आई, आज किनी विकीचा हॅप्पी बड्डे आहे! आम्ही गेल्यावर तो सिक्स इयर ओल्ड झाला म्हणून सिक्स कॅण्डल एका फुंकरमध्ये बंद करणार! मग विकी केक कापणार! आम्ही सगळे मिळून त्याला ‘हॅपी बड्डे टू यू’ असे गाणे म्हणणार!
आम्ही त्याच्या तोंडाला क्रीम फसणार! आणि पाठीत सहा सहा गुद्दे पण मारणार! मग आम्ही त्याला गिफ्ट देणार! आणि तो पण आम्हाला गिफ्ट देणार!... ध्रुव रोहिणीला उत्साहाने सांगत होता!

जरा मोठी झालेली मुले, वाढदिवस रात्री बारा वाजता साजरा करतात. काही जण दोन दिवस तर काही युवा मंडळी संपूर्ण आठवडा आपला वाढदिवस साजरा करतात!
ते सगळे ऐकून, रोहिणी आणि अरुंधतीने ध्रुवचा वाढदिवस आपल्या परंपरेनुसार करायचा ठरवले. ध्रुवचा वाढदिवस जन्मतिथीने पुढच्याच महिन्यात होता. त्या दिवशी सकाळी उठल्यावर रोहिणीने ध्रुवला अंघोळ घातली. नवीन कपडे घातले. त्याचे औक्षण केले. ध्रुवचे मित्र आले होते, त्यांना पेढा दिला. अरुंधतीच्या भावाने मंगल चिंतन केले आणि इतरांनी टाळ्या वाजवून त्याला साथ दिली -
सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव ।
भवतु मङ्गलं जन्मदिनम् ॥
चिरञ्जीव कुरु कीर्तिवर्धनम् ।
चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनम् ॥
विजयी भव सर्वत्र सर्वदा ।
जगती भवतु तव सुयशगानम् ॥
सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव ।
भवतु मङ्गलं जन्मदिनम् ॥
त्यावर रोहिणीने ध्रुवला घरातील सगळ्या मोठ्यांच्या पाया पडण्यास सांगितले. सर्वांनी त्याला आशीर्वाद दिले - मोठा हो! म्हातारा हो! सुखी रहा! यशस्वी हो! विजयी हो! तुला कीर्ती लाभू दे! तुझ्या हातून पुण्यकर्म घडू देत! तुला खूप पुण्य मिळू दे!
रजनीकांतच्या मामाने आलेल्या सगळ्या ध्रुवच्या मित्र -मैत्रिणींना हे वाढदिवसाचे गाणं शिकवले! आणि चालीत म्हटलेले गाणे त्यांना इतके आवडले की, पुढच्या आपापल्या वाढदिवसांना हेच गाणे म्हणायचे त्यांनी ठरवले. त्यावर सगळी मंडळी जेवायला बसली. आज ध्रुवच्या आवडीची खीर केली होती.
वाढदिवस हा एक संस्कार आहे. लहान मुलाला त्या दिवशी उत्सवमूर्तीचा मान मिळतो. एक प्रकारे मनाला सुख देणारी, आत्मविश्वास वाढवणारी ही गोष्ट आहे. ओवाळण्याने, अनेक आशीर्वाद मिळाल्याने, घरातील सगळ्यांनी प्रेमाने पाठीवरून हात फिरवल्याने एक आनंद व उत्साह संचारतो. आपल्यामध्ये काहीतरी खास आहे असे वाटते. कुठले न्यूनगंड असतील तर ते दूर पळून जातात. आत्मिक शक्ती वाढते... ते अशाप्रकारे वाढदिवस साजरा केल्याने.
केवळ स्वतःचे, घरातील ज्येष्ठांचे वाढदिवस करतो असे नाही. तर - राम, हनुमान, नरसिंह, वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, यांच्यापासून गंगाजयंतीपर्यंत अनेक जन्मदिवस साजरे करतो. रामाचा वाढदिवस तर 9 दिवस - पाडव्यापासून चैत्रनवमीपर्यंत साजरा केला जातो. नवीन वर्षाची सुरुवात राम राम म्हणून केल्यासारखी होते. अशा महात्म्यांचे वाढदिवस अथवा जयंती साजरी करणे हा देखील संस्कार आहे. त्यांचे गुणगान करण्याचा, त्यांचे सद्गुण अंगिकारण्याचा.
पहिला वाढदिवस अर्थात अब्दपूर्ती, हा मुलाचा जन्म ज्या तिथीला झाला असेल त्या तिथीला केला जातो. पहिले वर्षभर, प्रत्येक महिन्याच्या तिथीला काही समारंभ करावा आणि त्यानंतर मात्र दरवर्षी ती तिथी साजरी करावी. हा समारंभ कसा करावा हे सांगतांना सूत्र म्हणतात - बालकाच्या जन्मनक्षत्राच्या देवतेला आणि त्या नक्षत्राला उद्देशून होम करावा. तसेच सात चिरंजीवांची पूजा करावी.
शुक्ल यजुर्वेदात मानवाच्या सर्वांत जुन्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतात. त्यामध्ये सूर्याला उद्देशून प्रार्थना केली आहे -
तच्चक्षुर्देवहितं पुरस्ताच्छुक्रमुच्चरत् ।
पश्येम शरदः शतं
जीवेम शरदः शतं
श्रुणुयाम शरदः शतं
प्रब्रवाम शरदः शतं
अदीनाः स्याम शरदः शतं
भूयश्च शरदः शतात् ॥
(शुक्ल यजुर्वेदसंहिता, अध्याय 36, मंत्र 24)
या जगाचा चक्षु असलेला सूर्य आम्हाला शंभर शरद ऋतू इतके आयुष्य देवो! अर्थात शंभर वर्षांचे आयुष्य लाभो! शंभर शरद ऋतू नेत्रांनी पाहता येऊ दे! कानांना शंभर वर्षे ऐकण्याची शक्ती मिळू दे! शंभर वर्षे स्पष्ट बोलण्याची ताकद मिळो! शंभर वर्ष अदीन - ‘अ+दीन’ म्हणजे श्रीमंत समृद्ध जगावे! शंभर वर्षांपर्यंत पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये शिथिल ना होवोत. सूर्यदेव कृपा करून रोगमुक्त आयुष्य देवो!
यजुर्वेदातील वरील प्रार्थनेप्रमाणेच एक प्रार्थना अथर्ववेदात देखील आढळते. तिचे शब्द काहीसे भिन्न असले तरी त्यातील भाव जवळजवळ तेच आहेत. ती प्रार्थना अशी आहे - पश्येम शरदः शतम् । जीवेम शरदः शतम् । बुध्येम शरदः शतम् ।
रोहेम शरदः शतम् । पूषेम शरदः शतम् । भवेम शरदः शतम् ।
भूयेम शरदः शतम् । भूयसीः शरदः शतात् ।
शंभर शरद्ऋतू (शतायुष्य) पाहू दे. शंभर वर्षे निरोगीपणे जगू दे. बुद्धी शंभर वर्षे तेजस्वी आणि सक्रिय राहू दे. शंभर वर्षे उन्नती होत राहो. समृद्धी, पोषण आणि शक्ती शंभर वर्षे वाढत राहो. शंभर वर्षे अधिकाधिक भरभराट होऊ दे आणि या शंभर वर्षांच्या पलीकडेही जीवन अधिक मंगल आणि समृद्ध होवो.
प्रत्येक वर्षीचा वाढदिवस साजरा केला जात असला तरी, त्यामध्ये काही वाढदिवस विशेष आहेत - जसे एकसष्ठावा, पंचाहत्तरावा, एक्याऐंशीवा वाढदिवस. या वाढदिवसांना केल्या जाणार्या संस्कारांना स्वतः:चे वेगळे नाव पण आहे - एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन आदी. भारतीय पारंपरिक पद्धतीमध्ये वाढदिवसाला, उत्सवमूर्तीला गिफ्ट नाही, पण रिटर्न गिफ्ट मात्र आहे. ज्याचा वाढदिवस आहे त्याने गरजूंना दान द्यावे. वाढदिवसाला तुला करून आपल्या वजनाइतके दान करण्याची पद्धत आहे.
कोणी वजनाइतकी साखर, गूळ, गहू, तांदूळ, पुस्तके... इत्यादी दान देतात. दान मात्र सत्पात्री असावे. अर्थात आपण दिलेल्या वस्तूचा अथवा पैशांचा चांगल्या कामासाठी उपयोग केला जाईल याची खात्री करूनच दान द्यावे. जर दान घेणार्याने वाईट कामासाठी त्याचा उपयोग केला, तर त्याचे पाप दान देणार्याला पण लागते असे शास्त्र सांगते.
आयुष्यातील सुरुवातीचे वाढदिवस हे वाढीचे, प्रगतीचे, मोठे होण्याचे संस्कार देतात. तर आयुष्याच्या उतारावरील वाढदिवसाचे संस्कार वानप्रस्थ आश्रमाचे, अपरिग्रहाचे धडे देतात. अनेक जण या काळात विविध व्रते घेतात जसे - परान्न न घेणे - अर्थात बाहेरचे पथ्यकारक न खाणे. या वळणावर वाढदिवसाचे अभीष्टचिंतन करणारा मंत्र अनेक अर्थ सांगतो - अदीनाः स्याम शरदः शतम् । म्हणजे शंभर वर्षे आपण अदीन - दीनभावाशिवाय राहू. आपल्यात दीनता न यावी. परावलंबित्व नसावे. अंथरुणात पडून, दवाखान्यात पडून नसावे - तर आरोग्यपूर्ण प्रकारे जगो. कदाचित या म्हणण्यात ऋषींच्या मनात आणखीही असेल? काही गूढार्थ असेल? कदाचित, ‘अदीना’ हा शब्द शारीरिक दीनतेसाठी नसून, आपल्या अंतरंगातील एखाद्या लपलेल्या धनाकडे संकेत असेल काय! मग अ-दीन म्हणजे तो ज्याला आपल्या अंतरातील धन सापडले आहे तो होतो.
उपनिषदांनी देखील अशी इच्छा व्यक्त केली आहे की प्रत्येकाने शंभर वर्षे जगण्याची मनीषा मनात बाळगावी, आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत कार्यरत राहावे, समाजाच्या हिताचे काम करत आनंदाने शंभर वर्ष जगावे! इशावस्या उपनिषद सांगते-
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतं समाः । एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥ 2 ॥
या पृथ्वीवर शंभर वर्षे जगण्याची इच्छा असेल, तर कर्म करतच जगावे. कारण माणूस म्हणून जगताना, याशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही! वाढदिवसाला याहून मोठी सदिच्छा भेट नाही! आपले आयुष्य अनमोल आहे. आपले शरीर अमूल्य आहे. आपले शरीर सर्व धर्मचारणाचे आद्य साधन आहे त्याची निगा राखली पाहिजे, शुचिता राखली पाहिजे. ते शंभर वर्ष नीट जगू शकेल असे वागले पाहिजे. ह्या मंत्राचा संस्कार सर्व लहान - मोठ्यांवर वारंवार व्हावा. किमान प्रत्येक वाढदिवसाला व्हावा! आपल्या पाल्यावर हा संस्कार आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी जरूर करावा.