भारतीय जनसंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप संस्थापक प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. नानासाहेब उत्तमरावजी पाटील यांच्या दिनांक १८ नोव्हेंबर रोजी २४ व्या पुण्यस्मृतिदिना निमित्ताने त्यांचे कृपापात्र, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते व पत्रकार अनिलकुमार द्वा.पालीवाल यांनी जागवलेल्या शब्दांकित आठवणी....
महाराष्ट्राच्या स्वातंत्र्योत्तर राजकारणातील एक निष्ठावान पर्वाचे निर्माते, मार्गदर्शक व प्रेरणास्थान म्हणून ज्यांना मानाचं स्थान आहे, असे स्व. मा.नानासाहेब उत्तमरावजी लक्ष्मणराव पाटील यांचा आज २४ वा पुण्यस्मृतीदिवस! नानासाहेब यांचा जन्म वाघळी तालुका चाळीसगाव येथील सूर्यवंशी कुळातील. शेतीशी व मातीशी अतूट नाते असलेले हे कुटुंब संपूर्ण खानदेशातील प्रसिद्ध असे असल्याने नानासाहेब यांनी वकिलीचे उच्च शिक्षण घेऊन जवळच असलेल्या धुळे येथे आपल्या वकिलीच्या कार्याची प्रॅक्टिस सुरू केली. व अल्पावधीत नांव कमावले. राष्ट्रीय विचारानं प्रेरित होऊन सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या ध्येय धोरणांवर कटाक्ष ठेवत एक शेतकरी पुत्र नात्याने त्यांना संघ व जनसंघाचे तत्कालीन प्रचारक व वरिष्ठांनी हेरले आणि नाना एकदाचे जनसंघाचे झाले ते जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत. त्यावेळी राज्यात काँग्रेस व जनसंघात दोन नानासाहेब प्रसिद्ध होते. काँग्रेसचे स्व. यशवंतराव चव्हाण व क्रांतिवीर नाना पाटील तर जनसंघाचे कर्नाटक केसरी स्व.जगन्नाथराव जोशी व स्व. बिंदुमाधव जोशी. त्यात तिसरे नाना जनसंघाचे उत्तमराव पाटील यांच्या कार्याची छाप त्यांना राजकीय पातळीवर नावारूपास आणण्यासाठी कामी आली. राज्य पातळीवर नानांचा नावलौकिक झाला तो शेतकऱ्याच्या समस्यांवर त्यांनी प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेमुळे. कारण खानदेशातील कापूस उत्पादक शेतकरी पूर्वीपासूनच एकाधिकाराने होरपळला असून नानांनी त्यावर सरकारला धारेवर धरलं आणि ही ठिणगी संपूर्ण राज्यात आंदोलन रूपाने त्यावेळी शेतकरी बांधवांच्या कामी आली. जनसंघ त्यावेळी ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं जात होता... त्यातच राज्यात नानांकडे मराठा नेतृत्व म्हणून वरिष्ठ जनसंघ नेत्यांनी जबाबदारी द्यायचं ठरवलं... एकीकडे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन पेटलेलं... गुजराथ व मुंबई यांचा राजधानी वाद, त्यातच देशात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यात. महाराष्ट्र राज्य सर्व विरोधी पक्षांनी ह्या निवडणुकीत आपली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली व निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले. अन् नानासाहेब त्यावेळच्या धुळे लोकसभा मतदार संघात समितीच्यावतीने जनसंघाच्या दिवा या चिन्हावर प्रचंड मतांनी विजयी झाले. त्यावेळी देशातून जनसंघाचे दोनच खासदार विजयी झालेत, त्यात नानासाहेब धुळ्यात व दिवंगत पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी जी हे उत्तर प्रदेश च्या बलरामपूर येथून विजय मिळवून लोकसभेत दाखल झाले.. त्याचवेळी नानांनी लोकसभेत राष्ट्रीय, राज्य व मतदार संघातील अनेक समस्या, प्रश्न मांडून त्या सोडवल्या देखील.... हळूहळू नाना सर्वच राजकीय पातळीवर यशस्वी होऊ लागले होते. जनसंघाचे विधान परिषदेत पदवीधराचे आमदार व विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी आपली कारकिर्द गाजवली. सत्तावीस वर्ष आमदार व विरोधी पक्ष नेते असताना विविध शासकीय समित्यांवर, लोकसभा व विधानमंडळ समिती यावर त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली....त्यांच्या या संदर्भात संसदीय वाटचाल व कायदा व कामकाज यावर स्व. दि.घ.दातार यांचं "सूर्यफूल" नावाचे स्वतंत्र असे आत्मपरिचयात्मक पुस्तक प्रसिद्ध झाले असून त्यात नानांचा संपूर्ण जीवन प्रवास सादर केला आहे. त्यांच्या या संदर्भात भरपूर आठवणी मांडल्या तर वेळ अपूर्ण पडेल. संक्षेपाने सांगायचं तर काही ठळक मुद्दे आपण पाहू या. एक संघर्षमय राजकीय जीवन जगत त्यांनी काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या ऑफर्स अनेकदा धुडकावल्यात. पण जनसंघ सोडला नाही. ह्या सर्व वाटचालीत १९७५ ची आणीबाणी आठवते. त्यावेळी संपर्क साधन म्हणून पत्र... त्यांनी आणीबाणीत जवळजवळ बाहेर राहून दहा हजार पत्र लिहिलीत व कार्यकर्त्यांशी जनसंपर्क कायम ठेवला. राज्यातील सर्व कार्यकर्ते अगदी नानासाहेब यांचे तोंडपाठ... ज्या गावात जात तेथे कार्यकर्त्यांना आधी पूर्वसूचना असे... आपल्या लोकसंग्रहाचे रहस्य त्यांनी एका मुलाखतीत आमच्याशी उलगडले होते. नाना नेहमी म्हणायचे लोक त्यांच्या काम केल्याशिवाय तुमच्या जवळ येत नसतात. विरोधी नेते असूनही सत्ताधाऱ्यात त्यांचे वेगळेच नैतिक वजन होते. माणसं जोडण्याची अद्भुत कला त्यांना अवगत होती. त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी स्थापनेच्या बांद्रा रिक्लेमेशन च्या प्रथम अधिवेशनात लोकसंग्रह कसे करावे, ते मी अनुभवले... आम्ही चोपड्याहून चाळीस ते पन्नास कार्यकर्ते जळगाव स्टेशन वरून बसलो होतो. स्व.चंद्रकांतकाका मेंडकी, व अन्य वरिष्ठ नेते मंडळी आमच्यासोबत होते. मुंबईला दादर रेल्वे स्टेशनवर सर्व कार्यकर्ते गोळा होऊन बांद्रा अधिवेशन स्थळी पायीच निघाले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी चहापान व्यवस्था केली होती. मुंबई भाजप ची युवा मंडळी नियंत्रण व नियोजन कामात व्यस्त होती. किरीट सोमय्या, रमेश मर्ढेकर, विनोद तावडे, मेघाताई कुलकर्णी, प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंढे,धर्मचंदजी चोरडिया आदी मान्यवर आपापल्या नियोजनात होते. स्व. राम नाईक, हसु अडवाणी, वामनराव परब, आदी नेते नानासाहेबांच्या मार्गदर्शनात कार्यरत होते. उद्घाटन सत्र आटोपले होते. स्व. व्यंकप्पआ नायडू, सिकंदर बख्त, मदनलाल खुराणा, बॅरिस्टर राम जेठमलानी, बॅरिस्टर एम सी छागला यांनी उद्घाटनपर भाषणात उद्याचा भारत आपल्याला घडवायचे आवाहन केले होते. आणि एव्हढे धावपळीत नानांनी आम्हा कार्यकर्त्यांजवळ येऊन विचारपूस केली.कार्यकर्त्यांच्या गराड्यात नानांनी आपलं अपंगत्व व दुःख विसरून सदैव कार्यरत राहिलेत. स्व. नानासाहेब यांच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून यावेळी नियुक्ती घोषित केली गेली. आणि भाजप ची सुरुवात कार्यकर्त्यांच्या जोरावर शून्यातून सुरू झाली.कार्यकर्त्यांना पक्ष कसा चालवला जाईल? हे क्षणोक्षणी नाना पटवून देत.कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायम राहिले व नाना आलेत की, कार्यकर्त्यांना देखील वेगळीच ऊर्जा मिळत असे. यापूर्वीच्या आणीबाणीत त्यांना प्रकृती अस्वस्थता मुळे अटक न करता निव्वळ देखरेखीखाली बंदोबस्ताची व्यवस्थेत राहण्याची मुभा दिली होती. पण नाना स्वस्थ बसूच शकत नव्हते.चोपड्यात देखील त्यांच्या अनेकदा कार्यकर्त्यांची बैठका घेऊन भेटी व्हायच्या. संघ परिवाराचे कार्यकर्ते स्व.मधुकाका माळी यांच्या माडीवर भेटते असत. शाखा भरत नसत पण संपर्क,विचारपूस सुरू राहिली. त्यातून कार्यकर्त्यांचे धाडस बांधण्याचं काम होत असे. त्यातच लोकसभा लागल्यात धुळे मतदारसंघाचे विभाजन होऊन एरंडोलची निर्मिती झाली. नानांना दुसऱ्या विजय नाना ने धुळ्यात पराभूत केले. स्व. सोनुसिंग अण्णांनी एरंडोल जिंकले व तत्कालीन पंतप्रधान स्व. मोरारजी भाईंशी जवळीक असल्याने जनता पार्टीच्या सरकारमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री पद मिळवून आपलं वर्चस्व राखत जळगाव जिल्हा पुन्हा एकदा केंद्रात पोचला. नानांनी तद्नंतरची विधानसभा पारोळा तालुक्यातून जिंकली व राज्याच्या पुलोद मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर महसूलमंत्री म्हणून शपथ घेतली. काही दिवस गेल्यावर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीवांचा मुंबईत अपघाती मृत्यू झाला... नाना पुरते खचले, पण डगमगले नाहीत. पुन्हा सक्रिय होत राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून स्व. गोपीनाथजी मुंढे यांच्याकडे सूत्र दिलीत. नानांची सेवाभाव वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नसे सक्रिय राजकारणात त्यांचे दुसरे सुपुत्र प्रदिप पाटील उतरले, पण जनतेने त्यांना नाकारले. पण नानासाहेब एरंडोल मधूनच अवघ्या साडे चार हजार मतांनी त्याच विजयनांना पाडून धुळ्याचा आपल्या पराभवाचा बदला घेत पुन्हा दुसऱ्या वेळी लोकसभेत पोहचले... वय व प्रकृती मुळे स्व.अटलजींच्या एकोणीस महिन्यांचे आले जरी होते तरी नानांनी अटलजींनी देऊ केलेलं केंद्रीय मंत्री पद विनम्रतेने नाकारले. आणि राज्यपाल पद देखील नाकारत पक्षासाठी काम केले... एक मार्गदर्शक म्हणून त्यांचा अनुभव फार मोठा होता. सत्तेच्या राजकारणापेक्षा त्यांना लोकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यात जास्त रस होता. सत्ता येते आणि जाते. पण आपलं सेवा कार्य कायम संस्मरणीय असावे असे ते नेहेमी सांगत. त्यांच्या आजच्या चोविसाव्या स्मृतिदिनी आठवणीची साठवण दाटून जरी येत असल्या तरी मर्यादा ओळखून माझं मनोगत आवरतो व स्व. नानांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
लेखक...अनिलकुमार द्वा.पालीवाल, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव