...परि ‘साहित्य’रूपे उरावे!

विवेक मराठी    13-Nov-2025
Total Views |
@सत्येन सुभाष वेलणकर
 
vivek 
थोर इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी प्रचंड मेहनतीने साकारलेले त्यांचे अप्रकाशित साहित्य लवकरात लवकर प्रकाशित करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे साहित्य प्रकाशित करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली पावले उचलून त्यांचे हे अप्रकाशित आणि मोलाचे साहित्य येत्या वर्षभरात प्रकाशित करण्याचा संकल्प भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीपदादा रावत यांनी घेतला आहे. मेहेंदळे जरी शरीररूपाने आज आपल्यात नसले तरी त्यांनी करून ठेवलेल्या प्रचंड कामाच्या रूपाने ते सदैव आपल्यातच राहतील आणि इतिहास संशोधकांच्या पुढच्या अनेक पिढयांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहतील याविषयी यत्किंचितही शंका नाही!
 
ज्येष्ठ इतिहासकार व शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे 17 सप्टेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या या आकस्मिक निधनामुळे भारतातील इतिहास संशोधन क्षेत्राची अपरिमित हानी झाली. महाराष्ट्राला इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, ग. ह. खरे, दत्तो वामन पोतदार, सेतुमाधवराव पगडी, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या थोर इतिहासकारांची परंपरा लाभली आहे. गजानन भास्कर मेहेंदळे हे देखील त्याच थोर परंपरेतले एक इतिहासकार! 1971 च्या बांगलादेश युद्धात प्रत्यक्ष सीमेवर जाऊन युद्धाचे वार्तांकन केल्यानंतर मेहेंदळे पुण्याला परत आले. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा युद्धशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. थोर इतिहास संशोधक ग. ह. खरे हे त्यांना गुरू म्हणून लाभले. शिवचरित्राच्या आणि मुघल कालखंडाच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली फार्सी भाषा देखील त्यांनी आत्मसात केली. याच काळात ते पुणे विद्यापीठातून युद्धशास्त्र या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेत होते. त्यातही प्राविण्य मिळवत त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले.
 
 
vivek
 
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा युद्धशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करावा असा त्यांचा मानस होता, परंतु कालांतराने संपूर्ण शिवचरित्राचा सखोल अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सखोल संशोधन करून शिवचरित्र लिहिण्याचे अवघड काम हाती घ्यायचे ठरवले. शिवकाळाच्या आणि मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली फार्सी भाषा त्यांनी आत्मसात केलीच होती, परंतु शिवचरित्राच्या सखोल अभ्यासासाठी त्यांनी डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच भाषाही शिकून घेतल्या. सबळ, अस्सल आणि उत्तम पुरावा असल्याशिवाय काहीही लिहायचे नाही असा त्यांचा शिरस्ता होता. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक वाक्याला उत्तम असे एकाहून अधिक मूळ ग्रंथातले संदर्भ त्यांच्या लेखनात वाचकांना व अभ्यासकांना पाहायला मिळतात.
 
 
1996 साली मेहेंदळे यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीतून आणि संशोधनातून साकारलेले ‘श्री राजा शिवछत्रपती’ हे अफजलखान वधापर्यंतच्या घटनांचा समावेश असलेले शिवचरित्र, दोन खंडात प्रकाशित झाले. यापैकी पहिल्या खंडात शिवपूर्वकाळातील भारताची स्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांचे प्रारंभीच्या काळातील कर्तृत्व आणि अफजलखान वधापर्यंतच्या घटनांचे विस्तृत संशोधनात्मक लिखाण त्यांनी केले आहे. सुमारे हजार पानांच्या या खंडात तळटीपांची संख्याच 4000 पेक्षा जास्त आहे! दुसर्‍या खंडात शिवछत्रपतींच्या चरित्राच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या अनेक विषयांवरील परिशिष्टे आहेत. शिवचरित्रावर यापूर्वी एवढे सखोल आणि संशोधनात्मक काम झाले नव्हते. पुढील काळात त्यांनी संपूर्ण शिवचरित्र इंग्रजी भाषेत लिहून ते Shivaji : His Life and Times या नावाने 2011 साली प्रसिद्ध केले. याशिवाय शिवछत्रपतींचे आरमार, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती सेवक, Tipu as He Really Was, आदिलशाही फर्माने अशी एकाहून एक सरस आणि सखोल संशोधनाने परिपूर्ण अशी पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.
 
 चित्रमित्रकडून अमूल्य भेट

vivek
 
गेल्या काही वर्षांमध्ये इतिहासाच्या आणि शिवचरित्राच्या होत असलेल्या हेतूपुरस्सर विकृतीकरणामुळे आणि औरंगजेब आणि टिपू सुलतान यासारख्या क्रूरकर्म्यांच्या उदात्तीकरणामुळे मेहेंदळे उद्विग्न झाले होते. परंतु या विकृतीकरणाला उत्तर देण्यासाठी इतिहासकाराकडे एकच शस्त्र आहे, ते म्हणजे परिणामांची तमा न बाळगता सत्य सांगत राहणे, असे ते नेहमी म्हणत. याच प्रेरणेमधून त्यांनी काही वर्षांपूर्वी भारतातील इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण पुराव्यानिशी स्पष्ट करणारे संशोधनात्मक लेखन करण्याचे काम हाती घेतले होते. यामध्ये इस्लामच्या उदयापासून, मुहम्मद बिन कासीम, मुहम्मद घोरी, दिल्ली सल्तनत, बाबर ते शाहजहान, औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल, हैदर आणि टिपू सुलतान, इतर प्रांतिक इस्लामी सल्तनती इत्यादींचे इतिहास, त्यांचे धार्मिक धोरण आणि त्यांनी केलेल्या अत्याचारांचे विस्तृत चित्रण करण्याचा त्यांचा संकल्प होता आणि हे सर्व लिखाण त्यांनी पूर्णही केले. याच मालिकेतील इस्लामच्या उदयाची आणि त्यासंबंधीच्या इतिहासाची माहिती देणारा इस्लामची ओळख हा ग्रंथ त्यांनी 2024 साली प्रकाशित केला. या प्रकल्पातील दुसरे पुस्तक, औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल त्यांनी लिहून पूर्ण केले आणि त्याचे प्रकाशन होण्यापूर्वीच त्यांचे आकस्मिक निधन झाले.
 

vivek
 
युद्धशास्त्र हा मेहेंदळ्यांचा अतिशय आवडता विषय. त्यामुळे या विषयाशी संबंधीत असलेल्या दुसर्‍या महायुद्धावर सुमारे हजार पानांचे दहा खंड लिहिण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार पहिले महायुद्ध, दुसर्‍या महायुद्धाची पार्श्वभूमी आणि हिटलरचा उदय, दुसर्‍या महायुद्धात वापरले गेलेले गुप्त संदेश अर्थात कोड्स आणि सायफर्सचा रंजक इतिहास इत्यादी विषयांवर त्यांनी सुमारे पाच हजार पाने लिहून ठेवली आहेत! या शिवाय अफझलखानाच्या वधानंतर घडलेल्या शिवचरित्रातील महत्त्वाच्या विषयांवरील परिशिष्टांचे लिखाण देखील मेहेंदळे यांनी करून ठेवले आहे.
 
 
अशा या थोर इतिहास संशोधकाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळाने 9 नोव्हेंबर 2025 रोजी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात श्रद्धांजली सभा आयोजित केली. या सभेला आय.सी.एच.आर.चे चेअरमन रघुवेंद्र तंवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी उपस्थित होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आदी अनेक मान्यवरांनी मेहेंदळे यांच्या आकस्मिक निधनाबद्दल हळहळ व्यक्त करणारे शोकसंदेश पाठविले होते. त्याचे वाचन या सभेत करण्यात आले. मेहेंदळे यांनी प्रचंड मेहनतीने साकारलेले त्यांचे अप्रकाशित साहित्य लवकरात लवकर प्रकाशित करणे आता महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे साहित्य प्रकाशित करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली पावले उचलून त्यांचे हे अप्रकाशित आणि मोलाचे साहित्य येत्या वर्षभरात प्रकाशित करण्याचा संकल्प भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीपदादा रावत यांनी घेतला.
 
 
गजानन भास्कर मेहेंदळे जरी शरीररूपाने आज आपल्यात नसले तरी त्यांनी करून ठेवलेल्या प्रचंड कामाच्या रूपाने ते सदैव आपल्यातच राहतील आणि इतिहास संशोधकांच्या पुढच्या अनेक पिढयांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहतील याविषयी यत्किंचितही शंका नाही!