दुसर्‍या काश्मीर युद्धाची नांदी

15 Nov 2025 13:06:36
भारत स्वतंत्र झाल्यावर सैन्यदलेही अर्थातच स्वतंत्र भारतीय अस्मितेची प्रतीके बनली. भूदल, नौदल आणि वायुदल यांच्या संज्ञेतला ‘रॉयल’ हा शब्द गाळला गेला. भूदल हे ’इंडियन आर्मी’, नौदल हे ’इंडियन नेव्ही’ आणि वायुदल हे ’इंडियन एअर फोर्स’ बनले. त्यांच्या संज्ञेमधला ’रॉयल’ हा ब्रिटिश गुलामगिरी दर्शवणारा शब्द बाद झाला. या भारतीय सैनिकी दलांनी स्वातंत्र्योत्तर काळात गाजवलेल्या पराक्रमांच्या गाथा आपण प्रस्तुत स्तंभातून पाहात आहोत. 1947-48चे पहिले काश्मीर युद्ध, 1948ची हैद्राबाद- जुनागड कारवाई आणि 1961ची गोमंतक मुक्ती मोहीम यानंतर आता वळूया 1965च्या भारत-पाक युद्धाकडे. यालाच ‘दुसरे काश्मीर युद्ध’ असेही म्हटले जाते.

pakistan
दिनांक 1 सप्टेंबर 1965 या दिवसाची भली पहाट होत होती. पहाटे ठीक 3 वाजून 30 मिनिटे झाली... आणि काश्मीरच्या भिंबर-छांब या क्षेत्रात तोफांचा प्रचंड गडगडाट सुरू झाला. अमेरिकेकडून मिळालेल्या अत्याधुनिक तोफांच्या भडिमाराने पाकिस्तानने भारताविरुद्ध अधिकृतपणे युद्ध सुरू केले. अधिकृतपणे असे म्हणण्याचे कारण एवढेच की, पाकच्या छुप्या लष्करी कारवाया एप्रिल 1965 पासूनच सुरू झालेल्या होत्या. मात्र आपले सैन्य, अशा रीतीने भारतावर आक्रमण करीत आहे, हे पाकने मान्य केले नव्हते. आता पाकने ते जाहीरपणे मान्य केले. प्रत्येक सैनिकी कारवाईला एक विशिष्ट सांकेतिक नाव देण्याची सैनिकी परंपरा जगभर प्रचलित आहे. यानुसार या मोहिमेला पाक सेनापतींनी नाव दिले होते- ’ऑपरेशन ग्रँडस्लॅम’,
आपण जर पत्यांमधल्या ब्रिज या खेळाशी परिचित असाल, तर आपल्याला माहीत असेल की, ग्रँडस्लॅमचा डाव म्हणजे हुकुमाची पाने. या डावाला प्रतिस्पर्धी भिडूंकडे प्रतिडाव नसतो. म्हणजेच ग्रँडस्लॅमचा अर्थ स्वपक्षाचा हमखास विजय, प्रतिपक्षाचा हमखास पराभव.
आता 1965 साली भारताची 15 राज्ये आणि 10 केंद्रशासित प्रदेश होते. उलट पाकची फक्त 5 राज्ये होती. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक सर्वच दृष्टींनी भारत खूपच मोठा आणि प्रगत होता. तरीही आपण भारतावर मात करू, अशी घमेंड पाकच्या मनात निर्माण का झाली? 1965 च्या भारत-पाक युद्धातल्या समरांगणावरच्या पराक्रम गाथा पाहाण्यापूर्वी आपल्याला भारत आणि पाकिस्तान दोघांच्याही राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा मागोवा घ्यायला हवा. तरच आपल्याला या संघर्षाचा अर्थ कळू शकेल.
भारत-पाक : समांतर वाटचाल
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, तर पाकिस्तान एक दिवस अगोदरच 14 ऑगस्ट 1947 रोजी नव्याने निर्माण झाला. स्वतंत्र भारत सरकार ज्या राजकीय पक्षाने बनवले, त्या पक्षाच्या म्हणजेच त्या पक्षाच्या नेत्यांच्या देशाच्या राज्यकारभाराबद्दल काही ठाम धारणा होत्या, चिंतन होते. कदाचित ते चिंतन भ्रांत होते, भारताच्या प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरांवर आधारित असण्यापेक्षा ते पाश्चिमात्य आदर्शावर आधारित होते, असे म्हणता येईल. पण कसे का असेना, काहीतरी विचार होता. धारणा होत्या. चिंतन होते. यामुळे स्वातंत्र्य प्रत्यक्ष मिळण्याआधीच म्हणजे डिसेंबर 1946 मध्येच घटना समिती बनलेली असून तिने स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवायला सुरुवात देखील केलेली होती. ही राज्यघटना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या सव्वा दोन वर्षांत म्हणजे 26 जानेवारी रोजी लागू होऊन भारत हा आता स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रजासत्ताक देश झाला देखील. लगेच 1951 सालच्या एप्रिल महिन्यात भारताने ’पहिली पंचवार्षिक योजना’ लागू केली. ऊर्जानिर्मिती, जलसिंचन आणि कृषी या अत्यंत मूलभूत क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी परिवर्तन करण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाकांक्षी पाऊल होते. पाठोपाठ 1952 साली भारताने पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या. 21 वर्षांवरील प्रत्येक भारतीय व्यक्तीने मतदानाचा अधिकार बजावण्याचा हा आधुनिक इतिहासातला पहिला प्रसंग. लगेच 1955 साली भारताने ’भाक्रा-नांगल’ हा सतलज नदीवरचा अत्यंत भव्य आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी असा धरण प्रकल्प सुरू केला.
 

pakistan 
जलसिंचन आणि कृषी क्षेत्रांसाठी अशा भव्य योजना सुरू करत असतानाच भारत सरकारचे औद्योगिक - कारखानदारी क्षेत्राकडेही लक्ष होते. 1950 साली बंगालमध्ये ’चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स’ हा कारखाना सुरू करून भारताने वाफेची इंजिने स्वदेशात बनवायला सुरुवात केली. 1951 साली ’सिंद्री खत कारखाना’, 1953 साली ’हिंदुस्थान मशीन टूल्स’, 1956 साली ’हेवी इलेक्ट्रिकल्स इंडिया लिमिटेड’ (पुढे ’भेल’), 1955 साली ’भिलाई स्टील’, 1956 साली ’इंटेग्रल कोच फॅक्टरी’, 1959 साली ’दुर्गापूर स्टील’ आणि ’राऊरकेला स्टील’ असे विशाल उद्योगक्षेत्र भारताने उभे केले.
आता याच काळातील पाकिस्तानची वाटचाल पाहा. 11 ऑगस्ट 1947 म्हणजे देश निर्मितीपूर्वी फक्त तीन दिवस अगोदर पाकिस्तानची घटना समितीची पहिली बैठक झाली. पाकिस्तानचे निर्माते बॅरिस्टर जिना यांनी घटना समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन म्हणून केलेल्या भाषणात सांगितले की, पाकिस्तानची घटना कुणाही नागरिकाला एक व्यक्ती म्हणून वागवेल. पाक शासन हे धर्म, जात, संप्रदाय यांच्या पलिकडे असेल.
हे भाषण जिनांनी ज्या सिद्धांतावर पाकिस्तान निर्माण केले, तो सिद्धांतच मोडीत काढणारे होते. इंग्रज भारतातून निघून गेल्यावर आम्हा मुसलमानांना हिंदूंसोबत एकत्र राहायचे नाही. आम्हाला आमचा वेगळा देश हवा. कारण हिंदू आणि मुसलमान ही निसर्गतःच दोन वेगळी राष्ट्रे आहेत. असा ’द्वि-राष्ट्र सिद्धांत’ मांडून, मुसलमानांना भडकवून, दंगे करायला लावून आणि त्याद्वारे अहिंसावादी हिंदू नेत्यांना घाबरवून जिनांनी पाकिस्तान मिळवला. याचा अर्थ, पाकिस्तान हा फक्त मुसलमानांचा देश आहे आणि तो इस्लामी कामद्यानुसार चालणार, असा होतो. पण जिना तर म्हणतायत, पाक शासन हे धर्म, जात, संप्रदाय यांच्या पलीकडे असेल. केमाल पाशाने तुर्कस्तानचे नवनिर्माण करताना ज्याप्रमाणे धर्म आणि राज्यशासन यांची पूर्ण फारकत केली, असा काही नमुना जिनांच्या डोळ्यांसमोर होता का? कळायला मार्ग नाही. कारण घटना समितीची ही बैठक झाल्यानंतर बरोबर तेरा महिन्यांनी दिनांक 11 सप्टेंबर 1948 या दिवशी जिना मरण पावले.
शासकीयदृष्ट्या जिना हे गव्हर्नर जनरल या सर्वोच्च पदावर होते आणि लियाकत अली खान हे पंतप्रधान होते. आता जिनांच्या जागी ख्वाजा निजामुद्दिन हे गव्हर्नर जनरल बनले. पण अल्पावधीतच खरी राजकीय सत्ता पंतप्रधान लियाकत अली यांनी स्वतःकडे खेचून घेतली. परंतु 1951 साली लियाकत अली यांचा खून झाला. ख्वाजा निजामुद्दिन यांनी गव्हर्नर जनरल पदावरून पंतप्रधान पदावर उडी मारली. 1952 साली पूर्व पाकिस्तान या बंगाली भाषिक प्रांतात भाषेच्या प्रश्नावरून प्रचंड दंगा झाला. भरपूर माणसे मेली. परिणामी निजामुद्दिन यांची उचलबांगडी होऊन तिथे मुहंमद अली बोगरा हे पंतप्रधान झाले. राजकीय नेते अशा प्रकारे सुंदोपसुंदीत निमग्न असताना राज्यघटना बनवण्याचे तसेच भिजत पडलेले होते. अखेर 1956 साली, स्वातंत्र्य मिळाल्यावर तब्बल नऊ वर्षांनी, राज्यघटना एकदाची बनली आणि लागू झाली.
 

pakistan 
जनरल अयुबखान
 
या नऊ वर्षात शेती, जलसिंचन, ऊर्जानिर्मिती या पायाभूत क्षेत्रांच्या विकासासाठी पाक सरकारने काय काम केले? काहीही नाही. उद्योग, कारखानदारी या आधुनिक क्षेत्रांच्या विकासासाठी काम केले? काहीही नाही. मग देश चालत कसा होता? अगदी 1948 सालापासूनच अमेरिका पाकिस्तानला आर्थिक साहाय्य करत होती. 1954 साली पाकिस्तान ’साऊथ ईस्ट एशियन ट्रोटी ऑर्गनायझेशन’ उर्फ ’सीटो’ या गटात सामील झाला. तर 1955 साली तो ’सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन’ उर्फ ’सेंटो’ या गटात सामील झाला. हे दोन्ही गट अमेरिका आणि ब्रिटन यांच्या प्रमुखत्वाखाली काम करणारे असून आशिया खंडातील सोव्हिएत गटाचा वाढता प्रभाव रोखणे, हे यांचे उद्दिष्ट होते. या करारांमुळे पाकिस्तानचा दैनंदिन पोटापाण्याचा प्रश्न मिटला.
 
 
पाकिस्तान निर्माण झाला यावेळी जनरल फ्रँक मेसर्व्ही हा पाक सैन्याचा पहिला सेनाप्रमुख बनला. लगेचच 1948 साली तो निवृत्त होऊन या जागी जनरल डग्लस ग्रेसी आला. तो देखील 1951 निवृत्त होऊन त्याच्या जागी जनरल मुहंमद अयुबखान आला.
1956 साली राज्यघटना लागू होईपर्यंतचे राजकीय नेतृत्वाचे तमाशे जनरल अयुबखान बघत होताच. 1954 आणि 1955च्या सीटो आणि सेंटो करारांमुळे पाकिस्तानी सेनेला अत्याधुनिक तोफा-बंदुका, रणगाडे, युद्धनौका, पाणबुड्या, फायटर जेट विमाने, अत्याधुनिक रडार यंत्रणा अशी सगळी सामग्री फ्रान्स, ब्रिटन आणि मुख्यत: अमेरिकेकडून मिळाली. अयुबखान असे आपले बळ वाढवत राहिला आणि अखेर ऑक्टोबर 1958 मध्ये त्याने राष्ट्रपती इस्कंदर अली मिर्झा याचे सरकार उलथून टाकले. राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही दोन्ही पदे एकत्रितपणे स्वतःच्या हाती घेऊन त्याने स्वतःच स्वतःला ’फील्ड मार्शल’ ही पदवी घेतली आणि राज्यघटना रद्दबातल केली. अशा प्रकारे उत्तर कोरिया आणि चीन यांच्यानंतर पाकिस्तान हा हुकुमशाही देश बनला. याची जबाबदारी मुख्यतः राजकीय नेतृत्वाकडेच जाते. भारताचा म्हणजेच हिंदू समाजाचा द्वेष करणे, खेरीज पाकिस्तानी राजकीय नेतृत्वाकडे कोणताही सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक कार्यक्रमच नव्हता. मग आता करायचे काय? तर भारतावर आक्रमण करा... असाच त्यांनी विचार केला.
Powered By Sangraha 9.0