीम समाजाला कसे सहन करावे लागले इथपासून ते स्वत: कसे गुजराती मुस्लीम आहेत आणि मोदी मुख्यमंत्री असल्यापासून गुजरातमध्ये मुस्लीम समाज कसा सुखनैव राहू शकत नाही इथपर्यंत सर्व काही चालले होते. त्या व्यतिरिक्त त्यांची इस्रायलविरोधात आणि गाझा समर्थनार्थ पक्षी हमासच्या काळ्या कारनाम्याला झाकून ठेवणे हे सर्व त्यांनी जाहीरपणे केले. परिणामी, भारतीय उपखंडातील मुस्लीम समाजाव्यतिरिक्त इतर मुस्लिमांना पण ते आपलेसे वाटू लागले. भारतीय उपखंडातील मतदारांसमोर बोलताना तर हमखास मोदींना नावे ठेवणेही चालत होते. थोडक्यात, निवडणूक लढवणे असे म्हणायचे असेल तर ममदानी यांनी कुठलीही संधी न सोडता सगळे काही प्रयत्न केले आणि परिणामी त्यांना यश आले.
 
 
विजयी मेळाव्यातील भाषणात त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या मध्यरात्रीच्या केलेल्या पं. जवाहरलाल नेहरूंच्या भाषणातील नियतीच्या कराराच्या वाक्याचा संदर्भ दिला. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने, थोडक्यात गेल्या दहा वर्षात आधी लपवून ठेवलेला इतिहास प्रकाशात आल्याने जरी कुणाला नेहरूंच्या भाषणात फोलपणा वाटत असला तरी न्यूयॉर्कसारख्या शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीनंतरच्या भाषणात, एका भारतीय नेत्याच्या वक्तव्याचा संदर्भ दिला जाणे, याचे काही महत्त्व समाजमनावर परिणाम करू शकते, जरी त्या उद्देशाने झोहरान यांनी नेहरूंचा उल्लेख केला असण्याची शक्यता कमी असली तरी. अर्थात मोदींच्यावरील झोहरान यांची टीका, इस्रायलच्या विरोधातील प्रखर भूमिका, आणि जीवनमान सोपे करण्यासाठी मोफत अथवा स्वस्त सुविधा देण्याचा वादा हे सगळे निवडणूक प्रचारासाठी ठीक होते. पण आता जानेवारीत ममदानी अधिकृतपणे सत्तारूढ झाल्यावर जनतेच्या पदरी नक्की काय पडते ते पाहावे लागेल.
 
 
america
 
भारतीय, विशेषकरून डाव्या विचारांच्या माध्यमांना, पॉडकास्टकरांना, आणि समाजमध्यमजीवींना ममदानी न्यूयॉर्कचे महापौर होणे म्हणजे आपल्याच देशात त्यांना हवे तसे सत्तांतर घडले अशा प्रकारच्या आनंदाच्या उकळ्या फुटणे असे होताना दिसत आहे. केजरीवाल यांच्याप्रमाणे ममदानीस देखील प्रसिद्धीच्या झोतात कसे राहायचे याची पूर्ण कल्पना आहे. परिणामी, युगांडात जन्माला आलेल्या भारतीयवंशीय, मुस्लीमधर्मीय म्हणून सतत प्रसिद्धी दिली गेली. पण ती देत असताना, हैद्राबादमध्ये जन्माला आलेल्या गझाला हशमी ह्या भारतीयवंशीय मुस्लीम महिलेने व्हर्जिनिया मध्ये लेफ्टनंट गव्हर्नर पदाची निवडणूक जिंकली ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले. त्या व्यतिरिक्त ओहायो राज्यात सिनसिनाटी शहराचा महापौर हा पंजाबी हिंदू वडील आणि तिबेटिअन बुद्धिस्ट आई असलेला आफताब कर्म सिंग पुरेवाल महापौर झाला हे तर पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. तीच गोष्ट न्यू जर्सीची आहे. तिथे मिकी शेरील या गवर्नर झाल्या आहेत. पण ममदानीच्या पुढे त्यांना पब्लिसिटी मिळणे दुरापास्त झाले आहे.
 
 
ह्या निवडणुकांच्या व्यतिरिक्त न्यू जर्सीत पण डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता राज्यात आली आहे. न्यू हॅम्पशायर राज्यातील एक मराठमोळे नाव म्हणजे, संतोष साळवी. व्यक्तिगत आयुष्यात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योजक असलेले संतोष साळवी गेल्या निवडणुकीत न्यू हॅम्पशायर राज्य विधानसभेत डेमोक्रॅटिक पक्षाकडून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त या निवडणुकीत ते स्थानिक स्कूल कमिटी प्रतिनिधीच्या निवडणुकीत लढले आणि जिंकले. या निवडणुका देखील संपूर्ण शहराच्या मतदारांच्या मतांवर आधारित असतात. या निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या समितीकडून स्थानिक शिक्षणसंदर्भात निर्णय घेतले जातात ज्यात अभ्यासक्रमापासून ते अनुदानापर्यंत अनेक मुद्दे असतात.
 
 
एकूण हा निवडणूक हंगाम पाहिला तर समजून चुकते की एकीकडे कधी धर्म, कधी राजकारण, कधी आश्वासने आदि कारणे ही निर्णायक विजयासाठी उपयोगी होती. अनेक विजयी डेमोक्रॅटिक उमेदवारांनी केवळ सांस्कृतिक मुद्यांवर भर न देता,
 
 
जीवनमानाचा खर्च, घरकुल, आरोग्यसेवा आणि ऊर्जेचा खर्च या विषयांवर लक्ष केंद्रित करणारा संदेश दिला. हा संदेश मतदारांना पटल्यासारखा वाटला. तरी देखील अजून एक कारण होते, ते म्हणजे सध्याच्या फेडरल सरकारवरील राग. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदावरील जनमत (दुसरा कार्यकाळ) हा केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणासाठीच नाहीतर अंतर्गत राजकारणासाठी देखील आवाहनात्मक ठरत आहे. त्या अनुषंगाने जरी ट्रम्प स्वतः निवडणुकीच्या यादीत नव्हते, तरीही या निवडणुकांकडे त्यांच्या प्रशासनाबाबत जनतेचा कल मोजणारा बॅरोमीटर म्हणून पाहिले जात आहे.
 
 
हे निकाल दर्शवतात की, मतदारवर्गाचा मोठा वर्ग असमाधानी आहे. काही निवडणुकांच्या निकालांनी असे सूचित केले की, काही विशिष्ट गटांमध्ये (उदा. संघटित कामगार कुटुंबे, अल्पसंख्याक मतदार) रिपब्लिकन पक्षाचे वाढते पाठबळ थोडे कमी होत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या विजयांमुळे त्यांच्या आघाडीचे पुन्हा एकत्रीकरण सुरू असल्याचे संकेत मिळतात. म्हणूनच पुढच्या वर्षीच्या सिनेट, काँग्रेस आणि तमाम इतर निवडणुकींच्या संदर्भात कालच्या निवडणुकीचे निकाल म्हणजे रिपब्लिकन पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकेल. असे डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थन करणारे अथवा कुठल्याच पार्टीशी संलग्न नसलेले अनेक मतदार होते ज्यांनी 2024 मध्ये प्रथमच ट्रम्पना निवडून देण्यासाठी म्हणून रिपब्लिकन पक्षाला मते दिली. मात्र नंतर टॅरिफ, इमीग्रेशनबद्दलची टोकाची भूमिका, सरकारी नोकर्‍या कमी करणे, वंशवादाचे समर्थन करणार्‍या स्वत:च्या मतदारांना नियंत्रणात आणण्याऐवजी त्यांना अजूनच प्रोत्साहित करणारे निर्णय घेणे, वाढती महागाई, नोकर्‍यांची वानवा, या सर्वांचा परिणाम हा लोकशाही राज्यात मतपेटीतून प्रकटणार हे दिसत होते.
 
 
विसाव्या शतकाच्या सुरवातीचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष थिओडर रुझवेल्ट यांचे एक वाक्य सांगितले जाते: A vote is like a rifle; its usefulness depends upon the character of the user. थोडक्यात, निवडणुकीत दिलेले मत हे बंदुकीसारखे असते. त्याची उपयुक्तता ही मतदाराच्या गुणावगुणांवरच ठरते. जर अमेरिकेतील वोक संप्रदायाला कंटाळून जनतेने ट्रम्प यांना काही अपेक्षा ठेवून निवडून आणले असले आणि आता अपेक्षाभंग होत आहे असे वाटू लागले असेल तर त्यांनी ह्या त्या मानाने लहान प्रमाणावरील निवडणुकीत ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाला एक इशारा दिला आहे. जर ह्या इशार्‍यातून ते शिकले तर पुढील वर्षअखेरीच्या निवडणुकीत तेथे रिपब्लिकन पक्षाला काही स्थान राहील. अन्यथा अमेरिकी जनता निवडणुकीत कुणाच्या बाजूने उभे राहायचे हे ठरवण्यास सूज्ञ आहे.