इस्लामी दहशतवादाचे पांंढरपेशे रूप

13 Nov 2025 17:16:46
इस्लामी  दहशतवाद 
दिल्लीला लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या जवळ नुकताच आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला आणि देश हादरला. भर गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट होऊन अनेक निरपराध लोक मृत्युमुखी पडल्यामुळे धक्का बसणे स्वाभाविक आहेच, पण त्यापेक्षाही प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या डॉक्टर ही पदवी असणार्‍या व्यक्तींचा या हल्ल्यातील सहभाग आहे, याचा आणखी तीव्र मानसिक धक्का बसला आहे. उच्चशिक्षित पांढरपेशे प्रतिष्ठित समजले जाणारे सुद्धा दहशतवादी कसे बनू शकतात? हा खरा प्रश्न आहे!
दिल्लीला 10 नोव्हेंबरला लाल किल्ल्याच्या परिसरातील मेट्रो स्थानका जवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याआधी महिनाभर सुरक्षा यंत्रणांच्या विविध ठिकाणी छापे मारल्याच्या बातम्या येतच होत्या. दरम्यान पाकव्याप्त काश्मीर मध्ये जमात-उल-मुमीनात या आत्मघातकी संघटनेची स्थापना झाल्याची आणि नंतर पुण्यात उच्चशिक्षित संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याला अटक झाल्याची बातमी होती.
 
 
त्या आधी काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद हल्ला करणार आहे, अशा आशयाचे पोस्टर्स झळकले. नंतर धरपकड सुरू झाली. मग त्याचे धागेदोरे हरियाणा-फरीदाबादपर्यंत गेले. तिथे अनेक स्फोटके जप्त केली गेली. ही तपासाची शृंखला वाढत गेली आणि नंतर बाहेर आलेली नावे म्हणजे समाजाला बसलेला धक्का होता. कारण हे सगळे जण उच्चशिक्षित डॉक्टर होते! मानवतेची सेवा करणारे, जीवन वाचवणारे डॉक्टर दहशतवादी असू शकतात हा समाजाला पचवावा लागलेला नवा क्रूर धक्का आहे! म्हणजेच दहशतवादी यापुढे आपल्या नोकरी-व्यवसायासह आपल्या पदव्यासुद्धा ‘कव्हर’ म्हणून वापरू शकतात हेच किती भयंकर आहे?
ज्याप्रमाणे नक्षलवादी दुहेरी स्तरावर काम करतात, एक म्हणजे ‘फुट सोल्जर’ जे जंगलात प्रत्यक्ष शस्त्रे चालवतात आणि दुसरे म्हणजे अर्बन नक्षल - जे शहरात पांढरपेशे म्हणून वावरतात, पण नक्षलवादाचे वैचारिक पातळीवर समर्थन करतात. शहरी नक्षलवादी ग्रामीण नक्षलवाद्यांना समाजात सहानुभूती मिळवून देतात. त्याच प्रमाणे आता दहशतवाद दुहेरी-तिहेरी स्तरांवर कार्यरत झालेला आहे. ते सुद्धा जागतिक स्तरावर! ग्रामीण-शहरी भागांत, अशिक्षित तसेच सुशिक्षित यांच्यात सुद्धा दहशतवादी तयार होऊ लागलेले आहेत. पुन्हा यात सुद्धा पुरुष आणि महिला दोन्ही सक्रिय होऊ लागले आहेत. ज्या देशात इस्लामी कट्टर मूलतत्त्वाद आहे उदाहरणार्थ अफगाणिस्तान, तिथे महिलांना बुरख्यासारख्या पारंपरिक वेशभूषा सक्तीच्या आहेत. पेलेस्टाईन, पाकिस्तानसारख्या देशांत दहशतवादी कारवायांत पूर्वी महिलांना थेट सहभागी होण्याची परवानगी नव्हती. पण नंतर गरजेप्रमाणे त्यांना ती दिली गेली आहे. इस्लामी दहशतवादी संघटना जाणीवपूर्वक स्त्रियांना आत्मघातकी दहशतवादी बनवत आहेत. आणि भारतासारख्या देशात लोकशाहीचा गैरवापर करत दहशतवादी कारवायांत महिला, इस्लामसाठी, डॉक्टरसारख्या पदवीचा कव्हर म्हणून वापर करत असल्याचे उदाहरण आहे! दिल्लीचा हा 10/11 चा हल्ला अशा अनेक अर्थांनी भयंकर असून तो गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण, भारतात दहशतवादाचे पांंढरपेशे मोडयूल तयार झाले आहे!
 

इस्लामी  दहशतवाद 
 
पांंढरपेशे दहशतवादी मोड्यूल
 
जम्मू-काश्मीरचा डॉ. मुज्जमील शकील, डॉ. मुझमील अहमद घनाई, डॉ. आदिल माजिद राथेर आणि नंतर डॉ. शाहीन शाहिद! या नावांच्या पुढे लावलेली वैद्यकीय पदवी खरी आहे ना? असा प्रश्न पडावा अशी यांची या दहशतवादी हल्ल्यामधील भूमिका आढळून येते आहे.
 
 
दिल्लीत ज्या स्फोटकांनी भरलेल्या कारला विस्फोटाद्वारे उडवून दिले गेले, त्या कारचा चालक पुलवामाचा डॉ. मुहम्मद ओमर ऊन नबी हा अल फलाह विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक सुद्धा होता.
  
 
मुज्जमील, आदिल, शकील आणि शाहीन अल फलाह वैद्यकीय महाविद्यालयात भेटत तेव्हा ओमर भारतभर अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याविषयी बोलत असल्याचे शाहीनच्या जबानीत समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी स्फोटकांची जमवाजमव केली होती. डॉ. शाहीन शाहिद ही लखनौची असून जैश-ए-मोहम्मदच्या महिला विभागाची प्रमुख होती. इतकेच नाही तर जमात-ए-मुमिनात या पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थापन झालेल्या कट्टर इस्लामिक दहशतवादी संघटनेची ती भारतातील प्रमुख असल्याचे तपासात आढळून आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा /विद्यापीठाचा वापर त्यांनी कव्हर म्हणून सहजपणे करून घेतलेला आहे. विद्यापीठातील लॉकरमध्ये सुद्धा शस्त्रे लपवली होती. ज्यांच्यावर कुणीही कधी संशय घेणार नाही, घेऊ शकणार नाही अशा पवित्र मानल्या गेलेल्या वैद्यकीय पदव्या बाळगणारे हे पांंढरपेशे मोड्यूल आहे. जगभरात अशी उदाहरणे आहेत कारण दहशतवाद हा मोठ्या प्रमाणात मानसिक-भावनिक घटकांशी जोडलेला असून औपचारिक शिक्षण त्यापुढे प्रभावी ठरू शकत नाही !
 
 
उच्चशिक्षित दहशतवादी आणि हल्ले
 
संपूर्ण जगात जे मोठे दहशतवादी हल्ले झाले त्यात उच्चशिक्षित दहशतवादी असल्याचे दिसून आले आहे.
 
अशी काही उदाहरणे पाहू
 
अ) अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 1993 मध्ये ट्रकमध्ये स्फोटके भरून जो हल्ला केला गेला होता त्यात रामजी युसुफ ह्याने त्याचे नियोजन केले होते. तो इंग्लंडमध्ये शिकलेला इलेक्ट्रिकल इंजिनियर होता. तसेच इंग्लिशसाठी ऑक्सफर्ड कॉलेजमध्ये सुद्धा शिकला होता. दुसरा इयाद इस्मोली हा विचिता स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका यात शिकलेला इंजिनिअर होता. याने स्फोटकांनी भरलेला ट्रक धडकवला होता.
 
 
ब) अमेरिकेवरचा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यातील काही दहशतवादी.
 
1) मुहम्मद अत्ता - कैरो युनिव्हर्सिटीमध्ये आर्किटेक्चर आणि जर्मनीच्या हॅम्बुर्ग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी.
 

2) मारवा अल-शेही - जर्मनीच्या युनिव्हर्सिटी ऑफ बॉनमध्ये जर्मन शिकला तसेच टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ हँम्बुर्गमध्ये शिक्षण.
 
 
3) झियाद जराह - एअरोस्पेस इंजिनीअरिंग, हँम्बुर्गला युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्स येथे शिक्षण.
 
ह्या उच्चशिक्षित व्यक्तींचा उपयोग आपल्या मिशनसाठी अल कायदाने शिताफीने केला. इतरांचा जीव घेणे ह्यात त्यांना काहीही गैर वाटले नाही कारण त्याला मजहब रक्षण आणि हौतात्म्य ह्यांचे तत्त्वज्ञान जोडले गेले. वास्तविक औपचारिक शिक्षणामुळे व्यक्तीच्या ‘स्व’ विषयीच्या जाणीवा रुंदावतात. आपल्या भूमिकेविषयी,जीवनाच्या ध्येयाविषयी व्यक्ती जागरुक होते. आपल्या मजहबच्या रक्षणासाठी आपण काही तरी केले पाहिजे अशी भावना त्यात असते. आपला मजहब संकटात आहे असे वाटू लागताच त्याच्या बचावासाठी उच्चशिक्षित व्यक्ती सक्रीय झाल्याचे आढळते. त्यांचा गैरवापर दहशतवादी संघटना करून घेतात. औपचारिक शिक्षणापेक्षा घरात, समाजात, काही प्रसंगी मदरसे-धार्मिक स्थळे यात मिळणारे अनौपचारिक शिक्षण जास्त प्रभावी ठरते असे दिसून येते.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
 
दुसरे अलीकडचे उदाहरण आहे ते गोरखनाथ मंदिरावर हल्ला (2022) चढवणार्‍या अहमद मूर्तझा अब्बासी याचे. हा ‘लोन वूल्फ अ‍ॅटॅक’ होता, म्हणजे ह्यात एकटी व्यक्ती झपाटून जाऊन स्वत:हून हल्ला चढवते. मूर्तझा हा जानेवारी 2020 पासून हायटेक कॉम्प्युटर कोडींग शिकला. सीरियाच्या अनेक लोकांच्या संपर्कात तो सोशल मिडीया, इंटरनेटच्या माध्यमातून आला. त्याने आठ लाख रुपये नेपाळी खात्यांच्या माध्यमातून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीयाच्या इसीस बँक खात्यात हस्तांतरित केले आहेत अशी माहिती उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. इमाम अन्वर अल हालाकी ह्याला तो गुरू मानतो. इस्लामला संपूर्ण जगात त्रास सोसावा लागत आहे अशी त्याची धारणा झाली.त्यासाठी प्रतिशोध घेणे ही आपली जबाबदारी आहे अशी त्याची मानसिकता झाली. मुर्तझाच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये सुद्धा कट्टर धर्मांध भडकवणारे व्हिडीओ सापडलेले होते. एका इसीसच्या व्हिडीओमध्ये अगदी तसाच सुरा आहे जसा त्याने मंदिरावर हल्ला चढवताना स्वत: वापरला आहे. म्हणजेच सुशिक्षित उच्चशिक्षित व्यक्ती किती प्रभावाखाली येतात याची कल्पना येते.
 
 
कट्टर मूलतत्त्ववादी शिक्षण आणि मानसिकता
 
जेव्हा बुद्धीच्या जोरावर एखादी विचारसरणी पटवून दिली जाते आणि त्याला काटशह देणारा विचार समोर दिसत नाही तेव्हा ती कोणत्याही व्यक्तीला पटू शकते. जसे की, जगभरात अमेरिकेच्या धोरणांनी इस्लाम धोक्यात आलेला आहे हे उदाहरणासह ओसामा बीन लादेनने पटवून दिले होते. त्याकाळात अमेरिकेचे परराष्ट्र धोरण, सौदी अरेबियात अमेरिकेचे सैन्यांचे अस्तित्त्व, इराकमध्ये सद्दाम हुसेनचा पाडाव इ. अनेक घटना होत्या. म्हणूनच 9/11 ची आत्मघातकी दहशतवाद्यांची उच्चशिक्षितांची टीम सक्रिय झाली आणि त्यांनी भयंकर हल्ला चढवला.
 
 
भारतात सुद्धा अनेक दहशतवादी मोड्युल उघडकीस आलेले आहेत. त्यात अनेक उच्चशिक्षित व्यक्ती पकडल्या गेल्या आहेत. विशेषत: संगणक प्रशिक्षित यात जास्त आहेत, कारण त्याद्वारे जगभरातील संपर्क सुलभ आणि गोपनीयपणे होऊ शकतो. अल कायदा पाठोपाठ आता इसीसने मोठ्या प्रमाणात स्थानिक भाषा वापरून वेबसाईट वाढवल्या. त्याद्वारे ऑनलाईन भरती करण्यावर भर दिला आहे. दहशतवादी संघटनांचा आधुनिक जिहाद हा ‘ई-जिहाद’ आहे असे अनेक अभ्यासक मानतात. चॅटिंग करणे, फाईल शेअर करणे, छुपे गट, वैचारिक देवाण-देवाण, दहशतवादी हल्ल्याचे इंटरनेटवर नियोजन, संशोधन, व्हिडिओ, भाषणे, सोशल मिडीया विशेषत: टेलिग्राम इत्यादीद्वारे अनेक दहशतवादी संघटना तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत.
 
 
यात संवेदनशील व्यक्ती त्वरित बळी पडतात. आपल्या आयुष्यापेक्षा मजहबचे रक्षण किती मोलाचे आहे आणि संपूर्ण जगाला इस्लाममध्ये रूपांतरित करणे किती आवश्यक आहे हे त्यांना बुद्धीच्या जोरावर पटलेले असते. एखाद्या विकृत ध्येयाचा सतत पाठलाग करावा तशी ही अवस्था असते. त्या झपाटलेल्या अवस्थेचे उदात्तीकरण करणारे साथीदार, वातावरण मिळाले की असे विद्ध्वंस घडतात. अर्थात, ही एक प्रक्रिया असते, आत्मघातकी दहशतवादी एका दिवसात तयार होत नाही. आता त्याला उच्च शिक्षणाचे विद्यापीठांचे वातावरण असे सहज मिळू शकणार असेल तर ते किती धोक्याचे आहे हे समोर आले आहेच.
 
 
लेखिका एकता मासिकाच्या संपादिका आहेत.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
Powered By Sangraha 9.0