
@प्रा.संजय बडे
हरभरा हे रब्बी हंगामातील महाराष्ट्रातील मुख्य कडधान्य पीक. शेतकरी बांधवांनी या पिकाची लागवड करताना मध्यम ते भारी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. चोपण व आम्लयुक्त जमिनीत हे पीक घेण्याचे टाळावे. कोरडवाहू परिस्थितीमध्ये जमिनीची कमीत कमी मशागत करावी जेणेकरून जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल.
महाराष्ट्र राज्य हे भारतात हरभरा (चणा/चणा डाळ) लागवड आणि उत्पादनात आघाडीवर (सुमारे 30 ते 35 लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा घेतला जातो.) आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हरभर्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. यापैकी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही दोन प्रमुख राज्ये आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात हरभर्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
हरभरा प्रामुख्याने रब्बी हंगामात (ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पेरणी आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये कापणी) घेतला जातो. कमी पावसाच्या भागात हे पीक उत्तम येते. हरभरा हा डाळवर्गीय पिकांमध्ये महत्त्वाचा असून जमिनीतील नायट्रोजन वाढविण्यास मदत करतो.
जमीन व हवामान
हरभरा लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. ओल टिकवून ठेवणार्या जमिनीत हे पीक चांगले येते. चोपण व आम्ल जमिनी या पिकासाठी योग्य नसतात. कोरडे व थंड हवामान या पिकास मानवते. हवामानातील बदल व रोगकिडीचा पिकावर परिणाम दिसून येतो. उष्ण हवामानात या पिकाची वाढ चांगली होत नाही. हरभरा पीक फुलोर्यात असताना ढगाळ वातावरण असल्यास धुक्यामुळे पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊन पिकाच्या उत्पादनावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.
पूर्व मशागत
हे पीक खरीप बाजरी, ज्वारी, मका, उडीद, मूग आणि सोयाबीन पिकानंतर घेतले जाते. त्यामुळे खरीप पीक काढल्यानंतर एक नांगरट व वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
पेरणी पद्धत
कोरडवाहू हरभर्याची पेरणीची वेळ ठरविताना जमिनीत असलेल्या ओलाव्याचा विचार करावा लागतो, तर बागायती हरभर्याची लागवड करते वेळेस थंडीच्या कालावधीचा विचार करावा लागतो.
बागायती हरभर्याची पेरणी अखेरपर्यंत नोव्हेंबर दरम्यान करावी. पेरणीला उशीर झाल्यास फेब्रुवारी नंतर दिवसा वाढणार्या तापमानामुळे दाणे पूर्ण भरत नाहीत आणि पक्वतेचा कालावधी जवळ येतो. जास्त उत्पादनाच्या दृष्टीकोनातून हेक्टरी झाडांची संख्या 3.33 लाख ठेवावी. त्यासाठी तिफनीने दोन ओळीत 30 सेंटीमीटर व दोन झाडांमध्ये 10 सेंटीमीटर अंतर राहील अशाप्रकारे पेरणी करावी. बागायती पिकासाठी दोन ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर व दोन झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावे. कोरडवाहू हरभर्याचे दुसर्याचे पीक घेताना नांगरामागे पेरणी करावी. बियाणे सात ते दहा सेंटिमीटर खोलीवर पडेल तरी चालेल, पण ओळीत पडेल याची काळजी घ्यावी. तीन फूट रुंदीच्या सर्या पाडून वरंब्याच्या दोन्ही बाजूस हरभरा टोकन केल्यास सुद्धा अतिशय चांगले हरभरा उत्पादन मिळते.
बियाणे प्रमाण
लहान आकाराच्या दाण्याच्या वाणाकरिता हेक्टरी 50 ते 60 किलो बियाणे वापरावे. मध्यम आकाराच्या दाण्याच्या वाणाकरिता हेक्टरी 75 ते 80 किलो बियाणे वापरावे. काबुली हरभरा लागवडीसाठी 100 ते 125 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.
बीज प्रक्रिया
हरभरा उगवणीनंतर साधारणतः एक महिन्यापर्यंत मुळकुजव्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडे मरतात व त्यानंतर पुढे फ्युसेरियम बुरशीद्वारे होणार्या मर रोगामुळे झाडे वाळतात. या पिकाची उगवण व्यवस्थित होण्यासाठी आणि बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन किंवा बाविस्टीन यापैकी एका बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. या बुरशीनाशकाबरोबरच ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर जिवाणू संवर्धनयुक्त प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी दहा ते पंधरा किलो हरभरा बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे एक पाकीट पुरेशा गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी. त्यामुळे अधिकचे नत्र जमिनीत साठविले जाते. उत्पादनात दहा ते पंधरा टक्के वाढ होते. स्फुरद खताची उपलब्धता वाढविण्यासाठी पीएसबी जिवाणू संवर्धक 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास वापर करावा.
खत व्यवस्थापन
पेरणीपूर्वी कोरडवाहू हरभर्यास हेक्टरी 20 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद जमिनीत मिसळून द्यावे. तर ओलिताखालील हरभर्यास 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे. काबुलीसाठी हेक्टरी 25 किलो नत्र आणि 60 किलो स्फुरद दिल्यास उत्पादनात वाढ होते. हरभरा पिकाला माती परीक्षणानुसार पालाश व सुषमा अन्नद्रव्य देणे गरजेचे आहे. त्यासाठी हेक्टरी 30 किलो पालाश, 25 किलो झिंक सल्फेट आणि 20 किलो गंधक दिल्यास उत्पादनात वाढ मिळते.
कोरडवाहू हरभर्याच्या पिकावर दोन टक्के युरिया (200 ग्रॅम युरिया प्रति दहा लीटर पाणी ) किंवा दोन टक्के डीएपी (200 ग्रॅम डीएपी प्रति दहा लीटर पाणी) द्रावणाच्या दोन फवारण्या पहिली फुले येण्यापूर्वी व त्यानंतर दहा दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
उत्पादनात वाढ होण्यासाठी ओलिताखालील पिकास पेरणीपूर्वी 5 टन शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे किंवा पेरणीच्या वेळी जमिनीतून प्रति हेक्टरी दोन ते तीन टन गांडूळ खत आणि शिफारशीनुसार रासायनिक खत 25 :50 नत्र आणि स्फुरद/हेक्टरी याप्रमाणे द्यावे.
तण व्यवस्थापन
या पिकास पहिली कोळपणी आणि खुरपणी पेरणीपासून 25 दिवसांनी व दुसरी 45 दिवसांनी करावी. आंतरमशागत पीक फुलोर्यात येण्यापूर्वी संपवावी. तणनाशकाचा वापर करावयाचा असल्यास पेंडीमेथिलीन 2.5 ते 3 लीटर प्रति हेक्टरी हरभरा पेरणीनंतर परंतु बियाणे उगवण्यापूर्वी 500 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि पेरणीनंतर 45 दिवसांनी एक खुरपणी करावी. पहिल्या 30 दिवसापर्यंत पीक तणमुक्त ठेवल्यास उत्पादनात 25 टक्के वाढ होते.
आंतरपीक
हरभरा पिकाचे मोहरी, करडई, जवस, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते. हरभर्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर 10 सेंटिमीटर अंतरावर हरभर्याची एक ओळ टोकन केल्यास हरभर्याचे चांगले उत्पादन मिळते.
पाणी व्यवस्थापन
हरभर्याचे पीक पाण्याच्या वापरास उत्तम प्रतिसाद देते. जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण व पीक अवस्था लक्षात घेऊन पाणी द्यावे. हलक्या जमिनीत हरभरा घेतला असल्यास पेरणीनंतर 25 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या तीन पाळ्या द्याव्यात. कोरडवाहू हरभरा पेरणीनंतर 45 दिवसांनी एक पाणी दिल्यास उत्पादनात 28 टक्के वाढ होते आणि दोन पाणी दिल्यास 50 टक्के वाढ होते. बागायती हरभर्यास पेरणीचे वेळी दिलेल्या पाण्याशिवाय पहिले पाणी पीक 45 दिवसांचे (फुलोर्यात) असताना आणि दुसरे पाणी 75 दिवसांचे (घाटे भरतेवेळी) असताना पाणी द्यावे. या पिकास जास्तीचे पाणी दिल्यास झाडाची काहीच वाढ जास्त होते व घाटे कमी लागतात. जमिनीत पाणी साचून राहिल्यास पीक उधळण्याचा धोका असतो. हरभरा पिकास फांद्या फुटण्याच्या वेळेस, फुलोरा आणि घाटे भरणे या तीन संवेदनशील अवस्थेत पाणी देणे गरजेचे आहे. यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास उत्पादनात भर पडते.
सुधारित जातींची निवड
कोरडवाहू तसेच बागायतीसाठी विजय, दिग्विजय, जाकी, साकी, राजविजय 204, राज विजय 202, फुले विक्रम, परभणी चणा 16, फुले विक्रांत, पीकेव्ही कांचन, बीडीएनजी 797 (आकाश), विश्वराज. ओलिताखालील काबुली हरभरा: विराट, पीकेव्ही काक 2, श्वेता, पीकेव्ही काबुली 4, फुले कृपा, बीडीएनजीके 798, हिरव्या हरभर्यासाठी: हिरवा चाफा, पीकेव्ही हरिता, एके जीएस 1, फुटाणे हरभर्यासाठी: गुलक 1, डी 8. इत्यादी.
हरभरा शेतकर्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक आहे.हरभर्यापासून बेसन, सूप, स्नॅक्स, बेकरी उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे कोरडवाहू भागातील शेतकर्यांसाठी हे उत्तम नफा देणारे पीक आहे.
सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग,
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय,
दहेगाव, तालुका वैजापूर,
जिल्हा छत्रपती संभाजीनगर.