अ वॉक टू रिमेम्बर, हृदयाला स्पर्श करणारी आजच्या काळातील नितळ प्रेमकथा

22 Nov 2025 12:06:29
 A Walk to Remember
निकोलस स्पार्कच्या गाजलेल्या कादंबरीवर A Walk to Remember हा सिनेमा बेतलेला आहे. या सिनेमातील कथा फक्त दोन मुलांच्या प्रेमापुरती संकुचित नाही. एका वयात येणार्‍या मुलाचा, पुरुष बनण्याकडे होणारा प्रवास, अपरिपक्वतेपासून प्रगल्भतेकडे होणारा प्रवास म्हणजे A Walk to Remember हा सिनेमा. एकूणात हा सिनेमा म्हणजे नितळ प्रेमाचे दर्शन होय.

 A Walk to Remember
 
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सैंयारा’ या चित्रपटाने नाही पण हा चित्रपट पाहणार्‍या प्रेक्षकांच्या प्रतिसादाने आणि प्रतिक्रियांनी चर्चेला तोंड फुटले होते. ही प्रेमकथा पाहताना अनेक मुलामुलींना रडू कोसळले, अनेकजण दुःखाच्या आवेगाने विव्हळ झाले तर काहींना थिएटरमध्येेच चक्कर आली. ह्या सर्वच प्रतिक्रिया काही रील्ससाठी नव्हत्या.
जनरेशन झी एवढी संवेदनशील आणि दुबळी कशी असू शकते या टीकेला दिलेल्या एका उत्तराने मात्र मला विचार करायला भाग पाडले.
आताच्या व्यावहारिक आणि आत्मकेंद्री जगात असे प्रेम असते हे न अनुभवलेल्या या पिढीने हे प्रेम बघून भारावून जाणे यात नवल वाटण्यासारखे काही नाही. जी गोष्ट दुर्मीळ असते ती हृदयाला भिडणे अगदी स्वाभाविक आहे.
 
माणसे एका रात्रीत बदलण्याच्या घटना तुम्ही पाहिल्या आहेत का?
 
माणसे अंतर्बाह्य बदलतात एवढी की आधीचे रूप खोटे वाटावे.
कधी अचानक झालेल्या आघाताने किंवा निरपेक्ष प्रेमाने. प्रेमात माणसे स्वतःला विसरतात म्हणून बदलणे शक्य होत असावे.
मी सैंयारा या सिनेमाबद्दल नाही पण याच पिढीच्या एका नितांत सुंदर गाजलेल्या प्रेमकथेचा परिचय करून देणार आहे.
चांगली, सज्जन, साधी मुलगी आणि उर्मट, असंवेदनशील, काहीसा हट्टी मुलगा. दोघांच्यात नावालाही साम्य नाही. दोघे भेटतात आणि प्रेमाचा दूत क्युपिड आपले काम करतो. वयात येणार्‍या मुलांच्या प्रेमाच्या गोष्टी अशाच तर असतात.
 
 
अ थरश्रज्ञ ीें ठशाशालशी काही अपवाद नाही पण फक्त दोन मुलांच्या प्रेमापुरती ही कथा संकुचित नाही. एका वयात येणार्‍या मुलाचा, पुरुष बनण्याकडे होणारा प्रवास, अपरिपक्वतेपासून प्रगल्भतेकडे होणारा प्रवास म्हणजे अ थरश्रज्ञ ीें ठशाशालशी हा सिनेमा.
 
नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणार्‍या लोकप्रिय आणि बंडखोर लँडन कार्टरकडून एक मोठी चूक होते. शाळेच्या मैदानावर दारू प्यायची परवानगी नसताना, तो आणि त्याचे मित्र दारू पिताना पकडले जातात आणि त्याच वेळी, एका मुलाची मस्करी करताना, तो मुलगा जबर जखमी होतो.
एकतर, तुला शाळेतून काढून टाकले जाईल. तसे नको असेल तर साफसफाई करणार्‍या सेवक वर्गाला तुला मदत करावी लागेल, अभ्यासात मागे असणार्‍या मुलांना शिकवावे लागेल आणि शाळेच्या नाटकात भाग घ्यावा लागेल. शाळेचे मुख्याध्यापक त्याच्यापुढे दोन पर्याय ठेवतात.
पहिला पर्याय घेऊन, आयुष्याची माती न करण्याएवढा लँडन शहाणा असतो. मनात नसूनही तो आपली शिक्षा भोगायला सुरुवात करतो. याच वेळी त्याची ओळख जेमी सलीवन या मुलीशी होते. खरेतर लहानपणापासूनच जेमी त्याच्या बरोबर शिकत असते पण स्वतःपलीकडे कुणालाच महत्व न देणार्‍या लँडनला तिचे अस्तित्व सुद्धा जाणवत नाही.
जेमीचे वडील येथील छोट्याशा चर्चमध्ये मिनिस्टर असतात. अत्यंत मध्यमवर्गीय आणि धार्मिक वातावरणात वाढलेली ही आईवेगळी मुलगी खूप साधी असते. लँडनच्या इतर मैत्रिणीहून वेगळी. मोजके कपडे, एकच स्वेटर, चेहेर्‍यावर मेकअपचा गंध नसलेली आणि शाळेच्या पुस्तकांबरोबर बायबल आणणारी ही मुलगी लँडन आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या चेष्टेचा विषय असते.
नाटकात काम तर मिळते पण संवाद पाठ करणे लँडनला जमत नाही. नाटकातले संवाद लक्षात ठेवण्यासाठी जेमी, लँडनला मदत करते पण एका अटीवर. ती सांगते. माझ्या प्रेमात पडू नकोस.
लँडन काय प्रेक्षक सुद्धा हसतात. शक्य तरी असते का ते!
प्रेम मात्र शक्यतेच्या पलीकडचा विचार करते. लँडन आणि जेमी, नाटकाचा सराव करताना एकमेकांच्या जवळ येतात पण हृदयाचे ऐकण्याची लँडनला सवय नसते. त्यात मित्रमंडळींचा त्याच्यावर असलेला प्रभाव. त्यांच्याबरोबर असताना तो जेमीची हेटाळणी करतो. जेमी दुखावली जाते आणि त्याच्याशी बोलणे बंद करते. नाटकाचा प्रयोग सुरू झाल्यावर मात्र स्टेजवर वावरणारी जेमी फारच वेगळी दिसते. अतिशय सुंदर, आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेली ती आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना जिंकून घेते.
लँडन प्रेमात नुसता पडत नाही तर कोसळतो.
जेमी मात्र त्याला टाळते. प्रेम मात्र लवकर हार मानत नाही. आतापर्यंत दिलेल्या त्रासाची भरपाई म्हणून लँडन, तिला सुंदर स्वेटर आणून देतो. तिच्या गंभीर चेहेर्‍यात बदल होत नाही पण तो गेल्यावर मात्र तिच्या ओठावर मंद स्मित उमटते.
“यांच्यापासून लांब रहा, तो चांगला मुलगा नाही.” असं वडील बजावतात.
“बाबा, फक्त स्वेटर आहे हा. नका काळजी करू.” ती सांगते खरी पण प्रेम, मनातील शंकेला जुमानत नाही.
“माझ्याबरोबर या शनिवारी बाहेर येशील का?” तो विचारतो.
“मला परवानगी मिळणार नाही.” ती सांगते.
प्रेम माणसाला धीट बनवते हे तर माहीत आहेच पण प्रेम मिळवण्यासाठी प्रेमी आपला अहंकार सोडायला तयार होतो. लँडन, जेमीच्या वडिलांकडे जाऊन तिला बाहेर नेण्याची परवानगी मागतो. हा संयम त्यालाही नव्याने उमगला आहे.
असे म्हणतात, प्रेम ही एक भावना आहे. आहेच पण नाते जुळत असताना, जेव्हा तुम्ही ही पायरी ओलांडता तेव्हा शब्दांबरोबर कृतीला महत्व येते. प्रेमाचा पहिला धडा असतो, जिच्यावर प्रेम आहे तिला समजून घेणे. अ थरश्रज्ञ ीें ठशाशालशी मधला हा सीन फार सुंदर आहे.
शनिवारची संध्याकाळ. समुद्राजवळचे एक छोटेसे हॉटेल. शहरातील उच्चभ्रू माणसे जमली आहेत. इथे येण्याची लँडनला सवय असेल पण जेमी बरोबरचा तो मात्र वेगळा आहे.
नेहमी स्वतःला काय हवे याची पक्की जाणीव असणारा तो, आज तिच्यासाठी म्हणून त्याला न आवडणारा गोड चहा सहज घेतो, तिच्याबरोबर नृत्य करतो. तिच्या साध्या कपड्यांची त्याला तमा नाही आणि त्याचे तिचे मन जपणे एवढे सहज आहे की सुरुवातीचे असलेले अवघडलेपण आता पळून जाते.
तिची, तिच्यासारखीच साधी बकेट लिस्ट असते. एक टॅट्यू काढणे, एकाच वेळी दोन ठिकाणी उपस्थित राहणे आणि धूमकेतू पाहणे.
“तुझी काय इच्छा आहे?” ती त्याला विचारते.
“मला या शहरातून बाहेर पडायचे आहे.” तो आता मात्र गंभीर होतो .
“या शहरातून बाहेर पडणे ही तुझी समस्या नाही आहे लँडन. तू बाहेर पडून काय करणार आहेस, हे तुला ठरवायचे आहे आणि तेच तुला समजत नाही आहे. हीच तर तुझी समस्या आहे.”
प्रेम समजून घेते. प्रेम तुम्हाला उत्तर देते, प्रेम दिशा दाखवते, प्रेम चेहर्‍यावरचा मुखवटा अलगद दूर करते, प्रेम तुमच्या आतला माणूस बाहेर काढते आणि तो किती सुंदर आहे ह्याचा आरसा दाखवते. प्रेम तुम्हाला सुधारायची संधी देते.
जेमीवर आपले प्रेम का आहे हे लँडनला त्या क्षणी समजून चुकते.
आतापर्यंत आयुष्याचा कसलाही विचार न करणारा लँडन, मेडिकल कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी अभ्यासाला लागतो. पहिल्यांदाच स्वतःच्या मनाचा कौल घेतो. जेमीबरोबर आयुष्याची स्वप्ने रंगवताना मात्र त्याला समजते, त्याला दिशा दाखवणारी जेमी काही दिवसांचीच सोबतीण आहे. जेमी रक्ताच्या कर्करोगाने आजारी असते.
हे ऐकून हताश झालेला लँडन आपल्या वडिलांची भेट घेतो. लँडनच्या आईवडिलांचा घटस्फोट झालेला असतो. ह्या घटस्फोटासाठी लँडनने आपल्या वडिलांना दोषी मानल्याने अनेक वर्ष तो त्यांच्याशी बोलत नसतो पण जेमीसाठी मात्र आपला इगो बाजूला ठेवून तो वडिलांना भेटतो पण जेमीचा आजार बरा करणे त्यांच्याही हातात नसते.
अ थरश्रज्ञ ीें ठशाशालशी या सिनेमातल्या नायकाच्या बाह्य आयुष्यात काही खास घडत नाही. काही घडवण्याची त्याला महत्वाकांक्षा सुद्धा नाही. एका भरकटलेल्या पतंगासारखे त्याचे आयुष्य आहे पण एका मुलीच्या भेटीने त्याला स्वतःच्या अंत:करणात डोकवायची संधी मिळते.
मूल्ये, कर्तव्य आणि जबाबदारी ह्या सर्वच पातळीवर आपण किती कमी पडतो आहे हे त्याला जाणवते. खजील होऊन तो स्वत:ला बदलायचा प्रयत्न करतो. या सर्व प्रवासात जेमी त्याच्या बरोबर असते आणि त्याचवेळी तिचा स्वतःचा अनंताकडे जाण्याचा प्रवास सुरु झालेला असतो. आता या शेवटच्या प्रवासात न डगमगता तिला सोबत करण्याची जबाबदारी लँडनवर असते.
निकोलस स्पार्कच्या गाजलेल्या कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला आहे. निर्णय घेताना हृदयाचे न ऐकता बुद्धीचा कौल घ्यावा असे आपण म्हणतो खरे पण हृदयाने घेतलेला निर्णय हा मनाचा कौल असतो हे निकोलस स्पार्क या नितळ प्रेमकथेतून दाखवून देतो.
Powered By Sangraha 9.0