भात पिकातील अवशेषांचा उपयोग

    21-Nov-2025
Total Views |
डॉ. श्रीहरी हसबनीस
7588034068



भात पिकाचे अवशेष आणि त्यापैकी पळींज यामध्ये सर्वांत जास्त सिलिकाचे प्रमाण असते आणि बहुतेक सर्व शेतकरी या पळींजाकडे निरुपयोगी आहे म्हणून दुर्लक्ष करतात आणि टाकून देतात. खरेतर पळींज, भाताचा पेंढा, कोंडा आणि तांदूळ आदी महत्त्वाचे अवशेष आहेत. पिकांची कीड, रोग आणि निसर्गनिर्मित होणार्‍या प्रतिकूल घटकांशी सामना करण्याची क्षमता या अवशेषात असते.

संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात पावसाने हाहाकार केला. शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला पिकाचा घास हिसकावला गेला. अति आणि अवेळी पावसाने मोठ्या प्रमाणात नासधूस झाली.

कोकणपट्ट्यातसुद्धा भात काढणीसाठी तयार असतानाच अचानक आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. खरेतर दिवाळी हंगामाच्या सुमारास भात तयार होते आणि शेतकरी काढणी, झोडणी या कामात व्यस्त असतो. भातही पक्व होऊन काढणीस तयार असते. नेमक्या याचवेळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

बहुतेक शेतातून असे दिसते आहे की, शेतातील भात शेतकर्‍यांनी कापले आणि त्याच सायंकाळी आलेल्या मोठ्या पावसाने त्यात पाणी साचलं. या साचलेल्या पाण्यामुळे भाताचे दाणे अंकुरले. या अंकुरलेल्या भाताचा काहीच उपयोग नाही. पूर्णपणे नुकसान! काही शेतामधून असेही दृश्य दिसले की, उंच वाढलेले भात काढणीपूर्वीच मोठं वारं आणि अति पाऊस याच्यामुळे आडवे झाले. यामध्ये सुद्धा भाताच्या ओंब्या, पक्व दाणे मातीच्या आणि पाण्याच्या संपर्कात आले आणि हे भात दाणे सुद्धा रुजले, म्हणजे त्याला अंकुर आले. ही आपल्याला सर्व दूर परिस्थिती दिसत आहे. पुन्हा पुढील हंगामात असे नुकसान होऊ नये यासाठी आपण आतापासूनच तयारीस लागलं पाहिजे. वरील निरीक्षणामध्ये एक निरीक्षण म्हणजे, ज्यामध्ये उंच वाढलेले भात अतिवारा आणि पाऊस यामुळे आडवे झाले आणि नुकसान झाले. हे कसं टाळता येईल याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ.




निरीक्षणात असं आहे की, ज्या शेतकर्‍यांनी भाताच्या बुटक्या किंवा मध्यम उंचीच्या जातींची लागवड केली आहे. त्यांच्याकडे हा त्रास झालेला नाही. एवढेच नव्हे तर ज्या शेतकर्‍यांनी रासायनिक खतांच्या बाबतीत विशेषतः नत्रयुक्त रासायनिक खत म्हणजे युरिया अतिरेकी प्रमाणात वापरला आहे त्यांच्याकडे सुद्धा भाताची उंची खूपच वाढली, खोड कमकुवत राहिले आणि भात पीक लोळण्यास अनुकूल घडले. म्हणजे तात्पर्य असे की, अशा प्रकारचं नुकसान टाळण्यासाठी आपण पुढील हंगामात भाताच्या चांगलं उत्पन्न देणार्‍या बुटक्या किंवा मध्यम उंचीच्या जातींची निवड करणे. ज्या जाती खूपच उंच वाढतात, त्यांची लागवड करणे टाळणे. तसेच गरजे इतकीच नत्र खताची मात्रा युरियामार्फत, पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थामधूनच देणे. एवढ्या दोन खबरदारी घेतल्या तर भात उंच वाढून पावसामध्ये जमिनीवर लोळणे आणि त्यातून नुकसान होणे सहज टाळता येईल. हा या लेखाचा गाभा आहे.

भात पिकाच्या अवशेषांचा भात पीक वाढीसाठी सुयोग्य वापर
आता भात काढणीनंतर अवशेष कोणकोणते असतात? भाताचा पेंढा, भात काढणीनंतर फोल भात, म्हणजेच पळींज. फोल, कोंडा.
झोडणीनंतर आपण भाताला वारं देऊन स्वच्छ करतो, त्यावेळी ज्या भातामध्ये तांदळाचे दाणे भरलेले नाहीत किंवा पोचट आहेत, ते वार्‍याने लांब जाऊन पडतात आणि त्यालाच आपण पळींज असे म्हणतो. पुढील भात पीक घेत असताना या पळींजाचा उपयोग अतिशय महत्त्वाचा आहे.

आपल्या लेखाच्या शीर्षकाच्या संदर्भाने मी जे नमूद केले की भात पिकाचे अवशेष आणि त्यापैकी पळींज यामध्ये सर्वात जास्त सिलिकाचे प्रमाण असते आणि बहुतेक सर्व शेतकरी या पळींजाकडे निरुपयोगी आहे म्हणून दुर्लक्ष करतात आणि टाकून देतात.

सिलिका हा एक महत्त्वाचा निसर्गातील घटक आहे. पीक वाढीमध्ये किंवा पिकांसाठी असणार्‍या गरजेच्या अन्नद्रव्यांमध्ये सिलिका या घटकाचा अंतर्भाव नाही. परंतु संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, अनेक पिकांमध्ये सिलिका या घटकाचा खूप महत्त्वाचा उपकारी गुणधर्म आहे. तो पिकांची कीड, रोग आणि निसर्गनिर्मित होणार्‍या प्रतिकूल घटकांशी सामना करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवतो. भात पीक अवशेषांतील (पेंढा, पळींज, फोलकट, कोंडा, तांदूळ) सिलिकाचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे:


भात पेंढा : सिलिकाचे प्रमाण साधारण 12-16% पर्यंत असते.

पळींज : हे सर्वाधिक सिलिका प्रमाण असलेला भाग आहे. यामध्ये साधारण 15-20 टक्के सिलिका
असते. पळींज जाळल्यावर, राखेत सिलिकाचा प्रमाण 85-95% पर्यंत असते.

कोंडा : साधारण 3-5 टक्के सिलिका असते, जे पान आणि पेंढ्याच्या तुलनेत कमी प्रमाणात आहे.
तांदूळ : दाण्यामध्ये सिलिकाचे प्रमाण तुलनेने फार कमी 0.1-0.3 टक्के इतकेच असते. या सर्व अवशेषांपैकी पळींजमध्ये सर्वाधिक सिलिकाचे प्रमाण आहे. म्हणूनच त्याचा वापर करावयाचा आहे.
भात पिकामध्ये पळींजाचा वापर अगदी सोप्या पद्धतीने करता येतो. कोकणामध्ये भात लागवडीसाठी रोपे तयार करण्याची आणि पुनर्लागन करण्याची प्रथा प्रचलित आहे. भात लागवडीसाठी रोपे करताना बहुतांश शेतकरी भाजवण करतात. म्हणजे शेतातील काडीकचरा, जास्ती वाढलेल्या झाडांच्या फांद्या, काटक्या, काही शेतकरी तर गुरांच्या शेणाच्या गोवर्‍या यांचा वापर करून जिथे रोप करावयाचे आहे तो भाग भाजून घेतात. आपण या पळींजाचा सुद्धा भाजवणीमध्ये उपयोग करू शकतो. एवढेच नव्हे तर पळींज आत्ताच आपण जाळले आणि त्याची राख ठेवली तर त्याचा उपयोग आपल्याला अवश्य करता येतो.

भात रोपांसाठी जेव्हा आपण बियाणे विस्कटतो त्या दरम्यानच बियाणे विस्कटून झाले की, तेवढ्या क्षेत्रापुरती पळींजाची राखही विस्कटावी. या राखेमध्ये सिलिका असतो. भाताची रोपे वाढत असताना हा सिलिका शोषून घेतात, आपल्या शरीरात साठवतात. ज्या ज्या ठिकाणी प्रयोगामध्ये भात शेतीत पळींज राखेचा उपयोग केला आहे, त्या शेतामध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमीत कमी झाल्याचे निष्कर्ष उपलब्ध आहेत.


पळींजच्या राखेचे प्रमाण आणि वापर

राखेचा उपयोग भात रोपवाटिका प्रत्यक्ष पेरण्यापूर्वी करावा. मागील वर्षीच्या भात पिकातील पळींजची राख वापरली जाते. पळींजची राख पोत्यांमध्ये साठवून ठेवावी, नंतर भाताच्या रोपवाटिकेतील मातीमध्ये राख मिसळावी. राख मातीमध्ये मिसळताना साधारणतः 1 किलो राख ही 10 ते 15 चौरस मीटर क्षेत्रफळासाठी वापरतात. राखेतील सिलिकॉनमुळे भाताच्या रोपांची मुळे मजबूत होतात, रोगप्रतिबंधक क्षमता वाढते, आणि रोप उपटणे तसेच करपा रोगाचा संक्रमण कमी होतो. राख वापरल्याने भाताची उत्पादकता सुधारली जाते आणि पिक निरोगी राहते.

पळींज राख बियाण्यांसाठी प्रक्रिया
पळींज राख स्वच्छ, कोरडी आणि चांगल्या प्रतीची असावी. भाताच्या बियाण्यांवर राखेची 5-10 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. राखेच्या प्रक्रियेनंतर बियाणे हलक्या हाताने नीट मिसळावे आणि थोडा वेळ (काही तास) सावलीत कोरडे करावे जेणेकरून राख बियाण्यावर नीट लवकर लागू शकते. राख प्रक्रिया केलेले बियाणे त्वरित पेरणीसाठी वापरावे, जास्त वेळ साठवू नये. राखेने केलेली बीजप्रक्रिया भात पिकाचे रोगांपासून संरक्षण करते तसेच रोपांना मजबूती मिळते, मुळे बळकटीने वाढतात आणि पीक निरोगी व अधिक उत्पादनक्षम होते.

सिलिकामुळे भातपिकास होणारे फायदे

वनस्पतीच्या पानांमध्ये पर्णरंध्र असतात. इंग्रजीमध्ये यांना स्टोमाटा असे म्हणतात. पानांच्या खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूला असतात. वनस्पतीच्या शरीरक्रियांमध्ये यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. सूर्यप्रकाशाच्या प्रखर कालावधीमध्ये हे बंद होत असतात आणि तद्नंतर उघडतात.

भातामध्ये येणार्‍या रोगांपैकी, करपा (ब्लास्ट) हा एक बुरशीजन्य महत्त्वाचा रोग आहे. या बुरशीची लागण होताना ती या पर्णरंध्रांच्या मधूनच होत असते. ज्या भात पिकामध्ये सिलिकाचा वापर केला आहे त्या ठिकाणी पर्णरंध्रांच्या आतल्या बाजूने सिलिका भित्तिका तयार होतात. बुरशीच्या प्रवेशास अटकाव करतात. प्रयोगातून हे सिद्ध झाले आहे की, ज्या भात पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थात सिलिकाचा वापर केला आहे, तिथे भात पिकामध्ये ब्लास्ट म्हणजे करपा यासारख्या रोगास प्रतिकारक्षमता वाढलेली असते.

सिलिका वापरामुळे पानांच्या वरती, खोडांच्या वरती एक अतिशय टणक असे आवरण तयार होते. हे घट्ट आवरण फोडून रस शोषणार्‍या किडींना आपली सोंड आत खुपसण्यास अशक्य होते. पाने आणि खोड कुरतडून खाणार्‍या किडींना या जाड आवरणामुळे हिरवा भाग खाणे दुरापास्त होते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे खोडावरील तयार झालेल्या जाड आणि घट्ट आवरणामुळे आपले भात पीक आडवे होणार नाही, लोळणार नाही. पुढील हंगामात पावसाचा कहर होऊन असाच प्रसंग उद्भवल्यास आपले पीक निश्चितच सुरक्षित राहील. याशिवाय, सिलिकॉन वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेला चालना देतो. ज्यामुळे पिकाला चांगली वाढ मिळते. साधारणतः सिलिकॉन वनस्पती मुळांद्वारे मोनोसिलिसिक किंवा ऑर्थो सॅलिसिक अ‍ॅसिडच्या स्वरूपात शोषून घेतात आणि तो पेशी भिंतीत सिलिकाच्या स्वरूपात जमा होतो. त्यामुळे भाताचा काटेरी स्तर तयार होतो जो तग धरण्यास मदत करतो आणि भात लोळत नाही.

सिलिका वापरल्यामुळे पान आणि खोड
संरचनेत बदल


सिलिकाचा साठा वनस्पतीच्या पेशी भिंतींमध्ये आणि पानांच्या पृष्ठभागावर होतो, ज्यामुळे पेशी भिंतींना टणकपणा आणि ताकद मिळते. परिणामी पाने आणि खोड मजबूत व ताठ होतात. यामुळे पाने व खोड अधिक कणखर बनतात आणि त्यांचे खाली वाकणे कमी होते, ज्यामुळे पीक जमिनीवर लोळत नाही किंवा आडवे होत नाही. सिलिका वापरामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुधारते कारण पाने अधिक कार्यक्षमपणे सूर्यप्रकाश शोषू शकतात. पानांवर पातळ, टणक थर तयार होऊन कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि वनस्पतीला विविध ताणांपासून संरक्षण मिळते.

भात पिकामध्ये सिलिका (सिलिकॉन) वापरल्यामुळे पीक लोळत नाही कारण सिलिकॉन वनस्पतीच्या पेशीभित्तिकामध्ये जमा होऊन पेशीभित्तिकाची रचनात्मक दृढता व बळ वाढवते. यामुळे पानांचा ताठरपणा सुधारतो आणि झाड कणखर (मजबूत) होते, त्यामुळे जमिनीवर लोळणे होत नाही. सिलिकॉनने मुळे मजबूत होतात, पाण्याचे संतुलन राखले जाते आणि वनस्पती कीड व रोगांपासून अधिक टिकाऊ बनते.

एक मी अनुभवलेले व मार्गदर्शन केलेले आणि प्रत्यक्ष शेतकर्‍यानेही अनुभवलेले उदाहरण देतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या परिसरात एका शेतकर्‍याने पाच एकर क्षेत्रावरती गव्हाची लागवड केली होती. त्याने जी व्हरायटी म्हणजे गव्हाची जात वापरली होती तीच त्याच्या परिसरातील शेतकर्‍यांनी सुद्धा वापरलेली होती. गहू तयार होत असताना म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या परिसरात वादळामुळे मोठा पाऊस आणि सोसाट्याचा वारा झाला. त्या गावातील म्हणजेच परिसरातील सर्व शेतकर्‍यांचे बहुतांश गहू पीक हे आडवे झाले, जमिनीवरती लोळले आणि नुकसान झाले. परंतु ज्या शेतकर्‍यांने मार्गदर्शन घेतलं त्याचा मात्र एकही गव्हाचा ठोंब आडवा झाला नाही. सर्व पीक, संपूर्ण पाच एकर प्लॉट अगदी वादळ व पाऊस होऊनसुद्धा उभं होतं. त्या शेतकर्‍यावरती इतर शेतकर्‍यांनी प्रश्नांचा भडीमार केला की, तू आम्हाला न सांगता वेगळी जात वापरली आहेस. त्या शेतकर्‍याने खुलासा करून सर्व शेतकर्‍यांना पटवून दिले की, मी लावलेली जात आणि तुम्ही लावलेली गव्हाची जात एकसारखीच आहे. पण माझे गहू पीक मोठ्या सोसाट्याच्या वार्‍यात आणि पावसात आडवे झाले नाही याला कारण मी केलेली एक महत्त्वाची फवारणी होय. मी त्या शेतकर्‍याला सल्ला दिला होता की, पाण्यात विरघळणारे सिलिका बाजारात उपलब्ध आहे, ते स्वस्तही आहे. पाच मि.ली. प्रति लीटर याप्रमाणे त्या शेतकर्‍याने पाच एकरावरती पाच लीटर सिलिका फवारणी केली. याचाच परिणाम म्हणून त्या गव्हाच्या काड्यामध्ये कडकपणा आला. सोसाट्याच्या वार्‍यात ते टिकले आणि लोळले नाही. अशीही आहे सिलिकाची पिकामधील यशोगाथा.

मी आपणास सांगू इच्छितो की, हे पळींज दुर्लक्षित करू नका. टाकून देऊ नका. ते आत्ता साठवून ठेवा. गोण्यांमध्ये भरून बाजूला ठेवा. भात पिकामध्ये याचा वापर करा.

इथे आपण निसर्गाने जे दिलं आहे तेच आपल्या पिकासाठी पुन्हा वापरत आहोत. त्याचा पिकाच्या वाढीसाठी मोठा फायदा होत आहे. कोणतेही रसायन न वापरल्यामुळे आपली शेती, आपला निसर्ग, आपला परिसर, आपलं अन्न, कोणत्याही घातक रासायनिक अवशेषांच्या भेसळीपासून मुक्त राहणार आहे.

निवृत्त कृषी अणुजीव शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख, वनस्पती रोग शास्त्र कृषी महाविद्यालय, पुणे 411005.
 9022651287