आपल्या संस्कृतीसोबतच उद्योग-व्यवसाय सुद्धा जगभरात नेले पाहिजेत - डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

13 Nov 2025 16:27:31
pitambari 
ठाणे : आज जगात भारतीय संस्कृतीचा उदो उदो केला जातो आहे. जगभरातील लोकांना भारतीय संस्कृतीबद्दल नितांत आदर निर्माण होत आहे. ज्याप्रकारे आपल्या संस्कृतीबद्दल आदर निर्माण होत आहेत त्याच प्रकारे उद्योग परदेशात नेले पाहिजेत आणि त्याबद्दल सुद्धा एक विश्वासार्हता जगभरात निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. ते सा. विवेक प्रकाशित नव्या पिढीच्या उद्योजकांवर आधारित Gen Next  पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. ठाण्यातील गोखले मंगल कार्यालयात शनिवार 8 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्यास व्यासपीठावर पद्मश्री रमेश पतंगे, सा. विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, चितळे बंधू उद्योग समूहाचे डायरेक्टर इंद्रनील चितळे, केवा उद्योग समूहाचे केदार वझे, महेश वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सा. विवेकच्या वतीने पद्मश्री रमेश पतंगे आणि प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी पितांबरी उद्योग समूहाचे डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा उद्योग आणि संस्कृती भूषण देऊन सन्मान केला.
 
 
पुढे प्रभुदेसाई म्हणाले की चितळे, किर्लोस्कर, केळकर असे नावाजलेले मराठी उद्योग समूह आमचे आदर्श व मार्गदर्शक आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आमची वाटचाल सुरू आहे. आज देशात तरुण उद्योजक निर्माण होणे काळाची गरज आहे. पण अनेक भारतीय उद्योजकांची पुढची (Next generation) ही उद्योगात नाही तर ते परदेशात स्थिर झाले आहेत. त्यांना भारतात उद्योग-व्यवसाय करायचे नाही ही खरंच शोकांतिका आहे. ते पितांबरी उद्योग समूहाबद्दल बोलतांना म्हणाले की, ग्राहकांची विश्वासार्हता पितांबरी ब्रँडने मिळवली आहे. म्हणूनच आम्ही 350 कोटींचा टप्पा पार केला आहे आणि लवकरच तो 500 कोटींचा होईल. उद्योग म्हणजे नफा हे लक्षात घेऊनच उद्योग केले पाहिजेत, जर एक ते दोन वर्षांत आपल्या उद्योगात नफा होत नसेल तर आपले काहीतरी चुकत आहे याची जाणीव उद्योजकाला झाली पाहिजे.
 
यावेळी तरुण पिढीला कानमंत्र देतांना ते म्हणाले की, उद्योजक हा राजा असतो. तो कोणाचा गुलाम नसतो. त्यामुळे तरुणांनी अधिकाधिक उद्योग व्यवसाय सुरू करून देशाच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे. त्याचबरोबर सा. विवेकने केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले.
 

pitambari
 
साप्ताहिक विवेकतर्फे उद्योजक ह्या विषयावर प्रसिद्ध होणारे Gen Next  हे अकरावे पुस्तक आहे. प्रसिद्ध उद्योजकांच्या पुढील पिढीने व्यवसायात मारलेली यशस्वी धडक हा या प्रकल्पाचा मुख्य विषय. आजच्या काळात यात सामाविष्ट असलेले सारे उद्योजक यशस्वी तर आहेतच. पण जागतिक स्तरावर आपला व्यवसाय घेऊन जाण्याची त्यांची उमेद थक्क करणारी आहे. आपला व्यवसाय आपला ब्रँड व्हावा ही त्यांची मनीषा आहे. यामध्ये ज्या सोळा उद्योजकांचा समावेश आहे. त्या उद्योजकांच्या दोन्ही पिढ्यांचा हा चालताबोलता इतिहास आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रातील उद्योजक व त्यांचा संघर्ष त्यांचे यश या मालिकेच्या माध्यमातून जवळून पाहता येईल. आजच्या तरुण व्यवसायिकांना यातून अनेक गोष्टी शिकता येतील. पुस्तकासाठी संपर्क - 9594961858
 
 
कल्पकता आणि नाविन्यता याची जोड देऊन आपले उद्योग कसे वाढवायचे याचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन चितळे उद्योग समूहाचे डायरेक्टर इंद्रनील चितळे यांनी केले. आज अनेक आव्हानांना तोंड देत आपले उद्योग वाढवावे लागत आहेत. आज विदेशात, राज्यात राजकीय परिस्थिती बदलत असते. त्यातून उद्योगांना सम-विषम वातावरण निर्माण होत असते. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी उद्योगांचे आव्हान यात आपले व्यवसाय वाढवणे मोठे आव्हान होत आहे. त्यातच तंत्रज्ञानाच्या युगात एआयचे मोठे आव्हान समोर आहे, यापुढे उद्योगांमध्ये एआयचा प्रभाव दिसणार आहे. त्यामुळे त्याचा वापर करून आपले व्यावसायिक मॉडेल तयार केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
 
 
एआय, डीप फेक आणि टुलकीट हे एखाद्या प्रस्थापित उद्योगाला, प्रॉडक्टला नेस्तनाबूत करून टाकते तर एखाद्या नवख्या उद्योगाला/प्रॉडक्टला डोक्यावर घेत प्रस्थापित करते. आपल्याला काळापुढील धोके समजून घेऊन, आपला ग्राहक समोर ठेऊन आपल्या उद्योगात काळानुरूप बदल केले पाहिजेत तर ते उद्योग टिकाव धरू शकतील. यासाठी त्यांनी चितळे उद्योग समूहाचे उदाहरण दिले. चितळे उद्योग समूहाची पूर्वी दुकानात विक्री मोठ्या प्रमाणात होत असे. पण आज गेल्या 10 ते 12 वर्षांत ग्राहकांचा कल बदलला आहे. दुकानातून विक्री 40 टक्के होते तर 60 टक्के विक्री ही त्रयस्थ व्यक्ती (थर्ट पार्टी)कडून होते. हा त्रयस्थ ग्राहक अदृश्य असतो. त्यातच भारतातील भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे. भाषा, वेशभूषा, प्रादेशिक अस्मिता, आवडीनिवडी याचा कल समजून जाहिराती केल्यामुळे आज चितळे समूह आपले बॅ्रड टिकवून आहे, असेही त्यांनी सांगितले. ग्राहकांत आपल्या प्रॉडक्टचे उपभोगमूल्य हा खूप महत्त्वाचा भाग आहे. हे मूल्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण टिकून आहोत. हे व्यावसायिकाला समजले पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी आपल्या भाषणातून उद्योग आणि भविष्यातील धोके यावर सखोल भाष्य केले.
 
 
यावेळी पद्मश्री रमेश पतंगे यांनी आपल्या भाषणात विवेकची वैचारिक भूमिका, सामाजिक समरसता, संविधान, सामाजिक उपक्रमात दिलेले योगदान यावर भाष्य केले, त्याचबरोबर आपला समाज जातीपातीत विभागला नसता तर व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांना येथे राज्य करता आले नसते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
केवा वझे समूहाचे डायरेक्टर केदार वझे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपल्या आवडीच्या क्षेत्रातील उद्योग किंवा करिअर केले तर ते अधिक चांगले होते. कारण त्यात येणार्‍या संघर्षांना आपण जिद्दीने तोंड देण्यास तयार होतो. त्याचबरोबर प्रत्येक उद्योगत उतरण्यापूर्वी त्या विषयीचा सखोल अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी बहुमोलाचे मार्गदर्शन केले.
 
 
कार्यक्रमाचे प्रास्तविक दिलीप करंबेळकर यांनी केले ते म्हणाले की, महेश वैद्य हे विषयकेंद्रित संकल्पना घेऊन दरवेळी पुस्तक करीत असतात. यावेळी त्यांनी घेतलेली Gen Next ही संकल्पनाही खूप चांगली आहे. त्यामुळे पुस्तकालाही एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले. ते पुढे म्हणाले की, भारत स्वतंत्र झाला आणि आपण समाजवादी धोरण स्वीकारले, त्यामुळे काही मोजक्याच उद्योग घराण्यांना याचा फायदा झाला आणि उद्योगांत नवी पिढी घडली नाही. आज उद्योग विषयात मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध नाही. याच विषयावरील कादंबरी निर्माण करण्यात साहित्यिक कमी पडले अशीही खंत यांनी व्यक्त केली. गुलाब सुंदर असते पण त्यासोबत काटे असतात. तसेच उद्योग क्षेत्र मोठे आहे, पण त्यात आव्हानेदेखील खूप आहेत. रवींद्र प्रभुदेसाई आणि सा. विवेकचे ऋणानुबंध दीर्घ आहेत. त्यांच्या यशस्वी घोडदौडीचा विवेक साक्षीदार आहे. त्यांचे सामाजिक दायित्व मोठे आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान खर्‍या अर्थाने एका यशस्वी उद्योजकाचा सन्मान आहे, असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.
 
 
पुस्तकाच्या लेखिका रमा ताम्हणकर, पुस्तकाचे संयोजक महेश वैद्य यांनीही आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बागेश्री पारनेरकर तर आभारप्रदर्शन महेश वैद्य यांनी केले.
Powered By Sangraha 9.0