रानभाज्यांपैकी विविध गुणवैशिष्ट्ये जपलेली भाजी म्हणजे करटुली. नांदेड जिल्ह्यातील सुमनबाई बोराळे यांनी यंदाच्या हंगामात अवघ्या दहा गुंठ्यांत नैसर्गिक पद्धतीने करटुले या रानभाजीची यशस्वी पैदास करत लाखोची कमाई केली आहे. आंतरपीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. कमी खर्च व उत्पन्नात वाढ या सूत्राने त्यांनी सर्वांसमोर शेतीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन ठेवला आहे.
मनबाई बोराळे यांची कंधार तालुक्यातील बाभूळ या गावात सात एकर शेती आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी पारंपरिक व रासायनिक पद्धतीचा अवलंब करत खरिपात कापूस, तूर व सोयाबीन तर रब्बी हंगामात गहू, हरभरा अशी पिके त्या घेत असत. मात्र या पिकांमधून त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. अशावेळी त्यांचा नाबार्ड व सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या ’नैसर्गिक/सेंद्रिय शेतीप्रकल्प’ कार्याशी संपर्क आला आणि नैसर्गिक शेतीचा मार्ग धरला. जीवामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र यांसारख्या नैसर्गिक द्रव्ये वापरून त्यांनी कपाशीचे समाधानकारक उत्पन्न घेतले. यानंतर त्यानंतर सुमनबाईंनी मुळा, पालक, भोपळा यांसारख्या पिकांवर प्रयोग सुरू केले. नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यामुळे त्यांच्या शेतातील मातीचा पोत सुधारला, पिकांची चव सुधारली व आरोग्य उत्तम झाले, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खर्च निम्म्यावर आला.
करटुल्याचा प्रयोग
2025 हे वर्ष त्यांच्या शेतीतील टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो पारंपरिक रानभाजी ‘करटुले’ पिकवण्याचा. प्रथमतः त्यांनी करटुल्याचे अर्थशास्त्र जाणून घेतले आणि नंतर प्रयोग करण्याचे ठरवले. मे महिन्यात फक्त 10 गुंठे क्षेत्रात करटुल्याचे बी पेरले. 45 दिवसांत हिरवी-कोवळी फळं आली. करटुल्याचे आरोग्यदायी गुण, बाजारातील मागणी आणि स्थिर भाव पाहता त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला.

सुमनबाई सांगतात की, एकदा लागवड केल्यानंतर हे पीक अनेक वर्षे उत्पादन देत राहते. त्यामुळे दरवर्षी लागवड करण्याची गरज नसते. दोन फुटांवर लागवड केली. त्यापूर्वी शेतात शेणखत भरून घेतले.
मे-जून महिन्यात पावसाळी वातावरणात कंदांमधून वेल उगवणे सुरू झाले. या वेली व्यवस्थित बांधण्यासाठी लाकडी खांब उभारून त्यावर तारा बांधल्या आहेत. या तारांवर वेली फिरवल्या जातात. सुतळीने वेली बांधल्या. लागवडीनंतरच्या पहिल्याच वर्षी फळे लागली. एक लाख रुपयाचे उत्पन्न 10 गुंठे शेतीतून मिळाले. पहिल्या वर्षी खांब, तार, बांधणीची मजुरी असा सर्व खर्च या उत्पन्नातून वसूल झाला.
बाजारपेठेत थेट विक्री
सुमनबाई स्वतः बाजारात जाऊन करटुल्यांची विक्री करू लागल्या आणि या उपक्रमातून त्यांना दोन महत्त्वाचे अनुभव मिळाले. प्रथम ग्राहक वर्गात करटुल्यांना चांगली मागणी असल्याचे स्पष्ट दिसून आले. ही भाजी दर्जेदार आणि ताजी असल्यामुळे ग्राहकांनी उत्साहाने खरेदी केली.
दुसरे म्हणजे बाजारातील दर, मागणी, पुरवठा आणि किंमत ठरविण्याचे व्यावहारिक गणित सुमनबाईंना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे आत्मसात झाले. सतत शेतांवर आणि बाजारात या दोन्ही ठिकाणी काम केल्याने त्यांचे आर्थिक गणित अधिक मजबूत झाले आहे.
स्वतः उत्पादन घेऊन, स्वतःच बाजारपेठेत थेट विक्री करणे हा महिलांच्या स्वावलंबनाचा उत्तम आदर्श ठरतो. सुमनबाईंचा हा उपक्रम केवळ आर्थिक फायद्याचा नसून ग्रामीण महिलांनी व्यवसायात स्वतःचा ठसा उमटविण्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
आकड्यांतील यश
आठवड्याला अंदाजे 50 किलो करटुले उत्पादन
बाजारभाव : 200 प्रति किलो,
एकूण उत्पन्न : जवळपास 1,00,000
आंतरपीक (कारले, टोमॅटो) : 20,000 अतिरिक्त
एकूण गुंतवणूक : फक्त 20,000
नफा : रु. 80,000
नफा = ज्ञान + जिद्द + निसर्गावरचा विश्वास
हे समीकरण सुमनबाईंनी सिद्ध केले. पुढील वर्षीही उत्पादन व उत्पन्न वाढले, अशी त्यांना आशा आहे.
आत्मविश्वास दुणावला
सुमनबाईंच्या चेहर्यावर समाधान झळकते. त्या सांगतात की, नैसर्गिक शेतीत खर्च कमी होतो. अन्नदेखील सुरक्षित आणि पौष्टिक मिळते. शेताकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला. हा आत्मविश्वासच त्यांचा खरा लाभ आहे. आर्थिक स्थैर्यासोबतच अन्नसुरक्षा, आरोग्य आणि शाश्वत शेतीचे भक्कम मॉडेल मिळाले. निसर्ग आपले श्रम वाया जाऊ देत नाही. जिद्द आणि मेहनत यांची सांगड घातली, की जमीन सोनं देते.
कापूस + तूर आंतरपीक
नैसर्गिक पद्धतींच्या बळावर यंदा सुमनबाई कापूस व तूर आंतरपीक घेत आहेत. रोगप्रतिकारक क्षमता, मातीतील सुपीकता आणि समतोल वाढीमुळे कपाशीचे दहा क्विंटल तर तुरीचे 2 क्विंटल उत्पादन मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे. रब्बी हंगामाकरिता टाकळी ज्वारी व गव्हाची लागवड केली आहे.
शेतीची ताकद जमिनीच्या आकारात नसते, ती असते शेतकर्याच्या विचारांत, निसर्गावरच्या विश्वासात आणि प्रयोगशील वृत्तीत. त्यांचं यश छोट्या शेतकर्यांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. दहा गुंठे जमिनीतून मोठे स्वप्न कसे उभे करायचे, हे त्यांनी दाखवून दिले आहे.