मका पिकाचे अर्थशास्त्र

21 Nov 2025 12:52:58
सोनाली कदम



मका हे महत्त्वाचे तृणधान्य. ते मूळचे अमेरिकेचे, (याविषयी मतमतांतरे आहेत) पण अमेरिकेत प्रथम गेलेल्या युरोपियन लोकांनी मक्याला ’इंडियन कार्न’ हे नाव दिले ते आजही ’कार्न ’या संक्षिप्त रूपात प्रचलित आहे, असो. पोतृगीजांनी 16व्या शतकाच्या आरंभी भारतात मक्याची आयात केली असे मानले जाते. मक्याचा प्रत्येक दाणा एकदलिकीत बीज असते. त्याला ढालक म्हणतात. या दाण्यात मेद, कर्बोदके आणि प्रथिने हे तीनही घटक असल्यामुळे यास परिपूर्ण अन्न मानले जाते. याचे अनेक उपयोग आहेत. मक्याचे कणसे भाजून किवा उकडून खातात. यास ’कॉर्न फ्लोअर’ म्हणतात.

आज जगभरात गव्हाच्या खालोखाल मक्याचे उत्पादन होते. भारतात मका हे चौथ्या क्रमाकांचे तृणधान्य पीक आहे. कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश राज्यात मक्याचे पीक घेतले जाते. कर्नाटक हा भारतातील सर्वात मोठा मका उत्पादक व व्यापारी राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात मक्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे, चंद्रपूर या जिल्ह्यात मका लागवड केली जाते. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर व जालना या जिल्ह्यांची ’मका पिकाचे हब’ अशी ओळख आहे. या जिल्ह्यात मक्याची बाजारपेठ म्हणून सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मलकापूर (जि. बुलढाणा) कृषी उत्पन्न बाजार समिती ही वर्‍हाडातील सर्वांत मोठी मका बाजारपेठ म्हणून नावारूपाला आली आहे. मार्च 2025 या काळात दररोज तीन हजार क्विंटल मक्याची आवक झाल्याची नोंद करण्यात आली होती. या ठिकाणाहून परराज्यांमध्ये मक्याची जावक (रवाना) होते. मका संशोधन कार्य म्हणून डोईफोडा (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे मका संशोधन केंद्र मंजूर झाले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मका संशोधन प्रकल्प केंद्र आहे.

खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात मका पीक घेता येते. शिवाय लागवडीसाठी खर्च कमी येतो. अलीकडच्या काळात चारा म्हणून मक्यापासून मुरघास निर्मितीकडे वळत आहेत. मानवी आहार, पशुखाद्य उद्योग, स्टार्च फॅक्टरीत मक्यास मोठी मागणी आहे. सरकारने इथेनॉलसाठी मक्याचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे इथेनॉल उद्योगाकडून मक्याची मागणी वाढली आहे. विशेषतः जागतिक स्तरावर 2025-26 या वर्षात मका उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता आहे. भारत, अमेरिका आणि ब्राझील देशांत उत्पादन वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारात मक्याची तेजी टिकून राहण्याची शक्यता आहे. इतर पिकांच्या तुलनेने मका हे परवडणारे व जोखीम कमी असणारे पीक आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा मका लागवडीकडे कल वाढताना दिसतो आहे. मका उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय घटकांची सातत्याने भर करणे आवश्यक आहे. तरच मक्याचे उत्पादन, कणसाचा आकार आणि मातीचे आरोग्य सुधारेल.

मका उत्पादन तंत्रज्ञान

यंदा रब्बी (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) व उन्हाळी (फेब्रुवारी ते मार्च) हंगामात मका लागवड करावी. उत्तम उत्पादनासाठी मक्याच्या ’बायो-9681’, ’एच.क्यू.पी.एम-1’, ’एच.क्यू.पी.एम. 5’, ’संगम’ व ’कुबेर’ या उशिरा पक्व होणार्‍या जाती आहेत तर मध्यम कालावधीसाठी ’राजर्षी’, ’फुले महर्षी’, ’बायो-9637’ या जाती व तसेच लवकर पक्व होण्यासाठी ’पुसा संकरित मका-1’, ’विवेक संकरित मका 27’ व ’महाराजा’ या लोकप्रिय जाती आहेत.


75 सें.मी. दोन ओळींमधील अंतर 20 ते 25 सें.मी. दोन रोपांमधील पेरणीतील अंतर असावे व रुंद वरंबा सरी पद्धत किंवा जोड ओळ पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे आंतरमशागत करणे आणि पाण्याचे व्यवस्थापन करणे सोपे होते.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे उगवण चांगली होते, तसेच बुरशीजन्य आणि किडींपासून होणारे नुकसान टाळता येते. बुरशीनाशकासाठी प्रति किलो बियाणास 2 ग्रॅम कॅप्टन किंवा थायरम चोळावे. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 60 FS (4 ते 6 मिली प्रति किलो बियाणे) यासारख्या शिफारस केलेल्या कीटकनाशकाची प्रक्रिया करावी.

जैविक प्रक्रिया: अ‍ॅझोटोबॅक्टर किंवा अ‍ॅझोस्पिरिलम (प्रमाण: 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे) याची प्रक्रिया केल्यास नत्राची उपलब्धता वाढते.



खत व्यवस्थापन

मका हे खादाड पीक असल्याने, अधिक उत्पादन घेण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन गरजेचे आहे. शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर करून जमिनीचा पोत सुधारणे महत्त्वाचे ठरते.पेरणीच्या वेळी स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. तसेच नत्राची 1/4 मात्रा द्यावी.

पहिली वरखत मात्रा (पेरणीनंतर 25-30 दिवसांनी): नत्राची 1/2 मात्रा देऊन मातीची भर द्यावी.
दुसरी वरखत मात्रा (तुरा बाहेर पडण्याच्या वेळी - 45-50 दिवसांनी): नत्राची उर्वरित 1/4 मात्रा द्यावी.

सिंचनाच्या महत्त्वाच्या अवस्था

मका पिकाला विशिष्ट अवस्थांमध्ये पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या अवस्थांना ’संवेदनशील अवस्था’ म्हणतात. या काळात पाणी न मिळाल्यास उत्पादनावर थेट आणि नकारात्मक परिणाम होतो. रोपवाढ अवस्थेत (15 ते 20 दिवस) रोपांची चांगली वाढ होण्यासाठी आणि मुळे जमिनीत खोलवर जाण्यासाठी आवश्यक.

तुरा बाहेर पडण्याची अवस्था (40 ते 50 दिवस), कणीस भरण्याची अवस्था (60 ते 75 दिवस) व दाणे दुधाळ होण्याची अवस्था (80 ते 95 दिवस) यांत पाण्याची गरज असते. पारंपरिक पाटपाणी पद्धतीमुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. पाण्याची बचत करण्यासाठी आणि उत्पादन ठिबक, तुषार सिंचन व रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा.

कीड व रोग व्यवस्थापन

कांड कीडसाठी कीटकनाशक क्लोरपायरीफॉस 2 मि.ली./ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. पर्णभक्षी अळीसाठी स्पिनोसेंड 0.5 मि.ली./ली. पाणी फवारावे. तांबेरा व गंज रोगासाठी मॅनकोझेब 2 ग्रॅम/ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. जैविक उपाय म्हणून ट्रायकोग्रामा किंवा बॅसिलस सबटॅलिस यांचा वापर करावा.

मका पिकासमोरील मुख्य आव्हान

अमेरिकन लष्करी अळी ही मूळ अमेरिकेतील कीड आहे. येथील उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात ही कीड आढळते. जानेवारी 2018 मध्ये ही कीड सर्व साधारणपणे संपूर्ण आफ्रिका खंडात परसली होती. याच काळात ही कीड भारत व श्रीलंकेत आढळून आली.

किडीच्या वाढीचा कालावधी हवामान व इतर घटकांवर अवलंबून आहे. या किडीचे संपूर्ण एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन केल्यास नियंत्रण ठेवणे शक्य होते व उत्पादनात होणारे नुकसान व पिकाचे नुकसान टाळणे शक्य होते.



मका उत्पादन खर्च
प्रति एकर मका लागवडीसाठी येणारा अंदाजित खर्च (2024-25 च्या दरांनुसार अंदाजित) काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार खर्चात बदल होऊ शकतो.
(रु. प्रति एकर)
1. जमीन मशागत: 3,500 - 4,500
2. बियाणे: 1,500 - 2,500
3. खते आणि रासायनिके (छझघ, सूक्ष्म अन्नद्रव्ये):
4,000 - 6,000
4. कीड-रोग नियंत्रण (लष्करी अळी, खोडकिडा इ.) :
2,500 - 4,000
5. सिंचन खर्च: 2,000 - 3,000
6. मजुरी (पेरणी, निंदणी): 7,000 - 10,000
7. काढणी आणि मळणी: 3,500 - 5,000
8. इतर खर्च: 1,000 - 2,000

एकूण उत्पादन खर्च

अंदाजित - मका उत्पादक शेतकर्‍यांशी चर्चा करून 25,000 ते 37,000 इतका येतो.

अपेक्षित उत्पादन

सरासरी उत्पादन : 15 ते 25 क्विंटल प्रति एकर.

सुधारित तंत्रज्ञान वापरून उत्पादन : 30 ते 45 क्विंटल प्रति एकर.

उत्पन्न आणि निव्वळ नफा

उत्पादन खर्च (अंदाजित) : 30,000 (प्रति एकर)

अपेक्षित उत्पादन: 30 क्विंटल प्रति एकर

बाजारात अपेक्षित भाव

(उदा. NPK किंवा बाजारभाव) : 2,200 (प्रति क्विंटल)

एकूण उत्पन्न (30 क्विंटल 2,200) 66,000

निव्वळ नफा (अंदाजित) : ( 66,000 - 30,000)

36,000 (प्रति एकर)

बाजारपेठेचे स्वरूप

मक्याचे अर्थशास्त्र केवळ लागवडीवर नाही, तर योग्य बाजारपेठ धोरणांवर देखील अवलंबून आहे.
सरकारी खरेदी (MSP) : केंद्र सरकारने जाहीर केलेला किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price - MSP) हा शेतकर्‍यांना मिळणारा सर्वात सुरक्षित आधारभाव आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करणे सर्वांत फायदेशीर ठरते.

खाजगी व्यापारी: स्थानिक बाजार समित्या (APMC)आणि खाजगी व्यापारी यांच्या माध्यमातून विक्री करणे. यावेळी बाजारपेठेतील आवकचा अभ्यास करून विक्री करणे अधिक फायदेशीर ठरते.
थेट विक्री : थेट पोल्ट्री फार्म्स किंवा पशुखाद्य निर्मिती करणार्‍या कंपन्यांना विक्री केल्यास चांगला भाव मिळतो. कायमस्वरूपी पुरवठा अपेक्षित असल्यामुळे नियमित विक्री करणे शक्य होते.

ई-नाम (e-NAM) : राष्ट्रीय कृषी बाजाराच्या माध्यमातून देशभरातील बाजारपेठेशी जोडणी साधता येते. पुरवठा आणि मागणी हे बाजारभावावर परिणाम करणारे घटक आहेत. यामुळे पोल्ट्री आणि औद्योगिक क्षेत्रातील मागणीनुसार किमती थोड्याफार बदलतात. परिणामी, आंतरराष्ट्रीय किंमतीचा भारतीय बाजारावर परिणाम होतो.

प्रक्रिया आणि मूल्यवर्धन

शेतकरी बांधवांनी केवळ दाणे न विकता स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न किंवा पॉपकॉर्न यांसाठी विशिष्ट वाणांची लागवड करून थेट हॉटेल/रेस्टॉरंट साखळीला विक्री करणे अधिक फायद्याचे ठरते. याखेरीज चारा निर्मिती करून हिरव्या मक्यापासून (सायलेज) मुरघास (जनावरांसाठी उच्च पौष्टिक चारा) तयार करून विकणे अधिक फायदेशीर ठरेल. याशिवाय मका आधारित स्टार्च, तेल किंवा मक्याचे पीठ तयार करणार्‍या स्थानिक लघु उद्योगांमध्ये गुंतवणूक करणे अधिक नफा मिळवून देणारे ठरेल. मका पिकाचा विविध ठिकाणी होणारा वापर हा मूल्यवर्धन करुन देणारा आणि निश्चित नफा मिळवून देणारा ठरत असल्यामुळे शेतकरी बांधवांसाठी मका हा शाश्वत पर्याय उपलब्ध आहे. योग्य नियोजन पिकाची फेरपालट आणि एकात्मिक व्यवस्थापन यामुळे निश्चितच मका शेतकर्‍यांचे नफ्याच अर्थकारण बदलवेल यात काही शंकाच नाही.

- लेखिका आडगाव चोथवा (ता.येवला) येथे सहाय्यक कृषि अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
Powered By Sangraha 9.0