रीवा येथील साहित्यिक ‘अमृत’मंथन

21 Nov 2025 17:35:02



अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या 17व्या राष्ट्रीय अधिवेशनाची 7 नोव्हेंबर रोजी सकाळी प्रांतश: बैठकीने सुरूवात झाली. या प्रांतश: बैठकीत गेल्या तीन वर्षांत प्रांतात झालेल्या विविध कार्यक्रम व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला व नवीन वर्षांत करावयाच्या कार्यक्रम व उपक्रमांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष केंद्रित विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन, पंचपरिवर्तन आधारित साहित्य निर्मिती, संघसाहित्यावर गोलमेज परिषदा, प्रांतवार कार्यक्रम व उपक्रमांचे वार्षिक पंचांग तयार करणे संघटन वाढीच्या दृष्टीने, साहित्यिक, प्रकाशक, वितरक, वाचनालये, व्याख्याते, व्याख्यानमाला आयोजक, वाचक यांच्याशी संपर्क वाढविणे, सर्व विधा कार्यशाळा, साहित्ययात्रा, सभा-संमेलने, ‘आत्मबोध से विश्वबोध’ यावर कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले.

दुपारी 1 वाजता संघाचे सहसरकार्यवाह अतुलजी लिमये यांच्या हस्ते विश्वासराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनीत आत्मबोध से विश्वबोध यावर आधारित माहिती बरोबरच देशभरात विविध शाखांनी केलेल्या कार्यक्रम व उपक्रमांचे फोटोसहित वृत्तकथन पाहावयास मिळाले. अधिवेशनाच्या परिसरात मराठी लेखक शिवाजी सावंतांसहित देशभरातील विविध भाषांतील साहित्यिकांचे माहितीसह मोठे फलक लावले होते.

दुपारी 3 वाजता पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलचंद्र त्रिवेदी, मध्य प्रदेशाचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल व ख्यातनाम मराठी साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील हेही उपस्थित होते. आपल्या भाषणात रामनाथ कोविंद म्हणाले की, साहित्य हा समाजाचा आत्मा आहे. साहित्य, कला, संस्कृती यांमुळेच समाजात चैतन्य निर्माण होते. राष्ट्रवादाचे सशक्त माध्यम म्हणून साहित्याने स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात जसे कार्य केले, तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि सध्याच्या काळात विकासोन्मुख गतिशीलतेसाठी साहित्य आणि सांस्कृतिक मूल्य यांचे योगदान मोलाचे आहे. उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांनी रीवाचे ऐतिहासिक, पौराणिक आणि साहित्यिक महत्त्व विशद करून संमेलनास शुभेच्छा दिल्या.

विश्वास पाटील यांनी साहित्यिक म्हणून आपल्या जडणघडणीची वाटचाल कथन केली आणि झाडाझडती, पानिपत, महानायक या साहित्यकृतींचे वैशिष्ट्य नमूद केले.

या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून एकूण पन्नास साहित्यिक सहभागी झाले होते त्यात साहित्य अकादमीचे प्रा. नरेंद्र पाठक, महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष डॉ. बळीराम गायकवाड, संघटक नितीन केळकर, कोकण प्रांत कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख, विदर्भ प्रांत अध्यक्ष लखनसिंह कटरे, कार्याध्यक्ष चंद्रकांत लाखे, धुळ्याहून बहिणाबाई पारितोषिक विजेते प्रा. संजीव गिरासे, नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिनेश प्रताप सिंह, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे निदेशक राहुल मिश्र, पुण्याहून प्रा. चारुदत्त गंधे हे प्रमुख रूपाने उपस्थित होते.



उद्घाटनानंतर गावात शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेत आपापल्या प्रांतातील पारंपरिक पोशाख घालून साहित्यिक मंडळी सहभागी झाली होती. महाराष्ट्रातील संजय द्विवेदी पुणेरी पगडी घालून तर मनोहर मंडवाले व इतरांनी वारकरी संप्रदायाचा वेश परिधान केला होता. महिलांनी नऊवारी साड्या नेसून नाकात नथ घातली होती. आपल्या प्रांताचे बॅनर, हातात मराठी भाषेविषयी फलक, रस्त्यांवर फुगड्या अशामुळे महाराष्ट्राचे पथक लक्ष वेधून घेत होते. त्याचप्रमाणे विशिष्ट टोपी घातलेले उत्तराखंडमधील तरुण, राजस्थानी व हिमाचल प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण पोशाख, मध्यप्रदेशातील वनवासी बांधवांचे वादक पथक, सजविलेल्या विविध रथांवर देशभरातील काही साहित्यिक यामुळे शोभायात्रा रीवानगरवासीयांचे आकर्षण केंद्र झाली होती. नगरवासीयांनी जागोजागी फुलांचा वर्षाव करीत साहित्यिकांचे हृदयंगम स्वागत केले. रात्री भोजनोत्तर वंंदेेमातरम्च्या दीडशे वर्षानिमित्त सर्व साहित्यिकांनी सामूहिक संपूर्ण वंदेमातरम् गायले. त्यानंतर रामचरितमानसाचे गायन तसेच लोकनृत्याचे सादरीकरण स्थानिक कलावंतांनी केले. रात्री 12 पर्यंत बहुभाषक कविसंमेलन रंगले.

8 नोव्हेंबर रोजी ‘आत्मबोध ते विश्वबोध’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत सात सत्रांमध्ये विविध मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. रात्री भोजनोत्तर मध्य प्रदेश उर्दू साहित्य अकादमी संस्कृती विभागाच्या डॉ. नुसरत मेहंदी यांनी लिहिलेल्या दास्तान-ए-शंकर या आदी शंकराचार्यांच्या जीवन कथेवरील एकपात्री कार्यक्रम इंंदोरच्या भारती दिक्षित यांनी अप्रतिमरित्या सादर केला. नंतर पुन्हा सर्वभाषक कविसंमेलन झाले त्यात महाराष्ट्रातील साहित्यिकांनी आपल्या कविता सादर केल्या.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय संघटन मंत्री श्रीधर पराडकर यांची प्रकट मुलाखत एका सत्रात घेण्यात आली. त्यांच्या साहित्यकृती आणि साहित्य परिषदेची आजवरची वाटचाल हा या प्रकट मुलाखतीचा विषय होता. विजय आनंद तिवारी, डॉ. नुसरत मेहंदी, डॉ. दिनेश प्रताप सिंह यांनी ही मुलाखत घेतली. संघटन सत्रात संयुक्त महामंत्री डॉ. पवनपुत्र बादल यांनी आगामी काळात वर्षभर आयोजित करावयाच्या कार्यक्रमांबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्राच्या शेवटी उपस्थित प्रतिनिधींमधील साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे लोकार्पण करण्यात आले.

समारोपाच्या सत्रात संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांचे प्रमुख भाषण झाले. समाजाला रचनात्मक आणि सर्जनात्मक दृष्टी प्रदान करण्याचे कार्य साहित्य करीत असते, असे ते म्हणाले. सध्या समाजमाध्यमे आणि काही विशिष्ट लेखकगट भारतीय जीवनमूल्ये आणि संस्कारांना कमी लेखून नकारात्मक विचारांची पेरणी समाजात करीत आहेत. भारतीय साहित्याला आणि पर्यायाने आपल्या राष्ट्राला अशा समाजविघातक शक्तींपासून वाचविण्याचे आणि नवी दिशा देण्याचे कार्य अ. भा. साहित्य परिषदेने करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या अधिवेशनात डिजिटल माध्यमे नियंत्रित करा, असा प्रस्ताव संमत करण्यात आला. डिजिटल माध्यमे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या विधायक नियमनासाठी केंद्र आणि राज्य शासनाने स्वायत्त नियामक संस्था स्थापन करावी, अशी मागणी समारोप सत्रात अ. भा. साहित्य परिषदेच्या वतीने संमत प्रस्तावात करण्यात आली. डिजिटल माध्यमातून संविधानाचा गौरव आणि मानमर्यादा, धार्मिक आस्थेचे विषय, सांस्कृतिक मूल्य, सामाजिक मर्यादा आणि सनातन परंपरेला धक्का पोहोचवणार्‍या दृश्य, संवाद वा विचार यांवर कठोर नियंत्रण आणि कारवाई व्हावी, अश्लीलता, हिंसा, विकृत जीवनमूल्यांचा प्रचार करणार्‍या माध्यम-मंचांविरुद्ध दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी, तसेच भारतीय भाषा, संस्कृती आणि भारतीय मूल्यांवर आधारित मनोरंजन माध्यमांना प्रोत्साहित करावे, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.

या अधिवेशनात आगामी तीन वर्षांसाठी अ. भा. राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अशा प्रकारे तीन दिवसांचे हे वैचारिक मंथन देशभरातील साहित्यिकांच्या सहभागाने संपन्न झाले. आलेले सर्व साहित्यिक अपेक्षित असलेली वैचारिक क्रांती आपल्या साहित्यातून घडवतील असा विश्वास बाळगायला हरकत नाही.

- प्रवीण श्रीराम देशमुख
कार्याध्यक्ष, अ.भा.सा.परिषद पुरस्कृत साहित्य भारती
कोकण प्रांत
7506740652

Powered By Sangraha 9.0