ससून रुग्णालयात अनोखी अन्नदान सेवा

21 Nov 2025 17:59:38

राजेंद्र पंढरपुरे  9623442517

Sassoon Hospital Pune ससून रूग्णालयात येणार्‍या रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांनाही आपल्या मूलभूत गरजांवर खचर्र् करणे क्रमप्राप्त असते. रूग्णांची औषधे आणि आपल्यावर होणार्‍या खर्चाकडे बघता रूग्ण हेच त्यांच्यासाठी अग्रक्रम असतात. पोटाला चिमटा काढून रूग्णांची सेवा काहीवेळेस करावी लागते. असे चित्र पाहून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्कृष्ट दर्जाचे अन्नदान करावे हे अत्यंत स्तुत्य कार्य सुरेश भिकचंदजी डाकलिया आणि परिवाराच्या हातून घडत आहे.

ण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय हे केवळ पुण्यातीलच नव्हे तर, पश्चिम महाराष्ट्रातील शासकीय उपचार केंद्र आहे. येथे तीन हजार रुग्ण दाखल झालेले असतात आणि बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची रांग लागलेली असते. गावागावांतून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचा प्रश्न भेडसावत असतो. ही समस्या यथाशक्ती सोडविण्याचा प्रयत्न वाहतूक व्यावसायिक सुरेश भिकचंदजी डाकलिया आणि परिवाराने केला आहे.

ससून रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कनिष्ठ मध्यमवर्ग यातील रुग्णांचे प्रमाण जास्त असते. रुग्णांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था, व्यवस्थापनाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सहकार्याने केलेली आहे. या योजनेतून रुग्णांना दोन वेळा जेवण विनामूल्य देण्यात येते. पण प्रश्न येतो तो रुग्णाबरोबर थांबलेल्या नातेवाईकांचा. या नातेवाईकांना रुग्णाच्या आजाराचा मनावर ताण असतो. औषधोपचारासाठी थोडाफार खर्च करावा लागतोच. शिवाय नातेवाईकांच्या राहाण्याचा प्रश्न असतो. रुग्णालयाच्या आसपास स्नॅक्स सेंटर, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आहेत. तेथील पदार्थ खिशाला परवडणारे नसतात. शिवाय ते पदार्थ तिखट, तेलकट, मसालेदार असतात. ते खाऊन आजारी पडण्याचीच शक्यता वाटत असल्याने नातेवाईक ते जेवण टाळतात. रुग्णांचे काही नातेवाईक तर स्वतःची भूक मारून रुग्णाजवळ थांबलेले असतात.

नातेवाईकांच्या भुकेची समस्या साडेतीन-चार वर्षांपूर्वी डाकलिया यांना समजली. ते एकदा फिरायला गेले असताना, ससूनच्या बाहेर एक संस्था अन्नदान करीत होती आणि ते अन्न घेण्यासाठी तेथील लोकांची खूप मोठी रांग होती. ते पाहून डाकलिया यांनी विचार केला की, आपणही येथे उत्कृष्ट दर्जाचे अन्नदान करावे. डाकलियांना त्यांच्या मातोश्री स्व.जतनबाई भिकचंदजी डाकलिया सांगायच्या की, आपल्या उत्पन्नातला पाच टक्के तरी भाग आपण काही ना काही रूपात समाजाला द्यावा. मातोश्रींची ही भावना माझ्यासह सर्व परिवारासाठी प्रेरणादायक होती. त्यातून अन्नदान सेवेला चालना मिळाली, असे ते सांगतात.



पण ही योजना व्यवहारात आणायची कशी? असा प्रश्न होता. डाकलियांनी तो मित्रांना बोलून दाखवला. त्यावेळी स्वयंपाकाचे काम एखाद्या चांगल्या कुटुंबाकडे देण्याचे ठरले. तेव्हा त्यांना वडगाव शेरी येथील प्रशांत कोठारी, राखी कोठारी आणि परिवाराचे नाव सुचविण्यात आले. अहिल्यानगरमधून आलेले कोठारी वडगाव शेरीमध्ये घरगुती टिफीन बनवून देऊन जम बसवू पाहात होते. कोठारींची कष्ट करण्याची तयारी आणि चविष्ट पदार्थ बनविण्याचे त्यांचे कौशल्य डाकलिया यांनी ओळखले आणि कोठारी यांच्याकडे डबे तयार करून देण्याचे काम सोपविले.

हे काम सोपविल्यावर त्यांनी रोज 200 डबे आणि 200 पाण्याच्या बाटल्या बसतील, अशी एसी व्हॅन तयार करून घेतली. डब्यासाठी बॉक्स आणि प्लेट्स कोठारींच्या घरी पाठविण्याची व्यवस्था केली. डब्यात मोठ्या आकाराच्या दोन पोळ्या, कडधान्याची उसळ किंवा सुकी भाजी, भाताचे वेगवेगळे प्रकार म्हणजे कधी मसालेभात, जिरे भात, कधी हिरवा वाटाणा घालून केलेला भात, सोललेली काकडी आणि लोणचे असे पदार्थ असतात आणि सोबत अर्ध्या लीटरची पाण्याची बाटली दिली जाते.
हा उपक्रम राबविताना सुरुवातीला मात्र खूपच अडथळे आले. बरोबर दुपारी बारा-साडेबारा वाजण्याच्या सुमारास डाकलियांची गाडी ससून रुग्णालयाच्या बाहेर डबे वाटप करण्यासाठी येई. मात्र, काही हॉटेल चालकांच्या व्यवसायावर त्यामुळे परिणाम होऊ लागल्याने संघर्ष सुरू झाला.

हा संघर्ष टाळण्यासाठी सुरेश डाकलिया यांनी ससून रुग्णालयातील वरिष्ठांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. ’आपण अन्नदान सेवाभावी वृत्तीने करत असून त्या पदार्थांचा दर्जा चांगला ठेवला असल्याचे’ त्यांनी वरिष्ठांना पटवून दिले. त्यानंतर रुग्णालयाच्या आवारातच डाकलिया यांना त्यांची गाडी आणून जेवणाचे डबे वाटप करण्याची परवानगी देण्यात आली. शिवाय व्यवस्थापनाने रुग्णांच्या नातेवाईकांना टोकन देण्याची व्यवस्था केली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रुग्णांचे नातेवाईक गाडीची वाट पाहात असतात. टोकन घेऊन त्यांना डबा आणि पाण्याची बाटली दिली जाते. सध्या दीडशे ते दोनशे जणांना मोफत जेवण दिले जाते. दररोज तीनशे डबे पुरविण्याचा डाकलिया परिवाराचा विचार आहे. लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण होईल.

या उपक्रमाबाबत बोलताना प्रशांत कोठारी यांनी सांगितले, सोमवार ते शुक्रवार ही अन्नदान सेवा चालू असते. डाकलिया परिवार स्वखर्चाने हा उपक्रम चालवितो आणि त्यांचे बारकाईने लक्ष असते. सकाळी सात वाजता आम्ही जेवणाची तयारी करायला लागतो. अकरा वाजता सगळा स्वयंपाक योग्य ते पॅकिंग करून तयार असतो. डाकलियांची गाडी आली की, सगळे डबे, पाण्याच्या बाटल्या, जेवणाच्या प्लेट्स त्या गाडीत भरले जाते.

गाडी चालक फिरोज शेख याने सांगितले, आम्ही जेव्हा जेवणाचा डबा नातेवाईकांच्या हाती देतो तेव्हा ते आमच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला दुवा देतात, तेव्हा समाधान वाटते. हा दुवा पाठीशी असल्यानेच मी आणि पत्नी एका मोठ्या अपघातातून बचावलो.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अशा प्रकारचे उपक्रम करणे हे अत्यंत स्तुत्य कार्य डाकलिया यांच्या हातून घडत आहे.
Powered By Sangraha 9.0