नुकत्याच प्रदर्शित झालेल्या, ‘अभंग तुकाराम...कथा संत तुकारामांच्या गाथेची’ या चित्रपटामागचा विचार, निर्मितीप्रक्रिया, पात्रांची निवड, संगीत, कथा, पटकथा, संवाद या मुद्द्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न चित्रपटात तुकारामांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याशी संवाद साधून येथे केलेला आहे.
महाराष्ट्राचे वैभव असलेले आशयसमृद्ध संतसाहित्य आजही कालसुसंगत आहे. आज मानवाला भेडसावणार्या अनेक समस्यांचे समाधान संतसाहित्यात सापडते. म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या या आध्यात्मिक वारशाचे दर्शन चित्रपटातून घडविण्याचा स्तुत्य उपक्रम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या संतपटापासून सुरू केला. या मालिकेतील दुसरे पुष्प म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला ‘अभंग तुकाराम.....कथा संत तुकारामांच्या गाथेची’ हा चित्रपट होय. या चित्रपटामागचा विचार, निर्मितीप्रक्रिया, पात्रांची निवड, संगीत, कथा, पटकथा, संवाद या मुद्द्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न चित्रपटात तुकारामांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याशी संवाद साधून केला आहे.
आजवर संत तुकारामांवर अनेक चित्रपट, नाटक, मालिका प्रदर्शित झाल्या आहेत. असे असताना, ‘अभंग तुकाराम’ हा सिनेमा करावा, हे कसं सुचलं? या चित्रपटाचे वेगळेपण काय आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना दिग्पाल लांजेकर म्हणाले की, “संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवर याआधी अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘अभंग तुकाराम...कथा संत तुकारामांच्या गाथेची’ या शीर्षकातूनच चित्रपटाचे मर्म उलगडते. हा चित्रपट संत तुकारामांची गाथा, त्यांचे साहित्य, अभंग आणि तत्त्वज्ञान यावर आधारलेला आहे. मुळात या चित्रपटाची पूर्ण संकल्पना योगेश सोमण यांच्या ‘आनंदडोह’ या एकल नाट्यावर आधारलेली आहे. अभंग विसर्जित केल्यानंतर तेरा दिवसांनी ते तरले. या तेरा दिवसांच्या प्रवासात तुकोबारायांच्या मनात काय विचार आले, या काळात आजूबाजूच्या समाजात आणि त्यांच्या कुटुंबात काय घडलं, याचा आढावा घेणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट यापूर्वी आलेल्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो.”
चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय मांडण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं की, आताच्या तरुण पिढीला तुकाराम महाराजांच्या विचारांची फार गरज आहे असं आम्हाला वाटतं. आजूबाजूचं वातावरण पाहिलं तर सारेच जण उगीचच नैराश्याच्या गर्तेत बुडलेले दिसतात. युवा पिढी तर लहानसहान गोष्टीने व्यथित होताना दिसते. अशा या स्थितीत योग्य मार्ग दाखवणारं आपलं शाश्वत संतसाहित्य. म्हणूनच आम्ही अभंग तुकाराम या चित्रपटातून तुकारामांच्या व्यक्तिमत्त्वाकडे अभंगांच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी ‘आनंदडोह’ या आपल्या एकल नाट्यप्रयोगावर चित्रपट निर्मितीचा प्रस्ताव मांडला तेव्हा तुमच्या भावना काय होत्या? यावर योगेश सोमण म्हणाले की,“सद्गुरूंची इच्छा! अभंग तुकाराम या चित्रपटाचे मूळ कथानक आणि संवाद हे आनंदडोह या माझ्या एकलनाट्यावरून घेतलेले आहेत. आनंदडोह हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या विचारांचा, जीवनाचा आणि अभंगांचाही वेध घेणारे, परामर्श घेणारे आहे. त्यातील आवली आणि तुकाराम महाराज अशा दोन्ही भूमिका मी स्वतः सादर करतो. साधारण 2010-11 पासून याचे प्रयोग चालू आहेत. अभंग तुकाराम चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे आनंदडोह या नाटकाच्या पहिल्या काही प्रेक्षकांंपैकी एक आहेत. साधारण पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट...आनंदडोह एकलनाट्याच्या अभिवाचनाचा एक प्रयोग आणि प्रत्यक्ष एकलनाट्याचे सलग सात सादरीकरणाचे प्रयोग पाहिल्यानंतर चित्रपट निर्मिती व्हायला हवी हे त्याच्या मनात रूंजी घालू लागले.
रंगकर्मी या नात्याने प्राथमिक चर्चेंखेरीज कोणतीही प्रक्रिया झाली नव्हती. मात्र गेल्या वर्षी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाची संकल्पना पुन्हा चित्रपटाच्या दिशेने पुढे सरकली. आनंदडोहचे सादरीकरण हे मला नाट्यरूपात दिसले आणि तसे झालेही, मात्र दिग्पाल त्यात चित्रदृश्य पाहत होता, याच आधारे पटकथा लेखन दिग्पालने केले.
भक्तीची मक्तेदारी ही आपलीच आहे, अशा भ्रमात असणार्या पंडितांनी(?) जेव्हा तुकोबारायांचे अभंग हे चौर्यकर्म म्हणून हिणवले, तेव्हा तुकोबा उद्विग्न झाले आणि त्यांनी आपल्याच गाथा (अभंग) इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या. तिथून पुढे 13 दिवस ते ईश्वराबरोबर भांडण मांडून बसले होते. भक्ती, श्रद्धा, सत्य, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाचे अस्तित्व - हे तुझे खरेपण तू माझ्या अभंगाच्या वह्या तारून सिद्ध करून दाखवलं पाहिजेस. आणि त्या तेरा दिवसांमध्ये एकूणच अंधश्रद्धा, आस्तिकता, नास्तिकता, भक्तिमार्ग, निराकाराची भक्ती या विषयीची चर्चा अनेक अभंगांच्या माध्यमातून तुकोबारायांच्या आणि आवलीच्या तेरा दिवसांच्या स्वगतातून मांडलेले आहे. या सिनेमाची सुरुवात होते, संत तुकाराम महाराजांवर दाखल केलेल्या दिवाणी दाव्याने. हा दावा वाघोलीमध्ये सुरू होतो. महाराज विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताहेत असा सुरुवातीचा प्रसंग आहे. त्या अभंगांमधून तुकारामांचे चरित्र उलगडत जाते. शिवराज अष्टकामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा यांच्या नात्याविषयी अनुरूप असे सुंदर प्रसंगही दिग्पालने त्याच्या पटकथेमध्ये आणले आहेत. याचा नव्याने अभ्यास करताना जाणवलं की, तुकाराम महाराजांनी किती व्यवहारिक पातळीवर जाऊन अभंग रचले आहेत. त्यामुळे हा चित्रपट वेगळी अनुभूती देणारा ठरला.
एकल नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत तुकाराम महाराजांची भूमिका सादर करताना माझी मनोभूमिका एकच होती. माझ्या सद्गुरूंचे सांगणे होते की, या भूमिकेकडे अभिनय म्हणून किंवा काही साध्य करण्याच्या दृष्टीने पाहू नका. सद्गुरुंच्या आशीर्वादाने, सहाय्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानधारणा, योगक्रिया यांचा अभ्यास करायला लागलो. तुकाराम महाराजांची भूमिका सादर करणे, हे या साधनेच्या बळामुळेच शक्य झाले. या साधनेशिवाय मला तुकाराम महाराज गवसलेच नसते असे माझे ठाम मत आहे.
आनंदडोह असो अथवा अभंग तुकाराम त्या संदर्भातील संबंधित गोष्टी या माझ्याकडून ते करून घेतात, ही माझी प्रामाणिक आणि स्पष्ट भूमिका आहे. इतर चित्रपट, नाटक, एकांकिका यातून केलेल्या भूमिका किंवा इतर आतापर्यंतचे झालेले लेखन यात आणि या लेखनात जमीन-अस्मानाचा फरक आहे. तुकाराम महाराजांच्या भूमिकेचे सादरीकरण म्हणजे अनुभूतीचा प्रवास. तुम्ही आम्ही सारेच वैष्णव झालेले असतो, याचे साक्षीदार प्रेक्षक असतात. तुकारामांची भूमिका साकारणं सुरू झालं की, माझा आवाज बदललेला असतो. माझा चेहरा बदललेला असतो. माझ्या डोळ्यातले भाव बदललेले असतात. महाराजांच्या विचारांनी घडलेल्या भक्तीप्रवाहाच्या स्निग्धतेचा भास नव्हे तर अनुभव मला येतो. यासाठी वेगळी अभिनयाची तयारी केल्याचं मला स्मरत नाही. कलाकार म्हणून अभिनय करणे ही वेगळी गोष्ट, परंतु तुकाराम महाराजांची भूमिका ही शक्य आहे ती माझ्या आध्यात्मिक अधिष्ठानामुळे अशी प्रांजळ कबुली योगेश सोमण यांनी दिली.
अभिनयाबरोबरच कथा आणि संवादलेखन केले आहे, त्याबाबत थोडक्यात सांगताना योगेशजी म्हणाले की,“आनंदडोह किंवा अभंग तुकाराम यामधील संवाद हेच मुळी महाराजांच्या अभंगांसारखे साधेसरळ आहेत. जनमानसापर्यंत पोहचण्याचे सामर्थ्य त्यांच्या शब्दात होते. यातील संवाद लिहून तुकोबांचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ’नामदेवे केले स्वप्नामाजी जागे’ या तुकोबांच्या अभंगातच ते म्हणतात, मला नामदेवांनी स्वप्नातून जागं केलं आणि कवनं, अभंग रचण्याचा आदेश दिला. त्याचप्रमाणे अभंग तुकारामसाठी संवाद लेखनाचा तुकारामांनी मला आदेश दिला असं मी मानतो. ’अभंग तुकाराम’ हे चित्रपटाचे शीर्षक त्यांच्या विठ्ठलावरील निष्ठेचे, त्यांच्या अजर-अमर साहित्याचे द्योतक आहे. सततच्या दुष्काळाने आलेले अपार दारिद्—य, समाजाकडून होणारी अवहेलना, भोगाव्या लागलेल्या अनंत यातना, हे कमी म्हणून की काय इंद्रायणीच्या डोहात बुडवाव्या लागलेल्या गाथा... या पार्श्वभूमीवर त्यांचे अभंग टिकले आणि कालसुसंगतही राहिले. आज क्षणभंगुर मोहाच्या जाळ्यांत हा मनुष्यदेह अडकत चालला आहे. या पाशापासून दूर राहण्यासाठी, त्यातून सुटण्यासाठी तुकारामांचे शब्द बळ देतात. अशी ही तुकोेबांची प्रभावी, परिणामकारक शब्दसंपदा संवाद लेखनातून पेलण्याचे शिवधनुष्य मी उचलले आहे. हा सिनेमा इथल्या मातीचा, संस्कृतीचा, संस्काराचा इतिहासपट उलगडणारा आहे. आमची अपेक्षा आहे की, हा सिनेमा पालकांनी आपल्या मुलांना (तरुण पिढी) दाखवावा.”
अभंग तुकाराम चित्रपटासाठी पात्रांची निवड करताना काय विचार होता? यावर दिग्पाल म्हणाले,“अभंग तुकाराम हा संतपटांच्या मांदियाळीतील चित्रपट असल्याने पात्रांची निवडही तोच भाव ठेवून केली. तुकाराम महाराजांच्या भूमिकेसाठी योगेश सोमण सरांशिवाय अन्य कुणी डोळ्यासमोरच नव्हते. आनंदडोह ते आतापर्यंतचा सरांच्या आध्यात्मिक साधनेचा प्रवास आम्ही अनुभवलेला आहे आणि हीच त्या पात्राची गरज होती. त्यामुळे योगेश सरांच्या वेळेनुसारच चित्रीकरणाचे निश्चित केले होते. त्याच बरोबर स्मिता शेवाळे (आवली), अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अजिंक्य राऊत, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, निखील राऊत, तेजस बर्वे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपट दर्जेदार झाला आहे.”
“अभंग तुकाराम’ या चित्रपटाचे संगीत या चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपटातील गाणी समाजमनाची पकड घेणारी आहेत. संत वाङ्मय हे कालातीत आहे. या चित्रपटात दहा अभंगांना गीत स्वरूपात सादर करण्यात आले आहे. मागील काही वर्षांत अभंग आणि कीर्तनाला अतिशय आक्षेपार्ह चाली लावल्या गेल्या, हे आपण पाहिले आहे. प्रतिभेच्या पलीकडे असते ती प्रज्ञा. अशा प्रज्ञेतून तुकाराम महाराजांचे अभंग उतरलेले आहेत. त्या अभंगामध्ये अभिप्रेत असलेला भाव गाण्यात उतरला नाही तर त्याचा प्रभाव पडणार नाही, हे आमचे ठाम मत होते. वारकरी संप्रदायाच्या वैभवशाली पारंपरिक चालींमध्ये माधुर्य, सात्विकता, परमानंद, भक्ती यांचा समुच्चय आहे. या चालींचा आधार घेत मूळ अभंग रचनांना कुठेही धक्का न लावता आजच्या पिढीला भावेल, अशा पद्धतीने संगीतकार अवधूत गांधी यांनी संगीत दिलं आहे. या संगीतातून आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा वारसा पुढे चालवत आहोत,”असे दिग्पाल यांनी अतिशय अभिमानाने सांगितले.
आनंदडोह आणि अभंग तुकाराम यामध्ये साकारणारी भूमिका एक असली तरी, दोन्ही माध्यमे वेगळी आहेत, अशा वेळेला येणार्या प्रतिक्रियांकडे कसे पाहता?, यावर योगेशजी उत्तरले की, अगदी योग्य प्रश्न आहे हा, भूमिका एक असली तरी सादरीकरणाची माध्यमे वेगळी आहेत. आनंदडोहचे सादरीकरण प्रेक्षकांच्या उपस्थितीत असल्यामुळे येणार्या प्रतिक्रियाही थेट असतात. चित्रपटातून साकार होणार्या भूमिकेचा कालावधी अमर्याद असला तरी कलाकृतीची पोचपावती कलाकारापर्यंत पोहचत नाही. अभंग तुकाराम चित्रपटाच्या प्रिमिअरच्या निमित्ताने गेलो असता थेट प्रतिक्रियांचा आनंद मिळाला. प्रयोगानंतर महाराजांच्या दर्शनासाठी लोक येतात, आजीच्या वयाच्या बायका दृष्ट काढतात, अलाबला करतात. यातून एक कलाकार म्हणून कायमच उर्जा मिळते आणि तुकाराम महाराज लोकांपर्यंत पोहचवण्याच्या जबाबदारीची जाणीवही वाढते. या भूमिकेतून मला काय मिळालं तर शरणागत भाव-लीन भाव. आपण केवळ निमित्तमात्र आहोत, करवून घेणारी शक्ती कुणी दुसरीच असते, ही भावना प्रबळ झाली. यावरून महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष, लहान-थोर या सार्यांचं आपल्या संतांवर किती प्रेम आहे हे अनुभवता आलं. मात्र कधीकधी संकोचही वाटतो, काहीजण आपल्या तान्ह्या बाळाला पायावर ठेवतात, तर काहीजण हाताच्या पायघड्या घालतात. कधीकधी श्रद्धेने केलेला नमस्कारही अस्वस्थ करतो, तेव्हा माझ्या सद्गुरूंचे म्हणणे आठवते. त्यांचं सांगणं,’त्यांना तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचायचं आहे, तुम्ही कोण नाही म्हणणारे?’ हाच विचार ठेवून लोकांपर्यंत महाराजांचे विचार, अभंग पोहचवण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न करतोय.
या चित्रपट निर्मिती दरम्यान आपल्याला तुकोबांविषयी नवीन काही गवसलं का?, हे सांगताना दिग्पाल म्हणाले की, मुळात अशा विषयावर सिनेमा करतो, तेव्हा या विषयाच्या अधिकारी व्यक्ती मार्गदर्शक म्हणून असाव्यात, ही माझी पूर्वअट असते. या चित्रपटनिर्मितीत संत साहित्याचे अभ्यासक, महाराजांचे चरित्र अभ्यासक, आणि देहू संस्थानाचे तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे सल्लागार-मार्गदर्शक म्हणून सोबत होते. यानिमित्त अभ्यास करताना द्विधा मन:स्थिती होती, जगद्गुरू तुकोबांचं साहित्य मराठी माणसाच्या जीवन व्यवहारामध्ये इतकं रुळलं आहे की ते त्यांचं साहित्य होतं याचंही विस्मरण झालं. पाईकांचे अभंग आणि गनिमी काव्याचे अभंग तुकोबांच्या गाथेत आम्हाला नव्याने गवसलं. यावरुन भक्ती आणि शक्तीच्या संगमाने सुराज्य कसं घडत गेलं असेल याचं चित्र स्पष्ट झालं. तसंच, आजही तुकारामांचे अभंग किती कालोचित आहेत हे लक्षात आलं. अभंगांची पारायणे करण्यापेक्षा त्यांचं कृतिरूप आचरण हीच ईश्वरसेवा आहे. या मार्गावर आजची तरुण पिढी मार्गस्थ झाली तर राष्ट्र सामर्थ्यशाली होईल, असा विश्वास आहे.
या सिनेमा निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे, ह.भ.प. सचिनदादा पवार, डॉ. सदानंद मोरे या विभूतींचं मार्गदर्शन मिळालं म्हणूनच चित्रपटाची मांडणी अधिक अर्थपूर्ण तरीही लोकांना सहज समजेल अशी सोपी करता आली, असे दिग्पाल सांगत होते.
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे भक्ती आणि शक्तीचं अद्वैत आहे. यंदांचं वर्ष जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचं 375वं वर्ष आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींचं हे 750वं जन्मोत्सव वर्ष आहे. ही दोन्ही औचित्यं या चित्रपटनिर्मितीमागे आहेत. महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव समजून घेण्यासाठी आणि ते आचरणात आणण्याची प्रेरणा घेण्यासाठी सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला हवा.
सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.