‘पुल’कित कलाविष्कार

21 Nov 2025 15:52:08

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे 8 ते 12 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ’पु. ल. कला महोत्सव 2025 - उत्सव कलांचा, उत्सव कलाकारांचा...’ याचे आयोजन करण्यात आले होते. पु. लं. च्या बहुआयामी व बहुरंगी व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करणारे विविध कार्यक्रम या महोत्सवात सादर करण्यात आले. आबालवृद्धांसाठी मनोरंजनाची खरी पर्वणी असलेल्या या महोत्सवाने पु. ल. यांच्या कला क्षेत्रातील योगदानाला कलात्मक अभिवादन केले.

रुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पुलं यांचा महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असा सार्थ उल्लेख केला जातो. पु. ल. देशपांडे हे मराठी साहित्य, नाट्य, संगीत, चित्रकला आणि विनोदी लेखन क्षेत्रातील एक बहुआयामी प्रतिभावान व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा प्रभाव निर्माण करण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय होय. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि त्यांची स्मृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1991 मध्ये पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ही संस्था स्थापन केली. साल 2002 मध्ये देशपांडे यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रभादेवी येथील वास्तूस पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी हे नाव देण्यात आले. अकादमीत रवींद्र नाट्यमंदिर व अन्य दोन नाट्यगृहे आहेत. हे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत येते. पु. ल. यांच्या कलाविषयक वारशाला जपणे, नवीन कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि मराठी संस्कृतीचे विविध पैलू प्रदर्शित करणे असा अकादमीचा मुख्य उद्देश आहे.

पु. ल. कला महोत्सव हा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा वार्षिक कला महोत्सव असून, तो पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी आयोजित केला जातो. त्यांच्या स्मृतीला समर्पित कार्यक्रमांनी भरलेला हा महोत्सव असतो. हा महोत्सव पु. ल. यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाची (साहित्य, नाट्य, संगीत, व्यंग्य इ.) प्रेरणा घेऊन वैविध्यपूर्ण कलाप्रकारांच्या समावेशाने साजरा करण्यात येतो.

या महोत्सवाचा मुख्य उद्देश पुढीलप्रमाणे आहे:

- मराठी कला, साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार करणे.

- ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान आणि युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करणे.

- पारंपरिक आणि आधुनिक कलांचा संगम साधणे, जसे की नाटके, संगीत, चर्चासत्रे, प्रदर्शने भरविणे, इ.

या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे 8 ते 12 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ’पु. ल. कला महोत्सव 2025 - उत्सव कलांचा, उत्सव कलाकारांचा...’ याचे आयोजन करण्यात आले. पु. लं. च्या बहुआयामी व बहुरंगी व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करणारे विविध कार्यक्रम या महोत्सवात सादर करण्यात आले. महोत्सवाचा शुभारंभ मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्या हस्ते पु. लं.च्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला.


शंभरी पार केलेले आणि अद्याप कार्यरत असलेले प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या ’हसर्‍या गॅलरी’ चे उद्घाटन देखील आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या हसर्‍या गॅलरीत शि. दं. नि रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन व्यंगचित्रप्रेमींना त्याचा आस्वाद घेण्यात यावा यासाठी 8 ते 12 नोव्हेंबर 2025 या कालावधीत अकादमीतील कला दालन येथे भरविण्यात आले होते. तसेच याच दरम्यान महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनतर्फे बांबू उत्पादनांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते.
या महोत्सवात पहिल्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी कै. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ’मास्तरांचे मंतरलेले दिवस’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन दीपक करंजीकर आणि विघ्नेश जोशी यांचे होते तर लेखन मकरंद जोशी यांनी केले होते. प्रसिद्ध अभिनेत्री फैय्याज, चंद्रकांत लिमये, मीना नाईक, प्रमोद पवार, संजय पेंडसे, आविष्कार दारव्हेकर व रंजन दारव्हेकर यांनी दारव्हेकर मास्तरांच्या आठवणींना उजाळा दिला. नाट्यप्रवेश व अभिवाचन प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख संपदा माने, शैलेश चव्हाण, ओंकार कुलकर्णी, दीपक करंजीकर, विद्या करंजीकर यांनी केले. गायन साथ संपदा माने आणि अभिषेक काळे यांनी केली. वाद्य साथसंगत वरद सोहोनी आणि अथर्व आठल्ये यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मकरंद जोशी आणि स्मिता गवाणकर यांनी केले. निर्मिती पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांची होती.

दुसर्‍या दिवशी 9 नोव्हेंबर रोजी मुंबईतील पहिला ’संगीत सम्राट अल्लादिया खाँ युवा संगीत समारोह’ हा शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांच्या युवा शिष्यांचे सादरीकरणाने रवींद्र नाट्य मंदिर येथील मुख्य सभागृहात संपन्न झाला. युवा कलाकार अर्णव बुवा, निनाद जोशी, आशण जैन, अदिती कोरटकर, तेजस्विनी वेर्णेकर, अद्वैत केसकर, अनुजा बोरुडे शिंदे (पखवाज), षड्ज अय्यर, ऋतुजा लाड आणि श्रुती विश्वकर्मा मराठे यांनी या समारोहात आपल्या गुरूंना मानवंदना दिली. हा समारोह सकाळी 10 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत अतिशय उत्साहाच्या वातावरणात रंगला.

परभणीच्या झपुर्झा संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेले (पु. ल. यांच्या रेखाटलेल्या पात्रांवर आधारित) ’अस्वस्थ वल्ली’ हे नाटक मनाला चटका लावून गेले. विनोद डावरे यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून उतरलेले हे नाटक अस्वस्थ वल्ली या त्याच्या नावाप्रमाणेच मनाला अस्वथ करते. पु.लं. यांच्या 106व्या वाढदिवसानिमित्त पु. लं. यांनी निर्मिलेली पात्रे मग तो अंतू बर्वा असो की फुलराणी किंवा नारायण अथवा नाथा ही सर्वच मनाला अस्वथ करून जातात. सध्याच्या सामाजिक स्थितीवर मार्मिक बोट ठेवतात आणि समाजव्यवस्थेतील उणिवांवर भाष्य करतात. सुनीता बाईंचं पु.लं.च्या आयुष्यातील स्थान ही नाटिका अधोरेखित करते. या नाटकाचे सादरीकरण सकाळी 11 ते 2 या वेळेत रवींद्र नाट्य मंदिर येथील लघु नाट्यगृहात झाले.

सायंकाळी 7 ते 10 या वेळेत ’जावे पु.लं.च्या गावा’ हे नाटक कल्पांगण सांस्कृतिक केंद्र यांनी सादर केले. नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि संकल्पना प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना कल्पित राणे यांनी केले. प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद या प्रयोगास लाभला. रसिकांना सतत गुंतवत ठेवून पु.लं.च्या नाटकांचे, व्यक्तिचित्रांचे उतारे, पु.लं.ची गाणी, तुला शिकवीन चांगलाच धडा हे सुप्रसिद्ध कथन किंवा सुनीताबाईंनी पु.लं.च्या आठवणीत लिहिलेलं पत्र इत्यादी प्रयोग कल्पांगण सांस्कृतिक केंद्रच्या कलाकारांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. डॉ. राम पंडित, तन्वी गोरे, अम्लेंदू जोशी यांची गायन-वादन साथसंगत लाभली.

तिसर्‍या दिवशी 10 नोव्हेंबर रोजी स्व. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ’माणिक वंदन’ कार्यक्रम मुख्य सभागृह रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पाडला. समीर गुजर यांच्या रसाळ आणि माहितीपूर्ण निवेदनाने या कार्यक्रमाची उंची वाढवली. माणिक वर्मा यांच्या सांगीतिक आठवणींना आपल्या स्वराविष्कारातून डॉ. मीनल माटेगावकर, वेदश्री खाडिलकर-ओक व केतकी चैतन्य यांनी उजाळा दिला. माणिक वर्मांच्या वैविध्यपूर्ण गाण्यांची पेशकश रसिकांच्या आठवणी ताज्या करत होत्या. शौनक अभिषेकी, शैला दातार, सुहास व्यास आणि राणी वर्मा यांनी माणिक वर्मांच्या आठवणी जाग्या केल्या. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी निर्मित या कार्यक्रमाची संकल्पना आणि मार्गदर्शन आशा खाडिलकर यांनी केलं. साथसंगत निषाद करलगिरकर, निला सोहोनी, झंकार कानडे, अनिल करंजवकर यांनी केली. या कार्यक्रम प्रसंगी माणिक ताईंच्या कन्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, वंदना गुप्ते व राणी वर्मा उपस्थित होत्या. वंदना गुप्ते यांनी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे आणि मीनल जोगळेकर, संचालक पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांचे नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनाबद्दल विशेष कौतुक केले.

चौथ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळात ’अखची कलाकारी - अखचे कलाविश्वावर होणारे परिणाम’ हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध पत्रकार मिलिंद भागवत यांचे. तर वक्ते म्हणून व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव, टेक्निकल डिरेक्टर केतन माणगावकर व प्रा. शेखर सरतांडेल (रचना सांसद, कला शाखा) चर्चासत्रासाठी उपस्थित होते. अखचे कलाक्षेत्रावर होणार्‍या होकारार्थी परिणामांवर या चर्चासत्रामध्ये विश्लेषण करण्यात आले. त्याच बरोबरीने अखचे संभाव्य धोके ओळखून त्यातून मार्ग कसा काढू शकतो आणि आपली कार्यक्षमता कशी वाढवू शकतो यावर मंथन केले गेले. ही चर्चा अखंड दोन तास चालली. पण उपस्थित श्रोत्यांनी ह्या महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण चर्चेचे न कंटाळता श्रवण केले व दैनंदिन आयुष्यातील अखच्या प्रभावी व सकारात्मक वापराविषयी माहिती घेतली.

12 नोव्हेंबर रोजी ’सांगड’ हे बोलीभाषेतील कवितांचे सादरीकरण शशांक बामणोलकर व सहकारी कवी यांनी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत लघु नाट्यगृहात सादर केले. कोळी, आगरी, अहिरणी, लेवा पाटील, मालवणी, कुणबी इत्यादी बोलीभाषेतील स्वरचित कवितांची सांगड या बोलींतील कवितांनी केली.

अतिशय रंगलेल्या या महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध कथक नर्तक व गुरू मयूर व त्यांचा संच यांनी सादर केलेल्या शास्त्रीय आणि चित्रपट संगीत यावर आधारित ’अष्टनायिका’ या बहारदार व मयूर वैद्य यांच्या जोशपूर्ण आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणार्‍या अदाकारीने झाला. या सादरीकरणास अनेक नामवंत कलाकार, सामाजिक, वैद्यकीय व अन्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलाार यांच्या मार्गदर्शनानुसार अकादमीत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन अलीकडच्या काळात करण्यात येत आहे. डॉ. किरण कुलकर्णी (भा.प्र.से.) सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभाग यांच्या नेतृत्वात अकादमीचे अधिकारी आणि कर्मचारी या उपक्रमांचे अयोजन सुविहित पद्धतीने होण्यासाठी परिश्रम घेत असतात. त्यामुळे हा महोत्सव दरवर्षी वृद्धिंगत होत जातो. अमाप उत्साह, आनंद आणि कलाविष्कार यांनी आबालवृद्ध रसिक आकर्षित होतात. ही परंपरा अखंडित राहील याची ग्वाही देणारे अकादमीचे नियोजन त्याला सार्थ ठरवते. प्रायोजक भारतीय जीवन बीमा निगम, कालनिर्णय यासारख्या संस्था या महोत्सवास बहुमूल्य आधारस्तंभ ठरल्या आहेत. आबालवृद्धांसाठी मनोरंजनाची खरी पर्वणी असलेल्या या महोत्सवाने पु. ल. यांच्या कला क्षेत्रातील योगदानाला कलात्मक अभिवादन केले. आलेल्या रसिक प्रेक्षकांनी अकादमी व विभागाला शुभेच्छा देत भविष्यातील अशा आयोजनासाठी उत्साहपूर्ण अभिप्राय व्यक्त केला.

- प्रतिनिधी

Powered By Sangraha 9.0