जपावे पर्यावरणाचे आरोग्य

13 Nov 2025 16:06:29
@वैद्य नचिकेत वाचासुंदर
 8605172666
 
 
Environment
 
एकच एक पीक सर्वदूर न होता विविध देशी पिके आलटून पालटून घेत जमिनीचा पोत कायम राखला पाहिजे. गोमातेच्या साहाय्याने शाश्वत शेती विकास साधला पाहिजे. टिकाऊ धान्य निर्माण केले पाहिजे व त्यासाठी नैसर्गिक, विषमुक्त जैविक शेतीचा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे. त्यासाठी योग्य प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
 
 
परवाच आमचे शेतकरी मित्र वसंतराव देशमुख यांच्या तासगाव जवळच्या द्राक्षाच्या बागेला भेट देण्याचा योग आता. त्यांची ती सुरेख बाग, भोवताली कुंपण, गेटमधून आत शिरताच दिसणारे टुमदार शेतघर, मोठे मोठे भीतीदायक कुत्रे हे सारे पाहून आम्ही अगदी हरखून गेलो. विशेषतः सर्वत्र लोंबणारे आणि सहज हाताला येणारे द्राक्षाचे घड आणि पाहुण्यांची हवी तितकी द्राक्षे (मोफत) खाण्याची केलेली आपुलकीची सूचना ऐकून तर आमचे मुंबईकर मित्र तर विशेष आनंदून गेले. हवी तितकी द्राक्षे खाण्यात सर्वजण गुंग झाले. तोवर माझे लक्ष वसंतरावांच्या घराशेजारच्या द्राक्षाच्या मांडवाकडे गेले. बागेतली इतर द्राक्षे कशी लांबसडक होती. त्यांच्या भाषेत ’मणी’ लांबट होते. पण त्यांच्या घराजवळचे ’मणी’ मात्र इवलुसे होते. पण त्यांची गोडी, स्वाद आणि खुमारी काही वेगळीच होती.
 
 
मी म्हणालो, वसंतराव तुमचे घराजवळच्या मांडवाकडे लक्ष नाही दिसत - ’मणी बघा कसे छोटे आहेत! त्यावर वसंतरावांनी दिलेल्या उत्तराने माझे डोळे खाडकन उघडले, वसंतराव म्हणाले - ’डॉक्टर, हे मणी घरी खायला राखलेत!’
 
 
अच्छा, म्हणजे घरी खायला त्यातल्या त्यात कमी फवारणी आणि जिबरेली नावाच्या संप्रेरकाचा कमी वापर करायला पाहिजे. आणि तुमच्या आमच्यासारख्या चोखंदळ ग्राहकांना शहरात विकण्यासाठी तुफान रासायनिक पदार्थांचा वापर केलेली द्राक्षे. का तर ती मोठी, लांबट, देखणी आणि आकर्षक आहेत म्हणून त्यांना भाव जास्त मिळणार.
 
 
संपूर्ण जगातील अन्न उत्पादक थोड्या फार फरकाने हेच तत्त्व वापरीत आहेत. नुकताच ’द लॅन्सेट’ या जगन्मान्य संशोधन संस्थेने एक विशेष समिती नेमून अन्नधान्य उत्पन्न आणि पर्यावरणावर होणारे परिणाम यावर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 
 
पर्यावरणावर जे मानवाच्या आधुनिक जीवनाचे गंभीर दुष्परिणाम होत आहेत त्यामध्ये अन्नशेतीचा वाटा खूप मोठा आहे. अनैसर्गिकपणे शेती करण्याचे अनंत तोटे, गैरफायदे व कधीही भरून न निघणारे दुष्परिणाम आता उघडपणे दिसू लागले आहेत. हवामान, पाण्याचे स्रोत, जैववैविध्य यांवर या प्रदूषक अशा शेती पद्धतीमुळे जे परिणाम होत आहेत ते पाहून असे वाटते की, शेती केवळ अर्थकेंद्री करून मानव स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारीत आहे. कृत्रिम बियाणे, खते, कीटकनाशके, संप्रेरके व इतर अनेक रासायनिक पदार्थांच्या अनिर्बंध वापराने विषयुक्त अन्न आपल्याच बांधवांच्या पोटात जात आहे व त्यामुळे सर्दीपासून ते कर्करोगापर्यंत विविध असे बरे न होणारे आजार निर्माण होत आहेत, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. आधुनिक शेतीमुळे वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण धोक्याच्या पातळीच्या वर दुप्पटीने वाढले आहे. जमिनीचा पोत खराब होऊन त्या कायमच्या आजारी होत चालल्या आहेत. जमिनीखालील शुद्ध पाण्याचे स्त्रोत उसासारख्या पिकामुळे नामशेष होत चालले आहेत. मांस उत्पादनामुळेही हवेतील नत्रवायूचे प्रमाण वाढत आहे.
 
 
हे सर्व कशासाठी, तर अधिकाधिक उत्पन्न मिळवून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी, या शिवाय फळे, भाज्या, धान्ये यांवर प्रक्रिया करणे, ती साठविण्यासाठी मोठमोठी शीतगृहे बांधणे, लांबवर पाठविण्यासाठी दळणवळणाची साधने आणि त्याकरिता विद्युत् व पेट्रोलियम पदार्थांचा प्रचंड वापर केल्यामुळे खाद्यवस्तूंचे भाव कमालीचे वाढतात; जे भारतासारख्या देशातील कित्येक लोकांना परवडत नाहीत. 2050 पर्यंत आर्थिक विकास करण्याच्या 127% करण्याचे प्रयत्न चालू असताना अन्नाची चव, स्वाद, पोषणमूल्य यांकडे देखील विशेष लक्ष पुरविले पाहिजे. आयुर्वेद शास्त्राच्या मते रोज थोडे थोडे विष पोटात जाणे म्हणजे ’गरविष’ होय. जे हळूहळू आपल्या तब्येतीचा नाश करते. जल, वायू, भूमी इत्यादींचे विषारी होणे म्हणजे जनपदोध्वंस, आता या सर्वांबरोबरच कालाचेही प्रदूषण झाले आहे.
 
 
हरियाणा व पंजाबमधील शेतकर्‍यांनी आपली शेते पेटवून दिल्यावर दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर किती वाढतो हे आपण दरवर्षी पाहातो.
 
 
आता यावर उपाय काय आहेत? ही समस्या कोणा एकट्याने निर्माण केली आहे किंवा फक्त आमचा अन्नदाता मायबाप शेतकरीच याला जबाबदार आहे का? तर अजिबात नाही. ही समस्या सर्व मानवजातीची आहे. सर्व मानवजातीने एकत्र मिळूनच ती सोडवली पाहिजे. गुंतागुंत खूप आहे पण तो गुंता हळुवारपणे सोडवला पाहिजे. तो सहज सुटेल का? तर नाही. त्यासाठी दीर्घकाल योग्य दिशेने प्रयत्न मात्र केले पाहिजेत. हा प्रश्न आपल्या अस्तित्वाचा आहे. ’हम भी जिंदा रहे और इकॉनॉमी भी आगे बढे’ असा काही तरी मध्यममार्ग शोधला पाहिजे.
आपण करण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे सर्वांनीच अन्नाची नासाडी टाळली पाहिजे. हवे तेवढे खा, पचेल ते आणि तितकेच खा. एकंदर खाऊनही माजू नका आणि अन्न टाकूनही माजू नका असे धोरण अंगिकारले पाहिजे. अन्नाची, पाण्याची व सर्व निसर्ग साधनांची काटकसर करावयास मानवाने शिकले पाहिजे.
टिकाऊ धान्य निर्माण केले पाहिजे व त्यासाठी नैसर्गिक, विषमुक्त जैविक शेतीचा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे. त्यासाठी योग्य प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. स्थानिक व पारंपरिक बि-बियाणे, स्थानिक पदार्थांचा वापर आपल्या रोजच्या आहारामध्ये केला पाहिजे.
 
 
An apple a day keeps doctor away असे आपण महाराष्ट्रातील लोकांनी नाही म्हणायचे. ते म्हणायचे तिकडे हिमालयातल्या लोकांनी. आपण आपल्या स्थानिक पातळीवर आपल्या भागात सहज उपजणारी फळे, भाज्या, धान्ये, कडधान्ये खावयाचे. पेरू, चिक्कू, जांभळे, करवंदे, आवळा, आळू, बोरे इत्यादी फळे काही कमी पौष्टिक नाहीत. ताजी, जवळपास सहज मिळणारी कोणतीही फळे हीच स्वस्त आणि मस्त असतात.
 
 
खाद्य सवयींमध्ये प्रदेशाप्रमाणे, हवामानाप्रमाणे, ऋतूंप्रमाणे बदल करावयास हवा. एकच एक पदार्थ सार्‍या जगभर खाल्ला जाऊ नये, ज्या प्रदेशात जे सहज, नैसर्गिकपणे पिकते तेच तेथील लोकांनी आवर्जून खाल्ले पाहिजे. ते आरोग्याच्या आणि खिशाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. खाण्यामधे विविधता हवी. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ही जाहिरात ऐकून व त्याप्रमाणे वागून कित्येक लोकांनी आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करून घेतला आहे. आयुर्वेदानुसार कोणताही पदार्थ सर्वथा चांगला नसतो आणि वाईटही नसतो. तो कोणी, किती कसा, केव्हा, कशाबरोबर खाल्ला याला व्यक्तीपरत्वे वेगवेगळे महत्त्व असते.
 
 
आपण जाणतोच की, जगातील सर्वांत मोठी संघटना असलेला ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ यंदा आपल्या शताब्दी वर्षानिमित्त समाजामध्ये पंचपरिवर्तन हे अभियान चालवित आहे. ज्याचा उद्देश भारतामध्ये व सामाजिक आणि राष्ट्रीय पुनर्निर्माण करण्यासाठी पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे हा आहे. यामध्ये इतर चार आयांमासोबत ’पर्यावरण संरक्षण’ हा एक प्रमुख आयाम आहे. वृक्षारोपण, जलसंरक्षण आणि निसर्गाचे संरक्षण करणे याला खूप महत्त्व आहे. कारण यामुळेच भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहणार आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे मनुष्य व निसर्ग म्हणजेच व्यक्ती आणि समष्टी हे अभिन्न आहेत.
 
 
मानव हा निसर्गाचेच एक रूप असल्याने निसर्ग व मानव यांचे हित व अहित हे एकच असणार आहे. ’निसर्ग जगला तरच मानव जगेल’ हे नक्की. भारत हे एक कृषिकेंद्री राष्ट्र आहे. मधल्या काळामध्ये काही चुका झाल्या असतील, पण आता लोक हळूहळू सजग होऊ लागले आहेत. नैसर्गिक, विषमुक्त, जैविक, पारंपरिक शेतीविषयी अनेक लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. नदी, जंगले यांचे संवर्धन करणारे अनेक प्रकल्प शासकीय व बिगरशासकीय स्तरांवर उभे राहात आहेत. नैसर्गिक शेती कशी फायदेशीर ठरू शकते याविषयी अनेक लोक मोफत मार्गदर्शन करीत आहेत.
 
Environment 
 
दक्षिण भारतामध्ये save soil movement आणि Kauveri calling अशी जनआंदोलने उभी राहात आहेत. एकट्यादुकट्याने प्रयत्न केला तर तो सफल होईल असे नाही, मात्र गटागटांनी, गावागावांनी जर सामूहिक प्रयत्न केले तर मात्र त्याला लवकर यश प्राप्त होईल. पारंपरिक बी-बियाणांची जपणूक, संवर्धन करणार्‍या राहीबाई पोपेरे गावोगावी निर्माण झाल्या पाहिजेत. एकच एक पीक सर्वदूर न होता विविध देशी पिके आलटून पालटून घेत जमिनीचा पोत कायम राखला पाहिजे. गोमातेच्या साहाय्याने शाश्वत शेती विकास साधला पाहिजे.
 
 
स्व. अटलजींच्या भाषेत सांगायचे झाले तर - ‘माना कि अंधेरा घना हैं, लेकिन दीया जलाना कहाँ मना है?’ जरी या क्षेत्रात जागतिक स्तरावर अंधार पसरला असला तरीही स्वयंप्रकाशी अनेक दिवे आपल्या अवतीभोवती आहेत. असे प्रकाश पुंज आहेत. आपण त्यामुळे परिवर्तनाची आशा बाळगण्यास काहीच हरकत नाही.
 
लेखक एम. डी. (आयु.) आहेत.
Powered By Sangraha 9.0